Feb 25, 2019

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १



॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्री गणेशाला वंदन असो.

हे उदारकीर्ती, प्रतापज्योती गणपती, हे गौरीपुत्रा, मयूरेश्वरा तुझा जयजयकार असो.।।१।।मोठमोठाले विद्वान, साधुसंत, सत्पुरुष, जन कार्यारंभीं तुझेंच स्मरण करतात.।।२।। जसा अग्नीपुढें  कापसाचा पाड लागत नाही, त्याचप्रमाणे हे दयाघना तुझ्या कृपेच्या अगाध शक्तिमुळे सर्व विघ्नें भस्म होतात.।।३।। म्हणूनच अत्यंत आदराने मी तुझ्या चरणांना वंदन करीत आहे. आता तू  दासगणूच्या मुखानें  ही पद्यरचना  रसाळ करावी. ।।४।। मी अज्ञानी, मंदमती आहे. तसेच काव्यव्युत्पत्ति जाणत नाही. पण तू जर माझ्या अंत:करणात वास केल्यास माझे हे कार्य निश्चितच होईल. ।।५।। आतां आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची  प्रकृती आहे. जी थोर कवींची ध्येयमूर्ती आहे, ती जगदंबा , ब्रह्मकुमारी शारदामातेला मी  साष्टांग नमस्कार करतो. मी तुझे अजाण लेंकरुं आहे. माझ्यावर तुझी कृपा असावी. ।।६-७।। तुझ्या कृपेची थोरवी अगाध आहे. तुझ्या कृपेमुळेच पांगळाही पर्वत चढतो, आणि मुका सभेत अस्खलित व्याख्यान देतो.।।८।। त्या तुझ्या कीर्तीला आता कमीपणा आणु नकोस. ह्या दासगणूला ग्रंथरचनेस सर्वतोपरी सहाय्य करावेस अशी मी प्रार्थना करतो. ।।९।। आता हे पुराणपुरुषा, पांडुरंगा, पंढरीशा,सच्चिदानंदा रमेशा , दिनबंधो तू माझ्याकडे कृपादृष्टीने पहावेस. ।।१०।। तूच सर्वसाक्षी जगदाधार आहेस, तू  चराचर व्यापून राहिला आहेस. तूच कर्ता करविता सर्वेश्वर असून अवघे कांहीं तूंच तूं आहेस. ।।११।। जग, जन आणि जनार्दन असा तूंच एक परिपूर्ण आहेस. हे मायबापा, सगुण आणि निर्गुण असा तूच एक व्यापून राहिला आहेस. ।।१२।। तुझा अगाध महिमा भल्याभल्यांनासुद्धा कळत नाही, तेथे या गणूचा हे  पुरुषोत्तमा कसा निभाव लागणार ? ।।१३।। श्रीरामांच्या कृपेमुळेच तेव्हां माकडांना शक्ति आली. यमुनातीरीं गोकुळांत श्रीकृष्णांच्या कृपेमुळे गोपसुद्धा बलवान बनले. ।।१४।। तुझी कृपा होण्यास धनाची आवश्यकता नाही. श्रद्धेने तुझ्या चरणी लीन झाल्यास तू निश्चितच मदत करतोस. ।।१५।। हे  रमावरा,असेच सर्व संतांचे अनुभवाचे बोल आहेत. म्हणुनच मी तुझ्या दारी आलो आहे. आतां तू मला विन्मुख पाठवू नकोस.।।१६।। ह्या संतचरित्राची  रचना करण्यास हे पंढरीधीशा तू मला सहाय्य करावेस. माझ्या  अंत:करणात वास करून हा ग्रंथ तू पूर्णत्वास ने. ।।१७।।हे भवभवान्तक भवानीवरा,  हे नीलकंठा गंगाधरा, हे ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा तुझा कृपाहस्त माझ्या शिरी ठेव. ।।१८।। तुझे सहाय्य असल्यावर मला काळाचाही भीती नाही. परीसस्पर्श झाल्यास लोखंडाचे क्षणात सोने होते. ।।१९।। तुझी कृपा हाच परीस आहे आणि मी दासगणू हा लोखंड आहे. त्याचे सोने करून तू मला सहाय्य करावेस, मला तू (तुझ्यापासून )दूर करू नकोस.।।२०।। तुला काहीच अशक्य नाही , सर्व काही तुझ्या ठायीच आहे. तरी ह्या लेंकरासाठीं तू धावत ये आणि हा ग्रंथ सुगम कर. ।।२१।। माझी कुलदेवता कोल्हापुरवासिनी जगन्मातेच्या चरणी माथा ठेउन मी तिचा मंगल आशीर्वाद घेतो. ।।२२।। हे दुर्गे तुळजे भवानी,हे अपर्णे अंबे मृडानी दासगणूच्या शिरावर तुझा कृपाहस्त ठेव. ।।२३।|आता मी दत्तात्रेयांना वंदन करतो. तू मला त्वरित पाव. हे गजाननचरित्र गाण्यासाठी प्रसादासह स्फूर्ति दे.॥२४॥आतां शांडिल्यादि ऋषीवर,वसिष्ठ, गौतम, पाराशर आणि ज्ञानरूपी नभात जो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा शंकराचार्याना मी नमन करतो. ।।२५।। आतां अवघ्या संतमहंताना नमन करून  त्या सर्वांनी माझ्या हाताला धरून ह्या ग्रंथाचे लेखन करावे अशी मी प्रार्थना करतो. ।।२६।।ह्या भवसागराचे तारक गहिनी, निवृत्ति ,ज्ञानेश्वर, देहूकर श्रीतुकाराम,श्रीरामदास आदींना माझा नमस्कार असो. ।।२७।।शिर्डिकर साई समर्थ आणि पुण्यवंत वामनशास्त्री ह्याही संतानी दासगणूला  अभय द्यावे.।।२८।। केवळ तुमच्याच कृपेने मी हे ग्रंथलेखन करणार आहे. हा दासगणू तुमचे तान्हेंच आहे. मजवर कठोर होऊ नका. ।।२९।। जिथे खरा जिव्हाळा असतो, तिथेच असे बोलणे होते.तुमचें माझें नातें मायलेंकासारखे आहे हो. ।।३०।। लेखणी अक्षर काढते, परंतु तिच्यात काही जोर नाही. ती या लेखनरुपी कार्याचे केवळ निमित्तमात्र आहे. ।।३१।। दासगणू हाच इथे लेखणी आहे, ती लेखणी अवघ्या संतानी धारण करून रसाळ ग्रंथरचना करावी हीच प्रार्थना आहे ।।३२।।आतां श्रोतेजन निजकल्याण होण्यासाठी संतकथेचें श्रवण एकाग्र मन करून, सावधान होऊन करा.।।३३।। ह्या भूमीवर संत हेच चालते बोलते परमेश्वर आहेत. ते वैराग्याचे सागर आणि मोक्षपदाचे दाते आहेत.।।३४।।संत हेच सन्नीतीची प्रत्यक्ष मूर्तिच आहे. हे बुधजनहो ,संत म्हणजे भव्य कल्याणाची जणू पेठ आहे.।।३५।। त्या संतचरित्रास आता तुम्ही सावकाश ऐका. आजवरी या संतांनीं कोणालाही दगा दिला नाही. ।।३६।। खरे तर संत हेच ईश्वरी तत्त्वांचे मार्गदर्शक आहेत. जणू अत्यंत अमोघ ज्ञानानी भरलेले गाडे आहेत. ।।३७।।ज्याची संतचरणीं श्रद्धा असते, त्याचा प्रत्यक्ष रुक्मिणीकांत  ऋणी असतो. आता मलरहित चित्त करून गजाननचरित्र ऐकू या. ।।३८।। भरतखंडामध्ये खूप संत झाले. इतर देशांना खरे तर  हे भाग्य लाभले नाही. ।।३९।।पहिल्यापासोनच हें  जंबुद्वीप धन्य धन्य होय. आजपर्यंत कोणत्याही सुखाची येथे कधीच कमी नव्हती. ।।४०।।अनादि कालापासून या भूमीस संतचरण लागत आले आहेत ,हेच याचें कारण आहे. ।।४१।। नारद, ध्रुव, कयाधूकुमर,उद्धव, सुदामा, सुभद्रावर,महाबली अंजनीकुमर ,अजातशत्रू धर्मराजा आणि जगत्गुरू शंकराचार्य असे सर्व जे स्वर्गीचे कल्पतरु व अध्यात्मविद्येचे मेरुमणी याच देशीं झाले आहेत. ।।४२-४३।।ज्यानें निज सामर्थ्य दाखवून धर्माची लाज राखिली तो मध्व-वल्लभ-रामानुज याचा जणू परमेश्वर ऋणी आहे. ।।४४।। नरसीमेहता तुलसीदास ,कबीर कमाल सुरदास आणि गौरंग-प्रभूच्या लीलांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. ।।४५।।राजकन्या मिराबाई जिच्या भक्तीस उपमा नाही , तिच्यासाठी शेषशायी विष्णू विष प्राशन करता झाला.।।४६।। योगयोगेश्वर गोरख-मच्छेंद्र जालंदर आदी नवनाथांच्या लीलेचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ प्रसिद्ध आहे. ।।४७।। ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति करुन श्रीपतीला प्राप्त केले असे नामा, नरहरी सन्मति,जनी, कान्हो, संतसखू,चोखा-सावता-कूर्मदास,आणि पुण्यपुरुष दामाजीपंत ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष श्रीहरी वेदरास महार झाला. ।।४८-४९।। मागें महिपतींनीं मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन ह्यांची चरित्रें-गायन केली आहेत. ।।५०।।म्हणून त्यांचीं नांवें मी आता देत नाही. भक्तिविजय व भक्तमाला हे ते ग्रंथ होत, ते वाचा. ।।५१।। त्यानंतर जे जे संत जाहले त्यांचे तीन चरित्रग्रंथ मी लिहिले आहेत. ते वाचल्यावर त्यांची महती कळेल. ।।५२।।त्याच संतांच्या तोडीचा संत श्रीगजानन या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचितच लोकोत्तर आहे. ।।५३।।बुधजनहो,मी जी मागे तीन ग्रंथातून संतचरित्रें गाईलीं,तीं सारांशरुपें सांगितलीं आहेत. ।।५४।।आता हे पूर्णत: चरित्र कथितों ते ऐका. माझ्या सुदैवामुळे हे चरित्र रचण्याचा योग मला प्राप्त झाला आहे. ।।५५।।आकोटासन्निध जो संत मी प्रथमत: पाहिला, त्याचेच चरित्र मी इतर चरित्रांनंतर लिहितो आहे,त्याचे कारण आता तुम्ही ऐका. ।।५६।। आधीं माळा ओवतात, मग मेरुमणी जोडतात. त्याचप्रमाणे हे चरित्र मी नंतर रचितो आहे.।।५७।। वऱ्हाडात खामगांव तालुक्यांमध्ये शेगाव नावाचे प्रसिद्ध ग्राम आहे. जिथे मोठा व्यापार (मोठी बाजारपेठ ) चालतो.।।५८।। हे जरी लहान गाव असले तरी या गावाचे वैभव मोठे आहे.श्री गजानन साधूमुळें ह्या गावाचे नाव त्रिजगतात अजरामर झाले.।।५९।। त्या शेगांवरूपी सरोवरात गजाननरूपी कमळ उदयास आले. त्याच्या सुवासामुळे या अखिल ब्रह्मांडाचे आकर्षण ठरले.।।६०।। शेगांवरूपी खाणीत गजानन म्हणजे खरोखर हिराच होय.त्या अवलियाची महती मी अल्पमतीनें वर्णितो.।।६१।।आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका. श्रीगजाननचरणीं प्रेम धरा. तरच तुमचा खरा उद्धार होईल हें विसरुं नका।।६२।। हे गजाननचरित्र जणू आकाशातील मेघ आहेत, आणि तुम्ही सारे श्रोते मोर आहात. ह्या चरित्ररुपीं पावसाचा वर्षाव झाला की मोररूपी श्रोते आनंदाने निःसंशय नाचतील असे वाटते.।।६३।। शेगांवचे नगरजन हे निश्चितच परम भाग्यशाली आहेत. म्हणुनच त्यांना हे संतरत्न श्री गजानन लाभले. ।।६४।। जेव्हा अगणित पुण्य घडते, तेव्हाच संतचरण लाभतात. संत हे देवाहून श्रेष्ठ आहेत, याविषयीं तिळमात्र शंका नाही.।।६५।।कार्तिकीच्या वारीला  पंढरी क्षेत्रीं येऊन श्री रामचंद्र पाटलांनीं  मला विनंती केली. ।।६६।। माझ्याही मनी गजानन-चरित्र लिहावे अशी इच्छा होती. परंतु ते कसे/कधी लिहावे याबद्दल मला मार्ग सापडत नव्हता. ।।६७।।त्या माझ्या इच्छापूर्तीसाठीच जणू श्री समर्थांनी श्री रामचंद्र पाटलांची योजना केली.।।६८।।खऱ्या संताचें मनी काय आहे, हे कोणालाच कळत नाही. महापुरुष गजानन खचितच आधुनिक संत चूडामणी आहेत. ।।६९।।या महापुरुषाचे मूळ ठावठिकाण कोणते, वा त्यांची जात कुठली ह्याची  इतिहासदृष्टया माहिती उपलब्ध नाही. ।।७०।।ज्याप्रमाणे ब्रह्माचा मूळ ठावठिकाणा कोणासही माहिती नसतो. पण केवळ ब्रह्मास पाहून आपली श्रद्धा बसते.।।७१।। जो अतिशय अस्सल तेजस्वी हिरा असतो, त्याचे तेज पाहून तज्ञ प्रभावित होतात.।।७२।।तेथे त्या हिऱ्याची खाण कुठली आहे? हे विचारण्याची गरज मुळींच नसते.।।७३।।माघ वद्य सप्तमीला शके अठराशे साली श्री गजानन शेगांवनगरीं आले. तेव्हा ते तरुण होते.।।७४।। श्रीसमर्थांचें जे स्थान आहे त्या सज्जनगडाहून ते या  शेगावी आले असे काही लोकांचे म्हणणे आहे. ।।७५।। ह्याला जरी सबळ पुरावा नसला तरी त्यांच्या म्हणण्यांत कांहींतरी अर्थ/तथ्य असावे असे वाटते.।।७६।।या कलियुगात अवघे लोक भ्रष्ट झाले, नाना यातनांनी कष्टी झाले, त्यांच्यासाठींच समर्थांनीं असे कौतुक केले असे वाटतें.  ।।७७।।जगाचा उद्धार करण्यासाठी सिद्धयोगी श्री समर्थ पुन्हा या गजानन रूपात ह्या पृथ्वीतलावर अवतरले. ।।७८।। योगीपुरुष कोणत्याही देहात सहज प्रवेश करू शकतात. या यापूर्वीही या भूमीवर असे प्रकार जगद्गुरुंनीं केले आहेत.।।७९।।गोरख उकिरड्यांत जन्मला, तर कानीफा गजकर्णांत जन्मला. चांगदेव योनीवांचून नारायण डोहांत प्रगटले.।।८०।।तसेच कांहींतरी इथे निश्चितच झालें असावें. गजानन महाराजांना योगकला सर्वार्थाने ठाऊक होत्या. ।।८१।।हे त्यांनी केलेल्या चमत्कारामधून तुम्हाला पुढे कळून येईल. खरोखरच योगाची महिमा अगाध आहे, त्याची सर कशालाच येणार नाही.।।८२।।सकल जनांना केवळ तारण्यासाठीच माघमासातील वद्य सप्तमी दिवशीं शेगांवीं हा ज्ञानराशी उदय पावला.।।८३।।त्या वेळची कथा मी तुम्हाला सांगतों ती आता श्रवण करा. देविदास नावाचा एक भाविक,सज्जन गृहस्थ होता.।।८४।।हा देविदास पातूरकर ज्यांची शाखा माध्यंदिन होती, तो शेगावात मठाधिपती होता.।।८५।।त्याच्या एका मुलाची ऋतुशांति होती. त्यानिमित्त त्याच्या घरी भोजनाचे आयोजन केले होते.।।८६।।त्या देविदास विप्राच्या घरासमोरील रस्त्यावर उष्टया पत्रावळी टाकल्या होत्या.।।८७।। तिथेच समर्थसिद्धयोगी गजानन बसले होते. एक जुन्या पुराण्या कापडाची बंडी त्यांच्या अंगात होती.।।८८।। त्यांच्याजवळ इतर कोणतेही सामान नव्हते. पाणी पिण्याचे पात्र म्हणुन केवळ एक भोपळा होता.।।८९।।एक कच्ची चिलीम हातांत होती. ती चिलीम स्वत: समर्थांनी केलेली असून कुंभाराच्या भट्टीत ती भाजलेली नव्हती.।।९०।।त्यांची मुद्रा शांत होती. दृष्टि नासाग्री स्थिर होती. तपोबलाचे तेज अंगीं झळकत होते. पूर्व दिशेला उगवणाऱ्या बालरवीच्या तेजोवलयाचे वर्णन तरी किती करावें?।।९१।।गजाननमूर्ती अवघीच दिगंबर होती. मुखावर सर्वांसाठी कल्याणकारी भाव होता. कशाबाबतही दुजाभाव उरला नव्हता. त्यांना कुठल्याच गोष्टीची आवडनिवड राहिली नव्हती.।।९२।।रस्त्यावर बसून ती समर्थांची स्वारी पत्रावळी शोधत होती. तीही त्यांची केवळ एक निजलीलाच होती. ।।९३।। शीत दृष्टीस पडल्यावर तें मुखीं उचलुनी घालीत होते. 'अन्न हेच परब्रह्म आहे' हाच ह्या कृतीतून त्यांना संदेश द्यायचा होता.।।९४।।त्याचे कारण हेच की 'अन्न हेंच ब्रह्म आहे.' हेच श्रुती गर्जोन सांगत असतात.उपनिषदांतही "अन्नम् ब्रह्मेति" अशी उक्ती आहे.।।९५।।तेच पटवून देण्यासाठी दयाघन शितें वेचून खात होते. अर्थातच सामान्य लोकांना त्यातला भावार्थ तो कळला नाही.।।९६।।त्याचवेळी बंकटलाल आगरवाल आपल्या स्नेह्यासह रस्त्यानें चालला होता.त्यानें हा प्रकार पाहिला. ।।९७।।दामोदरपंत कुलकर्णी असे त्या स्नेह्याचें नांव होते. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले. ।।९८।।आणि एकमेकांशी बोलू लागले की खरोखर याचे वर्तन तर वेड्यासारखे दिसते आहे.।।९९।। हा जरी अन्नार्थी/ याचक असता तर ह्याने पान वाढून मागितले असते आणि देवीदासही सज्जन असल्यामुळे त्यानेही ते आनंदाने दिले असते. ।।१००।। सुज्ञ लोक दारी आलेल्या याचकाला कधीही रिक्त हस्ते परत पाठवत नाहीत. पण याच्या ह्या कृतीवरुन काहीच तर्क चालत नाही.।।१०१।।तरी आपण असेच रस्त्यावर उभें राहून त्याच्या वर्तनाचा अर्थ लावायचा प्रयत्न करू या असे बंकटलाल पंतासी बोलता झाला. ।।१०२।। व्यास मुनींनी भागवतांत लिहिले आहे की या जगात जे खरे साधु असतात त्यांचे वर्तन एखाद्या वेड्याप्रमाणेच असते.।।१०३।। हा जरी कृतीने वेडा दिसत असला तरी मला ज्ञानीपुरुष वाटतो किंवा प्रत्यक्ष अतिशय निर्मळ ज्ञानी योगीपुरुष असावा. ।।१०४।। असा विचार ते दोघे बंकटलाल आणि दामोदरपंत करू लागले. चतुर पारखीच समोर रत्न आले असतां त्याचे मूल्य जाणतो.।।१०५।। त्या रस्त्यावरून हजारों लोक आले गेले, पण या दोघांवांचून कुणीही  महाराजांकडे लक्ष दिले नाही. श्रोते हो, तुम्हीच याचा जरा विचार करा हो !।।१०६।।या जगात हिरे आणि  गारा एकत्र मिसळुन ठेवलेल्या असतात. परंतु फक्त खरे पारखी गारा टाकून हिरेच निवडुन घेतात.।।१०७।।मग प्रथम तो बंकटलाल आगरवाल पुढें झाला  आणि अतिशय विनयानें त्याने गजानन महाराजांना विचारले, "ह्या उष्ट्या पत्रावळीतील अन्न आपण का शोधून खात आहात? हे काही केल्या मला कळत नाही. आपणांस जर भूक लागली असेल तर मी चांगल्या अन्नाची व्यवस्था करतो."।।१०८-१०९।।असे त्याने विचारले तरी श्रींनी त्यास उत्तर दिले नाही. तर केवळ उभयतांच्या मुखाकडे दृष्टी वर करून नुसतें पाहिलें ।।११०।।तोच मनोहर रूप,सतेज कांती, पिळदार दंड,भव्य छाती,भृकुटी स्थिर झालेली दृष्टि आणि निजानंदी रंगलेला असा योगी बंकटलालाने पाहिला आणि मनात अतिशय समाधानी, प्रसन्न होऊन त्याने श्रींना मौनेंच(मनातल्या मनात) नमस्कार केला.।।१११-११२।।देविदासबुवाला विनंती करून एक अन्नाने भरलेले पान त्वरित बाहेर आणावयास सांगितले.।।११३।।देविदासाने तसेच केले आणि पक्वान्नांनीं भरलेलें पान द्वारासमोर बसलेल्या स्वामीपुढें आणून ठेविलें।।११४।। श्री समर्थांची स्वारी त्या पक्वान्नांनीं भरलेल्या पानावर भोजनास बसली.मात्र त्या सिद्धपुरुषास अंतरीं कुठल्याच चवीची अणुमात्र इच्छा उरली नव्हती.।।११५।।अनुपम अशा ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला आहे तो का गुळवणी मागून मिटक्या मारीत बैसेल ?।।११६।।जो सार्वभौम नृपवर आहे त्या मनुष्याला जहागीर मिळाली तरी प्रेम अथवा आनंद होत नाही.।।११७।।समर्थांनी सर्व पक्वान्नें एकत्र  केलीं कारण काही आवडनिवडच उरली नव्हती. दोन प्रहरच्या वेळी जठराग्नीची तृप्ति केली.।।११८।। तें पाहून बंकटलाल पंताना म्हणाला," ह्यांना आपण वेडा म्हणालों हेच आपले निःसंशय चुकले. सुभद्रेसाठीं द्वारकेला अर्जुन असाच वेडा झाला होता. त्याला व्यवहाराचा विसर पडला व तो विचित्र वर्तन करू लागला. तसाच हा ज्ञान गभस्ती मुक्तिरुप सुभद्रेसाठीं वेडा झाला आहे. आता याची परिक्षा घेणे नको. आपले शेगांव खरोखर आता धन्य झाले, ह्या योगीपुरुषाचे दर्शन झाले. जसे काही प्रत्यक्ष श्रीहरीने त्याला आपले शेगांव हे जहागीर म्हणुन उद्धरण्यास दिले. सूर्य माध्यान्हीं आला आहे. भूमी अतिशय तप्त झाली आहे, पांखरेंहीं उन्हाला त्रासून वृक्षावर जाऊन आश्रयाला बसली आहेत. अशा भर उन्हांत हा कसा आनंदांत बसला आहे. हा तर साक्षात् ब्रह्मच आहे.खरोखर ह्याला कसलेच भय उरले नाही. ह्याचे जेवण तर व्यवस्थित झाले,पण तुंब्यामध्यें पाणी नाही. तर पंत, आपण तें आणून देऊ या."।।११९-१२५।। आता दामोदर पुढे आले अन समर्थांना विचारू लागले," आपल्या तुंब्यामध्यें पाणी नाही. आपली इच्छा असेल तर हा सेवक पाणी आणून द्यायला तयार आहे." ।।१२६।।हे ऐकून समर्थांनीं हास्य केलें, व उभयतांकडे पाहून काय वदले, ते मी आता श्रोतेहो तुम्हांला सांगतो.।।१२७।। समर्थ म्हणाले, जर तुम्हाला गरज असेल तर मला पाणी आणून द्या. ह्या पूर्ण जगतात एकच ब्रह्म ओतप्रोत भरलें आहे. ।।१२८।। तुम्ही आम्ही असा भेद तिथे यत्किंचितही उरलेला नाही. परंतु जगव्यवहार हा आचरणात आणलाच पाहिजे हे ही तितकेच खरे आहे.।।१२९।। अन्न ह्या देहानीं खाल्ले, म्हणून पाणी प्यायला पाहिजे. हा व्यवहार चतुरांनीं अवश्य जाणिला पाहिजे.।।१३०।। म्हणून तुम्हां चतुर लोकांस गरज असल्यास पाण्याची तरतूद करा, म्हणजे सर्व यथासांग होईल.।।१३१।। समर्थांचे हे बोलणे ऐकून दोघांना अतिशय आनंद झाला. आपले भाग्य धन्य आहे असे बंकटलाल पंतांस सांगू लागला.।।१३२।। दामोदर पाणी आणण्यासाठी त्वरित घरांत गेले.तों इकडे काय प्रकार घडला तो ऐका.।।१३३।। घराजवळील विहिरीच्याच शेजारीं एक ओढा होता. जिथे गावातील सारी जनावरें पाणी पीत होती.।।१३४।। तिथेच जाऊन समर्थांनी पाणी पिऊन तृप्ततेचे ढेकर दिले. तोच पंत एका गडव्यांत पाणी घेऊन आले.।।१३५।। समर्थ ओढ्यातील पाणी पीत आहेत हे पाहून पंत बोलू लागले," अहो,ओढ्यातील पाणी गढूळ आहे. ते समर्था तुम्ही मुखात घेऊ नका. ते केवळ जनावरांना पिण्यास योग्य आहे. हे पहा, मी गोड, निर्मळ, थंडगार जल आणले आहे. शिवाय यामध्यें वाळा घालून सुवासितही केले आहे."।।१३६-१३७।। हे बोलणे ऐकून महाराज त्वरित बोलते झाले," तुम्ही ह्या अवघ्या व्यावहारिक कथा आम्हांला सांगू नका. हें अवघें चराचर एका ब्रह्माने व्याप्त आहे. तिथे गढुळ,निर्मळ,वासित पाणी असा भेद नाही. पाणी तरी तोच आहे. निर्मळ वा गढुळ तोच आहे. सुवास व कुवास दोन्ही हें त्याचेंच निःसंशय रुप आहे. पिणाराही त्यापासून वेगळा ना निराळा आहे. ही ईश्वराची अगाध लीला या नरजन्मींच कळते. हे सर्व सोडुन व्यवहारातच सर्वांचे मन गुंतले आहे. हे जग कशापासून झाले,यांचेंच सदा चिंतन करा."।।१३८-१४२।।अशी समर्थवाणी ऐकतांच दोघे फारच गहिंवरोन गेले. अनन्यभावें समर्थचरणीं लोळावयास तयार झाले.।।१४३।। तो त्यांच्या मनीचा हेतू जाणुन महाराज पळत पळत निघाले. वायूच्या गतीला या जगी खरेच कोण अडथळा करू शकतं ?।।१४४।।आता यापुढील कथा द्वितीयाध्यायात निवेदन होईल. चित्त एकाग्र करून ती श्रवण करावी.।।१४५।।हा गजाननविजय ग्रंथ भाविकांना आल्हाददायी होवो.दासगणू ईश्वरचरणी हात जोडुन हीच प्रार्थना करतो. ।।१४६।। श्रीहरिहरार्पणमस्तु॥ शुभं भवतु ॥


॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥


No comments:

Post a Comment