Jan 17, 2019

भास्करभट्टांची (अ)पूर्वकथा


।। श्री गुरुदेव दत्त ।।


अष्टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण I तिघांपुरतें शिजवी अन्न I जेविले बहु ब्राह्मण I आणि गांवचे शूद्रादि I I गुरुचरित्र  अवतरणिका ,ओवी ५६ I I

श्री गुरुचरित्रातील अडतिसाव्या अध्यायांत काश्यप गोत्राच्या भास्कर नावाच्या एका ब्राह्मणाची कथा आहे.  श्री गुरूंच्या वचनावर विश्वास ठेऊन भास्कराने केवळ तीन माणसांना पुरेल एवढ्या शिधा सामग्रीचा स्वयंपाक केला असतांना, त्या दिवशी चार हजार लोकांचे भोजन मठांत श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेनें पार पडलें. 

ऐसें तया दिवसीं विचारिती । सहस्र चारी झाली मिति । भूमीवरी झाली ख्याति । लोक म्हणती आश्चर्य ॥ गुरुचरित्र अध्याय ३८, ओवी  ७१

भक्ताची दृढ श्रद्धा असेल तर श्री गुरूंची कृपा नक्की होते. श्री गुरुचरित्रात याचे अनेक दाखले आहेत. भास्कर ब्राह्मणांकडे अशी भक्तिभावना होती, म्हणूनच भक्तवत्सल श्री गुरूंच्या वरदानास तो पात्र झाला. आज जे गाणगापुरांत पुजारी वर्ग आहेत,ते ह्याच भास्कर ब्राह्मणाचे वंशज आहेत. 

श्री गुरुचरित्रात काही भक्तांच्या पूर्वजन्माचा उल्लेख आहे. आठव्या अध्यायांत श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच स्त्री पुढील जन्मी कारंजा गावी जन्माला आली आणि पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंच  तिच्या उदरी श्री नृसिंह सरस्वती रूपात अवतरले. तसेच नवव्या अध्यायांत श्रीपाद श्रीवल्लभ यांनी दिलेल्या वरदानाने रजकाने पुढील जन्मी यवन राजा होऊन राजैश्वर्य उपभोगले व श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांचे श्री नृसिंह सरस्वती रूपांत त्यांस पुनर्दर्शनही झाले. 

सदगुरुंवर आत्यंतिक निष्ठा असणाऱ्या भास्कर ब्राह्मणाच्या पूर्वजन्मीची ही कथा ' श्री गुरुचरित्र परमकथामृतम ' ग्रंथाच्या नवव्या अध्यायात आलेली आहे. दत्तभक्तांनी ही श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूती, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या संपन्न व प्रासादिक लेखणीतून अवतरलेली  कथा अवश्य वाचावी. 



श्रीगुरुंच्या लीला खरोखर अपार आहेत.

No comments:

Post a Comment