Aug 13, 2020

जरी त्रिकाली म्हणसी ‘ करुणात्रिपदी ’ तरी - पद क्र. २


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

करुणात्रिपदी दुसरें पद : श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आता ।। ध्रु. ।। चोरें द्विजासी मारीतां मन जें । कळवळलें तें कळवळो आतां ।। श्रीगुरुदत्ता ।।१।। पोटशूळानें द्विज तडफडतां । कळवळलें तें कळवळो आतां ।। श्रीगुरुदत्ता ।।२।। द्विजसुत मरता वळलें तें मन । हो कीं उदासीन न वळे आतां ।। श्रीगुरुदत्ता।।३।। सतिपति मरता काकुळती येतां । वळलें तें मन न वळे कीं आतां ।। श्रीगुरुदत्ता।।४।। श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता । कोमल चित्ता वळवी आतां ।। श्रीगुरुदत्ता।।५।।

मराठी विवरण :- डॉ. वा. व्यं. देशमुख

श्रीगुरुदत्ता जय भगवंता I ते मन निष्ठुर न करी आता ।। ध्रु. ।। प्रथम पदात श्रीस्वामीमहाराजांनी भक्ताचा पक्ष मांडला आहे. अपराधांचा कबुलीजबाब देऊन दत्तप्रभूंच्या दयेची याचना केली आहे. त्या तीनही पदांचा रोख केवळ देवाकडे किंवा भक्तांकडे नाही. भक्तांच्या वतीने देवाची आळवणी करतांनाच, भक्ताला आत्मपरीक्षणाला, आपल्या चुका सुधारण्याला आणि परमेश्वराच्या इच्छेला शरण जाण्याला प्रवृत्त केले आहे. दुसऱ्या पदात असे दिसते की भक्ताविषयीच्या देवाच्या साहजिक (inherent) अनुकंपेला आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या भक्त रक्षणाचे दाखले दिले आहेत. याचाच दुसरा परिणाम भक्ताची श्रद्धा आणि भाव दृढ करण्यात होतो. पूर्वीच्या भक्तांना आलेले अनुभव स्मरून आपली भक्ती पुष्ट करावी, आपले देवाशी नाते अधिक घट्ट करावे असाच उपदेश श्रीमहाराज करीत आहेत. त्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी दासाच्या शासनासाठी धारण केलेली कठोरता टाकावी, अशी प्रार्थना केली आहे. त्यासाठी गुरुचरित्रातल्या काही काही प्रातिनिधिक घटनांचा आधार घेतला आहे.

चोरें द्विजासी मरितां मन जे I कळवळलें ते कळवळो आतां ।। १ ।। श्रीपादवल्लभांनी पुढचा (नरसिंहसरस्वती) अवतार घेण्यासाठी आपला वर्तमान लीलादेह अदृश्य केला, तरी ते सूक्ष्मरूपाने कुरुगुड्डीला राहिले आहेत असे सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले. तेव्हा त्याचा एखादा दाखला सांगावा अशा नामधारकाच्या प्रार्थनेनंतर ही कथा सिद्धमुनी सांगत आहेत. वल्लभेश नावाचा श्रीवल्लभांचा निस्सीम ब्राह्मणभक्त वाणिज्यवृत्तीने जीविका चालवी. एकदा व्यापारासाठी तो फिरतीवर निघताना त्याने नवस केला की मला व्यापारात जेवढा लाभ होईल त्या प्रमाणात मी कुरुगड्डीला येऊन ब्राह्मणभोजन करीन. त्याला श्रीगुरुकृपेने अकल्पित प्रमाणात खूप पैसा मिळाला. तेव्हा एक हजार ब्राह्मणांना भोजन देण्याचा संकल्प करून तो नवस फेडण्यासाठी पुरेसे धन घेऊन निघाला. वाटेत त्याला ठगांनी गाठले व आपणही श्रीपादगुरूंचे भक्त असल्याचे नाटक करून त्याचा बरोबर निघाले. मार्गावर, निर्जन ठिकाणी त्यांनी त्याचे धन हडपण्यासाठी त्याला ठार केले. त्यावेळी भक्तवत्सल गुरुनाथ एका शूलधारी तापसाच्या वेषाने तिथे प्रकटले. त्यांनी त्या ठगांचा वध केला. त्यात एकजण त्यांना सामील नसल्याने त्याला निर्दोष जाणून श्रीपादप्रभूंनी जिवंत ठेवले आणि त्याला भस्म देऊन वल्लभेशाचे मुंडके जोडून त्या धडाच्या ठिकाणी ते लावायला सांगितले. त्याने तसे करताच वल्लभेश जिवंत झाला व त्याचवेळी श्रीपादप्रभू अंतर्धान पावले. नंतर त्याने कुरुगड्डीला जाऊन आपला सहस्त्रभोजनाचा संकल्प पूर्ण केला. 'त्या वल्लभेशाच्या संकटकाळी जसे आपले चित्त द्रवले, हे भगवंता त्याचप्रमाणे आता आमच्यासाठी पाझरो.'

पोटशूळानें द्विज तडफडता I कळवळलें ते कळवळो आतां ।। २ ।। श्रीगुरु नृसिंहसरस्वती गोदावरीतीरावर संचार करीत असता बासर ( वासर ब्रह्मेश्वर ) येथे त्यांना गळ्यात धोंडा बांधून आत्महत्येला उद्युक्त झालेला कोणी ब्राह्मण दिसला. आपल्या शिष्यांना सांगून दयासागर प्रभूंनी त्या पोटशूळाने तडफडणाऱ्या दीनवाण्या रुग्णाला "का असे दुःसाहस करीत आहेस?" असे विचारले. तो उत्तरला, "मला हे विचारून काय उपयोग? माझा दु:खनाश तुम्ही कराल काय? अन्नाचा वैरी असलेला हा पोटशूळ नावाचा विकार आता अगदी सोसवत नाही. मी कसा जगूं ?" श्रीगुरु त्याला म्हणाले, भिऊ नकोस! मी वैद्य आहे. अन्न पचावे असे दिव्या औषध मी तुला देतो." असे श्रीगुरु बोलतात तोच त्यांच्याकडे सायंदेव नावाचा, ब्राह्मण शासकीय अधिकारी आला. त्याला श्रीगुरूंनी त्या शूलग्रस्ताला पथ्य म्हणून पंचपक्वान्नाचे जेवण द्यायला सांगितले. सायंदेव म्हणाले, "ह्याने महिन्या-पंधरवड्याला कधीतरी अन्न खाल्ले तरी भयंकर वेदना होतात. मी अन्न दिले तर न जाणो , त्याचे काही बरेवाईट झाले तर मला ब्रह्महत्येचे पाप लागेल, अशी भीती वाटते." श्रीगुरूंच्या आश्वासनानंतर सायंदेवाने ते मान्य करून श्रीगुरूंनीही शिष्यांसह आपल्या घरी भिक्षा घ्यावी अशी विनंती केली. श्रीगुरूंनी ती मान्य करून त्याच्या घरी भिक्षा घेतली. त्यांच्या पंक्तीला पोटभर भोजन करून तो गृहस्थ त्या दीर्घकालीन रोगापासून तर मुक्त झालाच पण भवव्याधीपासूनही मुक्त झाला. ' त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाच्या वेदना पाहून जसे आपले चित्त कळवळले तसेच आम्हा त्रिविध तापग्रस्तांसाठीही कळवळू द्या. ' अशी प्रार्थना केली आहे.

द्विजसुत मरता वळलें ते मन I हो किं उदासीन न वळे आता ।। ३ ।। हा तिसरा दृष्टांत शिरोळच्या स्त्रीचा आहे. तिची मुले गर्भातच किंवा जन्मानंतर लगेच मरण पावत. तिने तिथल्या एका जाणत्या ब्राह्मणाला आपली मुले वाचविण्याचा उपाय विचारला. त्या ब्राह्मणाने सांगितले, "तू पूर्वजन्मी एका शौनकगोत्रीय ब्राह्मणाचे पैसे लुबाडले. तोच आता पिशाच होऊन तुझी बाळे मारीत आहे. " त्या संत्रस्त सतीने त्यावर उपाय विचारला असता तो ब्राह्मण म्हणाला, " त्या पिशाच झालेल्या ब्राह्मणाचे शास्त्रोक्त पिंडदानादि अंत्यक, नारायणनागबळी इत्यादि तुझ्या पतीकडून करवून घे. तसेच प्रतिदिन एक महिनाभर कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमात न्हाऊन आणि अष्टतीर्थ स्नाने करून श्रीगुरूंच्या पादुकांची तसेच औदुंबरवृक्षाची विधिपूर्वक पूजा कर. मग सांगता करून, त्या प्रेताच्या शांतीसाठी शौनकगोत्राच्या एखाद्या ब्राह्मणाला शंभर रौप्य मुद्रांचे दान कर म्हणजे तुझ्या पापाची निष्कृती होईल." ' शंभर रौप्यमुद्रा मी कुठून आणू ? मात्र एक महिनाभर मनोभावे मी सद्गुरूंची पूजा करीन. तो हरीच माझे या पिशाचाच्या बाधेपासून रक्षण करो,' असा मनोमन निश्चय करून त्या ब्राह्मणीने आपल्या पतीसह औदुंबराखाली पादुकांची आराधना सुरु केली. तीन दिवसांनी एक ब्रह्मसमंध तिच्या स्वप्नात येऊन भीती दाखवून तिचे पूर्वजन्मी लुबाडलेले धन मागू लागला. त्या भयभीत सतीला औदुंबराच्या मुळापाशी श्रीगुरुंचे दर्शन झाले. त्यांनी त्या पिशाचाला दरडावून त्या ब्राह्मणीला तिच्या संततीचा नाश करून त्रास देण्याचे कारण विचारले. तो समंध उत्तरला," अहो यतिराज, आपल्यासारख्या संन्याशाला हा पक्षपात शोभत नाही. ह्या स्त्रीने लुबाडलेल्या माझ्या धनाच्या लोभाने मी या अमंगळ योनीत आलो." श्रीगुरूंनी त्याला विचारले, " या दरिद्री स्त्रीचा छळ करून तुझी या योनीतून सुटका होईल का? माझे ऐक, ती तिच्या ऐपतीप्रमाणे तुझे अंत्यसंस्कार करील आणि यथाशक्ती तुझ्या गोत्राच्या ब्राह्मणाला द्रव्य देईल. मी तुला या गलिच्छ योनीतून मुक्ती देईन." श्रीगुरुंचे म्हणणे मान्य करून त्या दंपतीने क्रियाकर्म केल्यावर पिशाच्चाला गती मिळाली आणि त्या स्त्रीला लवकरच जुळे मुलगे झाले. पुढे योग्यवेळी ज्येष्ठ मुलाच्या मुंजीची तयारी करत असतानाच अचानक धनुर्वाताने तो मुलगा मरण पावला. त्याची माता डोके व छाती पिटीत जोरजोराने रडू लागली. पुत्रशोकाने वेडी होऊन ती माता त्याला उद्देशून बोलू लागली. त्याचे गुण आठवून आक्रोश करू लागली. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना त्या प्रेताला हातही लावू देईना, ' माझेही त्याच्याबरोबर दहन करा. ' असे म्हणू लागली.गावातील मंडळीसमोर एक मोठेच संकट उभे राहिले. त्या बाळाचे संस्कार झाल्याशिवाय गावात चूल पेटू शकत नव्हती. ती दुःखाने बेभान झालेली सती कोणाचेही ऐकेना. त्यावेळी एक फिरस्ता तापसी अचानक तेथे आला. त्याने त्या स्त्रीला अध्यात्माचा उपदेश केला. पण तिचा एकच हेका,' मला श्रीगुरूंनी स्थिर म्हणून दिलेले कसे नष्ट झाले ? आता त्यांच्यावर कोण भरवसा करील ?' त्या साधूने तिला जिथे वर मिळाला तिथेच जाऊन विचारायला सांगितले. साधूचे बोलणे ऐकून ती सती आपल्या पुत्राचे शव घेऊन सद्गुरुंच्या मंदिरात गेली. त्या शोक आणि संतापाने त्रस्त स्त्रीने तिचे पादुकांवर डोके आपटून घेतले आणि पादुका रक्ताने भिजवल्या. अशा प्रकारे तिने रात्रीपर्यंत शोक केला आणि अंत्यसंस्कारासाठी ते प्रेत दिले नाही त्यामुळे वाट पाहून सगळे घरी गेले. ते दोघे पतिपत्नी मात्र तिथेच राहिले. थोड्या वेळाने रात्री तिला झोप लागली. स्वप्नात तिला श्रीगुरुंचे दर्शन दर्शन झाले. ते तिला म्हणाले," बाई का माझ्यावर रागावलीस? मी काय तुझे अहित केले आहे? तुझ्या मुलाचा गेलेला प्राण मी पूर्वव्रत जागच्या जागी आणून ठेवला आहे. आता तो मृत नाही. तेव्हा तू आता शोक सोड." हे स्वप्न पाहून ती साध्वी जागी होऊन पाहते तर तिचा मुलगा उठून बसला होता. ते पाहून तिच्या मनातल्या शोकाची जागा आनंदाने घेतली. ओठांवर हसू आणि डोळ्यांत पाणी अशी काहीशी तिची अवस्था झाली. तिने प्रेमाने आपल्या पतीला हाक मारली. त्यानेही उठून आपल्या भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन रडणाऱ्या मुलाला होऊन जवळ घेतले आणि परमेश्वराची स्तुती केली. तेवढ्यात सर्व गावकरी तेथे आले. सर्वानी पादुकारूपी भगवंताची महापूजा करून समाराधना केली. ' हे प्रभो, त्या ब्राह्मणीच्या पुत्रशोकाने पाझरलेले आपले मन आत्ताच कसे उदासीन झाले? ' असा प्रश्न श्रीमहाराज विचारीत आहेत.

सतिपति मरता काकुळती येता I वळलें ते मन न वळे कीं आतां ।। ४ ।। ही माहूरच्या गोपीनाथाला नवसाने झालेल्या दत्त नावाच्या मुलाची पत्नी, सावित्री हिची गोष्ट आहे. अगदी लहान वयातच असाध्य क्षयाची बाधा झालेल्या पतीला सर्व उपाय निष्फल झाल्यावर ही षोडशा, सासूसासऱ्यांची आज्ञा घेऊन श्रीगुरुंची कीर्ती ऐकून गाणगापूरला आली. वेशीत पाऊल ठेवताच पतीने प्राण सोडले. शोकविव्हल सावित्रीने बरोबर आणलेल्या खंजीराने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण जवळच्या लोकांच्या सावधानतेने तो फसला. ती धाय मोकलून रडू लागली. बेभान होऊन पतीला उठवू लागली. अंगावरची वस्त्रे फाडू लागली. अशावेळी एक जटाधरी तापसी तिथे येऊन तिचे सांत्वन करू लागला. तिला त्याने अध्यात्माचा उपदेश केला. वयाने लहान असली तरी सावित्रीने आपल्या पातिव्रत्याने चित्त शुद्ध केले होते. त्या अधिकारी गुरूने केलेला उपदेश तिच्या मनात ठसला. जगाची आणि जीवनाची नश्वरता पटली. त्या साधूकडून तिने स्त्रियांचे धर्म जाणून घेतले. त्याने सहगमन आणि विधवाधर्म हे दोन पर्याय तिच्या पुढे ठेवले. तिने सहगमनाचा पर्याय स्वीकारला. साधूने दिलेले चार रुद्राक्ष पतीच्या गळ्यात घालून, सुवासिनींना वाणे देऊन ती सहगमनाला निघाली. तेव्हा इतक्या आल्यासारखे श्रीगुरुंचे दर्शन तरी घ्यावे, ह्या विचाराने ती संगमावर श्रीगुरुंकडे आली. सर्व सौभाग्यचिन्हे धारण केलेल्या त्या तरुण मुलीला पाहताच श्रीगुरूंनी ' सौभाग्यवती भव! ' असा आशीर्वाद दिला. तिच्यासह सर्व लोक चमकून पाहीपर्यंत श्रीगुरूंनी ' अष्टपुत्रा हो! ' असाही वर दिला. उपस्थित लोकांनी त्यांना सांगितले, " महाराज हिचा पती मृत झाला असून ही सहगमनाला सिद्ध झाली आहे." त्यावर श्रीगुरु म्हणाले. " आमचे वचन वाया जाणार नाही. तिच्या पतीचा देह इथे आणा. पाहू केव्हा प्राण गेला आहे? " लोकांनी आणलेल्या शवाच्या मुखात आपल्या पादुकांवरील रुद्राभिषेकाचे तीर्थ घालण्याची आज्ञा श्रीगुरूंनी केली. तसे करताच तो झोपेतून सावध झाल्यासारखा उठून बसला. सर्व भक्तांनी श्रीगुरुंचा जयजयकार केला. त्या दांपत्याने त्यांची प्रार्थनापूर्वक पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा आशीर्वाद दिला. ' त्या बालिकेच्या आर्त शोकाने कळवळलेले मन आमच्यासाठी द्रवणार नाही का ? ' असा करुण प्रश्न श्रीस्वामीमहाराज विचारीत आहेत.

श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता I कोमल चित्ता वळवी आतां ।। ५ ।। या पदात श्रीदत्तप्रभूंची आर्त आळवणी आणि दत्तभक्ताच्या श्रद्धेचा परिपोष आहेतच, पण आणखी एक महत्वाचा पैलू आहे. तो म्हणजे श्रीदत्तगुरुंच्या लीला आणि गुणांचे वर्णन आहे. भक्तिमार्गात भगवल्लीलांच्या स्मरण , कीर्तन आणि श्रवण यांना अनन्यसाधारण महत्व आहे. ' स्वलीलया त्वं हि जनान पुनासि, तन्मे स्वलीलाश्रवण प्रयच्छ ' असे स्वामीमहाराज ' दत्तभावसुधारसात ' म्हणतात. त्यासाठीच कदाचित त्यांनी ह्या पदाची मध्यवर्ती योजना केली असावी. एकाच वेळी श्रीदत्तगुरुंच्या अनुकंपेची आवाहन, दत्तभक्तांच्या श्रद्धेची पुष्टी आणि चित्तशुद्धी असा तिहेरी लाभ यातून मिळतो. या सर्व उदाहरणांतून भगवान दत्तात्रेयांचे अंतःकरण मूलतः लोण्याहून मऊ आहे, काठिण्य हा केवळ बाह्य देखावा आहे मात्र आहे, हेच स्पष्ट केले आहे. ' ती वरपांगी कठोरता टाकून आम्हा शरणागतांवर आपल्या करुणेचा वर्षाव करावा. ' अशी प्रार्थना करून पदाचा समारोप केला आहे.

मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ - श्री वासुदेव निवास, पुणे क्रमश:



No comments:

Post a Comment