श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥ १ ॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्वी वृतांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्रियेची ॥ २ ॥ शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं । देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळी ॥ ३ ॥ झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं । वाजसनीय शाखेसी । विप्रकुळी जन्मली ॥ ४ ॥ जातक वर्तले तियेसी । नाम ' अंबा-भवानी ' ऐसी । आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरी परियेसा ॥ ५ ॥ वर्धता मातापित्यागृही । वाढली कन्या अतिस्नेही । विवाह करिती महोत्साही । देती विप्रासी तेचि ग्रामी ॥ ६ ॥ शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया ' माधव ' जाण । त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतीकरुनि ॥ ७ ॥ तया माधवविप्राघरी । शुभाचारें होती नारी । वासना तिची पूर्वापरी । ईश्वरपूजा करीतसे ॥ ८ ॥ पूजा करी ईश्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसी । प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्सर ॥ ९ ॥ मंदवारी त्रयोदशीसी । पूजा करिती अतिविशेषी । तंव वत्सरें झाली षोडशीं । अंतर्वत्नी झाली ऐका ॥ १० ॥ मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी । उत्तम डोहाळे होती तियेसी । ब्रह्मज्ञान बोलतसे ॥ ११ ॥ करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती । अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥ १२ ॥ ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं । पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होती मातापिता ॥ १३ ॥ जन्म होतांचि तो बाळक । ' ॐ 'कार शब्द म्हणतसे अलोलिक । पाहूनि झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥ १४ ॥ जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षणा दान । ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥ १५ ॥ सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषी । कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥ १६ ॥ याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्वासी । याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥ १७ ॥ अष्टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं । नव निधि याच्या घरी । राहती ऐक द्विजोत्तमा ॥ १८ ॥ न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत । याचे दर्शनमात्रे पतित । पुनीत होतील परियेसी ॥ १९ ॥ होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरंवसी । संदेह न धरावा मानसी । म्हणोनि करिती नमस्कार ॥ २० ॥ म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर । याचेनि महादैन्य हरे । भेणे नलगे कळिकाळा ॥ २१ ॥ तुमचे मनी जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा । यातें करावें हो जतना । निधान आले तुमचे घरा ॥ २२ ॥ ऐसे जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन । जनक जननी संतोषोन । देती दान वस्राभरणे ॥ २३ ॥ सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम । दृष्टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोवाळिती ॥ २४ ॥ व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिले म्हणत ।उपजतां बाळ ' ॐ ' कार जपत । आश्चर्य म्हणती सकळ जन ॥ २५ ॥ नगरलोक इष्टमित्र । पहावया येती विचित्र । दृष्टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥ २६ ॥ मायामोहे जनकजननी । बाळासी दृष्टि लागेल म्हणोनि । अंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्णसुतें ॥ २७ ॥ परमात्मयाचा अवतार । दृष्टि त्यासी केवी संचार । लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥ २८ ॥ वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी । नामकरण पुरःसरी । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥ २९ ॥ ' शालग्रामदेव ' म्हणत । जन्मनाम झालें ख्यात । नाम ' नरहरी ' ऐसे म्हणत । उच्चार केला धर्मकर्में ॥ ३० ॥ ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं । माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥ ३१ ॥ पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडे बाळा । एखादी मिळवा कां अवळा । स्तनपान देववूं ॥ ३२ ॥ अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक । ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥ ३३ ॥ स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर । वस्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥ ३४ ॥ विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणी । नमन करिती बाळकाचरणी । माता होय खेळविती ॥ ३५ ॥ पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यदें गाय अति हर्षी । न राहे बाळक पाळणेसी । सदा खेळे महीवरी ॥ ३६ ॥ वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारी । वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥ ३७ ॥ माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं । चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥ ३८ ॥ पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी । उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळी ॥ ३९ ॥ सांगती जाण ज्योतिषी । आराधावे कुलदेवतेसी । अर्कवारी अश्वत्थपर्णेसी । अन्न घालावे तीनी वेळां ॥ ४० ॥ एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावे बरव्या विवेके । बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥ ४१ ॥ हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ । विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥ ४२ ॥ एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें । श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥ ४३ ॥कांही केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता । पुत्रासी जाहली वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥ ४४ ॥ सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी । पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केवीं करावें म्हणोनियां ॥ ४५ ॥ विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा । उपनयनावें केवळा । अष्ट वरुषें होऊ नये ॥ ४६ ॥ मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं । मुका असे हा निश्चितीं । कैसे दैव झालें आम्हां ॥ ४७ ॥ कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्वरगौरी आराधिले । त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥ ४८ ॥ ईश्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु । न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंती शिवासी ॥ ४९ ॥ एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखो स्वप्नेसीं । वेष्टिलों होतो आम्ही आशी । आमुते रक्षील म्हणोनि ॥ ५० ॥ नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष । काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥ ५१ ॥ ऐसे नानापरी देखा । जननी करी महादुःखा ।जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥ ५२ ॥ घरांत जाऊनि तये वेळा । घेऊनि आला लोखंड सबळा । हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥ ५३ ॥ आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं । बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥ ५४ ॥ गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा । पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥ ५५ ॥ अमृतदृष्टीं पाहातां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमी । विश्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥ ५६ ॥ मग पुत्रातें आलिंगोनी । विनविताति जनकजननी । तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥ ५७ ॥तुझेनि सर्वस्व लाधलें । बोलतां आम्ही नाही ऐकिलें । अज्ञान-मायेनें वेष्टिलें । मुकें ऐसें म्हणों तुज ॥ ५८ ॥ आमुचे मनींची वासना । तुवां पुरवावी नंदना । तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥ ५९ ॥हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां । कटी दावी मौजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥ ६० ॥ संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं । मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥ ६१ ॥ मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती । व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥ ६२ ॥ केली आयती बहुतांपरी । रत्नखचित अळंकारीं । मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥ ६३ ॥ चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती । इष्ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥ ६४ ॥ नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार । आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥ ६५ ॥ नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती । द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥ ६६ ॥ इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं । गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेपरी ॥ ६७ ॥ एक म्हणती हो कां भलतें । मिष्टान्न आम्हांसि मिळतें । देकार देतील हिरण्य वस्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥ ६८ ॥ ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक । मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥ ६९ ॥ चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी । पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥ ७० ॥ मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त ।सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥ ७१ ॥ भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकभावें । मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥ ७२ ॥ गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केले त्या बाळका ।सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥ ७३ ॥ गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं । बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥ ७४ ॥ गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊनि आली माता । वस्रभूषणें रत्नखचिता । देती झाली तया वेळीं ॥ ७५ ॥ पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी । बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी । आचारधर्में वर्ततसे ॥ ७६ ॥ पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं । ' अग्निमीळेपुरोहितं ' उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥ ७७ ॥ दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद ' इषेत्वा- '। लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥ ७८ ॥ तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां । ' अग्नआयाहि- ' गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥ ७९ ॥ सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं । मुके बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥ ८० ॥ यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार । म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥ ८१ ॥ इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक । तुवां उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥ ८२ ॥ नव्हती बोल तुझें मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थें आचरावया ॥ ८३ ॥ आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं । वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥ ८४ ॥ ऐकोनि पुत्राचे वचन । दुःखे दाटली अतिगहन । बाष्प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥ ८५ ॥ निर्जीव होऊनि क्षणैक । करिती झाली महाशोक । पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥ ८६ ॥ आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं । न बोलसी आम्हांसवे याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥ ८७ ॥ न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल । ईश्वरपूजा आले फळ । म्हणोनि विश्वास केला आम्ही ॥ ८८ ॥ ऐसें नानापरी देखा । पुत्रासी म्हणे ते बाळिका । आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥ ८९ ॥ ऐकोनि मातेचे वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान । नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणे तेंचि असे ॥ ९० ॥ तूंतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारी । तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसी ॥ ९१ ॥ तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार ।म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जाहले जातिस्मरण ॥ ९२ ॥ पूर्वजन्मींचा वृतांत । स्मरता जाहली विस्मित । श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपांत । दिसतसे तो बाळक ॥ ९३ ॥ देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां । श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥ ९४ ॥ ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करी वो गुप्ती । आम्ही संन्यासी असों यति । अलिप्त असों संसारीं ॥ ९५ ॥याचिकारणें आम्ही आतां । हिंडू समस्त तीर्थयात्रा । कारण असे पुढे बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥ ९६ ॥ येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं । पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ९७ ॥ पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्हां जरी जाल । आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥ ९८ ॥ धाकुटपणीं तुम्ही तापस- । धर्मी कवण आहे हर्ष । धर्मशास्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥ ९९ ॥ ब्रह्मचर्य वर्षें बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा । मुख्य असे, वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥ १०० ॥मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ । मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्र येणेपरी ॥ १०१ ॥ ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां । विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥ १०२ ॥ यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया । येणेविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥ १०३ ॥ समस्त इंद्रियें संतुष्टवावीं । मनींची वासना पुरवावी । तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥ १०४ ॥ ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरु सांगती तत्त्वज्ञान । ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥ १०५ ॥ गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून । तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्र विस्तार ॥ १०६ ॥ पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका । महाराष्ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥ १०७ ॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment