Showing posts with label श्रीगुरुचरित्र. Show all posts
Showing posts with label श्रीगुरुचरित्र. Show all posts

Jan 27, 2026

गुरुचरित्रातील सायंदेव


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


भक्तवत्सल श्रीदत्तप्रभूंची कृपा किती प्रभावी असते हे सांगणारा श्रीगुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा त्या अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. या अध्यायाचे भक्तिभावाने पारायण व चिंतन केल्यास दुर्धर संकटांचा नाश होतो, असे अनेक थोर पुरुषांचे वचन आहे. क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नामक या अध्यायात श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या शिष्योत्तमाची कथा वर्णिली आहे. प्रथमभेटीतच श्रीगुरुंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या सायंदेवांची केवळ दर्शनमात्रें श्रीनृसिंह सरस्वतीस्वामींविषयीं भक्ती, नितांत श्रद्धा निर्माण झाली आहे. 

' भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ।... ' असे वरदान प्रत्यक्ष त्या परब्रह्माकडून सायंदेवाला मिळाले, त्याच्या भाग्याचे काय अन किती वर्णन करावे बरें ? वरद-कृपाघन श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी वासरब्रह्मेश्वर इथे त्याच्या घरी भिक्षा घेतलीच, अन तद्-नंतर गाणगापुर येथे श्रीगुरु असतांनादेखील पुनःश्च स्वगृहीं यथासांग श्रीगुरुपूजन आणि मोठी समाराधना करण्याचे महद्भाग्य या सद्‌भक्तास अन त्याच्या संपूर्ण परिवारास लाभले. भक्तकामकल्पद्रुम दत्तमहाराज किमान दोनदा तरी त्यांच्या या परम शिष्याच्या घरीं गेले होते, असा श्रीगुरुचरित्रांत स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, पुढें पंधरा वर्षांनी नित्य श्रीगुरुदर्शन, सेवा, सान्निध्य, काशीयात्रापुण्यफळ आणि प्रत्यक्ष श्रीगुरुदेवांच्या उपस्थितीत अनंतव्रत पूजन असे अनेक परमलाभ सायंदेवास प्राप्त झाले. पुढे, श्रीगुरु निवडक शिष्यांना घेऊन श्री शैल्य यात्रेस निघाले, त्यावेळीसुद्धा सायंदेव गुरुंसमवेत होता. श्रीगुरु कर्दळीवनात गुप्त झाल्यावर जी चार प्रसादपुष्पें आली होती, त्यातील एक सायंदेवाने घेतले होते. अर्थात त्याचा जो अनन्यभाव श्रीगुरुचरणीं स्थिर झाला होता, त्याचेच हे वरदानस्वरूप फळ होते.

श्रीनृसिंह सरस्वतीमहाराजांच्या सर्वच कसोटींत पुरेपूर उतरलेल्या या शिष्योत्तमाच्या भक्तीचे अतिशय सुरेख आणि सखोल विवेचन करणारा श्री. ना. वा. ठेंगडीलिखित गुरुचरित्रातील सायंदेव हा लेख सर्व दत्तभक्तांनी आवर्जून वाचावा असाच आहे.

दत्तभक्तहो, विदर्भ साहित्य संघ, नागपूर या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात येणाऱ्या युगवाणी या नियतकालिकातील हा चिंतनात्मक लेख पृष्ठ क्रमांक १८वर आहे.


श्री. ना. वा. ठेंगडीलिखित गुरुचरित्रातील सायंदेव    श्रीगुरुमहाराजांच्या ठायीं सायंदेवाचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्याच्या किमान एक कोट्यांश भक्तिभाव तरी श्रीदत्तप्रभूंची अत्यल्प सेवा, भक्ती करतांना आपल्या मनांत दृढ व्हावा !, हीच प्रार्थना !

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


आवडे दत्तभक्तांसी ...

 

Jan 24, 2025

श्रीनृसिंहवाडी स्थानमाहात्म्य - औरवाडच्या द्विजाचे दारिद्र्यहरण अर्थात श्रीगुरुचरित्र अध्याय - १८


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. ज्या दत्तभक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती, भक्तिपूर्वक पारायणे करावीत, असे अनेक अधिकारी संतमहात्म्यांनी सांगितले आहे. या कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्रांतील श्रीनृसिंहसरस्वती स्वामीमहाराजांचा मंगलमय आशीर्वाद लाभलेला एक अध्याय म्हणजे अठरावा अध्याय - द्रव्यसंकट परिहारार्थ हा अध्याय नित्य पाठांत ठेवावा. तसेच या अध्यायांत श्रीदत्तप्रभूंची राजधानी म्हणून विख्यात असलेल्या श्रीनृसिंहवाडीचे माहात्म्यदेखील वर्णन केले आहे. या महान क्षेत्रीं श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे वास्तव्य होणार हे जाणून श्री रामचंद्र योगी आणि इतर अनेक थोर सत्पुरुष येथे आधीपासूनच तपाचरण करीत राहिले होते, इतके हे स्थान परम पवित्र आणि प्राचीन आहे. अशा या तात्काळ प्रचिती देणाऱ्या अध्यायाचा पाठ करतांना तो केवळ वाचनमात्र न राहता, त्या परब्रह्माच्या ठायीं अनन्य शरणागतीचा भाव यावा, भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची-कृपेची अनुभूती यावी यासाठीच हा चिंतनाचा केलेला अल्प प्रयास ! ही यथामति केलेली वाङ्मयसेवा कृपामूर्ती श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावीं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना !!

II श्री गणेशाय नमः II श्री सरस्वत्यै नमः II श्री गुरुभ्यो नमः II

जय जया सिद्धमुनि I तूं तारक भवार्णी I सुधारस आमुचे श्रवणीं I पूर्ण केला दातारा II१II गुरुचरित्र कामधेनु I ऐकतां न धाये माझें मन I कांक्षीत होतें अंतःकरण I कथामृत ऐकावया II२II ध्यान लागलें श्रीगुरूचरणीं I तृप्ति नव्हे अंतःकरणीं I कथामृत संजीवनी I आणिक निरोपावें दातारा II३II येणेंपरी सिद्धासी I विनवी शिष्य भक्तीसीं I माथा लावूनि चरणांसी I कृपा भाकी तये वेळीं II४II  श्रीनृसिंहसरस्वती महाराज औदुंबरक्षेत्रीं असतांना घडलेला एका मंदमति ब्राह्मणाच्या वरप्रदानाचा कथावृत्तांत ऐकून नामधारक म्हणाला,” हे सिद्धमुनि, तुमचा जयजयकार असो. तुम्हीच हा भवसागर तरून नेणारे त्राता आहांत. हे श्रीगुरुंचे चरित्ररूपी अमृत देऊन तुम्ही माझे सर्व मनोरथ पूर्ण केले. हे कामधेनूस्वरूप गुरुचरित्र कितीही श्रवण केले तरी, माझे मन तृप्त होत नाही. हे कथामृत ऐकत रहावे, अशीच माझ्या मनींची इच्छा आहे. श्रीगुरूंचे ध्यान करण्यांत माझे चित्त निमग्न झाले आहे, श्रीगुरुचरणांचा मला ध्यास लागला आहे. अजूनही माझे पूर्णतः समाधान झाले नाही. हे दयाघना, हे कथामृत अधिक विस्ताराने मला सांगावे.” अशाप्रकारे सिद्धमुनींस भक्तिपूर्वक नमन करून नामधारकाने प्रार्थना केली.        शिष्यवचन ऐकोनि I संतोषला सिद्धमुनि I सांगतसे विस्तारोनि I ऐका श्रोते एकचित्तें II५II ऐक शिष्या-शिखामणि I धन्य धन्य तुझी वाणी I तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं I तल्लीन झाली परियेसा II६II तुजकरितां आम्हांसी I चेतन जाहलें परीयेसीं I गुरुचरित्र आद्यंतेसीं I स्मरण जाहलें अवधारीं II७II शिष्याची श्रीगुरुचरित्र ऐकण्याची ही तळमळ पाहून श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे परमभक्त सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला अन प्रसन्न होऊन ते म्हणाले, “ हे शिष्योत्तमा, तुझी श्रीगुरुचरणीं असलेली दृढ भक्ती पाहून मलाही श्रीगुरुचरित्राचे पुन्हा स्मरण होऊ लागले आहे. आता पुढील कथावृत्त ऐक.”     

भिल्लवडी स्थानमहिमा I निरोपिला अनुपमा I पुढील चरित्र उत्तमा I सांगेन ऐका एकचित्तें II८II व्कचित्काळ तये स्थानीं I श्रीगुरू होते गौप्योनि I प्रकट जहाले म्हणोनि I पुढें निघाले परियेसा II९II वरुणासंगम असे ख्यात I दक्षिणवाराणसी म्हणत I श्रीगुरू आले अवलोकित I भक्तानुग्रह करावया II१०II पुढें कृष्णातटाकांत I श्रीगुरू तीर्थें पावन करीत I पंचगंगासंगम ख्यात I तेथें राहिले द्वादशाब्दें II११II
श्रीगुरुमहाराज कृष्णा व वेणी नदीच्या तीरावर भुवनेश्वरीच्या पश्चिमेस असलेल्या औदुंबर वृक्षातळीं राहिले. त्यावेळीं, भिल्लवडी क्षेत्राच्या पैलतीरी त्यांनी चातुर्मासभर तीव्र अनुष्ठान केले. कितीही प्रयत्न केला तरी कस्तुरीचा सुगंध कधीही लपत नाही, त्याचप्रमाणे सकल जनांच्या कल्याणार्थ अवतरलेले सत्पुरुषही फार काळ गुप्त राहू शकत नाही. कोणत्या ना कोणत्या भक्ताच्या उद्धारासाठी ते प्रकट होतातच. करवीर येथील एका मूढ परंतु भुवनेश्वरी देवीच्या दृष्टांतानुसार श्रीगुरुंना अनन्यभावाने शरण गेलेल्या विप्रपुत्राला विद्या देण्याच्या निमित्ताने श्रीगुरुंची कीर्ती पुन्हा पसरली, अनेक भाविक जन त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यामुळे, लोकानुग्रहासाठी श्रीगुरुंनी तेथून प्रयाण करण्याचे ठरविले. कित्येक तीर्थक्षेत्रें पाहत पाहत ते ‘दक्षिण काशी’ म्हणून विख्यात असलेल्या वारणा नदीच्या संगमी आले. त्या भक्तवत्सल गुरूंच्या तीर्थाटनाचे प्रयोजन केवळ मुमुक्षुजनांचा उद्धार, भक्तकल्याणच होते. पुढें, कृष्णेच्या काठी, कुरुंदवाडनजीक जेथे पंचगंगा कृष्णेला मिळते, त्या संगमस्थानी श्रीगुरु सुमारे बारा वर्षे राहिले. श्रीगुरूंच्या या दीर्घकाळ वास्तव्याने पावन झालेले हे स्थान आज  ‘श्रीनृसिंहवाडी’ किंवा ‘श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी‘ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीगुरुमहिमा हा असा असतो, ते ज्या ज्या स्थानीं वास्तव्य करतात, ते ते क्षेत्र पावन होते.      
अनुपम्य तीर्थ मनोहर I जैसें अविमुक्त काशीपुर I प्रयागासमान तीर्थ थोर I म्हणोनि राहिले परियेसा II१२II कुरवपुर ग्राम गहन I कुरुक्षेत्र तेंचि जाण I पंचगंगासंगम कृष्णा I अत्योत्तम परियेसा II१३II कुरुक्षेत्रीं जितकें पुण्य I तयाहूनि अधिक असे जाण I तीर्थे असतीं अग्रण्य I म्हणोनि राहिले श्रीगुरू II१४II पंचगंगानदीतीर I प्रख्यात असे पुराणांतर I पांच नामें आहेति थोर I सांगेन ऐका एकचित्तें II१५II शिवा-भद्रा-भोगावती I कुंभीनदी-सरस्वती I ' पंचगंगा ' ऐसी ख्याति I महापातक संहारी II१६II ऐसी प्रख्यात पंचगंगा I आली कृष्णेचिया संगा I प्रयागाहूनि असें चांगा I संगमस्थान मनोहर II१७II अमरापुर म्हणिजे ग्राम I स्थान असे अनुपम्य I जैसा प्रयागसंगम I तैसें स्थान मनोहर II१८II वृक्ष असे औदुम्बरु I प्रत्यक्ष जाणा कल्पतरू I देव असे अमरेश्वरू I तया संगमा षट्कूळी II१९II 
काशी, प्रयाग यांसारख्या अतिपावन क्षेत्रांइतकेच या तीर्थाचे माहात्म्य अपार आहे, म्हणूनच श्रीगुरुंनी तिथे वास केला. कृष्णा - पंचगंगा संगमस्थान हे अतिशय श्रेष्ठ आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती या पंचगंगेतील पाच नद्या पुराणकाळापासून प्रसिद्ध आहेत. यांत स्नान केल्यास महापातकांचा नाश होतो. अशी ही अतिपावन पंचगंगा आणि कृष्णा-वेणी या सात नद्यांच्या संगमामुळे इथे ‘षट्कूळ’ तीर्थ झाले आहे - अर्थात सहा तीर म्हणजेच नदीचे काठ असलेले तीर्थ. कृष्णा-वेणीचे दोन तीर, पंचगंगेचे दोन काठ आणि संगम झाल्यानंतर पुढे वाहणाऱ्या नदीचे दोन तट असे हे एकूण सहा तीर असलेल्या या  ‘षट्कूळ’ तीर्थी कल्पतरूसमान औदुंबर वृक्ष आहे. या संगमाजवळ कृष्णेच्या दक्षिण तीरावर कुरवपूर (सध्याचे कुरुंदवाड) वसलेले आहे. नामधारका, हे कुरवपूर म्हणजे कुरुक्षेत्रच आहे. कृष्णा नदीच्या पूर्वतीरावर अमरापूर (सध्याचे औरवाड) नावांचे गांव आहे. येथेच  ‘अमरेश्वर’ नामक अतिशय जागृत असे शिवलिंग आहे. 
जैसी वाराणसी पुरी I गंगाभागीरथी-तीरीं I पंचनदी संगम थोरी I तत्समान परियेसा II२०II अमरेश्वर संनिधानीं I आहेति चौसष्ट योगिनी I शक्तितीर्थ निर्गुणी I प्रख्यात असे परियेसा II२१II अमरेश्वरलिंग बरवें I त्यासी वंदूनि स्वभावें I पूजितां नर अमर होय I विश्वनाथ तोचि जाणा II२२II प्रयागीं करितां माघस्नान I जें पुण्य होय साधन I शतगुण होय तयाहून I एक स्नानें परियेसा II२३II सहज नदीसंगमांत I प्रयागसमान असे ख्यात I अमरेश्वर परब्रह्म वस्तु I तया स्थानीं वास असे II२४II याकारणें तिये स्थानीं I कोटितीर्थे असतीं निर्गुणी I वाहे गंगा दक्षिणी I वेणीसहित निरंतर II२५II 
महान तीर्थक्षेत्र वाराणसी येथील गंगा नदी जशी अतिपवित्र आहे, त्याचप्रमाणे पंचगंगा - कृष्णा संगमाचे महत्त्व आहे. अमरेश्वराजवळ चौसष्ट योगिनी असून, तिथे निर्गुण शक्तितीर्थ नामक प्रख्यात तीर्थ आहे. अमरेश्वर साक्षात काशीविश्वनाथ असून या शिवलिंगाचे श्रद्धेने पूजन केले असता, मनुष्य अमर होतो. माघ महिन्यांत प्रयाग येथे स्नान केल्यास विशेष पुण्यफळ प्राप्त होते. अमरापुर येथील संगमात केवळ एकदा स्नान केल्यास त्या माघस्नानाच्या शतपट पुण्य मिळते. अर्थात हे स्थान प्रयागासम असून तेथे वास करणारा अमरेश्वर प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप आहे. त्यांमुळे तिथे निर्गुणस्वरूपी कोटितीर्थे आहेत. वेणी नदीसहित दक्षिणेकडे वाहणारी कृष्णा ही साक्षात भागिरथीच आहे.    
अमित तीर्थें तया स्थानीं I सांगतां विस्तार पुराणीं I अष्टतीर्थ ख्याति जाग्रणी I तया कृष्णातटाकांत II२६II उत्तर दिशीं असे देखा I वाहे कृष्णा पश्चिममुखा I शुक्लतीर्थ नाम ऐका I ब्रह्महत्यापाप दूर II२७II औदुम्बर सन्मुखेसी I तीनी तीर्थें परियेसीं I एकानंतर एक धनुषी I तीर्थें असती मनोहर II२८II ' पापविनाशी ' ' काम्यतीर्थ ' I तिसरें सिद्ध 'वरदतीर्थ ' I अमरेश्वरसंनिधार्थ I अनुपम्य असे भूमंडळीं II२९II पुढें संगम-षट्कूळांत I ' प्रयागतीर्थ ' असे ख्यात I ' शक्तितीर्थ ' ' अमरतीर्थ ' I ' कोटितीर्थ ' परियेसा II३०II तीर्थें असती अपरांपर I सांगतां असे विस्तार I याकारणें श्रीपाद्गुरू I राहिले तेथें द्वादशाब्दें II३१II कृष्णा वेणी नदी दोनी I पंचगंगा मिळोनि I सप्तनदीसंगम सगुणी I काय सांगूं महिमा त्यांची II३२II ब्रह्महत्यादि महा पातकें I जळोनि जातीं स्नानें एकें I ऐसें सिद्धस्थान निकें I सकळाभीष्ट होय तेथें II३३II काय सांगूं त्यांची महिमा I आणिक द्यावया नाही उपमा I दर्शनमात्रें होती काम्या I स्नानफळ काय वर्णूं II३४II साक्षात् कल्पतरु I असे वृक्ष औदुम्बरु I गौप्य होऊन अगोचरु I राहिले श्रीगुरु तया स्थानीं II३५II भक्तजनतारणार्थ I होणार असे तीर्थ ख्यात I राहिले तेथें श्रीगुरुनाथ I म्हणोनि प्रकट जाहले जाणा II३६II
या पावन संगमस्थानी असंख्य तीर्थे आहेत. त्यांचे महत्त्व पुराणांत वर्णिले आहे, इतके हे स्थान प्राचीन आहे. या कृष्णाकाठी आठ मुख्य तीर्थे आहेत. उत्तर दिशेकडून येणारी कृष्णा जिथे पश्चिमाभिमुख होते, तेथे ‘शुक्लतीर्थ’ आहे. या तीर्थांत स्नान केले असता ब्रह्महत्येचे पातक दूर होते. औदुंबर वृक्षाच्या - अर्थात मनोहर पादुका मंदिरासमोरच ‘पापविनाशी’, ‘काम्यतीर्थ’ आणि ‘वरदतीर्थ’ अशी तीन तीर्थे असून त्या तीर्थांमधील अंतर प्रत्येकी चार चार हात आहे. पुढें, संगमस्थानच्या षट्कुळांत ‘प्रयागतीर्थ’, ‘शक्तितीर्थ’, ‘अमरतीर्थ’ आणि ‘कोटितीर्थ’ अशी चार तीर्थे आहेत. अशा या गुप्त असणाऱ्या पवित्र तीर्थांना प्रकट करण्यासाठीच श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाऱाज तिथे बारा वर्षे राहिले. नामधारकास या सप्त नद्यांच्या संगमाचे माहात्म्य सांगताना सिद्ध म्हणतात, “ या स्थानी केवळ एकदा स्नान केले असता ब्रह्महत्यादि महापातकेही नष्ट होतात आणि भाविकांच्या सर्व इष्ट मनोकामना सहजच पूर्ण होतात. या क्षेत्राच्या केवळ दर्शनानेच सर्व अभिप्सीत पूर्ण होतात, मग स्नानाच्या  पुण्यफळाचे काय अन किती वर्णन करू ? आणि हा औदुंबर तर साक्षात् कल्पतरु आहे. श्रीगुरूमहाराजांच्या तेथील वास्तव्यामुळेच ही पवित्र तीर्थे प्रकट झाली आणि आजही असंख्य भक्तजन या पवित्र क्षेत्रास भेट देऊन इहपर सौख्याचा लाभ घेत आहेत.” 
दत्तभक्तहो, नृसिंहवाडीच्या कणाकणांत दत्तमहाराजांचे अस्तित्व आहे. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी ही सर्व अघहारी तीर्थे आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी किंवा मुमुक्षूंसाठी प्रगट केली आहेत. तेव्हा, कधीही दत्तमहाराजांच्या कृपेने श्रीनृसिंहवाडीस भेट देण्याचा योग आला, तर या क्षेत्रातील तीर्थस्नानाचा अवश्य लाभ घ्यावा अथवा किमान या पुण्यदायक तीर्थांचे दर्शन तरी आवर्जून घ्यावे.  
असतां पुढें वर्तमानीं I भिक्षा करावया प्रतिदिनीं I अमरापुरग्रामीं I जाती श्रीगुरू परियेसा II३७II तया ग्रामीं द्विज एक I असे वेदाभ्यासक I त्याची भार्या पतिसेवक I पतिव्रताशिरोमणी II३८II सुक्षीण असे तो ब्राह्मण I शुक्लभिक्षा करी आपण I कर्ममार्गी आचरण I असे सात्विक वृत्तीनें II३९II तया विप्रमंदिरांत I असे वेल उन्नत I शेंगा निघती नित्य बहुत I त्याणें उदरपूर्ति करी II४०II एखादे दिवशीं त्या ब्राह्मणासी I वरो न मिळे परियेसीं I तया शेंगांतें रांधोनि हर्षी I दिवस क्रमी येणेंपरी II४१II ऐसा तो ब्राह्मण दरिद्री I याचकपणें उदर भरी I पंचमहायज्ञ कुसरी I अतिथी पूजी भक्तीनें II४२II
श्रीनृसिंहसरस्वती महाराज कृष्णेच्या पश्चिमतीरावर असलेल्या औदुंबर वृक्षाखाली राहत होते. भिक्षेसाठी ते पूर्वतीरावरील अमरापुर गांवात जात असत. त्या ग्रामी वेदशास्त्रसंपन्न, नित्य विहित कर्माचरण करणारा ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत दरिद्री होता, तरीही परान्न न घेता केवळ कोरडी भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करीत असे. त्या परिस्थितीतही तो दररोज पंचमहायज्ञ करीत असे आणि घरी आलेल्या अतिथींचेही यथोचित आदरातिथ्य करीत असे. त्याची पत्नीही साध्वी, पतिव्रता होती, आणि सर्वदा पतीच्या वचनांनुसार वागत असे. त्या सद्‌वर्तनी ब्राह्मणाच्या दारात एक घेवड्याचा वेल होता. प्रचंड वाढलेल्या त्या वेलांस भरपूर शेंगा येत असत. एखाद्या दिवशी जर त्या विप्रास पुरेशी भिक्षा मिळाली नाही, तर त्या घेवड्याच्या शेंगा शिजवून त्याचे कुटुंब उदरपूर्ती करत असत.          
वर्ततां श्रीगुरू एके दिवसीं I तया विप्रमंदिरासी I गेले आपण भिक्षेसी I नेलें विप्रें भक्तीनें II४३II भक्तिपूर्वक श्रीगुरूसी I पूजा करी तो षोडशी I घेवडे-शेंगा बहुवसी I केली होती पत्र-शाका II४४II भिक्षा करून ब्राह्मणासी I आश्वासिती गुरु संतोषीं I गेले तुझे दरिद्र दोषी I म्हणोनि निघती तये वेळीं II४५II
अन एके दिवशी त्याची पुण्याई फळास आली. श्रीनृसिंहसरस्वती महाराज त्या सात्त्विक वृत्तीच्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. साक्षात श्रीगुरु आपल्या घरी भिक्षेसाठी आलेले पाहून, त्या ब्राह्मणास साहजिकच खूप आनंद झाला. मोठ्या भावभक्तीने त्याने श्रीगुरुंचे स्वागत केले, त्यांना बसण्यासाठी आदरपूर्वक आसन घातले. सर्व पूजासाहित्य आणून अतीव श्रद्धेने त्याने श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे षोडशोपचारांनी पूजन केले. त्या दिवशी नेमकी त्याला विशेष भिक्षा मिळाली नव्हती, त्यांमुळे दारातल्या घेवड्याचीच भाजी त्या भाविक दाम्पत्याने श्रीगुरुंना भोजनात वाढली. भक्तवत्सल श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी भावभक्तीने दिलेली ती भिक्षा स्वीकारली आणि प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला,” आता तुझा दारिद्र्य-दोष गेला बरें !” आणि श्रीगुरु तेथून निघाले. 
दत्तभक्तहो, शुद्धभावानें केलेली कुठलीही सेवा दत्तप्रभू आनंदाने स्वीकारतातच. श्री नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी शिरोळच्या ब्राह्मण स्त्रीने वाढलेल्या जोंधळ्याच्या कण्या आनंदाने ग्रहण केल्या, गाणगापूर येथील विप्र स्त्रीने सद्‌गुरुंच्या वचनावर श्रद्धा ठेवून वांझ म्हशीची धार काढली आणि तिने ते दूध तापवून नृसिंहसरस्वती महाराजांना भिक्षा म्हणून दिले. त्याचाही स्वामींनी स्वीकार केला. या काही फार मोठ्या सेवा नव्हेत, पण ही गुरुसेवा करतांना त्यांच्या ठायी जो उत्कट भक्तीभाव, अर्पण भाव होता, त्यामुळेच श्रीगुरू प्रसन्न झाले.        
तया विप्राचे गृहांत I जो का होता वेल उन्नत I घेवडा नाम विख्यात I आंगण सर्व वेष्टिलें असे II४६II तया वेलाचें झाडमूळ I श्रीगुरूमूर्ति छेदिती तात्काळ I टाकोनि देती परिबळे I गेले आपण संगमासी II४७II
त्या ब्राह्मणाच्या दारात असलेला घेवड्याचा वेल प्रचंड वाढलेला होता, त्याने सर्व अंगण व्यापून टाकले होते. त्या वेलाचे मूळच श्रीगुरुंनी तोडून टाकले आणि ते संगमावर निघून गेले.  
विप्रवनिता तये वेळीं I दुःख करिती पुत्र सकळी I म्हणती पहा हो दैव बळी I कैसें अदृष्ट आपुलें II४८II आम्हीं तया यतीश्वरासी I काय उपद्रव केला त्यासी I आमुचा ग्रास छेदुनि कैसी I टाकोनि दिल्हा भूमीवरी II४९II ऐसेपरी ते नारी I दुःख करी नानापरी I पुरुष तिचा कोप वारी I म्हणे प्रारब्ध प्रमाण II५०II
महाराजांनी घेवड्याचा वेल उपटलेला पाहताच त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अत्यंत दुःख झाले. या दारांत असलेल्या घेवड्यामुळेच कित्येक दिवशी त्या ब्राह्मणाच्या परिवाराची उदरपूर्ती झाली होती. आता मात्र श्रीगुरुंनी तो घेवड्याचा वेलच मूळापासून उपटला होता, त्यामुळे उद्विग्न होऊन ती ब्राह्मणपत्नी आणि त्याचे पुत्र दुःख करू लागले व म्हणू लागले, “ असे कसे आमचे नशीब वाईट आणि काय हे कुठल्या जन्मीचे प्रारब्ध ! आम्ही त्या यतीश्वरांचा असा काय अपराध केला होता, म्हणून त्यांनी आमच्या तोंडचा घास हिरावून मातीत टाकला.” अशाप्रकारे ती ब्राह्मणपत्नी आक्रोश करू लागली. परंतु तो ब्राह्मण मात्र तारतम्य जाणणारा होता. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणें सर्व काही घडत असते, हे तो जाणून होता. श्रीगुरुंवर त्याचा पूर्णतः विश्वास होता, श्रद्धा होती. त्यांमुळे त्याच्या पत्नीने श्रीगुरुंना दोष दिलेला त्याला मुळीच आवडले नाही. 
दत्तभक्तहो, थोडा विचार करा. बहुतांश वेळा कुटुंबाची उदरपूर्ती करणारा तो घेवड्याचा वेल गुरुमहाराजांनी तोडून टाकला आहे. आज रात्री, कदाचित दुसऱ्या दिवशीही आपल्या मुलाबाळांच्या, पत्नीच्या आणि स्वतःच्याही पोटात एखादा घास जाईल याची शाश्वती नाही. त्याही वेळेला या गुरुभक्ताची अशी गाढ श्रद्धा आहे की साक्षात त्रिमूर्तीस्वरूप स्वामींचे पवित्र चरण आपल्या घराला लागले आहेत ना, मग आपले निश्चितच कल्याण होणार. किती ती अनन्यशरणागतता अन किती तो श्रीगुरुंवर दृढ विश्वास ! आणि मग या निजभक्ताचे पूर्वकर्मार्जित दोष निवारण - दैन्यहरण श्रीगुरुमहाराज का नाही करणार बरें?
भाग्यवशात् त्या निजजनतारक श्रीदत्तात्रेयप्रभूंनी आपली अशी परिक्षा घेतली असती, तर त्या प्रसंगी आपण कसे वागलो असतो? त्या ब्राह्मणाच्या पत्नीप्रमाणे उद्विग्न झालो असतो, त्रागा केला असता? का मग त्या सत्त्वगुणी ब्राह्मणाप्रमाणे ' तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I नेलें आमुचे दरिद्रदोषी I' असा श्रीगुरुंवर अढळ विश्वास ठेवला असता?
म्हणे स्त्रियेसी तये वेळीं I जें जें होणार जया काळीं I निर्माण करी चंद्रमौळी I तया आधीन विश्व जाण II५१II विश्वव्यापक नारायण I उत्पत्तिस्थितिलया कारण I पिपीलिकादि स्थूळ-जीवन I समस्तां आहार पुरवीतसे II५२II ' आयुरन्नं प्रयच्छति ' I ऐसें बोले वेदश्रुति I पंचानन आहार हस्ती I केवीं करी प्रत्यहीं II५३II चौऱ्यांशी लक्ष जीवराशी I स्थूल सूक्ष्म समस्तांसी I निर्माण केले आहारासी I मग उत्पत्ति तदनंतरे II५४II रंकरायासी एक दृष्टीं I करूनी पोषितो हे सर्व सृष्टि I आपुलें आर्जव बरवें वोखटी I तैसे फळ आपणासी II५५II पूर्वजन्मीचें निक्षेपण I सुकृत अथवा दुष्कृत जाण I आपुलें आपणचि भोगणें I पुढिल्यावरी काय बोल II५६II आपुलें दैव असतां उणें I पुढिल्या बोलती मूर्खपणें I जें पेरिलें तेंचि भक्षणें I कवणावरी बोल सांगे II५७II बोल ठेविसी यतीश्वरासी I आपलें आर्जव न विचारिसी I ग्रास हरितला म्हणसी I अविद्यासागरी बुडोनि II५८II तो तारक आम्हांसी I म्हणोनी आला भिक्षेसी I नेलें आमुचे दरिद्रदोषी I तोचि तारील आमुतें II५९II
तो ब्राह्मण आपल्या पत्नीस म्हणाला,” जे काही ज्या ज्या वेळी घडते, ती ईश्वरी योजना असते. हे सारे विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. या संपूर्ण चराचराला व्यापून टाकणारा तो जगन्नियंता आहे. या अखिल सृष्टीची उत्पत्ति-स्थिती-लय करणाराही तोच आहे. लहान मुंगीपासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वांनाच तोच जगदीश्वर आहार पुरवितो. ‘तोच परमात्मा सर्वांना आयुष्य आणि अन्न देतो.’ हे वेदवचन आहे. सिंहाचा आहार हत्ती, तो कसा त्याला मिळतो? याचा जरा विचार करून बघ. चौऱ्याऐंशी लक्ष जीव आणि स्थावर जंगम या सर्वांचा आहार प्रथम निर्माण करून तद्‌नंतरच ईश्वराने त्यांची उत्पत्ती केली. श्रीमंत-निर्धन असा भेदभाव न करता तो समदृष्टी ठेऊन सर्व सृष्टीचे पोषण करतो. आपले पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळते. तेव्हा, आपले पूर्वजन्मीचे सुकृत अथवा दुष्कृत जसे असेल ते भोगणे प्राप्त आहे. उगाच इतरांना का दोष द्यावा बरें ? आपलेच दैव खडतर असेल तर दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे आहे. आपण जे पेरले असेल तेच फळ आपल्याला मिळते, त्यासाठी उगाच इतरांना का दोष द्यावा ? तू या अज्ञानसागरांत बुडून त्या सर्वश्रेष्ठ यतीश्वरांनी आपला ग्रास हिरावून घेतला असे म्हणतेस, मात्र आपल्या संचिताचा विचार तू करीत नाहीस. तो निजजनतारक असून आपल्या घरी भिक्षेसाठी आला, त्याच्या कृपेने आपला दारिद्र्य दोष गेला, आता तोच आपल्याला तारील. 
सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता I परो ददातीति कुबुद्धिरेषा I स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकः II असे वचन आहे. अर्थात आपल्याला सुख अथवा दुःख देणारा दुसरा कोणी नसतो, मुळात इतरांमुळे आपणास सुख अथवा दुःख प्राप्त होते, असे मानणे हीच दुर्बुद्धी आहे. सर्व प्राणिमात्र आपापल्या कर्मसूत्रांत बांधले गेले आहेत. तो ब्राह्मण पंचमहायज्ञ, अतिथीपूजन आणि वेदोक्त आचरण करणारा होता, त्याची वृत्ती सात्त्विक होती. म्हणूनच त्याला हे तत्त्वज्ञान कळले होते.                   
येणेंपरी स्त्रियेसी I संभाषी विप्र परियेसीं I काढोनि वेलशाखेसी I टाकीता झाला गंगेंत II६०II तया वेलाचें मूळ थोरी I जें कां होतें आपुलें द्वारीं I काढूं म्हणूनि द्विजवरीं I खणिता झाला तया वेळीं II६१II काढितां वेलमूळासी I लाधला कुंभ निधानेसीं I आनंद जाहला बहुवसी I घेऊनि गेला घरांत II६२II म्हणती नवल काय वर्तलें I यतीश्वर आम्हां प्रसन्न झाले I म्हणोनि ह्या वेला छेदिलें I निधान लाधलें आम्हांसी II६३II नर नव्हे तो योगीश्वर I होईल ईश्वरीअवतार I आम्हां भेटला दैन्यहर I म्हणती चला दर्शनासी II६४II
अशी पत्नी आणि मुलांची समजूत घालून श्रीगुरूंनी उपटून टाकलेला तो घेवड्याचा वेल त्याने कृष्णा नदींत फेकून दिला. त्या वेलाचे मूळ फार मोठे व जमिनीत खोलवर रुतलेले होते. ते काढण्यासाठी तो विप्र ती जमीन खोदू लागला. वेलाचे मूळ उपटून काढताच तिथे त्याला एक द्रव्याने भरलेला कुंभ आढळला. ते धन पाहून अर्थातच त्या सर्वांच्याच आनंदाला पारावार उरला नाही आणि ते मोठ्या कृतज्ञताभावाने म्हणू लागले, “ हे काय नवलच घडले ! यतीमहाराज आम्हांवर प्रसन्न झाले, म्हणूनच त्यांनी हा वेल तोडून टाकला आणि आम्हांला हा द्रव्यघट सापडला. ते कोणी सामान्य नर नसून साक्षात योगीश्वर आहेत, प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत. आमचे दैन्य दूर करण्यासाठीच ते आमच्या गृही आले होते. आता आपण सत्वर त्यांच्या दर्शनाला जाऊ.” 
नारायणस्वरूपी दत्तमहाराज गृहीं आल्यावर जगन्माता लक्ष्मीदेवी आपसूक तिथे येणारच, नाही का ? श्रीगुरु हे भावप्रिय आहे. माझ्या भक्तांचा मी उद्धार करणारच, असे त्यांचे ब्रीद आहे. त्यामुळे अंतःकरणपूर्वक केलेल्या अल्प सेवेच्या बदल्यात भक्तांचे इहपर कल्याण असा त्यांचा अनाकलनीय हिशोब असतो.      
जाऊनि संगमा श्रीगुरूसी I पूजा करिती बहुवसी I वृतांत सांगती तयांसी I तये वेळीं परियेसा II६५II श्रीगुरू म्हणती तयासी I तुम्हीं न सांगणें कवणासी I प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II६६II ऐसेपरी तया द्विजासी I सांगे श्रीगुरू परियेसीं I अखंड लक्ष्मी तुमचे वंशीं I पुत्रपौत्रीं नांदाल II६७II ऐसा वर लाधोन I गेली वनिता तो ब्राह्मण I श्रीगुरूकृपा ऐसी जाण I दर्शनमात्रें दैन्य हरे II६८II 
मग तो ब्राह्मण उत्तम पूजासाहित्य घेऊन आपल्या पत्नी-मुलांसह संगमावर गेला, श्रीगुरुमहाराज तिथे होतेच. त्या दाम्पत्याने श्रीगुरुंची उत्तम प्रकारे पूजा केली आणि घरी घडलेले सर्व वर्तमान त्यांना सांगितले. तसेच आपण अज्ञानवशात  श्रीगुरुंना दोष दिला त्याबद्दल त्यांची क्षमायाचनादेखील केली. परमकृपाळू गुरूंनी त्यांना क्षमा तर केलीच, पण ‘ तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल, तुम्ही पुत्रपौत्रांसह नांदाल,’ असे शुभाशीर्वादही दिले. पुढें, श्रीगुरुं त्यांना म्हणाले, “ तुम्ही ही धनप्राप्तीची गोष्ट कोणालाही सांगू नका. माझे स्वरूप जर तुम्ही लोकांत प्रकट केले तर तुमची संपत्ती नाहीशी होईल.”  असे शुभ दत्ताशिष प्राप्त होऊन ते ब्राह्मण पती-पत्नी परत गेले. श्रीगुरुकृपा अशी असते, त्यांच्या केवळ दर्शनानेच दैन्य निवारण होते.
दत्तभक्तहो, श्रीगुरुंनी त्या ब्राह्मणाला, ‘ तुम्हीं न सांगणें कवणासी I प्रकट करितां आम्हांसी I नसेल लक्ष्मी तुमचे घरीं II’ ही जी सूचना दिली, कारण त्या वेळी त्यांना प्रकट व्हायचे नव्हते, लोकोपद्रव टाळायचा होता.     
ज्यासी होय श्रीगुरूकृपा I त्यासी कैचें दैन्य पाप I कल्पवृक्ष आश्रय करितां बापा I दैन्य कैंचें तया घरीं II ६९ II दैवें उणा असेल जो नरु I त्याणें आश्रयावा श्रीगुरू I तोचि उतरेल पैलपारु I पूज्य होय सकळिकांसी II ७० II जो कोण भजेल श्रीगुरू I त्यासी लाधेल इह परू I अखंड लक्ष्मी त्याचे घरीं I अष्ट ऐश्वर्ये नांदती II७१II सिद्ध म्हणे नामधारकासी I श्रीगुरूमहिमा असे ऐसी I भजावें तुम्हीं मनोमानसीं I कामधेनु तुझ्या घरीं II७२II गंगाधराचा कुमर I सांगे श्रीगुरूचरित्रविस्तार I पुढील कथामृतसार I ऐका श्रोते एकचित्तें II७३II
ज्यावर श्रीगुरुंची कृपा होते, त्याच्या दारिद्र्य व पापाचा क्षणार्धांत नाश होतो. अहो, कल्पवृक्षाचा आश्रय घेतल्यावर दारिद्र्य कसे बरें त्याच्या घरी राहील? जो मनुष्य दैवहीन असेल त्याने श्रीगुरुंना अनन्यभावें शरण जावे. श्रीगुरुकृपेने तो सहजच भवसागर तरून जाईल आणि सर्वांना पूज्य होईल. जो कोणी श्रीगुरुंची अंतःकरणपूर्वक भक्ती करेल, त्याचे इहपर कल्याण होईल आणि त्याच्या घरी अष्टैश्वर्ये, लक्ष्मी अखंड नांदेल.
खरें पाहता, ब्राह्मण परिवाराच्या उदरपूर्तीचे साधन असलेला घेवड्याचा वेल उपटून श्रीगुरुंनी त्यांच्या संयमाची एक प्रकारे परीक्षाच घेतली. परंतु त्या ब्राह्मणाचे सदाचरण, श्रीगुरुंवर असलेली अढळ श्रद्धा यांमुळे श्री नृसिंहसरस्वती महाराज प्रसन्न झाले आणि फलस्वरूप त्या ब्राह्मणास सुवर्णमोहरांचा कुंभ मिळाला.
दत्तभक्तहो, आपल्याही जीवनांत असंख्य आपदा-विपदा येतात, कित्येकदा चढ-उतारांस सामोरे जावे लागते, अपमान-दुःखाचे प्रसंग येतात. अशा वेळी साहजिकच त्या ब्राह्मणाच्या पत्नीप्रमाणे आपलीही दत्तमहाराजांवर असलेली श्रद्धा कुठेतरी डळमळीत होते. मात्र हीच आपली कसोटीची वेळ असते. “ यांतच माझे कल्याण आहे, भक्तवत्सल श्रीगुरु माझा उद्धार निश्चित करतीलच!”  अशी त्या आचारसंपन्न ब्राह्मणाप्रमाणे दृढ श्रद्धा ठेवल्यास स्मर्तृगामी दत्तमहाराज त्वरित धावून येतील आणि आपल्या मनीचा भाव जाणून घेऊन मस्तकी कृपाहस्त ठेवतील, हे निःसंशय !  
सिद्धमुनी नामधारकास सांगतात, “ श्रीगुरुंचा महिमा हा असा आहे. तू मनोभावे गुरुभक्ती कर. त्यायोगे, जणू कामधेनूच तुझ्या घरी सदैव वास करेल.”
गंगाधराचा पुत्र श्रीगुरूचरित्र विस्तारपूर्वक सांगत आहे. श्रोतें हो, पुढील कथामृतसार तुम्ही एकाग्र मनाने श्रवण करावे.     
II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोSध्यायः II

श्री क्षेत्र औदुंबर येथून निघून भगवान् श्रीगुरूंनी दक्षिण दिशेकडे प्रस्थान केले. त्यांनी कृष्णाकाठच्या अनेक तीर्थयात्रा केल्या. कृष्णामाता साक्षात् विष्णूचे रूप आहे तर वेणीमाता ही भगवान शंकरांचे रूप आहे, असे पद्मपुराणांत वर्णिले आहे. ह्या दोन हरिहरस्वरूप असणाऱ्या नद्यांचा पंचनद्यांसह झालेला अत्यंत मनोहर, पुण्यदायक आणि ब्रह्महत्यादि पंचपातकांचा नाश करणाऱ्या अष्टतीर्थांनी युक्त असा संगम पाहून श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या अतिपवित्र संगमाच्या पश्चिम तीरावरील औदुंबर वृक्षातळी वास करून बारा वर्षे राहिले. या संदर्भात प. प. थोरले स्वामीमहाराजांनी एक अतिशय सुरेख अन समर्पक रूपक केले आहे. श्री टेम्ब्ये स्वामी म्हणतात. “ अष्टप्रकृतींच्या समन्वयाने साकारलेल्या या देहांत आदिमाया चित्शक्ती आणि जीवात्मा यांच्या संगमस्थानी अर्थात अती मनोहर अशा आज्ञाचक्राच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मरंध्रांत श्रीगुरूमहाराज विराजमान झाले.”
परमात्मस्वरूप श्रीमन्नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज आपल्या मनोहर स्वरूपांत तिथे स्थापित आहेत. ‘ तया औदुंबरातळीं । श्रीगुरुवास सर्वकाळीं । काम्य होत तात्काळीं । आराधितां श्रीगुरुसी ॥’ अशी ग्वाही श्रीगुरुचरित्रकारांनी दिली आहे. प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती महाराज, नारायण स्वामी, सनकादिक मंडळी, सद्‌गुरु गुळवणी महाराज, सद्‌गुरु मामा महाराज अशा अनेक थोर संत महापुरुषांनादेखील श्रीदत्तप्रभूंनी, श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे दर्शन दिले आहे, साक्षात्कार दिला आहे. तसेच आजही साक्षात श्रीदत्तप्रभू या पावन स्थानीं मुमुक्षूंना आश्वासन देत, सकाम भक्तांच्या इष्ट मनोकामनांची पूर्ती करत आणि संत-महात्म्यांना परमानंदाचे वरदान देत सदैव वास्तव्य करत आहेत. औदुंबरवृक्षातळीं गुप्तरूपाने वास करणाऱ्या श्रीगुरुंची आराधना केल्यास प्रचिती अवश्य येतेच. 
अमरापूर येथील ब्राह्मणाच्या दैन्यहरणाच्या कथेचेही हेच तात्पर्य आहे की विशुद्ध आचरण, सत्त्वगुणयुक्त विचार आणि चराचराला व्यापून टाकणाऱ्या त्या परमशक्तीवर प्रगाढ विश्वास यांमुळेच गुरुकृपा प्राप्त होते. आचारसंपन्न, वैदिक आणि श्री गुरुमहाराजांवर दृढ श्रद्धा असलेल्या भक्तिमान ब्राह्मण दाम्पत्यास ‘ तुम्ही भूलोकी पुत्र-पौत्रांसह ऐश्वर्यारोग्य भोगून अंती निश्चितपणे मुक्ती पावाल.’ असा आशीर्वाद त्या परमात्म्याने दिला. श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे पूजन करतांना, भिक्षा म्हणून घेवड्याची भाजी भोजनात देतांना त्या ब्राह्मणाची जी उत्कट भक्तिभावना होती, त्यांमुळे श्रीगुरु प्रसन्न झाले आणि ‘ तुझे दैन्य जाईल.’ असे त्यांनी आश्वासन दिले. अर्थातच त्यानंतर स्वामींनी त्या ब्राह्मण परिवाराच्या क्षुधाशांतीचे मुख्य साधन असलेल्या घेवड्याचा वेल तोडून त्याची कसोटीही घेतली. ‘ सकल विश्वाचा जनक, पालक आणि संहारक अशा परमेश्वराची श्रीमंत व निर्धन या सर्वांवरच कृपादृष्टी असते. कर्तुमकतुम् अन्यथा कर्तुमचें सामर्थ्य असलेले श्रीगुरुच आपले तारणहार आहेत.’, असा दृढभाव असलेला तो सात्विक वृत्तीचा ब्राह्मण त्या परमात्म्याच्या परिक्षेत सहजच उत्तीर्ण झाला. त्या अल्प गुरुसेवेनेच त्याचे इहपर कल्याण झाले. ‘ ऋण तरि मुष्टी पोहे I त्याच्या व्याजांत हेमनगरी ती I मुदलात मुक्ति देणे I ही कोण्या सावकारिची रीती II’ या कविवर्य मोरोपंतांच्या उक्तीचीच ही प्रचिती नव्हें काय ? थोडक्यांत सांगायचे तर परमेश्वराला निष्काम भावनेने काही समर्पण केले असता ते निश्चितच ‘सुवर्ण’ होऊन परत मिळते, याची खात्री बाळगावी. 
दत्तभक्तहो, कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्रातील हा अध्याय आपणही श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने नित्यपाठांत ठेवू या. दत्तमहाराजांच्या कृपेनें श्रीक्षेत्र श्रीनृसिंहवाटिका आणि इतरही अनेक श्रीदत्तक्षेत्रांच्या दर्शनाचा, सेवेचा लाभ आपणां सर्वांना मिळावा आणि अमरापूरच्या ब्राह्मणाप्रमाणेच आपल्या ठायीं अनन्य गुरुभक्ती असावी, सर्वकाही अनुकूल असतांना आपल्या मनीं नेहेमीच आपल्या आराध्याप्रति कृतज्ञताभाव असावा तसेच प्रारब्धवशांत विपरीत परिस्थिती आली तरी त्यावेळी आपली श्रीगुरुचरणांवरील पकड अधिक दृढतेने घट्ट व्हावी, हीच त्या भक्तवत्सल-दयाघन श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-श्रीदत्तप्रभूंच्या मनोहर चरणीं  प्रार्थना !!!
II श्रीगुरुदेवदत्त II 
II श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु II 
II शुभं भवतु II
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

Dec 11, 2024

श्रीगुरुचरित्र सारामृत अर्थात श्रीगुरुचरित्राचा गद्यानुवाद


॥ श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयसद्‌गुरुभ्यो नमः ॥ अथ ध्यानम् बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङगरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् । ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे ह्रदि मुदा ध्येयं सदा योगिभिः ॥ दत्तभक्तहो, श्रीगुरुचरित्राची प्रासादिकता तर सर्वश्रुत आहेच. ' श्रुतं हरति पापानि ' अर्थात वेद, पुराणें आणि प्रासादिक ग्रंथ श्रवण केल्याने पाप हरते, हे वेदवाक्य आहे. श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. श्री गुरुचरित्र हे सरस्वती गंगाधर यांनी प्रत्यक्ष श्री गुरूंच्या, श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेवरून लिहिलेले आहे, त्यामुळे तो वरदग्रंथही आहे. अर्थात प्रत्यक्ष श्रीगुरुंचा वर या ग्रंथास प्राप्त झाला असल्याने तो सर्वथैव सिद्धीप्रद आहे. त्यांतील दिव्य अक्षरांतून शुभ स्पंदने निर्माण होत असतात, त्यांमुळे त्यांचे पठणमात्रें फळ मिळतेच. परंतु ही ईश्वर आराधना केवळ श्रवण, वाचन करणे यापुरतीच मर्यादित न ठेवता त्याचे मनन करावे, त्यातून योग्य तो बोध घ्यावा, यासाठी हा अल्प प्रयास ! दत्तभक्तांना संपूर्ण श्रीगुरुचरित्राचा गद्यानुवाद इथे वाचता येईल.


*** श्रीगुरुचरित्र सारामृत ***

भगवान दत्तमहाराजांची कुठल्या ना कुठल्या रूपांत सतत सेवा घडावी, व त्या भक्ताभिमानी, शरणागतवत्सल परब्रह्मानेही ही सेवा त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावी, आणि आपल्या सर्वांवर त्यांची सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना !

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Nov 21, 2024

संतकवी श्री दासगणु महाराजविरचित श्री गुरूचरित्र सारामृत


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्री सरस्वती गंगाधररचित महाप्रसादिक श्रीगुरुचरित्र हा सिद्धमंत्ररूप आणि वरदग्रंथ आहे. त्यांमुळे मंत्राच्या अनुष्ठानविधीचे सर्व नियम या ग्रंथाचे पारायण करतांना विशेष पाळावे लागतात. या वेदतुल्य ग्रंथाचे वाचन सर्वच दत्तभक्तांना मुक्तपणे करता यावे यासाठी भक्तवत्सल श्रीदत्तात्रेय महाराजांनी अनेक अधिकारी संत-महात्म्यांना प्रेरणा दिली आणि श्रीगुरुचरित्रावर आधारित अशा विशेष पाठावृत्तींची निर्मिती झाली. प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजरचित श्री सप्तशतीगुरुचरित्रसार, प. पू. सद्‌गुरु श्री. मामा महाराजविरचित श्रीगुरुचरित्र नित्यपाठ, स्वामी दत्तावधूतरचित संक्षिप्त श्रीगुरुचरित्र या अशाच काही प्रासादिक पाठावृत्ती प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद आहेत. कित्येक दत्तभक्त या पोथींच्या केवळ वाचनानेही श्रीगुरूंच्या अपार कृपेची अनेक प्रकारे अनुभूती घेऊन कृतार्थ झाले आहेत, होत आहेत. संतकवी श्री दासगणु महाराजरचित श्री गुरूचरित्र सारामृत ही अशीच एक दिव्य पाठावृत्ती आहे. मूळ गुरुचरित्रातील सर्व कथाप्रसंग साररुपाने या ग्रंथात कथित केले आहेत. सिद्धकवी श्री दासगणु महाराजांनी अत्यंत रसाळपूर्ण आणि सुलभतेने रचलेले हे प्रासादिक काव्य दत्तभक्तांनी आवर्जून वाचावे असेच आहे. संतकवी श्री दासगणु महाराजविरचित श्री गुरूचरित्र सारामृत   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Nov 16, 2023

श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि अर्थात श्रीगुरुचरित्र अध्याय - १४


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. ज्या दत्तभक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती, भक्तिपूर्वक पारायणे करावीत, असे अनेक अधिकारी संतमहात्म्यांनी सांगितले आहे. त्यांतीलच एक अध्याय म्हणजे चौदावा अध्याय - आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ हा अध्याय अवश्य वाचावा. गुरुकृपा किती प्रभावी असते हे सांगणारा हा अध्याय या श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. मेरुमणि म्हणजेच एखाद्या माळेंतील मोठा, मध्यवर्तिमणि किंवा मुख्य आधारस्तंभ ! क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नामक या अध्यायचेही असेच महत्व आहे. ' न मे भक्त: प्रणश्यति ' अर्थात माझा भक्त कधीही नाश पावत नाही, असे भगवंतांचे वचन आहे. याच वचनांची, श्रीगुरूंच्या भक्तवात्सल्यतेची पूर्णतः अनुभूती देणाऱ्या या अध्यायाच्या चिंतनाचा हा अल्प प्रयास ! ही यथामति केलेली वाङ्मयसेवा कृपामूर्ती श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावीं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना !!


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥      नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१॥ जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥३॥  श्री सिद्धांनी सांगितलेल्या श्रीगुरूंच्या लीला ऐकून नामधारक भक्तिरसांत रंगून गेला. त्याने मोठ्या उत्सुकतेने सिद्धांना प्रश्न केला, " हे योगीश्वरा, मला श्रीगुरुंचे पुढील चरित्र विस्तारपूर्वक सांगा. पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणांवर श्रीगुरुंनी कृपा केली आणि त्याला व्याधिमुक्त केले. त्यानंतर काय घडले ? "     ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी । भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥७॥  शिष्याचा हा भाव पाहून सिद्धांना संतोष झाला आणि त्यांनी कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " हे शिष्योत्तमा, त्या दिवशी ज्याच्या घरी भिक्षा घेतली होती, त्या सायंदेव नामक ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले. त्याची श्रीगुरुचरणीं अनन्य भक्ति दृढ झाली होती, गुरुभक्ती कशी करावी हे तो जाणत होता.

सायंदेव व त्याची पत्नी जाखाई हिने ज्या उत्कट भक्तिभावाने श्री नृसिंह सरस्वती महाराजांची षोडशोपचारे पूजा केली, त्याचे सुरेख वर्णन गुरुचरित्रकारांनी तेराव्या अध्यायांत केले आहे. दत्तभक्तांसाठी ते श्रीगुरुपूजेचे विधान इथे थोडक्यांत देत आहोत. - समस्त शिष्यगण आणि तो उदरव्यथा असलेला ब्राह्मण यांसह श्रीनृसिंहसरस्वती महाराज सायंदेवाच्या घरी भोजनासाठी गेले. तेव्हा त्याने सर्व घर सुशोभित केले होते, सुंदर पंचवर्णी रांगोळ्या काढल्या होत्या. सायंदेव आणि त्याची पत्नी यांनी सर्वांचे योग्य स्वागत केले. श्रीगुरुंना बसण्यासाठी एक अतिशय सुंदर आसन मांडले होते. त्याचप्रमाणे सर्व शिष्यमंडळींसाठीही आसने तयार केली होती. प्रथमतः सायंदेवाने सपत्नीक मंडलार्चन विधी करून श्रीगुरुमहाराजांना पुष्प-गंधाक्षता वाहिल्या. श्रीसद्‌गुरूंच्या पूजनाचा श्रद्धापूर्वक शास्त्रोक्त संकल्प सोडून त्याने श्रीगुरुचरणांवर मोठ्या भक्तिभावाने मस्तक ठेवले, अनन्यभावें शरणागत होऊन श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार केला आणि श्रीगुरूंचे भवतारक चरण अतीव पूज्यभावानें आपल्या सर्वांगावरून फिरविले. तदनंतर पंचामृतादि स्नान, रुद्रसूक्तासह अभिषेक करून श्रीगुरुचरणांची षोडशोपचारे पूजा केली. त्या चरणतीर्थाचेही त्याने मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजन केले. त्यावेळी गीतवाद्यांच्या गजरात नीरांजन ओवाळीत आरती केली. अनेक प्रकारचे स्तुतीपर गायन केले अन त्या श्रद्धावान दाम्पत्याने श्रीगुरुमहाराजांना अनन्यभावें शरणागत होऊन नमन केले. या विशेष श्रीगुरुपूजनानंतर सर्व शिष्यवर्गाचाही योग्य आदरसत्कार करून त्यांचेही यथाविधी पूजन केले. सर्वांना वंदन केले. त्यानंतर नमनभावें सर्वांसाठी भोजनाची पानें मांडली. पानांभोवती सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या, अष्टदल कमल होते. प्रत्यक्ष श्रीगुरुमहाराज भिक्षेला येणार होते, त्यांमुळे त्या मंगल प्रसंगी जाखाईने खास रांधलेलें अनारसें, उडदाचे पदार्थ आणि अष्टविध पक्वान्नें वाढले. त्या भाविक दाम्पत्याचे ते उत्तम असे आदरातिथ्य स्वीकारून श्रीगुरुनाथांनी आपल्या शिष्यांसह प्रीतीपूर्वक भोजन केले. तो पोटशूळ असलेला ब्राह्मणदेखील पोटभर जेवला. श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी समूळ नष्ट झाली. असा त्यावेळी मोठा आनंदसोहळा झाला. त्याचा हा भक्तिभाव पाहून श्रीगुरु संतुष्ट होऊन त्याला म्हणाले, " मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या वंशात माझे भक्त होतील."     
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्‌गुरु । त्रयमूर्तींचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आता तुम्हांसी । तें कृपा करणे गुरुमूर्ति ॥११॥ 
श्रीगुरुंचे हे आशीर्वचन ऐकून सायंदेवाला अत्यानंद झाला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची स्तुती केली. तो म्हणाला, " हे जगदगुरो, तुमचा जयजयकार असो. तुम्ही प्रत्यक्ष त्रयमूर्तींचे अवतार आहात. परंतु आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हांला मानवरूपांत दिसता. तुमचा महिमा वेदांनाही कळलेला नाही. तुम्हीच विश्वव्यापक असून साक्षात ब्रह्मा-विष्णु व महेश आहात. आपण भक्तजनांना तारण्यासाठीच हा मानववेष धारण केलेला आहे. तुमचे माहात्म्य वर्णन करणे आम्हांस कदापिही शक्य नाही. हे कृपामूर्ती, माझे एक मागणें तुम्ही पूर्ण करावे. - माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी । इह सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्‌गती ॥१२॥  
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनी । सेवा करितो द्वारयवनी । महाशूरक्रुर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी । घात करितो जीवेसी । याचि कारणे आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी ॥१५॥ 
अशी प्रार्थना करून सायंदेवाने पुन्हा एकदा श्रीगुरुंची करुणा भाकली. गुरुकृपेचे कवच लाभण्यासाठी परोपरीची विनवणी करत तो म्हणाला," मी येथे ज्या यवन अधिकाऱ्याच्या सेवेत आहे, तो अत्यंत क्रूर आहे. तो यवन दरवर्षी एका विप्राला ठार मारतो, आज मला त्याने केवळ याच कारणासाठी बोलावले आहे. मी तिथे गेलो तर तो माझे प्राण निश्चितच घेईल. पण या भवतारक श्रीगुरुचरणांचे दर्शन झाल्यावर मला असे मरण कदापिही येणार नाही.   
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । अभयंकर आपुले हाती । विप्रमस्तकी ठेविती । चिंता न करी म्हणोनिया ॥१६॥ भय सांडूनि तुवां जावे । क्रुर यवना भेटावे । संतोषोनि प्रियभावे । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥१७॥ जंववरी तू परतोनि येसी । असो आम्ही भरंवसी । तुवां आलिया संतोषी । जाऊ आम्हीं येथोनि ॥१८॥ निजभक्त आमुचा तू होसी । पारंपर-वंशोवंशी । अखिलाभीष्ट तू पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥ 
सायंदेवाचा असा दृढभाव पाहून श्रीगुरुमहाराज प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला अभयहस्त ठेवला आणि त्या भक्तास ग्वाही देत म्हणाले," तू अगदी निर्भय होऊन त्या क्रूर यवनाकडे जा. तो तुझा आदर-सत्कार करून तुला आमच्याकडे परत पाठवील. तू सुखरूप परत येईपर्यंत आम्ही येथेच राहू, हे आमचे अभिवचन आहे. त्यानंतरच आम्ही येथून गमन करू. तू आमचा अत्यंत प्रिय भक्त आहेस. तुझ्या वंशास गुरुभक्तीचे वरदान असेल. तुझे सर्व अभीष्ट कल्याण होईल. तुला उत्तम संततिसुख लाभेल." दत्तभक्तहो, अशी ग्वाही केवळ सद्‌गुरुच देऊ शकतात, नाही का ?
तुझे वंशपारंपरी । सुखे नांदती पुत्रपौत्री । अखंड लक्ष्मी तयां घरी । निरोगी होती शतायुषी ॥२०॥ स्वयं श्रीदत्तमहाराजांनी वरस्वरूप दिलेले असे अनेक शुभाशिष - श्रीदत्ताशिष - तुझे पूर्वज सायंदेव यास लाभले.     
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथे होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा । ब्राह्मणाते पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥२२॥ विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥२३॥ कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रुर दुष्ट ॥२४॥ गरुडाचिया पिलीयांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसे तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचे भय नाही ॥२६॥ 
श्रीगुरुकृपेचे असे अमोघ वरदान प्राप्त करून सायंदेव त्या यवनाकडे सत्वर निघाला. यमासारखा भयंकर असा तो यवन राजा अत्यंत दुष्ट होता. सायंदेवाला पाहताच तो क्रोधाने अग्निज्वाळांसारखा लालेलाल झाला. आता कुठल्याही क्षणीं हा आपल्याला मारणार, अशी भीती सायंदेवास वाटली. तोच एक नवल घडलें! तो यवन तिथून तोंड फिरवून घरांत गेला. सायंदेव जरी भयभीत झाला होता, तरी तो श्रीगुरुंचे मनोमन ध्यान करून प्रार्थना करू लागला - वाळवीला कितीही राग आला तरी ती अग्नीस स्पर्शही करू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरुकृपेचे अभेद्य कवच लाभलेल्यास दुष्ट कधीही इजा करू शकत नाही. गरुडाच्या पिल्लांना का कधी सर्प खाऊ शकेल ? किंवा मग ऐरावतासारखा महाकाय हत्ती असला तरी तो सिंहाला कधी खातो का ? तसेच गुरुकृपा ज्यावर होते, त्याला कलिकाळाचेही भय नसते. गुरुमहाराजांचा वरदहस्त ज्याच्या मस्तकी आहे, त्याला अपमृत्यूची भीती बाळगण्याचे कारणच काय? - ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचे भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ ज्यासि नांही मृत्यूचे भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही ॥२८॥ श्रीगुरुकृपेचा हा असा प्रभाव आहे.  
ऐसेपरी तो यवन । अन्तःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाही ॥२९॥ हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसी । प्राणांतक व्यथेसी । कष्टतसे तये वेळी ॥३०॥ स्मरण असे नसे कांही । म्हणे शस्त्रे मारितो घाई । छेदन करितो अवेव पाही । विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण जाहले तये वेळी । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळी । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ येथे पाचारिले कवणी । जावे त्वरित परतोनि । वस्त्रे भूषणे देवोनि । निरोप दे तो तये वेळी ॥३३॥
इकडे तो यवन अधिकारी जो शयनगृहांत गेला तो एखाद्या भ्रमिष्टासारखा अस्वस्थ झाला. त्याला अचानक निद्रा येऊ लागली. काही वेळांतच तो जागा झाला, तेव्हा त्याला हृदयशूळ होऊन प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. आपल्याला काय होत आहे, आपण कुठे आहे हेच त्याला कळेना. त्यावेळी त्याला कशाचेच भान राहिले नाही. एक तेजस्वी विप्र शस्त्रांचे प्रहार करून आपले सर्व अवयव तोडीत आहे, असा त्याला भास होऊ लागला. काही क्षणांतच त्याला देहभान आले आणि एकदम आठवले की त्याने आज सायंदेवाला बोलावले होते व तो बाहेर उभा आहे. हे स्मरण होताच तो यवन आपल्या शयनगृहांतून लगेचच धावत बाहेर आला आणि त्या सायंदेव ब्राह्मणाच्या पायांवर लोळण घेत म्हणाला," तूच माझा स्वामी आहेस. तुला येथे कोणी बोलावले ? आता तू सत्वर परत जा."
दत्तभक्तहो, वास्तविकता अशी होती की त्या यवन अधिकाऱ्याकडे सायंदेव विप्र चाकरी करत होता, मात्र श्रीगुरुकृपेमुळे त्या यवन अधिकाऱ्याची बुद्धी पालटली होती. एव्हढेच नव्हें तर त्याने वस्त्रें-भूषणें देऊन सायंदेवाचा आदर-सत्कार केला आणि त्याला घरी परत जाण्यास सांगितले. श्रीगुरूंच्या वचनांची प्रचिती त्या शिष्योत्तमास आली होती. खरोखरच, त्या यवन अधिकाऱ्याने मोठ्या प्रेमाने सायंदेवाला निरोप देऊन घरी पाठविले होते.    
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरी असे वासर । श्रीगुरुंचे चरणदर्शना ॥३४॥ देखोनिया श्रीगुरूसी । नमन करी तो भावेसी । स्तोत्र करी बहुवसी । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥
सायंदेवाची त्यावेळी काय मनःस्थिती झाली असेल, त्याचे वर्णन करणे सर्वथा अशक्य आहे. समोर मृत्युभय दिसत असतांना केवळ श्रीगुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून हा गुरुभक्त यवन अधिकाऱ्याकडे आला होता. त्याच्या गुरुसेवेचे फळ त्याला मिळाले होते, त्याचे गंडांतर टळले होते. त्याच्या चित्तांत अत्यंत कृतज्ञभाव दाटला होता. कधी एकदा श्रीगुरुचरणांचे दर्शन होईल ? असा विचार करीत तो शीघ्र प्रवास करत होता. अतिशय आनंदाने तो सायंदेव गोदाकाठी असलेल्या 'वासर' नामक आपल्या गावी परतला. तेथे श्रीगुरुमहाराज होतेच. सायंदेवाने अनन्यभावानें त्यांच्या चरणकमळांवर मस्तक ठेवले आणि अनेक प्रकारे गुरुस्तुती केली. नंतर यवन अधिकाऱ्याकडे घडलेला सर्व वृत्तांतही सांगितला.       
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊ म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥ ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबे आतां तुमचे चरण । आपण येईन समागमे ॥३७॥ तुमचे चरणाविणे देखा । राहो न शके क्षण एका । संसारसागर तारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥ उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसे स्वामी आम्हासी । दर्शन दिधले आपुले ॥३९॥ भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हा सोडणे काय नीति । सवे येऊ निश्चिती । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥ 
त्रिकालज्ञानी श्रीगुरुंना सर्व ज्ञात होतेच, सायंदेवाचा भाव पाहून ते संतुष्ट झाले. " शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ।" असे ते गुरुमहाराज पुन्हा एकदा त्याला अभयवचन देऊन म्हणाले," आता आम्ही दक्षिणेकडील तीर्थयात्रा करण्याकरिता येथून निघू." आपल्यावर नुकतेच आलेले प्राणघातक संकट केवळ श्रीगुरुकृपेमुळे टळले, हे सायंदेवाला पुरतें उमगले होते. ' खोटी ही प्रपंचमाया । आलें आज कळोनीया ।' ही उपरती त्याला झाली होती. त्यामुळे श्रीगुरुंचा विरह त्याला सहन होईना, तो हात जोडून प्रार्थना करीत त्यांना म्हणाला," महाराज, आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ।.. हे तुमचे हे दिव्य चरण सोडून मी आता कोठेही जाणार नाही. मीही तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो. हे कृपासिंधो, या भवसागरातून तारणारे केवळ तुम्हीच आहांत. पूर्वी भगीरथाने सगरपुत्रांच्या उद्धारासाठी गंगा भूमीवर आणली. तसेच तुम्ही प्रत्यक्ष त्रिमूर्तीस्वरूप स्वामी असून आमच्या उद्धारासाठी मनुष्यरूप धारण करून या भूतलांवर अवतरीत झाला. भक्तवत्सल अशी तुमची ख्याति आहे, आता ते ब्रीद सोडणें योग्य आहे का ? मी तुमच्याबरोबर येणारच." आणि अनन्य शरणागत होऊन त्याने गुरूंचे पाय धरले.  
येणेपरी श्रीगुरूसी । विनवी विप्र भावेसी । संतोषोनि विनयेसी । श्रीगुरू म्हणती तये वेळी ॥४१॥ कारण असे आम्हा जाणे । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणे । संवत्सरी पंचदशी ॥४२॥ आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करू हे निश्चित । कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनी भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥ न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे । म्हणोनि हस्त ठेविती मस्तके । भाक देती तये वेळी ॥४४॥ 
सायंदेवाने आपला सर्वस्वभाव श्रीगुरुचरणीं अर्पून अशी विनवणी केली, तेव्हा गुरुमहाराज त्याच्यावर प्रसन्न झाले आणि  " सांप्रत आम्हांला दक्षिणेकडील तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देऊ. त्यांवेळी आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू तुझी पत्नी-मुले आणि इतर नातेवाईकांसह मला भेट. तू निःशंक होऊन सुखाने राहा, तुझी सर्व संकटे व दुःखे गेलीच म्हणून समज." असे म्हणत त्या सायंदेवाच्या मस्तकावर हात ठेवून श्रीगुरुंनी त्याला अभिवचन दिले. परमात्मने दत्तात्रेयमहाराजस्वरूप श्रीनृसिंह सरस्वती महाराजांची भक्तवत्सलता अशी आहे.
ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरू निघाले तेथोनि । जेथे असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥ समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरू आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथे राहिले गुप्तरूपे ॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठे ठेविले ॥४७॥ गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारून । सांगे नामकरणीस ॥४८॥ पुढील कथेचा विस्तारू । सांगता विचित्र अपारु । मन करूनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥
सिद्ध म्हणतात - त्यानंतर त्याचा निरोप घेऊन श्रीगुरु समस्त शिष्यांसोबत तिथून निघाले. अनेक तीर्थे पाहात ते वैजनाथ नामक क्षेत्रीं आले. आरोग्यभवानीचे स्थान असलेले हे अतिशय प्रख्यात असे तीर्थ आहे. श्रीक्षेत्र वैजनाथ येथे श्रीगुरुंनी काही काळ गुप्त रूपाने राहायचे ठरविले. त्यावर नामधारकाने मोठ्या कुतूहलाने विचारले," श्रीगुरुंना गुप्त होण्याचे कारण काय ? मग त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या शिष्यपरिवारांस कोठे जाण्यास सांगितले ?" कामधेनूस्वरूप गुरुचरित्रातील पुढील कथा अतिशय अद्भुत आहे. श्रोतें हो, तुम्ही ती मन एकाग्र करून ऐका.    
॥ इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः ॥

दत्तभक्तहो, केवळ ४९ ओव्यांचा हा चौदावा अध्याय तुम्ही विशेष पाठांत ठेवावा. तो श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. याचे भक्तिभावाने पारायण व चिंतन केल्यास दुर्धर संकटांचा नाश होतो, असे अनेक थोर पुरुषांचे वचन आहे. 
पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणाचे कसे निमित्त झाले आणि सायंदेवावर श्रीगुरुंची कृपा कशी झाली, हा कथाभाग या अध्यायात आलेला आहे. यांत विशेष लक्षांत घेण्यासारखा मुद्दा असा की सायंदेवांकडून प्रथम श्रीगुरुंनी प्रामुख्याने १)परोपकार २)अन्नदान ३)गुरुसेवा-गुरुभक्ती अशी तीन प्रकारची सेवा करून घेतली आणि सर्वात महत्वाची ४)गुरुवाक्य प्रमाण ही श्रद्धा - अशी कसोटीही घेतली. तदनंतरच त्याचे प्राणसंकटातून रक्षण केले. प्रथमतः त्या उदरव्यथेच्या ब्राह्मणास घरी भोजनासाठी बोलाविण्यास तो साशंक होता. कारण भोजन करून जर त्या पोटशूळाची व्याधी असलेल्या ब्राह्मणाचा जीव गेल्यास आपल्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल, अशी भीती सायंदेवास होती. मात्र प्रथमभेटीतच त्याने श्रीगुरुंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून उदरव्यथेच्या ब्राह्मणास भोजनास आपल्या गृहीं बोलाविले. पुढें पूजन करणे, भिक्षान्न भोजन देणे ही सेवा करतांना सायंदेव व त्याची पत्नी जाखाई यांचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्यांमुळेच श्रीगुरु प्रसन्न झाले.

' न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे ।... ' अशी भाक प्रत्यक्ष त्या परब्रह्माकडून सायंदेवाला मिळाली, त्याच्या भाग्याचे काय अन किती वर्णन करावे बरें ? वरद-कृपाघन श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी वासरब्रह्मेश्वर इथे त्याच्या घरी भिक्षा घेतलीच, अन तद्-नंतर गाणगापुर येथे श्रीगुरु असतांनादेखील पुनःश्च स्वगृहीं यथासांग श्रीगुरुपूजन आणि मोठी समाराधना करण्याचे महद्भाग्य या सद्‌भक्तास अन त्याच्या संपूर्ण परिवारास लाभले. भक्तकामकल्पद्रुम दत्तमहाराज किमान दोनदा तरी या शिष्योत्तमाच्या घरीं गेले होते, असा श्रीगुरुचरित्रांत स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, पुढें पंधरा वर्षांनी नित्य श्रीगुरुदर्शन, सेवा, सान्निध्य, काशीयात्रापुण्यफळ आणि प्रत्यक्ष श्रीगुरुदेवांच्या उपस्थितीत अनंतव्रत पूजन असे अनेक परमलाभ सायंदेवास प्राप्त झाले. पुढे, श्रीगुरु निवडक शिष्यांना घेऊन श्री शैल्य यात्रेस निघाले, त्यावेळीसुद्धा सायंदेव गुरुंसमवेत होता. श्रीगुरु कर्दळीवनात गुप्त झाल्यावर जी चार प्रसादपुष्पें आली होती, त्यातील एक सायंदेवाने घेतले होते. अर्थात त्याचा जो अनन्यभाव श्रीगुरुचरणीं स्थिर झाला होता, त्याचेच हे वरदानस्वरूप फळ होते.

' कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें ।... ' या उक्तीची प्रचिती असंख्य दत्तभक्तांनी आजपर्यंत नित्य अनुभवली आहे. तेव्हा आपणही - " श्रीगुरुकृपेची त्वरित प्रचिती देणाऱ्या या मेरुमणि अध्यायाचे नित्य स्मरण-पठण घडावें आणि गुरुमहाराजांच्या ठायीं सायंदेवाचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्याच्या किमान एक कोट्यांश भक्तिभाव तरी दत्तमहाराजांची ही अत्यल्प सेवा करतांना आपल्या मनांत दृढ व्हावा !", हीच त्या भक्तवत्सल, शरणागत-तारक आणि भवभय-वारण अशा श्रीदत्तप्रभूंच्या चरणीं प्रार्थना करू या !

   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

आवडे दत्तभक्तांसी ...

Jul 20, 2023

श्रीगुरुसत्कथामृतलता - वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया...


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीएकदंतपद वंदुनि शारदाही । ते पुण्यशील बहु पूर्वज संत पाहीं ॥ वाग्यज्ञ आचरुनि सिद्धकृपा मिळाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१॥ ब्रह्मा वदे कलिसि कीं गुरुपादसेवा । माहात्म्य जें अमुप दुर्लभ देवेदेवां ॥ सांदीपनीचरित चित्ति बरें उसाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२॥ भक्ताभिमान धरुनी भगवंत घेतो । नानावतार जगतीं असकृत् प्रभू तो ॥ हें अंबरीशचरितावरुनी शिकाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३॥ अत्रीमुनी तप करी घनघोर जेव्हां । ब्रह्मा हरीहरहि तुष्ट अतीव तेव्हां ॥ तत्पुत्र होती जगिं धन्य तदीय जाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४॥ 'आपाळ' नामक सुसात्त्विक विप्र होता । पीठापुरी तदिय सद्‌गुणि तेचिं कांता ॥ 'श्रीपादवल्लभ' तदीय सुपुत्र गाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥५॥ दे आत्मलिंग शिवशंभु दशाननासी । तैं पाठवी हरि बळेंचि गजाननासी ॥ तें स्थापि भूमिवरि तो जन उद्धराया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥६॥ गोकर्णीचा सुमहिमा मुनि गौतमें कीं । सांगुनि उद्धरित कल्मषपाद लोकीं ॥ श्रीपाद राहति तिथें सुतपा कराया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥७॥ अत्यंत मूढ निजपुत्र म्हणून दुःखी । पुत्रात्मघात करण्या विधवा विलोकी ॥ ठेवीत मस्तकिं करासि कृतार्थ व्हाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥८॥ होता भला रजक एक कुरूपुरांत । सेवा मठापुढति नित्य करी निवांत ॥ त्या दे वर प्रबळ भूपचि शीघ्र व्हाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥९॥ तो 'वल्लभेश' म्हणूनी द्विज एक भक्त । द्रव्यार्थ चोर वधिती कपट कृतांत ॥ श्रीपाद तैं प्रगटुनी उठवी स्वकार्या । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१०॥ होता करंजपुरिं विप्रहि माधवाख्य । अंबा म्हणोनि ललना गृहिं सर्व सौख्य ॥ पुण्योदयें प्रगटला 'नृहरी' जगीं ह्या । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥११॥ पाहोनिया अमित द्‌भुत बाललीला । मातापिता करिति ते व्रतबंधनाला ॥ वाराणसीप्रति निघें तप आचराया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१२॥ संन्यास घेउनि बळें गुरुसंप्रदाया । जो वाढवी निजकृपें जन उद्धराया ॥ शूळव्यथा शमवि विप्र सुखी कराया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१३॥ सायंसुराख्य निजभक्त वरप्रदान । रक्षीयला निजबळें प्रभुनीं दयेनें ॥ जाखाइ-नामक सतीप्रति तोषवाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१४॥ झाले बहूत जन शिष्य तयांसि धाडी । तीर्थासि आपण निरंजनि दीस काढी ॥ तीर्थेहि वंदिति जयासि पवित्र व्हाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१५॥ एकासि धौम्यमुनि-शिष्यकथा कथूनी । धाडीयले निजगुरूप्रति शांतवोनी ॥ दावी जनासि गुरुभक्ति भवा तराया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१६॥ कृष्णातिरीं मग पहा भुवनेश्वरीला । भेटोनि, पैलतिरिं आवडिं वास केला ॥ विद्या जडासि दिधली नमतांचि पायां । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१७॥ विप्रांगणस्थितच वेलहि घेवड्याचा । तोडोनि टाकि बघण्यास्तव भाव साचा ॥ द्‌रत्नहेमनिधि देई दरिद्र जाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१८॥ कृष्णानदी मिळत जेथहि पंचगंगे । तो जातसे अमरपूरिं पहां निजांगें ॥ चौसष्ट योगिनि जया पुजिती तरायां । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥१९॥ होती शिरोळपुरिं एक सुविप्रपत्नी । आराधि सद्‌गुरुसि ती सुत दे म्हणोनी ॥ तीतें दिलाहि वर सत्वरि पुत्र व्हाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२०॥ मृत पुत्राप्रतिहि दे नच जाळण्यासी । विश्वास तो श्रीगुरुपदीं दृढ कीं जियेसी ॥ सत्पुत्र तो उठवि स्वप्निहि येऊनीयां । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२१॥ द्‌विप्रगेहिं महिषी खरि वांझ होती । भिक्षेति जाउनि तया स्थळि बैसताती ॥ दोही म्हणूनि वदतां पय ये दुहाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२२॥ ऐकोनि कीर्ति नृप ये शरण त्वरेंसीं । या गाणगापुरि चला विनवी वचेसी ॥ नेई ब्रह्मराक्षस पहा निजमोक्षठाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२३॥ लोकीं त्रिविक्रम करी कुमसीसि निंदा । तो विश्वरूप निज दावुनि देई बोघा ॥ सद्‌भक्त येती बहु नित्य जया पहाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२४॥ उन्मत्त विप्र छळिती सकलां द्विजांसी । ते मागती विजयपत्रचि आपणासी ॥ आणी त्रिविक्रम जयाप्रति गर्व जाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२५॥ प्रेमें किती तरि तया समजाविलें कीं । सांगूनि वेदरचना करि कोप शेखीं ॥ भोगाल कर्म अपुले म्हणती जनीं या । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२६॥ भस्माभिमंत्रण करोनिहि बोलविलें । वेदोक्तमंत्र पतितामुखि हो स्वलीलें ॥ शापोक्तिनें अधम पावति मृत्युठाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२७॥ त्या अंत्यजासि उपजे मति विप्र व्हावें । तत्पूर्वकर्म वदती म्हणुनि स्वभावें ॥ होई न मान्य; कथिती तनु तैं धुवाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२८॥ तेव्हां त्रिविक्रम पुसे गुज काय हें जी । भस्मप्रभाव कथिला मग त्या समयीं ॥ तैं धन्य धन्य म्हणुनी नमिताति पायां । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥२९॥ माहूरिं विप्रसुत रोगि निराशचित्त । घेऊनि येई ललना गुरुदर्शनार्थ ॥ तो मृत्यु पावत तदा प्रगटेचि ठाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३०॥ बोधोनि धर्म सगळे तिजला सतीचे । पाही कसोनि निजधैर्यहि बापुडीचें ॥ आली तदा शरण आग्रह सोडुनियां । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३१॥ निर्वासनात्मक विशुद्धचि चित्त होतां । रुद्राभिषेकजल सिंधुनियां अतौता । भर्ता जिवंत करिती निजसौख्य व्हाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३२॥ सांगून गोष्टि बरि कुक्कुटमर्कटांची । वेश्येचिही विमलभक्तचि जी शिवाची ॥ रुद्राक्षधारणफळाहि कथी स्वमाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३३॥ काश्मीरराजसुतमृत्यु पराशरें कीं । तो टाळिला करवुनी अतिरुद्र शेखीं ॥ जो रुद्रसूक्त-महिमा कळवी जनां या । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३४॥ रुद्राक्ष-रुद्रमहिमा कथुनी सतीला । सीमंतिनीसुचरितामृतही तियेला ॥ सौभाग्यवर्धक शिवव्रत दे कराया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३५॥ घेतां परान्न किति दोषहिं लागताती । विप्रस्त्रियेप्रति बरें समजाविताती ॥ आन्हीक कर्म पुसतां कथिती कळाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३६॥ पूजान्नसेवनविधी, शयानान्त कर्म । अत्यंत विस्तृतपणें शिकवी स्वधर्म ॥ देई तया द्विजवरा वर सौख्य व्हाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३७॥ भिक्षा करूं म्हणुनि भास्कर विप्र आला । स्वल्पप्रमाण घृत घेउनि तंडुलाला ॥ चारी सहस्त्र जन तृप्त करी स्वमाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३८॥ गंगाख्य वृद्धवयसा ललनाहि वंध्या । नाहीं अपत्य म्हणुनी जनिं होय निंद्या ॥ जो देतसे वर सुता-सुतही पहाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥३९॥ एका द्विजा प्रबळ कुष्ट निजांगिं होई । येतांचि तो शरण शुष्कचि काष्ठ देई ॥ त्याचा करी तरु कृपेंहि विशुद्ध काया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४०॥ गंगाधरात्मज-सुपूर्वज-पुण्यपात्रा । त्वष्ट्याचिया निजमुखें बरि काशियात्रा ॥ सांगूनि काशिहि दाविति योगमाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४१॥ कौंडिण्य-सन्मुनि कथा वदुनी स्ववाचें । पाळी म्हणे व्रत अनंतचतुर्दशीचें ॥ सद्‌भाग्यवृद्धि-वर दे भजनीं रमाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४२॥ ने तंतुका नयन झांकुनि जो निजांगें । श्रीपर्वतावरि पळांतचि योगमार्गे ॥ तेथेंहि तो बघतसे निजयोगिवर्या । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४३॥ कुष्ठी द्विज व्यथितचित्त करि तपाला । देवी वदे शरण जा नृहरीपदाला ॥ व्याधी हरी सुचवुनी निजगुण गाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४४॥ होता कवी चतुर हिप्परगी-पुरींत । कल्लेश्वरावरि कवित्व सदा करीत ॥ केला स्वशिष्यवर दावुनि दिव्य माया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४५॥ सच्छिष्य सातजण इच्छिति सद्‌गुरुला । न्याया दिवाळी करण्या अपुल्या पुरीला ॥ रूपेंहि घेई तितुकी बसुनी स्वठाया | वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४६॥ सद्‌भक्त शूद्र करि नित्यचि वंदनाला । कापूनि टाकविति कोमल यावनाळा ॥ देती पुन्हां पिकवुनि बहू धान्य खाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४७॥ कैशी नदी अमराजा बहु पुण्यखाणी । गंधर्वपूर-इतिहास वदे स्ववाणी ॥ रत्नाई-कुष्ठ हरिलें अघटीत माया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४८॥ शंभूसि पार्वति पुसे अति गुह्यवार्तां । सांगे तियेस शिव तो गुज ' गुरुगीता ' ॥ लावीत मंत्रमयि सिद्ध मुखें वदाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥४९॥ वैदूरपूरनृपती निज शिष्य साचा । पूर्वील तो रजक ओळखुनी तयाचा ॥ नेला लयासि झणि स्फोटक, सौख्य व्हाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥५०॥ ऐसें चरित्र सुविचित्र करूनियां कीं । घाली पदातळिं पहा कालिकाळ लोकीं ॥ श्रीशैल्यदर्शनमिसें त्यजि जो स्वठाया । वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥५१॥ सद्‌भक्त शिष्यजन सर्वहि दुःखि होती । त्यांसी गुरू कथुनि बोधहि शांतवीती ॥ कीजे त्रिकाळ वरि आरति सौख्य व्हाया । बोले, वंदूं तया प्रभुवरा गुरुदत्तराया ॥५२॥ मी ठेवितों मठिं मदीयचि पादुका कीं । आराधनेसि सकलेप्सितदाचि लोकीं ॥ संतुष्ट मी बहुपरा गुणगायनानें । घ्या भोगमोक्षहि कथामृतदिव्यपानें ॥५३॥ ऐसें वदोनि निजभक्त-गणानुरागी । श्रीमल्लिकार्जुन वनाप्रति जाय वेगीं ॥ पुष्पासनावरि वसोनि सरित्प्रवाहीं । धाडी प्रसादसुमनें निजसौख्यदें हीं ॥५४॥ ऐसें चरित्र पठतां स्मरतांहि लीला । त्रैमूर्ति होती वश सत्वरि भाविकाला ॥ इष्टार्थ पूर्ण करिती भव हा तराया । सत्कीर्ति ही जगतिं नित्यचि विस्तराया ॥५५॥ गोमांचलीं जनहितार्थ वसे निवांत । माशैल नामक सुपुण्यवर स्थलांत ॥ दुर्गात्मदत्त विभु तच्चरणावरी ही । वाक्पुष्प-अंजलि समर्पिलि अल्प पाही ॥५६॥ श्रीमत्पंतुमहानुभाव-जननग्रामीं अजापूरी कीं । झाली श्रीगुरुसत्कथामृतलता आज्ञे तयाच्या निकी ॥ श्रीगंगाधरपुत्र धन्य गुरु सद्‌भक्ताग्रणी वंदु या । राधाकृष्णसुता दिगंबर गुरुपायीं सदा बांधु या ॥५७॥

॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


स्रोत : श्री साईलीला