Feb 27, 2023

गुरुराया दत्तात्रेया, आठवितों तुझिये पाया


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


गुरुराया दत्तात्रेया । आठवितों तुझिये पाया ॥धृ.॥ 

जरि नेणे भजन उपाया । परि धरिलें तुझिये पाया । 
जरि हरिशी तूं न अपाया । लाज ही तुझिये पाया ॥ 
गुरुराया सखया आतां । सदया शिरिं धरिं वरदहस्ता । 
तुजवांचुनि ऐशा पतिता । उद्धरील कोण जगी या । गुरुराया… ॥१॥ 
मी झालों अतिशय कष्टी । एक वेळ मजवरि दृष्टी ।
उघडुनियां करुणावृष्टी । करिं जेणें होईल तुष्टी ॥ 
व्यष्टि समष्टी ही सकळ । सृष्टि स्थिति हे तव खेळ । 
पुष्टि दे तूं केवळ विमळ । चेष्टित तव नेणों अपाया । गुरुराया… ॥२॥ 
पाप ताप दैन्य विनाशी । तूं मनोरथ पुरवीसी ।
जड पडेल तुज हें ऐसी । वार्ता तरि मानूं कैसी ॥
म्हातारि साठ वर्षांची । होती ती गंगा साची । 
कन्या सुत देउनि तीसी । वांछा पुरविलीस दयाळा । गुरुराया… ॥३॥ 
तूं अघटित घटना करिसी । कृष्णातटिं हें सर्वांसी ।
हे प्रसिद्ध मग आम्हासी । तूं उपेक्षिसी कीं कैसी ॥
कींव न ये माझी आतां । निज बिरुदा आणुनि चित्ता । 
मम कामना पुरविसी दत्ता । वासुदेव नमस्कारि गेया । गुरुराया… ॥४॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Feb 24, 2023

श्री दत्तात्रेय स्तुती


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

दत्तात्रेयं सनातनं ब्रह्म निरञ्जनम् । आदिदेवं निराकारं व्यक्तं गुणविवर्जितम् ॥१॥ चिन्मयं व्यापितं सर्वं चिदाकाशं दिगम्बरम् । निर्विकल्पं निराभासं दृश्यदर्शनवर्जितम् ॥२॥ अगोचरं निरालम्बं ब्रह्मचारी यतीश्वरः । सर्वलोकनायकं संपूर्णं परमात्मनरक्षकः ॥३॥ आशापाशविबन्धनमुक्तः शौचाशौचविवर्जितयुक्तः । शून्यागारे समरसमज्ञः शुद्धविशुद्धं सततसमज्ञः ॥४॥ दत्तात्रेयं नाथोत्तमं सुखदं परमानन्दसागरम् । चित्कीर्तिभूषणं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥५॥ हर्षवर्धनं वन्दे कौवल्यसुखदायकं । सकलागमपूजितं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥६॥ संसारतमनाशनं संकल्पदु:खदलनम् । तापत्रयनिवारकं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥७॥ संशयार्णवखण्डनं दोषत्रयविभेदिनम् । ब्रह्मप्रकाशात्मानं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥८॥ भार्गवप्रियकृत्तमं दूरत्वपरिनाशनम् । जगदार्जवपालनं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥९॥ नमस्ते कालाग्निशमनाय योगिजनवल्लभाय नमोऽस्तु ते । नमस्ते अत्रिपुत्राय दत्तात्रेयाय नमोऽस्तु ते ॥१०॥ नमस्ते लीलाविश्वम्भराय अवधूताय नमोऽस्तु ते । नमस्ते अनसूयानन्दनाय दिगम्बराय नमोऽस्तु ते ॥११॥ नमस्ते सत्वसाध्याय सत्वसाक्षिणे नमोऽस्तु ते । नमस्ते गुह्यतमाय चिद् विलासाय नमोऽस्तु ते ॥१२॥ नमस्ते क्षेत्राधाराय क्षेत्रशून्याय नमोऽस्तु ते । नमस्ते रुपकारणाय गगनाकृतये नमोऽस्तु ते ॥१३॥ श्री दत्तात्रेय पाहि मां प्रसीद दिगम्बर । क्षमस्व अवधूत रक्ष रक्ष श्रीगुरो ॥१४॥  

 

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Feb 22, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ६


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावर अवघेंच अशुभ दूर जातें असाच संतांचा अनुभव आहे.॥१॥त्या संतवचनांवर सर्वथा विश्वास ठेवून हे श्रीनिवासा, मी मांगल्याची आशा मनीं धरून तुझ्या दारीं पातलों आहें.॥२॥ मला आतां विन्मुख पाठविल्यास त्याचा तुला दोष लागेल आणि संतांच्या वचनांसदेखील बट्टा लागेल.॥३॥ आणि म्हणूनच हे माधवा !,माझा तुम्ही अभिमान धरावा.या अजाण लेंकरावर कधीही तुम्ही रागावू नका.॥४॥ बालकांचा कमीपणा/ दोष हा मातेला दुषणच असतो. हे कृपया लक्षांत घेऊन जे आपणांस योग्य वाटेल तेच करा.॥५॥ असो. समर्थांची स्वारी बंकटलालाच्या घरी असतांना एक अपूर्व घटना घडली. श्रोते हो, ती गोष्ट तुम्ही आतां ऐका.॥६॥ शेगांवच्या दक्षिणेस बंकटलालाचे शेत होतें.एक दिवस महाराज त्या मळ्यांत मक्याचीं कणसें खाण्यास गेले.॥७॥ त्यांच्यासोबत खूप सारी मंडळी कणसें खाण्यास आली. मळ्यांतील विहिरीजवळ कणसें भाजण्याची तयारी केली होती.॥८॥ ती विहीर विशाल असून तिला भरपूर पाणीही होते. चिंचेचे गर्द छाया असलेले मोठे वृक्ष त्या विहिरीजवळ होतें.॥९॥ (कणसें भाजण्यासाठी) अंदाजे दहा-बारा आगीच्या शेगड्या पेटवल्या गेल्या. त्यांमुळे धुराचा डोंब अगदी आकाशापर्यंत पोहोचला.॥१०॥ त्याच्यामुळे झाले असे की एका चिंचेच्या झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधमाश्या उठल्या. ॥११॥ ज्या क्षणींत्या माशा उठल्या, तत्क्षणीच सर्व मंडळी घाबरून पळून गेली. आणि मक्याचीं कणसें तिथल्याच तिथें राहिली.॥१२॥ त्या पोळ्यातील मधमाश्या बघतां बघतां सर्व मळ्यांत पसरल्या. काहीजण घोंगडयाचा बुरखा घेऊन पळून गेले.॥१३॥ खरोखर ह्या जगांत प्राणापेक्षा अधिक आवडती वस्तू कोणतीही नाही.अशा वेळीं मात्र समर्थमूर्ती आपल्यां आसनीं निर्धास्त होती.॥१४॥ तें मुळी पळून न जातां आपल्या आसनी स्वस्थ बसलें होते. आपल्या चित्ती मधमाश्यांचा विचार करूं लागले.॥१५॥ मीच माशीरूप आहें, पोळे हेही मीच आहें.ही कणसें खावयास मीच इथे आलों आणि कणसेंही माझीच तर रूपें आहेत.॥१६॥ असा विचार करीत महाराज आनंदात बसलें होते. त्यांच्या अंगावर असंख्य माश्या येऊन बसल्या होत्या.॥१७॥ श्री समर्थ जणू काही मधमाश्यांची घोंगडी घेऊन बसले आहेंत असेच वाटत होते. ब्रह्मनिष्ठ स्वामींची योग्यता कशी बरी वर्णावी ? ॥१८॥ त्यामधमाश्यांनी त्यांस अनेकदा दंश केला.त्या माश्यांचे असंख्य काटे महाराजांच्या शरीरात पसरलें होते.॥१९॥ एक पूर्ण प्रहरभर, महाराजांच्या सर्व शरीरावर मधमाश्यां होत्या, अवघें भक्त चिंतातुर झालें. बंकटलालाचें मन तर दु:खाने व्याकुळ झालें.॥२०॥ मला कोठून बुद्धी झाली अन मी श्री समर्थांस इथे इतर मंडळींसमवेत मक्याची कणसें खाण्यास आणले.॥२१॥ अश्या रितीने समर्थांस दु:ख देण्यास मीच कारणीभूत झालो.हाय रे दुर्दैवा ! हेच का माझें शिष्यपण ? असा तो मनांत विचार करू लागला.॥२२॥ अखेर बंकटलालानें पुढें येण्याची खरोखर तयारी केली आहे हे समर्थांनी मनांत जाणले अन एक चमत्कार केला.॥२३॥ हे मधमाश्यांनो, तुम्ही इथून निघून आपल्या पोळ्यांत परत जा ! माझा प्रिय भक्त बंकट इथे येतो आहे, त्यांस तुम्हीं कुणीही चावू नका.॥२४॥ इथे जमलेल्या सर्व मंडळींत बंकट हाच माझा निःसीम भक्त आहें, जो माझ्यासाठी धावून येत आहें.॥२५॥ असे महाराजांनी म्हणताच सर्व मधमाश्या पुन्हां पोळ्यांत जाऊन बसल्या. बंकटलालानें स्वतः आपल्या डोळ्यांनी त्या परत आपल्या स्थानीं गेलेल्या पाहिल्या.॥२६॥ महाराज त्यास पाहून हसून बोलले,अरे वा ! आमच्यासाठी छान मधमाश्यांची मेजवानी केलीस.॥२७॥ अरे, ते विषारी जीव जेव्हा माझ्या सर्वांगावर बसले होतें,तेव्हा हे सारे लड्डूभक्त माझ्यापासून लांब पळून गेलें.॥२८॥ बघ तू नीट विचार कर,कुणावरही संकट आल्यांस एका ईश्वरावांचून कोणीही साहाय्य करत नाहीं.॥२९॥ केवळ जिलेबी, पेढे, बर्फी खाण्यासाठी जमतात अन मधमाश्या आल्यावर पळून जातात,असें ज्यांचे वर्तन असतें. ते निःसंशय स्वार्थी भक्त होत.॥३०॥ त्यावर बंकटलाल विनम्रतेने विचारू लागला,महाराज मी मधमाश्यांचे काटे काढण्यासाठी सोनारांस बोलावू का ? ॥३१॥ हे गुरुराया,मी महापापीच ज्याने तुम्हांस ह्या ठिकाणीं आणले,अन तुम्हांस असंख्य मधमाश्या डसल्यामुळे झालेल्या ह्या त्रासांस कारणीभूत झालो.॥३२॥ तुमच्या सर्वांगावर (मधमाश्यांच्या दंशामुळे)अगणित गांध्या उठल्या आहेंत, यातूंन बरें होण्यासाठी आता कोणता उपाय करावा ? हे कृपा करून सांगा.॥३३॥ बंकटलालाचें तें बोलणे ऐकून महाराज उत्तरलें, अरे, इथे काहीच वेगळे घडले नाही. डसणे हा तर माश्यांचा स्वभावच असतो.॥३४॥ पण मला कधीही त्या मधमाश्यांची बाधा होणार नाहीं कारण त्या माशीरुप सच्चिदानंदाला मी पूर्णतः जाणले आहें.॥३५॥ मधमाशीही तोच झाला, माझे रूपदेखील तोच आहें. पाण्यानेंच पाण्याला कधी दुखवितां येतें का ?॥३६॥ हें ब्रह्मज्ञान ऐकून बंकटलाल काहीच बोलला नाहीं. त्यानें कांटे काढण्यासाठी सोनारांस बोलाविलें. ॥३७॥ सोनार चिमटे घेऊन आले आणि मधमाश्यांचे काटे महाराजांच्या शरीरांत कोठें रुतले आहेत तें शोधू लागलें. ॥३८॥ महाराज त्यांस बोललें,उगाच कशाला तुम्ही वेळ दवडतां ? तुमच्या ह्या डोळ्यांना काही ते कांटे दिसणार नाहींत.॥३९॥ तें मधमाश्यांचे काटे काढण्यासाठी ह्या चिमटयांचा काहीच उपयोग नाहीं. ह्या गोष्टीचा पुरावा मीच तुम्हांस दाखवतो. ॥४०॥ असें म्हणून महाराजांनी योगाने वायूस रोखलें. तों शरीरातील अवघेंच रूतलेलें कांटे वर आलें. (असा समर्थांनी चमत्कार केला.)॥४१॥ तो प्रकार पाहून सारे लोक फार आनंदले.श्रीगजाननस्वामींचा अधिकार सर्वांस कळून आला.॥४२॥ त्यानंतर तिथे कणसें भाजलीं व सर्वांनी तीं ग्रहण केलीं.सायंकाळी सर्व मंडळी आपापल्या घरीं निघून गेली.॥४३॥ असो. पुढें एकदा महाराज आपला बंधू श्रीनरसिंगजी महाराज यांना भेटण्यासाठी अकोटाला गेले.॥४४॥ हें श्रीनरसिंगजी कोतश्या अल्ली यांचे शिष्य असून मराठा जातीचे होते.आपल्या भक्तीसामर्थ्यामुळे ते विठ्ठलाचे प्रिय भक्त, जणू कंठमणीच झाले होते.॥४५॥ मीं भक्‍तलीलामृतांत श्रीनरसिंगजी महाराजांचे चरित्र इत्यंभूत वर्णिलें आहे. आतां इथे तें (विस्तारभयास्तव )सांगत नाहीं.॥४६॥ शेगांवपासून ईशान्य दिशेला साधारण अठरा कोसांवर हें अकोट नावाचे नगर आहे.॥४७॥ शरण आलेल्या भक्तांचे कल्पतरूच असलेले श्रीगजानन महाराज मनोवेगाच्या वारूवरून (अकोटास )जाण्यास निघालें.॥४८॥ अकोटाच्या जवळ असलेल्या एका घनदाट अरण्यांत श्रीनरसिंगजी महाराज एकान्तवासात दिवसरात्र रहात असतं.॥४९॥ ते महा भयकंर असें अरण्य निर्जन असून निंब, पिंपळ, रातांजन असें अनेक विशाल वृक्ष तिथे होते.॥५०॥ अनेक प्रकारच्या लता-वेली त्या महाकाय वृक्षांस वेढलेल्या होत्या. भूमीवरती प्रचंड गवत वाढले होतें. तिथे वारुळांमध्ये असंख्य सर्प होतें.॥५१॥ अश्या त्या अरण्यांत नरसिंगजी वास्तव्य करून होतें. म्हणूनच श्री समर्थ त्यांस अवचित भेटण्यासाठी आलें.॥५२॥ खरोखर समान तत्त्व असलेलेच,सामान विचारधारेचेच एकेमेकांस भेटतात.पाणीच पाण्यांत एकरूप होतें.विजातीय द्रव्य कधीच समरस होऊ शकत नाही.॥५३॥ श्री गजाननांस पाहून नरसिंगजी स्वामींस अत्यानंद झाला.त्यांच्या एकमेकांवरील लोभाचे मी वर्णन करू शकत नाही.॥५४॥ एक हरी तर एक हर जणू काही दोघेही चालते बोलते परमेश्‍वरच होते.एक राम तर एक वसुदेव-देवकीचा कुमार कृष्णच होते.॥५५॥ एक मुनी वसिष्ठ तर एक श्रेष्ठ असे पाराशर ऋषि होतें.एक जान्हवीचा कांठ तर एक गोदावरीचा तट होते.॥५६॥ एक कोहिनूर हिरा,तर खरोखर एक कौस्तुभमणीच होते. एक वैनतेय म्हणजे गरुड तर एक सती वानरी अंजनीचा पुत्र हनुमंतच होते.॥५७॥ दोघांसही एकमेकांस भेटून अतिशय आनंद झाला. एका आसनांवर बसून दोघेही एकमेकांशी हितगुज करू लागलें.॥५८॥ एकमेकांस आपापले अनुभव कथन करू लागले.नरसिंगा,तूं प्रपंचांत राहिलास हे उत्तम केलेंस.॥५९॥ मी प्रपंचाचा त्याग करून योगमार्ग स्वीकारला.या सच्चिदानंद तत्त्वाचा विचार करू लागलो.॥६०॥ या योगक्रियेत अत्यंत अघटीत अशा गोष्टी घडतात, त्या सर्वच आकलन होणें हे ह्या सामान्य जनांस अशक्य असतें.॥६१॥ त्याच गोष्टी लपवण्यासाठी या जगाच्या दृष्टीने मी हा असा पिसा झालो.नको ती उपाधी टाळण्यासाठी मी बळेंच वेडेपणाचे सोंग घेतलें.॥६२॥ शास्त्रकारांनीं शास्त्रांमध्ये हे तत्त्व जाणण्यासाठी कर्म, भक्ति, आणि योग असे तीन मार्ग सांगितले आहेंत.॥६३॥ या तीन ही मार्गांचें जरी फळ अखेर एकच असले तरीही प्रत्येक मार्गांचें बाह्य स्वरुप मात्र अतिशय भिन्न आहें.॥६४॥ जर एखाद्या योगी साधकाने योगक्रियेचा अभिमान धरला तर त्याला कधीही ह्या तत्त्वाचा खरा बोध होतं नाहीं.॥६५॥ योगक्रिया करूनदेखील कमळाच्या पानांप्रमाणे त्यांपासून अलिप्त राहिले तरंच ते तत्त्व कळून येतें.॥६६॥ नरसिंगा, अगदी त्याचप्रमाणे प्रपंचाची स्थिती आहे.तिथे कन्यापुत्रांची आसक्ती मुळींच राहतां कामा नये.॥६७॥ गार ज्याप्रमाणे पाण्यांत असून देखील पाणी आंत शिरू देत नाही,त्याचंप्रमाणे ह्या प्रपंचात वर्तन असू द्यावें.॥६८॥ तूही तसाच रहा. सदा अपेक्षारहित असावें आणि त्या सच्चिदानंद परमेश्वराला कधीही अंत:करणातून ढळूं देऊ नये(त्याचा विसर पडू नये).॥६९॥ म्हणजे कांहींच अशक्य रहात नाहीं. तूं, मी आणि शेषशायी श्रीविष्णू एकरुपच आहोंत. जन आणि जनार्दन काही वेगळे नसतात.॥७०॥ त्यांवर नरसिंग बोलले,हें बंधुराया,मला तू भेटण्यास आला, ही तुझी किती कृपा व दया आहे, खरोखर त्यांस उपमा नाहीं.॥७१॥ हा प्रपंच मुळीं अशाश्वत आहें, त्याची किंमत तरी काय ? दुपारच्या सावलीला कधी कोण खरे समजतो का ?॥७२॥ तू जो उपदेश केला आहेस तसाच मी ह्या जगतीं नक्की वागेन. मला तू असाच वरचेवर भेटावयास येत जा.॥७३॥ ज्याचें जसे देह-प्रारब्ध असेल त्याचप्रमाणे सामान्य लोकांच्या बाबत निःसंशय घडून येतें.॥७४॥ मात्र तुम्हां-आम्हांला जे करण्यासाठी ह्या भूमीवर ईश्वरानें पाठविलें आहे तेच आपण निरालसपणें करावयाचें आहें.॥७५॥ आतां इतकीच विनंती आहे की वरचेवर अशी व्यावहारिक भेट मला देत जावी, कारण मी तुझा धाकटा बंधु आहे.॥७६॥ भरत ज्याप्रमाणें श्री रघुपतीची वाट पहात नंदीग्रामीं राहिला, मीही तसाच या आकोटांत वास करीत तुझी वाट पहात राहीन.॥७७॥ तुला इथे येण्यांस निश्चितच काही अशक्य नाहीं ! तुला पहिल्यापासूनच अवघ्या योगक्रिया अवगत आहेत.॥७८॥ पाण्यांस पायदेखील न लावतां योगीपुरुष त्यावरून भरधांव पळतात.एका क्षणांतच अवघ्या त्रिभुवनांत शोध घेत फिरूनही येतात.॥७९॥ त्यां उभयतांचें असें हितगुज रात्रभर झालें. एकमेकांस भेटून दोघांनाही अतिशय आनंदाचे, प्रेमाचे भरतें आलें होतें.॥८०॥ श्रोतेहो, जे का खरें संत असतात,तिथेच असे घडतें. दांभिकांचीं मात्र एकमेकांना पाहून भांडणें होतात.॥८१॥ दांभिकांस कधीही आपला गुरु म्हणूं नये,ते केवळ पोट भरण्यासाठी संत झालेले असतात. फुटकें जहाज कधीही पुरातून आपण्यास वाचवण्यास समर्थ नसते.॥८२॥ जरी जगांत खरोखर दांभिकांचाच बोलबाला होतो, तरीही श्रोते हो !त्यांस ओळखून आपण त्याचा त्याग करावा हेच बरें.॥८३॥ संतत्व एखाद्या मठांत नसते, तसेच फक्त विद्वत्तेंत वा कवित्वांतदेखील संतत्व नसते. तिथें केवळ स्वानुभव पाहिजे.॥८४॥ दांभिकतेचा मुलामा दिलेलें सोनें कधी कुणाला घेणें आवडेल काय ? घरांत गृहिणी म्हणून कोणी कसबीण ठेवते का ?॥८५॥ ही साक्षात्कारी संतजोडी मुळातच दांभिकतेची वैरी होती. त्यांच्या घरी सदैवच सन्नीति आणि सदाचार नांदत होतें.॥८६॥ नरसिंगजी महाराजांस भेटण्यासाठी गजानन स्वामी अरण्यांत आले आहेंत, हे वर्तमान एका गुराख्याकडून अकोटवासियांना समजले.॥८७॥ तें वर्तमान ऐकून लोकं आनंदले. त्या संत द्वयांस बघण्यासाठी नारळ घेऊन वनाकडे धावतच निघाले.॥८८॥ एकमेकांस म्हणू लागले,सत्वर चला चला रे! अरण्यांत गोदा आणि भागीरथीचा संगम झाला आहें .॥८९॥ त्या भेटीरूप प्रयाग स्थानी आपण स्नानासाठी जाऊ या. सर्वांनीया महोदयपर्वणीचा लाभ करून घेऊ या.॥९०॥ पण तेव्हा काय झालें की गजानन महाराज नरसिंग स्वामींना भेटून आधींच निघून गेले होतें. त्यामळें लोकांस त्यांची भेट घडलीच नाही.॥९१॥ पुढें एकदां गजानन समर्थ भ्रमण करत करत आपल्यां शिष्यांसह दर्यापूरजवळ आलें.॥९२॥ दर्यापुराच्या निकट चंद्रभागेच्या तीरीं शिवरगांव नावाचे एक गांव आहें. तिथे व्रजभूषण रहात असें.॥९३॥ श्रोते हो, ही चंद्रभागा पंढरीची नव्हें बरं का ? ही एक लहानशी गंगा आहें जी पयोष्णी नदीला जाऊन मिळतें.॥९४॥ याच शिवर गांवांत व्रजभूषण नावाचा पंडित होतां. श्रोतेजन हो, त्यांस चार भाषा अवगत होत्या.॥९५॥ साऱ्या वऱ्हाडांत त्याच्या विद्वत्तेची कीर्ति पसरली होतीं. तों सूर्यनारायणांची मनापासून भक्ती करत असे.॥९६॥ तों प्रतिदिवशी चंद्रभागेवर स्नान करीत असें. दिनकर उदयास येतांच त्यांस अर्घ्य देत असे.॥९७॥ अगदी उषःकाली व्रजभूषण उठत असे. प्रातर्विधी आवरून अरुणोदयाच्या वेळीं स्नान करीत असे.॥९८॥ नेहमीच तो थंड पाण्यानें स्नान करी, असा तो अतिशय कर्मठ पण ज्ञानी होता.अनेक विद्वज्जनांत त्याच्या विद्वत्तेची विशेष मानमान्यता होती.॥९९॥ त्या शिवरगांवी योगीराज गजानन फिरत फिरत आलें.त्या व्रजभूषणाच्या तापाचे त्यांना फळं द्यायचे होते असेंच वाटते.॥१००॥ हा ज्ञानजेठी चंद्रभागेच्या वाळवंटांत बसला होतां.समोर नदी तीरावर व्रजभूषण स्नानासाठी आले होतें.॥१०१॥ त्या प्रभातकाळीं दाहीं दिशा प्रकाशमान झाल्या होत्या.वरचेवर कुक्कुटाचा आवाजही ऐकू येत होता.॥१०२॥ पूर्व दिशा लक्षून चातक, भारद्वाज आदी पक्षी अत्यादरांने जणू भास्कराचे स्वागत करीत सामोरी जात होतें.॥१०३॥ सूर्यनारायणांचा उदय होतांच हां हां म्हणतां तम निघाला. जसें की सभेस पंडित येतांच मूर्ख लगेच उठून जातात.॥१०४॥ अशा त्या सुप्रभातीं, गुरुमूर्ति ब्रह्मानंदीं डोलत,निवांत त्या वाळवंटांत बसली होती.॥१०५॥ सभोवताली अनेक शिष्य मंडलाकारात बसले होतें. तें शिष्य नसून गजाननभास्कराचीं तेजस्वी किरणेंच भासत होतें.॥१०६॥ त्यावेळींनित्यनियमानुसार व्रजभूषणाने सूर्यास अर्घ्य दिले. तेव्हा समोर बसलेला हा ज्ञानसविता त्याच्या नजरेस पडला.॥१०७॥ ज्यांची सूर्याप्रमाणें सतेज कांति असून ते निश्चितच अजानुबाहू होते.महाराजांची दृष्टि नासाग्रावर स्थिर झालेली होती.॥१०८॥ असा योगीपुरुष पहाता क्षणीच व्रजभूषणाला मनांत अतिशय आनंद झाला. संध्येचे सर्व साहित्य घेऊन तो त्यांच्याजवळ धावतच आला.॥१०९॥ सत्वर त्याने गजानन महाराजांच्या पायांवर अर्घ्य दिलें.अखेर समर्थांस त्याने प्रदक्षिणाही घातली.॥११०॥ "मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः... " अशी नांवे घेऊन व्रजभूषणाने द्वादश नमस्कारही घातले.॥१११॥ शेवटीं गजानन महाराजांची त्याने मनोभावे आरती केली. अशा रितीने काहीही न्यून न ठेवतां पूजन केलें.॥११२॥ नंतर त्याने प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार केला आणि महाराजांचे थोर स्तवन तो मुखानें म्हणू लागला.॥११३॥ आज मला खरोखर माझ्या तपाचरणाचें फळ मिळालें. आपल्या दिव्य चरणांचे दर्शन झाल्याने आज मी धन्य झालों.॥११४॥ आजपर्यंत मी आकाशातील भास्करांस अर्घ्य देत होतों. त्याच ज्ञाननिधि योगेश्वरांचे आज मला प्रत्यक्ष दर्शन झालें.॥११५॥ श्लोक - हे पूर्णब्रह्म, जगचालक, आणि ज्ञानराशी असें प्रत्येक युगांत किती अवतार घेतोस ? हें गजाननगुरु ,तुझें दर्शन झाल्यांस भवरोग, आणि चिंता क्षणांत नाश पावतात. माझ्यावर आतां कृपा कर. ॥१॥ अशी प्रार्थना करून त्यानें स्तवन पूर्ण केलें. योगेश्वरांनी ( प्रसन्न होऊन ) दोन्ही करांनी दृढ धरून व्रजभूषणास आलिंगन दिलें.॥११६॥ माता जशी लेंकराला प्रेमाने पोटाशी धरतें,त्याचप्रमाणें महाराजांनी व्रजभूषणाला पोटाशी धरले.॥११७॥ आणि त्यांनी 'बाळा व्रजभूषणा,सर्वदा तुझा जयजयकार होईल 'असा त्याच्या मस्तकावर हात ठेऊन थोर आशीर्वाद दिला.॥११८॥ तू कधीही कर्ममार्ग सोडूं नकोस. विधींस निरर्थक मानूं नको ! मात्र बाळा, त्यांत केव्हांही गुंतून जाऊ नकोस.॥११९॥ कर्मफलाचे सच्चेपणानें आचरण केल्यांस तो घननीळ नक्की भेटतो. या कर्मामुळे तो ईश्वर कधींही मलिन होत नाहीं.॥१२०॥ तू आतां माझे हे बोल लक्षात ठेव, आपल्या घरांत तू जेव्हा जेंव्हा माझे ध्यान करशील, तेव्हा तेव्हा तुला माझे दर्शन होईल.॥१२१॥ असे म्हणून महाराजांनी त्या व्रजभूषण पंडिताला श्रीफळ प्रसाद म्हणून दिले. त्यानंतर समर्थ शेगांवीं परत आलें.॥१२२॥ श्रोतें हो, पूर्वकालीं ह्या शेगांवाचें नांव शिवगांव असे होतें.त्याचाच अपभ्रंश होऊन सध्या शेगांव हे नांव प्रचलित आहें. वर्‍हाडांत असलेल्या या गांवात एकूण सतरा पाटील होते.॥१२३-१२४॥ महाराज शेगांवी परत आलें खरे, पण त्यांनी तिथे कधीच स्थिर असा वास केला नाही.तें कायमचं मनाला येईल त्या स्थानीं भटकत राहिले.॥१२५॥ आकोट, अकोलें, मलकापूर आदी त्या स्थानांची नावे तरी किती सांगावी? कोणालाही आकाशांतील चांदण्यांची गणती करतां येत नाही.॥१२६॥ ज्येष्ठ, आषाढ मास सारले, अन पुढें श्रावण महिना आला. मारुतीच्या देवळांत आता उत्सव सुरुं झाला होता.॥१२७॥ त्या शेगांवीं हें भव्य असे मारुतीचें मंदिर होतें. सारी पाटील मंडळी या मारुतीरायाचें भक्त होतें.॥१२८॥ गवताच्या पेंडीला ज्याप्रमाणें आळ्याने बांधतात, तसेच साऱ्या गांवावर पाटील मंडळींचा वचक होतां.जें जें कांहीं पाटलास आवडेल, लोकांसही तेंच आवडत असे.॥१२९॥ हा उत्सव महिनाभर संपन्न होई.अभिषेक, पोथी-वाचन, कीर्तन- गजर असे कार्यक्रम होत.सढळ हस्तें अन्नदानही होत असे, त्यांमुळें अवघे लोक तृप्त होत असतं.॥१३०॥ खंडू पाटील या उत्सवाचा पुढारी होता. शेगांवचा हा मुख्य कारभारी अतिशय उदार मनाचा होता.॥१३१॥ श्रोतें हो,हें पाटीलपण म्हणजे वाघाचें पांघरुण असतें.तें जो घेई, त्यांस अवघे गांवकरी सहजच घाबरून असतं.॥१३२॥ मराठींत एक ' गांव करी तें राव न करी ' अशी सुंदर म्हण आहें. ती अगदी समर्पक आहें.॥१३३॥ श्रावण महिन्याच्या आरंभी त्या मारुतीच्या मंदिरांत पुण्यराशी गजानन महाराज श्रींचा उत्सव पाहण्यासाठी म्हणून आलें.॥१३४॥ त्यांनी बंकटलालास त्यावेळीं समजावले, मी आतां इथून पुढें मंदिरातच वास्तव्य करेन. तू याबद्दल अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.॥१३५॥ गोसावी, संन्यासी, वा फकीर यांना कायमचें राहण्यांस प्रापंचिकाचें घर काही योग्य नव्हे.॥१३६॥ मी परमहंस, संन्यासी आहें, मी आतां यापुढें मंदिरातच राहीन. तू ज्या दिवशीं मला तुझ्या गृहीं बोलावशील, मी तेवढयापुरता तिथे येईन.॥१३७॥ बंकटलाला, हें अंतरींचें गुह्य मी तुला सांगितले आहें. स्वामी शंकराचार्यानी देखील भ्रमणच केलें.॥१३८॥ मच्छिंद्र, जालंदर आदी गोसावीसुद्धा निरंतर अरण्यांत वृक्षातळीं राहिले. त्यांनीही प्रापंचिकाचें घर वगळलें.॥१३९॥ छत्रपती राजा शिवाजी जो वीर-रणबहादूर होतां. ज्यानें दुष्ट यवनांचा पराभव करून, हिंदूच्या परंपरेचे, राज्याचें रक्षण केलें.॥१४०॥ त्या राजा शिवछत्रपतीचे समर्थ रामदासांवर फार प्रेम होतें. तरीही, स्वामींचे सज्जनगडावरच वास्तव्य होतें.॥१४१॥ बंकटलाला ,तूसुद्धा याचा विचार करून मुळींच हट्ट करू नकोस आणि माझ्या या म्हणण्यास मान द्यावा. यांतच तुझे कल्याण आहें.॥१४२॥ अखेर निरुपाय होऊन त्या बंकटलाल सावकाराने गजाननस्वामींच्या म्हणण्याला रुकार दिला.॥१४३॥ स्वामी समर्थ मंदिरात राहायला आल्यांवर, सर्व भक्तजनांस अतिशय हर्ष झाला. त्यावेळीं भास्कर पाटील महाराजांजवळ सेवा-शुश्रूषेकरतां सतत जवळ असें.॥१४४॥ हा दासगणूविरचित श्रीगजाननविजय नावाचा ग्रंथ सर्व मुमुक्षांस संतचरणसेवेचा मार्ग दाखवो, हीच प्रार्थना.॥१४५॥

शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ५ इथे वाचता येतील.

 

Feb 15, 2023

नमी तो विभू श्रीगुरू रामदास


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ श्री कृष्णदास महाराजविरचित अभंग सह्याद्री खोऱ्यात गर्जला गजर ! जय जय रघुवीर समर्थ !, जय जय रघुवीर समर्थ !! हा तर समर्थ रामदासांचा संचार ! पायी खडावा, हाती कुबडी, सवे झोळी खांद्यावर, भगवी छाटी अंगावर, हाती असे जपमाळ, दाढीजटांचा केशसंभार, शरीर अति सुदृढ, कारण सूर्यनमस्कार ! रूप दिसे ते अति सुंदर, स्वारी करी अखंड संचार ! भेटी होता मज येई गहिवर, भानचि विसरुनि पडलो चरणांवर ! श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू श्रीधरस्वामी महाराजविरचित श्री समर्थाष्टक स्तवावा मनी की गुरु रामदास । कृपे या जयाच्या तुटे मोहपाश । निजानंदरूपें जया नित्य वास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥१॥ तपोज्ञानयज्ञानिकां साधकांस । करूनि मनः शुद्धि एकान्तवास । मनी ज्या सदा आठवीता उदास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥२॥ भवी दुःखदावानलें जे उदास । जगी होति ते गुरूदेवदास । जया ध्याति की सद्‌गुरु हे उदास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥३॥ गुरुसेविं जी प्राप्ती होते जनास । समाधान लाभे जयाच्या मनास । जनीं नित्य ज्या मानितीं की सुखास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥४॥ तनधर्मकर्मादिकांचा निरास । करूनी अजीवेश होती तयास । सदा ज्या स्थळीं वाटतो शांत वास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥५॥ असे ईशरुपेंची जो योगियांस । अनेका मतीं अन्य सांख्यादिकांस । मला जो सदा ब्रह्मरुपेचि खास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥६॥ जयाच्यावारी विश्व जीवेश भास । जसा एक दोरी फणीचा विलास । जया दर्शने सर्व मिथ्याची सोस । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥७॥ जयाच्या स्वरूपी न हा कीं विभास । अवस्थात्रयांती जयाचा विकास । तया मस्त्वरूपी न हा भिन्न भास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥८॥ (इंद्रवज्रा) श्लोकाष्टके तोषवि जो गुरूस । होई कृपे त्या परिपूर्ण आस । नासूनि सारा जगभिन्न भास । लाभे तया तत्पदिं नित्य वास ॥९॥ ॥ श्रीसमर्थार्पणमस्तु ॥


 ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Feb 13, 2023

गजाननाच्या अद्‌भुत लीला...


॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय नमः ॥

सतेज दुसरा रवि हरीसमान यांचे बल  
वशिष्ठ-सम सर्वदा त्वदिय चित्त ते निर्मल  
असें असुनिया खरे, वरिवरि पिसा भासतो  
तया गुरु गजाननां प्रति सदा गणू वंदितो  संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे, संतकवी श्रीदासगणू महाराजांनी केलेले हे वर्णन किती यथार्थ आहे. जगत्कल्याणासाठी, सामान्य जनांच्या उद्धारासाठी तो निर्गुण, निराकार परमात्मा संत-महात्मे, सत्पुरुष यांच्या स्वरूपांत सगुण साकार रूप घेऊन या भूतलावर अवतरीत होतो. विदेहि संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज असेच साक्षात् ब्रह्मस्वरुप होते, हे निर्विवाद सत्य आहे. त्यांच्या जीवनचरित्रातील अनेक लीला याची साक्ष देतात.  संतकवी श्रीदासगणूविरचित ‘ श्री गजानन विजय ' या प्रासादिक ग्रंथातील अठराव्या अध्यायात श्री गजानन महाराजांनी आपला सद्‌भक्त बापुना काळे यांस साक्षात विठ्ठलरूपांत दर्शन दिले, ही कथा वर्णन केली आहे. भगवंताच्या भेटीसाठी आपल्या या भक्ताची तळमळ, ध्यास पाहून त्या कृपाळू माऊलीने प्रत्यक्ष विठ्ठल-दर्शनाचा लाभ त्यास घडवला. अशा अनेक भक्तांना त्यांनी त्यांच्या इष्टदेवतेच्या स्वरूपांत दर्शन दिले आणि त्यांची श्रद्धा दृढ केली.  श्री गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त, त्यांची अशीच एक लीला आज आपण पाहू या. शेगांवचे परशुराम देशमुख परम भाविक गृहस्थ होते. त्यांची श्री गजानन महाराजांवर अतिशय दृढ श्रद्धा होती. एकदा गजानन स्वामी आपल्या काही भक्तांसह विटखेड येथील श्री दत्तप्रभूंच्या जागृत स्थानाच्या दर्शनासाठी निघाले. दत्तभक्त असलेले परशुराम देशमुखही त्यावेळी महाराजांच्या सोबत होते. भक्तवत्सल दत्तमहाराज आपल्या भक्तांसाठी कसे धावून येतात, याची प्रचिती देणारे विटखेड हे पवित्र क्षेत्र आहे. या स्थानाची महती अशी - शेगांवातील पाटील घराण्यांत एक थोर दत्तभक्त होते. ते नित्यनियमाने दत्तप्रभूंच्या क्षेत्राची वारी करत असत. हा क्रम कित्येक वर्षे चालू होता. पुढें, वृद्धापकाळ आला, शरीरही थकले. तेव्हा, त्यांनी अत्यंत करुणाभावानें दत्तमाऊलीला प्रार्थना केली, “ हे प्रभो, गेली अनेक वर्षे आपण माझ्याकडून ही वारीची सेवा करवून घेतली. आता, वृद्धावस्थेमुळे पुढील वारी होईल होईल, असे वाटत नाही. हे अत्रिसुता, तुम्ही अंतर्यामी आहात. तुमच्या दर्शनाचा लाभ मला अखंड लाभो, हेच तुझ्या चरणीं मागणे !” त्याच रात्री दत्तप्रभूंनी त्या भक्ताला स्वप्नदृष्टांत दिला. दत्तमहाराज स्वतः तिथे प्रकटले आणि त्या दत्तभक्तास अत्यंत प्रसन्नतेने म्हणाले, “ वत्सा, तुझ्यावर माझी कृपा नेहेमीच राहील. ही दत्तमूर्ती घे, अन तुझ्या पूजेत नित्य ठेव. यापुढें तुझ्या घरीच तुला सदैव माझे दर्शन होईल. तुला आता ही वारी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, घरी जाईपर्यंत ही मूर्ती तू कोठेही भूमीवर ठेवू नकोस.” आपल्या इष्टदेवतेचा हा कृपाप्रसाद मिळाल्याने ते दत्तभक्त अतिशय आनंदित झाले आणि ती सुरेख अशी दत्तमूर्ती घेऊन सत्वर शेगांवी येण्यास निघाले. दत्तात्रेयांच्या आज्ञेचे पालन करीत त्यांनी ती दत्तमूर्ती कोठेही भूमीवर ठेवली नाही. मात्र, विटखेड इथे येताच त्यांना या गोष्टीचे पूर्णतः विस्मरण झाले आणि काही कारणाकरिता अगदी अनावधानाने त्यांनी ती दत्तमूर्ती जमिनीवर ठेवली. ‘ईश्वरेच्छा बलियसी !’... हेच खरें, अर्थात त्या भगवंतांच्या लीलेला कोण बरें जाणू शकणार ? पाटलांनी ती दत्तमूर्ती भूमीवर ठेवताच ती मूर्ती जमिनीत गुप्त झाली. ते पाहताच, त्या दत्तभक्तांना दुःखावेगाने अश्रू अनावर झाले अन ते पुनः पुनः दत्तप्रभूंची करुणा भाकू लागले. करुणासागर दत्तात्रेयांनी पुन्हा एकदा त्यांना दर्शन दिले आणि अत्यंत वत्सलतेने बोलू लागले, “ अरे तू दुःखी होऊ नकोस. मी सदैव या स्थानीं वास करेन. तू दररोज इथे येऊन माझे दर्शन घेत जा.” एव्हढें बोलून दत्तमहाराज गुप्त झाले. आजही या ठिकाणी दत्तभक्तांना महाराजांच्या कृपेची अनुभूती येते.  तर अशा या जागृत क्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी श्री गजानन महाराज बैलगाडीत बसून आपल्या भक्तांसह निघाले. तिथे पोहोचताच दत्तस्थानापासून काही अंतरावरच त्या सर्वांनी बैलगाड्या लावल्या, अन ते अनसूयानंदनाच्या दर्शनास पायीं निघाले. परशुराम देशमुख यांस महाराजांना तिथे एकटे सोडून दर्शनास जाणे योग्य वाटले नाही. त्यांमुळे श्री गजानन समर्थांनी वारंवार आग्रह करूनही ते इतर भक्तांसोबत गेले नाही अन हात जोडून महाराजांना म्हणाले, “ हे सद्‌गुरो, माझ्यासाठी तुम्हीच दत्तप्रभू आहात. तुमचे केलेले नित्य पूजन, तुम्हांला मनोभावें केलेले नमन श्री दत्तात्रेयांच्या चरणीं रुजू होते, अशी माझी दृढ श्रद्धा आहे.” परशुराम देशमुखांचा तो निर्मळ भाव जाणून श्री गजानन महाराजांनी त्यांना साक्षात श्री दत्तात्रेयांचे सगुण दर्शन घडवले. “शेगावकर श्री संत चरित्रामृत” या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन करतांना ग्रंथकार लिहतात - “ तो तेथे द्‌भुत लीला जाहली जोगीवेशी अकस्मात मूर्ती आली  ... हेच ते गंगापूरचे दत्त म्हणुनी नमस्कार घाल सद्‌गुरुस ”  त्यावेळी, दत्तमहाराजांच्या सोबत चार श्वानही होते. परम भाग्यवंत अशा परशुराम देशमुखांनी दत्तप्रभूंच्या चरणीं मोठ्या भक्तिभावाने माथा टेकला अन अत्यंत श्रद्धेने आपल्या आराध्यदेवतेचे दर्शन घेतले. पुढे, श्री दत्तात्रेय अन दोन श्वान अदृश्य झाले. उरलेले दोन श्वान श्री गजानन महाराजांबरोबर शेगांवास आले. त्यापैकी एकाला महाराज ‘मोतीराम’ म्हणून हाक मारीत असत अन तो समर्थांचा अत्यंत लाडका होता. आजही, श्री गजानन महाराज त्यांच्या भक्तांना दर्शन देतात, प्रचिती देतात मात्र त्यासाठी आपला भावही निर्मळ हवा. श्री गजानन बावनीमधील, ‘गजाननाच्या द्‌भुत लीला । अनुभव येती आज मितीला ’ या ओव्यांचा अनुभव असंख्य भक्तांनी खरोखर घेतला आहे.

संदर्भ : श्रीगजानन आचार्यपीठ 
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

अवश्य वाचावे असे काही -


Feb 6, 2023

श्रीगुरुस्वारी निघे श्रीशैल्य-यात्रेसी...


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

आज श्रीगुरुप्रतिपदा, समस्त दत्तभक्तांसाठी अत्यंत खास दिवस! श्री दत्तमहाराजांचे द्वितीय अवतार, भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी याच पावन दिनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या 'निर्गुण पादुका' स्थापन करून श्रीशैल्यगमन केले होते.  यानिमित्त, श्री दत्तचरित्र सार या ओवीबद्ध ग्रंथातील अध्याय ५७ अर्थात श्रीगुरूंच्या कर्दळीवनगमनाचा अध्याय, त्यांतील या काही ओव्या दत्तभक्तांसाठी प्रकाशित करत आहे. प्रत्यक्ष परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या आशीर्वादाने श्री. विष्णु गोपाळ नातू यांनी हा ग्रंथ रचला. आपले मनोगत व्यक्त करतांना ग्रंथकार लिहतात. - परम पवित्र जगच्चालक श्रीदत्त महाराजांनी प्रेरणा करून, हा ‘श्रीदत्तचरित्रसार’ ग्रंथ लिहवून, सर्वजनांसाठी प्रसिद्ध करविलां; त्याची लीला कोण जाणणार आहे ! त्या सूत्रधारी कनवाळू प्रभूला नित्य नमन असो ! ज्या परम दयाळु श्रीसद्‌गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामींनी अस्वस्थ मन:स्थितीत अभय दिले व ग्रंथ लेखनास पात्र करून घेतले, त्यांना नमस्कार असो ! त्यांच्या थोर शिष्यांची श्री. गुळवणी महाराजांची प्रशस्ति असलेली, श्रीगुरुशिष्य सायंदेवसुत श्री. नागनाथ महाराजांचे श्री. विरूपाक्ष शिष्यवंशज श्री. विश्वनाथ केशव कुलकर्णी हत्तरवाडकर यांच्या गुरुप्रेम-पूरित अंत:करणांतून व्यक्त झालेली, 'श्रीदत्तप्रभु नमनावली' या ग्रंथांत समाविष्ट करण्याची सुसंधि लाभली, त्यामुळे परमेश्वरी जागृति हृद्य वाटते. या सर्वांस नमस्ते ! 

 

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

रजक झाला यवन राजा । भावें करी श्रीगुरुपूजा । राजधर्मानें पाळी प्रजा । चित्त गुरुपदी बैसलें ॥ श्रीगुरु निघाले तेथून । गोदा तीर्थीं केलें गमन । गोदेंत भागिरथीस्नान । सिंहेस गुरु असतांना ॥ कन्या राशीस बृहस्पति । कृष्णा होतसे भागीरथी । कृष्णातीरीं शैल्य पर्वती । जाणार म्हणती श्रीगुरु ॥ गाणगापुरीं गुरु आले । सांगती स्थान प्रसिद्ध झालें । यवनही येती सगळे । होईल विप्रां अडचण ॥ म्हणून तेथें गुप्त व्हावें । यात्रामिषें निघून जावें । परी भक्तांनी प्रत्यय घ्यावे । येथेंच पूर्वीसमान ॥ श्रीगुरुकरणी अगाध । त्यांचें चरित्र बहुविध । यवन राजाही प्रसिद्ध । शिष्य झाला श्रीगुरूचा ॥ श्रीगुरु विचार करिती । धर्म दाविला जनांप्रती । यवनांच्याही राजाप्रती । भक्ति उपजली उत्तम ॥ वेदधर्मा अनुसरणें । सर्वभूत हित चिंतणें । आपलाही पंथ पाळणें । विधायक वृत्ति ठेवून ॥ श्रीगुरु यतिआचरण । सदा त्याचें हवें स्मरण । चिंतून श्रीगुरुचरण । सुख मिळतें इहपर ॥ तत्त्व लोकांला समजलें । येथलें कार्य पुरें झाले । शैल्य पर्वती गमन केलें । श्रीगुरु करणी लक्षावी ॥ लोकांस मिळे आश्वासन । अनुभव येती प्रतिदिन । निर्गुण पादुका मम स्थान । वास्तव्य त्यांत निरंतर ॥ येथें राहूं गुप्तपणानें । भाव ठेवा आतां प्रमाणें । भक्तांस सदा सांभाळणें । ब्रीद आमुचें सदैव ॥ जाहली होती धर्मग्लानी । लोक झाले शंकित मनीं । म्हणून आलों अवतरूनी । वैदिक धर्म रक्षिण्या ॥ जशी परिस्थिती होतेसे । त्यापरी येणें घडतसे । भावा ठेवावा भरंवसे । चिंता नको मुळींच ॥ ऐकतां गुरूंचे वत्सल बोल । लोकां वाटली हळहळ । म्हणती गुरो तुम्ही जल । आम्ही मत्स्य सुखी होतों ॥ लोक दुःखी झाले अपार । शब्दें वर्णन न होणार । श्रीगुरू नसती निष्ठुर । प्रेमें लोकां शांतविती ॥ श्रीगुरु भक्तांस सांगती । आम्ही राहातों गुप्तरीतीं । ज्यांना असेल भावभक्ती । त्यांना दृश्य स्वभावें होऊं ॥ निर्गुण पादुका मठांत । चिंतामणीही येथें असत । शुद्धभावें भजा सतत । सुख होईल तुम्हांला ॥ मला आवडतें गायन । गायनीं करावें स्मरण । चित्तवृत्ति चरणीं लीन । कृपा होईल निश्चित ॥ मी भावाचा सदा भुकेला । भेटेन ज्यासी भाव त्याला । आरती करा तिन्ही वेळां । पूजन विधी प्रमाणें ॥ आम्ही येथून नाहीं जात । परंतु राहणार गुप्त । येतील येथें नाना भक्त । त्यांच्या इच्छा पुरतील ॥ गाणगापूर दिव्य स्थान । सर्वांना करील पावन । येथें नसावा अभिमान । उत्तम क्षेत्र हें असे ॥ चरित्र वाचावें ऐकावें । घरींही सर्वदा पूजावें । श्रद्धेनें निर्भय असावें । रक्षण निश्चयें होईल ॥ जे जन करिती माझी भक्ती । त्यांची काळजी मजप्रती । त्यांच्या घरी मी श्रीपतीं । अखंड वसतों प्रीतीनें ॥ त्यांना चारही पुरुषार्थ । साधतील हा निश्चितार्थ । सकळ सिद्धि वसतो तेथ । संशय मनीं नसावा ॥ दुष्ट बाधेचें निरसन । होऊन सुखसमाधान । लाभेल रहावें सावधान । दुष्ट बुद्धि धरूं नये ॥ त्यांना नाहीं यमाचें भय । लाभ ही लाभे हा निश्चय । पुत्रपौत्रादि अष्टैश्वर्य । अंतीं निर्भय मिळे मुक्ति ॥ यापरी श्रीगुरु सांगती । त्यांना असो भावें प्रणती । छप्पन्नावा अध्याय येती । श्रीदत्तगुरु भक्तहिता ॥ सायंदेव, नंदी, नरहरी, । सिद्ध हे गुरु शिष्य चारी । त्यांच्यासह श्रीगुरुस्वारी । निघे श्रीशैल्य यात्रेसी ॥ आश्वासून गाणगापुरी । निघातां यात्रा जमे अपारी । लोकांचे नेत्रीं दिसे वारी । वर्णन येथें न करवे ॥ कंठ दाटून येतसे । नेत्रीं उदक गळतसे । भक्तिपाश गहन असे । विचारें न जमे वागणें ॥ श्रीगुरुदत्त कृपामूर्ती । पुन्हां पुन्हां लोक नमिती । शिष्यांसह श्रीगुरु जाती । लोक माघारे परतले ॥ मठांत दिसे श्रीगुरु यती । लोक झाले निर्भय चित्तीं । लगेच गुरु गुप्त होती । धन्य त्रैमूर्ति अवतार ॥ प्रातःस्नान कृष्णा-तीरीं । दुपारीं भिक्षा गाणगापुरीं । अशी असे गुरु-वैखरी । भक्त मनीं सदोदित ॥ पहाटेपासून नित्यापरी । क्रम चालविती पूजारी । सेवा करिती सेवेकरी । श्रीगुरु रात्रीं झोंपती ॥ कृपाळु श्रीगुरुदत्त-मूर्ती । नाना स्थानें प्रकट करिती । भक्त-कामना पुरविती । साक्षात्कार भक्तमना ॥ बहुधान्य वर्ष माघ मास । सायन कुंभ संक्रांतीस । कृष्ण प्रतिपदा शुक्र दिवस । कन्या राशींत देव-गुरु ॥ शक तेराशें ऐंशीत । श्रीगुरु यात्रेस निघत । भक्तमनें उचंबळत । मठीं पाहून भक्त सुखी ॥ श्रीमल्लिकार्जुन पर्वतीं । कृष्णेचें पात्र खोल अती । पाताळगंगा तिला म्हणती । श्रीगुरु तेथें पातले ॥ शिष्य वंदिती चरणांसी । श्रीगुरु आज्ञापिती त्यांसी । जाणें असे पैलतीरासी । पुष्पासन त्वरित करा ॥ शिष्य आणिती नाना फुलें । पुष्पासन लगेच केलें । नदी-प्रवाहांत ठेविलें । त्यावर श्रीगुरु बैसले ॥ आतां होणार ताटातूट । सगुण रूपें नाहीं भेट । काय होईल आमुची वाट । हीच शंका दाट मनीं  ॥ धन्य धन्य श्रीगुरुनाथ । दतात्रेय स्वामी समर्थ । त्यांच्या भक्तीनें जन्म कृतार्थ । नमन प्रेमं गुरुचरणीं ॥ गुरु सांगती प्रिय शिष्यांसी । चिंता करूं नका मानसीं । सदा पावाल प्रत्ययासी । तुमच्याकडे मी असें ॥ तुम्हां नाहीं कसलें भय । रहावें सर्वदा निर्भय । मम भक्तां सदा अभय । त्यांची प्रीती अपार मला ॥ प्रेमं शिष्यां कुरवाऴिती । प्रसाद फुलें धाडूं म्हणती । शेवंती पुष्पे चार येती । घ्यावी काढून चौघांनी ॥ करा त्यांचें नित्य पूजन । पावाल क्षेम समाधान । अंतीं सद्‌गती सुख भोगून । आतां निश्चिंत असावें ॥ इतके सांगून श्रीगुरु । जाते जाहले पैलपारु । नावाड्यांकडे सांगती गुरु । निरोप शिष्यां प्रेमाचा ॥ शिष्य बनले चिंताक्रांत । नावाडी येती इतक्यात । सांगती शिष्यां टाका खंत । आम्ही श्रीगुरु देखिले ॥ नाम नृसिंह सरस्वती । त्यांचा वेष संन्यासी यती । सुवर्ण पादुका पदांप्रती । चालत जाती पलीकडे ॥ त्यांनी सांगितले तुम्हांस । गाणगापुरीं गुप्त वास । आतां जातों कर्दळी वनास । प्रसाद पुष्पें येतील ॥ तेचं पुष्पें प्रवाहांतून । आलीं घेतलीं उचलून । गुरु-रूप मानून वंदन । भक्तिभावें शिष्य करिती ॥ सिद्ध नामधारका सांगती । गुरु-चरित्र प्रेमें अती । प्रसाद पुष्पही दाविती । नामधारक समाधिस्थ ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


संदर्भ आणि मूळ स्रोत : http://dattacharitrasar.com/


अवश्य वाचावे असे काही -


Feb 2, 2023

प्रसाद हा मज द्यावा देवा...


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


प्रसाद हा मज द्यावा देवा । सहवास तुझाचि घडावा ॥धृ.॥   निशिदिनीं तव मी नाम स्मरावें । विसर तुझा न पडावा ॥१॥ देवा प्रसाद हा मज द्यावा, देवा…  हृदयमंदिरी तुवा बैसुनी । ज्ञान-योग मज द्यावा ॥२॥ देवा प्रसाद हा मज द्यावा, देवा… हरिभजनामृत निशिदिनीं पाजुनी । जन्म-मृत्यु चुकवावा ॥३॥ देवा प्रसाद हा मज द्यावा, देवा…  आत्मसुता प्रभु प्रसाद द्यावा । वियोग ना तव व्हावा ॥४॥ देवा प्रसाद हा मज द्यावा, देवा…


॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त ॥


अवश्य वाचावे असे काही -