Nov 16, 2023

श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि अर्थात श्रीगुरुचरित्र अध्याय - १४


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. ज्या दत्तभक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती, भक्तिपूर्वक पारायणे करावीत, असे अनेक अधिकारी संतमहात्म्यांनी सांगितले आहे. त्यांतीलच एक अध्याय म्हणजे चौदावा अध्याय - आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ हा अध्याय अवश्य वाचावा. गुरुकृपा किती प्रभावी असते हे सांगणारा हा अध्याय या श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. मेरुमणि म्हणजेच एखाद्या माळेंतील मोठा, मध्यवर्तिमणि किंवा मुख्य आधारस्तंभ ! क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नामक या अध्यायचेही असेच महत्व आहे. ' न मे भक्त: प्रणश्यति ' अर्थात माझा भक्त कधीही नाश पावत नाही, असे भगवंतांचे वचन आहे. याच वचनांची, श्रीगुरूंच्या भक्तवात्सल्यतेची पूर्णतः अनुभूती देणाऱ्या या अध्यायाच्या चिंतनाचा हा अल्प प्रयास ! ही यथामति केलेली वाङ्मयसेवा कृपामूर्ती श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावीं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना !!


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥      नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१॥ जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥३॥  श्री सिद्धांनी सांगितलेल्या श्रीगुरूंच्या लीला ऐकून नामधारक भक्तिरसांत रंगून गेला. त्याने मोठ्या उत्सुकतेने सिद्धांना प्रश्न केला, " हे योगीश्वरा, मला श्रीगुरुंचे पुढील चरित्र विस्तारपूर्वक सांगा. पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणांवर श्रीगुरुंनी कृपा केली आणि त्याला व्याधिमुक्त केले. त्यानंतर काय घडले ? "     ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी । भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥७॥  शिष्याचा हा भाव पाहून सिद्धांना संतोष झाला आणि त्यांनी कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " हे शिष्योत्तमा, त्या दिवशी ज्याच्या घरी भिक्षा घेतली होती, त्या सायंदेव नामक ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले. त्याची श्रीगुरुचरणीं अनन्य भक्ति दृढ झाली होती, गुरुभक्ती कशी करावी हे तो जाणत होता.

सायंदेव व त्याची पत्नी जाखाई हिने ज्या उत्कट भक्तिभावाने श्री नृसिंह सरस्वती महाराजांची षोडशोपचारे पूजा केली, त्याचे सुरेख वर्णन गुरुचरित्रकारांनी तेराव्या अध्यायांत केले आहे. दत्तभक्तांसाठी ते श्रीगुरुपूजेचे विधान इथे थोडक्यांत देत आहोत. - समस्त शिष्यगण आणि तो उदरव्यथा असलेला ब्राह्मण यांसह श्रीनृसिंहसरस्वती महाराज सायंदेवाच्या घरी भोजनासाठी गेले. तेव्हा त्याने सर्व घर सुशोभित केले होते, सुंदर पंचवर्णी रांगोळ्या काढल्या होत्या. सायंदेव आणि त्याची पत्नी यांनी सर्वांचे योग्य स्वागत केले. श्रीगुरुंना बसण्यासाठी एक अतिशय सुंदर आसन मांडले होते. त्याचप्रमाणे सर्व शिष्यमंडळींसाठीही आसने तयार केली होती. प्रथमतः सायंदेवाने सपत्नीक मंडलार्चन विधी करून श्रीगुरुमहाराजांना पुष्प-गंधाक्षता वाहिल्या. श्रद्धापूर्वक शास्त्रोक्त संकल्प करून श्रीगुरुचरणांवर मोठ्या भक्तिभावाने मस्तक ठेवून साष्टांग नमन केले. श्रीगुरूंचे भवतारक चरण अतीव पूज्यभावानें आपल्या सर्वांगावरून फिरविले. तदनंतर पंचामृतादि स्नान, रुद्रसूक्तासह अभिषेक करून श्रीगुरुचरणांची षोडशोपचारे पूजा केली. त्या चरणतीर्थाचेही त्याने मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजन केले. त्यावेळी गीतवाद्यांच्या गजरात नीरांजन ओवाळीत आरती केली. अनेक प्रकारचे गायन करून त्या दाम्पत्याने श्रीगुरुमहाराजांना मोठ्या श्रद्धापूर्वक नमनही केले. या विशेष श्रीगुरुपूजनानंतर सर्व शिष्यवर्गाचाही योग्य आदरसत्कार करून त्यांचेही यथाविधी पूजन केले. सर्वांना वंदन केले. त्यानंतर नमनभावें सर्वांसाठी भोजनाची पानें मांडली. पानांभोवती सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या, अष्टदल कमल होते. प्रत्यक्ष श्रीगुरुमहाराज भिक्षेला येणार होते, त्यांमुळे त्या मंगल प्रसंगी जाखाईने खास रांधलेलें अनारसें, उडदाचे पदार्थ आणि अष्टविध पक्वान्नें वाढले. त्या भाविक दाम्पत्याचे उत्तम आदरातिथ्य स्वीकारून श्रीगुरुनाथांनी आपल्या शिष्यांसह प्रीतीपूर्वक भोजन केले. तो पोटशूळ असलेला ब्राह्मणदेखील पोटभर जेवला. श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी समूळ नष्ट झाली. असा त्यावेळी मोठा आनंदसोहळा झाला. त्याचा हा भक्तिभाव पाहून श्रीगुरु संतुष्ट होऊन त्याला म्हणाले, " मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या वंशात माझे भक्त होतील."    
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्‌गुरु । त्रयमूर्तींचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आता तुम्हांसी । तें कृपा करणे गुरुमूर्ति ॥११॥ 
श्रीगुरुंचे हे आशीर्वचन ऐकून सायंदेवाला अत्यानंद झाला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची स्तुती केली. तो म्हणाला, " हे जगदगुरो, तुमचा जयजयकार असो. तुम्ही प्रत्यक्ष त्रयमूर्तींचे अवतार आहात. परंतु आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हांला मानवरूपांत दिसता. तुमचा महिमा वेदांनाही कळलेला नाही. तुम्हीच विश्वव्यापक असून साक्षात ब्रह्मा-विष्णु व महेश आहात. आपण भक्तजनांना तारण्यासाठीच हा मानववेष धारण केलेला आहे. तुमचे माहात्म्य वर्णन करणे आम्हांस कदापिही शक्य नाही. हे कृपामूर्ती, माझे एक मागणें तुम्ही पूर्ण करावे. - माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी । इह सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्‌गती ॥१२॥  
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनी । सेवा करितो द्वारयवनी । महाशूरक्रुर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी । घात करितो जीवेसी । याचि कारणे आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी ॥१५॥ 
अशी प्रार्थना करून सायंदेवाने पुन्हा एकदा श्रीगुरुंची करुणा भाकली. गुरुकृपेचे कवच लाभण्यासाठी परोपरीची विनवणी करत तो म्हणाला," मी येथे ज्या यवन अधिकाऱ्याच्या सेवेत आहे, तो अत्यंत क्रूर आहे. तो यवन दरवर्षी एका विप्राला ठार मारतो, आज मला त्याने केवळ याच कारणासाठी बोलावले आहे. मी तिथे गेलो तर तो माझे प्राण निश्चितच घेईल. पण या भवतारक श्रीगुरुचरणांचे दर्शन झाल्यावर मला असे मरण कदापिही येणार नाही.   
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । अभयंकर आपुले हाती । विप्रमस्तकी ठेविती । चिंता न करी म्हणोनिया ॥१६॥ भय सांडूनि तुवां जावे । क्रुर यवना भेटावे । संतोषोनि प्रियभावे । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥१७॥ जंववरी तू परतोनि येसी । असो आम्ही भरंवसी । तुवां आलिया संतोषी । जाऊ आम्हीं येथोनि ॥१८॥ निजभक्त आमुचा तू होसी । पारंपर-वंशोवंशी । अखिलाभीष्ट तू पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥ 
सायंदेवाचा असा दृढभाव पाहून श्रीगुरुमहाराज प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला अभयहस्त ठेवला आणि त्या भक्तास ग्वाही देत म्हणाले," तू अगदी निर्भय होऊन त्या क्रूर यवनाकडे जा. तो तुझा आदर-सत्कार करून तुला आमच्याकडे परत पाठवील. तू सुखरूप परत येईपर्यंत आम्ही येथेच राहू, हे आमचे अभिवचन आहे. त्यानंतरच आम्ही येथून गमन करू. तू आमचा अत्यंत प्रिय भक्त आहेस. तुझ्या वंशास गुरुभक्तीचे वरदान असेल. तुझे सर्व अभीष्ट कल्याण होईल. तुला उत्तम संततिसुख लाभेल." दत्तभक्तहो, अशी ग्वाही केवळ सद्‌गुरुच देऊ शकतात.
तुझे वंशपारंपरी । सुखे नांदती पुत्रपौत्री । अखंड लक्ष्मी तयां घरी । निरोगी होती शतायुषी ॥२०॥ स्वयं श्रीदत्तमहाराजांनी वरस्वरूप दिलेले असे अनेक शुभाशिष - श्रीदत्ताशिष - तुझे पूर्वज सायंदेव यास लाभले.     
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथे होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा । ब्राह्मणाते पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥२२॥ विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥२३॥ कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रुर दुष्ट ॥२४॥ गरुडाचिया पिलीयांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसे तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचे भय नाही ॥२६॥ 
श्रीगुरुकृपेचे असे अमोघ वरदान प्राप्त करून सायंदेव त्या यवनाकडे सत्वर निघाला. यमासारखा भयंकर असा तो यवन राजा अत्यंत दुष्ट होता. सायंदेवाला पाहताच तो क्रोधाने अग्निज्वाळांसारखा लालेलाल झाला. आता कुठल्याही क्षणीं हा आपल्याला मारणार, अशी भीती सायंदेवास वाटली. तोच एक नवल घडलें! तो यवन तिथून तोंड फिरवून घरांत गेला. सायंदेव जरी भयभीत झाला होता, तरी तो श्रीगुरुंचे मनोमन ध्यान करून प्रार्थना करू लागला - वाळवीला कितीही राग आला तरी ती अग्नीस स्पर्शही करू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरुकृपेचे अभेद्य कवच लाभलेल्यास दुष्ट कधीही इजा करू शकत नाही. गरुडाच्या पिल्लांना का कधी सर्प खाऊ शकेल ? किंवा मग ऐरावतसारखा महाकाय हत्ती असला तरी तो सिंहाला कधी खातो का ? तसेच गुरुकृपा ज्यावर होते, त्याला कलिकाळाचेही भय नसते. गुरुमहाराजांचा वरदहस्त ज्याच्या मस्तकी आहे, त्याला अपमृत्यूची भीती बाळगण्याचे कारणच काय? - ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचे भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ ज्यासि नांही मृत्यूचे भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही ॥२८॥ श्रीगुरुकृपेचा हा असा प्रभाव आहे.  
ऐसेपरी तो यवन । अन्तःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाही ॥२९॥ हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसी । प्राणांतक व्यथेसी । कष्टतसे तये वेळी ॥३०॥ स्मरण असे नसे कांही । म्हणे शस्त्रे मारितो घाई । छेदन करितो अवेव पाही । विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण जाहले तये वेळी । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळी । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ येथे पाचारिले कवणी । जावे त्वरित परतोनि । वस्त्रे भूषणे देवोनि । निरोप दे तो तये वेळी ॥३३॥
इकडे तो यवन अधिकारी जो शयनगृहांत गेला तो एखाद्या भ्रमिष्टासारखा अस्वस्थ झाला. त्याला अचानक निद्रा येऊ लागली. काही वेळांतच तो जागा झाला, तेव्हा त्याला हृदयशूळ होऊन प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. आपल्याला काय होत आहे, आपण कुठे आहे हेच त्याला कळेना. त्यावेळी त्याला कशाचेच भान राहिले नाही. एक तेजस्वी विप्र शस्त्रांचे प्रहार करून आपले सर्व अवयव तोडीत आहे, असा त्याला भास होऊ लागला. काही क्षणांतच त्याला देहभान आले आणि एकदम आठवले की त्याने आज सायंदेवाला बोलावले होते व तो बाहेर उभा आहे. हे स्मरण होताच तो यवन आपल्या शयनगृहांतून लगेचच धावत बाहेर आला आणि त्या सायंदेव ब्राह्मणाच्या पायांवर लोळण घेत म्हणाला," तूच माझा स्वामी आहेस. तुला येथे कोणी बोलावले ? आता तू सत्वर परत जा."
दत्तभक्तहो, वास्तविकता अशी होती की त्या यवन अधिकाऱ्याकडे सायंदेव विप्र चाकरी करत होता, मात्र श्रीगुरुकृपेमुळे त्या यवन अधिकाऱ्याची बुद्धी पालटली होती. एव्हढेच नव्हें तर त्याने वस्त्रें-भूषणें देऊन सायंदेवाचा आदर-सत्कार केला आणि त्याला घरी परत जाण्यास सांगितले. श्रीगुरूंच्या वचनांची प्रचिती त्या शिष्योत्तमास आली होती. खरोखरच, त्या यवन अधिकाऱ्याने मोठ्या प्रेमाने सायंदेवाला निरोप देऊन घरी पाठविले होते.    
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरी असे वासर । श्रीगुरुंचे चरणदर्शना ॥३४॥ देखोनिया श्रीगुरूसी । नमन करी तो भावेसी । स्तोत्र करी बहुवसी । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥
सायंदेवाची त्यावेळी काय मनःस्थिती झाली असेल, त्याचे वर्णन करणे सर्वथा अशक्य आहे. समोर मृत्युभय दिसत असतांना केवळ श्रीगुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून हा गुरुभक्त यवन अधिकाऱ्याकडे आला होता. त्याच्या गुरुसेवेचे फळ त्याला मिळाले होते, त्याचे गंडांतर टळले होते. त्याच्या चित्तांत अत्यंत कृतज्ञभाव दाटला होता. कधी एकदा श्रीगुरुचरणांचे दर्शन होईल ? असा विचार करीत तो शीघ्र प्रवास करत होता. अतिशय आनंदाने तो सायंदेव गोदाकाठी असलेल्या 'वासर' नामक आपल्या गावी परतला. तेथे श्रीगुरुमहाराज होतेच. सायंदेवाने अनन्यभावानें त्यांच्या चरणकमळांवर मस्तक ठेवले आणि अनेक प्रकारे गुरुस्तुती केली. नंतर यवन अधिकाऱ्याकडे घडलेला सर्व वृत्तांतही सांगितला.       
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊ म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥ ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबे आतां तुमचे चरण । आपण येईन समागमे ॥३७॥ तुमचे चरणाविणे देखा । राहो न शके क्षण एका । संसारसागर तारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥ उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसे स्वामी आम्हासी । दर्शन दिधले आपुले ॥३९॥ भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हा सोडणे काय नीति । सवे येऊ निश्चिती । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥ 
त्रिकालज्ञानी श्रीगुरुंना सर्व ज्ञात होतेच, सायंदेवाचा भाव पाहून ते संतुष्ट झाले. " शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ।" असे ते गुरुमहाराज पुन्हा एकदा त्याला अभयवचन देऊन म्हणाले," आता आम्ही दक्षिणेकडील तीर्थयात्रा करण्याकरिता येथून निघू." आपल्यावर नुकतेच आलेले प्राणघातक संकट केवळ श्रीगुरुकृपेमुळे टळले, हे सायंदेवाला पुरतें उमगले होते. ' खोटी ही प्रपंचमाया । आलें आज कळोनीया ।' ही उपरती त्याला झाली होती. त्यामुळे श्रीगुरुंचा विरह त्याला सहन होईना, तो हात जोडून प्रार्थना करीत त्यांना म्हणाला," महाराज, आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ।.. हे तुमचे हे दिव्य चरण सोडून मी आता कोठेही जाणार नाही. मीही तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो. हे कृपासिंधो, या भवसागरातून तारणारे केवळ तुम्हीच आहांत. पूर्वी भगीरथाने सगरपुत्रांच्या उद्धारासाठी गंगा भूमीवर आणली. तसेच तुम्ही प्रत्यक्ष त्रिमूर्तीस्वरूप स्वामी असून आमच्या उद्धारासाठी मनुष्यरूप धारण करून या भूतलांवर अवतरीत झाला. भक्तवत्सल अशी तुमची ख्याति आहे, आता ते ब्रीद सोडणें योग्य आहे का ? मी तुमच्याबरोबर येणारच." आणि अनन्य शरणागत होऊन त्याने गुरूंचे पाय धरले.  
येणेपरी श्रीगुरूसी । विनवी विप्र भावेसी । संतोषोनि विनयेसी । श्रीगुरू म्हणती तये वेळी ॥४१॥ कारण असे आम्हा जाणे । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणे । संवत्सरी पंचदशी ॥४२॥ आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करू हे निश्चित । कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनी भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥ न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे । म्हणोनि हस्त ठेविती मस्तके । भाक देती तये वेळी ॥४४॥ 
सायंदेवाने आपला सर्वस्वभाव श्रीगुरुचरणीं अर्पून अशी विनवणी केली, तेव्हा गुरुमहाराज त्याच्यावर प्रसन्न झाले आणि  " सांप्रत आम्हांला दक्षिणेकडील तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देऊ. त्यांवेळी आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू तुझी पत्नी-मुले आणि इतर नातेवाईकांसह मला भेट. तू निःशंक होऊन सुखाने राहा, तुझी सर्व संकटे व दुःखे गेलीच म्हणून समज." असे म्हणत त्या सायंदेवाच्या मस्तकावर हात ठेवून श्रीगुरुंनी त्याला आशीर्वचन दिले. 
ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरू निघाले तेथोनि । जेथे असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥ समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरू आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथे राहिले गुप्तरूपे ॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठे ठेविले ॥४७॥ गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारून । सांगे नामकरणीस ॥४८॥ पुढील कथेचा विस्तारू । सांगता विचित्र अपारु । मन करूनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥
सिद्ध म्हणतात - त्यानंतर त्याचा निरोप घेऊन श्रीगुरु समस्त शिष्यांसोबत तिथून निघाले. अनेक तीर्थे पाहात ते वैजनाथ नामक क्षेत्रीं आले. आरोग्यभवानीचे स्थान असलेले हे अतिशय प्रख्यात असे तीर्थ आहे. श्रीक्षेत्र वैजनाथ येथे श्रीगुरुंनी काही काळ गुप्त रूपाने राहायचे ठरविले. त्यावर नामधारकाने मोठ्या कुतूहलाने विचारले," श्रीगुरुंना गुप्त होण्याचे कारण काय ? मग त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या शिष्यपरिवारांस कोठे जाण्यास सांगितले ?" कामधेनूस्वरूप गुरुचरित्रातील पुढील कथा अतिशय अद्भुत आहे. श्रोतें हो, तुम्ही ती मन एकाग्र करून ऐका.    
॥ इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः ॥

दत्तभक्तहो, केवळ ४९ ओव्यांचा हा चौदावा अध्याय तुम्ही विशेष पाठांत ठेवावा. तो श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. याचे भक्तिभावाने पारायण व चिंतन केल्यास दुर्धर संकटांचा नाश होतो, असे अनेक थोर पुरुषांचे वचन आहे. 
पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणाचे कसे निमित्त झाले आणि सायंदेवावर श्रीगुरुंची कृपा कशी झाली, हा कथाभाग या अध्यायात आलेला आहे. यांत विशेष लक्षांत घेण्यासारखा मुद्दा असा की सायंदेवांकडून प्रथम श्रीगुरुंनी प्रामुख्याने १)परोपकार २)अन्नदान ३)गुरुसेवा-गुरुभक्ती अशी तीन प्रकारची सेवा करून घेतली आणि सर्वात महत्वाची ४)गुरुवाक्य प्रमाण ही श्रद्धा - अशी कसोटीही घेतली. तदनंतरच त्याचे प्राणसंकटातून रक्षण केले. प्रथमतः त्या उदरव्यथेच्या ब्राह्मणास घरी भोजनासाठी बोलाविण्यास तो साशंक होता. कारण भोजन करून जर त्या पोटशूळाची व्याधी असलेल्या ब्राह्मणाचा जीव गेल्यास आपल्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल, अशी भीती सायंदेवास होती. मात्र प्रथमभेटीतच त्याने श्रीगुरुंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून उदरव्यथेच्या ब्राह्मणास भोजनास आपल्या गृहीं बोलाविले. पुढें पूजन करणे, भिक्षान्न भोजन देणे ही सेवा करतांना सायंदेव व त्याची पत्नी जाखाई यांचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्यांमुळेच श्रीगुरु प्रसन्न झाले.

' न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे ।... ' अशी भाक प्रत्यक्ष त्या परब्रह्माकडून सायंदेवाला मिळाली, त्याच्या भाग्याचे काय अन किती वर्णन करावे बरें ? वरद-कृपाघन श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी कडगंची इथे त्याच्या घरी भिक्षा घेतलीच, अन तद्-नंतर गाणगापुर येथे श्रीगुरु असतांनादेखील पुनःश्च स्वगृहीं यथासांग श्रीगुरुपूजन आणि मोठी समाराधना करण्याचे महद्भाग्य या सद्‌भक्तास अन त्याच्या संपूर्ण परिवारास लाभले. भक्तकामकल्पद्रुम दत्तमहाराज किमान दोनदा तरी या शिष्योत्तमाच्या घरीं गेले होते, असा श्रीगुरुचरित्रांत स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, पुढें पंधरा वर्षांनी नित्य श्रीगुरुदर्शन, सेवा, सान्निध्य, काशीयात्रापुण्यफळ आणि प्रत्यक्ष श्रीगुरुदेवांच्या उपस्थितीत अनंतव्रत पूजन असे अनेक परमलाभ सायंदेवास प्राप्त झाले. अर्थात त्याचा जो अनन्यभाव श्रीगुरुचरणीं स्थिर झाला होता, त्याचेच हे वरदानस्वरूप फळ होते.

' कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें ।... ' या उक्तीची प्रचिती असंख्य दत्तभक्तांनी आजपर्यंत नित्य अनुभवली आहे. तेव्हा आपणही - " श्रीगुरुकृपेची त्वरित प्रचिती देणाऱ्या या मेरुमणि अध्यायाचे नित्य स्मरण-पठण घडावें आणि गुरुमहाराजांच्या ठायीं सायंदेवाचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्याच्या किमान एक कोट्यांश भक्तिभाव तरी दत्तमहाराजांची ही अत्यल्प सेवा करतांना आपल्या मनांत दृढ व्हावा !", हीच त्या भक्तवत्सल, शरणागत-तारक आणि भवभय-वारण अशा श्रीदत्तप्रभूंच्या चरणीं प्रार्थना करू या !

   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

Nov 9, 2023

श्रीपादश्रीवल्लभस्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥













ब्राह्मण्यै यो मंक्षु भिक्षान्नतोऽभूत्प्रीतस्तस्या यः कृपार्द्र: सुतोऽभूत् । 

विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिद्रौ ॥१॥ भावार्थ : जे सुमतीनामक ब्राह्मणीने दिलेले भिक्षान्न स्वीकारून तिच्यावर त्वरित प्रसन्न झाले, आणि कृपाप्रसाद म्हणून स्वतः तिचे पुत्र झाले. ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?      आश्वास्याम्बां प्रव्रजन्नग्रजान्यः कृत्वा स्वङ्गान् संचचारार्यमान्यः ।  विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥२॥ भावार्थ : ज्यांनी (साधुजनांना दीक्षा देण्यासाठी) तीर्थाटनाला जातांना (केवळ आपल्या हस्तस्पर्शाने) ज्येष्ठ बंधुंच्या व्यंगाचा परिहार करून मातेला आश्वस्त केले, जे सर्व विद्वज्जनांना पूजनीय आहेत आणि जे भक्तजनांच्या कल्याणासाठी या भूमीवर संचार करू लागले, ते तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावरील एकांत स्थळीं अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?      सार्भा मर्तुं योद्यता स्त्रीस्तु तस्या दुःखं हर्तुं त्वं स्वयं तत्सुतः स्याः ।   विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥३॥ भावार्थ : मंदमती मुलासह जी स्त्री प्राणत्याग करण्यास निघाली होती, तिचे दुःख दूर करण्यासाठी जे श्रीगुरु स्वतः तिचे पुत्र झाले, तेच भक्तांची अरिष्टे तत्काळ दूर करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?  राज्यं योऽदादाशु निर्णेजकाय प्रीतो नत्या यः स्वगुप्त्यै नृकायः ।   विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥४॥ भावार्थ : भक्तिभावाने केलेल्या केवळ नमस्काराने प्रसन्न होऊन ज्यांनी एका परिटाला राज्याचे वरदान दिले, आणि लौकिकदृष्ट्या अदृश्य होऊनही, जे अजूनही गुप्तरुपें लीलादेह धारण करून भक्तजनांच्या कामना पूर्ण करतात, ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?   प्रेतं विप्रं जीवयित्वाऽस्तजूर्ति यश्चक्रे दिक्शालिनीं स्वीयकीर्तिम् ।  विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥५॥ भावार्थ : ज्यांनी (वल्लभेश) ब्राह्मणाला जिवंत करून त्याचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण केले, ज्यांची कीर्ती अखिल दिगंतात पसरली आहे, तेच तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?  ॥ श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीपादश्रीवल्लभस्तोत्रं संपूर्णम् ॥


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥