Jan 31, 2019

परी भक्तप्रेमालागी सकाम...


आज श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री नृसिंहवाडी येथें श्री नृसिंहसरस्वती महाराजांनी एक तप वास्तव्य केलें होतें. कृष्णा - पंचगंगा संगमस्थानी वसलेल्या ह्या पवित्र स्थळीं भगवान दत्तप्रभूंचा द्वितीय अवतार, श्री नृसिंहसरस्वती महाराज एका विशाल औंदुंबर वृक्षाखाली गुप्तपणें बारा वर्षे तप करीत होते. श्री गुरुचरित्रात वर्णिलेल्या अमरापुर माहात्म्य, वेदाभ्यासी द्विज दैन्यहरण, औदुंबर माहात्म्य, गंगानुज नावाड्यावर श्रीगुरुंची कृपा आणि त्याची त्रिस्थळीं यात्रा, योगिनींची कथा, ब्राह्मण स्त्रीचा ब्रह्मसमंध परिहार आणि मृतपुत्र - संजीवन कथा नृसिंहवाडी इथें घडलेल्या आहेत. तसेच मनोहर पादुका स्थापना, भैरव द्विज वरदान कथा आणि शिरोळच्या भोजनपात्राची कथा ह्या गुरुचरित्रात उल्लेख नसलेल्या लीला ह्याच पवित्र स्थानीं श्री स्वामींनी दाखविल्या आहेत. 

पुढें श्री गुरूंनी गाणगापूरला गमन केल्यावरही, कधी कोणाला ह्या स्थानी आराधना करून प्रचिती आली का? असे नामधारकाने विचारले असता सिद्धांनी त्याला एका ब्राह्मण स्त्रीला कसे दृष्टांत झाले त्या कथा विसाव्या आणि एकविसाव्या अध्यायांत सांगितल्या आहेत. त्या स्त्रीनें पूर्वजन्मी एका ब्राह्मणाचे कर्ज घेतले होते व ते परत दिले नाही. त्या द्रव्यलोभी माणसाने आत्महत्या केली, तो पिशाच्च झाला व त्या स्त्रीची संतती मारून तिला छळू लागला. ती स्त्री औदुंबर क्षेत्री आली व तिने संगमस्थानी श्री गुरूंची पूजा करून व्रताचरण केले. त्या विप्र स्त्रीचा श्री नृसिंह महाराजांवरील दृढ विश्वास आणि त्यामुळे श्री गुरूंनी केलेला समंधाचा प्रतिकार म्हणजे गुरुनिष्ठेचे फळ काय असते व महाराजांचे भक्तवात्सल्य व भक्त-पक्षपात कसा असतो, ह्याचेच उदाहरण आहे. पुढें ह्याच विप्रस्त्रीला वर देऊन दोन पुत्र दिले व पुत्रशोक झाल्यावर सिद्धरूपांत येऊन आत्मज्ञानोपदेशही केला. तसेच आपलें वरदान खरे करण्यासाठी, गुरूपादुकांवर डोके आपटून शोकग्रस्त असलेल्या त्या विप्र मातेच्या मुलाला पुन्हा जिवंत केले. तीन वेळां स्वप्नांत आणि एकदा ब्रह्मचारी रूपांत असा श्री गुरु महाराजांच्या दर्शनाचा व कृपेचा लाभ ज्या विप्र स्त्रीस प्राप्त झाला, तिच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरें ? खरोखर भक्तवत्सल श्री दत्तगुरुंचा महिमा काय वर्णावा ? 

श्री. शरद उपाध्यें यांनी ही कथा सुरेख वर्णन केली आहे.



No comments:

Post a Comment