Nov 2, 2022

श्री साईनाथ माहात्म्य


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

नमो श्री गजानना । नमो नमो श्री गौरीनंदना । दुःखनिवारक विघ्नहरणा । नमन माझे तव पायीं ॥१॥ मग नमितो सरस्वती माता । जगन्माता विद्यादेवता । चरणीं ठेवोनियां माथा । वंदन माझे तियेसी ॥२॥ तैसेचि नमन श्रीगुरुवर्या । कृपावंता सद्‌गुरुराया । आठवोनि त्या पूज्य पायां । आत्मशुद्धी जाहली ॥३॥ माता, पिता आणि संतजन । भाविक श्रोते सज्जन । तयांसी करोन वंदन । श्री साई माहात्म्य वर्णितो ॥४॥ श्री साईंचे गुणगान । करीत असतां निशिदिन । घडता समाधी दर्शन । दुःख दूर होते हो ॥५॥ तुम्हीही भजा साई-साई । लीन रहा तयाचे पायीं । धांवोनिया संकट समयीं । नाथ माझा येईल हो ॥६॥ जे मागाल तेचि देईल । नौका किनारी नेईल । मनोरथ पूर्ण होतील । साई कृपेने सर्वांचे ॥७॥ शिरडीच माझी पंढरी । साई माझे श्रीहरी । मथुरा, गोकुळ, द्वारापुरी । शिरडी माझे सर्वस्व ॥८॥ साईच माता साईच पिता । साईच माझा असे दाता । मुखी तयाचे नाम येतां । पापें जळती जन्मांची ॥९॥ जगीं देव तेहत्तीस कोटी । परि माझा देव शिर्डीपती । जडलीं साई चरणीं प्रीती । दुजे न च ठावें मजलागी ॥१०॥ जे जे साई चरित्र वाचिले । ते ते हृदयीं रेखाटिले । शिरडीमार्गी जीवन लाविले । सत्य हेच जाणावें ॥११॥ जयें तोषविले संत । तयें मिळविला भगवंत । ऐसे अनेक दृष्टांत । शास्त्र-पुराणीं देखिले ॥१२॥ संतांचा संत थोर । म्हणवी माझा साईश्वर । ऐसे असतां खरोखर । कासयां हिंडू व्यर्थचि ॥१३॥ बाप माझा कृपाळू साई । वसला असतां मम् हृदयीं । मग कशाची कमताई । आहे माझ्या जीवनी ॥१४॥ कोणी म्हणे श्रीराम । कोणी म्हणे घनःश्याम । कोणी म्हणे चारही धाम । साईनाथ आमुचे ॥१५॥ कोणी म्हणे पवनसुत । कोणी म्हणे श्रीदत्त । समजुनि कोणी पंढरीनाथ । पूजा करती साईंची ॥१६॥ नव्हें हिंदु, नव्हें यवन । श्रोतयां आहे हे सत्य जाण । रूप श्रीसाईंचे घेऊन । ब्रह्म उतरले शिरडीत ॥१७॥ कोण पिता, कोण आई । कोणासच ना ठावें काही । अघटित एक नवलाई । घडली शिरडी नगरांत ॥१८॥ निंबचियां वृक्षाखाली । कृपावंत साई माऊली । बालकरूपें प्रगटली । ऐसे ग्रंथीं वर्णिले ॥१९॥ निंबास्थळीं गुरुचे स्थान । आहे ऐसे सांगून । तेथेच वसले निशी-दिन । देवरूपी साई ते ॥२०॥ सदासर्वदा उपकार । करीत राहिले साईश्वर । धन्यविले ते शिरडी नगर । माझ्या साईबाबांनी ॥२१॥ संततीहीनांस संतती । गोर-गरीबां संपत्ती । देत गेले भक्तांप्रती । कीर्ती ऐसी ऐकिली ॥२२॥ भक्तांचिया मदतीसाठी । धावोनि जाई ते जगजेठी । सदाच रक्षा करी संकटी । आपुलियां दासांची ॥२३॥ म्हाळसापती भक्त जाण । बाबांस मानी गुरुसमान । त्यानेच साईबाबा म्हणोन । नाम ठेविलें बाबांचे ॥२४॥ आता सांगतो साईलीला । ज्या ज्या घडल्या शिरडीला । मी जो महिमा श्रवण केला । तोच वर्णितो श्रोतियां ॥२५॥ त्या समयीं गणपतराव कोते । या नावाचे भक्त होते । बायजाबाई पत्नी तयांते । होती बहु भाविक ॥२६॥ कवणें एके शुभ दिवशी । श्री बाबांच्या दर्शनासी । बायजाबाई मशिदीशी । जाऊनियां पोहोचल्या ॥२६॥ ऐका ऐका नवलाई । उभे राहिले बाबा साई । यावें यावें मामीबाई । स्वागत केले बाईंचे ॥२७॥ धन्य धन्य ती माऊली । श्री साईकृपेची सावली । जगतीं तियेसी लाभली । नमन माझें साष्टांगीं ॥२८॥ रोज द्वारकामाईत जाऊन । बाबांसी वाढावे जेवण । बायजाबाईचा नित्यनेम । होऊनियां बैसला ॥२९॥ आधी बाबांना भोजन द्यावे । मग स्वतः ग्रहण करावें । साई पूजावें जीवे-भावें । हाचि धर्म तियेचा ॥३०॥ तोचि नियम आजपर्यंत । रूढ आहे कोते घराण्यांत । आधी नेवैद्य श्रीमंदिरांत । मग जेवावे सर्वांनी ॥३१॥ धन्य धन्य कोते परिवार । तयें लाभला साई निरंतर । साईविना दुजा आधार । नाही ऐसे मानिलें ॥३२॥ ठराविक ऐशा पाच घरीं । बाबा मागत भाकरी । त्यातून अन्न उरलें जरी । खाऊ घालीत श्वानांसी ॥३३॥ ऐसे बाबा परोपकारी । पुजू लागली जनता सारी । श्री साईमूर्ती घरोघरीं । स्थापन झाली तेधवां ॥३४॥ रामनवमींस भरें भक्तमेळा । लाखों भक्त होती गोळा । कैसा वर्णावा तो सोहळा । भाषा पडेल पांगुळीं ॥३५॥ कोणी चढवी पुष्पहार । कोणी आदरें चादर । अखंड चाले जयजयकार । श्री साईनामाचा ॥३६॥ पदर पसरुनियां कोणी । साईचरणीं करी मागणी । केवळ दर्शन घेऊनि कोणी । निरोप घेती बाबांचा ॥३७॥ कोणी रंजला गांजला । जर का शिरडीत पोहोचला । तर साईकृपें त्याजला । शांति मिळे निश्चित ॥३८॥ शांत ठेवोनियां आपुलें चित्त । ऐक श्रोतयां हकिकत । ऐसी घडली शिरडी नगरांत । तीच सांगतो तुजलागीं ॥३९॥ घटना ऐसी अघटित । एकदा घडली शिरडीत । श्रीबाबा पणत्या लावीत । मशिदीमाजी दररोज ॥४०॥ तेल आणावे मागून । त्यांच्या पणत्या लावून । बैसावें आनंदित होऊन । हा नेम होता बाबांचा ॥४१॥ एके दिवशी साईनाथ । कटोरा घेऊन हातांत । तेल मागावया गावांत । सर्व दुकानीं हिंडले ॥४२॥ परी ते सर्व दुकानदार । तेलासाठी देती नकार । काय घडला चमत्कार । शांत चित्ते परिसिजें ॥४३॥ हळूहळू वाढे अंधार । चिंताग्रस्त झाले साईश्वर । भक्त तेव्हा दोन-चार । गोळा जाहलें बाबांचे ॥४४॥ होवोनिया क्रोधायमान । आज्ञा केली भक्तांलागून । विहिरीवरती त्वरित जाऊन । पाणी आणा थोडेसें ॥४५॥ जमल्यापैकी एक भक्त । विहिरीवर गेला धावत । पाणी घेऊन त्वरित । साईचरणीं ठाकला ॥४६॥ सर्व पणत्यांत भरलें पाणी । स्वतः श्री साईबाबांनी । पणत्या जळल्या अखंड रजनी । जनता दंग जाहली ॥४७॥ तेल नाकारणारे व्यापारी । मशिदीत आले झडकरी । लोटांगण श्री चरणांवरी । त्या सर्वांनी घातले ॥४८॥ मग श्रोतयां तदनंतर । कोणी न च करी इन्कार । सर्वांतरीं वसला आदर । श्री साईबाबांविषयीं ॥४९॥ बघा एक दुसरी कथा । सांगतो स्मरुनी साईनाथा । चमत्कार एका भक्ता । कैसा दाविला बाबांनी ॥५०॥ श्री काकासाहेब दीक्षित । बैसले असता ध्यानस्थ । तेव्हा तयांसी साक्षात । दर्शन घडले श्रीहरीचे ॥५१॥ काका करिती विचार । कैसा झाला हा चमत्कार । श्री पांडुरंग येथवर । कैसे येऊनियां पोहोचले ॥५२॥ येईल कैसा भगवान । मज द्यावयां दर्शन । अस्थिर झाले काकांचे मन । काहीच त्यांसी सुचेना ॥५३॥ अखेर धांवत धांवत । काका गेलें मशिदीत । जोडोनियां त्यांनी हात । साईचरणीं ठाकलें ॥५४॥ काका काही न च बोलता । सर्वच कळलें साईनाथा । घाबरलेले काका बघतां । हसू लागले श्रीसाई ॥५५॥ काकांस पुसती श्री साई । पांडुरंग भेटला की नाही? । का बरें धांवत घाई घाई । आलास काका मजपाशी ॥५६॥ पळपुट्या आहे तो देव । घट्ट धरूनि तयां ठेव । नसतो मुळीं निभाव । एके ठायीं तयाचा ॥५७॥ नाही तयाचा भरवसा । केव्हा कुठे जाईल कैसा । पक्षी उडूनि जाई तैसा । देव जातो उडोनि ॥५८॥ बोलणें हे श्रींचे ऐकून । श्री काका चकित होऊन । चरणीं घातले लोटांगण । श्रीसाईबाबांच्या ॥५९॥ तदनंतर दुसरें दिवशी । बाजार होता शिरडीसी । हकिकत घडली ऐसी । चित्त लावुनि ऐकावी ॥६०॥ श्री काकासाहेब दीक्षित । सहज फिरत फिरत । गेले बघा बाजारांत । काय घडलें तेव्हा ॥६१॥ काका एका दुकानावरी । थांबले बघावया तसबिरी । चमत्कार हा खरोखरी । काय पहिले काकांनी ॥६२॥ आदल्या दिवशी जी मूर्ती । ध्यानस्थ असता पाहिली होती । फोटोत त्या दुकानांत पुन्हा ती । दृष्टीं पडली काकांच्या ॥६३॥ काका जाहलें चकित । तसबीर ती घेतली विकत । आणोनियां स्वगृहांत । पूजेसाठी लाविली ॥६४॥ धन्य धन्य ते काका धन्य । जयांस घडलें प्रभूदर्शन । श्री साईचरणीं जीवन । वेचिलें हो जयांनी ॥६५॥ लाखों भक्त ऐसें बोलती । नाना तऱ्हेचे दाखलें देती । गुंग होई आपली मती । साईचरितां ऐकोनि ॥६६॥ एक होते छोटेसे गांव । धूपखेडें तयाचे नांव । तेथे श्रीबाबांनी धांव । ऐका कैसी घेतली ॥६७॥ पाटील तिथला चांदभाई । तयां भेटले कैसे साई । श्रोतयां ही नवलाई । शांत चित्तें परिसावी ॥६८॥ चांदभाईचा घोडा हरवला । तयां निघे शोधायाला । हिंडता हिंडता रानांत गेला । काय तयानें पाहिले ॥६९॥ एका वृक्षाच्या छायेंत । बैसले होते साईनाथ । बघुनि चांदभाईस घाईत । बोलाविले बाबांनी ॥७०॥ कां बरें फिरतोस रानी-वनी । कडक उन्हांत एकटा प्राणी । ऐकुनी ही बाबांची वाणी । चांदभाई बोलला ॥७१॥ हरवलां आहे माझा घोडा । जीव होई थोडा घाबरा । अतिचतुर तयां न जोडा । सबंध जिल्ह्यामाजी या ॥७२॥ मग बोलले सद्‌गुरु । मुळींच नको चिंता करू । बैस आधी चिलीम भरू । घोडा येथेचि येईल ॥७३॥ चिलीम झाली तयार । परंतु नव्हता अंगार । चांदभाईस पडला विचार । आतां काय करावे ॥७४॥ प्रसंग बाबांनी जाणला । चिमटा आदळला धरणीला । तेव्हा अग्नी निर्माण झाला । एक मोठा निखारा ॥७५॥ चिलीम ओढावयां सुरुवात । होते न होते इतक्यांत । चांदभाईचा घोडा धांवत । तयापाशी पोहोचला ॥७६॥ चांदभाई बहु आनंदला । तुम्ही आहांत वल्ली अल्ला । एकदां या आमच्या गांवाला । विनंती आहे माझी ही ॥७७॥ काही कालांतराने । श्री साई गेले धूपखेडें गांवीं । न कळें कैसी वर्णावी । साईलीला अपार ती ॥७८॥ कधी जावें भक्तांघरी । कधी मशिदीभितरीं । बायजाबाईची भाकरी । खावयांस यावें शिरडीत ॥७९॥ कधी रानीं-वनीं फिरतां । कधी भगवंतास स्मरतां । कधी भक्तां आशिष देतां । दर्शन घडे साईंचे ॥८०॥ पुढें परिसावी साईकथा । स्थिर ठेवुनी आपल्या चित्ता । अभिमान होता निजभक्ता । काय केले बाबांनी ॥८१॥ काय घडले श्रोतयां देख । गोष्ट तुजसी सांगतो एक । काशिराम शिंपी भक्तभाविक । शिरडीत रहात असे ॥८२॥ श्रींची सेवा करी दिन रात । सदा मग्न असे भजनांत । पण ‘ग’ ची बाधा त्यास । कशी बाधली तयातें ॥८३॥ शेकडो भक्त येती दर्शना । पण कोणाकडूनही दक्षिणा । पैसा, अधेला अथवा आणा । घेत नव्हते श्री साई ॥८४॥ काशिरामास बाबा प्रसन्न । त्यास झाला अभिमान । बैसला एकदा हट्ट धरून । की दक्षिणा घ्यावी बाबांनी ॥८५॥ सबंध दिवसाची कमाई । श्री साईबाबांच्यापुढे ठेवी । घेत होते बाबाही । पैसा-अधेला त्यांतूनि ॥८६॥ प्रियभक्ताची इच्छा म्हणून । दक्षिणा घेत उचलून । काशिराम जाई फुलून । सांगू लागले लोकांप्रति ॥८७॥ घेत नाहीत कोणाकडूनही । पण माझी दक्षिणा श्रीसाई । बघा घेतात की नाही । ऐसे सांगे गर्वाने ॥८८॥ याचा गर्व नष्ट करावा । सन्मार्गी यासी लावावा । चमत्कार यास दाखवावा । ऐसे ठरविले बाबांनी ॥८९॥ काशिरामें जे पुढे ठेवावे । तितुके सर्व उचलून घ्यावे । आणखी पैसे आणून द्यावे । आज्ञा करिती श्रीसाई ॥९०॥ जितुका मिळवावा पैसा । बाबांसी सगळा द्यावा तैसा । काशिरामाचा नेम ऐसा । काही काळ चालला ॥९१॥ विकले त्याने घर-दार । सारे शेत व शिवार । इकडे श्रींचा आग्रह फार । वाढू लागला मागणीचा ॥९२॥ गेले सर्व, खुंटली कमाई । आता दक्षिणा कोठून द्यावी । काशिरामास सुचेना काही । चिंताग्रस्त जाहला ॥९३॥ अखेर घेतली माघार । पडला जाऊन श्रीचरणांवर । म्हणे दयाळा मजवर । दया आता करावी ॥९४॥ मी जाहलो भिकारी । ओढवली अवदसा भारी । इस्टेट संपली सारी । कैसी दक्षिणा देऊ मी ॥९५॥ काशिरामास आला अनुभव । मी दीन-दुबळा मानव । दक्षिणा देण्याचा हा गर्व । माझेच नडलें मजलागीं ॥९६॥ मानवाची नाही शक्ती । काही देईल देवांप्रति । पण प्रसन्न होती साईमूर्ती । काशिरामावर बहुत ॥९७॥ श्रीबाबांनी आशिष दिधला । तेरा भला करेगा अल्ला । काशिराम तो सुखी झाला । पूर्ववत तैसाचि ॥९८॥ परत मिळाली संपत्ती । टळून गेली आपत्ती । केवळ श्रीचरणांवरती । जीवन गेले तयाचे ॥९९॥ किड्या-मुंग्यांस घाली साखर । भुकेल्यास देई भाकर । जेणेंकरून तो ईश्वर । सुखी ठेवील तुजलागीं ॥१००॥ मुक्ती लाभेल तुजला खास । ऐसा दिधला आशिष । प्रियभक्त काशिरामास । कृपावंत बाबांनी ॥१०१॥ काशिराम झाला धन्य । श्रीचरणीं होऊन अनन्य । फळां आले तयाचे पुण्य । नमन माझे त्यालाही ॥१०२॥ श्री साईंचे भजतो नाम । हाचि माझा नेमधर्म । हेच माझे तीर्थ-धाम । दृढ व्हावें श्रीचरणीं ॥१०३॥ आई-बाप साईश्वर । शिरडी माझे पंढरपूर । गोकुळ, काशी, हरिद्वार । वास जेथे बाबांचा ॥१०४॥ तुकारामांसम संत होऊनि गेले । स्वयें तरूनी इतरां तारीलें । तैसे साईनाथ अवतरलें । उद्धार करण्यां भक्तांचा ॥१०५॥ आत्मसंतोषी, परोपकारी । अंतर्ज्ञानी, तपस्वी भारी । दीनानाथांचे कैवारी । साईनाथ जाहले ॥१०६॥ चिलीम, तंबाखू बरोबर । हातीं कटोरा निरंतर । इतुकाचि असे संसार । माझ्या साईबाबांचा ॥१०७॥ कधी झोपावे मशिदीत । कधी विश्रांती चावडीत । निंबवृक्षास्थळीं बसत । असत श्रीबाबा ॥१०८॥ जवळ ती पेटलेली धुनी । ध्यास प्रभूचा सदा मनीं । अल्ला-मालिक मुखे बोलुनी । उद्धरिलें अनेक भक्तांना ॥१०९॥ मंदिरी चाले आरती । आनंदूनि जाये नभ-धरती । जयजयकार जन करिती । माझ्या साईनाथाचा ॥११०॥ जो साईचरणीं झाला लीन । सुखी झाले त्याचे जीवन । ज्याने धरले साईध्यान । भवसागर तरला तो ॥१११॥ विनवतो तुम्हांला म्हणून । जगीं नरजन्मीं येऊन । एकदा अवश्य घ्यावे दर्शन । साईसमाधीचे ॥११२॥ करां साईंचे नामस्मरण । मनोरथ होतील पूर्ण । दुःख अवघें जाईल टळून । साईकृपें तुमचे ॥११३॥ केले इतुकें गुणगान । देहभान विसरून । बाळ मी तुमचा अज्ञान । क्षमा चुकीची करावी ॥११४॥

इति कवी साहेबराव कोकाटेकृत श्री साईनाथ माहात्म्य संपूर्णम ॥

नमो श्री साईनाथाय नमः ॥

ॐ साई श्री साई जय जय साई ॥

श्री गुरुदेव दत्त ॥