॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !
ऐका दत्तात्रय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजी पूर्ण । अनुसूया जाण पतिव्रता ॥१॥ ऐकोनी शिवाची वाणी । गदगदां हांसे भवानी । आम्हां तीघींवरती त्रिभुवनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥ २ ॥ गर्व देखोनी पार्वतीचा । बोले त्रिलोचन तेव्हां वाचा । नारद सांगेल महिमा तिचा । तेव्हां तुज कळेल ॥३॥ ऐकोन पार्वती मनांत । नारदाची मार्गप्रतिक्षा करीत । तव तो मुनी अकस्मात् । पावला तेथें ते क्षणीं ॥४॥ देखोनियां नारद मुनि । षोडशोचारे पूजीं भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । आणिक कोणी अमेना ॥५॥ ऐकोनी हांसला नारदमुनी । ऐके पार्वती चित्त देउनी । अनुसूया अत्रीपत्नी । तुम्हां तिघींहुनि पतिव्रता ॥६॥ तुम्हां तिघींचे पुतळे करुनी । बांधिले असे वामनचरणीं । असंख्य सामर्थ्य त्रिभुवनीं । समतुल्य कोणी असेना ॥७॥ तो पार्वती झाली चिंताग्रस्त । नारदातें उपाय पुसत । तो म्हणे प्रार्था विश्वनाथ । तो तेथवरी जाईल ॥८॥ नग्न होऊनि घालीं भिक्षा भोजन । तेणें होईल तिचें छळण । ब्रिदें तुमचें देईल सोडून । मग गर्व सहजची गळेल ॥९॥ पार्वतीसी ऐसें सांगोनी । स्वयें वैकुंठासी येत तत्क्षणीं । देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं । मग पूजी आदरें तयातें ॥१०॥ कर जोडोनी करी विनंती । कांहीं नवल सांगा स्थिती । मागे झाली जे रितीं । वदला मती विनोदें ॥११॥ म्हणे धन्य अनुसूया पतिव्रता । तुम्हां तिघींहुनी समर्था । तुमचे पुतळे तत्त्वतां । तिनें तोडरीं बांधिलें ॥१२॥ ऐकोनी तटस्थ झाली रमा । आता काय करूं पुरुषोत्तमा । मजह्रुनी वाढ ऐसी सीमा । ते कैसेनी निरसेल ॥१३॥ नारद म्हणे उपाय एक । तेथें पाठवा वैकुंठनायक । नग्न भोजन मागा ते देख । तेणें ते छळेल ॥१४॥ सांगोनी ऐसा वृत्तांत । सत्य लोकांसी गेला ब्रह्मसुत । सावित्री पुसे त्वरित । कांहीं अपूर्व वर्तलें ॥१५॥ मग तो म्हणे सावित्रीसी । अनुसूया ऐसी गुणराशी । सामर्थ्य अधिक तियेपाशी । पदा तिघींसी वांधिलें ॥१६॥ सावित्री म्हणे नारदामतें । कैसा उपाय करावा तीतें । जेणें भंगेल गर्वातें । शरण आम्हांतें येईल ॥१७॥ पाहतां आम्हांपासूनि उत्पत्ति । एवढी काय तिची स्थिती । टिटवी काय समुद्राप्रती । शोषूं शके ॥१८॥ आम्हांहूनि काय चाड । ऐसें पीडिलें महागूढ़ । आतां उपाय सांगा दृढ । जेणें गर्व भंगेल तिचा ॥१९॥ मग ती म्हणे नारदासी । काय करावा तिशीं । तंव तो म्हणे सावित्रीशी । एक तुजसी सांगेन ॥२०॥ प्रार्थुनिया चतुरानना । पाठवावें अत्रिभुवना । जाये तूं आतां याच क्षणां । अवश्य वचन बोलवी ॥२१॥ म्हणावें दे नग्न भोजन । तेणें होईल तिचे छळण । मग यावें सत्व घेऊन । ब्रीद जाण तुटेल ॥२२॥ ऐसा नारद सांगून गेला । मग तिघी प्रार्थिती तिघांला । श्रुत करोनि नारद गेला । म्हणवूनि विनविती ॥२३॥ ऐकुनी ऐसें वचनीं । तिघें निघाले तत्क्षणी । स्त्रियांची करुणा देखुनी मनीं । कृपा झाली तयांची ॥२४॥ मग पवनवेगें ते अवसरीं । तिथे प्रवेशले आश्रमाभीतरीं । वाहनें ठेवूनिया दूरी । माध्यानकाळीं पैं आले ॥२५॥ मग तंव ते म्हणती तिघेजण । आम्हांस घेणें अनुसूयादर्शन । ऋपीने आज्ञा करून । दारा बाहेर पाठविली ॥२६॥ तें देखोनी अत्रिऋषीनें । तिघांचें केलें सांग पूजन । मग म्हणे येणें काय कारणें । आवश्यक पैं झालें ॥२७॥ तंव द्वारा बाहेर तिन्ही मूर्ति । ब्रह्मा शिव कमलापती । नमस्कार झालीया पुसती । काय आज्ञा तें सांगिजे ॥२८॥ ते म्हणे अनुसूयेसी । तूं पतिव्रतेमाजी श्रेष्ठ म्हणविसी । तरी मागतों तें देई आम्हांसी । म्हणोनि भीकेसी गोविलें ॥२९॥ मग म्हणे ती तयांप्रती । तुमचें देणें त्रिजगतीं । आणि तुम्हीं मागतां मजप्रती । इच्छा जैशी मागिजे ॥३०॥ देव म्हणती होऊनि नग्न । आम्हांशी घालावें भोजन । अनुसूया अवश्य म्हणे । मग काय करिती जाहली ॥३१॥ ठेवूनिया तिघांचे मस्तकीं कर । तंव ते तिघे झाले कुमर । मग नग्न होउनि सत्वर । करवी स्तनपान तयातें ॥३२॥ करुनि तयांची उदरतृप्ती । वसन नेसली शीघ्रगती । मग घालूनी पालखाप्रति । गाती झाली तेधवां ॥३३॥ मग म्हणे चतुरानना । जो जो जो जो रे सगुणा । उत्पन्न करुनि त्रिभुवना । बहु श्रम पावलासी ॥ ३४॥ या कारणें केलें बाळ । आतां राहिलें कर्तृत्व सकळ । स्तनपान करोनि निर्मळ । सुखें निद्रा करावी ॥३५॥ जो जो जो जो रे लक्ष्मीपती । तुझी तव अगाध कीर्ति । अवतार धरुनि पंक्ति । दुष्ट संहार पैं केला ॥३६॥ ते श्रम पावलासी थोर । निद्रा करावी बा सत्वर । म्हणोनि केला कुमर । विश्रांती सुख पावावया ॥३७॥ जो जो जो जो रे बा शंकरा । महादेवा पार्वतीवरा । करोनि दुष्ट संहारा। बहु श्रम पावलासी ॥३८॥ तरी आतां सुखें निद्रा करी । कुमारकत्व पावलें यापरी । आतां क्लेश नाहीं तरी । पालखीभीतरी पहुडावें ॥३९॥ आसे आखेद स्तनपान । पालखात निजवी बाळकें पूर्ण । नित्य गीतगायन । भक्ती ज्ञान वैराग्य ॥४०॥ ऐसे बहुत दिवस । मार्ग नाहीं जावयास । न सुटे बाळपणाचा वेश । सामर्थ्य विशेष अनुसूयेचें ॥४१॥ उमा रमा सावित्रीतें । थोर गर्व होतां तिघींतें । तो निरसावयातें । विंदान केलें नारदें ॥४२॥ मागुती सांगे तिघींप्रती । काय निश्चित बैसल्याती । बालकें करूनि तिघांप्रती । अनुसूया सती खेळवितसे ॥४३॥ नित्य करवी स्तनपान । षण्मासांचे बाळें करून । पाळण्यामाजी निजवून । गीत गायन करीतसे ॥४४॥ पाहतां ऋषीपत्नी जाण । तिचें तुळणें न पुरे त्रिभुवन । आतां जाणें शरण तियेसी ॥४५॥ तंव त्या तिघीजणीं बोलती । आम्ही तरी आदिशक्ती । आमचे सामर्थ्य त्रिजगतीं । प्राणी वर्तती एकसरें ॥४६॥ सुरनर गंधर्व किन्नर । पशुपक्षी अपार । आमच्या सामर्थ्या थोर । चराचर नांदत ॥४७॥ तरी आमचे आम्हींच पती । सोडवू आपले सामर्थ्यी । अनुसूया ते बापुडी किती । काय तिची कीर्ति आपुल्यापुढें ॥४८॥ ऐसें बोलोनी अभिमानी । तिघी निघाल्या त्या क्षणीं । लगबग आल्या धांवुनी । अनुसूयाभुवनीं तत्काळ ॥४९॥ ते देखोनिया ऋषीश्वरे । तिघी पूजिल्या पोडशोपचारें । काय आज्ञा पुसे त्वरें । ते प्रत्योत्तरे सांगीजे ॥५०॥ त्या तिघीजणी बोलती । पाठवावें अनुसूयाप्रती । येरें आज्ञा करूनी शीघ्रगती । स्त्रियांप्रती आणविले ॥५१॥ तंव ते पातलीसे त्वरें । केला तिघींसी नमस्कार । आज्ञा पुसे सत्वर । भाग्य थोर आलेती ॥५२॥ तिघी म्हणती आमुचे पती । आणून देई शीघ्रगती । तंव त्या बाळकाच्या मूर्ती । पुढें क्षीतीं ठेविल्या ॥५३॥ तंव ते सारखे बाळ तिन्ही । बोलं नेणती वचनीं । तिघी चकीत झाल्पा मनीं । परि कोण्हा न लक्षवेना ॥५४॥ सर्वही सामर्थ्य वेचलें । अभिमान धैर्य गळालें । पण लोटांगण घातलें । चरण वंदिले सतीचे ॥५५॥ अनुसूया थोर तुं पतिव्रता । धन्य धन्य तुझी सामर्थ्यता । आम्ही लीन जाहलों पाहतां । नको निष्ठुरता करूं माये ॥५६॥ जैसे होते आमुचे पती । तेसे करावे पुढती । अगाध धन्य तुझी कीर्ति । पूर्ण सती पतिव्रता ॥५७॥ ऐकोनी सतीत्रयींचें वचन । तिघांचें मस्तकीं स्पर्शे करून । कृपायुक्त अवलोकून । पूर्व चर्या ते आणिले ॥५८॥ तिघांचीं स्वरूपें जैसीं होतीं । तैशा केल्या तिन्हीं मूर्ति । देव अंतरिक्ष कौतुक पहाती । वृष्टी करिती पुष्पांची ॥५९॥ दुंदुभि वाजविल्या भेरी । आनंद झाला सर्वांतरी । बोलिले सत्वरीं । अनुसूया पतिव्रता ॥६०॥ त्रय देव म्हणती धन्य माते । अगाध सामर्थ्य तुझें सत्य । प्रसन्न झालों मागा वरातें । मनोरथ पूर्ण करा हो ॥६१॥ मग ते बोले करुणावचन । अपूर्व तुमचें दर्शन । भावें न गमे तुम्हांविण । अर्धक्षण जाणिजे ॥६२॥ तरी तिघे रूप असावें । एवढें मज वरदान द्यावें । आणीक नलगे स्वभावें । म्हणोनी भावें प्रार्थितसें ॥६३॥ मग देवत्रयाची मूर्ति । करकमळीं आली शीघ्रगती । दत्तात्रय नामें ऐसी ख्याती । तिहीं लोकांप्रती विशेष ॥६४॥ वर देऊनी स्वस्थाना । शक्तीसहीत आरूढले वाहना । सर्व देव समुदाय जाणा । स्वर्ग भुवना पातले ॥६५॥ येरीकडे दत्तात्रयमूर्ति । बालरूपें अनुसूयेप्रती । पुढें व्रतबंध झाले निश्चिती । अभ्यासिल्या सकळ कला ॥६६॥ एका जनार्दन म्हणे । दत्तात्रय जन्मकथन । भावें करितां श्रवण । मनोरथ पूर्ण श्रोतियांचे ॥६७॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
अवश्य वाचावे असे काही -
No comments:
Post a Comment