Sep 20, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १०


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अरुपा, अव्यया, पूर्णब्रह्मा, पंढरीराया आणि सज्जनांच्या आश्रयदात्या माझी आतां उपेक्षा करू नकोस.॥१॥ देवा, हा दासगणू (तुझा नसून) कोण्या परक्याचा आहे असे आता म्हणू नकोस. हे नारायणा, माझ्या पातकांचा विचारही मनांत आणू नकोस.॥२॥ माझ्या हातून कधी पुण्यकर्में झाली नाहीत, हे मला पुरतें ठाऊक आहे. अगदीं तुला तोंड दाखवण्यासदेखील मी पात्र नाही(हे मी जाणतो).॥३॥ हे देवा, एकूण अशी स्थिती असली, तरी तू माझ्यावर कृपा कर. गोदावरी ओहोळास आपल्यात सामावून घेतेच.॥४॥ तसेच तू करावेस आणि माझ्या अवघ्या दु:खाचे निवारण कर. माझ्या ठायीं पातक यत्किंचित्‌ही राहू नयें.॥५॥ तू मनांत आणलें तर सर्व काही घडून येते (अशक्यही शक्य होते). तुझी कृपा झाल्यास (क्षणार्धात) रंकाचाही राव होतो.॥६॥ असो. एकदा पुण्यराशी गजानन महाराज अमरावतीस गेले आणि आत्माराम भिकाजीच्या सदनांत वास्तव्यास राहिले.॥७॥ हा भिकाजीसुत आत्माराम अमरावतीचा प्रांत होता आणि श्रोतें हो, त्याच्या हातांत फार मोठा अधिकार होता.॥८॥ हा जातीनें कायस्थ प्रभू होता आणि संतमंडळींच्या चरणीं ह्याची फार श्रद्धा होती. असा हा सदाचारसंपन्न, संसारी, गृहस्थ होता.॥९॥ त्याच्या घरी समर्थांचे आगमन झाल्यावर, आत्मारामाने स्वामींचे यथाविधी पूजन केलें. (त्याने) उष्णोदकानें गजानन महाराजांना मंगलस्नान घातले.॥१०॥ नाना प्रकारची उटणीं त्यानें श्रींच्या तनूस लावली. संतसहवासाने त्याचे मन हर्षोल्हासित झाले होते.॥११॥ (समर्थांस) उमरेडची सुरेख कर्वतीकांठी धोतरजोडी वस्त्रें म्हणून अर्पिली. त्यांच्या भाळीं केशरी गंधाचा भव्य तिलक लावला.॥१२॥ कंठीं पुष्पहार वाहिला. तसेच नैवेद्य म्हणून विविध पदार्थ (श्रींसमोर) ठेवले. शंभर रुपयांची दक्षिणा अर्पण केली.॥१३॥ धूप, दीप आरती झाल्यावर (भिकाजीने स्वामींस) पुष्पांजली समर्पित केली. अमरावतीच्या लोकांची (गजानन महाराजांच्या) दर्शनासाठी गर्दी होऊ लागली.॥१४॥ समर्थांस आपल्या घरी घेऊन जावे आणि त्यांचे याचप्रमाणें यथासांग पूजन करावे, असे तिथें जमलेल्या प्रत्येकांस वाटत होते.॥१५॥ अनेक लोकांची अशी इच्छा होती, तरी फारच थोड्याजणांची मनोकामना पूर्ण झाली. महाराजांचे चरण घरीं लागण्यासाठी (भक्तांचे) पुण्य बलवत्तर असणे आवश्यक होते.॥१६॥ अंतर्ज्ञानी संत अवघेंच जाणतात, त्यांमुळे जे भाविक असें पुण्यवंत होते, समर्थ त्यांच्या घरीं गेले.॥१७॥ गणेश श्रीकृष्ण खापर्डे नांवाचें एक अमरावतीत बडे गृहस्थ होते. त्यांच्या वकीलीच्या यशस्वी कारकिर्दीमुळे त्यांच्यापुढें (अक्षरश:) रुपयांचे ढीग पडत असत.॥१८॥ वऱ्हाडांत (लोक) त्यांना दादासाहेब असे म्हणत असत. हा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण असून अत्यंत भाविक, सज्जन (गृहस्थ) होता.॥१९॥ त्याने मनापासून विनंती केली असतां महाराज त्याच्या घरी गेले. लोकहो, समर्थांचे तिथेही याचप्रमाणें पूजन झाले.॥२०॥ गणेश आप्पा नावाचा एक लिंगायत वाणी(व्यापारी) होता. त्याची पत्नी चंद्राबाई ही परम भाविक होती.॥२१॥ ती आपल्या पतीस म्हणाली, " या संत गजानन महाराजांस कसेही करून आपल्या घरी येण्यांसाठी आमंत्रण दिले पाहिजे. तुम्ही त्यांस विनंती करून पाहा. आपलें मन निष्पाप असल्यांस त्यांचे आगमन आपल्या घरीं नक्की होईल आणि त्यांमुळे आपले घर पवित्र होईल. देव आपल्या भक्तांच्या अधीन असतो."॥२२-२३॥ यांवर गणेश आप्पा उत्तरला," तुला खरोखर वेड लागलें आहे. हा साधू घरीं नेण्यास बलवत्तर वशिला हवा. खापर्डे (यांसारख्या प्रतिष्ठीत मान्यवरांस) देखील ह्या संतास घरी नेण्यास फार कष्ट पडले, हे लक्षांत घे. उगाच असां हट्ट करू नकोस."॥२२४-२५॥ चंद्राबाई मात्र आपल्या पतीस म्हणाली," हे कांही माझ्या मनांस पटत नाही. माझी मनोदेवता सांगते की आपल्या घरी हे साधू नक्की येतील. तुम्ही त्यांना आपल्या घरी येण्याची (प्रार्थनापूर्वक) विनंती तर करा. संतांची गरीब भक्तांवर विशेष प्रेम असते."॥२६-२७॥ पण आप्पा काही बोलेना. श्री गजानन महाराजांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देण्याची त्याची काही हिम्मत झाली नाही.॥२८॥ अखेर महाराजच गणेश आप्पाचा हात धरून म्हणाले, "तुझें घर कुठे आहे? किती दूर आहे ? ते मला सांग. मला तुझ्या घरी यावें, काही काळ तिथे बसावे, असे वाटते. अरे, मनांत असेल ते कोणाचीही भीडभाड न ठेवतां बोलावे."॥२९-३०॥ असे महाराज वदतां क्षणीं गणेश आप्पाला अतिशय आनंद झाला. भावनावेगाने त्यास एकही शब्द बोलवेना.॥३१॥ समर्थांस आपल्या गृहीं नेऊन त्या उभयंतां पती-पत्नींनी त्यांची (श्रद्धापूर्वक) पूजा केली. आपला सर्व संसार त्या दोघांनी स्वामींच्या चरणीं तत्क्षणींच अर्पण केला.॥३२॥ असो. त्या अमरावतींत (समर्थांच्या) अशा असंख्य पूजा संपन्न झाल्या. त्या प्रत्येक पूजासमयीं एक गृहस्थ नेहेमी हजर असायचा.॥३३॥ तो आत्माराम भिकाजीचा नात्यानें भाचा होता आणि मुंबईत तारमास्तर या पदावर काम करीत होता.॥३४॥ त्याचे बाळाभाऊ असे नाव होते. तो रजा घेऊन अमरावतीस आपल्या मामांस भेटण्यासाठी आला होता.॥३५॥ त्या बाळाभाऊंची समर्थ चरणीं श्रद्धा जडली होती. अशा थोर संतांचे चरण सोडून इतर कुठे जाऊ नये, असे तो म्हणू लागला.॥३६॥ हा अवघा प्रपंच अशाश्वत आहे, त्यांत आतां चित्त कशासाठीं गुंतवावे बरें ? आजपर्यंत जितका संसार केला, तोच आतां पुरें झाला.॥३७॥ काहीही झाले तरी, आजपासून मी त्यांचे चरण सोडणार नाही. अहो, अमृत समोर असतांना का कोणी विष प्यायला जाईल ?॥३८॥ सज्जनहो, केवळ असा मनाशी निश्चय करून, बाळाभाऊ प्रत्येक पूजेला उपस्थित राहू लागला होता. इतर दुसरें कुठलेही (पूजेस हजर राहण्याचे) कारण नव्हतें.॥३९॥ असो. काही दिवसानंतर समर्थ शेगांवी परतले. मात्र (कृष्णाजींच्या) मळ्यांस न जाता तें मोट्यांच्या (शिव) मंदिरांत आले.॥४०॥ त्या मंदिराच्या पूर्वेस एक ओसाड जागा होती. पुण्यपुरुष गजानन महाराज तिथें येऊन बसले.॥४१॥ कृष्णा पाटलाला महाराजांच्या आगमनाची वार्ता कळली, तसेच आपल्या मळ्यांतील जागाही त्यांनी सोडली हे समजले.॥४२॥ म्हणून तो धावतच त्या ओसाड जमिनीकडे आला. महाराजांस दंडवत करून तो (हताश होऊन) अधोवदन (मान खाली घालून) बसला.॥४३॥ त्याच्या डोळ्यांतून अखंड अश्रुधारा वाहत होत्या. त्या अश्रूंनी त्याच्या छातीवरील वस्त्र (सदरा) पुरतें भिजून गेले होते.॥४४॥ (कृष्णाजी) पाटलाला (असा खिन्न पाहून) महाराज त्याला म्हणाले, " तू असा (शोकग्रस्त होऊन) रडत का आहेस? तुला काय दु:ख आहे, ते मला लवकर सांग बघू."॥४५॥ त्यावर पाटील आपलें दोन्ही कर जोडून बोलू लागला," महाराज, आज तुम्ही माझ्या मळ्याचा का बरें त्याग केला ?॥४६॥ हे ज्ञानवंता, असा कोणता अक्षम्य अपराध माझ्या हातून घडला आहे ? मी तर आपलें (अजाण) लेकरू आहे.॥४७॥ तसेच ही जागा एका माळ्याच्या मालकीची असून, तो देशमुखाच्या गटातील आहे. तुम्हीं (कदापिही) इथें राहू नका.॥४८॥ तुम्हांस मळ्यांत राहायची इच्छा नसेल तर, माझ्या राहत्या घरीं चला. हे दयाळा, तें मी तुमच्यासाठीं लगोलग खाली करतो.॥४९॥ तुम्हांवाचून दुसरें काहीही मला प्रिय नाही, (हे सत्य तुम्हीं जाणता)." तोपर्यंत हे वर्तमान अवघ्यां पाटील बंधूंस समजले.॥५०॥ तेही त्या ठिकाणी धावतच आले आणि हरी व नारायण हे दोघेंजण महाराजांस आपल्या घरी (वास्तव्यांस) येण्याची विनंती करू लागले.॥५१॥ तेव्हा महाराज (शांतपणे) त्यांस समजावू लागले, " आज मी जो या जागेवर येऊन बसलों आहे, तें तुमच्या हितासाठीच आहे.॥५२॥ तें तुम्हांस पुढें कळून येईल. आतां जास्त वाद घालू नका, हाच वाद तुम्हां दोघांच्या (पाटील आणि देशमुख मंडळींच्या) विनाशास कारण होईल,हे विसरू नका.॥५३॥ या जगांत जितकें जमिनदार आहेत, ते कधीही मागचा पुढचा विचार करीत नाहीत. खरें तर, हाच त्यांचे ठायीं उणेपणा आहे.॥५४॥ जा, बंकटलालास (तुम्हीं) सत्वर इथें घेऊन या पाहू. मी जेव्हा त्याचे घर सोडले, तेव्हा तो मुळीच रागावला नाही.॥५५॥ त्याचे कारण त्यास विचारून बघा. माझी तुमच्यावर नेहेमीच कृपा आहे, ती कोणत्यांही कारणांनी ढळणार (कमी होणार) नाही."॥५६॥ (हे वृत्त कानीं येताच) बंकटलालही तिथें आला, आणि पाटील मंडळींची समजूत घालू लागला. समर्थांच्या मर्जीविरुद्ध तुम्हीं त्यांना मळ्यांत राहण्याचा आग्रह करू नका.॥५७॥ महाराजांनी जेव्हा माझें घर सोडून (मारुती मंदिरात) राहण्याचा निश्चय केला, तेव्हा सांगा बरें मी काय केलें ? आपण सर्वजण त्यांची लेकरें आहोत, ते अवघ्यांचेच श्रद्धास्थान आहेत.॥५८॥ सखाराम आसोलकर उदार मनुष्य आहे. तो आपली जागा (समर्थांसाठी) देण्यास नकार देणार नाही, असे मला वाटते.॥५९॥ सखाराम जागा देईल आणि पुढची व्यवस्था आपण करू या. जेणें करून सर्व लोकांस यांत सहजच सहभाग घेता येईल.॥६०॥ असा सर्वांचा समेट होऊन त्या ठिकाणीं (महाराजांचा) मठ बांधला गेला. त्या कार्यांत परशराम सावजींनी विशेष मेहेनत घेतली.॥६१॥ समर्थांबरोबर भास्कर, बाळाभाऊ, पितांबर, आणि अमरावतीचा गणेश आप्पा असे त्यांचे चार निस्सीम भक्त नेहेमी असत.॥६२॥ त्याचप्रमाणें रामचंद्र गुरवही महाराजांच्या बरोबर राहत होता. हे पाच शिष्य जणू पांडव आणि गजानन साक्षात श्रीहरी असे (त्या शेगांवांत) शोभू लागले.॥६३॥ दिवसोंदिवस बाळाभाऊची वृत्ती अतिशय विरक्त होऊ लागली. आपल्या नोकरीची त्यानें यत्किचिंतही पर्वा केली नाही.॥६४॥ बाळाभाऊस घरीं परतण्यासाठी वरचेवर पत्रे येत असत. पण त्या पत्रांचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.॥६५॥ (हे सर्व पाहून) भास्कर महाराजांस म्हणाला, " गुरुराया, हा (बाळाभाऊ) पेढे खाण्यास चटावला आहे, म्हणूनच आपणांस सोडून इतरत्र जाण्याची ह्याची इच्छा नाही. आतां तुम्हीं याला चांगला मार द्या,म्हणजेच हा आपल्या घरीं परतेल. चौदावें रत्न पाहिल्याशिवाय हा काही येथून हलणार नाही. लकडीवाचून माकड कधी सरळ होत नाही. मोठमोठें पहाडही वज्रास घाबरतात."॥६६-६८॥ (हा प्रकार पाहून) बाळाभाऊंस एकदां (महाराजांच्या शिष्यांनी) जबरदस्तीने परत पाठविले. पण तो नोकरीचा राजीनामा देऊन (मठांत) परत आला.॥६९॥ बाळाभाऊ शेगांवांत परतलेला पाहून भास्कर त्याला म्हणाला, " अरे, येथें असा वारंवार येऊन आम्हांला त्रास का देतोस?॥७०॥ ओढाळ बैल जसा हिरव्यागार गवतावर कायम चरण्यासाठी जायला पाहतो. त्याला कितीही मार दिला तरी, पुन्हा पुन्हा तो तिथेच येतो.॥७१॥ त्या लोचटाप्रमाणेच तुझी तंतोतंत वर्तणूक आहे, हे निश्चित ! अरे, ज्याला विरक्ति आली आहे, त्यानेंच इथे (महाराजांजवळ) यावें."॥७२॥ भास्कराचे असे अहंकारपूर्ण बोलणें महाराजांस काही आवडले नाही. त्यांनी भास्कराचे अज्ञान दूर करण्यासाठी एक लीला केली.॥७३॥ तिथेच एका गृहस्थाच्या हातांत भली मोठी छत्री होती. गजानन महाराजांनी ती आपल्या हातांत घेतली आणि (त्या मोठ्या छत्रीने) बाळाभाऊंस मारू लागले.॥७४॥ सज्जनहो, त्या छत्रीने बाळाभाऊंस इतका मार दिला की ती छत्री शेवटी मोडली. मग, (समर्थांनी) एक वेळूची भरीव काठी हातांत घेतली.॥७५॥ आणि तिने (बाळाभाऊंस) झोडणें सुरु केले. ते दृश्य पाहून तिथें असलेले लोक अतिशय घाबरले. काही जण तर त्या मठांस सोडून पळून गेले.॥७६॥ पण बाळाभाऊ मात्र समर्थांच्यापुढे तसाच पडून (मार खात राहिला). अशा जोरदार मारानें तो कदाचित मेला असावा, असे कित्येक लोक बोलू लागले.॥७७॥ इकडें भास्करही, बाळाभाऊ असा मार खात असलेला पाहून, अतिशय चिंतातुर झाला होता. पण समर्थांना काही बोलण्याची त्याची हिम्मत होईना.॥७८॥ बाळाभाऊच्या पाठीवर मारत असतांना (अखेर ती भरीव वेळूची) काठीही मोडली. मग कंटाळून शेवटी (महाराज) त्यास (पायांनी) तुडवू लागले.॥७९॥कुंभार जसा माती पायांनी तुडवितो, अगदी त्याचप्रमाणें महाराजांचा (बाळाभाऊस) तुडविण्याचा प्रकार चालू होता.॥८०॥ मठांत ही घटना घडत असतांना, समर्थांचे शिष्यगण धावू लागले, तर काही जण महाराजांच्या आवडत्या मंडळींस बोलावण्यासाठी गेले.॥८१॥ (हे वृत्त ऐकताच) बंकटलाल, कृष्णाजी आदी मंडळी मठांत धावतच आली. परंतु, समर्थांचा हात धरून त्यांना थांबविण्यास मात्र कोणीही तयार होईना.॥८२॥ अखेर, बंकटलाल घाबरतच म्हणाला, "समर्था, हा आपला भक्त आहे. आता तरी याला अशा प्रकारें तुडवणें थांबवा."॥८३॥ त्याची ती विनवणी ऐकून समर्थ हसतच म्हणाले, " हे असें असंबद्ध का बोलत आहेस ? हे मला काही कळत नाही. मी बाळाभाऊस ना मारले, ना त्याला तुडविलें. तू त्यास नीट निरखुन पहा, म्हणजे (मी काय सांगत आहे तें) तुला कळून येईल."॥८४-८५॥ नंतर बाळाभाऊकडे वळून महाराज म्हणाले," वत्सा, तू सत्वर उठ पाहू आणि इथे जमलेल्या सर्व मंडळींस तुझें अंग दाखव."॥८६॥ महाराजांची अशी आज्ञा होताच बाळाभाऊ उठून बसला. सर्व लोक त्याच्या अंगाला (कुठे लागले आहे का ?) हे निरखून पाहू लागले.॥८७॥ तेव्हा त्याच्या अंगावर एका साधा वळही उमटला नव्हता वा त्याला कोठेंही काही लागले नव्हते. उलट तो पाहिल्याप्रमाणेच आपल्या आनंदांत निमग्न होता.॥८८॥ तें पाहून भास्करास बाळाभाऊचा अधिकार कळला. त्यानंतर तो पुन्हा कधीही बाळाला वेडेवाकडें बोलला नाही.॥८९॥ सोनें जेव्हा कसोटीस उतरतें, तेव्हाच त्याची किंमत कळते. तो घडलेला प्रकार पाहून समस्त लोक आश्चर्यचकित झाले.॥९०॥ श्रोतें हो, बाळापुरांत एक सुकलाल आगरवाल नावाचा गृहस्थ होता. त्याच्या आगरातील एक गाय अतिशय द्वाड होती.॥९१॥ ती गाय गांवांत स्वैरपणें फिरायची. (तिच्या वाटेत आलेल्या)मुलां-माणसांना तुडवायची. भल्या भल्या ताकदवान गावकऱ्यांस आपल्या शिंगावर घेऊन फेकून द्यायची.॥९२॥ कधी ती गाय वाटेल त्याच्या दुकानांत शिरायची आणि तिथे ठेवलेल्या धान्यांच्या टोपल्यांत आपलें तोंड खुपसायची आणि यथेच्छपणें वाटेल तितकें धान्य खायची. (टोपल्यांत) उरलेल्या धान्याची नासाडी करायची. तर कधी धक्का देऊन तेल-तुपाच्या पिंपांची सांडलवंड करायची.॥९३-९४॥ (तिला) घरीं बांधून ठेवले असता चऱ्हाटें तर बघतां बघतां अगदी सहजपणें तोडायची. अगदी साखळीसुद्धा त्या गाईला बांधायला निरुपयोगी ठरायची.॥९५॥ ती जणू गाय नसून वाघीणच वाटायची. बाळापुरांतील लोक तिच्या ह्या त्रासाला कंटाळून गेलें होते.॥९६॥ ती गाय गाभण मुळींच रहात नव्हती, ना दूध देत होती. घरांत वा इतर कोठेही बांधून ठेवलें तरी तिथेंही राहत नव्हती.॥९७॥ " या गाईला खाटकाला तरी देऊन टाक किंवा तूच गोळी घालून तिला मारून टाक. ", असे लोक त्या सुकलालाला म्हणू लागले.॥९८॥ त्यावर सुकलाल त्या लोकांस म्हणाला, " लोक हो, तुम्हीच वाटेल तो प्रयत्न करून तिला मारून टाका.॥९९॥ एका पठाणानें तिला मारण्याचा प्रयत्न केला. बंदुकींत गोळी भरून तो एकदा टपून बसला होता.॥१००॥ तें कसे काय कोण जाणे , पण त्या गाईला कळले. तिनें त्या पठाणास शिंगावर घेऊन उताणा पाडला.॥१०१॥ मी तिला परगांवीही नेलें होते आणि तेथेच सोडून आलो होतो. परंतु ती तेथूनही परतून आली, तेंव्हा आतां मी काय करू ? ते (तुम्हीं लोकच) सांगा."॥१०२॥ हें त्याचे बोलणें ऐकून लोक म्हणू लागले," यांवर आतां एकच उपाय दिसतो आहे. समर्थांनी गोविंदबुवांचा (द्वाड) घोडा शांत केला, असे समजतें.॥१०३॥ तुही या गाईला घेऊन शेगांवांस जा आणि ती गाय समर्थांस अर्पण कर. जेणेंकरून (आपल्या ह्या समस्येचा) नाश होईल.॥१०४॥ साधूस गाय दान केल्याचें तुला अत्यंत श्रेष्ठ असें पुण्य लाभेल आणि त्यायोगें आमचेंही हें संकट टळेल, बापा !"॥१०५॥ हा विचारास सर्वांनीच मान्यता दिली आणि गाय (शेगांवला) घेऊन जाण्याचे ठरविले. तिला धरण्यासाठी (सर्व लोक) नाना तऱ्हेचें प्रयत्न करू लागले.॥१०६॥ पण (त्यांच्या) एकाही प्रयत्नास यश आले नाही. शेवटी एका पटांगणात (गावकऱ्यांनी) हरळकुंद्याचा मोठा ढीग केला, तसेच तिथेच बाजूला सरकीही रचून ठेवली.॥१०७॥ तें खाण्यासाठी गाय धावत आली. ती तेथें आल्यावर दहा-वीस जणांनी फांस टाकून तिला पकडलें.॥१०८॥ आणि (मजबूत) साखळदंडानें पुरतें बांधून एका गाडीवर चढवलें. त्यानंतर (त्या गाईला) श्री गजानन महाराजांस अर्पण करण्यासाठी (तें लोक) शेगांवाकडे निघालें.॥१०९॥ जसें जसें शेगांव जवळ येऊ लागले, तसा-तसा त्या गाईच्या स्वभावांत बदल दिसू लागला.॥११०॥ आणि ज्याक्षणीं ती गाय समर्थांपुढे आली, ती अगदीच केविलवाणी दिसू लागली. त्या पुण्यपुरुषांकडे ती डोळ्यांत पाणी आणून पाहू लागली.॥१११॥(त्या गाईला साखळदंडानें असें जेरबंदी केलेले पाहून) महाराज अवघ्यांस म्हणाले, " हा काय तुमचा मूर्खपणा म्हणावा ? गाईस या अशा यातना देणें, हे काही बरें नव्हे.॥११२॥ (या गाईचे) चारही पाय बांधले आहेत, गळ्यांसही साखळदंड लावलेलें आहेत. काथ्याच्या चऱ्हाटांनी पुरतें बांधून शिंगांचीही तशीच अवस्था केली आहे.॥११३॥ एखाद्या वाघिणीसाठी हा असा जबरदस्त बंदोबस्त शोभून दिसतो. मात्र ही तर गरीब बिचारी गाय आहे, तिला असे जखडून ठेवणें, हे काही बरें नव्हे.॥११४॥ अरे वेड्यांनो, ही गाय अवघ्या जगाची माता आहे. तिला हे असें (क्रूरपणें) बांधणे म्हणजे केवढा कठीण प्रसंग आला आहे.॥११५॥ चला, तिला तत्काळ मुक्त करा पाहू. ती काही कोणासही मारणार (उडवणार) नाही." परंतु, तिला हात लावण्याचे साहस करायला कोणीही तयार झाले नाही.॥११६॥ (तिथें असलेल्यांपैकी) प्रत्येक जण मागें सरकतो आहे, हे पाहून शेवटी समर्थ स्वत: (त्या गोमातेजवळ) आले आणि आपल्या पवित्र करांनी त्या धेनूची सर्व बंधने तोडू लागलें.॥११७॥ त्यांनी त्या गाईला बंधनमुक्त केल्यावर, ती गाय गाडीतून खाली उतरली. आपलें पुढील पाय टेकून समर्थांस वंदन करू लागली.॥११८॥ आपली मान खाली घालून तिनें समर्थांस तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांचे दिव्य चरण आपल्या जिभेनें चाटूं लागली.॥११९॥ तिथें घडलेला हा अद्भुत चमत्कार सर्व लोकांनी पाहिला. खरोखर, समर्थांच्या ह्या लीलांचे वर्णन शेषही करू शकत नाही.॥१२०॥ तदनंतर समर्थ त्या गोमातेंस म्हणाले, " बाई, इथून पुढें तू कोणासही त्रास देऊ नये. या मठांस सोडून तू इतरत्र कुठेही जाऊ नकोस."॥१२१॥ असा प्रकार घडल्यांवर, अवघ्यांनी समर्थांचा उच्च स्वरानें त्रिवार जयजयकार केला.॥१२२॥ नंतर बाळापूरची मंडळी बाळापूरास परतली. अन ती गाय तेथेंच शेगांवांत मठामध्यें राहिली.॥१२३॥ त्या दिवसापासून, तिला चऱ्हाट आदींची काहीच आवश्यकता भासली नाही. सुज्ञ गाईचे सर्व गुण तिच्या ठायी आलें.॥१२४॥ अजूनही त्या शेगांवांत त्या गाईची संतती नांदत आहे. (श्रोतें हो,) ब्रह्मवेत्ते जी वचनें बोलतात, त्याप्रमाणेच सर्व काही घडून येते,(हेंच सत्य आहे).॥१२५॥ असो. कारंजा नावाच्या गावांत लक्ष्मण घुडे नावाचा वाजसनीय शाखेचा एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय धनवान होता.॥१२६॥ तो पोटाच्या व्याधीनें ग्रस्त झाला होता. त्यांवर त्यानें (भरपूर पैसे खर्च करून) अनेक उपायही केले, परंतु त्यास किंचितही गुण न आल्यानें, त्याचा सर्व खर्च व्यर्थ गेला.॥१२७॥समर्थांची कीर्ती त्याच्या कानांवर आली होती, म्हणून लगेच त्यानें सहपरिवार शेगांवास प्रयाण केले.॥१२८॥ श्रोतें हो, त्या लक्ष्मणाला व्याधीच्या त्रासामुळे चालतां देखील येत नव्हतें. दोघां-तिघांनी त्याला उचलून त्या मठांत आणले.॥१२९॥ समर्थांस साधा नमस्कार करण्याचेही त्याच्या शरीरांत त्राण उरलें नव्हतें. अखेर त्याच्या पत्नीने समर्थांपुढे आपला पदर पसरला.॥१३०॥ आणि (प्रार्थनापूर्वक) म्हणाली," हे दयाघना ! मी आपली धर्मकन्या आहे. माझ्या पतीच्या सर्व यातना दूर कराव्यात.॥१३१॥ अमृताचें दर्शन झाल्यावरदेखील का बरें मरण यावें ? माझ्या कुंकवाचे रक्षण करा, हीच माझी आपणांस विनंती आहे."॥१३२॥ (मठांत) त्यावेळीं समर्थांची स्वारी आंबा खात होती. तोच आंबा त्यांनी लक्ष्मणाच्या पत्नीच्या अंगावर फेकला.॥१३३॥ (आणि म्हणाले,)" जा, तुझा पती व्याधीमुक्त होण्यासाठीं हा आंबा त्यास खाऊ घाल. तू पतिभक्ती-परायण अशी त्याची पत्नी म्हणून शोभतेस,खरी !"॥१३४॥ एवढेच बोलून, शेगांवातील त्या मठांत (निवास करणारे) श्रीगजानन स्वामी चिलीम ओढू लागलें.॥१३५॥ (त्यावेळीं तिथेच समर्थांची सेवा करीत असलेला) भास्कर म्हणाला, " अहो बाई, आतां इथे एक क्षणही थांबू नका. आपल्या पतीस घेऊन लगोलग कारंज्यास परत जा.॥१३६॥ समर्थांच्या पवित्र हातांनी तुला हा जो आंबा प्रसाद म्हणून मिळाला आहे, तोच आपल्या पतीस खायला घाल.॥१३७॥ असे केल्यानें तुझ्या मनींची इच्छा पूर्ण होईल. हा आंबा खाताच लक्ष्मणाच्या व्याधीस उतार पडेल आणि अत्युत्तम गुण येईल."॥१३८॥ हे ऐकून लक्ष्मणाची पत्नी तो प्रसाद म्हणून मिळालेला आंबा घेऊन कारंज्यास आली. आपल्या पतीस तिनें तो आंबा खाऊ घातला.॥१३९॥ तें जोडपें स्वगृहीं परतल्यावर नातेवाईक (त्यांची) विचारपूस करण्यासाठी आले. तसेच शेगांवांत काय वर्तमान घडले? याचीही चौकशी करू लागलें.॥१४०॥ त्यांवर लक्ष्मणाची पत्नीनें (शेगांवांत घडलेली) सर्व हकिकत त्या लोकांना सांगितली आणि समर्थांनी मला प्रसाद म्हणून आंबा दिला. तसेच तो आंबा आपल्या पतीस स्वतःच्या हातांनी खाऊ घाल, अशी आज्ञाही केली.॥१४१-१४२॥ (समर्थांचे वचन शिरसावंद्य मानून) मीदेखील आज सकाळीं (माझ्या पतीस हा आंबा) खाऊ घातला, असेंही सांगितले. तिथें आलेल्या वैद्यांनी जेव्हा हे वृत्त ऐकले, तेंव्हा त्यांना वाईट वाटले.॥१४३॥ "अहो बाई, तुम्हीं हा केवढा अनर्थ केलात. या पोटांतील रोगाला आंबा हेच कुपथ्य आहे.॥१४४॥ माधवनिदानीं हेच सांगितले आहे, सुश्रुतांनीही असेच वर्णन केले आहे. तसेच निघंटाने आणि शारंगधरानेदेखील हेच लिहून ठेवलें आहे.॥१४५॥ (समर्थांनी) दिलेला तो प्रसादरूपी आंबा तुम्हीच खायला पाहिजे होता. पत्नीचें पुण्य पतीला लाभदायक ठरते."॥१४६॥ असे वैद्य जेव्हा बोललें, तेंव्हा सर्व नातेवाईक भयभीत झाले आणि लक्ष्मणाच्या पत्नीस (तिच्या कृत्याबद्दल) टोचून बोलू लागले.॥१४७॥ पण पुढें अघटित घडले. लक्ष्मणास अकस्मात रेच होऊन त्याचे पोट मऊ होऊन गेले.॥१४८॥ शौच्यावाटें सर्व व्याधी निघून गेली. हळूहळू लक्ष्मणास ताकद येऊ लागली आणि लवकरच त्याची प्रकृती पूर्ववत (निरोगी) झाली.॥१४९॥ वैद्यशास्त्र निसर्गनियमांच्या कक्षेबाहेर काहीच करत नाही. अशा वेळीं देव-संतांची कृपा अतिशय गुणकारी ठरते.॥१५०॥ पुढें लक्ष्मण खडखडीत बरा झाल्यावर सत्वर शेगांवांस आला आणि महाराज, आपल्या आगमनानें माझें घर पवित्र करा, (अशी महाराजांची प्रार्थना करू लागला).॥१५१॥ मी केवळ आपणांस हें (निमंत्रण देण्यासाठीच) आलो आहे. हे ज्ञानजेठीं, आपण कारंज्यास चलावे. आतां नाहीं असे म्हणून मला निराश करू नका.॥१५२॥ त्याचा विशेष आग्रह पाहून महाराज कारंज्यास गेले. त्यांच्याबरोबर त्यावेळीं शंकर-भाऊ, पितांबरही होतें.॥१५३॥ (लक्ष्मणाने समर्थांस) आपल्या घरी नेऊन त्यांची पूजा केली आणि दक्षिणाही अर्पण केली. ही सारी संपत्ती सर्वस्वीं आपलीच आहे, (ही दक्षिणा) देणारा मी कोण बरें ?॥१५४॥ (लक्ष्मण असे म्हणाला तरी) पण एका ताटांत त्यानें काही रुपये ठेवले. तें पाहून महाराज त्याला म्हणाले, "माझें काहीही उरले नाही, असे तू म्हणतो आहेस खरा, मग हे रुपये तू कुठून आणलेस? लक्ष्मणा, हें असे दांभिकपणाचे वर्तन करू नकोस.॥१५५-१५६॥ मला तू तुझें हे घर दिलें आहेस, आतां ही सारी कुलुपें रस्त्यावर फेकून दे आणि सर्व दरवाजे उघड."॥१५७॥ लक्ष्मण काहीच न बोलता मौन धरून बसला. पण समर्थ मात्र त्यास 'खजिन्याचे दार उघड.' असा आग्रह करीत होते.॥१५८॥ अखेर त्यानें घाबरत घाबरत दार उघडलें, पण स्वत: खजिन्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसला.॥१५९॥ आणि तेथूनच म्हणाला," महाराज, तुम्हीं यावें आणि (या खजिन्यातून) तुम्हांस हवे तें घेऊन जावें." असे जरी तो बोलला तरी त्याच्या मनांत मात्र वेगळाच भाव होता.॥१६०॥ त्याचे हें दांभिकपण (अर्थातच) समर्थांस समजले. बाजारांत बहुरुप्यानें (राजाचे सोंग घेतलें तरी, त्याचे) राजेपण कधी कोणी सत्य मानत नाही.॥१६१॥ जसें एखादे कडू वृंदावन बाहेरून अतिशय सुरेख दिसतें, पण आंतून मात्र पूर्णतः कडवटपणा त्याच्या ठायीं असतो.॥१६२॥ (लक्ष्मणाचा हा खोटा भाव पाहून) पुण्यराशी त्याच्या घरातून उपाशीच बाहेर पडले. संत कधीही दांभिकांच्या घरांत संतुष्ट होत नाहीत.॥१६३॥ खरें पाहता समर्थांस त्याच्या घराची व धन-संपत्तीची काहीच आवश्यकता नव्हती. महाराज तर वैराग्याचे सागर होतें.॥१६४॥ परंतु, लक्ष्मण जे काही बोलला, त्याच्या खरेपणाची स्वामींनी परीक्षा घेतली. त्याच्या खोटेंपणाचा त्यांना राग आला, म्हणून तें तात्काळ उठून बाहेर पडलें.॥१६५॥ आणि जातां जातां म्हणाले," माझें माझें असे सतत म्हणत आहेस खरा, आतां त्याची फळें भोग. त्यास माझा काही उपाय नाही. मी तर इथें तुझ्यावर कृपा करण्यासाठीच, जें काही तुझ्याजवळ आहें, त्याच्या दुप्पटीनें तुला द्यावयास आलो होतो. पण तें काही तुझ्या नशिबांत नाही."॥१६६-१६७॥ तेंच पुढें सत्य झाले. पुढील सहा-एक महिन्यांतच त्याची सर्व संपत्ती लयास गेली आणि त्याच्यावर भिक्षा मागायची वेळ आली.॥१६८॥ श्रोतें हो, परमार्थांत याच कारणास्तव खोटेपणा किंचितही नसावा. समर्थांनी ह्याचसाठी हें चरित्र घडवलें आहे.॥१६९॥ श्री गजानन महाराज हे चिंतामणी आहेत, त्यांना कधी गार शोभून दिसेल काय ? किंवा मग कथिलाने सोन्यांस कधी सुशोभित करतां येईल काय ?॥१७०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित श्रीगजाननविजय नावाचा हा ग्रंथ भाविकजन स्वतःच्या कल्याणप्राप्तीसाठी सदासर्वदा पठण करोत.॥१७१॥ शुभं भवतु ॥ ॥श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ९ इथे वाचता येतील.


अवश्य वाचावे असे काही :

श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )


No comments:

Post a Comment