Feb 8, 2019

श्रीगुरु नृसिंहसरस्वती आणि शिष्योत्तम सायंदेव


श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे अनेक शिष्य होते. त्यातही सायंदेवावर त्यांचे विशेष प्रेम होतें, हे श्री गुरुचरित्रातील कथांवरून लक्षात येते. श्री गुरुचरित्रांतदेखील सायंदेव आणि त्रिविक्रमभारती यांचे कथाभाग असलेले अनेक अध्याय आहेत. सायंदेवाची व श्रीगुरुंची प्रथम भेट झाली तो कथाप्रसंग गुरुचरित्रातील तेराव्या अध्यायांत वर्णिला आहे. वासरब्रह्मेश्वर या गोदातटीच्या एका ग्रामीं स्वामी इतर शिष्यांसमवेत होतें, त्यावेळीं पोटदुखीने अत्यंत त्रस्त झालेला एक ब्राह्मण तिथे आत्महत्या करण्यास आला. श्रीगुरुंनी त्या व्याधीयुक्त ब्राह्मणास अभय देऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले व मी तुला औषध देऊन तुझी ही पोटदुखी कायमची दूर करतो असे आश्वासन दिले. तेवढ्यात सायंदेव नावाचा एक ब्राह्मण जो ग्रामाधिकारी होता, तो तेथे आला. श्री गुरूंच्या दर्शनाने अत्यंत प्रसन्न होऊन त्यानें भक्तीभावाने स्वामींना नमस्कार केला. ह्या प्रथम भेटीतच तो श्रीगुरुंना कायावाचामनाने शरण आला होता. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्यानें त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणास भोजनाचे निमंत्रण तर दिलेच पण त्याचबरोबर श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनाही शिष्यमंडळींसह पूजा स्वीकारण्यांस व भिक्षेस बोलावले. तदनुसार गुरूंसह सर्वांचे त्याच्या गृही आगमन झाल्यावर सायंदेवाने आपल्या पत्नीसह श्रीगुरुंची व इतरांची षोडशोपचारे पूजा केली व सर्वांना उत्तम पक्वान्नांचे भोजन दिले. गुरुकृपेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मण त्या भोजनानंतर व्याधीमुक्त झालाच, तसेच सायंदेवाच्या पूजेने व सेवेने स्वामी महाराज सायंदेवावर प्रसन्न झाले व त्यास अनेक आशीर्वादही दिले. इतकेच नाही तर त्याला प्राणसंकटातूनही सोडविले. 

सायंदेवाने श्री गुरूंना तो ज्या यवनाकडे चाकरी करायचा त्याविषयी सांगितले व तुमचे दर्शन झाल्यावर मला त्या यवनाकडून मरण का यावे ? असे विचारले असता श्री गुरुदेवांनी "तू निर्भयपणे यवनाकडे जा.तो तुला परत पाठवेल." अशी ग्वाही दिली. केवळ श्रीगुरूंच्या कृपाकवचामुळे त्या यवनाने सायंदेवाला न मारता वस्त्रे वगैरे देऊन मानाने परत पाठविले. गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय म्हणजे गुरुकृपा किती प्रभावी असतें, ह्याचेच उदाहरण आहे.म्हणूनच गुरुचरित्राच्या अध्यायमालिकेचा तो मेरुमणी आहे.

पुढें श्री नृसिंह सरस्वती महाराज गाणगापुरी आल्यावर (एकेचाळिसाव्या अध्यायांत)त्यांनी सायंदेवाच्या गुरुभक्तीची कसोटी घेतली. काशीयात्रेचे वर्णन करून सांगता सांगता सर्व तीर्थेभेटी त्याच्याकडून योगावस्थेत करून घेतल्या व यापुढे आमच्याकडेच सेवा करीत राहा असे सांगितले. तसेच श्री अनंत व्रतही सायंदेवाकडून करवून घेतले.

श्री गुरु निवडक शिष्यांना घेऊन श्री शैल्य यात्रेस निघाले, त्यावेळीसुद्धा सायंदेव गुरुंसमवेत होता. श्रीगुरु कर्दळीवनात गुप्त झाल्यावर जी चार प्रसादपुष्पें आली होती, त्यातील एक सायंदेवाने घेतले होते. सायंदेवाच्या भक्तीचे अन भाग्याचे वर्णन काय करावें बरें ? 

कर्नाटकातील श्री क्षेत्र कडगंची हे सायंदेवाचे मूळ गांव आणि वेदतुल्य श्रीगुरुचरित्राचे लेखनस्थळ ! श्री दत्तभक्तांनी या पवित्र स्थानाला अवश्य भेट द्यावी.


सविस्तर लेख : श्री क्षेत्र कडगंची


No comments:

Post a Comment