Showing posts with label दत्तजन्म आख्यान. Show all posts
Showing posts with label दत्तजन्म आख्यान. Show all posts

Dec 9, 2024

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - श्रीगुरुदेवदत्त जन्माध्याय


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
श्रीगुरुसंतती मूळपीठ । कवण स्थलीं झाले प्रकट । - गुरुपरंपरेची ही कथा अत्यंत प्रासादिक आहे. पूर्णब्रह्म हे निर्विकल्प, निरंजन आणि भेदत्रयवर्जित होते. निराकार आणि निरुपाधिक असलेल्या त्या परमात्म्यास अनेक स्वरूपांत प्रगट व्हावे, अशी इच्छा झाली. अनादि स्वयंभू प्रमाण । वेद साक्षात नारायण । पिंड ब्रह्मांड झाले निर्माण । साद्यन्त वर्णी यथार्थ तें ॥ या बुद्धीयुक्त अस्तित्वास हिरण्यगर्भ असे म्हणतात. पंचमहाभूतांच्या कमी-अधिक प्रभावाने जी सृष्टी निर्माण होते, त्यालाच स्थूलसृष्टी असे संबोधतात आणि या समस्त जीवसृष्टीतील नाम, रूप, आकृती, स्थावर आणि जंगम या सर्वांशी तादाम्यता साधणाऱ्या त्या परमात्म्याचेच विराट असे नाम आहे. रजोगुणापासून ब्रह्मदेव या सृष्टीतील सर्जनशक्तीचे कार्य करतात. सत्वगुणापासून श्रीहरि भरण, पोषण आणि संगोपनाचे कार्य करतात. तर तमोगुणापासून महेश्वर संहरणशक्तीचे कार्य करतात. विधात्याचे जे अनेक मानसपुत्र झाले, त्यांत सप्तऋषी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांतील ब्रह्मज्ञानी अत्रि ऋषी परमश्रेष्ठ होते. त्यांची अनसूयानामक पत्नी वेदाचरणी पतिव्रता होती. पुत्रप्राप्तीसाठी अत्रिऋषींनी अनसूयेसह कुलाद्रि पर्वतावर उग्र तपश्चर्या केली. निर्विध्या नदीच्या तीरी एका पायावर उभे राहून प्राणायामादि करून त्यांनी एकाग्रतेने तप केले. महासती अनसूया एकनिष्ठतेने त्यांची सेवा करत असे. शंभर वर्षांनंतर त्या उग्र तपाने अत्रिऋषींच्या मस्तकांतून अग्नीच्या ज्वाला प्रगट होऊ लागल्या. " या भयंकर दाहापासून आमचे संरक्षण करावे. ", अशी त्यावेळी महेंद्रादिक सुरवरांनी त्रिदेवांची प्रार्थना केली. त्यांना अभयवचन देत ब्रह्मदेव हंसावर, श्रीविष्णु गरुडावर आणि शूलपाणि नंदीवरआरूढ होऊन अत्रिऋषींच्या आश्रमीं पोहोचले. कृपावलोकने हास्यवदन । भक्तवत्सल सुप्रसन्न । ऋषीनें प्रेमे विलोकून । साष्टांग नमन केले तयां ॥ अत्रि-अनसूयेने त्रिदेवांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले, तेव्हा प्रसन्न होऊन त्रिदेवांनी, अथास्मदंशभूत निर्विकल्प । केवल पूर्णब्रह्म स्वरूप । लोकविख्यात ज्ञानदीप । पुत्र होईल असे आशीर्वचन दिले. श्रीमदभागवतात वर्णिलेली श्रीदत्तजन्माची कथाही मोठी सौख्यप्रद आहे. पूर्वी ब्रह्मर्षी नारदांनी श्रेष्ठ अशा विशुद्धसत्वरूपाच्या नित्यदर्शनासाठी मोठे अनुष्ठान आरंभिले. तेव्हा, श्रीहरि विष्णु प्रसन्न झाले आणि त्यांनी त्रिदेव एकत्र आले तरच असे दर्शन शक्य होईल, असे नारदमुनींना सांगितले. हे कार्य साधण्यासाठी नारदमुनी भूमंडळी संचार करीत करीत अत्रिऋषींच्या आश्रमी आले. ऋषींनी त्यांचे योग्य आदरातिथ्य-पूजन केले. त्यावेळी अत्रिमुनींनी देवी अनसूयेला पिण्यासाठी पाणी मागितले. अनसूया तेव्हा हातात मुसळ घेऊन तांदूळ कांडीत होती. पतिसेवाआज्ञातत्पर । मुसल थांबविले वरचेवर अधर । सुगंध शुद्धोदक रूचिकर । दिधलें सुपात्री आणूनी ॥ अनसूयेचे पतिव्रतासामर्थ्य इतके की तिने मुसळ वरच्यावर ठेवले आणि पतिदेवांना पाणी आणून दिले. हे पाहून नारदमुनींस महदाश्चर्य वाटले. तत्क्षणीं त्यांना त्रिदेवांच्या एकत्रीकरणाची एक युक्ती सुचली. नारदऋषि कलहप्रिय । जगत्कल्याणार्थ हिंडती अक्षय । हरि गुरु नारायण जय जय । मुखें उच्चारित निघाले ॥ एके दिवशी हरिप्रिया लक्ष्मी आणि ब्रह्मदेवपत्नी सावित्री या दोघी शिवशक्ती पार्वतीला भेटावयास कैलासभुवनास आल्या होत्या. जगन्माता उमेने त्या दोघींचे यथायोग्य आदरातिथ्य केले. एकमेकींशी लीलाविनोद करीत त्या एकमेकींची चौकशी करू लागल्या. त्यावेळी अकस्मात नारदमुनी त्या स्थानीं आले. नारदमुनींना उत्तम सिंहासनी बसवूनत्या त्रिदेवींनी त्यांचे पूजन केले अन मधुर स्वरांत त्या तिघींनी नारदमुनीस विचारले, या त्रैलोक्यांत कोठे असती । आम्हांसम कोण स्त्रिया सुसती । नारदा हे यथामति । विदित व्हावें आम्हांला ॥ तेव्हा त्या कलहप्रिय ब्रह्मर्षि नारदमुनींनी त्यांना महा साध्वी अनसूया हीच या ब्रह्मांडांत सर्वोपम पतिव्रता-शिरोमणी आहे, हे सांगितले. महर्षी अत्रिंची पत्नी अनसूया ही तिच्या नावाप्रमाणेच असूयाविरहित असून पतिसेवेत सदा तत्पर, कुशल गृहस्थाश्रमीं, अभ्यागतांचे उत्तम आदरातिथ्य करणारी आहे. त्या सतीच्या केवळ दर्शनाने अखिल सुरवरच नव्हे तर पापी जनही पावन होतात. अशा प्रकारें, सतीचे गाऊनि यश । क्षोभविले लावुनि कलहास । उमारमासावित्रीस ॥ आणि मग अखंड भगवतचिंतन करीत नारद तिथून निघाले. अशाप्रकारे कळ लावून नारदमुनींनी तिथून गमन केले खरें! मात्र तिन्ही देवी अत्यंत क्रोधायमान झाल्या आणि आपापल्या पतीजवळ जाऊन " अखिल ब्रह्मांडातील श्रेष्ठ महापतिव्रता अशी अनसूयेची महती आपणांस सहन होत नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी करावे." अशी त्यांनी तक्रार केली. या कलहाचे मुख्य कारण नारदमुनी आहेत, हे त्रिदेवांनी अंतर्ज्ञानाने जाणले. मात्र स्त्रीहट्टापुढे त्यांचे तरी काय चालणार ? मग ब्रह्मा, विष्णु आणि शिव तिघेही ब्राह्मणांचे रूप घेऊन भूमंडळी अत्रि ऋषींच्या आश्रमीं आले. अत्रि-अनसूया हे उभयंता सर्वकाळ अतिथींचे पूजन-सन्मान करून त्यांस भोजन देत असत. ऐशा पुण्यश्रमीं अतिथीत्रय म्हणजेच त्रिदेव आले आणि महासाध्वी अनसूयेस म्हणाले, " आम्ही अतिशय क्षुधार्त असून आम्हांस इच्छाभोजन द्यावे." त्यांचे वचन ऐकून अनसूयेने त्यांना उत्तम आसन दिले आणि त्यांचे षोडशोपचारे पूजन केले. तदनंतर तिने विविध पक्वान्नांनी भरलेली पानें मांडून अतिथींना भोजन करण्याची प्रार्थना केली. मात्र त्यावर तुमचे लावण्य स्वरूप देखुनी । अभिलाषा उपजली मनीं । वाढावें तुम्ही वस्त्र त्यागुनी । ऐसे अतिथी बोलती ॥ नाहीतर आम्ही तुझे सत्त्व घेऊन जाऊ, अशी ब्राह्मणवेषांतील त्रिदेवांनी विचित्र मागणी केली. त्यावेळी ब्रह्मविद्वर, त्रिकाल-ज्ञानी अत्रि ऋषींनी हे अतिथी म्हणजेच साक्षात विधिहरिहर आहेत, हे ओळखले. मग सती अनसूयेने निजदैवताचे अर्थात पतीदेव अत्रिऋषींचे ध्यान केले आणि त्यांचे चरणतीर्थ घेऊन ते अतिथींवर सिंचन केले. तात्काळ ते त्रिदेव लहान, गोजिरवाणी बालके झाली. विगतवसन होउनी सती । घेतलीं बालकें अंकावरती । तों स्तनीं दुग्धधारा सुटती । मग ते पाजिती लेंकरा ॥ ती अतिसुंदर, लोभस बालकें पाहून अत्रि-अनसूया या दोघानांही परमानंद झाला आणि हे तीन पुत्र देऊन ईश्वराने आपले वरदान पूर्णत्वास नेले, असेच त्यांना वाटले. आश्रमांतील सर्व आबाल-वृद्ध अनसूया सतीचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून अचंबित झाले.
अत्रिआश्रमांत पुत्रजन्माचा महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होऊ लागला. महापतिव्रता अनसूया सुंदर नवीन वस्त्र नेसून ध्वजा, तोरणें उभारू लागली. तेथील सर्व योगी-मुनीजन मंगलवाद्यांच्या गजरांत सुरेख गीत गाऊ लागले. चतुर्मुख ब्रह्मा जो अनेक ब्रह्मांडांची उत्पत्ति करतो, ज्याचे सर्व वेद हिरण्यगर्भ, स्रष्टा असे स्तवन करतात, तो ब्रह्मदेव अत्रिसदनीं तान्हें शिशु होऊन पाळण्यांत लोळू लागला. जनार्दन अर्थात महाविष्णु जो अनंतसृष्टीचे पालन करतो, जो कैवल्यमोक्षदायी आहे आणि ज्याचा महिमा पुराणें, वेद-व्यासादि गातात तो हरी अत्रिआश्रमीं पाळण्यांत लहान बालक होऊन रडू लागला. कैलासराणा नीलकंठ, शिवशंकर ज्याचा रुद्रमहिमा वेद-पुराणें, स्मृतिशास्त्रेंही सर्वत्र गातात, तो अखंड ब्रह्मानंद अत्रिबाळ होऊन मंद हास्य-रुदन करू लागला. आपल्या या तिन्ही पुत्रांना पाळण्यांत घालून महासती अनसूया मोठ्या ममत्वाने जोजवू लागली. असा त्या स्थानीं मोठा आनंदसोहळा सुरु होता.
इतक्यांत एक नवल वर्तले! देवर्षि नारदमुनी अकस्मात तिथे आले आणि त्रैमूर्ति बालस्वरूपांत पाहून हसू लागले. अत्रिऋषि अनसूया । पूजुनी म्हणती देवर्षिराया । आपण बैसविले निजठायां । केली दया समर्थे ॥ पुढे, नारदमुनी सत्वर देवलोकी गेले. त्यांना पाहून सुरवरस्त्रिया विनवित म्हणाल्या, " गेले कित्येक दिवस आमचे पती स्वस्थानीं आले नाहीत. तुम्हांस त्यांचा काही ठावठिकाणा माहित असेल तर, आम्हांस सांगावे." " तुमचे पती अत्रिआश्रमांत । बाल होऊनी लोळती पाळण्यांत ।" असे नारदमुनींनी सांगताच त्या तिन्ही देवी क्रोधायमान झाल्या आणि देवर्षींसह सत्वर भूलोकी अत्रि ऋषींच्या आश्रमांत आल्या. तिथे त्रिदेवांना बालकस्वरूपांत पाहून त्यांचा राग अनावर झाला अन मंत्र जपुनि त्वां केलें कपटें । आमच्या पुरुषांसी धाकटें । पतिव्रतालक्षण चेटकें । शोभे नेटकें तुझे तुज ॥ असे अनसूयेस मोठ्या त्वेषयुक्त स्वरांत बोलू लागल्या. त्या तिन्ही देवस्त्रियांचे ते गर्व-द्वेष आणि अहंभावयुक्त वचन ऐकून ती पतिव्रताशिरोमणी अनसूया अति मधुर स्वरांत त्यांना म्हणाली, " देवींनो, तुमचे पती हे बहुरूपी आहेत, हे तुम्ही जाणता. तुम्हीही अखिल त्रैलोक्यांत महान पतिव्रता म्हणून विख्यात आहात. त्या सामर्थ्याने तुम्ही बालकरूपांतील आपापल्या पतींना ओळखून घेऊन जा." अनसूयेचे हे वचन ऐकून रमा, उमा आणि सावित्री तिघीहीजणी धावतच पाळण्याजवळ गेल्या खऱ्या, मात्र त्या तिन्ही गोजिरवाण्या अत्रिनंदनांचे रूप पाहून, हुंकार ऐकून, अथवा त्यांना उचलून कडेवर घेऊनही, यांतील ब्रह्मा कोण ? श्रीहरिविष्णु कुठले आणि शंभो महादेव कोण? हे काही त्या ओळखू शकल्या नाहीत. अंतर्बाह्य मर्यादा खुणें । स्वपतीस जाणणे न ओळखणे । हे काय पतिव्रतेचे लक्षण म्हणावें काय ? असा विचार करून त्या तिघीहीजणी तेव्हा मनोमन ओशाळल्या. मग सावित्री, लक्ष्मी, उमा या तिघीही जणी अनसूयेची क्षमा मागत म्हणाल्या, " हे अनसूये, तू पतिव्रताधर्म निपुण असून साक्षात जगन्माता आहेस. आम्ही तुला शरण आलो आहोत. तू आमच्या पतीचे दान द्यावे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो." त्यावर अनसूया हसतहसत उत्तरली," सुरांगना हो, मी या तिन्ही बालकांचे आनंदाने पालन करते. तुम्हीही इथे तुमच्या पतीसह वास्तव्य करावे." असे बोलून ती त्या तिन्ही बालकांस स्तनपान करू लागली. जरी मोठें हे देवत्रय । कोठून मिळे त्यांना सुसतीचे पय । हाचि जाणूनि अभिप्राय । स्तनपान करिती अवश्य ते ॥ असा हा पुत्रसोहळा पहाण्यासाठी आकाशांत सुरवरांच्या विमानांची दाटी झाली अन ते त्या अनसूयेच्या पुत्रांवर सुवर्णपुष्पांची वृष्टी करू लागले. अशाप्रकारे, कृतयुगांत अत्रि आश्रमी ब्रह्मकैवल्य, पुरुषोत्तम गुरु प्रकटले. मार्गशीर्ष शुक्लपक्षीं । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्ही सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ॥ ब्रह्मावतार 'सोम' नांवानें, रुद्रावतार 'दुर्वास' नामानें तर विष्णुस्वरूप 'दत्त' नामानें जगतविख्यात झाले. प्रत्यक्ष ईश्वर आपले पुत्र झाले, हे पाहून अनसूया-अत्रि अतिशय आनंदले. तेव्हा त्या तिन्ही देवस्त्रियांनी सती अनसूयेस वारंवार नमन केले आणि " कृपा करून आमच्या पतींचे आम्हांस दान द्यावे," अशी प्रार्थना केली. मग त्या महापतिव्रता अनसूयेने पतीचरणांचे तीर्थ त्या तीन बालकांवर शिंपडले अन त्रिदेवांना तात्काळ पूर्वरूप प्राप्त झाले व तिन्ही बाळेंही तशीच पाळण्यांत राहिली. हे पाहून सर्वांसी वाटले आश्चर्य । म्हणती धन्य धन्य सती ऋषिवर्य । नारद वदे साधले कार्य । अमरार्य झाले एकत्र ॥ अशा रितीने, त्रैमूर्तींनी अत्रि महर्षींना दिलेले वरदान फलस्वरूप झाले. तदनंतर ब्रह्मा-सावित्री, श्रीहरि-लक्ष्मी, अन शिव-गिरीजा त्या पुण्यशील दांपत्यास शुभाशिष देऊन स्वस्थानीं गेले. कालांतराने सोम चंद्रमंडळात वास करू लागला, तर दुर्वास तीर्थयात्रा करण्यासाठी प्रयाण करते झाले, अन त्रयदेवात्मक योगीश्वर दत्त अत्रि-अनसूयेजवळ राहिले. विधाता-नारायण-पंचवक्त्र । मिळून झाले एकत्र । विशुद्धसत्त्व-एकस्वरूप स्वतंत्र । अवतरले सर्वत्र सुखप्रद ॥ दकारोSज्ञानदग्धा च । तकारस्तत्त्वमव्ययं । दत्तस्मरणमात्रेण । पुनर्जन्म न विद्यते ॥ अर्थात त्या दत्तप्रभूंच्या - विधि-नारायण-हर यांच्या या अपूर्व त्रैमूर्तिस्वरूपाचे नित्य ध्यान-पूजन केले असता साधकांस भुक्ति-मुक्ती सहज प्राप्त होते.  
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमश:

आवडे दत्तभक्तांसी ...


Dec 25, 2023

संत एकनाथमहाराजकृत श्रीदत्तात्रय जन्मकथन आख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !


ऐका दत्तात्रय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजी पूर्ण । अनुसूया जाण पतिव्रता ॥१॥ ऐकोनी शिवाची वाणी । गदगदां हांसे भवानी । आम्हां तीघींवरती त्रिभुवनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥ २ ॥ गर्व देखोनी पार्वतीचा । बोले त्रिलोचन तेव्हां वाचा । नारद सांगेल महिमा तिचा । तेव्हां तुज कळेल ॥३॥ ऐकोन पार्वती मनांत । नारदाची मार्गप्रतिक्षा करीत । तव तो मुनी अकस्मात् । पावला तेथें ते क्षणीं ॥४॥ देखोनियां नारद मुनि । षोडशोचारे पूजीं भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । आणिक कोणी अमेना ॥५॥ ऐकोनी हांसला नारदमुनी । ऐके पार्वती चित्त देउनी । अनुसूया अत्रीपत्नी । तुम्हां तिघींहुनि पतिव्रता ॥६॥ तुम्हां तिघींचे पुतळे करुनी । बांधिले असे वामनचरणीं । असंख्य सामर्थ्य त्रिभुवनीं । समतुल्य कोणी असेना ॥७॥ तो पार्वती झाली चिंताग्रस्त । नारदातें उपाय पुसत । तो म्हणे प्रार्था विश्वनाथ । तो तेथवरी जाईल ॥८॥ नग्न होऊनि घालीं भिक्षा भोजन । तेणें होईल तिचें छळण । ब्रिदें तुमचें देईल सोडून । मग गर्व सहजची गळेल ॥९॥ पार्वतीसी ऐसें सांगोनी । स्वयें वैकुंठासी येत तत्क्षणीं । देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं । मग पूजी आदरें तयातें ॥१०॥ कर जोडोनी करी विनंती । कांहीं नवल सांगा स्थिती । मागे झाली जे रितीं । वदला मती विनोदें ॥११॥ म्हणे धन्य अनुसूया पतिव्रता । तुम्हां तिघींहुनी समर्था । तुमचे पुतळे तत्त्वतां । तिनें तोडरीं बांधिलें ॥१२॥ ऐकोनी तटस्थ झाली रमा । आता काय करूं पुरुषोत्तमा । मजह्रुनी वाढ ऐसी सीमा । ते कैसेनी निरसेल ॥१३॥ नारद म्हणे उपाय एक । तेथें पाठवा वैकुंठनायक । नग्न भोजन मागा ते देख । तेणें ते छळेल ॥१४॥ सांगोनी ऐसा वृत्तांत । सत्य लोकांसी गेला ब्रह्मसुत । सावित्री पुसे त्वरित । कांहीं अपूर्व वर्तलें ॥१५॥ मग तो म्हणे सावित्रीसी । अनुसूया ऐसी गुणराशी । सामर्थ्य अधिक तियेपाशी । पदा तिघींसी वांधिलें ॥१६॥ सावित्री म्हणे नारदामतें । कैसा उपाय करावा तीतें । जेणें भंगेल गर्वातें । शरण आम्हांतें येईल ॥१७॥ पाहतां आम्हांपासूनि उत्पत्ति । एवढी काय तिची स्थिती । टिटवी काय समुद्राप्रती । शोषूं शके ॥१८॥ आम्हांहूनि काय चाड । ऐसें पीडिलें महागूढ़ । आतां उपाय सांगा दृढ । जेणें गर्व भंगेल तिचा ॥१९॥ मग ती म्हणे नारदासी । काय करावा तिशीं । तंव तो म्हणे सावित्रीशी । एक तुजसी सांगेन ॥२०॥ प्रार्थुनिया चतुरानना । पाठवावें अत्रिभुवना । जाये तूं आतां याच क्षणां । अवश्य वचन बोलवी ॥२१॥ म्हणावें दे नग्न भोजन । तेणें होईल तिचे छळण । मग यावें सत्व घेऊन । ब्रीद जाण तुटेल ॥२२॥ ऐसा नारद सांगून गेला । मग तिघी प्रार्थिती तिघांला । श्रुत करोनि नारद गेला । म्हणवूनि विनविती ॥२३॥ ऐकुनी ऐसें वचनीं । तिघें निघाले तत्क्षणी । स्त्रियांची करुणा देखुनी मनीं । कृपा झाली तयांची ॥२४॥ मग पवनवेगें ते अवसरीं । तिथे प्रवेशले आश्रमाभीतरीं । वाहनें ठेवूनिया दूरी । माध्यानकाळीं पैं आले ॥२५॥ मग तंव ते म्हणती तिघेजण । आम्हांस घेणें अनुसूयादर्शन । ऋपीने आज्ञा करून । दारा बाहेर पाठविली ॥२६॥ तें देखोनी अत्रिऋषीनें । तिघांचें केलें सांग पूजन । मग म्हणे येणें काय कारणें । आवश्यक पैं झालें ॥२७॥ तंव द्वारा बाहेर तिन्ही मूर्ति । ब्रह्मा शिव कमलापती । नमस्कार झालीया पुसती । काय आज्ञा तें सांगिजे ॥२८॥ ते म्हणे अनुसूयेसी । तूं पतिव्रतेमाजी श्रेष्ठ म्हणविसी । तरी मागतों तें देई आम्हांसी । म्हणोनि भीकेसी गोविलें ॥२९॥ मग म्हणे ती तयांप्रती । तुमचें देणें त्रिजगतीं । आणि तुम्हीं मागतां मजप्रती । इच्छा जैशी मागिजे ॥३०॥ देव म्हणती होऊनि नग्न । आम्हांशी घालावें भोजन । अनुसूया अवश्य म्हणे । मग काय करिती जाहली ॥३१॥ ठेवूनिया तिघांचे मस्तकीं कर । तंव ते तिघे झाले कुमर । मग नग्न होउनि सत्वर । करवी स्तनपान तयातें ॥३२॥ करुनि तयांची उदरतृप्ती । वसन नेसली शीघ्रगती । मग घालूनी पालखाप्रति । गाती झाली तेधवां ॥३३॥ मग म्हणे चतुरानना । जो जो जो जो रे सगुणा । उत्पन्न करुनि त्रिभुवना । बहु श्रम पावलासी ॥ ३४॥ या कारणें केलें बाळ । आतां राहिलें कर्तृत्व सकळ । स्तनपान करोनि निर्मळ । सुखें निद्रा करावी ॥३५॥ जो जो जो जो रे लक्ष्मीपती । तुझी तव अगाध कीर्ति । अवतार धरुनि पंक्ति । दुष्ट संहार पैं केला ॥३६॥ ते श्रम पावलासी थोर । निद्रा करावी बा सत्वर । म्हणोनि केला कुमर । विश्रांती सुख पावावया ॥३७॥ जो जो जो जो रे बा शंकरा । महादेवा पार्वतीवरा । करोनि दुष्ट संहारा। बहु श्रम पावलासी ॥३८॥ तरी आतां सुखें निद्रा करी । कुमारकत्व पावलें यापरी । आतां क्लेश नाहीं तरी । पालखीभीतरी पहुडावें ॥३९॥ आसे आखेद स्तनपान । पालखात निजवी बाळकें पूर्ण । नित्य गीतगायन । भक्ती ज्ञान वैराग्य ॥४०॥ ऐसे बहुत दिवस । मार्ग नाहीं जावयास । न सुटे बाळपणाचा वेश । सामर्थ्य विशेष अनुसूयेचें ॥४१॥ उमा रमा सावित्रीतें । थोर गर्व होतां तिघींतें । तो निरसावयातें । विंदान केलें नारदें ॥४२॥ मागुती सांगे तिघींप्रती । काय निश्चित बैसल्याती । बालकें करूनि तिघांप्रती । अनुसूया सती खेळवितसे ॥४३॥ नित्य करवी स्तनपान । षण्मासांचे बाळें करून । पाळण्यामाजी निजवून । गीत गायन करीतसे ॥४४॥ पाहतां ऋषीपत्नी जाण । तिचें तुळणें न पुरे त्रिभुवन । आतां जाणें शरण तियेसी ॥४५॥ तंव त्या तिघीजणीं बोलती । आम्ही तरी आदिशक्ती । आमचे सामर्थ्य त्रिजगतीं । प्राणी वर्तती एकसरें ॥४६॥ सुरनर गंधर्व किन्नर । पशुपक्षी अपार । आमच्या सामर्थ्या थोर । चराचर नांदत ॥४७॥ तरी आमचे आम्हींच पती । सोडवू आपले सामर्थ्यी । अनुसूया ते बापुडी किती । काय तिची कीर्ति आपुल्यापुढें ॥४८॥ ऐसें बोलोनी अभिमानी । तिघी निघाल्या त्या क्षणीं । लगबग आल्या धांवुनी । अनुसूयाभुवनीं तत्काळ ॥४९॥ ते देखोनिया ऋषीश्वरे । तिघी पूजिल्या पोडशोपचारें । काय आज्ञा पुसे त्वरें । ते प्रत्योत्तरे सांगीजे ॥५०॥ त्या तिघीजणी बोलती । पाठवावें अनुसूयाप्रती । येरें आज्ञा करूनी शीघ्रगती । स्त्रियांप्रती आणविले ॥५१॥ तंव ते पातलीसे त्वरें । केला तिघींसी नमस्कार । आज्ञा पुसे सत्वर । भाग्य थोर आलेती ॥५२॥ तिघी म्हणती आमुचे पती । आणून देई शीघ्रगती । तंव त्या बाळकाच्या मूर्ती । पुढें क्षीतीं ठेविल्या ॥५३॥ तंव ते सारखे बाळ तिन्ही । बोलं नेणती वचनीं । तिघी चकीत झाल्पा मनीं । परि कोण्हा न लक्षवेना ॥५४॥ सर्वही सामर्थ्य वेचलें । अभिमान धैर्य गळालें । पण लोटांगण घातलें । चरण वंदिले सतीचे ॥५५॥ अनुसूया थोर तुं पतिव्रता । धन्य धन्य तुझी सामर्थ्यता । आम्ही लीन जाहलों पाहतां । नको निष्ठुरता करूं माये ॥५६॥ जैसे होते आमुचे पती । तेसे करावे पुढती । अगाध धन्य तुझी कीर्ति । पूर्ण सती पतिव्रता ॥५७॥ ऐकोनी सतीत्रयींचें वचन । तिघांचें मस्तकीं स्पर्शे करून । कृपायुक्त अवलोकून । पूर्व चर्या ते आणिले ॥५८॥ तिघांचीं स्वरूपें जैसीं होतीं । तैशा केल्या तिन्हीं मूर्ति । देव अंतरिक्ष कौतुक पहाती । वृष्टी करिती पुष्पांची ॥५९॥ दुंदुभि वाजविल्या भेरी । आनंद झाला सर्वांतरी । बोलिले सत्वरीं । अनुसूया पतिव्रता ॥६०॥ त्रय देव म्हणती धन्य माते । अगाध सामर्थ्य तुझें सत्य । प्रसन्न झालों मागा वरातें । मनोरथ पूर्ण करा हो ॥६१॥ मग ते बोले करुणावचन । अपूर्व तुमचें दर्शन । भावें न गमे तुम्हांविण । अर्धक्षण जाणिजे ॥६२॥ तरी तिघे रूप असावें । एवढें मज वरदान द्यावें । आणीक नलगे स्वभावें । म्हणोनी भावें  प्रार्थितसें ॥६३॥ मग देवत्रयाची मूर्ति । करकमळीं आली शीघ्रगती । दत्तात्रय नामें ऐसी ख्याती । तिहीं लोकांप्रती विशेष ॥६४॥ वर देऊनी स्वस्थाना । शक्तीसहीत आरूढले वाहना । सर्व देव समुदाय जाणा । स्वर्ग भुवना पातले ॥६५॥ येरीकडे दत्तात्रयमूर्ति । बालरूपें अनुसूयेप्रती । पुढें व्रतबंध झाले निश्चिती । अभ्यासिल्या सकळ कला ॥६६॥ एका जनार्दन म्हणे । दत्तात्रय जन्मकथन । भावें करितां श्रवण । मनोरथ पूर्ण श्रोतियांचे ॥६७॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

अवश्य वाचावे असे काही -

*** श्रीदत्तजन्म आख्यान ***


एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !


पैठणचे संत एकनाथ महाराज हे थोर दत्तकृपांकित जनार्दन स्वामींचे शिष्य ! ते दौलताबाद येथे त्यांच्याकडे मंत्रादि वेदाध्ययन शिकण्यासाठी राहत होते. आपल्या सद्‌गुरुचरणीं एकनाथ महाराजांची दृढ निष्ठा होती. एकदा जनार्दनपंतांनी त्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले, " एका, उद्यापासून त्या समोरच्या टेकडीवरील झाडाखाली बसून अध्ययन करीत जा." श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार एकनाथ महाराज दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या झाडाखाली जाऊन बसले. तिथे छान एकांत होता, त्यांना ती जागा फार आवडली. तिथे बसून ते अध्ययन करू लागले. पण काही वेळांतच तिथे प्रखर ऊन तापू लागले. एकनाथ महाराजांच्या घशास कोरड पडली. पण तिथे ओढा, तळं असे पाण्याचे कुठलेच साधन नव्हते ना तिथे जवळपास कुणाचे घर होते. एकनाथ महाराज तहानेने फारच व्याकुळ झाले, त्यांना काय करावे हे समजेना.
इतक्यात तिथे एक गवळी आला, आणि मोठ्या ममत्वानें त्यांना म्हणाला, " बाळा, तुला फार तहान लागलेली दिसतेय! हे दूध पी. हे अगदी उत्तम नि ताजं आहे. तुला बरें वाटेल आणि मग तू एकाग्रतेने अध्ययन करू शकशील." त्यावर एकनाथ महाराज विनंती करीत म्हणाले," महोदय, पण माझ्याजवळ पैसे नाहीत! तुम्हांला उद्या पैसे दिले तर चालेल का ?"  " अरे, पैशाची काळजी करू नकोस. उद्या दिलेस तरी हरकत नाही. " तो गवळी उत्तरला.   संध्याकाळी एकनाथ महाराज जनार्दनस्वामींकडे परतले. स्वामींनी विचारले," कसे झाले आजचे अध्ययन ?"  " फारच उत्तम ! मी उद्याही तिथेच जाईन ! " एकनाथ महाराज म्हणाले. दुसन्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार घडला. तोच गवळी पुन्हा आला नि दूध देऊन गेला. तेव्हा मात्र एकनाथ महाराज संकोचून म्हणाले, " महोदय, मी काल स्वामींजवळ पैसे मागायला विसरलो. उद्या मात्र मी तुम्हांस नक्की पैसे देईन!" मग त्यादिवशी संध्याकाळी स्वामींपाशी येऊन एकनाथ महाराज म्हणाले, " आजही माझे छान ध्यान लागले. पण काल मी तुम्हांला एक गोष्ट सांगायचीच विसरलो."  " कुठली गोष्ट ? " जनार्दन स्वामींनी विचारले. " गेले दोन दिवस एक गवळी मला अगदी ताजं ताजं दूध आणून देत आहे. त्याला देण्यासाठी मला पैसे हवे आहेत!" नाथ म्हणाले. " काही नकोत पैसे द्यायला... तो आपलाच आहे रोजचा !", जनार्दनपंत मंद स्मित करत म्हणाले. " आपल्याकडे दूध घालणारा हाच का गवळी ? त्याला एकदम महिन्याचे पैसे द्यायचे का ?" एकनाथ महाराजांनी पुन्हा प्रश्न केला.   " अरे एका, कधी-मधी माझ्या शेजारी येऊन बसतात ते...." जनार्दन स्वामी हसत म्हणाले. " म्हणजे? श्रीदत्त गुरु?", एकनाथ महाराजांनी सदगदित होऊन विचारले.   " हो, तीच भक्तवत्सल गुरुमाऊली !" जनार्दन स्वामी उत्तरले.  एकनाथ महाराजांनी जनार्दनपंतांना आपणांसही श्रीदत्तात्रेय दर्शन व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यावर जनार्दन स्वामी आश्वासक स्वरांत म्हणाले," एका, तुझी उपासना पूर्ण झाली आणि योग्य वेळ आली की दत्त महाराज तुला आपणहून दर्शन देतील." आणि लवकरच जनार्दनपंतांनी एकनाथ महाराजांना दत्तदर्शनाचा लाभ घडविला. फकीर वेशांतील श्रीदत्तगुरूंची ओळख जनार्दन स्वामींनी नाथांना करून दिली. इतुकेच नव्हें तर त्रिगुणात्मक स्वरूपातीलही दत्तप्रभूंचे दर्शन एकनाथ महाराजांना झाले. पुढे, दत्तप्रभूंच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या आवडत्या शिष्याला अर्थात एकनाथ महाराजांना सर्व गुह्यज्ञान देऊन अद्वयत्वाची, अभेदतत्त्वाची जाणीव करून दिली.    धन्य ती गुरु-शिष्याची जोडी, ज्यांच्यावर श्रीदत्तात्रेय प्रभूंनी कृपानुग्रह केला. 
श्रीदत्तजन्माचे संत एकनाथ महाराजांनी रचलेले हे काही सुरेख अभंग : धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥ तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥ अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥ पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥ निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥ एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥ जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ.॥ पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥ करितां उत्पत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥ लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वैकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥ पार्वतीरमण शिवा निज आतां । संहारक जीवजंता । निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनीं दाता ॥४॥        
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 7, 2022

श्री दत्तजन्माच्या विविध पुराणांत वर्णिलेल्या कथा


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !

श्री दत्तात्रेयांच्या अवताराचा हेतु स्पष्ट करतांना ब्रह्मपुराणात म्हटले आहे की, भूयो भूतात्मनो विष्णोः प्रादुर्भावो महात्मनः । दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परया युतः ॥ तेन नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मखेषु च । चातुर्वर्ण्ये तु संकीर्णे धर्मे शिथिलतां गते ॥ अभिवर्धति चाधर्मे सत्ये नष्टेऽनृते स्थिते । प्रजासु शीर्यमाणासु धर्मे चाकुलतां गते ॥ सहयज्ञक्रिया वेदाः प्रत्यानीता हि तेन वै । चातुर्वर्ण्यमसंकीर्णं कृतं तेन महात्मना ॥  याचा भावार्थ थोडक्यांत असा की, सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा असे ते श्रीहरि विष्णू यांचाच हा दत्तात्रेय नावाचा अवतार होय. अत्यंत क्षमाशील असा हा अवतार असून या अवतारकार्यांत त्यांनी वेदांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन केले, चातुर्वर्ण्यातील शिथिलता दूर केली, अधर्माचा व असत्याचा नाश करून क्षीण होत चाललेल्या लोकांत सामर्थ्य निर्माण केले.

  श्री दत्तजन्माच्या वेगवेगळ्या कथा विविध पुराणांत वर्णिल्या आहेत. महर्षी अत्री व महापतिव्रता अनसूया या श्रेष्ठ दांपत्याच्या पोटी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला असून ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवाचे अंश त्यांच्यांत एकवटलेले आहेत. श्री विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी हा एक आहे, असेही काही दत्तभक्तांचे मत आहे. निरनिराळ्या पुराणांतून दत्तात्रेयांच्या जन्मकथा निरनिराळया असल्या तरी ते अत्रि-अनसूयेचा पुत्र व विष्णूचा अवतार यात मात्र एकवाक्यता आढळते.   यापैकी काही जन्मकथांची थोडक्यात ओळख करून घेऊ.

भागवतपुराणातील कथा थोडक्यांत अशी आहे -  ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री ऋषी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मदेवाने त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तपश्चर्या करण्यासाठी ते आपल्या पत्नीसहवर्तमान ऋक्षपर्वतावर गेले. त्या पर्वतावरील एका घनदाट अरण्यात निर्विन्ध्या नावाच्या नदीतीरी, सुखदुःखादी द्वंद्वांचा त्याग करून अत्री ऋषींनी एका पायावर उभे राहून कडक तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. सुमारे शंभर वर्षेपर्यंत केवळ वायू भक्षण करून व प्राणायामाच्या योगाने आपल्या मनाचा निग्रह करून तपश्चर्या करीत असताना अत्री ऋषी, 'जो कोणी या जगाचा नियंता आहे, त्यालाच मी शरण आलो आहे, तरी त्याने मला आपल्यासारखी संतती द्यावी' असे नित्य चिंतन करीत असत. त्यांच्या या तपोबलाने प्रदीप्त झालेला अग्नी त्रैलोक्याला जाळू लागला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे तीनही देव अत्री ऋषींच्या आश्रमात आले. नंदी, हंस व गरुड या वाहनांवर बसून आलेल्या व त्रिशूळ, कमंडलू व चक्र अशी आयुधे धारण करणाऱ्या या तीन देवांनी अत्रींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची मनोभावे पूजा केली. अत्री ऋषीने त्यांना मनोभावे प्रार्थना करून म्हटले, “ हे त्रिदेवांनो, जगाची उत्पत्ती, पालन व संहार अशी कार्ये करणारे ब्रह्मा, विष्णू व महेश तुम्ही आहात. तुमच्यापैकी ज्या एकाचीच मी आराधना करीत होतो, तो कोण ? मी येथे पुत्रप्राप्तीसाठी तप करीत आहे.”  त्यावर ते तिन्ही देव प्रसन्न होऊन म्हणाले, “ तू ज्या एका तत्त्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत. हे मुनिवर्य, तुझे कल्याण असो. आता तुला आमच्या अंशांपासून जगप्रख्यात असे तीन पुत्र होतील आणि ते तुझी कीर्ती जगभर पसरवतील.” या वरदानाचे फलस्वरूप म्हणून यथावकाश अत्री ऋषींना ब्रह्मदेवाच्या अंशापासून सोम, विष्णूच्या अंशापासून योगशास्त्रात निपुण असे दत्त व शंकराच्या अंशापासून दुर्वास असे तीन पुत्र झाले.

ब्रह्मपुराणातील कथेनुसार, ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी अत्री ऋषींनी आराधना केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या त्रिमूर्तींना त्यांनी प्रार्थना केली, “आपण माझ्या 'घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि एक गुणवती व रूपवती कन्या पण द्यावी.”  त्या वरदानस्वरूप अत्री ऋषींस दत्तात्रेय, सोम व दुर्वास हे तीन पुत्र झाले आणि शुभात्रेयी नामक कन्या झाली.

  वायुपुराण, कूर्मपुराण आणि मार्कंडेय पुराणात मात्र अनसूयेच्या सतीत्वाशी व पावित्र्याशी संबंध असलेली एक कथा आहे. प्रतिष्ठान नगरीत कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. मात्र तो ब्राह्मण नित्य वेश्यागमनी असल्यामुळे आपल्या साध्वी पत्नीकडे दुर्लक्ष करीत असे. काही काळानंतर त्याला महारोग जडला आणि त्याची गात्रे झडू लागली. त्या वेश्येनेही  त्याचा त्याग केल्यावर तो घरी परतला. त्याची पत्नी त्याची मनोभावे सेवा करू लागली. एकदा कौशिक आपल्या पत्नीस म्हणाला, “ मला त्या वेश्येकडे घेऊन चल.” पतीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी रात्रीच्या अंधारात ती महासती कौशिकपत्नी आपल्या पतीला घेऊन वेश्येकडे निघाली. मार्गांत एक चमत्कार घडला. त्याच नगरात चुकीने चोर समजून सुळी दिलेले मांडव्य ऋषी सुळावर यातना भोगीत होते. त्यांना या कौशिकाचा धक्का बसला. तत्क्षणीं, मांडव्य ऋषींनी कौशिकाला शाप दिला की, “तू सूर्योदयापूर्वी मरण पावशील.” हे शापवचन ऐकताच कौशिकपत्नीने आपल्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सूर्योदयच थांबविला. त्यामुळे सबंध विश्वचक्रच बिघडले. सर्व देव धावरून गेले. विश्वाला वाचविण्यासाठी ब्रह्मदेवाने सती अनसूयेकडे मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली. अनसूयेने कौशिकपत्नीला अभय देऊन सूर्योदय घडवून आणला आणि सूर्योदय झाल्यावर मांडव्याच्या शापामुळे मृत झालेल्या कौशिकास आपल्या पातिव्रत्याच्या बलाने पुनः जिवंत केले. अनसूयेवर सर्व देव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, “तुझ्या पोटी तीन देव जन्म घेतील.” त्या वरदानाचे फलित म्हणून श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला.


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


संदर्भ : श्रीदत्तात्रेय-ज्ञानकोश ( लेखक : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी )


Dec 17, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - अनसूयोपाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार चतुर्थोऽध्यायः ॥

बहुवित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज । त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥ जाण अत्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्र । दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥ निर्बाध अनसूयेचे । व्रत पाहुनी तें साचें । मन भ्यालें सर्व सुरांचें । अबोधाचें बीज हें कीं ॥३॥ ते निश्चोतत्धैर्य देव । त्रिमूर्तीपाशी घेती धांव । आश्वासोनीं त्यांतें देव । भिक्षुभाव स्वीकारिती ॥४॥ ते ऊर्ध्व लोक सोडुनी । भिक्षुकसे होवुनि । तिघे आले अत्रिसदनीं । जातां रानीं मुनिवर्य ॥५॥ त्यां किंप्रयोजन ऐसें । अनसूया पुसतसे । नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥ जरी सृती सोडिती ते । तरी सती वदे त्यातें । तसीच मी तुम्हा देते । स्वस्थचित्तें भिक्षा करा ॥७॥ स्वव्रताच्या सामर्थ्ये ती । अत्रिपदा चिंती चित्तीं । अतिथी बाळ कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥ सुदुस्तर ज्यांची माया । सहसा बालत्व ये तयां । तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥ सुहास्यमुखी घे बालां । तंव स्तना पान्हा आला । पाजी एका एका बाला । जी विमला पातिव्रत्यें ॥१०॥ त्यांची शांत झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें । पाळण्यांत घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥ ती सुखानें गातां मुनि । तेव्हा आला वनांतुनि । ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनि तोषवी त्याला ॥१२॥ त्यांचें गुज तें जाणुनि । राहिले सुत होऊनि । निजरुपेंहि स्वस्थानीं । जाती तीनी देव हर्षे ॥१३॥ सगुणत्वा आले त्यांची । अत्रि नामें योजी साचीं । चंद्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥१४॥ चंद्र प्रणाम करुनी । चंद्रलोका गेला, मुनि । दुर्वासा फिरे भुवनीं । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥ तो निवृत्तिमार्ग दावी । भक्तांचे काम पुरवी । स्मर्तृगामी पुनः भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥
श्री विष्णूंच्या अवतारांचे कारण आणि प्रयोजन याविषयीची कथा ऐकल्यानंतर नामधारक श्री दत्तावताराचे वर्णन ऐकण्यास उत्सुक होता. तो सिद्धमुनींना म्हणाला," अत्रिऋषी कोण होते ? त्यांची पत्नी अनसूया कोण होती ? त्रिमूर्ती कपट वेषाने त्यांच्या आश्रमीं कसे आले ? त्रयमूर्तींचा जन्म कसा झाला ? हे सर्व मला सविस्तर सांगावे." आपल्या शिष्याची ही विनंती ऐकून सिद्धमुनी अति प्रसन्न झाले आणि त्रैमूर्ती अवतार कथा सांगू लागले. - सृष्टिरचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सात पुत्रांतील अत्रि हा मुख्य पुत्र होता. श्री गुरु परंपरा ही तेथूनच निर्माण झाली. अत्रि ऋषींची अनसूया नामक भार्या होती. ते उभयंता धर्मपरायण, सदाचरणी आणि वंदनीय असे दाम्पत्य होते. त्यांच्या आश्रमातून कोणीही अतिथी कधीही विन्मुख जात नसे. अभ्यागताला त्यांच्या त्या अतिपवित्र आश्रमीं नित्य अन्न संतर्पण होत असे. प्रभू श्रीदत्तात्रेय या परमपुण्यवंत दाम्पत्यांचे पुत्र होत. अत्रि ऋषींचे आचरण शुद्ध, पवित्र तर होतेच, त्यांची पत्नी अनसूयाही महापतिव्रता होती. ती काया-वाचा-मनाने भक्तीपूर्वक पतिसेवा करीत असे. तिच्या तप व पातिव्रत्याच्या पुण्यप्रभावाने सर्व देव भयभीत झाले. ही ऋषीपत्नी आपल्या योगसामर्थ्यानें केव्हा कुठल्या देवाचे स्थान हिरावून घेईल वा आम्हांस शाप देईल अथवा न जाणो कधी कुणाला वर देऊन आमचा नाश करू शकेल, अशी चिंता त्या सर्व सुरांना वाटू लागली. त्यांचे धैर्य खचू लागले. अखेर, इंद्रादि सर्व देव एकत्र होऊन ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्याकडे गेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितली. तसेच, आपण यांवर उपाय केला नाही तर आमचे स्वर्गस्थानही जाऊ शकते अशी भीतीही व्यक्त केली. सर्व देवांचे हे चिंताग्रस्त बोल ऐकून त्रिमूर्तींनी त्यांना धीर दिला आणि ' आपण महापतिव्रता अनसूयेचा व्रतभंग करून सर्व देवांस भयमुक्त करू,' असे आश्वासनही दिले.  सतीची सत्त्वपरिक्षा घेण्यासाठी त्या तीनही देवांनी भिक्षुकांचे रूप धारण केले आणि ऊर्ध्वलोकांतून ते मनोवेगें अत्रिऋषींच्या आश्रमांत अभ्यागत म्हणून आले. त्यावेळीं, अत्रिमुनी अनुष्ठानासाठी वनांत गेले होते. आपल्या गृही आलेल्या त्या तीन अतिथींचे अनसूयेने उचित आदरातिथ्य केले आणि त्यांना नमन करून विनयतेने म्हणाली," ऋषीवर्य, मी आपली काय सेवा करू ?" तेव्हा भिक्षुकांच्या रूपांतील त्रिमूर्तींनी तिच्याकडे भोजनाची मागणी केली, आणि म्हणाले " आम्ही भुकेने फार व्याकुळ झालो आहोत. तुमच्या या आश्रमांत नित्य अन्न संतर्पण होत असते, तुम्ही इच्छाभोजन देता, अशी ख्याती आम्ही ऐकली. म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आम्हांस सत्वर भोजन द्यावे." अतिथींची ही इच्छा ऐकून अनसूयेने त्वरित सर्व तयारी केली आणि त्यांना आसनांवर बसण्याची प्रार्थना केली. मात्र तिने विवस्त्र होऊन आपणांस भिक्षा घालावी, असा त्या त्रिदेवांनी हट्ट धरला. त्यांचे हे विपरीत, धर्ममार्गाच्या विरुद्ध असे वचन ऐकून, हे निश्चितच कुणी अवतारी पुरुष असावेत असा त्या श्रेष्ठ पतिव्रतेने विचार केला. तसेच," माझे मन निर्मळ आहे आणि माझ्या पतीचे तप:सामर्थ्य मला अवश्य तारेल.", अशी तिची दृढ धारणा होती. तेव्हा, ती महापतिव्रता अनसूया म्हणाली," योगिवर्य, तुमच्या इच्छेनुसार मी तुम्हांस भिक्षा देते. तुम्ही स्वस्थचित्तानें भोजन करावे. "  तेव्हा त्या सतीने आपल्या पतीच्या, अत्रिऋषींच्या चरणांचे मनोभावें चिंतन केले. त्यानंतर तिने, " हे अतिथी माझी बालके आहेत." असा मनांत संकल्प केला आणि आपल्या अंगावरची सर्व वस्त्रें उतरविली. अन काय आश्चर्य ! अनसूया जेव्हा विवस्त्र होऊन अन्नोदक वाढण्यासाठी बाहेर आली, तो ते तीन अतिथी, तान्ही बालके होऊन तिथे रांगत होती. अत्रि ऋषींचे तप आणि तिचे पातिव्रत्य यांच्या पुण्यप्रभावाने तिने केलेल्या या संकल्पात एव्हढे सामर्थ्य होते की ब्रह्मा-विष्णु-महेश्वर या देवाधिदेवानांदेखील बालस्वरूप घ्यावे लागले. ज्यांच्या प्रकृतीरूपी मायेला पार करणे सर्वथा अशक्य, अवघड असते, ते या सृष्टीचे उत्पत्ती-स्थिती-लयकर्ते आता तान्ही बालके झाली होती. हे नवल पाहून अनसूया अतिशय आश्चर्यचकित झाली. मग पुन्हा वस्त्रें नेसून ती त्या तीन बालकांजवळ आली आणि त्या बालकांना तिने वात्सल्यतेनें जवळ घेतले. त्या गोजिरवाण्या बाळांना पाहून अनसूयेला पान्हा फुटला. एकेका बालकाला मांडीवर घेऊन तिने स्तनपान दिले आणि त्या तिन्ही शिशुंचे क्षुधा निवारण केले. ते क्षुधार्त बालकरूपी त्रिमूर्ती त्या महान पतिव्रतेच्या स्तन्यपानाने तृप्त झाले. धन्य ते श्रेष्ठ तपस्वी अत्रि महर्षी अन धन्य ती महापतिव्रता अत्रिभार्या अनसूया !  मग अनसूयेने त्या तिन्ही बालकांना पाळण्यांत घातले आणि ती अंगाई गीते म्हणू लागली. असा तो सुखसोहळा सुरु होता, तोच अत्रिऋषी आश्रमांत परतले. अनसूयेने त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ही तीन बालके म्हणजे ब्रह्मा-विष्णु-महेशच आहेत, हे त्यांनी अंतर्दृष्टीनें ओळखले. अत्यंत हर्षित होऊन त्यांनी त्रैमूर्तींचे स्तवन केले आणि श्रद्धापूर्वक नमनही केले. त्यांचा तो अनन्य भक्तीभाव पाहून त्रिमूर्ती संतुष्ट झाले. ती तीन बालके तर पाळण्यातच राहिली आणि चतुर्मुख ब्रह्मा, चक्रपाणि विष्णु आणि पिनाकधारी शंकर निजरूपात उभे राहिले. त्रिमूर्तींचे ते दिव्य रूप पाहून अत्रि मुनी आणि सती अनसूया यांना अतिशय आनंद झाला, त्यांनी देवांना प्रणिपात केला. त्यावर ते तीनही देव म्हणाले," अत्रि ऋषी, तुमचे तपोबल आणि अनसूयेचे पातिव्रत्य अलौकीक आहे. तुमच्या भक्तीनें आम्ही प्रसन्न झालो आहोत, तुम्ही इष्ट वर मागा." तेव्हा, " ही तीनही बालके आमच्या गृहीं पुत्र म्हणून राहावेत, व हे त्रिमूर्ती एकरूप असावेत. " हेच अभीप्सित वरदान त्या जगद्वंद्य पती-पत्नींनी मागितले. त्यांचे हे वचन ऐकून तीनही देव ' तथास्तु !' असा वर देऊन आपल्या स्वस्थानीं निघून गेले. एका सुमुहूर्ती, अत्रि ऋषींनी ब्रह्मदेवाच्या बालमूर्तीचे चंद्र, विष्णुमूर्ती बालकाचे दत्त आणि शिवबालमूर्तीचे दुर्वास असे नामकरण केले. अशा रितीने, त्रिमूर्ती अत्रि-अनसूयेच्या आश्रमांत त्यांचे पुत्र होऊन राहिले.  काही कालांतराने, चंद्र आणि दुर्वास यांनी आपल्या माता-पित्यांस निजस्थानीं जाण्याची अनुज्ञा मागितली. अनुमती मागत चंद्र म्हणाला, " मी चंद्रलोकांत राहून तुमचे नित्य दर्शन घेईन." तर " मी ऋषी असून तीर्थाटनास जातो. तसेच अनुष्ठान, यज्ञयाग यांसाठी भूलोकी भ्रमण करीत राहीन." असे म्हणून दुर्वासांनी आपल्या माता-पित्याचा निरोप घेतला. तिन्ही देवांची मूर्ती एक होऊन विष्णूंची दत्तनामक मूर्ती नित्य स्वगृहीं राहीली. अत्रि-अनसूयेला मिळालेले वरदान अशाप्रकारे जगत्कल्याणासाठी पूर्णत्वास गेले. त्रिमूर्ती त्यांच्या सदनीं एकच मूर्ती, एकच देवता म्हणून राहिले. परमात्मा दत्तरूपाने अवतरला ! अत्रि ऋषींचा पुत्र तो आत्रेय, असा तो दत्तात्रेय आहे आणि सिद्ध गुरुचे मूळपीठ तोच आहे. श्री दत्तप्रभूच मोक्षदाते असून, आपल्या भक्तांचा सदैव उद्धार करतात. दत्तमहाराजांच्या कृपेने भक्तांच्या इष्ट मनोकामना सहजच पूर्ण होतात. ते स्मर्तृगामी आहेत, म्हणजेच त्यांचे केवळ मनापासून स्मरण केले असता ते तत्काळ प्रकट होतात. श्रीहरि विष्णूंच्या अवताराप्रमाणेच श्रीदत्तात्रेयांचेही अवतार झाले. आपण अवतार का व केव्हा घेतो ? हे भगवंताने गीतेत अनेक श्लोकांमधून सांगितले आहे. ' परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥' अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते, तेव्हा भगवंत अवतार घेतात. त्रिमूर्ती दत्तदेखील श्रीपाद श्रीवल्लभ रूपांत पुन्हा या भूलोकी अवतरित झाले.  

श्री दत्तजयंती विशेष : 
दत्तभक्तहो, श्रीदत्तजन्माची ही कथा ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी श्रीगुरुलीलामृत या प्रासादिक ग्रंथांत अतिशय रसाळ ओव्यांतून वर्णिली आहे. 
ऋषि योगिजन उत्कृष्टविश्राम । ब्रह्मकैवल्य परंधाम । कृतयुगीं गुरु पुरुषोत्तम । अत्रि-आश्रमीं प्रकटले ॥ मार्गशीर्ष शुक्लपक्षीं । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्हीं सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ॥ सुरमासीं शुक्लातिथि चवदावी । दत्तावतार मोक्षसुख चव दावी । दासें लीला म्हणूनच वदावी । जगद्गुरुची सर्वदा ॥ ब्रह्मावतार ' सोम ' । रुद्रावतार ' दुर्वास ' नाम । विष्णुस्वरूप ' दत्त ' परम । सर्वांसी मान्य योगीश्वर ॥ भृगु आदिक ऋषी-संमत । चतुर्दशी बुध मार्गशीर्ष शुक्रांत । उच्चस्थ ग्रह-पंचक विख्यात । वृषभलग्नीं प्रगटले ॥ सोम चंद्रमंडलीं निश्चितीं । दुर्वास तीर्थयात्रें जाती । त्रयदेवात्मक घडली मूर्ती । होऊनि स्थिती एकत्र ॥ विधाता-नारायण-पंचवक्त्र । मिळून झाले एकत्र । विशुद्धसत्त्व एकस्वरूप स्वतंत्र । अवतरले सर्वत्र सुखप्रद ॥ स्कंदपुराणींचे वचन । दत्तात्रेयोत्पत्ति कथन । मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमादिन । प्रदोषव्यापिनी रविवारीं वर्णिले ॥ अत्रीस त्रैमूर्तींनी वर दिधले । तेचि त्रयमूर्ति जाहले । ' देवदत्त ' म्हणूनि नाम ठेविलें । दत्तात्रेय ईश्वर ॥ अनसूया अत्रि आनंदले । प्रत्यक्ष ईश्वर पुत्र जाहले  कृतकृत्य उभयतांस वाटलें । वर्णिलें स्कंद्पुराणीं हें ॥ 

श्रीगुरुलीलामृतातील श्रीदत्तजन्म अध्याय इथे उपलब्ध आहे.
दत्तभक्तहो, श्री दत्तजन्म आख्यान लेख इथे वाचता येतील.                          

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 29, 2020

अनसूयात्रिपुत्रः स श्रीदत्तः शरणं मम ...


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

सत्ययुगातील प्रथम मन्वन्तराच्या प्रारंभी श्री दत्तात्रेय प्रगट झाले होते. केवळ स्मरतां क्षणीच प्रसन्न होणारे हे दैवत या विश्वातील सकल प्राणिमात्रांच्या दुःख, दैन्य, आणि पाप - ताप निवारणार्थ अवतारीत झाले. या अलौकिक अवताराचे वैशिष्ट्य असे, ' अवतार येती आणि जाती । तैसी नोहे दत्तमूर्ती । सदा राहे पृथ्वीवरती । लोकोद्धार करावया ।' अर्थात श्री दत्तप्रभू या पृथ्वीतलांवर भक्त कल्याणाकरिता, दीन जनांचा उद्धार करण्यासाठी सतत संचार करीत असतात. 

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या सायंकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्मकाळ साजरा केला जातो. त्या दिवशी दत्तोपासक मृग नक्षत्रांत दिसणाऱ्या तीन ताऱ्यांना भगवान त्रिमूर्ती दत्तात्रेय मानून त्यांचे दर्शन घेतात.  त्यानंतर त्यांची पूजा, आरती आणि प्रदक्षिणा केली जाते. श्री दत्तमहाराजांचे जन्माख्यान, पाळणा, गुरुचरित्र पारायण आदि अनेक प्रकारच्या उपासना दत्तभक्त या शुभ दिनी करतात. 

पुराणांत दत्तात्रेयांच्या अवताराची कथा अशी वर्णिली आहे - सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षि अत्रि यांचा विवाह देवहूतिची कन्या अनसूया हिच्याबरोबर झाला होता. पुत्रप्राप्तीसाठी उभयतांनी कठोर तपश्चर्या केली. त्यावेळीं ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी प्रसन्न होऊन आपण त्यांचे पुत्र म्हणून अवतार घेऊ, असे अत्रि-अनसूयेला वरदान दिले. अर्थात, स्वतःचे दान केलेला तो दत्त आणि अत्रिमुनींचा पुत्र आत्रेय असे दत्तात्रेय प्रगट झाले. दत्तपुराणात अत्रि म्हणजेच त्रिगुणातीत चैतन्य आणि ' अनसूया ' नावाचा अर्थ असूयारहित प्रकृती असा वर्णिला आहे. मार्कण्डेय पुराणानुसार, अत्रि-अनसूयेच्या प्रथम पुत्र सोम (चंद्र) हा ब्रह्मदेवांचा अवतार रजोगुणी होता. त्यांचा द्वितीय पुत्र श्री विष्णूंचा अवतार श्री दत्तात्रेय सत्वगुणप्रधान होते तर शिव अवतार असलेले तृतीय पुत्र दुर्वास तमोगुणप्रधान होते. परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती - टेंबे स्वामी महाराज श्री दत्तमहाराजांचे वर्णन करतांना म्हणतात, नमस्ते समस्तेष्टदात्रे विधात्रे, नमो नमस्तेऽस्तु पुरान्तकाय, नमो नमस्तेऽस्त्वसुरान्तकाय । अर्थात सकल वांच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या आणि ह्या सृष्टीचा निर्माणकर्ता (ब्रह्मदेवस्वरूप) असलेल्या हे जगन्नियंत्या, तुला माझा नमस्कार ! पुरांतकांला म्हणजे त्रिपुरांतकांला (अर्थांत श्रीशिवशंकर स्वरुप) श्रीदत्तात्रेया तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. असुरांचे निर्दालन करणाऱ्या (श्रीहरिविष्णुस्वरूप) जगदीशा, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. 

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे साजरा करण्यात आलेला श्री दत्तात्रेय जयंती सोहळा खास दत्तभक्तांसाठी

         


निरंजन स्वामीकृत दत्तजन्म आख्यान


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ॐ नमोजी गुरु स्वामी दत्तात्रेया । कृपाळू सखया दीनबंधू ॥१॥ तुझे कीर्तिगुण वर्णाया लागुन । इच्छितसे मन माझें बहु ॥२॥ तरि देई मति वदावया वाणी । आनंदाची खाणी प्रगटाया ॥३॥ ऐका हो तुम्ही श्रोते संतजन । जन्म सुलक्षण श्रीदत्ताचा ॥४॥ सावित्री आणिक लक्ष्मी पार्वती । एके ठायीं स्थिती झाली होती ॥५॥ अकस्मात आली नारदाची फेरी । वीणा स्कंधावरी घेऊनियां ॥६॥ देवोनियां त्यातें बैसाया आसन । पुसती वर्तमान त्रैलोकीचें ॥७॥ असे नारदमुनीं त्रैलोक्य भुवनीं । आम्हा ऐशा कोणी असती काय ॥८॥ पतिव्रता आणि सर्वसत्ता अंगीं । ऐशा कोणी जगीं असती काय ॥९॥ ऐशा गर्विष्ठ पाहे तिघीजणी । बोले नारदमुनी तयालांगीं ॥१०॥ तुमची याहुनी श्रेष्ठ कोटीगुण । देखलीसे जाण पतिव्रता ॥११॥ भूलोकाचे ठायी अत्रिमुनी-जाया । सती अनसूया नाम तिचें ॥१२॥ तुम्हां ऐशा दासी तिजला शोभती । काय सांगूं ख्याति तिची तुम्हां ॥१३॥ ऐसे ऐकोनी मुनीचें वचन । मनामाजीं खिन्न झाल्या तिघी ॥१४॥ आपुलिया घरा उठोनियां गेल्या । पतीसी बोलल्या जाऊनियां ॥१५॥ ऐका हो तुम्ही आमुचें वचन । कासावीस होती प्राण बहू ॥१६॥ अनसूयेची कीर्ति नारदमुनीनीं । वर्णिली येवोनी आम्हांपाशीं ॥१७॥ तरी तुम्ही जावें मृत्युलोकाठायी । अनसूयेचे गृहीं लागवेगीं ॥१८॥ हरोनियां तिच्या सत्वालागीं जाण । यावें परतून निजघरा ॥१९॥ स्त्रियांचे वचन ऐकोनी कानीं । तिघे तत्क्षणीं उठीयेले ॥२०॥ ब्रह्मा विष्णु आणि तिजा चंद्रमौळी । निघाले ते काळीं मृत्युलोका ॥२१॥ स्नानसंध्येलागी अत्रिमुनि गेला । माध्यान्हीं पातला दिनमणी ॥२२॥ तयाकाळीं तिघें होवोनि अतीथी । गेले आकस्मात भिक्षेलागीं ॥२३॥ अनसुयेलागीं मारुनियां हांक । बोलती कौतुक करोनियां ॥२४॥ भिक्षा घाली माते आम्हांसी सत्वर । नग्न दिगंबर होवोनियां ॥२५॥ नाहीं तरी आम्ही जातो परतोनि । सत्त्वासि घेऊनि तुझ्या आतां ॥२६॥ ऐकोनि ऐसें अतिथी वचन । पतिव्रतारत्‍न चिंतावलें ॥२७॥ करोनियां मनीं पतीचें चिंतन । तीर्थातें घेऊन शिंपीयलें ॥२८॥ तंव ते तिघेजण झाले चिमणे बाळ । रांगती लडिवाळ होवोनियां ॥२९॥ अनसुया नग्न होवोनियां आपण । करि दुग्धपान तयांलागीं ॥ ३०॥ तिघेजण एका पालखीं घालून । ओवीया गाऊन हालवीत ॥३१॥ इतुकियामाजीं अत्रिमुनी आले । बाळांतें पाहिलें निजडोळां ॥३२॥ विस्मित होवोनि आपुलीया मनीं । म्हणे श्रेष्ठ कोणी असती हे ॥३३॥ असो या लागून झाले बहुदिन । स्वर्गींचें भुवन शून्य ठेलें ॥३४॥ लक्ष्मी पार्वती सावित्री या तिन्ही । चिंताग्रस्त मनीं जाल्या बहू ॥३५॥ एके ठायीं सर्व होवोनियां गोळा । चिंता वेळोवेळां करिताती ॥३६॥ इतुक्यांत आली नारदाची फेरी । मंजुळ उच्चारी नाममंत्र ॥३७॥ देवोनि आसन बैसविले मुनी । करिती विनवणी तयांलागीं ॥३८॥ आमुचे भ्रतार गेले कोणीकडे । आम्हांसी सांकडें घालोनियां ॥३९॥ तयावीण आम्हां न गमेचि क्षण । जाले बहुदिन तयालागीं ॥४०॥ तयांवीण सर्व शोभित मंदीर । दिसति भयंकर आम्हांलागीं ॥४१॥ तुम्हांप्रति कोठें भेटतील तरी । सांगावें सत्वरीं आम्हांलागीं ॥४२॥ तंव बोले मुनि तया स्त्रियांप्रति । देखियेले पती तुमचे म्यां ॥४३॥ अनसूयेचे घरीं तिघेजण बाळ । होवोनि लडिवाळ खेळताती ॥४४॥ ऐकोनि ऐंसें मुनीचें वचन । विस्मित होऊन बोलती त्या ॥४५॥ आमुचिया बोला गेले सतीघरीं । आम्हांलागीं घोरीं घालूनियां ॥४६॥ चला जाऊं आतां तयेचिया घरा । मागूनि भ्रतारा घेऊं आजी ॥४७॥ अभिमान दूर सांडुनियां जाण । पातल्या शरण अनसूयेसीं ॥४८॥ म्हणती वो माते देई चुडेदान । करी बोळवण आम्हांलागीं ॥४९॥ भ्रतारांवाचून आमुचे पंचप्राण । कंठापाशीं जाण आले माते ॥५०॥ सर्वभावें आतां शरणागत आम्ही । द्यावे आमुचे स्वामी आम्हांलागीं ॥५१॥ पतिव्रता म्हणे ’न्यावे आपुले पती । धरुनियां हातीं आपुलाले’ ॥५२॥ तवं त्या बोलती तिघीजणी तीतें । ओळख आम्हांते न पडेचि ॥५३॥ समान दिसती ब्रह्माविष्णुरुद्र । तिन्ही मुखचंद्र सारिखेची ॥५४॥ माय होवोनियां न होय मावशी । द्यावे हो आम्हांसी ओळखून ॥५५॥ ऐशा त्या वेल्हाळा पाहूनियां । दीन केलेसें विंदान अनुसूयेनें ॥५६॥ पतीच्या तीर्थासीं शिंपूनी मागुती । तिघीचेही पती दाखविले ॥५७॥ ब्रह्माविष्णुरुद्र होवोनि प्रसन्न । म्हणे ’वरदान मागें कांहीं ’ ॥५८॥ म्हणे अनसूया द्यावे ऐसे वर । तिघेही कुमार तुम्हां ऐसे ॥५९॥ तथास्तु म्हणोनि देऊनीयां वर । ब्रह्महरीहर जाते झाले ॥६०॥ तयांच्या प्रसादें झाले तिघे पुत्र । उत्तम पवित्र पुण्यशील ॥६१॥ विरंचीचा चंद्र शिवाचा दुर्वास । विष्णूचा तो अंश दत्तात्रय ॥६२॥ तयाकाळीं हर्ष झाला जयजयकार । येती सुरवर तया ठायां ॥६३॥ आनंदोनि देव वर्षती सुमनें । करिती निंबलोण सर्व जग ॥६४॥ निरंजन म्हणे धन्य आजि दिन । पाहिलें निधान दत्तात्रय ॥६५॥


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


श्री दत्तमाहात्म्य - श्रीदत्तावतार



॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

असो आतां ऐक शिष्या । त्रिमूर्ती देववरा मानुनियां । अनसूयेच्या उदरीं येवोनियां । गर्भरूपें वाढती ॥

ज्यांच्या स्मरणें तुटे फांस । त्यासी कैंचा गर्भवास । अज असोनी दाविती खास । भक्ताधीनत्व या लोकीं ॥

अनसूये डोहाळे होती । उत्तम ज्ञान बोले ती । ऐसे नवमास लोटती । करी संस्कार अत्रिमुनी ॥

मार्गशीर्ष पौर्णिमेसी । बुधवारीं प्रदोषसमयासी । मृग नक्षत्रीं शुभ दिवशीं । अनसूयेसी पुत्र झाले ॥

तव अत्रिऋषी येऊन । पाहीन म्हणे पुत्रवदन । तों अकस्मात् त्रिमूर्ती पाहून । विस्मित-मन जाहला ॥

माला कमंडलु अध:करीं । डमरू त्रिशूल मध्यकरीं । शंखचक्र ऊर्ध्वंकरीं धरी । भक्तकैवारी त्रिमूर्त्यात्मक ॥

काषायवस्त्र परिधान । विभूतीचें लेपन । मस्तकीं जटामंडन । वात्सल्यरसायन धाम जें ॥

तें दिव्यरूप पाहून । करसंपुट जोडून । अनसूया अत्रि वंदून । करिती स्तवन सगद्गद ॥

जयजया परात्परा । अजा अव्यया निर्विकारा । जगत्कारणा जगदाधारा । सत्या असंगा उदासीना ॥

सावकाश ज्याच्या पोटीं । परिभ्रमती ब्रह्मांडकोटी । तो तूं व्यापक आमुचे पोटीं । येसी हे खोटी गोष्ट होय ॥

सृष्टीपूर्वीं तूं एक सत्य । स्थितिकालींही न होसी असत्य । प्रळयीं निर्बाधत्वें सत्य । त्वद्वचन असत्य होय कीं ॥

निज बिरुदावळी पाळिसी । वासनावन जाळिसी । भक्तजनां संभाळिसी । आळसी न होसी भक्तकाजीं ॥

स्वयें असोनी स्वतंत्र । भावाच्या भुकेनें होसी परतंत्र । कोण जाणे तुझा मंत्र । भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व ॥

ह्या रूपा आमुचा नंदन । म्हणणें हें जगीं विडंबन । म्हणूनि तूं बाल होऊन । राहतां मन हर्षेल ॥

पुत्रभावेंकरून । तुझें करितां लालन पालन । जाईल आमुचें मायावरण । म्हणोनी चरण धरियेले ॥

मग बोले वनमाळी । तुम्हीं तप केलें कूलाचळीं । तीन स्वरूपीं त्या वेळीं । तुम्हां दर्शन दीधलें ॥

एकाचें करितां ध्यान । तुम्ही आलेंत कोण तीन । ऐसें तुम्हीं पुसतां दिलें वचन । आम्ही तीन एकरूप ॥

पुढें अतिथी होऊन । जसें मागितलें भिक्षादान । तसेंच देतां नग्न होऊन । अनसूयेपुढें तीन बाळ झालों ॥

आमच्या शक्त्या येऊन । आम्हां मागती प्रार्थना करून । तेव्हां हा पाळणा न व्हावा शून्य । म्हणोनि वरदान मागितलें ॥

तसाच वर देऊन । शक्तींसह केलें गमन । निजभक्त देवगण । त्यांहीं वरदान तुम्हां दिलें ॥

तें सर्व सत्य करावया । पूर्व वरा स्मरावया । लोकीं भक्तिख्याती व्हावया । प्रगट केलें ह्या दिव्यरूपा ॥

तुमचा भाव पाहोन । तुम्हां दिलें म्यां माझें दान । राहीन तुमच्या स्वाधीन । देतों वचन त्रिवार ॥

माझें दर्शन न हो निष्फळ । जें गती दे तत्काळ । असें म्हणोनि तीन बाळ । झाला घननीळ विश्वनाटकी ॥

मग अत्रि करी स्नान । करी जातकर्मविधान । मिळोनियां मुनिजन । जयजयकार करिती ॥

पुष्पें वर्षती सुरवर । वारा चाले मनोहर । जगीं आनंद होय थोर । परात्पर अवतरतां ॥

वांझ वृक्ष झाले सफळ । वंध्येपोटीं आलें बाळ । पळोनि गेला दुष्काळ । अवतरतां मूळपुरुष हा ॥

अनसूया धन्य पतिव्रता । विधिहरिहरांची झाली माता । जिचें स्तनपान करितां । ये तृप्तता त्रिमूर्तीला ॥

बारावे दिनीं अत्रिमुनीं । नामकर्म करोनी । अन्वर्थक नामें तिन्ही । तयांचीं ठेविलीं प्रेमानें ॥

ज्यानें केलें स्वात्मदान । त्याचें दत्त हें अभिधान । सर्वां देई आल्हादन । म्हणोनि चंद्राभिधान ब्रह्मांशा ॥

दुर्वासा नाम रुद्रांशा दे । मग अनसूया आनंदें । पाळणा बांधूनी स्वच्छंदें । बाळा निजवूनी गातसे ॥


( पाळणा

॥ जो जो जो जो रे परात्परा ॥ भजकांच्या माहेरा ॥ध्रु.॥

सह्याद्रीवरि जो अत्रिसुत । अनसूया जठरांत ।

प्रगटुनि विख्यात । हो दत्त ॥

तारिल जो निजभक्त ।जय जगदुद्धारा, उदारा ॥ भजकांच्या माहेरा ॥ जो जो जो जो रे ॥

प्रर्‍हादा देशी विज्ञान । येतां अर्जुन शरण । सिद्धी देऊन उद्धरून । स्वपदीं देशी स्थान ॥

अलर्क यदुतारा, योगिवरा । भजकांच्या माहेरा ॥ जो जो जो जो रे ॥


( पाळणा २ )

 जो जो रे जो जो जयविश्वात्मन् ।

परावर भूमन् । जयजय जय भगवन् ॥ध्रु.॥

चारभूत खाणी । पाळणा बांधोनी । चोवीस तत्वें घेवोनी । दृढतर ओंवोनी ॥

गुणसूत्रें माया । स्तंभीं बांधुनीयां । कर्मदोरी धरूनी । झोंके घेसी वायां ॥

चाळाचाळी टाकूनी । श्रुतिगीत ऐकूनी । घे झोंप उन्मनी । स्वानुभवें करूनी ॥

( पाळणा संपूर्ण ) ॥ 

जो सृष्टिस्थिति संहार करितीं । तयास पाळण्यांत निजवी सती । स्वकरें पुन: पुन: झोंके देती । काय गती भक्तीची हो ॥


॥ श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

श्री दत्तमाहात्म्य - अध्याय ३


Dec 3, 2017

श्रीगुरुचरित्र अध्याय - ४ ( श्रीदत्त-जन्म )


श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्री गुरुभ्यो नमः II ऐशी शिष्याची विनंती I ऐकोन सिद्ध काय बोलती I साधु-साधु तुझी भक्ति I प्रीति पावो गुरुचरणीं II १ II ऐक शिष्यचूडामणी I धन्य धन्य तुझी वाणी I आठवतसे तुझिया प्रश्नीं I आदि-मध्य-अवसानक II २ II प्रश्न केला बरवा निका I सांगेन तुज विवेका I अत्रिऋषीच्या पूर्वका I सृष्टीउत्पत्तीपासोनि II ३ II पूर्वी सृष्टि नव्हती कांही I जलमय होतें सर्वांठायीं I 'आपोनारायण ' म्हणोनि पाहीं I वेद बोलती याचिकारणें II ४ II आपोनारायण आपण I सर्वां ठायीं वास पूर्ण I बुद्धि संभवे प्रपंचगुण I अंड निर्मिलें हिरण्यवर्ण II ५ II तेंचि ब्रह्मांड नाम जाहलें I रजोगुणें ब्रह्मयासि निर्मिलें I 'हिरण्यगर्भ' नाम पावलें I देवतावर्ष एक होतें II ६ II तेंचि ब्रह्मांड देखा I फुटोनि शकलें झालीं द्वैका I एक आकाश एक भूमिका I होऊनि ठेलीं शकलें दोनी II ७ II ब्रह्मा तेथें उपजोन I रचिलीं चवदाही भुवनें I दाही दिशा मनस वचन I काळकामक्रोधादि सकळ II ८ II पुढें सृष्टि रचावयासी I सप्त पुत्र उपजवी मानसीं I नामें सांगेन परियेसीं I सातै जण ब्रह्मपुत्र II ९ II मरीचि अत्रि आंगिरस I पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ I सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ I सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण II १० II सप्त पुत्रांमधील 'अत्रि' I तेथूनि पीठ गुरुसंतति I सांगेन ऐक एकचित्तीं I सौभाग्यवंता नामधारका II ११ II अत्रिऋषीची भार्या I नाम तिचें 'अनसूया ' I पतिव्रताशिरोमणिया I जगदंबा तेचि जाण II १२ II तिचें सौंदर्यलक्षण I वर्णूं शके ऐसा कोण I जिचा पुत्र चंद्र आपण I तिचें रूप केवीं सांगों II १३ II पतिसेवा करी बहुत I समस्त सुरवर भयाभीत I स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित I म्हणोनि चिंतिती मानसीं II १४ II इंद्रादि सुरवर मिळूनि I त्रिमूर्तीपाशीं जाऊनि I विनविताति प्रकाशोनि I आचार अत्रिऋषीचा II १५ II इंद्र म्हणतसे स्वामियां I पतिव्रता स्त्री अनसूया I आचार तिचा अगम्य I काय सांगों विस्तारोनि II १६ II पतिसेवा करी भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मेसीं I अतिथीपूजा महाहर्षी I विमुख नव्हे कवणे काळीं II १७ II तिचा आचार देखोनि I सूर्य भीतसे गगनीं I उष्ण तिसी लागे म्हणोनि I मंद मंद तपतसे II १८ II अग्नि झाला अति भीत I शीतळ असे वर्तत I वायु झाला भयचकित I मंद मंद वर्ततसे II १९ II भूमि आपण भिऊनि देखा I नम्र जाहली तिचिया पादुका I शाप देईल म्हणोनि ऐका I समस्त आम्ही भीतसों II २० II नेणों घेईल कवण स्थान I कवण देवाचें हिरोन I एखादिया वर देतांचि क्षण I तोही आमुतें मारुं शके II २१ II त्यासि करावा उपावो I तूं जगदात्मा देवरावो I जाईल आमुचा स्वर्गठावो I म्हणोनि तुम्हां सांगो आलों II २२ II न कराल जरी उपाव यासी I सेवा करूं आम्ही तिसी I तिच्या द्वारी अहर्निशीं I राहूं चित्त धरुनि II २३ II ऐसें ऐकोनि त्रयमूर्ति I महाक्रोधें कापती I चला जाऊं कैसी सती I पतिव्रता म्हणताति II २४ II व्रतभंग करूनि तिसी I ठेवूनि येऊं भूमीसी I अथवा वैवस्वतालयासी I पाठवूं म्हणोनि निघाले II २५ II वास पाहावया सतीचें I त्रयमूर्ति वेष धरिती भिक्षुकाचे I आश्रमा आले अत्रीचे I अभ्यागत होऊनि II २६ II ऋषि करावया गेला अनुष्ठान I मागें आले त्रयमूर्ति आपण I अनसूयेसी आश्वासून I अतिथि आपण आलों म्हणती II २७ II क्षुधेंकरुनि बहुत पीडोन I आलों आम्ही ब्राह्मण I त्वरित द्यावें सती अन्न I अथवा जाऊं आणिका ठायां II २८ II सदा तुमच्या आश्रमांत I संतर्पण अभ्यागत I ऐकिली आम्ही कीर्ति विख्यात I म्हणोनि आलों अनसूये II २९ II इच्छाभोजनदान तुम्ही I देतां म्हणोनि ऐकों आम्ही I ठाकोनि आलों याचि कामीं I इच्छाभोजन मागावया II ३० II इतुकें ऐकोनि अनसूया I नमन केलें अतिविनया I बैसकार करूनियां I क्षालन केलें चरण त्यांचे II ३१ II अर्घ्य पाद्य देऊनि त्यांसी I गंधाक्षतापुष्पेसीं I सवेंचि म्हणतसे हर्षी I आरोगण सारिजे II ३२ II अतिथि म्हणती तये वेळी I करोनि आलों आपण आंघोळी I ऋषि येतील बहुतां वेळीं I त्वरित आम्हांसी भोजन द्यावें II ३३ II वास पाहोनि अतिथींतें I काय केलें पतिव्रतें I ठाय घातले त्वरितें I केला तेथें बैसकार II ३४ II बैसवोनियां पाटावरी I घृतेसीं पात्राभिधार करी I घेवोनि आली अनसूया नारी I शाक पाक तये वेळीं II ३५ II तिसी म्हणती अवो नारी I आम्ही अतिथि आलों दूरी I देखोनि तुझें रूप सुंदरी I अभीष्ट मानसीं आणिक वसे II ३६ II नग्न होऊनि आम्हांसी I अन्न वाढावें परियेसीं I अथवा काय निरोप देसी I आम्ही जाऊं नाहीं तरी II ३७ II ऐकोनि अतिथींचे वचन I अनसूया करी चिंतन I आले विप्र पहावया मन I पुरुष कारणिक होतील II ३८ II पतिव्रताशिरोमणी I विचार करी अंतःकरणीं I अतिथि विमुख, तपोहानि I पतिनिरोप केवी उल्लंघूं II ३९ II माझें मन असे निर्मळ I काय करील मन्मथ खळ I पतीचें असे जरी तपफळ I तारील मज म्हणतसे II ४० II ऐसें विचारूनि मानसीं I तथास्तु म्हणे तयासी I भोजन करा स्वचित्तेंसी I वाढीन नग्न म्हणतसे II ४१ II पाकस्थाना जाऊनि आपण I चिंतन करी पतीचे चरण I वस्त्रें फेडूनि झाली नग्न I म्हणे अतिथि बाळें माझीं II ४२ II नग्न होऊनि सती देखा I घेऊनि आली अन्नोदका I तंव तेचि जाहलीं बाळकां I ठायांपुढें लोळतीं II ४३ II बाळकें देखोनि अनसूया I भयचकित होऊनियां I पुनरपि वस्त्रें नेसूनियां I आली तयां बाळकांपाशीं II ४४ II रोदन करिताति तिन्ही बाळें I अनसूया राहवी वेळोवेळें I क्षुधार्त झालीं केवळें I म्हणोनि कडे घेतलें II ४५ II कडे घेवोनि बाळकांसी I स्तनपान देतसे हर्षी I एका सोडोनी एकासी I निवारण करीं क्षुधेचें II ४६ II पाहें पां नवल काय घडलें I त्रयमूर्तीचे बाळक झाले I स्तनपानमात्रें क्षुधा गेली I तपफळ ऐसें पतिव्रतेचें II ४७ II ज्याचे उदरी चवदा भुवने I सप्त समुद्र वडवान्न I त्याची क्षुधा निवारण I पतिव्रतास्तनपानमात्रें II ४८ II चतुर्मुख ब्रह्मयासी I सृष्टि रचणें अहर्निशी I त्याची क्षुधा स्तनपानेसीं I केवीं झाली निवारण II ४९ II भाळाक्ष कर्पूरगौर I पंचवक्त्र काळाग्निरुद्र I स्तनपान करवी अनसूयासुंदर I तपस्वी हो अत्रि ऐसा II ५० II अनसूया ऐशी अत्रीची रमणी I न होती मागें ऐकिली कवणीं I त्रयमूर्तीची झाली जननी I ख्याति झाली त्रिवभूनी II ५१ II कडे घेवोनि बाळकांसी I खेळवीतसे तिघांसी I घालूनि बाळकां पाळणेसीं I पर्यंदे गाई तये वेळीं II ५२ II पर्यंदे गाय नानापरी I उपनिषदार्थ अतिकुसरीं I अतिउल्हासें सप्त स्वरीं I संबोखीतसे त्रिमूर्तीसी II ५३ II इतुकें होतां तये वेळीं I माध्यान्हकाळीं अतिथिवेळीं I अत्रिऋषि मन निर्मळीं I आले आपुले आश्रमा II ५४ II घरांत आला अवलोकित I तंव देखिली अनसूया गात I कैंची बाळें ऐसें म्हणत I पुसतसे तयेवेळीं II ५५ II तिणें सांगितला वृत्तांत I ऋषि ज्ञानें असे पहात I त्रिमूर्ति हेचि म्हणत I नमस्कार करीतसे II ५६ II नमस्कारितां अत्रि देखा I संतोष विष्णु-पिनायका I आनंद झाला चतुर्मुखा I प्रसन्न झाले तये वेळीं II ५७ II बाळें राहिली पाळणेंसी I निजमूर्ति ठेले सन्मुखेंसी I साधु-साधु अत्रिऋषि I अनसूया पतिव्रता II ५८ II तुष्टलों तुझिये भक्तीसी I वर माग जे इच्छिसी I अत्रि म्हणतसे सतीसी I जें वांछिसी तें माग आतां II ५९ II अनसूया म्हणे अत्रीसी I प्राणेश्वरु तूंचि होसी I देव पातले तुमचे भक्तीसी I पुत्र मागा तुम्ही आतां II ६० II तिघे बाळक आमच्या घरीं I राहावे आमुच्या पुत्रांपरी I हेंचि मागणें निर्धारीं I त्रिमूर्ति असावे एकरूप II ६१ II ऐसें वचन ऐकोनि I वर दिधला मूर्ती तिन्हीं I राहतीं बाळकें म्हणोनि I आपण गेले निजालयासी II ६२ II त्रिमूर्ति राहिले तिचे घरी I अनसूया पोशी बाळकांपरी I नामें ठेविलीं प्रीतिकरीं I त्रिवर्गाचीं परियेसा II ६३ II ब्रह्मामूर्ति 'चंद्र' झाला I विष्णुमूर्ति 'दत्त' केवळा I ईश्वरातें 'दुर्वास' नाम ठेविलें I तिघे पुत्र अनसूयेचे II ६४ II दुर्वास आणि चंद्र देखा I उभे राहूनि माताभिमुखा I निरोप मागती कवतुका I जाऊं तपा निजस्थाना II ६५ II दुर्वास म्हणे अहो जननी I आम्ही ऋषि अनुष्ठानी I जाऊं तीर्थे-आचरणीं I म्हणोनि निरोप घेतला II ६६ II चंद्र म्हणे अवो माते I निरोप द्यावा आम्हां त्वरितें I चंद्रमंडळीं वास आमुतें I नित्य दर्शन तुम्हांचरणीं II ६७ II तिसरा दत्त विष्णुमूर्ति I असेल तुम्हांतें धरोनि चित्तीं I त्रिमूर्ति निश्चित म्हणोनि सांगती I हें मनीं धरावें तुम्हीं II ६८ II त्रयमूर्ति तोचि जाण दत्त I ' सर्वं विष्णुमयं जगत् ' I राहील धरोनि तुमचें चित्त I श्रीविष्णुमूर्ति दत्तात्रेय II ६९ II त्रयमूर्ति ऐक्य होऊन I दत्तात्रेय राहिला आपण I दुर्वास चंद्र निरोप घेऊन I गेले स्थाना आपुलाले II ७० II अनसूयेच्या घरीं देखा I त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका I नाम दत्तात्रेय ऐका I मूळपीठ श्रीगुरूचें II ७१ II ऐसेपरी सिद्ध देखा I सांगे कथा नामधारका I संतोषेंकरूनि प्रश्र्न ऐका I पुसतसे सिद्धासी II ७२ II जय जया सिद्ध योगीश्वरा I भक्तजनाच्या मनोहरा I तारक संसारसागरा I ज्ञानमूर्ति कृपासिंधु II ७३ II तुझेनि प्रसादें मज I ज्ञान उपजलें, सतीकाज I तारक आमुचा योगिराज I विनंति माझी परियेसा II ७४ II दत्तात्रेयाचा अवतारू I सांगितला पूर्वापारू I पुढें मागुती अवतार जाहले गुरु I कवणेपरी निरोपावे II ७५ II विस्तारुनि बाळकासी I सांगावें स्वामी प्रीतीसीं I श्रीगुरूमूर्ति अवतार जाहले कैसी I अनुक्रमें निरोपावें II ७६ II म्हणे सरस्वती गंगाधरू I पुढील कथेचा विस्तारू I ऐकतां होय मनोहरु I सकळाभीष्टे साधती II ७७ II

IIइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रैमूर्ति-अवतारकथनंनाम चतुर्थोSध्यायः II 

II श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II