Showing posts with label श्री गजानन विजय कथामृत. Show all posts
Showing posts with label श्री गजानन विजय कथामृत. Show all posts

Sep 2, 2025

स्वामी माधवानंदविरचित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्रीगजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता भाविकांना श्रीगजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतुकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजाननभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

याच दिव्य पोथीचे विवरण करणारा स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथ श्रीगजानन महाराजांच्या असंख्य लीलांचे, सद्‌गुरु श्रीगजाननांच्या उपदेशपर शिकवणीचे आणि समर्थांच्या भक्तांच्या भावपूर्ण अंतःकरणाचे अनेक विलोभनीय पैलू उलगडून दाखवतो. गजाननभक्तांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा, त्यातील सूक्ष्म अर्थांचे नित्य मनन-चिंतन करावे जेणेकरून श्रीगजानन विजय पोथीवाचन केवळ वाचनमात्र न राहता, भाविकांना आंतरिक समाधान तर निश्चित लाभेलच, तसेच महाराज सदैव आपल्यासोबतच आहेत अशी दृढ धारणादेखील होईल.

स्वामी माधवानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे डॉ. माधव बाळकृष्ण नगरकर. हे आदिनाथ, श्रीदत्तात्रेय, श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ, श्रीजालंदरनाथ यांच्यापासून सुरु झालेल्या आणि पुढे श्रीज्ञानेश्वर महाराज तसेच स्वामी स्वरूपानंद (पावस), स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या परंपरेतील ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी होते. अनेक संत-महात्मे यांचे वाङ्मय तसेच विविध पौराणिक कथा व स्तोत्र यांवर त्यांनी निरूपणपर लेखन केले आहे. त्यांतून व्यक्त होणारा बोध, भावार्थ आणि वाचकांना मनन करण्यास प्रेरित करणारे सोदाहरण विश्लेषण हे स्वामी माधवानंदलिखित साहित्याचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथदेखील याला अपवाद नाही. या ग्रंथाविषयी स्वामी माधवानंद लिहितात - गजानन महाराजांच्या भक्तांच्या अंतःकरणाची विलोभनीयता आणि महाराजांना द्यायची असलेली शिकवण यांवर विशेष प्रकाशझोत टाकून, चमत्कारांनी दिपलेल्या डोळ्यांना हे सर्व दिसेल, माणूस त्यांतून स्वतःसाठी योगज्ञानाच्या प्रेरणा आणि 'श्रीगजानन विजय' ग्रंथातील भक्तिरसाचा आस्वाद घेऊ शकेल यासाठी श्रीगजानन महाराजांनी हा ग्रंथ त्याच्या नावाच्या स्फुरणासह प्रकट केला अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.

  स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा विवरण ग्रंथ इथे ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. सर्व गजाननभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

  " देवा, उपासना तुझी आहे. तुझ्या इच्छेने, तुझ्या प्रेरणेने आणि तुझ्या शक्तीनेच ही चालली आहे. कर्ता आणि करविता तूच आहेस. या उपासनेतून हे देवा, तू मला तुझ्या दर्शनासाठी योग्य करून घ्यावेस. याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. ऐहिक गोष्टींच्या बाबतीत जी तुझी इच्छा तीच माझी इच्छा !", याच ग्रंथातील ही अनन्यशरणागत भावयुक्त प्रार्थना करून ही लेखनसेवा श्रीगजानन महाराजांच्या दिव्य चरणीं रुजू व्हावी, हेच मागणे गुरुवरा !

श्रीगजानन महाराजार्पणमस्तु   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Feb 19, 2025

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १३


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अखिल संतमंडळींना वरदान देणाऱ्या श्रीधरा, हे करुणेच्या सागरा, हे गोप-गोपींना अतिप्रिय असणाऱ्या गोपाळा, हे तमालनीळा श्रीहरी माझ्यावर कृपा कर.॥१॥ तुझ्या ईशत्वाची कसोटी घेण्यासाठी जेव्हा ब्रह्मदेवाने यमुनातीरावरील गोकुळातील सर्व गाई-वासरें चोरली, तेंव्हा तू आपली निजलीला दाखविलीस आणि स्वतःच गाई-वासरांचे रूप घेतलेस. अशा रितीनें, तू त्या सृष्टीकर्त्यालाच आपलें परब्रह्मस्वरूप दाखविलेस.॥२-३॥ यमुनेत वास्तव्य करणाऱ्या दुष्ट कालियाचे मर्दन केले. मात्र, त्याला अभय देऊन रमणकद्वीपास स्थलांतर करण्यास सांगितले आणि सर्व गोप-गोपी भयमुक्त केलेस.॥४॥ हे वासुदेवा, असाच माझ्या दुर्दैवाचा समूळ नाश करून या दासगणूलादेखील सर्वत: निर्भय करावे.॥५॥ हे श्रीहरी, मी तुझा एक अज्ञानी, काहीही योग्यता नसलेला असा भक्त आहे. मी तुझ्या कृपाप्रसादास देखील पात्र नाही. तरीही हे प्रभू, तुम्ही माझ्यावर कृपा करा.॥६॥ आणि हे जरी सत्य असलें, तरी तू माझा अंत पाहू नकोस. हे परमेश्वरा, तुझा केवळ एक कृपाकटाक्ष टाकून माझ्या अवघ्या चिंता दूर कर.॥७॥ श्रोतें हो, आतां एकाग्र चित्त करा. बंकट, हरी, लक्ष्मण, विठू, जगदेव आणि इतर काही भक्तमंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरु केले.॥८॥ भाविक जनांनी मोठ्या आनंदाने वर्गणी दिली. मात्र काही टवाळखोर कुत्सितपणें बोलू लागले, " तुमच्या या साधू महाराजांना वर्गणीची गरज का भासली ?॥९॥ गजानन महाराज हे अशक्यही सहजप्राय शक्य करून दाखविणारे महान संतपुरुष आहेत, असा तुमचा विश्वास आहे ना ? मग त्यांच्या मठबांधणीसाठी वर्गणी मागण्याची गरज काय ?॥१०॥ अहो, प्रत्यक्ष कुबेर त्यांचा भंडारी आहे ना ? मग तुम्ही उगाच का असे दारोदारी वर्गणी मागत फिरत आहात ? कुबेरावरच हुंडी काढा, म्हणजे तुमचे काम होईल."॥११॥ त्या टवाळ लोकांचे हे बोलणें ऐकून जगदेव हसत म्हणाला," केवळ तुमचे भलें व्हावे, हेच हे वर्गणीरूपी दान मागण्याचे कारण आहे.॥१२॥ हे मठ उभारणीचे शुभ कार्य मुळातच श्री गजानन महाराजांसाठी नाहीच मुळी ! तर तुमचे कल्याण होण्यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.॥१३॥ हे अवघें त्रैलोक्य त्या स्वामी गजाननाचेच आहे, तोच त्यांचा मठ आहे. त्यांचा बाग-बगीचा म्हणजे या भूतलांवरील सर्व वनराई ! ही धरां हाच त्यांचा पलंग आहे.॥१४॥ अहो, अष्टसिद्धी ज्याच्या घरीं दासी होऊन राबत असतात, त्याचे अवघें वैभव खचितच निराळें आहे. त्याला तुम्ही दिलेल्या देणगीची आवश्यकताच नाही.॥१५॥ त्या प्रत्यक्ष सूर्यनारायणाला, या नभांत तळपणाऱ्या भास्कराला अंधाराचा नाश करण्यासाठी कधी एखादा दिवा आपला प्रकाश देतो काय ?॥१६॥ तो रवी स्वतःच इतका दैदीप्यमान, तेजस्वी आहे की त्याला त्या दीपाची मुळीच गरज नाही. सार्वभौमपद भूषविणारे का कधी शिपाई/जासूद होतील काय ?॥१७॥ मात्र सर्वसाधारण मनुष्याची जी ऐहिक वैभवप्राप्तीची अभिलाषा असते, ती या पुण्यकृत्यानें अवश्य फळास येईल.॥१८॥ औषधाचे प्रयोजन हे रोग परिहार करण्यासाठी असते. ते काही प्राणासाठी नसते, हे प्रथम लक्षांत घ्या.॥१९॥ रोग हा शरीरास हानिकारक असतो. त्यापासून प्राणास मुळीच भय नसते. खरें तर, प्राणास जन्म-मरणाचेही भय नसते.॥२०॥ त्याचप्रमाणें, तुमच्या या समृद्धीचे, ऐहिक वैभवाचे रक्षण होण्यासाठी या पुण्यरूप औषधीचे सेवन करणे जरुरी आहे.॥२१॥ अशी संपन्नता हे जर शरीर मानल्यास अनाचार अर्थात दुष्कृत्यें म्हणजे त्या शरीरास होणारे रोग आहेत. त्या व्याधींचा समूळ नायनाट केवळ ही पुण्यरूप औषधीं घेतली असता होईल.॥२२॥ म्हणूनच लोकहो, कुठल्याही शंका मनांत ना आणता या पुण्यसंचयाची ही पर्वणी साधून घ्या. हे पुण्यबीज या भूमीत पेरा, आणि सहस्रपटींनी ही  आपली संपत्ती वृद्धिंगत करा.॥२३॥ कुठलेही बीज जर खडकावर पेरले, तर ते निःसंशय वाया जाते. त्या खडकावर ते बीज कधीच अंकुरित होऊ शकत नाही, हे अवश्य लक्षात घ्यावें.॥२४॥ त्याचप्रमाणें, कुकर्मे, दुष्ट वासना यांही खडकांप्रमाणेच असतात. तेथे जर बीज पेरले, तर शंकारूपी किडे-पांखरें ते सर्व बीज खातात.॥२५॥ थोर संतांच्या सेवेइतकें इतर दुसरें कुठलेही पुण्यकर्म नाही. आणि स्वामी गजानन हे तर सर्व संतांचे मुगुटमणी आहेत.॥२६॥ संतकार्यासाठी काही दान केले असता त्याचे अगणित पटींनी फळ मिळते. जमिनीत एखादे बीज पेरले तरी त्यापासून अनेक कणसें निर्माण होतात.॥२७॥ त्या कणसांचे असंख्य दाणे हे केवळ एका बीजापासून तयार झालेले असतात. सज्जनहो, पुण्याचेही अगदी त्याचप्रमाणे आहे, हे कधीही विसरू नका.॥२८॥ हे बोलणें ऐकून कुत्सित खरोखरच निरुत्तर झाले. जिथे परमसत्य असे श्रेष्ठ तत्त्व असते, तिथे तर्कास मुळीच वाव नसतो.॥२९॥ कुशल, चतुर नेता असल्यावर वर्गणी विपुल प्रमाणात गोळा होते. एखाद्या क्षुल्लक व्यक्तीकडून मात्र हे वर्गणीचे कार्य सफल होणे शक्य नाही.॥३०॥ असो. मंजूर झालेल्या जागेवर कोट बांधण्याचे कार्य त्वरेनें सुरु झाले. सर्व शेगांववासी झटू लागल्यावर कशाची कमी पडणार ?॥३१॥ शेगांवी हे कोटाचे बांधकाम सुरु असतांना दगड, चुना, रेती आदि सामान गाड्यांतून आणले जात होते.॥३२॥ त्यावेळी समर्थांची स्वारी जुन्या मठातच वास्तव्यास होती. एकदा, त्यांच्या मनांत एक विचार आला.॥३३॥ आपण स्वतः तिथे बसल्याशिवाय मठाचे बांधकाम झपाट्यानें होणार नाही. असा विचार करून समर्थांनी काय केले ते श्रोतेहो, तुम्ही आता ऐका.॥३४॥ तिथेच असलेल्या एका रेतीच्या गाडीवर समर्थ जाऊन बसले. त्या गाडीचा वाहक, गाडीवान महार होता, तो पटकन त्या गाडीवरून खाली उतरला.॥३५॥ ते पाहून महाराज त्याला म्हणाले, " का रे बाबा, तू खाली उतरलास ? आम्ही परमहंस आहोत, आम्हांस विटाळ वगैरेंची बाधा होत नाही.॥३६॥ त्यावर तो महार म्हणाला, " महाराज, या गाडीवर तुमच्या शेजारी बसणे हे मला काही योग्य वाटत नाही.॥३७॥ मारुतीराया रामभक्ती करून रामस्वरूपास प्राप्त झाला, पण तो कधीच श्रीरामांच्या शेजारी बसला नाही. तर तो नेहेमीच श्रीरामांपुढे आपले दोन्ही हात जोडून एखाद्या दासाप्रमाणे उभा राहिला."॥३८॥ ( त्यावर महाराज हसत बोलले,) बरें बापा ! जशी तुझी इच्छा. माझी त्यास काहीच हरकत नाही. बैलांनो, तुम्ही आता तुमच्या गाडीवाल्याच्या मागोमाग नीट चला.॥३९॥ समर्थांच्या आज्ञेचे बैलांनीही पालन केले. गाडीवान त्यांना हाकत नसला तरी मार्गांत कुठेही न बुजता, ते बांधकामाच्या ठिकाणीं अगदी व्यवस्थित आले.॥४०॥ मग समर्थ गाडीवरून खाली उतरले आणि त्या जागेच्या मध्यभागीं येऊन बसले. त्याच ठिकाणीं, त्यांची भव्य समाधी बांधली गेली.॥४१॥ ही जागा सर्व्हे क्रमांक सातशेमध्यें असून भूखंड क्रमांक त्रेचाळीस आणि पंचेचाळीस यांचा त्यांत समावेश आहे.॥४२॥ महाराज येऊन ज्या ठिकाणी बसले, तीच जागा मध्यभागीं यावी असे बांधकाम कारभाऱ्यांना वाटले. त्याकरिता, त्या  कुशल कारभाऱ्यांनी त्या दोन क्रमांकाच्या भूखंडातून थोडी जागा घेऊन मठाचा मध्य साधला.॥४३-४४॥ सध्या केवळ एक एकर जमीन मंजूर झाली होती, त्यामुळे समाधीमध्य साधण्यासाठी बांधकाम करतांना जागा थोडी कमी पडली.॥४५॥ मात्र मध्य म्हणून तीच जागा निश्चित झाल्यानें मंजूर झालेल्या जागेपेक्षा अकरा गुंठे जागा जास्त घेतली आणि त्यावर त्या कारभाऱ्यांनी बांधकाम केले.॥४६॥ जागा व्यवस्थित विकसित केल्यास, तुम्हांला आणखी एक एकर जागा मंजूर करून देऊ, असे अधिकार्‍यांनीं पुढारी मंडळींना वचन दिले होते. म्हणूनच, हे अकरा गुंठे जास्त जागा घेऊन त्यावर बांधकाम करण्याचे त्यांनी धाडस केले. मात्र, एका दुर्जनाने हे वृत्त अधिकाऱ्यांस कळविल्याने हे प्रकरण विकोपास गेले.॥४७-४८॥ त्यांमुळे, पुढारी मंडळीं थोडी चिंताग्रस्त झाली. त्या नेते मंडळीतील, हरी पाटील यांनी समर्थांना प्रार्थना केली, " महाराज, या अकरा गुंठे जास्त घेतलेल्या जागेचा तपास करण्यासाठी एक जोशी नामक अधिकारी येणार आहे."॥४९-५०॥ तेव्हा, या जागेबद्दल जो काही तुम्हांस दंड झाला आहे, तो अवश्य माफ होईल. तुम्ही निश्चिन्त राहा, अशी समर्थांनी हसत हरी पाटलाला ग्वाही दिली.॥५१॥ श्री समर्थांनीं प्रेरणा दिल्यानें, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या त्या जोशी नामक अधिकाऱ्याने असा अहवाल सादर केला -॥५२॥ गजानन संस्थेला हा जो काही दंड आकारला गेला आहे, तो योग्य नव्हे. यास्तव, हा दंड त्यांना परत द्यावा.॥५३॥ मी स्वतः शेगांवांत जाऊन सर्वथा चौकशी करून आलो आहे. या प्रकाराबद्दल हा जो काही दंड सुनावला गेला आहे, तो उचित नाही.॥५४॥ तेव्हा, हा दंड त्वरित माफ करण्यात यावा, असा त्याने हुकूम दिला. हे जेव्हा हरी पाटलाला कळलें, तेव्हा त्याला फार आनंद झाला.॥५५॥ आणि तो म्हणू लागला - समर्थांचे वचन कधीच खोटें होत नाही. माझ्यावर नुकतेच एक अरिष्ट आले होते, त्यात एका महाराने माझ्यावर खोटें आरोप केले होते.॥५६॥ त्यावेळी, मी महाराजांना साकडे घातले असता त्यांनी मला आश्वस्त केले होते की तू मुळीच घाबरू नकोस. तुझ्या एका केसालादेखील या संकटाचा धक्का बसणार नाही.॥५७॥ आणि अखेर समर्थवचनाप्रमाणेच सारे काही घडून आले. आजही अगदी तसाच प्रकार पुन्हा घडला आहे.॥५८॥ समर्थांचे बोल खोटें झाले आहेत, हे आजवर कधीच कोणीही ऐकले नाही. असो. शेगांवांतील सर्व लोक स्वामींच्या भक्तीत रंगून गेले.॥५९॥ आतां, नव्या जागी मठ स्थापन झाल्यावर तिथे कुठल्या घटना अर्थात समर्थांचे काय काय चमत्कार झाले, हे मी कथन करतो.॥६०॥ मेहेकरच्या जवळ सवडद नामक गांव आहे. तेथील गंगाभारती गोसावी नावाचा एक ग्रामस्थ या नवीन मठांत आला.॥६१॥ त्याला महारोग झाला होता. त्यामुळे, त्याचे अवघे अंग कुजून गेले होते आणि दोन्ही पायांना जागोजागी भेगा पडल्या होत्या.॥६२॥ त्याच्या शरीरावरील सर्व त्वचा लालसर झाली होती आणि सारी बोटें झडून गेली होती. कानाच्या पाळ्या सुजल्या होत्या आणि सर्वांगास दुर्गंधी येत होती.॥६३॥ अशा त्या महारोगामुळे गंगाभारती अतिशय त्रासला होता. त्याच्या कानी समर्थांची कीर्ति आली, अन तो शेगांवास आला.॥६४॥ श्रोते हो, त्या महारोगग्रस्त गोसाव्याला सर्व लोक अडवू लागले आणि बोलू लागले, " तुला रक्तपिती आहे, तेव्हा तू महाराजांच्या दर्शनासाठी जवळ जाऊ नकोस.॥६५॥ महाराज दिसतील अशा ठिकाणी तू उभा राहा आणि दुरूनच त्यांचे दर्शन घेत जा. त्यांचे चरण धरण्यासाठी कधीही तू त्यांच्या समीप जाऊ नकोस.॥६६॥ हा रोग अतिशय स्पर्शजन्य आहे, असे सर्व वैद्य आणि डॉक्टर सांगतात. तेव्हा ही गोष्ट तू अवश्य लक्षांत ठेव.॥६७॥ मात्र एके दिवशी, गंगाभारती तिथे असलेल्या सर्व लोकांची नजर चुकवून ( कोणाला काही कळायच्या आत ) अतिशय त्वरेनें समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आला.॥६८॥ आणि त्याने समर्थांच्या चरणांवर आपले मस्तक ठेविले. लोकहो, त्याच क्षणीं महाराजांनी त्याच्या डोक्यावर अति जोरानें एक चापट मारली.॥६९॥ त्यामुळें गोंधळलेला गंगाभारती उभा राहिला, अन समर्थांना न्याहाळू लागला. तोच, स्वामींनी आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या थोबाडीत मारली.॥७०॥ त्याला अनेक मुस्काटांत तर मारल्याच, शिवाय आणिक एक लाथही मारली. पुढे, महाराज खाकरले आणि आपला बेडका त्याच्या अंगावर थुंकले.॥७१॥ आपल्या अंगावर पडलेल्या या बेडक्यास गंगाभारतीने समर्थांचा पावन प्रसाद मानला.॥७२॥ तो आपल्या हातात घेऊन एखाद्या मलमाप्रमाणे सर्वांगास चोळू लागला.॥७३॥ हा सर्व प्रकार तिथेच असलेला एक टवाळ पाहत होता. तो गोसाव्यास बोलू लागला. -॥७४॥ अरे बापा, आधीच तुझे हे रोगग्रस्त शरीर नासले आहे. आणि वर महाराज हा अमंगळ बेडका तुझ्या अंगावर थुंकले.॥७५॥ जो तू प्रसाद मानून अवघ्या शरीरास चोळला. तू आधी साबण लावून तुझे अंग स्वच्छ धुवून टाक.॥७६॥ हे असे वेडे पीर या भूमीवर भ्रमण करू लागतात. काही अंधश्रद्धाळू लोक त्यांना संत-साधू मानू लागतात.॥७७॥ अर्थातच त्याचा परिणाम विपरीत होऊन असंख्य धर्मबाह्य कृत्ये घडली जातात. त्यांमुळे, या समाजाची अधोगती होते.॥७८॥ आता, तुझेच उदाहरण घे ना ! तू तज्ञ वैद्यांकडून औषध न घेता या वेडयापिशाकडे धावत आलास.॥७९॥ त्याचे हे कुत्सित बोलणें ऐकून गोसाव्यास हसू आले आणि तो म्हणाला," अरे, तुम्ही इथेच तर चुकता. थोडा विचार केल्यास सर्व प्रकार ध्यानांत येईल.॥८०॥ संतपुरुषाच्या ठायीं अमंगल, अपवित्र असे किंचितही राहत नाही, हे निश्चित ! जिथे कस्तुरी असते, तिथे दुर्गंधी कधीही असू शकत नाही.॥८१॥ तुला हा जरी साधारण बेडका दिसत असला तरी प्रत्यक्षात हे गुणकारी मलम आहे. तसेच, याला कस्तुरीप्रमाणे सुवास येत आहे.॥८२॥ तुझ्या मनी संशय असल्यास, माझ्या अंगास तू हात लावून पाहू शकतोस. मग तुला खरा प्रकार ध्यानात येईल.॥८३॥ या बेडक्यात थुंकी नावालाही नाही. ही सर्वथैव औषधी आहे, हे निश्चित ! कुठल्याही बेडक्यास मलम मानण्याइतका मी काही वेडा नाही.॥८४॥ तुझा समर्थचरणीं भाव नसल्यामुळे तुला हा केवळ बेडकाच दिसला. समर्थांची थोरवी तू मुळी जाणलीच नाही.॥८५॥ तुला जर याची खात्रीच करावयाची असेल, तर आतां उगाच वेळ घालवू नकोस. समर्थ ज्या ठिकाणी स्नान करतात, तिथे माझ्यासोबत एकदाच चल.॥८६॥ प्रतिदिवशी समर्थ ज्या ठिकाणी स्नान करतात, तेथील ओली माती मी माझ्या सर्वांगास लावतो.॥८७॥ असे आपापसांत बोलून, ते दोघेही स्वामींच्या स्नान करावयाच्या स्थळीं गेले. तो काय आश्चर्य ! त्या कुत्सितास अगदी गोसाव्याने कथन केल्याप्रमाणेच अनुभव आला.॥८८॥ महाराजांच्या स्नानस्थळाची माती त्या दोघांनीही आपल्या हाती घेतली खरीं ! मात्र गोसाव्याच्या हातात असलेली माती औषधी होऊन बसली.॥८९॥ त्या टवाळखोर मनुष्याच्या हातात मात्र केवळ ओली मातीच आली अन तिला किंचित्‌ दुर्गंधीही येत होती.॥९०॥ हा अनुभव घेतल्यावर मात्र तो कुटाळ विलक्षण गोंधळून गेला आणि आपल्या सर्व कुत्सित वल्गना सोडून समर्थांना अनन्यभावाने शरण गेला.॥९१॥ असो. या महारोगी गोसाव्यास कुणीही जवळ बसू देत नव्हते. त्यांमुळे, हा सर्वांपासून कुठेतरी दूर बसून स्वामींपुढे भजन करीत असे.॥९२॥ गंगाभारतीचा आवाज पहाडी, सुमधुर, सुरेल तर होताच, तसेच त्याला गायनकलेचे विशेष ज्ञानही होते.॥९३॥ असेच पंधरा दिवस गेले आणि चमत्कार झाला. त्या गंगाभारतीच्या रोगाचे स्वरूपच पालटलें. त्याच्या सर्वांगाचा लालसरपणा हळूहळू जाऊ लागला.॥९४॥ सर्व भेगा भरून यायला लागल्या आणि त्याचे हात-पाय पूर्ववत झाले. श्रोतेहो, त्याच्या तनूस येणारी दुर्गंधीही पूर्णतः दूर झाली.॥९५॥ त्या गोसाव्याने अत्यंत भक्तिभावाने केलेले ते भजन ऐकून समर्थ प्रसन्न होत असत. प्रत्येक जीवमात्रांस गायन हे आवडतेच.॥९६॥ गंगाभारतीची अनसूया नामक पत्नी आपल्या पतीस परत घरी घेऊन जाण्यासाठी शेगांवीं आली.॥९७॥ त्यावेळी तिच्यासोबत त्यांचा पुत्र संतोषभारती हादेखील आला होता. " आपण आता आपल्या गांवी परतावे. (श्री गजानन महाराजांच्या कृपेनें) तुमची सर्व व्याधी आता बरी झाली आहे, हे मी स्वतः बघितले. समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी आहेत, हे सर्वथा सत्य आहे." अशी तिने तिच्या पतीस हात जोडून विनवणी केली.॥९८-९९॥ " बाबा, तुम्ही गजानन महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या गांवी चला. इथे शेगांवात राहणे आता पुरे झाले." असा मुलगाही आपल्या पित्यास तसेच आग्रह करू लागला.॥१००॥ त्यावर गंगाभारती त्या दोघांना म्हणाला," तुम्ही मला अशी हात जोडून विनवणी करू नका. आजपासून मी खचितच तुमचा आप्तेष्ट नाही.॥१०१॥ ही जी अनाथांची माऊली अर्थातच आपले स्वामी गजानन महाराज जे इथे वास करतात, त्यांनी चापट मारून माझी धुंदी उतरवली, मला वास्तवाची जाणीव करून दिली.॥१०२॥ अंगाला राख फासली आहे, परंतु तुझें सारें चित्त मात्र संसारातच गुंतले आहे. संन्यासी म्हणून हे जे भगवे वस्त्र धारण केले आहेस, त्याची तू अशा रीतीनें अवलेहना केलीस.॥१०३॥ असे सांकेतिक शब्दांत मला समजाविले अन थापट्या मारून सत्याची जाणीव करून दिली. आता, माझे डोळे उघडले आहेत. या संसाराचा मला पुन्हा संबंध नको.॥१०४॥ अरे संतोषभारती बाळा, तू आता इथे न थांबता तुझ्या आईस घरीं घेऊन जा. तुम्ही दोघांनीही सत्वर सवडद ग्रामीं परत जावे.॥१०५॥ ही तुझी माता आहे. तिची तू अखेरपर्यंत सेवा कर. तिला तुझ्यापासून दूर करू नकोस.॥१०६॥ मातापित्यांची सेवा करणारा श्रीहरीस अत्यंत प्रिय असतो. पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीचा आदर्श नेहेमी आपल्यापुढे ठेवावा.॥१०७॥ मी सवडदला परत आल्यास पुन्हा पूर्ववत रोगग्रस्त होईन. म्हणून तुम्ही दोघांनीही मला घरी येण्याचा आग्रह करू नका.॥१०८॥ आजपर्यंत तुमच्यासाठी सर्व काही केले. आतां मात्र परमेश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करतो. या मिळालेल्या नरजन्माचा काहीतरी उपयोग करून घेतो.॥१०९॥ आतापर्यंत संसारात केवळ रमल्यामुळें हा नरजन्म वायाच गेला म्हणायचा. या संसृतीचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग महाराजांनी मला दाखविला आहे, त्यामुळे हा चौर्‍यांशींचा फेरा सहजच चुकेल.॥११०॥ मला ही विरक्ती केवळ समर्थांच्या कृपेने आली आहे. या परमार्थरूपी खिरीमध्ये तुम्ही ही मोह-मायेची माती टाकू नका रे !"॥१११॥ अशा प्रकारे गंगाभारतीने आपल्या कुटुंबीयांची समजूत काढली आणि पत्नीला मुलासह सवडदाला परत पाठविले. तो स्वतः मात्र समर्थचरणीं शेगांवातच राहिला.॥११२॥ समर्थांची स्तुती-भक्तीपर अनेक पदें तो अत्यंत तन्मयतेने म्हणत असे. श्रोतेहो, त्याला गायन कलेचे विशेष ज्ञान होतेच.॥११३॥ दररोज सायंकाळी तो एकतारा घेऊन समर्थांच्या जवळ बसत असे आणि भजन-गायन करीत असे.॥११४॥ त्याचे ते भक्तिरसपूर्ण स्वरांतील भजन ऐकून सर्वच भक्तजनांचे मन हर्षित होत असे. सुस्वर गायन सर्वांनाच अपार सुख-समाधान देते.॥११५॥ या गंगाभारतीचा रोग समूळ नष्ट झाला आणि तो पूर्ववत निरोगी झाला. पुढें, श्री गजानन महाराजांच्या आज्ञेचे पालन करीत तो मलकापुरास गेला.॥११६॥ असो. एकदा पौष महिन्यांत झ्यामसिंग शेगांवी आला आणि समर्थांना त्याने, " आपण माझ्या गांवी यावे." अशी प्रार्थना केली.॥११७॥ मागें मी माझ्या अडगांव येथील भाच्याच्या घरीं चलावे, असे आपणास विनविले होते. तेव्हा हे समर्था तुम्ही मला वचन दिले होते की मी काही दिवसांनंतर नक्की तुझ्या गृहीं येईल. मात्र आतां तू मला आग्रह करू नये.॥११८-११९॥ त्या घटनेला आता बरेच दिवस होऊन गेले आहेत. तेव्हा, हे दयाळा तुम्ही आता मुंडगांवीं माझ्या घरी यावे. मीही आपला भक्त आहे, म्हणून माझी ही इच्छा पूर्ण करावी.॥१२०॥ माझ्या गृहीं, मुंडगांवी आपण काही दिवस वास करावा. मी तिथें अवघीं सिद्धता, तजवीज करून आपणांस घेऊन जाण्यास आलो आहे.॥१२१॥ तेव्हा, साधुवर्य गजानन झ्यामसिंगासह मुंडगांवी आले. त्या थोर सत्पुरुषाचे दर्शन घेण्यासाठी भाविक स्त्री-पुरुषांची अनिवार गर्दी लोटली. त्या आनंद सोहळ्याचे वर्णन करणे, सर्वथा अशक्य आहे.॥१२२॥ त्यावेळी, झ्यामसिंगाने फार मोठा भंडारा घातला. गोदावरीच्या तीरावर वसलेले ते मुंडगांव जणू दुसरे पैठणच भासू लागले.॥१२३॥ पैठणनगरीत जसे थोर संत एकनाथ प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे मुंडगांवीं श्री गजानन महाराज (शोभू लागले.) भजनी मंडळींच्या अनेक दिंड्या तिथे भजन करण्यासाठी आल्या.॥१२४॥ आचारी भंडाऱ्याचा महाप्रसाद करण्यासाठी स्वयंपाक करू लागले. अर्ध्याहून अधिक पाकसिद्धी झालीही अन तेव्हाच महाराज झ्यामसिंगास म्हणाले, " अरे झ्यामसिंगा, आज चतुर्दशी आहे. ही रिक्त तिथी समजली जाते. या भंडाऱ्याच्या प्रसादाच्या पंक्ती पौर्णिमेला ( म्हणजेच उद्या ) होऊ दे."॥१२५-१२६॥ त्यावर झ्यामसिंग म्हणाला, " महाराज, सर्व स्वयंपाक तयार तर झालेला आहे. शिवाय आपला प्रसाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकही इथे जमले आहेत."॥१२७॥ ( ते बोलणे ऐकून ) स्वामी उत्तरले," व्यवहारदृष्टीने केलेले तुझे हे बोलणें सर्वथा योग्य आहे खरें ! मात्र हे असे होणे त्या जगदीश्वराला मान्य नाही. झ्यामसिंगा, लोकांस हा अन्नप्रसाद मिळेल असे वाटत नाही. तुम्हां प्रापंचिक लोकांना आपण ठरवल्याप्रमाणेच सर्व घडावे असे वाटते.॥१२८-१२९॥ पुढें, भोजनाच्या पंक्ती बसल्यावर एकाएकी आकाश ढगांनी भरून आले आणि मेघांचा कडकडाट सुरु झाला.॥१३०॥ वीजाही चमकू लागल्या, सोसाट्याचा झंझावात सुटला. त्या वाऱ्याच्या जोराने जंगलातील झाडे उन्मळून पडू लागली.॥१३१॥ काही क्षणांतच सगळीकडे पाणीच पाणी झाले, आणि प्रसादाचे ते सर्व अन्न वाया गेले. हे पाहून झ्यामसिंगाने महाराजांस अशी प्रार्थना केली - महाराज, आता उद्यां तरी आजच्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती न येवो. गुरुराया, इथे जमलेल्या अवघ्या मंडळींची (घडलेल्या प्रकारामुळे) पार निराशा झाली आहे.॥१३२-१३३॥ या पर्जन्याचे संकट आता दूर करा. सध्या तर पावसाळ्याचाही काळ नाही, अवकाळी आलेल्या या पावसाने आमचे नुकसानच होईल.॥१३४॥ अवेळी हा असा पाऊस पडला तर शेतातील पिकांचा सर्वनाश होईल. अन मग सर्व लोक मलाच दोष देत बोलतील, हा भंडारा घालून झ्यासिंगाने चांगलेच पुण्यकार्य केले, ज्यांमुळे आमचे तर नुकसान झाले. पुण्यकर्म करण्याची ही कुठली पद्धत ?॥१३५-१३६॥ त्याचे ते बोलणे ऐकून महाराज आश्वासक स्वरांत म्हणाले, " झ्यामसिंगा, असा चिंतीत होऊ नकोस. उद्या हा पाऊस तुझे काहीच नुकसान करणार नाही.॥१३७॥ मी आताच हे पर्जन्याचे संकट दूर करतो, असे म्हणत पुण्यपुरुष गजानन महाराज आकाशाकडे ( दिव्यदृष्टीने ) पाहू लागले. तो काय आश्चर्य ! आभाळ क्षणांत निरभ्र झाले.॥१३८॥ आकाशातील काळे मेघ दूर गेले आणि ( सूर्यनारायणाचे दर्शन होऊन ) सगळीकडे लख्ख ऊन पडले. हा चमत्कार अवघ्या एका क्षणांत झाला. खरोखर संतांचे सामर्थ्य अगाध असते.॥१३९॥ मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला तो भंडारा मोठ्या उत्साहांत साजरा झाला. श्रोतेहो, त्या मुंडगांवीं अजूनही नित्यनियमाने हा भंडारा साजरा केला जातो.॥१४०॥ ( महाराजांच्या त्या सद्भक्ताने ) झ्यामसिंगाने मुंडगांवांत असलेली त्याची सर्व मालमत्ता श्री गजानन महाराजांच्या चरणीं अर्पण केली.॥१४१॥श्रोतेहो, त्या मुंडगांवात समर्थांचे अनेक भक्त रहात होते. त्यापैकी एक होता पुंडलीक भोकरे, या तरुण मुलाची समर्थ चरणीं दृढ श्रद्धा होती.॥१४२॥ हा उकिरड्या नामक कुणब्याचा एकुलता एक, तरुण मुलगा होता. तो महाराजांचा निस्सीम भक्त होता.॥१४३॥ लोकहो, वऱ्हाडप्रांती जर मूल जगत, वाचत नसेल तर नवस बोलून नवजात शिशूचे हे उकीर्डा असे नाव ठेवतात. या प्रांतात तसा रिवाज आहे.॥१४४॥ जसा तेलंगणा प्रांतात पेंटय्या, महाराष्ट्रांत केर-पुंजा अशी नांवे ठेवण्याचा प्रघात आहे. त्याच रितीनुसार, वऱ्हाडांत उकीर्डा असे बालकाचे नाव ठेवतात.॥१४५॥ हा पुंडलीक वद्य पक्षांत नित्यनियमाने शेगांवींची वारी करीत असे. अशाप्रकारे, ( दर पंधरा दिवसांनी ) नित्य समर्थांच्या दर्शनास येत असे.॥१४६॥ ( पांडुरंगभक्त ) वारकरी लोक ज्याप्रमाणें इंद्रायणीं नदीच्या तीरावर वसलेल्या देहू-आळंदी इथे प्रत्येक वद्य पक्षांत ( ज्ञानेश्वर-तुकोबा माऊलींच्या ) दर्शनासाठी जातात. अगदी त्याचप्रमाणें, हा वऱ्हाडांतील भक्त दर वद्य पक्षांत शेगांवांत येऊन गजानन महाराजांचे अत्यंत भक्तिभावानें दर्शन घेत असे.॥१४७-१४८॥ असो. एकदा वऱ्हाडात ग्रंथिक ज्वराच्या रोगाची साथ पसरली. त्यांपासून वाचण्यासाठी गावकरी गांव सोडून जाऊ लागले.॥१४९॥ या तापाची लक्षणें अशी होती की हा संसर्ग झालेल्या मनुष्यास प्रथम थंडी वाजते. तापाने अंगही तापते आणि डोळेही अत्यंत लालबुंद होतात.॥१५०॥ तसेच, कुठल्याही सांध्याच्या स्थानी ग्रंथी म्हणजे गाठ उठते. अशी गाठ येताच वातदोष प्रचंड वाढतो.॥१५१॥ त्यांमुळे, रोग्याला शुद्ध राहत नाही आणि तो असबंद्ध बडबड करू लागतो. शरीराची लाहीलाही होऊन बेशुद्धही पडतो.॥१५२॥ असा हा अत्यंत विपरीत रोग पूर्वी भारतखंडात नव्हता. तर युरोपांत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता.॥१५३॥ तेथील साथ इकडे आली आणि गांवोगांवी पसरली. त्या भयंकर साथीपासून वाचण्यासाठी लोक घरेंदारें सोडून दूर वनांत जाऊन राहू लागले.॥१५४॥ त्या दुर्धर साथीचा संसर्ग मुंडगांवातही होऊ लागला. त्याच दरम्यान, पुंडलीकाच्या वारी आली आणि तो शेगांवास निघाला.॥१५५॥ घरी असतांनाच त्याला थोडीफार कणकण जाणवू लागली होती, पण त्याने त्याबद्दल कुणालाच सांगितले नाही. नित्य शेगांवची वारी करण्यासाठी तो त्याच्या वडिलांसोबत निघाला.॥१५६॥ साधारण पाच कोस अंतर चालून झाल्यावर त्याला बराच जोराचा ताप आला आणि थकव्यामुळे त्याला एक पाऊलदेखील चालवेना.॥१५७॥ त्याच्या काखेत एक गाठही आली आणि त्याला अशक्तपणा जाणवू लागला. त्याची ही अवस्था पाहून त्याचे वडील त्यास विचारू लागले, " बाळा पुंडलीका,  असे का करतो आहेस ? तू ठीक आहेस ना?" ॥१५८॥ त्यावर पुंडलीक त्याच्या वडिलांना म्हणाला, " बाबा, मला ताप आला आहे आणि कांखेत एक गोळाही उठला आहे.॥१५९॥ माझी सर्व शक्ती क्षीण होऊन मी अगदी गळून गेलो आहे. आतां मला अजिबात चालवत नाही. माझे दुर्दैव पहा कसे माझ्या वारीच्या आड आले आहे अन आता माझी ही वारी कशी पूर्ण होणार ?॥१६०॥ हे स्वामी दयाघना, माझ्या वारीत खंड पाडू नकोस. तू भक्तवत्सल, कृपानिधी आहेस, तुझ्या दिव्य चरणांचे दर्शन मला होऊ दे.॥१६१॥ माझ्या वारीची सांगता झाल्यानंतर मला खुशाल ताप येऊ दे अथवा माझे शरीर पडू दे. मला त्याची किंचितही पर्वा नाही.॥१६२॥ हे गुरुराया, ही वारी हाच माझा पुण्यठेवा आहे. मात्र ही साथ एखाद्या वैऱ्याप्रमाणे या माझ्या वारीचा नाश करू पाहत आहे. तेव्हा, या संकटापासून तिचे रक्षण करा. ( माझी वारी निर्विघ्नपणें पार पडू द्या. ) ॥१६३॥ शरीरात शक्ती असेल तरच परमार्थ यथार्थ घडतो. मुलाची अशी अतीव कष्टदायक अवस्था पाहून पुंडलीकाचे वडीलही अत्यंत चिंतातुर झाले.॥१६४॥ त्या पित्यास अश्रू अनावर झाले आणि तो परमेश्वरचरणीं प्रार्थना करू लागला, " देवा, हा माझा एकुलता एक पुत्र आहे. माझ्या वंशाचा हा दिवा तू हिरावू नकोस." ॥१६५॥ तेव्हा उकीर्डा आपल्या मुलास म्हणाला," बाळा, आता तुला बसावयास एखादी गाडी अथवा घोडे पाहू का ?" ॥१६६॥ त्यावर पुंडलीक म्हणाला," माझी ही वारी पायीच पूर्ण झाली पाहिजे. मी आता उठत-बसत, हळूहळू जमेल तसे शेगांवास जाण्याचा प्रयत्न करतो.॥१६७॥ मार्गांत जरी मला मृत्यू आल्यास तरी माझे शव तरी तुम्ही शेगांवास न्या. ( हीच माझी शेवटची इच्छा आहे.) आणि तुम्ही मुळीच शोक करू नका, हेच माझे सांगणे आहे.॥१६८॥ अशा प्रकारे, कसातरी बसत-उठत मोठ्या कष्टाने पुंडलीक शेगांवला आला आणि आपल्या स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्याने मोठ्या भक्तिभावाने त्यांना साष्टांग नमस्कार केला.॥१६९॥ तोच समर्थांनी एक अदभूत लीला केली. त्यांची स्वतःची काख त्यांनी एका हाताने जोर लावून दाबली.॥१७०॥ आणि पुंडलीकास प्रेमपूर्वक म्हणाले, " तुझे गंडांतर आता पूर्ण टळले आहे. तू यत्किंचितही काळजी करू नकोस." ॥१७१॥ महाराजांनी हे उद्गार काढता क्षणीच पुंडलीकाच्या काखेतील गाठ जागच्या जागीच विरून गेली आणि त्याचा तापही तात्काळ उतरला.॥१७२॥ अशक्तततेने त्याच्या शरीराला थोडासा कंप मात्र राहिला होता. तेव्हा, समर्थांसाठी पुंडलीकाच्या आईने नैवेद्य वाढून आणला.॥१७३॥ त्या नैवेद्याचे दोन घास समर्थांनी खाल्ले आणि तत्क्षणीच पुंडलीकाच्या शरीराचे कांपरें बंद झाले.॥१७४॥ पुंडलीक अगदी पूर्ववत आरोग्यवंत झाला, केवळ थोडासा अशक्तपणा राहिला. गुरुभक्तीचेच हे खरोखर फळ त्याला मिळाले. शंकेखोर मनुष्यांनी याचा जरूर विचार करावा.॥१७५॥ साक्षात्कारी गुरुची श्रद्धेने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. कामधेनू तुमच्या घरीं असेल तर तुमच्या सर्व इच्छा का नाही पूर्ण होणार ?॥१७६॥ वारीची सांगता करून पुंडलीक मुंडगांवला परतला. हे चरित्र जो मनोभावें वाचेल त्याचे गंडांतर गुरुकृपेने अवश्य टळेल.॥१७७॥ हे संतचरित्र म्हणजे कपोलकल्पित कहाणी नव्हें, तर ही भक्तांच्या सत्य अनुभवांची खाण आहे. या संतकथेविषयीं मनांत थोडाही अविश्वास आणू नका.॥१७८॥ श्रोतें हो, हा श्रीदासगणूविरचित श्री गजाननविजय नामें ग्रंथ भाविकांस कल्याणप्रद होवो, हेच परमेश्वराजवळ मागणे ! ॥१७९॥
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति त्रयोदशोSध्यायः समाप्तः ॥  
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Jul 29, 2024

॥ म्हणे गजानन ॥ - श्री. गणेश वि. रामदासीकृत श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता श्री गजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्मसमंधाचा ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजानन भक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

" म्हणे गजानन " या स्वरमालिकेतून श्री. गणेश वि. रामदासी यांनी या श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण अत्यंत रसाळ वाणींत केले आहे. अतिशय सुमधुर असे हे मनन प्रत्येक गजानन भक्ताने आवर्जून श्रवण करावे, असेच झाले आहे.



॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jul 2, 2024

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १२


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती, हे मयूरेश्वरा विमलकीर्ती तू माझ्या हृदयांत वास करून हा ग्रंथ कळसास ने (हा ग्रंथ सुफळ संपूर्ण व्हावा).॥१॥ तू ज्ञानबुद्धीचा दाता आहेस, तूच भक्तांचे मनोरथ पूर्ण करतोस. हे गणराया, ह्या विघ्नरूपी पर्वतांचा तूच संहार करतोस.॥२॥ तू साक्षात चिंतामणी आहेस, (तत्कारण तुझे भक्त) जे काही इच्छितात, ते सर्व काही तू आपल्या भक्तांना देतोस, असे पुराणांत वर्णिले आहे.॥३॥ हे एकदंता, लंबोदरा, पार्वतीसुता, भालचंद्रा आणि सिंदुरारि माझ्या मनांतील अवघ्या चिंता दूर कर.॥४॥ असो. अकोल्यात बच्चूलाल अग्रवाल नावाचा एक धन-कनक संपन्न असा गृहस्थ होता. तो अतिशय उदारही होता.॥५॥ त्यानें कारंजा ग्रामीं घडलेली लक्ष्मणपंत घुडे यांची हकीकत (इतर लोकांकडून) कर्णोपकर्णी ऐकली होती. त्यामुळें तो जरा साशंक झाला होता.॥६॥ तिथें काय खरें आणि काय खोटें घडलें असावें, असा तो मनी विचार करत असे. आणि एके दिवशी (गजानन) महाराज अकोल्यास आले.॥७॥ त्यावेळीं हा आपला भक्त आहे हे जाणून साक्षात्कारी गजानन स्वामी बच्चुलालाच्या घरीं आलें आणि (घराबाहेरील) ओट्यावर स्थानापन्न झाले.॥८॥ (समर्थांचे आगमन झालेले पाहून) बच्चूलालास अतिशय आनंद झाला आणि तो समर्थांस म्हणाला," गुरूराया, आज मला आपलें पूजन करण्याची इच्छा आहे."॥९॥ त्याचे हे बोलणें ऐकून समर्थांनी आपल्या मानेनेच होकार दिला. श्रोतें हो, (या पूजनास) आपली संमती असल्याचेच हें साक्षात द्योतक होते.॥१०॥ बच्चुलालानें सत्वर पूजेची तयारी केली. त्या ओट्यावर अतिशय आदरपूर्वक त्याने (समर्थांचे) षोडशोपचारी पूजन आरंभिले.॥११॥ प्रथम त्याने समर्थांच्या सर्वांगास विविध प्रकारची उटणीं लावून मंगलस्नान घातलें. त्यानंतर त्यांस भरजरी पितांबर वस्त्र म्हणून परिधान केलें.॥१२॥ अंगावर बहुमोल अशी काश्मिरी शालजोडीही पांघरली. एक जरीकाठीचा रेशमी रुमाल आणून मस्तकास बांधला.॥१३॥ गळ्यांत गोफ आणि हातांत सुवर्ण सलकडींही घातली. दोन्ही हातांच्या दहाही बोटांत निरनिराळ्या अंगठ्या घातल्या.॥१४॥ स्वामींच्या डाव्या हातात हिऱ्याची बहुमूल्य अशी पौची घातली. तसेच रत्नजडित हार महाराजांच्या कंठी त्यावेळीं विशेष खुलून दिसत होता.॥१५॥ नैवेद्यासाठी म्हणून जिलबी, राघवदास पेढे (समर्थांपुढे) ठेवले. एका लहान तबकांत त्रयोदश गुणी विडेदेखील ठेवले.॥१६॥ (स्वामींस) अष्टगंध, अर्गजा, अत्तर आदी सुवासिक द्रव्यें लावली. तसेच गुलाबपाणीही त्यांच्या अवघ्या तनूवर शिंपडले.॥१७॥ शेवटी एका सुवर्णाच्या ताटांत फार मोठी, अनेक रुपये होन मोहोरांची दक्षिणा ठेवली.॥१८॥ त्या दक्षिणेची एकूण किंमत काढली तर खरोखर दहा हजार झाली असती. अश्या थोर दक्षिणेचे किती वर्णन करू बरें ?॥१९॥ (त्यानंतर) श्रींपुढे श्रीफळ ठेवलें आणि अत्यंत विनयपूर्वक (बच्चुलालाने) प्रार्थना केली, " महाराज, माझ्या मनीं इथे एक राममंदिर बांधावयाची इच्छा आहे.॥२०॥ गुरुराया, उत्सवासाठी ह्या माझ्या ओट्यावर मंडप उभारला तरी फारच अडचण होते.॥२१॥ हे ज्ञानवंता, माझें हे मनोरथ पूर्ण कर." असे म्हणून अनन्यभावानें त्याने आपला माथा (स्वामी) चरणांवर ठेवला.॥२२॥ त्यावर संत गजानन (त्याला) ' श्रीजानकीजीवन तुझा हा हेतू पूर्ण करेल.' असा आशीर्वाद देते झाले.॥२३॥ असो. आज हे सर्व अलंकार घालून मला पोळ्याचा बैल बनवला आहेस. तू असें का बरें केलेस ? याचे मला कारण सांग बघू.॥२४॥ मी काही पोळ्याचा बैल अथवा दसऱ्याचा घोडा नाही. मला या सर्व दागदागिन्यांचा काय उपयोग आहे? ते मला सांग बरें.॥२५॥ अरे, हे सर्व मज विषासमान आहे. मला ह्या वस्तूंचा स्पर्शदेखील नको. अरे, या अशा नसत्या उपाधींस माझ्या मागे लावू नकोस.॥२६॥ किंवा मग बच्चुलाला, तू किती धनवान आहेस, हे दाखविण्यासाठी असे हे प्रदर्शन केले आहेस का? ते मला सर्व सांग पाहू.॥२७॥ अरे, ज्याला जे आवडते तेच त्याला द्यावें. मी तर एक वेडापिसा संन्याशी आहे, जो गांवभर नागवा फिरत असतो.॥२८॥ बच्चुलाला, हें अवघें (ऐश्वर्य) तुझें तुला लखलाभ असो. तुम्हां प्रापंचिकांसच या द्रव्याची गरज असते.॥२९॥ अरे, माझा जगतनियंता परमेश्वर भीमा नदीच्या तीरी एका विटेवर उभा आहे. तो काय मला हे सर्व वैभव देण्यास समर्थ नाही का ?॥३०॥ असे म्हणून (महाराजांनी) आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून चहू बाजूंस फेकून दिले. अगदी वस्त्रांचीही तीच गती झाली.॥३१॥ केवळ दोन पेढे खाऊन गजानन महाराज तिथून निघून गेलें. हा सर्व घडलेला प्रकार पाहून, अकोल्यांतील अनेक लोकांना वाईट वाटले.॥३२॥ त्यावेळीं तिथे कारंजा येथील काही लोक उपस्थित होते. तें आपापसांत  बोलू लागले, " आपला लक्ष्मण खरोखरच दुर्दैवी आहे. त्याने आपल्या घरी बच्चुलालाप्रमाणेच (महाराजांचे) पूजन केलें खरें, परंतु मनांत धनाचा मोह असल्यामुळें दक्षिणा अर्पण करतांना कचरला.॥३३-३४॥ त्यानें भक्ती नसतांना केवळ वरवरचें भाषण केलें. (अंतर्ज्ञानी) समर्थांस त्याचे हे वागणे समजणे अशक्य होते काय ?॥३५॥ दांभिकांची पूजा म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडेच असतात. तें महावस्त्र म्हणून केवळ अक्षता अर्पण करतात.॥३६॥ ' शर्कराखंडखाद्यानि ' (खडीसाखर नैवेद्यास अर्पण करतो.) असें म्हणून भुईमुगाचा एखादा कुचका दाणा पुढें आणून ठेवतात.॥३७॥ अशा दांभिक पूजनाचे फळंही अर्थात त्याच स्वरूपांत मिळते. लक्ष्मणाचा सर्वनाश त्याच्या या अशाच कृतीने झाला, हेच खरें !॥३८॥ हा बच्चुलाल मात्र धन्य झाला. ज्याप्रमाणें तो बोलला, अगदी तसेंच, एका जवाहूनही वेगळें नाही असेच त्याचे वर्तन होते. (महाराजांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तिपूर्वक त्यानें पूजन केलें.)॥३९॥ आतां त्याच्या या वैभवाला कधीही ओहोटी लागणार नाही. अहो, एकदा संतकृपेस जो पात्र ठरला, तो सर्वदा सुखीच होत असतो."॥४०॥ त्यानंतर बच्चुलालांनीं संपूर्ण अकोला शहरांत समर्थांचा शोध घेतला, परंतु त्यांचा कोठेही थांगपत्ता लागला नाही.॥४१॥ असो. शेगांवच्या मठामध्यें गजानन महाराजांचा पितांबर नावाचा एक शिंपी जातीचा शिष्य होता.॥४२॥ त्याने (समर्थांची) खूप सेवा केली होती. त्याच्या त्या तपश्चर्येला अखेर फळ आले. श्रोतेंहो, एके दिवशी मठांत एक गोष्ट घडली. ती आतां ऐका.॥४३॥ पितांबर एक साधेसे, अतिशय जीर्ण झालेलें धोतर नेसला होता. तें पाहून गुरुवर त्यास म्हणाले," अरे, तुझे नांव पितांबर आहे, पण तुला नेसण्यासाठी धड धोतरही नाही. वेड्या! तुझ्या उघड्या पार्श्वभागास सर्व स्त्री-पुरुष बघत आहेत, तो तरी जरा झाक बरें !॥४४-४५॥ आपलें नाव सोनुबाई सांगायचे आणि हातांत साधा कथिलाचा वाळाही घालावयास नसावा अथवा प्रत्यक्ष गंगाबाई नाव असतांना जीव मात्र तहानेनें तडफडत असावा, असाच खरोखर तुझा हा प्रकार आहे. (हे तू नेसलेलें) फाटकें धोतर केवळ पोतेरा म्हणून उपयोगीं येईल.॥४६-४७॥ तेच (धोतर) तू नेहेमी नेसतोस आणि आपलें ढुंगण जगाला दाखवतोस. तेव्हा नेसण्यासाठी हा दुपेटा (मी) तुला देतों, तो घे.॥४८॥ बाळा, माझ्या शब्दाचा मान राखून तू हा दुपेटा नेसत जा आणि कोणी काहीही केलें तरी हा नेसणें सोडू नकोस."॥४९॥ पितांबराने तो दुपेटा नेसला खरा, पण (त्याचे हे कृत्य) इतरांना सहन झालें नाही. स्वार्थीपणानें भाऊच आपल्या भावाला घातक ठरतो.॥५०॥ तो वेडावांकडा प्रकार खरें पाहतां बोलावयासच नको. श्रोतेहो, गटाराचें दार उघडलें की घाण मात्र सुटतेच (हेच खरें !).॥५१॥ श्री गजानन स्वामींचे असंख्य भक्त असले तरी, अधिकारी भक्त मात्र दोन्ही हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होते.॥५२॥श्रोतें हो, ज्याप्रमाणें अरण्यांत निरनिराळें अनेक वृक्ष असलें तरी क्वचितच कुठेतरी एखादा चंदनाचा वृक्ष नजरेस पडतो.॥५३॥ त्याचप्रमाणें त्यांच्या शिष्यमंडळींत (उत्तम शिष्य फार कमी) होतें. तेथील काही शिष्य पितांबरास उगाचच निरर्थक टोचून बोलू लागले.॥५४॥अरे पितांबरा, समर्थांना जे घालण्यास उपयोगी आलें असते, तें वस्त्र तू स्वतः परिधान करून बसला आहेस. हेच का तुझें शिष्यपण ? ॥५५॥ तुझी समर्थांवर कशी भक्ती आहे तें अगदीच कळून आलें. तू खरोखर खुशालचंदच आहेस. त्यामुळे ह्या मठांत सद्गुरुंचा अपमान होत आहे, तेव्हा तू इथे राहू नकोस.॥५६॥ त्यावर पितांबर उत्तरला, " मी काही गुरुंचा अपमान केला नाही, तर उलट त्यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांचा मानच ठेवला.॥५७॥हें वस्त्र त्यांनी स्वतः मला दिलें आणि नेसावयास सांगितले. मी ही (त्यांनी सांगितल्याप्रमाणें) तेंच परिधान केले. मग ही अवज्ञा कशी बरें झाली ?"॥५८॥ अशी 'भवति न भवति' अर्थात वादविवाद होऊन शिष्यांत तणाव आणि दुरावा निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी श्री गजानन स्वामींनी एक निर्णय घेतला.॥५९॥ गुरूवर पितांबरास म्हणाले, " तू आतां येथून निघून जावेस. मूल जाणतें झाल्यावर आई त्याला दूर ठेवतें.॥६०॥ पितांबरा, माझी तुझ्यावर अखंड कृपा आहे. तेव्हा तू आता ह्या भूमीवर भ्रमण कर आणि अज्ञ जनांना योग्य मार्ग दाखव."॥६१॥ (नाइलाजानें अखेर पितांबरानें समर्थांस) साष्टांग नमस्कार केला आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे पाहत तो (जड अंत:करणानें) मठ सोडून निघाला.॥६२॥ (मार्गक्रमण करत करत) पितांबर कोंडोली नावाच्या गावांत आला आणि तेथील एका वनांतील आंब्याच्या वृक्षाखाली बसला. त्याच्या मनांत निजगुरूंचे चिंतन सतत चालू होते.॥६३॥ तो रात्रभर तिथेच बसून होता. सूर्योदय झाल्यावर मात्र तिथे मुंगळ्यांचा त्रास होऊ लागला, त्यामुळें तो अखेर त्या झाडावर जाऊन बसला.॥६४॥ परंतु त्या आम्रवृक्षावरदेखील असंख्य मुंग्या आणि मुंगळें होतें. पितांबर सर्व लहान-मोठ्या फांद्यावर जाऊन आला खरा, पण बसण्यासाठी (मुंगळ्यांचा त्रास होणार नाही अशी) निवांत जागा त्याला त्या झाडावर काही सापडली नाही. त्याचे हे कृत्यच तेथील गुराख्यांना कौतुकास्पद वाटलें. ॥६५-६६॥ तें आपापसांत बोलू लागले, हा एखाद्या माकडाप्रमाणें ह्या वृक्षावर का फिरतो आहे ? ह्याचे कारण काही कळत नाही.॥६७॥ हा अगदी लहान-सहान फांद्यांवरही निर्भयपणें फिरून आला. मात्र कुठेही खाली पडला नाही, हे खरें तर आश्चर्यच आहे.॥६८॥ त्यांवर दुसरा (गुराखी) म्हणाला, " ह्यांत काहीच आश्चर्य वाटायचे कारण नाही. श्री गजानन महाराजांच्या शिष्यांच्या अंगी असे सामर्थ्य असते, हे नक्की. त्यामुळें हा त्यांचा शिष्य खचितच असावा. चला, हा इथें आल्याचा वृत्तांत आपण गावांत जाऊन सर्वांना सांगू या."॥६९-७०॥ गुराख्यांकडून हे वृत्त कळल्यावर, कोंडोलीचे ग्रामस्थ त्या आंब्याच्या वृक्षाजवळ आले आणि तिथे कोण आले आहे हे पाहू लागलें.॥७१॥ (पितांबरास पाहून) गावकरी आपापसांत बोलू लागले, हा खरे तर एखादा ढोंगी मनुष्य असावा आणि उगाचच आपण गजानन महाराजांचा शिष्य असल्याचे भासवत आहे.॥७२॥ भास्कर पाटील नावाचा गजानन महाराजांचा एक थोर शिष्य होता खरा, परंतु त्याचा नुकताच अडगांव या गावांत अंत झाला. ॥७३॥ आणि तसेही समर्थांचे शिष्य चांगले बर्फी, पेढे खायचे सोडून इथे मुद्दामहून उपवास करण्यासाठी कशाला येतील बरें ? ॥७४॥ तरीही एकदा याला विचारावे आणि त्याचे म्हणणे प्रथम ऐकून मग काय खरें अन काय खोटें ते ठरवावें. उगाचच तर्क करणे, योग्य नाही.॥७५॥ मग एक गांवकरी पुढे आला आणि " तू कोण आहेस? इथे कुठून आणि कशासाठी आला आहेस ? तुझा गुरु कोण आहे ?" असे (अनेक प्रश्न) पितांबरास विचारू लागला.॥७६॥ पितांबर त्यावर उत्तरला, " मी शेगांवचा असून माझे नाव पितांबर शिंपी आहे. तसेच श्री गजाननस्वामींचा मी शिष्य आहे. त्यांची मला पर्यटन करण्यासाठी आज्ञा झाली, म्हणून मग भ्रमण करीत मी इथवर आलो आणि ह्या वृक्षाखाली (विश्रांतीसाठी) बसलो. पण या आंब्याच्या मुळाशी खूप मुंगळें होते, म्हणून मी झाडावर चढलो आणि एका फांदीवर जाऊन बसलो."॥७७-७९॥ त्याचे हे बोलणें ऐकून ग्रामस्थ चांगलेच संतापले आणि म्हणू लागले, अरे, असे थोर संतांचे नाव घेऊन उगाच अशा चेष्टा करू नकोस.॥८०॥ काय तर म्हणे, मी खरें म्हणजे राजाची आवडती राणी आहे पण पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजूरी करण्यास इथे आले.॥८१॥ त्या (कोंडोली) गावांचा जो देशमुख होता, त्याचे नाव श्यामराव होते. तो म्हणू लागला, " अरे सोंगाड्या, आतां माझे बोलणे ऐक.॥८२॥ स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत. त्यांचे नाव (गुरु म्हणून) सांगून उगाच त्यांना बट्टा लावू नको.॥८३॥ अरे वेड्या, एकदा त्यांनी केलेला चमत्कार ऐक जरा ! (वसंत) ऋतू नसतांना देखील त्यांनी आंब्याच्या झाडाला फळें आणली होती.॥८४॥ समर्थांनी तर फळें निर्माण केली. तू नुसतीं पाने तरी आणून दाखव. नाही तर या ठिकाणी तुझी काही धडगत नाही.॥८५॥ हा जो बळीराम पाटलाच्या (शेतातील) वठलेला शुष्क आंब्याचा वृक्ष आहे, तो आत्ता या क्षणी आमच्या डोळ्यांदेखत (हिरव्यागार पानांनी बहरलेला असा) पर्णयुक्त करून दाखव.॥८६॥ तू जर असे नाही करू शकलास, तर नक्कीच आमचा मार खाशील आणि जर तू सत्य बोलत असशील तर आम्हांस वंद्य होशील.॥८७॥ कारण सद्‌गुरुंचे शिष्य काही अंशी तरी त्यांच्याच योग्यतेचे असतात, अशी या जगती वदंता आहे.॥८८॥ आता अजिबात उशीर न करतां हे आंब्याचे झाड हिरवेगार कर पाहू." तें बोलणें ऐकून पितांबर अतिशय घाबरला.॥८९॥ आणि (दीनपणे) बोलू लागला, " माझा सारा वृत्तांत ऐकून घ्यावा. लोक हो, हिरे आणि गारा एकाच खाणीत सापडतात.॥९०॥ तसेच श्री गजाननस्वामींच्या शिष्यांमध्ये मी गार आहे, असे समजा. मात्र मी यत्किंचितही खोटें बोललो नाही.॥९१॥ या जगांत गारेवरून त्या खाणीस काही कमीपणा येत नाही. माझ्या गुरूंच्या नांवास मी चोरून कसे ठेवू बरें ?"॥९२॥ त्यावर श्यामराव उत्तरला, " तू आता उगाच बाष्कळ बडबड करू नकोस. शिष्यांवर संकट ओढवलें तर ते त्यांच्या सद्‌गुरुंचा धांवा करतात.॥९३॥ मग त्यांचा तो शिष्य जरी योग्य अधिकारी नसला, तरी सद्‌गुरुंचा प्रभाव (कृपासामर्थ्य) आपल्या शिष्यांना सहाय्यभूत  होतो."॥९४॥ श्रोतें हो, त्यावेळीं पितांबराची अवस्था खरोखर इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली. बिचारा अतिशय चिंतातुर झाला आणि त्याला काहीच सुचेनासे झाले.॥९५॥ त्या वठलेल्या आंब्याच्या झाडापाशी अवघेंच गांवकरी आपल्या बायकां-मुलांसह जमलें आणि आता पुढें काय घडणार हे पाहू लागलें.॥९६॥ अखेर निरुपाय होऊन पितांबरानें आपलें हात जोडलें आणि आपल्या सद्‌गुरुरायांचे मन:पूर्वक स्तवन सुरु केलें.॥९७॥ हे स्वामी समर्था गजानना, हे ज्ञानरूपी आकाशांतील नारायणा, तुझ्या चरणीं दृढ श्रद्धा असलेल्या (या भक्ताच्या) रक्षणासाठी आतां यावेळीं धावून ये.॥९८॥ हे भक्तपाला, माझ्यामुळें तुला कमीपणा येऊ पाहतो आहे. (मी सदैव भक्तांच्या पाठीशी उभा आहे) या आपल्या वचनासाठी या आंब्याच्या झाडास पालवी फुटू दे.॥९९॥ आता माझी सारी भिस्त तुमच्यावरच आहे. हे आई, माझ्यावर तू कृपा कर. नाहीतर इथे माझा प्राण जायची वेळ आली आहे.॥१००॥ प्रल्हादाचे बोल सत्य करण्यासाठी नरहरी भगवान खांबात प्रगटलें. संत जनाबाईस सुळांवर चढवलें असतां त्या सुळांचेच पाणी झाले.॥१०१॥ संत जनाबाईंचा भार त्या विठ्ठलावर, ईश्वरावर होता तर माझा सर्व विश्वास केवळ तुझ्यावरच आहे. संत आणि देवांमध्ये काहीच अंतर नसते.॥१०२॥ ईश्वर हाच संत असतो तर संत साक्षात त्या परमेश्वराचेच रूप असतात. सर्व लोक मला मी गजानन स्वामींचा शिष्य आहे असे म्हणतात.॥१०३॥ खरे तर माझे असे काहीच महत्व नाही. हे अवघें सामर्थ्य तर तुझ्याच ठायीं आहे. या जगीं फुलांमुळेच दोऱ्याचे महत्त्व असते.॥१०४॥ तें फुल तूच आहेस मी केवळ दोरा आहे. तू कस्तुरी तर माझी योग्यता मातीइतकीच आहे, हे सत्य आहे. हें संकटही तुझ्यामुळेंच माझ्यावर आलेले आहे.॥१०५॥ तेव्हां आता माझा अंत पाहू नकोस रें, गुरुराया ! (या तुझ्या भक्तासाठी) धावत ये आणि या वठलेल्या वृक्षास कोवळी पालवी (तुझ्या कृपेनें) फुटू दे."॥१०६॥ (आपल्या सद्‌गुरुंची अशी प्रार्थना करून) पितांबर तिथे जमलेल्या सर्व लोकांस म्हणाला, " लोक हो, माझ्या सद्‌गुरुंचा नामगजर करा. हे शेगांवच्या अवलिया, जय जय गजानन साधूवर असा त्यांचा जयजयकार करा."॥१०७॥ तेव्हा सर्व गांवकरी (समर्थांचा) जयजयकार करू लागले. (तो काय आश्चर्य !) त्या वठलेल्या वृक्षास पालवी फुटू लागली. त्या अगाध चमत्कारास सर्व लोक आपल्या डोळ्यांसमक्ष घडत असलेले पाहू लागले.॥१०८॥ काही लोक म्हणू लागले, हे तर कदाचित आपणांस पडलेलें स्वप्न असावें, (खरेच जागें आहोत हे जाणण्यासाठी) तेव्हा आपल्याला हातांनी चिमटा घेऊन पाहू या. ॥१०९॥ आणि चिमटे घेऊन पाहिले असता हे स्वप्न नसून सत्य आहे, हे त्यांना उमगले. तेव्हा ही नक्कीच नजरबंदी असावी, असे काही जण बोलू लागलें.॥११०॥ गारुड्यांच्या खेळांत कशी वाद्येंच सर्पाप्रमाणे भासतात आणि कश्या मातीच्या खापऱ्या (नजरबंदीमुळे) आपल्या दृष्टीस रुपयांप्रमाणे दिसू लागतात, नाही का ?॥१११॥ परंतु जेव्हा त्या पानांस तोडून पहिले असतां त्या फांदीतून पांढराशुभ्र चीक बाहेर येऊ लागला, तेव्हा हा भ्रम नव्हें, याची (सर्व गांवकऱ्यांस) जाणीव झाली.॥११२॥ अशा रितीने वाळलेल्या वृक्षास पालवी फुटली, अशी तिथे जमलेल्या सर्वांची खात्री झाली. ' श्री गजानन माऊली हे खरोखर महासंत आहेत,'  हे निःसंशय ! (असे ते सर्वजण म्हणू लागले.)॥११३॥ आता मात्र या पितांबराविषयीं मनांत काहीच संशय घेऊ नये, हा श्री गजानन महाराजांचा शिष्य आहे हेच सत्य आहे. ह्याला आता आपण गावांत घेऊन जाऊ या.॥११४॥ ज्याप्रमाणे गाय आपल्या वासरासाठी धावत येते, त्याप्रमाणेच आपल्या ह्या भक्ताच्या निमित्ताने का होईना कधी तरी श्री गजानन महाराजांचे कोंडोलीस आगमन होईल.॥११५॥ असा सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि पितांबरास मोठ्या थाटामाटांत गावांत नेले. अशा प्रकारे दिव्य चमत्कार झाल्यावर सर्वच लोकांचा भाव दृढ झाला.॥११६॥ श्री (रामदास स्वामी) समर्थांनीही अशाच प्रकारें आपला कल्याण नामक शिष्य जगत्कल्याणासाठीच डोमगांवीं पाठवला होता.॥११७॥ श्री गजानन स्वामींनीही जणू तशीच कृपा केली, त्यामुळे आपल्या या कोंडोली गावाचे भाग्य फळफळलें हे मात्र खरें !॥११८॥ श्रोतेहो, ते आंब्याचे झाड अजूनही (श्री गजानन कृपेची साक्ष देत) कोंडोलीत आहे. इतर वृक्षांच्या तुलनेत ह्या आम्रवृक्षाला फळेही भरपूर येतात.॥११९॥ कोंडोलीच्या ग्रामस्थांचीही पितांबरावर दृढ श्रद्धा जडली. अर्थात, हिरकणी कुठल्याही स्थानीं असली तरी मौल्यवानच असते.॥१२०॥ लवकरच, पितांबराचा मठ त्या कोंडोलीत झाला आणि त्याच्या अंतिम क्षणांपर्यंत तो तिथेच कार्यरत राहिला.॥१२१॥ आतां इकडे शेगांवांत एके दिवशी महाराज आपल्या मठांत उदास होऊन बसले.॥१२२॥ त्यांचे सर्व शिष्य हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागले, " महाराज आज आपण चिंताग्रस्त का दिसत आहात ?॥१२३॥ तेव्हा, महाराज गंभीर स्वरांत तिथे जमलेल्या लोकांना म्हणाले, " आमचा लाडका भक्त कृष्णा पाटील, जो आम्हांला दररोज चिकण-सुपारी आणून देत असे, तो आता वैकुंठवासी झाला. त्याची आम्हांला आज आठवण झाली. त्याचा मुलगा राम तर अजून लहान आहे, मग ये ठायीं आता आम्हांला चिकण-सुपारी कोण आणून देणार ?॥१२४-१२५॥ राम मोठा झाल्यावर माझी सेवा करीलच, पण तोपर्यंत मी काही या मठांत राहायला तयार नाही."॥१२६॥ असे महाराज बोलताच, सर्वांनाच चिंता वाटू लागली. महाराजांचा आता येथून जाण्याचा विचार दिसत आहे. तेंव्हा, आपण काहीही करून त्यांचे मन वळविले पाहिजे. चला, आपण सर्वजण मिळून महाराजांचे चरण धरून प्रार्थना करू.॥१२७-१२८॥ असा सर्वानुमते विचार करून सर्व मंडळी मठांत आली. श्रीपतराव, बंकटलाला, ताराचंद, मारुती या सर्व भक्तमंडळींनी महाराजांचे पाय धरले, आणि महाराजांना विनवणी करत म्हणाले, " महाराज, आम्हांला सोडून तुम्ही अन्यत्र कोठेही राहू नये. कृपा करून या मठाचा तुम्ही त्याग करू नका."॥१२९-१३०॥ या शेगांवांत तुमची जिथे इच्छा असेल, तिथे राहा. मात्र हे गांव सोडण्याचे मनांत आणू नका."॥१३१॥ तो महाराज गर्जून म्हणाले, " तुमच्या या गावांत दुफळी आहे. त्यामुळें, मला इथे राहण्यासाठी कोणाचीच जागा नको.॥१३२॥ तेव्हा, कोणाच्याच मालकीची नसेल अशी जागा मला तुम्ही दिल्यासच, मी या शेगांवीं राहीन."॥१३३॥ महाराजांचे हे वचन ऐकून अवघी मंडळी चिंताग्रस्त झाली आणि ही मागणी करून समर्थांनी आपल्याला मोठ्याच पेंचात टाकले असे ते सर्व विचार करू लागले.॥१३४॥ महाराज तर आपल्यापैकी कोणाच्याही जागेंत राहाण्यास तयार नाहीत, आणि हे सरकार समर्थांसाठी जागा देईल, याची खात्री वाटत नाही.॥१३५॥ आपल्या महाराजांची योग्यता, महती हे सरकार मुळीच जाणत नाही. शेवटीं, बंकटलाल विनयतेनें बोलता झाला, " महाराज, अशा संकटात आम्हांला घालू नका. हे परक्याचे राज्य आहे. त्यामुळें, सरकार धार्मिक कार्यासाठी जागा उपलब्ध करून देईल, याची काही शक्यता वाटत नाही.॥१३६-१३७॥ तेंव्हा, आमच्यापैकी कुणाच्याही जागेची तुम्ही मागणी करा. आम्हां सर्वांचीच आपल्याला आनंदाने जागा देण्याची तयारी आहे."॥१३८॥ त्यावर महाराज बोलले, " काय हे तुमचे अज्ञान ! या सर्व जमिनींची मालकी खरें तर पूर्णतः त्या सच्चिदानंदाची आहे.॥१३९॥ या भूमीवर असे कित्येक राजे आले आणि गेले. तेव्हा, ही सर्व जागा निश्चितच सरकारी नाही. या सर्व जमिनींचा खरा मालक तो पांडुरंगच आहे.॥१४०॥ आतां, व्यावहारिकदृष्ट्या मालकपण राजास प्राप्त होते खरें ! पण ते महत्वाचे नाही. तुम्ही प्रयत्न करून पाहा.॥१४१॥ प्रयत्न केल्यास जागा अवश्य मिळेल. आता काही बोलू नका. हरी पाटलाच्या हाताला यश येईल, याविषयीं काहीही शंका मनांत बाळगू नका."॥१४२॥ मग ती सर्व मंडळी हरी पाटलाकडे आली आणि त्याच्याशी विचार-विनिमय करून महाराजांच्या मठाच्या जागेसाठी अर्ज दिला.॥१४३॥ बुलढाणा जिल्ह्याचा एक करी नामक सर्वाधिकारी होता. त्याने अर्जाची योग्य तपासणी करून समर्थांच्या मठासाठी एक एकर जागा मंजूर केली.॥१४४॥ आणि म्हणाला, " मंडळी, तुम्ही दोन एकर जागेसाठी अर्ज केला आहे खरा, पण मी सध्या तुम्हांला एक एकर जागा देत आहे.॥१४५॥ तुम्ही ती जागा एका वर्षांत व्यवस्थित विकसित केल्यास मी आणखी एक एकर जागा तुमच्या मठासाठी मंजूर करीन. जेणेंकरून तुमची ही दोन एकर जागेची मागणी मान्य होईल."॥१४६॥ या सरकारी ठरावाची अजूनही दप्तरीं नोंद आहे. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचितच लोकोत्तर आहे, हे निःसंशय !॥१४७॥ मग हरी पाटील, बंकटलाल आदि भक्तमंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरु केले. (समर्थांवर सर्वांचीच श्रद्धा असल्यामुळें) बराच द्रव्यनिधी थोड्या कालावधीत जमला आणि मठाचे काम सुरु झाले.॥१४८॥ यापुढील सर्व वृत्त इत्थंभूतपणे पुढच्या अध्यायांत कथन होईल. सत्पुरुषाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी परमेश्वर सदैव तत्पर असतो, हेच खरें !॥१४९॥ डोंगरगांवचा विठू पाटील, वाडेगांव येथील लक्ष्मण पाटील आणि शेगांवचे रहिवासी जगु आबा आदि मंडळींनी वर्गणी गोळा करण्यात पुढाकार घेतला.॥१५०॥ श्रोतें हो, हा श्रीदासगणूविरचित श्री गजाननविजय नामें ग्रंथ तुम्ही सावध चित्त होऊन ऐका. त्यामुळें तुमचे निश्चितच निजकल्याण होईल. ॥१५१॥ 
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Mar 1, 2024

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ११


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती, भवानीवरा दक्षिणामूर्ति, या ब्रह्मांडांत ज्या ज्या थोर विभूती आहेत, ती सर्व तुझीच रूपे आहेत.॥१॥ तुझें निराकार रूप, ज्यानें हे चराचर व्यापले आहे. तें रूपच अविद्या माया प्रकृतीचा पूर्णतः आधार आहे.॥२॥ हे देवराया, त्या स्वरूपास जाणण्यास कोणीही समर्थ नाही. त्यासाठीच तू दयावंत होऊन विविध सगुण रूपें धारण केलीस.॥३॥ ज्याला तुझे जें रूप आवडते, त्या तुझ्या रुपाचीच तो उपासना करतो. परंतु, निरनिराळ्या नावांमुळे तुला कधीही भिन्नत्व येत नाही.॥४॥ शैव तुला शिव म्हणतात, तर वेदांत जाणणारे तुला ब्रह्म असे संबोधतात. रामानुजनांसाठी तू सीतापती आहेस, तर वैष्णवांचा तू विष्णू आहेस.॥५॥ निरनिराळ्या उपासना पद्धतींमुळे तुला ही अनेक नांवें मिळाली आहेत. पण, सर्वांच्याच ठायीं तू अभिन्नपणें  भेटतोस.॥६॥ तू सोमनाथ ,विश्वेश्वर, हिमालयांतील केदार,आणि ओंकारेश्वर आहेस. तर क्षिप्रातीरीं वास करणारा महांकालही खरोखर तूच आहेस.॥७॥ तूच नागनाथ, वैजनाथ, आणि वेरुळांतील घृष्णेश्वर  आहेस. तर गोदावरीच्या काठीं तुला त्र्यंबक असे म्हणतात.॥८॥ तू भीमाशंकर, मल्लिकार्जुन आणि रामेश्वर आहेस. तसेच गोकर्णरूपी शंकर आणि शिंगणापुरांतील महादेवही तूच आहेस.॥९॥ त्या तुझ्या सर्व रूपांस माझा साष्टांग नमस्कार असो. हे दीनबंधो, माझ्या त्रितापांचे तू शीघ्र निवारण कर.॥१०॥ देवा, तुम्हीं कुबेरांस क्षणांत ऐश्वर्यवान केलें. मग हें गिरिजापतें, माझ्याविषयीं मात्र तुम्हीं का शंकित झाला आहात ?॥११॥ पुढें दुसऱ्या वर्षीही त्या बाळापुरांत दासनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी, समर्थ बाळकृष्णाच्या गृहीं आले.॥१२॥ त्या बाळापुरांत सुकलाल आणि बाळकृष्ण असे श्रींचे दोन निःसीम भक्त होते. (त्यांची समर्थांवर अतिशय श्रद्धा होती, त्या त्यांच्या निष्ठेची) कोणीही बरोबरी करू शकत नव्हते.॥१३॥ या वेळीं समर्थांबरोबर भास्कर पाटील,बाळाभाऊ,पितांबर,गणू,जगदेव आणि दिंडोकार आदी भक्त मंडळीही होती.॥१४॥ दासनवमीच्या उत्सवाची सांगताही मोठ्या थाटामाटात पार पडली. भास्कराचे दुर्दैव मात्र तिथेच आडवे आले.॥१५॥ (त्या तिथेच) एक पिसाळलेलें कुत्रें भास्करास चावले. त्यामुळें इतर सर्व लोक घाबरले आणि हा आता पिसाळेल, असे म्हणू लागलें.॥१६॥ सारें व्यावहारिक उपाय त्या भास्करावर केलें गेले. काही जण आता तातडीनें डॉक्टरांस बोलावले पाहिजे असे म्हणू लागलें.॥१७॥ भास्कर मात्र त्यावेळीही, " मला खरेच कुठल्याही वैद्याची गरज नाही. माझा डॉक्टर, श्रीगजानन इथेच आसनस्थ आहे. त्यांच्याकडेच मला न्यावें आणि हे अवघें वृत्त त्यांस कळवावें. तदनंतर तें जे सांगतील, तेच करावे. उगाच आपला हट्ट करू नका." असे म्हणू लागला.॥१८-१९॥ मग गजानन महाराजांच्या समोर भास्कर पाटलास आणले. बाळाभाऊनें घडलेलें अवघें वृत्त समर्थांस सांगितले.॥२०॥ तो सर्व समाचार ऐकून महाराज हसतच म्हणाले," हत्या,वैर आणि ऋण हे कधीही कुणासही चुकत नाही.॥२१॥ सुकलालच्या गाईचा जो द्वाडपणा होता,तो या भास्करानें (माझी प्रार्थना करून) शेगांवात पूर्णपणे दूर केला.॥२२॥ त्या गाईचे ते द्वाडपण इथे त्या कुत्र्याच्या रूपात आलें आणि या भास्कर पाटलास चावले.॥२३॥ त्या गाईचा द्वाडपणा दूर करण्यासाठी यानें माझी प्रार्थना केली. ह्या भास्करास त्या गाईचे दूध प्यायचें होते, असा हा मतलबी आहे.॥२४॥ दूध पितांना गोड वाटलें, पण आता तें ऋण फेडतांना जड का वाटू लागले ? भास्करा, तुला मी आता ह्यांतून वाचवू का ? हे काही आडपडदा न ठेवता मला सांग.॥२५॥ तुझें आयुष्य संपत आले आहे, हें कुत्रें फक्त निमित्त झाले आहे. तू आता हा मृत्युलोक सोडून (स्वर्गलोकी) प्रयाण केलें पाहिजेस.॥२६॥ यांतून वाचण्याची तुझ्या मनात इच्छा असेल तर वेड्या, मी तुझें यापासून अवश्य रक्षण करीन.॥२७॥ परंतु,ती केवळ जन्ममृत्यूची उसनवारी होईल रे, बाळा ! या अशाश्वताच्या बाजारीं असें देणें घेणें नेहेमीच चालतें.॥२८॥ तेव्हा तुझा काय विचार आहे, हे आता पटकन सांग. ही अशी पर्वणी तुला परत कधी येणार नाही."॥२९॥ भास्कर त्यावर उत्तरला," मी तर सर्व तऱ्हेने अजाण आहे. आपल्या मनात जे असेल तेच आपण करावे.॥३०॥ आपल्या लेकराचें अवघें हित कशात आहे, हे फक्त माता जाणते. असे श्रीतुकोबांनी आपल्या एका अभंगात म्हंटलेले आहे.॥३१॥ मीही आपलें लेकरूच आहे, मग मी कशासाठी विनंती करू ? तुम्ही तर अवघ्या ज्ञानाचा सागर आहात,  माझे (भलें कशात आहे),हें आपण नक्की जाणता."॥३२॥भास्कराचे हे बोलणें ऐकून गजानन महाराजांना संतोष झाला. सत्य कथन केल्यास सच्च्या भक्ताचे निश्चितच समाधान होते.॥३३॥ काही लोक, " महाराज, हा भास्कर आपला भक्त आहे, तेंव्हा याला श्वानदंशापासून वाचवा." असे म्हणू लागले.॥३४॥ त्यांवर महाराज त्यांस म्हणाले, " अरे वेड्या, हेंच तर तुझें अज्ञान आहे. खरें तर जन्म-मरण हीच मुळीं भ्रांती आहे. कोणीही जन्माला येत नाही वा कोणी मरतही नाही. हें गूढ जाणण्यासाठीच शास्त्रकारांनी परमार्थाचा उपाय सांगितला आहे.॥३५-३६॥ त्याचा उपयोग करावा आणि मोहाचा समूळ नायनाट करावा. आपला प्रारब्धभोग निमूटपणें भोगावा,हेंच बरें आहे.॥३७॥ संचित,प्रारब्ध आणि क्रियमाण हें पूर्णत: भोगल्यावाचून या बद्ध जीवाची मुळीच सुटका होत नाही.॥३८॥ पूर्वजन्मांचे जे काही कर्म असेल, तें या जन्मीं भोगावें. किंबुहना तें भोगण्यासाठीच जन्मास यावें, असा सिद्धांत आहे.॥३९॥ या जन्मीं जे कर्म करावें, तें पुढच्या जन्मास कारण व्हावें, असें किती जन्ममृत्यूचे फेरे घ्यावे? (हे तुम्हीं सांगा बरें !)॥४०॥ भास्कराचे पूर्वजन्मीचे देणें आता काहीच उरलें नाही. ह्या साऱ्या (मायेच्या चक्रातून) तो आता मोक्षास जाण्यासाठी मुक्त झाला आहे.॥४१॥ म्हणूनच लोकहो, तुम्हीं आतां नसता आग्रह करून त्याचा हा (मोक्षाचा) मार्ग अडवू नका. भास्कारासारखा भक्तराणा वारंवार जन्मास येत नसतो.॥४२॥ तें कुत्रें ह्याचे पूर्वजन्मीचें वैरी होते, म्हणूनच इथे बाळापुरांत तें भास्करास चावले.॥४३॥ (पूर्वजन्मीचा) डाव त्या श्वानानें इथे साधला. तसाच जर भास्कराच्या मनात त्याच्याबद्दल द्वेष राहिला, तरी तो त्याचा द्वेष प्रतिशोध घेण्यासाठी ह्या भास्कराच्या पुढील जन्मास कारणीभूत होईल.॥४५॥ म्हणूनच हें पूर्वजन्मींचें वैर आतां संपले आहे. ह्या भास्कराचे आतां कुठलेच देणें उरलेलें नाही, त्याच्या सर्व कर्मांचा नाश झाला आहे.॥४६॥ आतां मात्र मी (भास्करासाठी) इतकेच करतो की याला श्वानविषापासून पिसाळू देत नाही आणि दोन महिने वाचवितो.॥४७॥ हें जर मी नाही केलें, तर हा पुन्हा दोन महिन्यांसाठी उरलेलें आयुष्य भोगण्यासाठी या भूमीवर जन्म घेईल."॥४८॥ (गजानन महाराजांचा) हा बोध  कित्येक जनांस पटला नाही. बाळाभाऊ मात्र तें ज्ञानाचे बोल ऐकून आनंदले.॥४९॥ भास्करा, तू धन्य झालास. तू केलेली संतसेवा फळली. तुझें जन्ममरण चुकले (तू मुक्त झालास). तुझ्या सद्भाग्याचे मी काय वर्णन करू ? (असें बाळाभाऊ भास्करास म्हणाले.)॥५०॥ असा प्रकार घडल्यावर सर्व मंडळी शेगांवांस परत आली. महाराजांच्या भक्तगणांस भास्कर अतिशय कृतज्ञतापूर्वक सांगू लागला.॥५१॥ बाळापुरांत घडलेली हकीकत प्रत्येकांस सांगून भास्कर वदला," माझी तुम्हांस हात जोडून हीच विनंती आहे. आपल्या शेगांवांस महाराज लाभले, याचा तुम्हीं विचार करा. हा संतपुरुषाचा अनमोल ठेवा तुम्हीं त्यांचे स्मारक बांधून जतन करा.॥५२-५३॥ त्यांना या स्मारकाची मुळीच गरज नाही. तें स्मारक पुढील पिढ्यांना त्यांच्या थोर साधुत्वाची साक्ष देत राहील.॥५४॥ आळंदीस ज्ञानेश्वर महाराज, सज्जनगडांस समर्थ स्वामी आणि देहूनगरीस तुकाराम महाराज आदि विभूतींनी आपल्या वास्तव्यानें पवित्र केले आहे.॥५५॥ त्या त्या ठायीं त्यांची भव्य स्मारकें त्याच्या भक्तांनी बांधली आहेत. तोच मार्ग तुम्हीसुद्धा अनुसरावा आणि मनापासून प्रयत्न करावा."॥५६॥ असें प्रत्येक भक्तास भास्कर वारंवार सांगत होता. परंतु, एकदा त्याच्या मनांत एक विचार आला.॥५७॥ माझी विनंती ऐकून, हे मला हो, हो असें म्हणत आहेत खरे ! पण त्यांच्या अनुमोदनाबाबत माझ्या मनांत मात्र शंका येतें आहे.॥५८॥ अखेर त्याने एकदा महाराजांच्या अपरोक्ष सर्व लोकांना मठांत एकत्र बोलाविलें.॥५९॥ बंकटलाल, हरी पाटील,खंडुजीच्या दुकानांत कारभारी असलेला मारुती चंद्रभान, श्रीपतराव वावीकर, ताराचंद साहुकार आणि ज्यांची नांवे तरी कुठवर सांगू अशी इतरही बरीच मंडळी तिथे जमली.॥६०-६१॥ त्या लोकांस असे एकत्र बोलावून भास्कराने हात जोडून काकुळतीनें विनंती केली," माझा आता तुमच्याशी केवळ दोन महिनेंच संबंध उरला आहे.॥६२॥ समर्थांचे भव्य स्मारक या वऱ्हाडप्रांती शेगांवांत व्हावे, अशी माझी मनापासून इच्छा आहे.॥६३॥ तुम्हीं हें (स्मारक) बांधतो,असे म्हणा. त्यामुळें मला आनंद होईल आणि मी वैकुंठास सुखानें गमन करेन.॥६४॥ संतसेवा कधीही वाया जात नाही. भक्तांच्या ज्या ज्या इच्छा असतात, त्या साऱ्या इच्छा संत पूर्ण करतात.॥६५॥ असें (सुरेख) स्मारक बांधावे की अवघ्यांनींच त्याचे कौतुक करावे. तें पाहून प्रत्येकानें आपल्या मनीं (संतोषानें) डोलावे.॥६६॥ अशा प्रकारचें इथें स्मारक बांधू, अशी तुम्हीं सर्वांनी समर्थांची शपथ घ्या. ही माझी अखेरची विनंती आहे असे समजून मान्य करा."॥६७॥ तें म्हणणें सर्वांनी कबूल केले. त्यामुळें भास्कराचें चित्त स्थिर झालें आणि त्याच्या मनाची रुखरुख संपली.॥६८॥ लहान मुलें जशी पुढील सणाच्या आशेनें आनंदित होतात, त्याप्रमाणेंच उत्तरोत्तर भास्कराची आनंदवृत्ती वाढत चालली.॥६९॥ माघ वद्य त्रयोदशीला महाराज भास्करास म्हणालें," चल, ह्या शिवरात्रीला आपण त्र्यंबकेश्वराला जाऊ.॥७०॥ तो कर्पूरगौर त्र्यंबकराजा, तो भवभवांतक भवानीवर गोदावरीच्या तीरावर स्थिर झाला आहे.॥७१॥ तें मनोहर ज्योतिर्लिंग पापविनाशी आहे. आतां उशीर न करतां आपण गंगास्नानाला जाऊ.॥७२॥ भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं एक ब्रह्मगिरी नावाचा पहाड आहे. त्या पहाडावर दरवर्षी अगणित औषधी वनस्पती उगवतात.॥७३॥ त्याच ब्रह्मगिरीवर गहिनीनाथ यांचे वास्तव्य आहे. त्यांना या औषधी वनस्पतींचे सर्व गुणधर्म ज्ञात आहेत.॥७४॥ वेड्या कुत्र्याच्या विषावरदेखील तिथें औषधी नक्की आहे. चल, आपण आता सत्वर तिचा उपयोग करून पाहू या."॥७५॥ त्यांवर भास्कर (हात जोडून) वदला," गुरुनाथा, आतां औषधींची काय आवश्यकता आहे ? त्या औषधीहून प्रभावी अशी तुमची सत्ता अगाध आहे.॥७६॥ आपल्या कृपेनें खरें तर बाळापुरांतच ह्या विषाचा प्रभाव नाहीसा झाला आहे. आतां तर आयुष्याचे केवळ दोनच महिने उरलें आहेत.॥७७॥ हे गुरुमूर्ती, या कारणास्तव मला शेगांवांतच राहावेसे वाटते. आमच्यासाठी तुम्हीच साक्षात त्र्यंबकेश्वर आहात.॥७८॥ तुमचें चरण हीच माझी गोदावरी आहे. मी तिथेच स्नान करीन. मला आतां इतर कुठल्याच तीर्थस्थानांस जाण्याची गरज नाही."॥७९॥ त्याचे असे बोलणें ऐकून, समर्थ हसलें आणि म्हणाले, " तुझें म्हणणे खरें असलें तरी तीर्थ माहात्म्य मानायालाच हवे.॥८०॥ चल, आतां त्र्यंबकेश्वरास जाण्यासाठी उशीर करू नकोस. तसेच बाळाभाऊ आणि पितांबर यांसही आपल्याबरोबर घेऊन जाऊ."॥८१॥ मग त्या मंडळींनी शेगांवहून प्रयाण केलें. शिवरात्रीला तें सर्वजण त्र्यंबकेश्वरांस पोहोचलें.॥८२॥ त्यांनी कुशावर्ती स्नान केले आणि शिवाचे दर्शनही घेतले. नंतर गंगाद्वारांस जाऊन गौतमीचे पूजन केलें.॥८३॥ निलांबिका मातेला वंदन केलें. तसेच गहिनीनाथ आणि निवृत्तिनाथांचेही दर्शन घेतलें. त्यानंतर गोपाळदासाला भेटण्यासाठी तें नाशिकांत आले.॥८४॥ हें संत गोपाळदास पंचवटीमध्ये काळ्या रामाच्या मंदिरात दाराजवळच धुनी लावून बसले होते.॥८५॥ त्या राम-मंदिरासमोरच एक पिंपळाचा पार होता. साधूवर गजानन आपल्या शिष्यांसहित त्या पारावर जाऊन बसले.॥८६॥ (त्यांना पाहून) गोपाळदासांस आनंद झाला आणि तें त्यांच्या भक्तगणांना म्हणाले," आज माझा बंधू गजानन वऱ्हाडांतून इथे आला आहे.॥८७॥ जा, तुम्हीं अनन्यभावें त्यांचे दर्शन घ्या. माझ्याकडून भेट म्हणून हा नारळ आणि खडीसाखर त्यांस अर्पण करा.॥८८॥ त्यांच्या गळ्यात हा हार घाला. तो आणि मी एकच आहोत, आमचे देह भिन्न असलें, तरी आम्हां उभयतांस वेगवेगळें मानू नका."॥८९॥शिष्यांनींही तसेच केले. तें सर्व (समर्थांचे)  दर्शन घ्यायला आलें. (गोपाळदासांनी) दिलेला तो फुलांचा हार त्यांनी (गजानन महाराजांच्या) गळ्यात घातला.॥९०॥ स्वामींसमोर नारळ आणि खडीसाखरदेखील ठेवली. तें पाहून गुरूवर भास्कराला म्हणाले," हा प्रसाद सर्वांना दे. पण उगाच गर्दी जमवू नकोस. आज या पंचवटींत माझ्या बंधूची भेट झाली.॥९१-९२॥ माझें इथलें काम तर झाले, आतां नाशिकातील काम राहिले आहे. तेंव्हा आपण आतां तिथें धुमाळ वकीलाच्या घरीं जाऊ या."॥९३॥ त्यानंतर महाराज नाशिकांत आले असता असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी जमले. महाराज तिथें असतांना अनेक बारीक सारीक गोष्टी घडल्या.॥९४॥ त्या सगळ्या सांगितल्या तर उगाच ग्रंथाविस्तार होईल (असे वाटते). म्हणून, थोडक्यांतच त्यांचे वर्णन केलें आहे. लोकहो, याबद्दल मला क्षमा करा.॥९५॥ तिथें काही दिवस राहून महाराज (भक्तमंडळींसह) शेगांवांस परतले. तेंव्हा, झ्यामसिंग महाराजांस अडगांवीं घेऊन जाण्यासाठी आला होता.॥९६॥त्यानें फारच आग्रह केला असतां, समर्थ त्यास म्हणाले," रामनवमी झाली की आम्हीं अडगांवांस नक्की येऊ. तू आता आम्हांस जास्त आग्रह करू नकोस आणि परत जा." झ्यामसिंग हा मुळातच समर्थांचा नि:सीम भक्त होता.॥९७-९८॥ (समर्थांची आज्ञा मानून) तो तसाच आपल्या अडगांवाला परत गेला. श्रोतें हो, तो पुन्हा रामनवमीस शेगांवांस परत आला.॥९९॥ त्यानें रामनवमीचा उत्सव शेगांवांत साजरा केला आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी अडगांवात समर्थांना त्यांच्या शिष्यांसहित घेऊन आला.॥१००॥ समर्थांची स्वारी अडगांवात असतांना अनेक चमत्कार झाले. एके दिवशी, दुसऱ्या प्रहरीं त्यांनी भास्कराला फुफाट्यांत लोळवला.॥१०१॥ भास्कराच्या छातीवर बसून स्वामीं त्याला मारू लागलें. हा सर्व प्रकार लोक दुरून पाहत होतें, पण त्यांच्या जवळ जाण्यास कोणीही तयार होईना.॥१०२॥ त्यावेळीं बाळाभाऊ तिथें जवळच होता. शेवटी तो म्हणाला," हे सद्‌गुरुनाथा, आतां तरी भास्कराला मारणें थांबवा. हा आधीच उन्हानें बेजार झाला आहे."॥१०३॥ त्यांवर भास्कर म्हणाला," बाळाभाऊ, तुम्हीं (महाराजांना) काही विनंती करू नका. हा माझ्यासाठी साक्षात् ईश्वर आहे, त्यामुळें तें जें काही करत आहेत, तें करू द्या. लोकांना जरी तें मला मारत आहेत, असे वाटलें तरी मला मात्र गुदगुल्या होतं आहेत. अनुभवीच त्या अनुभवाबद्दलच्या सर्व गोष्टीं जाणतात, (म्हणून मी हें तुम्हांस सांगत आहे)."॥१०४-१०५॥ पुढें महाराज भास्कराला अडगांवातील आपण उतरलेल्या ठिकाणी घेऊन आलें.॥१०६॥ आणि बाळाभाऊस म्हणाले, " भास्कराचे आता केवळ दोनच दिवस आयुष्य उरलें आहे, पंचमीला तो जाईल.॥१०७॥ आज मी रानांत त्याला कशासाठी मारले ? हें तुला कळून आले असेलच.॥१०८॥ तुला या भास्करानेच शेगांवांत माझ्याकडून छत्रीनें मार बसवला होता, तें तुझ्या लक्षांत आहे का ?॥१०९॥ तें त्याचे क्रियमाण नष्ट होण्यासाठीच मी त्याला आज मारलें. या एकाच कारणाशिवाय अन्य कुठलाही हेतू त्या कृतीमागे नव्हता."॥११०॥ त्या अडगांवात उत्सवाची सांगता झाल्यावर काय घडलें, तें आता ऐका.॥१११॥ उत्सवाचा काला झाला. वद्य पंचमीचा दिवस उजाडला. दिवसाचा पहिला प्रहर उलटल्यावर समर्थ भास्करास म्हणाले," भास्करा, आज तुझ्या प्रयाणाचा दिवस आहे. आता तू पद्मासन घालून पूर्वाभिमुख बस.॥११२-११३॥ चित्त एकाग्र करून हरिचिंतन कर. तुझा काळ जवळ आला आहे, तेंव्हा सावध राहा."॥११४॥तिथें असलेल्या लोकांस गजानन स्वामी म्हणाले," तुम्हीं आतां उच्च स्वरांत ' विठ्ठल विठ्ठल नारायण ' हें भजन करा. हा तुमचा भाऊ आज वैकुंठाला जातो आहे. त्याला हार,बुक्का वाहून त्याचे पूजन करा."॥११५-११६॥ भास्कर पद्मासनांत बसला. त्यानें आपली दृष्टि नासाग्री स्थिर केली आणि अंतर्मुख होऊन सर्व वृत्ती (ईशचरणीं) समर्पित केल्या.॥११७॥ सारें भक्तगण भास्कराचे बुक्का, हार वाहून पूजन करू लागलें. आपल्या भक्ताचा हा कौतुक सोहळा महाराज दूर बसून बघत होते.॥११८॥ सुमारें एक प्रहरभर भजन झालें. सूर्यनारायण माध्यान्हींला आले आणि महाराजांनी ' हरहर ' असा शब्द मोठ्यानें उच्चारला.॥११९॥ त्याबरोबर भास्कराचा प्राण वैकुंठी गेला. संतांची ज्यांना आपल्या कृपाछत्रछायेखालीं घेतलें असतें, तें (मृत्यूनंतर) वैकुंठी हरीचें अतिथीच असतात.॥१२०॥ लोक महाराजांस विचारू लागलें ," भास्कराची समाधी कुठें करायची ? त्याच्या शरीरास कुठें न्यायचें ?"॥१२१॥ त्यांवर समर्थ सर्वांना सांगू लागले," पशुपती द्वारकेश्वराच्या जवळ सतीचे देऊळ आहे, तिथेच भास्कराचा देह विसावू दे."॥१२२॥ (महाराजांची) अशी आज्ञा होताक्षणींच लोकांनी एक विमान बांधलें. सज्जन हो, चारही बाजूंस केळीचे खांबही लावलें.॥१२३॥ (त्या विमानांत भास्कराचा) देह ठेवला. त्यापुढें भजनाचा गजर सुरु झाला आणि भास्कराला द्वारकेश्वराजवळ (भजनाच्या) गजरांत आणला.॥१२४॥ तिथें समाधीचा विधी यथासांग पार पडला. ' महाराजांचा परम भक्त गेला हो ! ' असें लोक म्हणू लागलें.॥१२५॥ दुसऱ्या दिवसापासून समाधीस्थानीं गोरगरिबांसाठी अन्नदान होऊ लागलें.॥१२६॥हें द्वारकेश्वराचे स्थान अडगांवाच्या उत्तरेस साधारण एक मैलावर आहे.॥१२७॥ द्वारकेश्वराची जागा अतिशय रमणीय होती. तिथें चिंचवृक्षांची दाट झाडी होती.॥१२८॥ त्याचप्रमाणें निंब,अश्वत्थ, मांदार, आंबा,वड आणि औदुंबर असें कितीतरी वृक्ष त्या ठिकाणीं होते. शिवाय कांही फुलझाडेंही होती.॥१२९॥ अडगांव आणि अकोली ह्या गावांपासून समान अंतरावर हे ठिकाण आहे, तिथेच समर्थांनी आपल्या भास्करास समाधी दिली.॥१३०॥ दहा दिवस तिथें अन्नदान चाललें होते, हा वृत्तांत पूर्वीच सांगितला आहे. त्यास संतभंडारा असे म्हणतात.॥१३१॥ त्या चिंचवृक्षांच्या सावलींत पंगत जेवायला बसत असे. त्या तिथें कावळ्यांचा अतोनात त्रास होऊ लागला.॥१३२॥ काव-काव असे त्या कावळ्यांचे कर्कश ओरडणे चालू असायचे.पत्रावळींवरील द्रोण उचलून न्यायचे आणि जेवत असलेल्या लोकांच्या अंगावर मलोत्सर्गही करायचे.॥१३३॥ या प्रकारांनी लोक अतिशय त्रासून गेलें होते. अखेर भिल्लांनी त्या कावळ्यांना मारण्यासाठी तीरकमटे तयार केलें.॥१३४॥ तें पाहून गजानन महाराज त्या लोकांना म्हणाले," त्या (कावळ्यांना) तुम्हीं मारू नका. इथें येण्यांत त्यांचा काहीच दोष नाही.॥१३५॥ इतरांप्रमाणेच आपणासही भास्कराचा प्रसाद मिळावा, एव्हढाच या भंडाऱ्यांत येण्याचा त्यांचा हेतू आहे.॥१३६॥ कारण भास्कर हा थेट वैकुंठ लोकीं गेला. तो पितृलोकावर मुळींच राहिला नाही.॥१३७॥ वस्तुतः प्राण अंतरिक्षांत दहा दिवसापर्यंत परिभ्रमण करत राहतो. पिंडदान झालें की मगच तो पुढें जातो.॥१३८॥ अकराव्या दिवशी काकबली देतात. कावळा जेव्हा त्यास स्पर्श करतो, तेव्हांच प्राण पुढें जातो.॥१३९॥ परंतु, भास्करास त्या बलिदानाचें कारणच उरलें नाही. म्हणूनच या कावळ्यांना राग आलेला आहे.॥१४०॥ भास्कराचा आत्मा केव्हांच मुक्त झाला आहे. आतां तो वैकुंठीचा पाहुणा झाला आहे.॥१४१॥ या सोम-सूर्य लोकांत (परिभ्रमण करण्याचे) त्यांस काही कारणच उरलें नाही. म्हणूनच पिंडदानाचीदेखील काहीच आवश्यकता नाही.॥१४२॥ ज्यांना अशी गती मिळत नाही, त्यांच्यासाठी पिंडदान करतात. कलशावर पिंड ठेवून कावळ्यानें स्पर्श करण्याची वाट पाहतात.॥१४३॥ भास्कराने एकदम वैकुंठ लोकांस गमन केलें, हे ह्या कावळ्यांना समजले आहे. म्हणूनच तें रागावले आहेत.॥१४४॥ आम्हांलाही या भंडाऱ्याचा प्रसाद मिळाला पाहिजे, असें या कावळ्यांना वाटतें आहे. म्हणूनच तें असें (त्रासदायक) वर्तन करीत आहेत.॥१४५॥ तुम्हीं त्यांस मारू नका. मीच त्यांना आतां समजावून सांगतो. अहो जीवांनो, मी आता तुम्हांस जे सांगतो, ते ऐका.॥१४६॥ उद्यापासून तुम्हीं या स्थानीं मुळीच येऊ नका. नाहीतर, माझ्या भास्कराला कमीपणा येईल.॥१४७॥ तुम्हीं सर्व आज हा प्रसाद घेऊन तृप्त व्हा. मात्र उद्यापासून या ठिकाणीं अजिबात येऊ नका."॥१४८॥ महाराजांचे हे बोलणें भाविकांस पूर्णतः पटलें. पण त्या मंडळींत काही कुत्सितही होतें.॥१४९॥ तें (कुचेष्टेनें) हसू लागलें आणि एकमेकांस म्हणू लागले," हें गजानन किती निरर्थक आणि अस्थानीं बोलतात ? पक्षी का कधी मानवाच्या आज्ञेप्रमाणें वागतात ? उद्या आपण मुद्दाम इथें येऊन या गोष्टीची प्रचिती पाहू या.॥१५०-१५१॥ हें वेडें असें काहीही बोलतात आणि भाविकांस आपल्या नादी लावतात. तसेच आपल्या संतत्वाचे निरर्थक स्तोम माजवतात.॥१५२॥ अहो, शोभेल असें बोलावें आणि पचेल तेंच खावें ! उगाच अंगात उसनें अवसान कधी आणू नये."॥१५३॥ दुसऱ्या दिवशीं ते कुत्सित लोक मुद्दाम तिथें बघायला आले. पण एकही कावळा त्यांच्या दृष्टीस पडला नाही.॥१५४॥ मग मात्र तें आश्चर्यचकित झालें आणि समर्थांना शरण आलें. श्रोत हो, बारा वर्षें उलटून गेली तरी त्या स्थानीं कधी कावळें आले नाहीत.॥१५५॥ चौदा दिवस झाल्यावर, गजानन महाराज आपल्या उर्वरित शिष्यांसह शेगांवांत परत आले.॥१५६॥ श्रोतें हो, त्या शेगांवांत एक अघटित घडलेली गोष्ट मी तुम्हांस सांगतो. ती तुम्हीं चित्त एकाग्र करून ऐका.॥१५७॥ त्या वर्षी दुष्काळ पडला होता. म्हणून सुरुंग लावून एक विहिर खोदण्याचें काम चाललें होते.॥१५८॥ साधारणपणें दोन पुरुषांवर खोल खणून झाल्यावर मोठा काळा खडक लागला. त्यामुळें पहारीनें खणण्याचा वेग मंदावला.॥१५९॥ म्हणून मग छिद्रें पाडून त्यांत दारू ठासून भरली आणि सुरुंग लावून तो खडक फोडण्याचें काम सुरु झालें.॥१६०॥ चारही बाजूंनी पहारीनें खोदून चार भोकें तयार केली. शेवटी, त्यांत दोऱ्या घालून दारू ठासून भरली.॥१६१॥ एरंड-पुंगळ्या पेटवून चारही दोऱ्यांतून त्या खाली सोडल्या. पण त्या पुंगळ्या दोऱ्याच्या गाठींशी अडकून बसल्या.॥१६२॥ पुंगळी खाली जात नव्हती, त्यामुळें सुरुंग काही पेटणें शक्य नव्हते. पाणी मात्र हळू हळू सुरुंगाच्या जवळ येऊ लागले.॥१६३॥ तेंव्हा त्या कामावरचा मिस्तरी, "सुरूंगाला जर पाणी लागलें, तर हें सारें सुरुंग वाया जाईल." असा मनांत विचार करू लागला.॥१६४॥ म्हणून गणू जवऱ्याला तो मिस्तरी म्हणाला," तू विहिरीत उतरून या पुंगळ्या थोड्या खाली सरकव आणि तू लवकर वर ये. तोपर्यंत पुंगळ्या दारुच्या बाराजवळ जातील आणि आपलें कामही होईल."॥१६५-१६६॥ त्या पुंगळ्या सरकवण्यासाठी खाली (विहिरीत) जायला कोणाचीच हिम्मत होत नव्हती. म्हणून या गणू जवऱ्याला मिस्तरीनें दटावलें.॥१६७॥ गणू जवऱ्याच्या घरीं दारिद्र्य होते, त्यामुळें त्या बिचाऱ्यास (हें अवघड) काम करणें भाग होते. यज्ञासाठी आणलेल्या बळीच्या बोकडाप्रमाणें त्याच्या मनाविरुद्ध जबरदस्तीनें (विहिरीत उतरण्यास सांगत होते).॥१६८॥ या गणू जवर्‍याची समर्थांवर अढळ श्रद्धा होती. मिस्तरीची परत आज्ञा होतांच गणू (नाइलाजानें) अखेर विहिरीत उतरला.॥१६९॥ त्यानें एक पुंगळी सरकवली, ती तत्क्षणींच तळाला गेली आणि दारूला जाऊन भिडली. गणू आंत विहिरीतच अडकला.॥१७०॥ दुसऱ्या पुंगळीस खाली सरकवण्यासाठी त्यानें जो हात पुढें केला, तोपर्यंत पहिला सुरुंग उडाला. (श्रोतें हो,गणूच्या जो मनाचा थरकाप उडाला,) तो काय विचारतां ?॥१७१॥ विहिरीत अडकलेला गणू (महाराजांचा) धावा करू लागला, " समर्था, तू सत्वर धावत ये. आतां माझें रक्षण तुझ्याशिवाय कोण करणार बरें ?"॥१७२॥विहिरीत त्या धुराचा डोंब उसळला होता. दुसरा सुरुंगही पेटण्यास अवघें काही क्षणच उरलें होते.॥१७३॥ एवढ्यात गणू जवर्‍याच्या हाताला एक कपार लागली. त्या कपारींत गणू जवर्‍याची स्वारी जाऊन बसली.॥१७४॥ उरलेल्या तीनही सुरुंगांनी एकामागून एक असा पेट घेतला. अनेक दगड वर उडालें.॥१७५॥ (सगळें सुरुंग शांत झाल्यावर) सर्व स्त्री-पुरुष विहिरीत डोकावून गणू जवर्‍याला पाहू लागलें. त्याचे शरीर छिन्न भिन्न झालें असेल, असें तें आपापसांत बोलू लागले.॥१७६॥ तर काही जण तो कोठें दिसत नाही हें पाहून, गणू एखाद्या दगडाप्रमाणेच बाहेर उडाला असेल, असा तर्क करू लागले.॥१७७॥ " बाहेरच्या भागांत कुठेतरी त्याचे प्रेत पडलेले असेल, तें शोधण्यासाठी एखादा माणूस पाठवा."॥१७८॥ मिस्तरीचे हें बोलणें ऐकताच गणू विहिरीतूनच ओरडून म्हणाला, " अहो मिस्त्री, गणू मेला नाही तर विहिरीत सुरक्षित आहे. गजाननाच्या कृपेनें मी इथें वाचलो खरा, या एका कपारींत जाऊन बसलों होतो.॥१७९-१८०॥ पण कपारीच्या तोंडाला एक मोठा धोंडा येऊन पडला आहे, त्यामुळें मला बाहेर येत येत नाही.॥१८१॥ गणूचे हे शब्द ऐकताच साऱ्यांना कमालीचा आनंद झाला आणि काही जण तो धोंडा काढण्यासाठी खाली उतरलें.॥१८२॥ पाच-दहा जणांनी पहारीनें तो धोंडा सरकावला आणि गणूस (कपारींतून) बाहेर काढून वर घेऊन आलें.॥१८३॥ वरती येतांच, गणू पळत पळत गावांत समर्थांच्या मठांत त्यांचे दर्शन घेण्यासाठी गेला.॥१८४॥ गणू दर्शनाला येतां क्षणीच कैवल्यदानी त्याला म्हणाले, " गण्या कपारींत बसून किती धोंडे उडवलेस ?॥१८५॥ त्यांतीलच एक मोठा धोंडा तुझ्या रक्षणासाठी कपारीच्या तोंडाला येऊन बसला, म्हणून तर तू वाचलास.॥१८६॥ पुन्हा हे असलें साहस कधी करू नकोस. कुठलाही प्रसंग येऊ दे, पुंगळ्या एकदा पेटल्यावर त्यांना मध्येच जाऊन कधीही हातानें धरू नकोस.॥१८७॥ आतां जा... आज तुझे गंडांतर टळलें." (तोपर्यंत) त्या गणूस बघायला गावांतील लोक आलें.॥१८८॥ त्यांवर गणू म्हणाला, " हें सद्‌गुरुनाथा, चारही सुरुंग पेटल्यावर तूच तर मला हात देऊन कपारींत बसवलेस. म्हणून तर मी वाचलों आणि तुझें हे चरण पाहण्यासाठी आलो. अन्यथा हे गुरुराया, त्या विहिरीतच मी मेलों असतो."॥१८९-१९०॥ असें हें गजाननकृपेचें माहात्म्य अगाध आहे, ते संपूर्णपणें वर्णन करण्याचें सामर्थ्य माझ्या ठायीं नाही.॥१९१॥ श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नावाचा ग्रंथ भाविकांस आल्हाददायक व्हावा, हेंच हा दासगणू इच्छितो.॥१९२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते १० इथे वाचता येतील.


अवश्य वाचावे असे काही :

श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )


Sep 20, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १०


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अरुपा, अव्यया, पूर्णब्रह्मा, पंढरीराया आणि सज्जनांच्या आश्रयदात्या माझी आतां उपेक्षा करू नकोस.॥१॥ देवा, हा दासगणू (तुझा नसून) कोण्या परक्याचा आहे असे आता म्हणू नकोस. हे नारायणा, माझ्या पातकांचा विचारही मनांत आणू नकोस.॥२॥ माझ्या हातून कधी पुण्यकर्में झाली नाहीत, हे मला पुरतें ठाऊक आहे. अगदीं तुला तोंड दाखवण्यासदेखील मी पात्र नाही(हे मी जाणतो).॥३॥ हे देवा, एकूण अशी स्थिती असली, तरी तू माझ्यावर कृपा कर. गोदावरी ओहोळास आपल्यात सामावून घेतेच.॥४॥ तसेच तू करावेस आणि माझ्या अवघ्या दु:खाचे निवारण कर. माझ्या ठायीं पातक यत्किंचित्‌ही राहू नयें.॥५॥ तू मनांत आणलें तर सर्व काही घडून येते (अशक्यही शक्य होते). तुझी कृपा झाल्यास (क्षणार्धात) रंकाचाही राव होतो.॥६॥ असो. एकदा पुण्यराशी गजानन महाराज अमरावतीस गेले आणि आत्माराम भिकाजीच्या सदनांत वास्तव्यास राहिले.॥७॥ हा भिकाजीसुत आत्माराम अमरावतीचा प्रांत होता आणि श्रोतें हो, त्याच्या हातांत फार मोठा अधिकार होता.॥८॥ हा जातीनें कायस्थ प्रभू होता आणि संतमंडळींच्या चरणीं ह्याची फार श्रद्धा होती. असा हा सदाचारसंपन्न, संसारी, गृहस्थ होता.॥९॥ त्याच्या घरी समर्थांचे आगमन झाल्यावर, आत्मारामाने स्वामींचे यथाविधी पूजन केलें. (त्याने) उष्णोदकानें गजानन महाराजांना मंगलस्नान घातले.॥१०॥ नाना प्रकारची उटणीं त्यानें श्रींच्या तनूस लावली. संतसहवासाने त्याचे मन हर्षोल्हासित झाले होते.॥११॥ (समर्थांस) उमरेडची सुरेख कर्वतीकांठी धोतरजोडी वस्त्रें म्हणून अर्पिली. त्यांच्या भाळीं केशरी गंधाचा भव्य तिलक लावला.॥१२॥ कंठीं पुष्पहार वाहिला. तसेच नैवेद्य म्हणून विविध पदार्थ (श्रींसमोर) ठेवले. शंभर रुपयांची दक्षिणा अर्पण केली.॥१३॥ धूप, दीप आरती झाल्यावर (भिकाजीने स्वामींस) पुष्पांजली समर्पित केली. अमरावतीच्या लोकांची (गजानन महाराजांच्या) दर्शनासाठी गर्दी होऊ लागली.॥१४॥ समर्थांस आपल्या घरी घेऊन जावे आणि त्यांचे याचप्रमाणें यथासांग पूजन करावे, असे तिथें जमलेल्या प्रत्येकांस वाटत होते.॥१५॥ अनेक लोकांची अशी इच्छा होती, तरी फारच थोड्याजणांची मनोकामना पूर्ण झाली. महाराजांचे चरण घरीं लागण्यासाठी (भक्तांचे) पुण्य बलवत्तर असणे आवश्यक होते.॥१६॥ अंतर्ज्ञानी संत अवघेंच जाणतात, त्यांमुळे जे भाविक असें पुण्यवंत होते, समर्थ त्यांच्या घरीं गेले.॥१७॥ गणेश श्रीकृष्ण खापर्डे नांवाचें एक अमरावतीत बडे गृहस्थ होते. त्यांच्या वकीलीच्या यशस्वी कारकिर्दीमुळे त्यांच्यापुढें (अक्षरश:) रुपयांचे ढीग पडत असत.॥१८॥ वऱ्हाडांत (लोक) त्यांना दादासाहेब असे म्हणत असत. हा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण असून अत्यंत भाविक, सज्जन (गृहस्थ) होता.॥१९॥ त्याने मनापासून विनंती केली असतां महाराज त्याच्या घरी गेले. लोकहो, समर्थांचे तिथेही याचप्रमाणें पूजन झाले.॥२०॥ गणेश आप्पा नावाचा एक लिंगायत वाणी(व्यापारी) होता. त्याची पत्नी चंद्राबाई ही परम भाविक होती.॥२१॥ ती आपल्या पतीस म्हणाली, " या संत गजानन महाराजांस कसेही करून आपल्या घरी येण्यांसाठी आमंत्रण दिले पाहिजे. तुम्ही त्यांस विनंती करून पाहा. आपलें मन निष्पाप असल्यांस त्यांचे आगमन आपल्या घरीं नक्की होईल आणि त्यांमुळे आपले घर पवित्र होईल. देव आपल्या भक्तांच्या अधीन असतो."॥२२-२३॥ यांवर गणेश आप्पा उत्तरला," तुला खरोखर वेड लागलें आहे. हा साधू घरीं नेण्यास बलवत्तर वशिला हवा. खापर्डे (यांसारख्या प्रतिष्ठीत मान्यवरांस) देखील ह्या संतास घरी नेण्यास फार कष्ट पडले, हे लक्षांत घे. उगाच असां हट्ट करू नकोस."॥२२४-२५॥ चंद्राबाई मात्र आपल्या पतीस म्हणाली," हे कांही माझ्या मनांस पटत नाही. माझी मनोदेवता सांगते की आपल्या घरी हे साधू नक्की येतील. तुम्ही त्यांना आपल्या घरी येण्याची (प्रार्थनापूर्वक) विनंती तर करा. संतांची गरीब भक्तांवर विशेष प्रेम असते."॥२६-२७॥ पण आप्पा काही बोलेना. श्री गजानन महाराजांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देण्याची त्याची काही हिम्मत झाली नाही.॥२८॥ अखेर महाराजच गणेश आप्पाचा हात धरून म्हणाले, "तुझें घर कुठे आहे? किती दूर आहे ? ते मला सांग. मला तुझ्या घरी यावें, काही काळ तिथे बसावे, असे वाटते. अरे, मनांत असेल ते कोणाचीही भीडभाड न ठेवतां बोलावे."॥२९-३०॥ असे महाराज वदतां क्षणीं गणेश आप्पाला अतिशय आनंद झाला. भावनावेगाने त्यास एकही शब्द बोलवेना.॥३१॥ समर्थांस आपल्या गृहीं नेऊन त्या उभयंतां पती-पत्नींनी त्यांची (श्रद्धापूर्वक) पूजा केली. आपला सर्व संसार त्या दोघांनी स्वामींच्या चरणीं तत्क्षणींच अर्पण केला.॥३२॥ असो. त्या अमरावतींत (समर्थांच्या) अशा असंख्य पूजा संपन्न झाल्या. त्या प्रत्येक पूजासमयीं एक गृहस्थ नेहेमी हजर असायचा.॥३३॥ तो आत्माराम भिकाजीचा नात्यानें भाचा होता आणि मुंबईत तारमास्तर या पदावर काम करीत होता.॥३४॥ त्याचे बाळाभाऊ असे नाव होते. तो रजा घेऊन अमरावतीस आपल्या मामांस भेटण्यासाठी आला होता.॥३५॥ त्या बाळाभाऊंची समर्थ चरणीं श्रद्धा जडली होती. अशा थोर संतांचे चरण सोडून इतर कुठे जाऊ नये, असे तो म्हणू लागला.॥३६॥ हा अवघा प्रपंच अशाश्वत आहे, त्यांत आतां चित्त कशासाठीं गुंतवावे बरें ? आजपर्यंत जितका संसार केला, तोच आतां पुरें झाला.॥३७॥ काहीही झाले तरी, आजपासून मी त्यांचे चरण सोडणार नाही. अहो, अमृत समोर असतांना का कोणी विष प्यायला जाईल ?॥३८॥ सज्जनहो, केवळ असा मनाशी निश्चय करून, बाळाभाऊ प्रत्येक पूजेला उपस्थित राहू लागला होता. इतर दुसरें कुठलेही (पूजेस हजर राहण्याचे) कारण नव्हतें.॥३९॥ असो. काही दिवसानंतर समर्थ शेगांवी परतले. मात्र (कृष्णाजींच्या) मळ्यांस न जाता तें मोट्यांच्या (शिव) मंदिरांत आले.॥४०॥ त्या मंदिराच्या पूर्वेस एक ओसाड जागा होती. पुण्यपुरुष गजानन महाराज तिथें येऊन बसले.॥४१॥ कृष्णा पाटलाला महाराजांच्या आगमनाची वार्ता कळली, तसेच आपल्या मळ्यांतील जागाही त्यांनी सोडली हे समजले.॥४२॥ म्हणून तो धावतच त्या ओसाड जमिनीकडे आला. महाराजांस दंडवत करून तो (हताश होऊन) अधोवदन (मान खाली घालून) बसला.॥४३॥ त्याच्या डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. त्या अश्रूंनी त्याच्या छातीवरील वस्त्र (सदरा) पुरतें भिजून गेले होते.॥४४॥ (कृष्णाजी) पाटलाला (असा खिन्न पाहून) महाराज त्याला म्हणाले, " तू असा (शोकग्रस्त होऊन) रडत का आहेस? तुला काय दु:ख आहे, ते मला लवकर सांग बघू."॥४५॥ त्यावर पाटील आपलें दोन्ही कर जोडून बोलू लागला," महाराज, आज तुम्ही माझ्या मळ्याचा का बरें त्याग केला ?॥४६॥ हे ज्ञानवंता, असा कोणता अक्षम्य अपराध माझ्या हातून घडला आहे ? मी तर आपलें (अजाण) लेकरू आहे.॥४७॥ तसेच ही जागा एका माळ्याच्या मालकीची असून, तो देशमुखाच्या गटातील आहे. तुम्हीं (कदापिही) इथें राहू नका.॥४८॥ तुम्हांस मळ्यांत राहायची इच्छा नसेल तर, माझ्या राहत्या घरीं चला. हे दयाळा, तें मी तुमच्यासाठीं लगोलग खाली करतो.॥४९॥ तुम्हांवाचून दुसरें काहीही मला प्रिय नाही, (हे सत्य तुम्हीं जाणता)." तोपर्यंत हे वर्तमान अवघ्यां पाटील बंधूंस समजले.॥५०॥ तेही त्या ठिकाणी धावतच आले आणि हरी व नारायण हे दोघेंजण महाराजांस आपल्या घरी (वास्तव्यांस) येण्याची विनंती करू लागले.॥५१॥ तेव्हा महाराज (शांतपणे) त्यांस समजावू लागले, " आज मी जो या जागेवर येऊन बसलों आहे, तें तुमच्या हितासाठीच आहे.॥५२॥ तें तुम्हांस पुढें कळून येईल. आतां जास्त वाद घालू नका, हाच वाद तुम्हां दोघांच्या (पाटील आणि देशमुख मंडळींच्या) विनाशास कारण होईल,हे विसरू नका.॥५३॥ या जगांत जितकें जमिनदार आहेत, ते कधीही मागचा पुढचा विचार करीत नाहीत. खरें तर, हाच त्यांचे ठायीं उणेपणा आहे.॥५४॥ जा, बंकटलालास (तुम्हीं) सत्वर इथें घेऊन या पाहू. मी जेव्हा त्याचे घर सोडले, तेव्हा तो मुळीच रागावला नाही.॥५५॥ त्याचे कारण त्यास विचारून बघा. माझी तुमच्यावर नेहेमीच कृपा आहे, ती कोणत्यांही कारणांनी ढळणार (कमी होणार) नाही."॥५६॥ (हे वृत्त कानीं येताच) बंकटलालही तिथें आला, आणि पाटील मंडळींची समजूत घालू लागला. समर्थांच्या मर्जीविरुद्ध तुम्हीं त्यांना मळ्यांत राहण्याचा आग्रह करू नका.॥५७॥ महाराजांनी जेव्हा माझें घर सोडून (मारुती मंदिरात) राहण्याचा निश्चय केला, तेव्हा सांगा बरें मी काय केलें ? आपण सर्वजण त्यांची लेकरें आहोत, ते अवघ्यांचेच श्रद्धास्थान आहेत.॥५८॥ सखाराम आसोलकर उदार मनुष्य आहे. तो आपली जागा (समर्थांसाठी) देण्यास नकार देणार नाही, असे मला वाटते.॥५९॥ सखाराम जागा देईल आणि पुढची व्यवस्था आपण करू या. जेणें करून सर्व लोकांस यांत सहजच सहभाग घेता येईल.॥६०॥ असा सर्वांचा समेट होऊन त्या ठिकाणीं (महाराजांचा) मठ बांधला गेला. त्या कार्यांत परशराम सावजींनी विशेष मेहेनत घेतली.॥६१॥ समर्थांबरोबर भास्कर, बाळाभाऊ, पितांबर, आणि अमरावतीचा गणेश आप्पा असे त्यांचे चार निस्सीम भक्त नेहेमी असत.॥६२॥ त्याचप्रमाणें रामचंद्र गुरवही महाराजांच्या बरोबर राहत होता. हे पाच शिष्य जणू पांडव आणि गजानन साक्षात श्रीहरी असे (त्या शेगांवांत) शोभू लागले.॥६३॥ दिवसोंदिवस बाळाभाऊची वृत्ती अतिशय विरक्त होऊ लागली. आपल्या नोकरीची त्यानें यत्किचिंतही पर्वा केली नाही.॥६४॥ बाळाभाऊस घरीं परतण्यासाठी वरचेवर पत्रे येत असत. पण त्या पत्रांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.॥६५॥ (हे सर्व पाहून) भास्कर महाराजांस म्हणाला, " गुरुराया, हा (बाळाभाऊ) पेढे खाण्यास चटावला आहे, म्हणूनच आपणांस सोडून इतरत्र जाण्याची ह्याची इच्छा नाही. आतां तुम्हीं याला चांगला मार द्या,म्हणजेच हा आपल्या घरीं परतेल. चौदावें रत्न पाहिल्याशिवाय हा काही येथून हलणार नाही. लकडीवाचून माकड कधी सरळ होत नाही. मोठमोठें पहाडही वज्रास घाबरतात."॥६६-६८॥ (हा प्रकार पाहून) बाळाभाऊंस एकदां (महाराजांच्या शिष्यांनी) जबरदस्तीने परत पाठविले. पण तो नोकरीचा राजीनामा देऊन (मठांत) परत आला.॥६९॥ बाळाभाऊ शेगांवांत परतलेला पाहून भास्कर त्याला म्हणाला, " अरे, येथें असा वारंवार येऊन आम्हांला त्रास का देतोस?॥७०॥ ओढाळ बैल जसा हिरव्यागार गवतावर कायम चरण्यासाठी जायला पाहतो. त्याला कितीही मार दिला तरी, पुन्हा पुन्हा तो तिथेच येतो.॥७१॥ त्या लोचटाप्रमाणेच तुझी तंतोतंत वर्तणूक आहे, हे निश्चित ! अरे, ज्याला विरक्ति आली आहे, त्यानेंच इथे (महाराजांजवळ) यावें."॥७२॥ भास्कराचे असे अहंकारपूर्ण बोलणें महाराजांस काही आवडले नाही. त्यांनी भास्कराचे अज्ञान दूर करण्यासाठी एक लीला केली.॥७३॥ तिथेच एका गृहस्थाच्या हातांत भली मोठी छत्री होती. गजानन महाराजांनी ती आपल्या हातांत घेतली आणि (त्या मोठ्या छत्रीने) बाळाभाऊंस मारू लागले.॥७४॥ सज्जनहो, त्या छत्रीने बाळाभाऊंस इतका मार दिला की ती छत्री शेवटी मोडली. मग, (समर्थांनी) एक वेळूची भरीव काठी हातांत घेतली.॥७५॥ आणि तिने (बाळाभाऊंस) झोडणें सुरु केले. ते दृश्य पाहून तिथें असलेले लोक अतिशय घाबरले. काही जण तर त्या मठांस सोडून पळून गेले.॥७६॥ पण बाळाभाऊ मात्र समर्थांच्यापुढे तसाच पडून (मार खात राहिला). अशा जोरदार मारानें तो कदाचित मेला असावा, असे कित्येक लोक बोलू लागले.॥७७॥ इकडें भास्करही, बाळाभाऊ असा मार खात असलेला पाहून, अतिशय चिंतातुर झाला होता. पण समर्थांना काही बोलण्याची त्याची हिम्मत होईना.॥७८॥ बाळाभाऊच्या पाठीवर मारत असतांना (अखेर ती भरीव वेळूची) काठीही मोडली. मग कंटाळून शेवटी (महाराज) त्यास (पायांनी) तुडवू लागले.॥७९॥कुंभार जसा माती पायांनी तुडवितो, अगदी त्याचप्रमाणें महाराजांचा (बाळाभाऊस) तुडविण्याचा प्रकार चालू होता.॥८०॥ मठांत ही घटना घडत असतांना, समर्थांचे शिष्यगण धावू लागले, तर काही जण महाराजांच्या आवडत्या मंडळींस बोलावण्यासाठी गेले.॥८१॥ (हे वृत्त ऐकताच) बंकटलाल, कृष्णाजी आदी मंडळी मठांत धावतच आली. परंतु, समर्थांचा हात धरून त्यांना थांबविण्यास मात्र कोणीही तयार होईना.॥८२॥ अखेर, बंकटलाल घाबरतच म्हणाला, "समर्था, हा आपला भक्त आहे. आता तरी याला अशा प्रकारें तुडवणें थांबवा."॥८३॥ त्याची ती विनवणी ऐकून समर्थ हसतच म्हणाले, " हे असें असंबद्ध का बोलत आहेस ? हे मला काही कळत नाही. मी बाळाभाऊस ना मारले, ना त्याला तुडविलें. तू त्यास नीट निरखुन पहा, म्हणजे (मी काय सांगत आहे तें) तुला कळून येईल."॥८४-८५॥ नंतर बाळाभाऊकडे वळून महाराज म्हणाले," वत्सा, तू सत्वर उठ पाहू आणि इथे जमलेल्या सर्व मंडळींस तुझें अंग दाखव."॥८६॥ महाराजांची अशी आज्ञा होताच बाळाभाऊ उठून बसला. सर्व लोक त्याच्या अंगाला (कुठे लागले आहे का ?) हे निरखून पाहू लागले.॥८७॥ तेव्हा त्याच्या अंगावर एका साधा वळही उमटला नव्हता वा त्याला कोठेंही काही लागले नव्हते. उलट तो पाहिल्याप्रमाणेच आपल्या आनंदांत निमग्न होता.॥८८॥ तें पाहून भास्करास बाळाभाऊचा अधिकार कळला. त्यानंतर तो पुन्हा कधीही बाळाला वेडेवाकडें बोलला नाही.॥८९॥ सोनें जेव्हा कसोटीस उतरतें, तेव्हाच त्याची किंमत कळते. तो घडलेला प्रकार पाहून समस्त लोक आश्चर्यचकित झाले.॥९०॥ श्रोतें हो, बाळापुरांत एक सुकलाल आगरवाल नावाचा गृहस्थ होता. त्याच्या आगरातील एक गाय अतिशय द्वाड होती.॥९१॥ ती गाय गांवांत स्वैरपणें फिरायची. (तिच्या वाटेत आलेल्या)मुलां-माणसांना तुडवायची. भल्या भल्या ताकदवान गावकऱ्यांस आपल्या शिंगावर घेऊन फेकून द्यायची.॥९२॥ कधी ती गाय वाटेल त्याच्या दुकानांत शिरायची आणि तिथे ठेवलेल्या धान्यांच्या टोपल्यांत आपलें तोंड खुपसायची आणि यथेच्छपणें वाटेल तितकें धान्य खायची. (टोपल्यांत) उरलेल्या धान्याची नासाडी करायची. तर कधी धक्का देऊन तेल-तुपाच्या पिंपांची सांडलवंड करायची.॥९३-९४॥ (तिला) घरीं बांधून ठेवले असता चऱ्हाटें तर बघतां बघतां अगदी सहजपणें तोडायची. अगदी साखळीसुद्धा त्या गाईला बांधायला निरुपयोगी ठरायची.॥९५॥ ती जणू गाय नसून वाघीणच वाटायची. बाळापुरांतील लोक तिच्या ह्या त्रासाला कंटाळून गेलें होते.॥९६॥ ती गाय गाभण मुळींच रहात नव्हती, ना दूध देत होती. घरांत वा इतर कोठेही बांधून ठेवलें तरी तिथेंही राहत नव्हती.॥९७॥ " या गाईला खाटकाला तरी देऊन टाक किंवा तूच गोळी घालून तिला मारून टाक. ", असे लोक त्या सुकलालाला म्हणू लागले.॥९८॥ त्यावर सुकलाल त्या लोकांस म्हणाला, " लोक हो, तुम्हीच वाटेल तो प्रयत्न करून तिला मारून टाका.॥९९॥ एका पठाणानें तिला मारण्याचा प्रयत्न केला. बंदुकींत गोळी भरून तो एकदा टपून बसला होता.॥१००॥ तें कसे काय कोण जाणे , पण त्या गाईला कळले. तिनें त्या पठाणास शिंगावर घेऊन उताणा पाडला.॥१०१॥ मी तिला परगांवीही नेलें होते आणि तेथेच सोडून आलो होतो. परंतु ती तेथूनही परतून आली, तेंव्हा आतां मी काय करू ? ते (तुम्हीं लोकच) सांगा."॥१०२॥ हें त्याचे बोलणें ऐकून लोक म्हणू लागले," यांवर आतां एकच उपाय दिसतो आहे. समर्थांनी गोविंदबुवांचा (द्वाड) घोडा शांत केला, असे समजतें.॥१०३॥ तुही या गाईला घेऊन शेगांवांस जा आणि ती गाय समर्थांस अर्पण कर. जेणेंकरून (आपल्या ह्या समस्येचा) नाश होईल.॥१०४॥ साधूस गाय दान केल्याचें तुला अत्यंत श्रेष्ठ असें पुण्य लाभेल आणि त्यायोगें आमचेंही हें संकट टळेल, बापा !"॥१०५॥ हा विचारास सर्वांनीच मान्यता दिली आणि गाय (शेगांवला) घेऊन जाण्याचे ठरविले. तिला धरण्यासाठी (सर्व लोक) नाना तऱ्हेचें प्रयत्न करू लागले.॥१०६॥ पण (त्यांच्या) एकाही प्रयत्नास यश आले नाही. शेवटी एका पटांगणात (गावकऱ्यांनी) हरळकुंद्याचा मोठा ढीग केला, तसेच तिथेच बाजूला सरकीही रचून ठेवली.॥१०७॥ तें खाण्यासाठी गाय धावत आली. ती तेथें आल्यावर दहा-वीस जणांनी फांस टाकून तिला पकडलें.॥१०८॥ आणि (मजबूत) साखळदंडानें पुरतें बांधून एका गाडीवर चढवलें. त्यानंतर (त्या गाईला) श्री गजानन महाराजांस अर्पण करण्यासाठी (तें लोक) शेगांवाकडे निघालें.॥१०९॥ जसें जसें शेगांव जवळ येऊ लागले, तसा-तसा त्या गाईच्या स्वभावांत बदल दिसू लागला.॥११०॥ आणि ज्याक्षणीं ती गाय समर्थांपुढे आली, ती अगदीच केविलवाणी दिसू लागली. त्या पुण्यपुरुषांकडे ती डोळ्यांत पाणी आणून पाहू लागली.॥१११॥(त्या गाईला साखळदंडानें असें जेरबंदी केलेले पाहून) महाराज अवघ्यांस म्हणाले, " हा काय तुमचा मूर्खपणा म्हणावा ? गाईस या अशा यातना देणें, हे काही बरें नव्हे.॥११२॥ (या गाईचे) चारही पाय बांधले आहेत, गळ्यांसही साखळदंड लावलेलें आहेत. काथ्याच्या चऱ्हाटांनी पुरतें बांधून शिंगांचीही तशीच अवस्था केली आहे.॥११३॥ एखाद्या वाघिणीसाठी हा असा जबरदस्त बंदोबस्त शोभून दिसतो. मात्र ही तर गरीब बिचारी गाय आहे, तिला असे जखडून ठेवणें, हे काही बरें नव्हे.॥११४॥ अरे वेड्यांनो, ही गाय अवघ्या जगाची माता आहे. तिला हे असें (क्रूरपणें) बांधणे म्हणजे केवढा कठीण प्रसंग आला आहे.॥११५॥ चला, तिला तत्काळ मुक्त करा पाहू. ती काही कोणासही मारणार (उडवणार) नाही." परंतु, तिला हात लावण्याचे साहस करायला कोणीही तयार झाले नाही.॥११६॥ (तिथें असलेल्यांपैकी) प्रत्येक जण मागें सरकतो आहे, हे पाहून शेवटी समर्थ स्वत: (त्या गोमातेजवळ) आले आणि आपल्या पवित्र करांनी त्या धेनूची सर्व बंधने तोडू लागलें.॥११७॥ त्यांनी त्या गाईला बंधनमुक्त केल्यावर, ती गाय गाडीतून खाली उतरली. आपलें पुढील पाय टेकून समर्थांस वंदन करू लागली.॥११८॥ आपली मान खाली घालून तिनें समर्थांस तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचे दिव्य चरण आपल्या जिभेनें चाटूं लागली.॥११९॥ तिथें घडलेला हा अद्भुत चमत्कार सर्व लोकांनी पाहिला. खरोखर, समर्थांच्या ह्या लीलांचे वर्णन शेषही करू शकत नाही.॥१२०॥ तदनंतर समर्थ त्या गोमातेंस म्हणाले, " बाई, इथून पुढें तू कोणासही त्रास देऊ नये. या मठांस सोडून तू इतरत्र कुठेही जाऊ नकोस."॥१२१॥ असा प्रकार घडल्यांवर, अवघ्यांनी समर्थांचा उच्च स्वरानें त्रिवार जयजयकार केला.॥१२२॥ नंतर बाळापूरची मंडळी बाळापूरास परतली. अन ती गाय तेथेंच शेगांवांत मठामध्यें राहिली.॥१२३॥ त्या दिवसापासून, तिला चऱ्हाट आदींची काहीच आवश्यकता भासली नाही. सुज्ञ गाईचे सर्व गुण तिच्या ठायी आलें.॥१२४॥ अजूनही त्या शेगांवांत त्या गाईची संतती नांदत आहे. (श्रोतें हो,) ब्रह्मवेत्ते जी वचनें बोलतात, त्याप्रमाणेच सर्व काही घडून येते,(हेंच सत्य आहे).॥१२५॥ असो. कारंजा नावाच्या गावांत लक्ष्मण घुडे नावाचा वाजसनीय शाखेचा एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय धनवान होता.॥१२६॥ तो पोटाच्या व्याधीनें ग्रस्त झाला होता. त्यांवर त्यानें (भरपूर पैसे खर्च करून) अनेक उपायही केले, परंतु त्यास किंचितही गुण न आल्यानें, त्याचा सर्व खर्च व्यर्थ गेला.॥१२७॥समर्थांची कीर्ती त्याच्या कानांवर आली होती, म्हणून लगेच त्यानें सहपरिवार शेगांवास प्रयाण केले.॥१२८॥ श्रोतें हो, त्या लक्ष्मणाला व्याधीच्या त्रासामुळे चालतां देखील येत नव्हतें. दोघां-तिघांनी त्याला उचलून त्या मठांत आणले.॥१२९॥ समर्थांस साधा नमस्कार करण्याचेही त्याच्या शरीरांत त्राण उरलें नव्हतें. अखेर त्याच्या पत्नीने समर्थांपुढे आपला पदर पसरला.॥१३०॥ आणि (प्रार्थनापूर्वक) म्हणाली," हे दयाघना ! मी आपली धर्मकन्या आहे. माझ्या पतीच्या सर्व यातना दूर कराव्यात.॥१३१॥ अमृताचें दर्शन झाल्यावरदेखील का बरें मरण यावें ? माझ्या कुंकवाचे रक्षण करा, हीच माझी आपणांस विनंती आहे."॥१३२॥ (मठांत) त्यावेळीं समर्थांची स्वारी आंबा खात होती. तोच आंबा त्यांनी लक्ष्मणाच्या पत्नीच्या अंगावर फेकला.॥१३३॥ (आणि म्हणाले,)" जा, तुझा पती व्याधीमुक्त होण्यासाठीं हा आंबा त्यास खाऊ घाल. तू पतिभक्ती-परायण अशी त्याची पत्नी म्हणून शोभतेस,खरी !"॥१३४॥ एवढेच बोलून, शेगांवातील त्या मठांत (निवास करणारे) श्रीगजानन स्वामी चिलीम ओढू लागलें.॥१३५॥ (त्यावेळीं तिथेच समर्थांची सेवा करीत असलेला) भास्कर म्हणाला, " अहो बाई, आतां इथे एक क्षणही थांबू नका. आपल्या पतीस घेऊन लगोलग कारंज्यास परत जा.॥१३६॥ समर्थांच्या पवित्र हातांनी तुला हा जो आंबा प्रसाद म्हणून मिळाला आहे, तोच आपल्या पतीस खायला घाल.॥१३७॥ असे केल्यानें तुझ्या मनींची इच्छा पूर्ण होईल. हा आंबा खाताच लक्ष्मणाच्या व्याधीस उतार पडेल आणि अत्युत्तम गुण येईल."॥१३८॥ हे ऐकून लक्ष्मणाची पत्नी तो प्रसाद म्हणून मिळालेला आंबा घेऊन कारंज्यास आली. आपल्या पतीस तिनें तो आंबा खाऊ घातला.॥१३९॥ तें जोडपें स्वगृहीं परतल्यावर नातेवाईक (त्यांची) विचारपूस करण्यासाठी आले. तसेच शेगांवांत काय वर्तमान घडले? याचीही चौकशी करू लागलें.॥१४०॥ त्यांवर लक्ष्मणाची पत्नीनें (शेगांवांत घडलेली) सर्व हकिकत त्या लोकांना सांगितली आणि समर्थांनी मला प्रसाद म्हणून आंबा दिला. तसेच तो आंबा आपल्या पतीस स्वतःच्या हातांनी खाऊ घाल, अशी आज्ञाही केली.॥१४१-१४२॥ (समर्थांचे वचन शिरसावंद्य मानून) मीदेखील आज सकाळीं (माझ्या पतीस हा आंबा) खाऊ घातला, असेंही सांगितले. तिथें आलेल्या वैद्यांनी जेव्हा हे वृत्त ऐकले, तेंव्हा त्यांना वाईट वाटले.॥१४३॥ "अहो बाई, तुम्हीं हा केवढा अनर्थ केलात. या पोटांतील रोगाला आंबा हेच कुपथ्य आहे.॥१४४॥ माधवनिदानीं हेच सांगितले आहे, सुश्रुतांनीही असेच वर्णन केले आहे. तसेच निघंटाने आणि शारंगधरानेदेखील हेच लिहून ठेवलें आहे.॥१४५॥ (समर्थांनी) दिलेला तो प्रसादरूपी आंबा तुम्हीच खायला पाहिजे होता. पत्नीचें पुण्य पतीला लाभदायक ठरते."॥१४६॥ असे वैद्य जेव्हा बोललें, तेंव्हा सर्व नातेवाईक भयभीत झाले आणि लक्ष्मणाच्या पत्नीस (तिच्या कृत्याबद्दल) टोचून बोलू लागले.॥१४७॥ पण पुढें अघटित घडले. लक्ष्मणास अकस्मात रेच होऊन त्याचे पोट मऊ होऊन गेले.॥१४८॥ शौच्यावाटें सर्व व्याधी निघून गेली. हळूहळू लक्ष्मणास ताकद येऊ लागली आणि लवकरच त्याची प्रकृती पूर्ववत (निरोगी) झाली.॥१४९॥ वैद्यशास्त्र निसर्गनियमांच्या कक्षेबाहेर काहीच करत नाही. अशा वेळीं देव-संतांची कृपा अतिशय गुणकारी ठरते.॥१५०॥ पुढें लक्ष्मण खडखडीत बरा झाल्यावर सत्वर शेगांवांस आला आणि महाराज, आपल्या आगमनानें माझें घर पवित्र करा, (अशी महाराजांची प्रार्थना करू लागला).॥१५१॥ मी केवळ आपणांस हें (निमंत्रण देण्यासाठीच) आलो आहे. हे ज्ञानजेठीं, आपण कारंज्यास चलावे. आतां नाहीं असे म्हणून मला निराश करू नका.॥१५२॥ त्याचा विशेष आग्रह पाहून महाराज कारंज्यास गेले. त्यांच्याबरोबर त्यावेळीं शंकर-भाऊ, पितांबरही होतें.॥१५३॥ (लक्ष्मणाने समर्थांस) आपल्या घरी नेऊन त्यांची पूजा केली आणि दक्षिणाही अर्पण केली. ही सारी संपत्ती सर्वस्वीं आपलीच आहे, (ही दक्षिणा) देणारा मी कोण बरें ?॥१५४॥ (लक्ष्मण असे म्हणाला तरी) पण एका ताटांत त्यानें काही रुपये ठेवले. तें पाहून महाराज त्याला म्हणाले, "माझें काहीही उरले नाही, असे तू म्हणतो आहेस खरा, मग हे रुपये तू कुठून आणलेस? लक्ष्मणा, हें असे दांभिकपणाचे वर्तन करू नकोस.॥१५५-१५६॥ मला तू तुझें हे घर दिलें आहेस, आतां ही सारी कुलुपें रस्त्यावर फेकून दे आणि सर्व दरवाजे उघड."॥१५७॥ लक्ष्मण काहीच न बोलता मौन धरून बसला. पण समर्थ मात्र त्यास 'खजिन्याचे दार उघड.' असा आग्रह करीत होते.॥१५८॥ अखेर त्यानें घाबरत घाबरत दार उघडलें, पण स्वत: खजिन्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसला.॥१५९॥ आणि तेथूनच म्हणाला," महाराज, तुम्हीं यावें आणि (या खजिन्यातून) तुम्हांस हवे तें घेऊन जावें." असे जरी तो बोलला तरी त्याच्या मनांत मात्र वेगळाच भाव होता.॥१६०॥ त्याचे हें दांभिकपण (अर्थातच) समर्थांस समजले. बाजारांत बहुरुप्यानें (राजाचे सोंग घेतलें तरी, त्याचे) राजेपण कधी कोणी सत्य मानत नाही.॥१६१॥ जसें एखादे कडू वृंदावन बाहेरून अतिशय सुरेख दिसतें, पण आंतून मात्र पूर्णतः कडवटपणा त्याच्या ठायीं असतो.॥१६२॥ (लक्ष्मणाचा हा खोटा भाव पाहून) पुण्यराशी त्याच्या घरातून उपाशीच बाहेर पडले. संत कधीही दांभिकांच्या घरांत संतुष्ट होत नाहीत.॥१६३॥ खरें पाहता समर्थांस त्याच्या घराची व धन-संपत्तीची काहीच आवश्यकता नव्हती. महाराज तर वैराग्याचे सागर होतें.॥१६४॥ परंतु, लक्ष्मण जे काही बोलला, त्याच्या खरेपणाची स्वामींनी परीक्षा घेतली. त्याच्या खोटेंपणाचा त्यांना राग आला, म्हणून तें तात्काळ उठून बाहेर पडलें.॥१६५॥ आणि जातां जातां म्हणाले," माझें माझें असे सतत म्हणत आहेस खरा, आतां त्याची फळें भोग. त्यास माझा काही उपाय नाही. मी तर इथें तुझ्यावर कृपा करण्यासाठीच, जें काही तुझ्याजवळ आहें, त्याच्या दुप्पटीनें तुला द्यावयास आलो होतो. पण तें काही तुझ्या नशिबांत नाही."॥१६६-१६७॥ तेंच पुढें सत्य झाले. पुढील सहा-एक महिन्यांतच त्याची सर्व संपत्ती लयास गेली आणि त्याच्यावर भिक्षा मागायची वेळ आली.॥१६८॥ श्रोतें हो, परमार्थांत याच कारणास्तव खोटेपणा किंचितही नसावा. समर्थांनी ह्याचसाठी हें चरित्र घडवलें आहे.॥१६९॥ श्री गजानन महाराज हे चिंतामणी आहेत, त्यांना कधी गार शोभून दिसेल काय ? किंवा मग कथिलाने सोन्यांस कधी सुशोभित करतां येईल काय ?॥१७०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित श्रीगजाननविजय नावाचा हा ग्रंथ भाविकजन स्वतःच्या कल्याणप्राप्तीसाठी सदासर्वदा पठण करोत.॥१७१॥ शुभं भवतु ॥ ॥श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ९ इथे वाचता येतील.


अवश्य वाचावे असे काही :

श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )