Showing posts with label श्री स्वामी समर्थ चरित्र कथा. Show all posts
Showing posts with label श्री स्वामी समर्थ चरित्र कथा. Show all posts

Jan 23, 2026

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ७


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

धन्य धन्य नृसिंहगुरुमुनि । अक्कलकोटीं स्वेच्छे वसूनि । प्राणिमात्रांसि संतोषवूनि । कृतकार्य केलें सहज कीं ॥
अनंत अमृतरूप श्रीगुरूलीला । दावूनि निरुपाधिक वेगळा । धन्य भाग्य धीपुरींचा सोहोळा । वर्णिला न जाय सुखाब्धि ॥ - त्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाची अशीच एक लीला !

एक भाविक गोसावी अनेक तीर्थयात्रा करीत श्रीसेतुबंधरामेश्वर इथे आला. त्या पावन क्षेत्रीं द्वारका पश्चिमधाम यात्रेचा शुभसंकल्प सोडून तो पुढील प्रवासास निघाला. चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या दर्शनाचा त्याला ध्यास लागला होता. मात्र दुर्दैवाने त्या प्रवासातच त्याला जलोदराची व्याधी जडली. दिवसोंदिवस ती व्याधी बळावतच गेली, त्या तपस्व्याला द्वारकायात्रा पूर्ण करणे आता अशक्य वाटू लागले. अतीव कष्टाने त्याने गाणगापुर गाठले आणि श्रीदत्तात्रेय-श्रीपाद-श्रीनृसिंह महाराजांच्या पावन पादुकांचे दर्शन घेतले. भाग्यवशात अक्कलकोट श्रीस्वामी समर्थांची महती त्याला तिथे समजली. या परमहंस अवतारीक महापुरुषांचेही दर्शन घ्यावे, असे त्याने ठरविले आणि दहा दिवसांच्या अतिशय कष्टप्रद, व्याधीने वेदनादायी अशा प्रवासानंतर तो अक्कलकोटास पोहोचला. अंतर्यामी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या भक्ताची भगवान श्रीकृष्ण दर्शनाची ओढ जाणली. भक्तवत्सल योगीश्वरांच्या कृपाप्रसादाने त्या गोसाव्याची जलोदर व्याधी निवारण होऊन त्याला निरामय आरोग्यता तर लाभलीच, अन त्या ब्रह्मांडनायकाने त्याला साक्षात चतुर्भुज श्रीकृष्णस्वरूपांत दिव्य दर्शनही दिले. त्या सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वांतर्यामी नियंत्याची ही अद्‌भूत लीला पाहून तो भाविक तपस्वी कृतकृत्य झाला आणि त्याने श्रीस्वामी समर्थांची अतिशय सुंदर, आर्त प्रार्थना केली.  
        
म्हणे अहो गुरु विश्वंभरा । महाविष्णु महेश्वरा । दत्तात्रेय स्वामी दयासागरा । अज्ञानअविद्यातीत मज केलें ॥
अनेकप्रकारचे ब्रह्मांडांत । आपणच एक चिद्रूप आहां व्याप्त । निःसंशय ब्रह्मांडनायक अनंत । व्याप्त व्यापक वर्जित आहां ॥
काय व्हावें आपले उतराई । द्यावा ऐसा पदार्थचि नाहीं । लक्ष्मी लोळे सर्वदा निजपायीं । कोणतें धन द्यावया योग्य ॥
कमलपद्म प्रभुचरणीं विराजे । तेथें कोणतें पुष्प उरलें अर्पाया शिळें ताजें । त्वच्चरणांपासूनि निघाली जे । जगत्पावनी भागीरथी ॥
म्हणूनि कोणत्या उदकें स्नाना । घालावें आपणां जनार्दना । कोणत्या प्रयत्न रिझवावें जगत्पावना । सकलसिद्धिदायका ॥
नखांची शोभा दीप्ति अनेक । कोटिसूर्यचंद्रांहून अधिक । तेथें कोणते धूप दीप दाखवावे अमोलिक । स्वयंप्रकाशी निरांजना ॥
अखंड वाजे अनुहत ध्वनि । तेथें कोणतीं वाद्ये वाजवूनि । संतोषवावें देव चक्रपाणि । हें नकळे मजलागीं ॥
जेथूनि निघाले चार वेद । त्यासि स्तोत्रादिक पठणें तुष्टिप्रद । एक स्वतःसिद्ध प्रभु स्वसंवेद । परिच्छेदरहितासि कैसें व्हावें ॥
आनंदस्वरूप अद्वितीय निर्विकल्पासि । कोणत्या प्रकारें करावें पूजनासि । आवाहन कोठें परिपूर्णासि । सर्वाधारासि कैचें आसन ॥
अति स्वच्छासि अर्घ्य पाद्य जाण । शुद्ध परम्यात्म्यासि कैंचें आचमन । निर्मलासि कोठें स्नान । विश्वोदरासि वस्त्र कैचें ॥
निरालंबासि यज्ञोपवीत अर्पण । नित्योपरमासि आभरण । निर्लेपासि सुगंध चंदन । कैसें पुष्प अर्पावें निर्वासनासि ॥
निर्गंध आत्म्यासि सुगंध धूप । स्वयंप्रकाशमानासि निरांजन दीप । नित्यतृप्तासि नैवेद्य पदार्थ अमुप । निष्कामासि फल काय अर्पावें ॥
त्रयोदशगुणी तांबूल विभु-परमात्म्यासि । दक्षिणा द्यावी कोठें नित्यानंदासि । स्वप्रकाशक एक आत्म्यासि । आर्तिक्यनिरांजन कैसें ओवाळावें ॥
अनंतासि पुष्पांजलि कैशी प्रदक्षिणा । अद्वितीयासि कैशी करावी प्रार्थना । अंतर्बाह्यवर्ती परिपूर्णा । उद्वासन कोठें करावें ॥
हीच पूजा अमित तेजस । करिती श्रेष्ठ ब्रह्मानुभवी विद्वांस । भोगिती जीवन्मुक्ति-ब्रह्मसुखास । वेदांतीं आचार्यै कथिली असे ॥

केवळ स्मरण करताच धावत येणारे, अल्प सेवेनेही संतुष्ट होणारे, आणि करुणेचा सागर असणारे भगवान दत्तात्रेय मानवदेहाने या पृथ्वीतलावर अवतरले ! प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थांना अशक्य ते काय असणार ? त्यांच्या लीला खरोखर अनंत, अनाकलनीय आणि अगाध आहेत. राव, रंक, सज्जन, दुर्जन, सामान्य जन इतकेच नव्हे तर पशु-पक्षी-वृक्ष यांनादेखील श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ झाला. त्या योगीश्वरानें आपल्या सर्वच भक्तांचे ऐहिक कल्याण तर केलेच, तसेच अनेक अधिकारी भक्तांना आत्मसाक्षात्कार घडवून मुक्तीही दिली.
पूर्णावतारी परमहंस । परमात्मा स्वामी परमपुरुष । तच्चरणांचे जन्मोजन्मीं दास । व्हावें हीच आस असे ॥ - हीच प्रार्थना श्रीस्वामी समर्था !!

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
श्री गुरुदेव दत्त

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत


May 9, 2025

श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


सुंदर हे रूप गोजिरे सुकुमार । दिसे मनोहर, स्वामीराज ॥

एक कर कटी शोभतो साजिरा । रुद्राक्ष हो हार, गळा एका ॥

केशराची उटी, कस्तुरी ललाटी । भक्ताचे हो संकटी उभा असे ॥

सरळ नासिक शोभते वदना । रत्नाची हो खाणी, स्वामीराज ॥

वैराग्य विभूती, कौपिन शोभत । असे ते स्वरूप स्वामीराया ॥ 

चरण मृदू असे नवनीतापरी । वंदिता कैवारी, स्वामीराज ॥ 

लावण्याचा गाभा, ज्योतीची ही प्रभा । भक्तासाठी उभा, सर्वकाळ ॥ 

स्वामीसुत म्हणे, काय वर्णू रूप । खरे तीच एक स्वामीराया ॥


श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परमशिष्यांत श्री. महारूद्रराव देशपांडे अर्थात श्री नानासाहेब देशपांडे (केजकर स्वामी) यांचे स्थान अग्रेसर आहे. ' स्वामीमहाराजांचे भक्तजनांत । केजकर स्वामी असती प्रख्यात । सदाचारी, ज्ञानी, श्रीमंत । उदार, भक्तिज्ञानसंपन्न ते ॥' असे ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी त्यांचे वर्णन केले आहे. श्रीस्वामीसमर्थांच्या कृपाप्रसादामुळे महारूद्ररावांना त्यांचे ऐहिक वैभव, सामाजिक प्रतिष्ठा पुनश्च प्राप्त तर झालेच, अन सद्‌गुरुकृपेचा चिरंतन लाभदेखील झाला. त्यायोगे त्यांच्या चित्तवृत्तींत बदल होऊ लागला. त्यांना सतत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा ध्यास लागला. असेच एकदा महारूद्रराव श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते, तेव्हा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात गेले असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी अनेक प्रयत्न करूनही श्रीसमर्थांचे दर्शन त्यांना झाले नाही. द्‌गुरुदर्शनाचा ध्यास लागलेले हे परमभक्त तेव्हा अन्न-पाणी ग्रहण न करता राजवाड्याबाहेरच पूर्ण दिवसभर बसून राहिले. स्वामीभक्तहो, महारूद्ररावांचा तो दृढनिश्चय अन निग्रह पाहून अलौकिक अवतारी, करुणाघन स्वामी द्रवले, यांत नवल ते काय ? श्रीस्वामी महाराजांनी त्वरित सेवेकऱ्यांस आज्ञा केली, " जाव, नाना को यहाँ लेके आव ।" सेवेकऱ्यांनी तात्काळ बाहेर जाऊन विचारणा केली आणि ते महारूद्ररावांना आपल्यासोबत राजवाड्यात घेऊन गेले. आपल्या आराध्याचे, श्रीस्वामीसमर्थांचे दर्शन होताच या सत्शिष्याचा कंठ दाटून आला, त्यांना भावसमाधी लागली. तेव्हा, भक्तवत्सल श्रीस्वामींनी जवळच असलेला एक गोटा आणि आपल्या पायांतील जोडे महारूद्ररावांच्या दिशेने भिरकावले. श्रीस्वामींच्या पुनीत हस्ताने प्राप्त झालेला हा प्रसाद महारूद्ररावांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या मस्तकी लावला आणि त्यांनी आपल्या द्‌गुरुंचे मनोभावें दर्शन घेतले. पुढें, या प्रासादिक वस्तू त्यांनी केज येथे त्यांच्या देवघरात नित्य पूजनार्थ ठेवल्या. श्रीस्वामींचा कृपाप्रसाद असलेला हा गोटा व चर्म पादुका यांचे दर्शन भाविक आता केजच्या या मठांत घेऊ शकतात. अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज महारूद्ररावांना 'माझा नाना' असे संबोधित असत, इतुकेच नव्हें तर केजकर स्वामींची समाधीदेखील श्रीस्वामींच्या प्रेरणेने श्रींच्याच प्रिय आद्य मठांत बांधली गेली, यांतच महारूद्ररावांचे श्रेष्ठत्व अन वेगळेपण दिसून येते. खरोखरच, केजकर स्वामी महद्भाग्यवंत होते, हे निःसंशय !

 " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृतात वर्णिलेला  हा  'दगड' म्हणजेच या पावन पादुका होत.


प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार या प्रासादिक पादुका श्रीमंत महारूद्र (नानासाहेब) केशवराव देशपांडे यांनी श्री ब्रह्मचारी महाराज (मुंबई गादी) यांच्या हस्ते, शके १७९७ साली (इ.स. १८७५) गुरुवारी वैशाख शुद्ध १५ या तिथीला प्रतिष्ठापित केल्या. या मंगल घटनेला वैशाख शुद्ध तिथी १५ शके १९४७ अर्थात १२ मे २०२५ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. या शुभ प्रसंगाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केजतर्फे पंचकुंडी पंचायतन महायज्ञ, दीड कोटी स्वामी नामजप, अन्नदान तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

श्री स्वामी समर्थांचे पट्टशिष्य श्री हरिभाऊ तावडे उर्फ स्वामीसुत यांचे धाकटे बंधू दादामहाराज (मोरपीस) आणि त्यांची मातोश्री काकूबाई हे दोघेही या पावन पादुकांची स्थापना होत असताना स्वामी समर्थांच्या आज्ञेने प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे आजही या मठात श्री स्वामीसुतांची सांप्रदायिक परंपरा श्रद्धेने पाळली जात आहे.

साक्षात त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास स्वामीभक्तांनी शक्य झाल्यास अवश्य भेट द्यावी आणि या विशेष सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा. 


श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज - या सोहळ्याविषयीची सविस्तर माहिती इथे उपलब्ध आहे.


केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे यांचे चरित्र इथे वाचता येईल.



॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

सौजन्य : श्री स्वामी समर्थ मठ संस्थान, केज

Apr 30, 2025

श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुर्मिळ चरित्र आणि 'श्रीस्वामी सत्संग'


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे प्राचीन व दुर्मिळ चरित्र पुणे नगर वाचन मंदिर यांनी सर्व स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला, आरत्या, पदें, अष्टकें आणि स्तोत्र यांचे अतिशय सुंदर संकलन केलेला हा ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून सतत नित्योपासनेसाठी संग्रही ठेवावा असाच आहे.

*** पदामृत सागर - श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीसमर्थ मंडळ ***


'श्रीस्वामी सत्संग' अर्थात अँफी थिएटर, बोरिवली पूर्व इथे आयोजित केलेले श्री संजय नारायण वेंगुर्लेकर यांचे ओघवत्या शैलीतील भक्तिरसमय असे व्याख्यान प्रत्येक स्वामीभक्ताने वारंवार ऐकावे असेच आहे.

 

 

॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Jan 22, 2022

विश्वव्यापी परात्मा यो नानारूपधरोsप्यज:


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥ श्री नृसिंहसरस्वत्यै नमः

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


दत्तात्रेयगुरु श्रीपादश्रीवल्लभ पुढे रुप श्री नृसिंहमुनि । तेचि श्रृंखला अवतरली रुपे अक्कलकोट स्वामी अर्थात अत्रि-अनसूया यांच्या पुत्ररूपांत अवतरित झालेले श्री दत्तात्रेय जगत्कल्याणासाठी पुन्हा श्रीपादश्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज ( अक्कलकोट ) म्हणून प्रकट झाले, अशी दत्तभक्तांची दृढ श्रद्धा आहे. पूर्वावतारांच्या चरित्रग्रंथांचे पठण, चिंतन केल्यानंतरच श्री स्वामींच्या लीलांचा खरा अर्थ उमगतो. भगवान दत्तात्रेयांच्या भक्तांची अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज एकच असल्याची दृढ श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हिंदू कालगणनेनुसार १३०० साली, (इ. स. १३७८) प्रकट झाले. आपले अवतारकार्य समाप्त झाल्यावर त्यांनी साधारण १३८० साली (इ. स. १४५९) श्री शैल्यगमन केले. श्री शैल्य पर्वताच्या रम्य परिसरांत, ते तीनशे वर्षे समाधी अवस्थेत होते. त्यानंतर, त्यांचे प्रथम प्रगटीकरण कर्दळीवनात झाले. पुढें, त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रीं भ्रमण केले तरी ' गाणगापूर आपले मुख्य स्थान आहे, यास्तव त्याचेच नजीक वास करून अवतारकार्य पूर्ण करावे.' याच संकल्पूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटी वास केला. श्री स्वामी समर्थ पूर्ण दत्तावतार होते, याची अनेक दत्तभक्तांना अनुभूती आली आहे.  
श्रीस्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना, त्यांची कीर्ती ऐकून एक युरोपियन वकिल त्यांच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी, त्या वकिलाचा एक पारशी मित्र अक्कलकोट येथे होता. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अक्कलकोट स्वामी महाराजांना विचारले, “ स्वामी, तुमचे मूळ स्थान कुठले आहे ? " त्यावर श्रीस्वामी महाराजांनी उत्तर दिले, “ सर्वप्रथम मी श्रीशैल पर्वतावरील कर्दळीवन येथे प्रगट झालो. या पृथ्वीतलावर तीर्थाटन करत करत कोलकता या शहरात गेलो. बंगालमध्ये भटकत असताना मला काली मातेचा आशीर्वाद मिळाला. त्यानंतर, गंगामातेच्या तीरावर भटकत मी हरिद्वार, केदारनाथ, गंगोत्री, बद्रीनाथ, अयोध्या, द्वारका अशा असंख्य पवित्र क्षेत्रांना भेट दिली. पुढें, मी गोदावरी नदीच्या काठी पोहोचलो. त्यानंतर मी हैदराबादला येथे आलो. तिथे काही काळ राहून मी मंगळवेढा येथे प्रयाण केले. मंगळवेढ्यास मी बरेच वर्षे वास्तव्य केले. मग पंढरपूर, बेगमपूर, व सोलापूर फिरून मोहोळ गावात पोहोचलो. काही दिवसांनी मी इथे या अक्कलकोट नगरीत आलो. तेव्हापासून माझे इथेच वास्तव्य आहे."
साधारण असाच प्रश्न पुणे येथील कर्वे नावाच्या एका भाविकाने विचारला असता, त्यावेळी अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थ उत्तरले, “ मी काश्यप गोत्री, यजुर्वेदी ब्राह्मण आहे. माझे नाव नरसिंहभान असून आमची रास मीन आहे. "
गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे प्रमुख स्थान आहे. एकदा गाणगापूरचा एक भक्त अक्कलकोटला आला असता, श्रीस्वामी समर्थांनी त्याला विचारले, “ तू कोणत्या देवाची आराधना करतोस? " त्यावर तो भक्त अतीव श्रद्धेने म्हणाला, “ माझे आराध्य दैवत श्री क्षेत्र गाणगापूरस्थित श्री नृसिंह सरस्वती आहेत. ” त्याचे ते उत्तर ऐकून श्रीस्वामी हसत म्हणाले, " माझेही नाव नरसिंहभान आहे, बरं का ?"
असेच एकदा श्री नरसिंह सरस्वतींच्या दीर्घकाळ वास्तव्याने पावन झालेले आणि दत्तसंप्रदायातील जागृत पुण्यक्षेत्र, श्रीनृसिंहवाडी येथील काही लोक श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला आले होते. तेव्हा, त्यांनी विचारले, “ स्वामी, तुम्ही कोण आहात ?" त्यावर स्वामींनी उत्तर दिले, “ मूळपुरुष, वटवृक्ष, दत्तनगर ! ” विशेष नवलाईची गोष्ट ही की स्वत: श्री नृसिंह सरस्वती यांनीच आपल्या या भक्तांना दृष्टांत देऊन अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाण्यास सांगितले होते. 
मुंबईत श्रीकृष्णबुवा ऊर्फ ठाकूरदासबुवा नावाचे एक दत्तोपासक होते. प्रारब्धयोगानें, त्यांना कुष्ठरोग झाला. अनेक वर्षे उपाय करूनही व्याधीस उतार पडला नाही. अखेर निराश होऊन यापुढें आपण काशीक्षेत्री वास करावा, असा त्यांनी निश्चय केला. तत्पूर्वी, आपल्या आराध्यदैवताचे, श्री दत्तपादुकांचे गाणगापूर येथे जाऊन अखेरचे दर्शन घ्यावें म्हणून ते श्री क्षेत्र गाणगापुरांस आले. श्री नरसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांवर अर्पण करण्यासाठी उत्तम कस्तुरी त्यांनी आपल्याबरोबर आणली होती. दर्शन घेऊन त्यांनी पादुकांचे यथासांग पूजनही केले. मात्र, त्यावेळीं बुवा कस्तुरी अर्पण करण्यास विसरले. त्याच रात्री त्यांना, " अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे, म्हणजे तू व्याधीमुक्त होशील " असा श्री दत्तप्रभूंचा स्वप्नदृष्टांत झाला. त्यानुसार, ते अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतलें. तत्क्षणीं, श्रीस्वामी महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, “ हमारी कस्तुरी अभी के अभी लाव !” अशारितीने, श्री स्वामी समर्थांनी अंत:साक्षित्वाची प्रचिती ठाकूरदासबुवास दिली.   
गोविंदराव टोळ नावाचे एक गृहस्थ पोटशूळाच्या व्याधीने अतिशय त्रस्त होते. त्यांचे वडील चिंतोपंत टोळ हे श्री स्वामी समर्थांचे भक्त होते. आपल्या पित्याच्या आग्रहास्तव ते अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आले खरें, मात्र गोविंदरावांची श्रीस्वामी समर्थांवर श्रद्धा नव्हती. त्यामुळे, स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गाणगापूरला जाण्याचे ठरविले होते. अनेक श्री समर्थभक्तांनी परोपरीने सांगूनही ते गाणगापूरला गेले. तेथे सुमारें अडीच वर्षे राहून त्यांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांची उपासना केली. अखेर, श्री दत्तप्रभूंचा दृष्टांत झाल्यावर ते अक्कलकोटला परतले आणि श्री स्वामी समर्थांची भक्तिभावाने सेवा करू लागले. पुढें, लवकरच त्यांची व्यथा दूर झाली. 
एकदा, गोविंदराव यांनी श्रीस्वामींना विचारले, “ भीमा-अमरजा संगमावरही आपले वास्तव्य असते का? " त्यावर प्रसन्नपणे स्मित करत श्रीस्वामी वदले, “ होय, मी त्याक्षेत्रीही आहे. ” त्यानंतर काही दिवसातच गोविंदरावांना शुभ स्वप्न पडले. त्यांना गाणगापूर येथील निर्गुण पादुकांच्या स्थानीं श्री स्वामी समर्थ दिव्यरुपांत विराजमान आहेत आणि त्यांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका धारण केल्या आहेत, असे दिसले.

दत्तभक्तहो, श्रीगुरुमहिमा काय पुससी । अंनतरुपें होतीं परियेसीं । विश्वव्यापक परमात्मा ॥ या वेदवचनाचीच ही प्रचिती नव्हें काय ?

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

Nov 18, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ६


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥

भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥


श्रीकार्तिकस्वामी दर्शन - रामशास्त्रीं डोंगरे

एकदा बडोद्यातील काही भक्त मंडळी कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेस निघाली. मार्गक्रमण करतांना वाटेतच अक्कलकोट येत असल्याने तिथे काही काळ थांबून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन पुढील यात्रेस प्रारंभ करावा असे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे, ती सर्व भक्तमंडळी प्रज्ञापुरीस आली. ' योगीश्वर-दर्शनासि सारे । जाऊनि नमिती प्रेमभरें ' अशाप्रकारे स्वामी समर्थांचे त्यां सर्वांनी भक्तिभावानें पूजन केले आणि श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी प्रस्थान करण्याची अनुज्ञा मागितली. त्या भक्तमंडळींमध्ये रामशास्त्रीं डोंगरे नावाचे एक सद्-गृहस्थ होते. श्री समर्थचरणीं त्यांची अपार श्रद्धा होती. तेव्हा, इतर सर्व भक्तजनांस स्वामी महाराजांनी पुढील प्रवासास अनुमती दिली आणि त्यांची ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल असे आशीर्वचनही दिले. मात्र रामशास्त्रींसी समर्थ वदती - आज्ञा नाही तुम्हांसि । दर्शनार्थ जावया ।.
श्री स्वामी समर्थांचे हे वचन ऐकताच रामशास्त्रीं डोंगरे उद्विग्न चित्त झाले. इतक्या दूर येऊनही, आपल्या नशिबी श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा योग नसावा याचे त्यांना वाईट वाटले. त्यावेळीं ते श्री स्वामीचे थोर भक्त बाबा सबनीस यांच्या गृही मुक्कामास उतरले होते. रामशास्त्रींना असे दुःखी-कष्टी झालेले पाहून, बाबा सबनीसांनी त्यांची चौकशी केली. त्यावर रामशास्त्री म्हणाले, " श्री स्वामीरायांनी मला पुढील यात्रेसाठी अनुमती दिली नसल्याने मी खिन्न झालो आहे. आपण समर्थांचे निजभक्त आहात, मला यांवर काही तरी उपाय सुचवाल का ?" त्यांचे समाधान करण्यासाठी, ते बाबा साधु वदती सत्य वचन । जाऊं नये प्रभु आज्ञाभंग करून । तुम्हीं तळमळ टाकूनि राहावें । अर्थात श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेचे अवलंघन करू नये आणि इथेच निःशंकपणें राहावे. बाबा सबनीसांचे हे बोलणें ऐकून रामशास्त्रीं अक्कलकोटीं राहिले खरें, मात्र त्यांचे मन श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले होते.
पुढें पाच दिवसांनी कार्तिक मासांतील पौर्णिमा आली. कार्तिक पौर्णिमेसि कृत्तिकायोगांत । दर्शनासि जमली मंडळी बहुत । स्नान संध्या आटोपूनि रामशास्त्री त्वरित । दर्शनार्थ पातले बाबासह त्या शुभयोगावर सर्व भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे विधीवत पूजन केले, मंगल आरतीही केली. प्रत्येक भक्तगण श्री स्वामी समर्थांच्या चरणीं नतमस्तक होऊ लागला. तो प्रसन्नवदन योगीश्वरही उभा राहून आपला कृपाकर भक्तांच्या मस्तकीं ठेवून आशीर्वाद देऊ लागला. रामशास्त्रींनीही समर्थांना अत्यंत भक्तिभावाने साष्टांग नमस्कार केला आणि ते उठून स्वामींकडे श्रद्धापूर्वक पाहू लागले. तोच एक चमत्कार झाला - कार्तिकस्वामींचे सगुण स्वरूप । प्रत्यक्ष धारण करूनि सर्वांसमीप । दर्शन दिधलें दाता-सत्यसंकल्प । त्या देवाधिदेवानें त्यांना श्री कार्तिकस्वामींचे सगुण दर्शन घडविले होते. त्या अपूर्व पुण्यदायीं योगावर कार्तिकस्वामींचे मूर्तिमंत दर्शन झालेले पाहून रामशास्त्रीं अतिशय सद्गदित झाले आणि अनन्यभावानें त्यांनी पुन्हा एकदा त्या अक्कलकोटांत अवधूतरूप धारण केलेल्या सर्वेश्वरांस साष्टांग नमन केले. त्या मंगल दर्शनाने त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले होते आणि ते मनोभावें प्रार्थना करू लागले - हे भगवान दत्तमूर्ते । परमेश्वर आहां बोलते चालते । माझ्यासारख्या अज्ञानी, मदांध आणि या संसारसागरात भरकटलेल्या सामान्यजनास साक्षात्कार देऊन संशयरहित केले. हे परमात्म्या, तुझे सामर्थ्य अगाध आहे. कृपालुत्वें देऊनि दर्शनप्रबोध । कृतार्थ केलें अनुभवी । हे दीनदयाळा, आपण प्रत्यक्ष परमात्मस्वरूप आहात आणि केवळ या जगताच्या उद्धारास्तवच आपण हा अवतार धारण केला आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थांचे यथासांग पूजन केले.
' प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ' हे सर्वथा खरें आहे. या कृपानुभवानंतर, श्री स्वामी समर्थांच्या ठायीं असलेली त्यांची श्रद्धा अधिकच दृढ झाली. हा साक्षात्कार घडल्यावर रामशास्त्री डोंगरे पुढे दोन वर्षे प्रज्ञापुरींतच राहिले. श्री स्वामी समर्थांच्या नित्य पूजन-दर्शनाचे, असंख्य थोर स्वामीभक्तांच्या सहवासाचे आणि अनेक स्वामीलीला पाहण्याचे सद्भाग्य त्यांना लाभले. पुढें दत्तात्रेय-आज्ञा घेऊन । आले बडोद्यासि संतुष्टमन । तिथे ते सदाचारी, विवेकसंपन्न रामशास्त्री पुराण-कीर्तन आणि दत्तात्रेयस्वामी लीलांचे वर्णन करीत असत. श्री स्वामींच्या कृपाशीर्वादाने त्यांना काशी-महायात्राही घडली.
स्वामीभक्तहो, श्रीगुरुस्वामी परमेश्वर । कृपादृष्टि करील जयावर । त्यासि चारी पुरुषार्थ प्राप्त होती साचार । कां न्यून नसेचि हेच सत्य नव्हें काय ?

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.

Oct 7, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ५


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥

भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥


केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे

शालिवाहन शके अठराशें, बहुधान्य नामक सवंत्सरी चैत्र कृ. त्रयोदशीस मंगळवारी पूर्णब्रह्म सगुणमूर्ती कैवल्य पूर्णावतारी निजानंदी निमग्न झाले. ' शुद्ध स्वस्तिकासन घालोनि । संपूर्ण जनांसि सौख्याशीर्वचनी । परमानंदरूपी संतोषवोनि । स्वरूपीं समाधिस्थ जहाले ॥' लौकिक प्रपंचदृष्टीनें श्री स्वामी समर्थ जरी अदृश्य झाले असले, तरी परमार्थ-ब्रह्मरूपे ते सर्वत्र आहेत. आजही ते आपल्या भक्तांना अधिकारपरत्वे सगुण-निर्गुण दर्शन देतात. अगदी उदाहरणादाखल म्हणून, शुद्धभक्तिप्रिय ते श्रीपति । पूर्ववचनाची ठेवूनि स्मृती । समाधीनंतर नीलेगांवी प्रकटती । भाऊसाहेबांस दर्शन द्यावया ॥ योगीराज समर्थ मंगळवारी समाधिस्थ झाले तरी त्यांनी पुढें पांचव्या दिवशी शनिवारी भाऊसाहेब जहागिरदार यांना नीलेगांवी जाऊन दर्शन दिले होते. महारूद्ररावांनादेखील अशीच प्रचिती आली. स्वामी समर्थांच्या वियोगाने त्यांचे मन-प्राण व्याकुळ झाले होते. पूर्णब्रह्म स्वामीराजांविण । शून्य भासे विश्व संपूर्ण । अक्कलकोट दिसे भयानक जाण । असेच त्यांना भासू लागले होते. त्या उद्विग्न मन:स्थितीतच महारूद्रराव एकदा श्रीगिरि-व्यंकटेश दर्शनासाठी गेले होते, तिथेच त्यांना श्री समर्थांचा दृष्टांत झाला. श्री स्वामीराजांच्या आज्ञेनुसार, ते तात्काळ अक्कलकोट नगरीस आले आणि श्रीचरणीं मागुनि क्षमा । पूजिले त्रयमूर्ति-पुरुषोत्तमा । अर्थात त्यांनी श्री स्वामी समाधीस्थानाचे दर्शन घेऊन विधीपूर्वक पूजनही केले. श्री दत्तजयंतीचा उत्सव त्यावेळी समीप आला होता. अक्कलकोट संस्थानातून वार्षिक उत्सवांसाठी नेमणूक मिळत असे, मात्र त्या वर्षी महागाईने कळस गाठला होता. महर्गतेच्या त्या संकटामुळे श्री दत्तजयंतीची पूजा-अर्चा, प्रसाद आदि विधीवत समारंभ कसा होणार, हाच गहन प्रश्न स्वामीभक्तांपुढे होता. अन् तेव्हाच महारूद्ररावांना त्या योगीराज संकल्पसिद्धीदात्याने दृष्टांत देऊन धीपुरी जाण्यास सांगितले. श्री स्वामी महाराज हेच ज्यांचे सर्वस्व होते, अशा भक्तशिरोमणी महारूद्ररावांनी अपार अर्थसाह्य केल्यामुळें त्यावर्षीदेखील श्री दत्तमहाराजांच्या जयंतीचा उत्सव यथायोग्य पार पडला. तेव्हापासून, प्रतिवर्षी देशपांडे मंडळी श्रीदत्तजयंती उत्सव प्रसंगी अक्कलकोट येथे येत असत आणि भरपूर दान दक्षिणा देऊन स्वामींचे परमभक्त चोळाप्पा यांचे पुत्र कृष्णाप्पा आणि जावई पुजारी श्रीपाद भट यांच्या मदतीनें पूजनोत्सव थाटामाटांत करीत असत. तसेच, महारूद्रराव समाधीचे पूजन । रूद्राभिषेके करिती जाण । द्विजवर्य वेदघोष मंत्र पढून । षोडशोपचारें पूजिती ॥ त्या समारंभात महानैवेद्य, भजन-कीर्तन, ब्राह्मण-भोजन, उपस्थित स्वामीभक्त आणि ग्रामस्थ यांच्यासाठी महाप्रसाद आदि अनेक कार्यक्रमही उत्साहांत होत असत. महारूद्ररावांचे चार पुत्र रघूत्तमराव, गणपतराव, बापूराव आणि अण्णा हेदेखील धर्मशील, स्वामीभक्त आणि दानशूर होते. अशा रितीने, केजकर-देशपांडे मंडळींची स्वामीचरणीं असलेली श्रद्धा अधिकच वृद्धींगत होऊ लागली. त्यानंतर, प्रत्येक वर्षी महारूद्रराव सहपरिवार अक्कलकोटास एक-दोनदा श्री स्वामी-समाधी दर्शनासाठी येत असत आणि अनेक धार्मिक कार्यांसाठी विपुल धनदान करीत असत. श्री स्वमर्थ चरणीं त्यांची अवीट, पूर्ण, निरंतर भक्ती होती, त्यांचे अंतःकरण शुद्ध, उदार होते. ' हरिगुरुलीला करितां श्रवण । प्रेमाश्रुपात वाहे यन्नयनीं ' अशी त्यांची भावपूर्ण अवस्था होत असे. पुढें, महारूद्ररावांना संसार विरक्ती आणि वैराग्यता आली. त्यांनी चतुर्थाश्रम स्वीकारून संन्यास दीक्षा घेतली व श्री चिदानंदस्वामी आणि श्री स्वामी समर्थांचे चरणदास अशी संन्यस्थ नामें धारण केली. समस्त जन त्यांना केजकर स्वामी उर्फ सदगुरु नानासाहेब महाराज असे संबोधू लागले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनें त्यांना अनेक धार्मिक अनुष्ठानें, तसेच काशी, प्रयाग, गया क्षेत्रादिक तीर्थयात्रा करण्याचे महद्भाग्य लाभले. काशीयात्रा करून आल्यावर त्यांनी श्रींच्या समाधीचे भागीरथीच्या पावन जलाने यथाविधी पूजन केले. त्या शुभप्रसंगी देशपांडे मंडळींनी श्री स्वामीनामाचा जप, महानैवेद्य, महाप्रसाद अशी थोर समाराधनाही केली. स्वामीभक्तहो, त्या परमात्म्याची पूर्ण कृपादृष्टी असता काय उणें पडणार बरें ?
सद्भाग्यवंत केजकर स्वामींची श्री समर्थांच्या ठायीं पराकोटीची निष्ठा होती. त्यांना श्री दत्तात्रेय स्वामींचे दर्शन होत असे. ' शुद्ध अंतःकरणांत प्रकटे तें । परमेश्वरस्वरूप गुरुबोधें ' हे वचन सर्वथा सत्यच आहे. त्यांनी पुढें अनेक वर्षे ही श्री स्वामीसेवा केली. असेच एकदा मार्गशीर्ष महिन्यांत श्री दत्तजयंती उत्सवासाठी ते अक्कलकोटास आले. केजकर देशपांडे मंडळींही त्यावेळीं उपस्थित होती. नित्याप्रमाणें, श्री दत्तमहाराज जयंतीचा उत्सव उत्तमरित्या पार पडला. मात्र, त्यानंतर केजकर स्वामींची प्रकृती बिघडली. अनेक वैद्योपचार घेऊनही, ती दिवसोंदिवस अधिकच खालावू लागली. एके दिवशी, श्री नानासाहेब महाराजांनी श्री स्वामी समाधीस्थानाचे पुजारी आणि इतर थोर भक्तांना विनंती केली, स्वामी समर्थांच्या चरणांजवळ । माझी समाधि करा हो जन प्रांजळ । मी समर्थांचा पूर्ण दास केवळ । अनंत जन्मींचा असे हो ॥. त्यांची ही कळकळीची प्रार्थना ऐकून सर्व भक्तगण हेलावले. पुढे काही दिवसांतच, शके १८१७ साली पौष वद्य नवमीस, गुरुवारी प्रातःकाळी त्यांनी आपला देह विसर्जन करून इहलोकीची यात्रा पूर्ण केली. श्री स्वामी समर्थांच्या प्रेरणेनें आणि केजकर स्वामींच्या इच्छेनुसार त्यांच्या पुत्रांनी या परमभाग्यवंत भक्ताची समाधी श्रींच्या आद्य प्रिय मठांत बांधली. सभामंडपाच्या उजव्या बाजूस । समर्थांच्या गाईचा जेथें समाधिवास । त्या गौस्थानाच्या शेजारी विदेह-निवास । झाला केजकर स्वामींचा ॥. त्या मनोहर समाधीस्थानी त्यांच्या पुत्रांनी सुंदरसे शिवलिंग बांधले. खरोखरच, केजकर स्वामी महद्भाग्यवंत होते. ज्यांची समाधि सर्वकाळ । जाहली समर्थांच्या चरणांजवळ । धन्य धन्य भाग्योदय पुण्य प्रबळ । फळले शेवटी गुरूरूपीं ॥, असे धन्य ते थोर स्वामीभक्त जे श्री समर्थांच्या चरणकमलीं रंगले.
स्वामीभक्तहो, आजही केजकर देशपांडे घराणे श्रीं स्वामी समर्थांच्या भक्तीची ही परंपरा श्रद्धापूर्वक जपत असून नुकतीच श्री सदगुरु नानासाहेब महाराजांची १२५वी, अमृत महोत्सवी पुण्यतिथी केज येथील मठांत भक्तिमय वातावरणांत संपन्न झाली. ' स्वामीमहाराजांचे भक्तजनांत । केजकर स्वामी असती प्रख्यात । सदाचारी, ज्ञानी, श्रीमंत । उदार, भक्तिज्ञानसंपन्न ते ॥' हे त्यांचे वर्णन सर्वथा यथायोग्यच आहे. प्रत्यक्ष त्या ब्रह्मांडनायकाच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या केज येथील या श्री स्वामी समर्थ मठास एकदा अवश्य भेट द्यावी.

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.

Oct 1, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ४


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे

अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थांच्या असीम कृपेमुळे महारूद्ररावांचे गंडांतर टळले. ते व्याधीमुक्त होऊन आरोग्यवंत झाले. त्यावेळी त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघूत्तमरावांनी श्री स्वामी चरणीं दशसहस्त्र रौप्यमुद्रिका अर्पण करण्याचा आपला मानस सांगितला, त्यावर समर्थांनी हसून आपल्या श्वेतवर्ण मनोहर दिव्य पादुका त्यास प्रसाद म्हणून दिल्या आणि केज येथील त्यांच्या घराच्या उकीरड्याच्या स्थानीं त्यांची स्थापना करावयास सांगितली. त्या ब्रह्मनायकाच्या भक्तवत्सलतेची अनुभूती महारूद्ररावांना अनेक वेळा आली होतीच, आणि आता तर त्यांची सेवा, भक्ती जणू फळाला आली होती. त्याकाळीं, हरिश्चंद्र शेणवी नामक अत्यंत भक्तिमान, निर्लोभी आणि सदाचारी असे स्वामीभक्त मुंबईस राहत असत. त्यांची श्रीदत्तात्रेय चरणीं अत्यंत श्रद्धा असून ते वारंवार अक्कलकोटास दर्शनासाठी येत असत. स्वामीभक्तांना हव्या तश्या लहान-मोठ्या पादुका तयार करून ते श्री स्वामी चरणांना लावून सिद्ध करीत असत आणि नित्यपूजेसाठी देत असत. त्यासाठी ते कोणाकडूनही मूल्य अथवा द्रव्य घेत नसत, हीच त्यांची स्वामीसेवा होती. - पुष्कळ पादुका सिद्ध करून । मोल ना घेता कोणापासून । सहस्रावधि अर्पितसे । असे ते स्वामीभक्तिपरायण हरिश्चंद्रजी त्यावेळीं श्वेत पाषाणाच्या पादुका घेऊन श्री स्वामी समर्थांच्या समोर बसले होते. स्वामीआज्ञेनुसार त्यांनी त्याच पादुका अत्यंत संतोषपूर्वक रघूत्तमरावांना अर्पण केल्या. - हरिश्चंद्रे रघूत्तमासि पादुका । अर्पिल्यावरी पूजा नैवेद्य दक्षिणदिका । ब्राह्मण-भोजन करुनि संतुष्ट लोकां । गेली देशपांडे मंडळी केजेस

लवकरच, एका सुमुहूर्तावर महारूद्ररावांनी केज येथे आपल्या घराच्या उकीरड्याच्या स्थानी विशाल मठ बांधण्यास प्रारंभ केला. सुंदर, रमणीय आणि भव्य अशा या मठात तीन बाजूंस दोन खणी सोपें काढून आवारांत विपुल जल असलेली एक विहीरही बांधली. पुढें, शुभदिनीं वैदिक, याज्ञीक पंडितांना पाचारण करून देशपांडे मंडळींनी विधिपूर्वक श्री स्वामींच्या प्रासादिक पादुकांची प्रतिष्ठापना केली. स्वामीभक्तहो, या विशेष समारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे श्री स्वामी समर्थांनी ज्यांचा आपले पुत्र म्हणून उल्लेख केला, ज्यांना पादुकास्वरूप ‘आत्मलिंग’ प्रसादरूपाने दिले आणि श्री स्वामीप्राप्ती, श्री स्वामीचिंतन हेच ज्यांच्या जगण्याचे ध्येय होते असे हरिभाऊ म्हणजेच स्वामीसुत यांचे कनिष्ठ बंधू सच्चिदानंद स्वामीकुमार यांना त्यावेळीं श्री समर्थांनी, नानासाहेब केजकरांबरोबर खास पाठविले होते. या शुभप्रसंगी प्रत्यक्ष त्या सर्वेश्वराच्या आज्ञेनें सच्चिदानंद स्वामीकुमार आणि ब्रह्मचारीबुवा अक्कलकोटाहून आले होते.

अशा रीतीने, ब्रह्मांडनायकाच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थांचा मठ श्री महारूद्रराव देशपांडे केजकर उर्फ सद्गुरू नानासाहेब महाराज यांनी आपल्या ग्रामीं स्थापन केला. तिथे, महान दत्तभक्त हरिश्चंद्र यांनी अर्पण केलेल्या या मनोहर पादुका पूर्वाभिमुख असून मठाचा नगारखाना उत्तराभिमुख आहे. श्री स्वामी महाराजांची पंचधातूंची अतिशय सुरेख मूर्तीही तिथे स्थापन केली आहे. - निरालस्य शुद्ध भक्तिपूर्वक । पूजा नित्य नैवेद्यादीक । आरती, भजन त्रिकाल सम्यक । होतसे मठांत समर्थांच्या अजूनही, केज येथील या देशपांडे घराण्याने श्री स्वामी समर्थांच्या सेवेची परंपरा जपली आहे. या श्री स्वामी समर्थ संस्थानात अनेक हरिदास, पुराणिक आणि विद्वज्जन तसेच असंख्य स्वामी-सेवेकरी, भक्तगण इथे सतत दर्शन, महोत्सव आदि धार्मिक कार्यांसाठी येत असतात. त्याचबरोबर, अनेक सामाजिक उपक्रमही या संस्थानातर्फे राबविले जातात.

अक्कलकोट येथील सुमारें एकवीस वर्षांच्या वास्तव्यांत श्रीदत्तावतारी श्री स्वामी समर्थांनी अनेक लीला केल्या, भक्तांचे इहपर कल्याण केले. श्री देव मामलेदार, श्री साईनाथ, श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज आदि अनेक सिद्धपुरुष स्वामी संप्रदायांत महत्वाचे स्थान राखून आहेत. तसेच, श्री आनंदनाथ महाराज, चोळाप्पा, बाळाप्पा, स्वामीसुत, श्री बीडकर महाराज अशा अनेक थोर अलौकिक शिष्यांनी श्री स्वामींचे कार्य आजही भक्तिपूर्वक सुरु ठेवले आहे. हा परब्रह्माचा मूर्तिमंत अविष्कार शके १८०० ( इ.स. १८७८ ) मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास समाधिस्थ झाला. श्रीमद्दत्तात्रेय-स्वामिराजें निरुपाधि । विदेही निजानंदी घेतली समाधि । वास्तविक पाहतां, त्या लीलाधराची हीदेखील एक लीलाच म्हणावयास हवी. आपल्याला आज त्यांचे सदेह स्वरूप दिसत नसले, तरी त्यांच्या निर्गुण निराकार स्वरूपाची अनुभूती आजही एकनिष्ठ भक्तांना, श्रद्धावंतांना निश्चितच येते. महारूद्ररावांनासुद्धा समर्थांच्या समाधीनंतर असाच दृष्टांत झाला.

क्रमश: ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.

Sep 22, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ३


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे आपल्या कुलस्वामींच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे महारूद्रराव गेले असता, श्री विठ्ठलमूर्तीच्या जागी त्यांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या अक्कलकोटनिवासी योगिश्वरांच्या कृपेनें हा अद्वैताचा साक्षात्कार घडल्यावर महारूद्ररावांची त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली अन आपली श्रीगुरुदेवमूर्ति कधी एकदा पाहीन, असा ध्यास लागला. पुढें काही दिवसांनी अक्कलकोटास जाण्याचा योग आला आणि श्री स्वामी समर्थ हेच आपले कुलदैवत रुक्मिणीकांत श्रीजनार्दन आहेत असा भाव ठेवून त्यांनी महाराजांना लोटांगण नमन घातले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटांत असतांना काही ठराविक भक्तमंडळींच्या गृहीं वारंवार येत असत. तेथील ग्रामजोशी बाळकृष्णबुवा हे त्या भाग्यवंत भक्तांपैकीच एक होते. ते विद्वान, वैष्णव आणि ज्योतिषी असून अनेक लोक आपले कार्य प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या घरी सतत येत असत. त्याशिवाय स्वामींच्या दर्शनासाठी बाहेरगावांहून येणारी गणपतराव अरब आदि अनेक मंडळीही बाळकृष्णबुवांच्याच घरी मुक्कामास राहत असत. हैदराबादचे हे गणपतराव अरब हे मराठी, पण त्यांच्याकडे निजामाचा अरब रिसाला होता. त्यामुळे, त्यांना अरब नाव पडले. हे श्री दत्तभक्त होते. सदाचारी, विद्यासंपन्न आणि सुस्वभावी असे बाळकृष्णबुवा अत्यंत अगत्यपूर्वक सर्वांचे आतिथ्य करीत असत. त्यांच्याच गृही महारूद्रराव आपल्या कुटुंबियांसहित उतरले. मनोभावें श्री स्वामीराजांचे पूजन करून त्यांनी सहस्र-भोजन समाराधना केली. शुक्ल पक्षींच्या चंद्रकलासम । श्रीस्वामीसमर्थ चरणीं निरुपम । महारूद्ररावांची शुद्धभक्ति नि:सीम । जडली सप्रेम सर्वदा ॥ अशा रीतीने श्री समर्थांचे कल्याणप्रद असे आशीर्वचन घेऊन अत्यंत समाधानाने महारूद्रराव आपल्या घरीं केज येथे परतले. ते श्री नृसिंह-मुनींचे नित्य स्मरण करीत असत. अक्कलकोटाहून घरीं आल्यावर पुढे चार-आठ दिवसांतच महारूद्ररावांना पुनः श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती आली. त्यांच्या जागेंत काही काम सुरु होते, आणि तिथेच त्यांना द्रव्याचें हांडे सापडले. विपुल अशा धनसंपत्तीचा लाभ झाल्याने सर्व देशपांडे मंडळी अत्यंत आनंदित झाली. दिवसोंदिवस भाग्यकाळ वृद्धिंगत होऊ लागला, ' जगन्नाथ स्वामी सदाशिव कृपाल । साह्य होतां काय उणे ' या उक्तीची प्रचिती येऊ लागली आणि महारूद्ररावांची श्री स्वामी समर्थ चरणीं भक्ती अधिकच दृढ होऊ लागली. गृहस्थाश्रमीं असूनही त्यांची आपल्या सद्गुरूंवर नितांत श्रद्धा होती, आपल्या या आराध्यदैवतास ते अनन्यभावें शरण आले होते. असेच एकदा, महारूद्रराव सहपरिवार श्री महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले आणि नेहेमीप्रमाणेच श्री बाळकृष्णबुवांच्या गृहीं मुक्कामास उतरले. नित्यनियमांनुसार, श्री दत्तगुरु स्वामी समर्थांचे दर्शन झाले खरें, मात्र त्यावेळीं महारूद्ररावांना ज्वर येऊन वायुप्रकोप झाला. वैद्योपचार घेऊनही उतार पडण्याची काहीच चिन्हें दिसेनात आणि बघतां बघतां त्यांची प्रकृती अतिशय खालावत गेली. ते या आजारांतून वाचतील अशी काहीच लक्षणें दिसत नव्हती. देशपांडे कुटुंबियांचा आता मात्र धीर खचला आणि श्री स्वामी समर्थांनाच आता शरण जावें, त्याशिवाय आता कुठलाच मार्ग नाही असा विचार त्या सर्वांनी केला. तेव्हा, महारूद्ररावांचे ज्येष्ठ पुत्र रघूत्तमराव त्या जगत्सूत्रधारक समर्थांकडे आले आणि अत्यंत चिंतीत होऊन ' आमचे पित्याची घातली घटिका । त्यावीण आमचा प्रपंच लटिका । प्राप्त व्हावी कृपारूप अंजनगुटिका । ' अशी त्यांची करुणा भाकली. ' हे दयासागरा, तुम्हीच सर्वथा आमचे मायबाप आहात, असे म्हणत त्याने श्रीमद्दत्तात्रेय स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांचे चरण दृढतेने धरले. त्याची प्रार्थना ऐकून करुणाघन कळवळले आणि आश्वासक स्वरांत म्हणाले, " अरे तुझ्या पित्यास लवकरच बरें वाटेल आणि तो व्याधीमुक्त होईल. तू अजिबात चिंता करू नकोस, सत्वर आपल्या स्वस्थानीं जा." समर्थांचे ते अमृतवचन ऐकताच रघूत्तमरावांस संतोष वाटला आणि स्वामींचा तीर्थप्रसाद घेऊन ते धावतच आपल्या बिऱ्हाडीं परतले. आपल्या पित्यास ते तीर्थ देऊन ते स्वामीनाम जपू लागले. अन काय आश्चर्य ! महारूद्ररावांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. ' आठ चार दिवसांत आला शुभ प्रत्यय । महारूद्ररावांची प्रकृति झाली निरामय ' स्वामीभक्तहो, त्या पूर्णप्रतापी योगीश्वराची कृपा असता अशक्य काय ते सांगा बरें ? महारूद्ररावांना आरोग्यप्राप्ती झाल्यामुळे देशपांडे कुटुंबीय अतिशय सुखावले. रघूत्तमराव सत्वर स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि त्यांना अनन्यभावानें वंदन करून म्हणाले, " हे दयाघना, आपल्या आशीर्वादाने माझ्या पित्यावर आलेले गंडांतर दूर झाले. ते व्याधीमुक्त होऊन त्यांना आरोग्यता लाभली. स्वामी, मला आपल्या चरणीं दहा सहस्त्र रौप्यमुद्रा अर्पण करण्याची इच्छा आहे, आपण त्यास अनुमती द्यावी." त्यांचे हे बोल ऐकून त्या ब्रह्मांडनायकास हसू आले आणि अत्यंत प्रसन्नतेने ते म्हणाले, " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" क्रमश: ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.


Sep 16, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - २


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे

मोगलाई प्रांतात आंबे-जोगाईनजिक केज नांवाचे छोटेसे गांव आहे. तेथे महारुद्र देशपांडे नामक ऋग्वेदी ब्राह्मण जहागिरदार होते. लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचाही वरदहस्त त्यांच्या घराण्यांवर होता. महारूद्ररावांना दोन कनिष्ठ बंधू होते. एके काळीं काही कारणांनी त्यांचे निजाम-सरकारांतील उत्पन्न जप्त झाले होते. ते सोडविण्यासाठी या तीन बंधूंनी विशेषतः महारूद्ररावांनी अथक प्रयत्न केले, परंतु त्यांस यश आले नाही. त्याकाळी, बीड प्रांतात श्रीरामानंद बीडकर महाराज हे साधुपुरुष प्रसिद्ध होते. परब्रह्मस्वरूप अक्कलकोट स्वामी समर्थांचे ते कृपांकित शिष्य होते. महारूद्ररावही त्यांच्या दर्शनास वारंवार जात असत. असेच, एकदा ते दर्शनासाठी गेलें असता, त्यांनी बीडकर महाराजांस आपलें अडलेले कार्य पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांवर त्या संतपुरुषानें महारूद्ररावांना अक्कलकोट येथे जाऊन तेथील परमहंस स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावें असे सांगितले. श्री स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्न पुन्हा लवकरच सुरु होईल असा त्यांनी विश्वास दिल्यानंतर महारूद्रराव ह्यांस आशेचा किरण दिसु लागला. त्यानुसार, लवकरच ते अक्कलकोटास रवाना झाले. महाराज त्यावेळीं विरुपाक्ष मोदींच्या गृहीं आहेत हे समजताच श्रीफलादि पूजा साहित्य घेऊन ते समर्थांच्या दर्शनास निघाले. देशपांड्यांनी श्रीफलादी अर्पून । घातले प्रेमे साष्टांग नमन । तदा महारूद्ररावांचे हृद्गत जाणून । अवधूत निरंजन वदले - " तुम्ही चार मनोरे आहेत तेथे जावें, म्हणजे तुमचे शेत सोडुन देऊ..!! ". हे आशीर्वचन ऐकताच महारूद्ररावांना श्री स्वामी समर्थांच्या अंतर्साक्षीत्वाची प्रचिती आली आणि स्वामींचरणी त्यांची श्रद्धा दृढ झाली. त्याच दिवशी भोजन झाल्यावर स्वामींची आज्ञा घेऊन ते हैद्राबादेस निघाले. समर्थांच्या वचनांवर त्यांचा विश्वास होताच, तेव्हा वंदूनि श्रीदत्त-दिगंबरपदांस । त्वरेकरूनि निघाले ।


त्यावेळी हैद्राबाद येथील निजाम सरकार दरबारी उच्चपदस्थ मुख्य अधिकारी असलेले श्री शंकरराय राजा राजराया हे श्री स्वामी समर्थांचे खास भक्त होते. श्री स्वामी महाराजांनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन महारूद्ररावांस सहाय्य करावे असे सांगितले. आपल्या सद्‌गुरुंची अर्थात श्रीस्वामी समर्थ महाराजांची ही आज्ञा प्रमाण मानून शंकरराय राजा राजराया यांनी महारूद्रराव यांना त्यांची जहागिरीची सनद आणि मानमरातब पूर्ववत मिळवून दिले. अशाप्रकारे हैद्राबाद शहरी येताच अगदीच अनपेक्षितरित्या त्यांचे उत्पन्नाचे अडलेले काम सहजच पूर्ण झाले. याच कार्यासाठी पूर्वी अनेक प्रयत्न-साधने केली होती, द्रव्यही खर्चले होते, परंतु बराच काळ वाट पाहूनही यश काही आले नव्हते. मात्र तेच श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होताच, अगदीच विनासायास साधले गेले. श्री स्वामीकृपेची अशी प्रचिती येताच, महारूद्ररावांची श्री स्वामी समर्थांच्या ठायीं श्रद्धा, भक्ती अधिकच दृढ झाली. स्वामीभक्तहो, ' विश्वास: फलदायक: ' असे शास्त्रवचन आहे. अर्थात विश्वासच फलद्रूप होतो, याचा पुरेपूर अनुभव देशपांड्यांना आला. पूर्ववत उत्पन्न मिळताच, महारूद्रराव त्वरित अक्कलकोटास आले. श्री स्वामींचे दर्शन घेऊन त्यांनी सर्व वृत्तांत कथिला. मूळच्याच भक्तिवंत असलेल्या महारूद्ररावांनी समर्थांचे श्रद्धापूर्वक पूजन केले, त्यांना महानैवेद्य अर्पण केला आणि भरपूर दानधर्मही केला. काही दिवस अक्कलकोट नगरीत राहून ते केजधारुरास परतले.

पुढें काही दिवसांनी, महारूद्रराव आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या कुलदेवतेच्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी, भूलोकीचे वैकुंठ अर्थात पंढरपूर येथे आले. चंद्रभागेत स्नान करून ते श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले असता, त्यांना ' तो विटेवरी विठ्ठल-पांडुरंग-मूर्ति नसून । दिसले संन्यासी दैदीप्यमान । विटेवर उभे कटीवर हस्त ठेवून ।' असा अनुभव आला. मंदिरातील विठ्ठलमूर्तीच्या स्थानी त्यांना श्री अक्कलकोटस्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या यतींद्रमूर्तीच्या मनोहर दर्शनाने देशपांडे यांना अतिशय हर्ष झाला आणि अपूर्व अशी चित्तशांती त्यांनी अनुभवली. आपले कुलस्वामी पंढरीनाथ विठ्ठल आणि यतीश्वर अभिन्न स्वरूप असून एकाच परब्रह्माचे मूर्तिमंत चैतन्याविष्कार आहेत, हेच समजाविण्यासाठी योगीराज श्री स्वामी समर्थांनी सहज लीलेने हा चमत्कार महारूद्ररावांना दाखविला. पुढें, षोडषोपचारें श्रीविठ्ठल पूजन, यथाशक्ति ब्राह्मणभोजनादि करून देशपांडे आपल्या ग्रामीं परतले. मात्र, अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावें असा त्यांना ध्यास लागला. - महारूद्ररावांचे चित्ती । तळमळ लागली दर्शन-प्रीति । केव्हां पाहीन श्रीगुरुदेवमूर्ति । स्वामीसमर्थ जगदीश

क्रमश:
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत


Aug 16, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - १


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥ आजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

दत्तभक्तहो, अनेक वाचकांनी श्री स्वामी चरित्र, त्यांच्या लीला याविषयीं लिहिण्याबद्दल सूचना/अभिप्राय पाठवले. तसे पाहतां, या अक्कलकोटनिवासी अवतारी पुरुषाच्या चरित्रावर आधारित श्रीगुरुलीलामृत, श्री स्वामी समर्थ सारामृत, श्री स्वामी समर्थ बखर, श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत, श्री स्वामी समर्थ सप्तशती असे अनेक सिद्ध ग्रंथ रचले आहेत. तरीही, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अफाट चरित्र सागरांतून अनेक अमौलिक रत्ने, त्यांच्या काही लीला, स्वामीभक्तांना आलेल्या अनुभूती भक्तजनांपुढे मांडण्यासाठी एक उपक्रम घेऊन येत आहोत.
स्वामीभक्तहो, आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. करायचे एव्हढेच आहे की आपण आपली आवडती श्री स्वामी चरित्र कथा, लीला, बोधकथा आम्हांस ' संपर्क ' वापरून अथवा Email Us इथे कळवावी. आम्ही तुमचा नामनिर्देश करून त्या प्रकाशित करू. जेणे करून सर्व श्री स्वामी भक्तांना त्याचा लाभ होईल. महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

जास्तीत जास्त भाविकांना हे श्री स्वामी चरित्र वाचता यावे, श्री स्वामी/दत्तभक्तीचा प्रसार व्हावा आणि स्वामींच्या लीलांचे मनन करीत आपण सर्वजण स्वामीकृपेत रंगून जावे, केवळ हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  

काष्ठावर पादुका उमटल्या !
चिंतोपंत टोळ स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त बनले होते. श्रीसमर्थ म्हणजे साक्षात दत्तप्रभू अशा भावनेनेच त्यांची सेवा चालली होती. एकदा चिंतोपंतांनी आपल्या पूजेतील श्रीविष्णूमूर्तीला एक कोटी तुलसीपत्रे वाहण्याचा संकल्प केला. त्याचप्रमाणे ते दररोज नेमाने तुलसीपत्रे वाहत होते. केव्हा केव्हा श्रीसमर्थ पूजेच्या वेळी टोळाच्या घरी येत. त्यावेळी टोळ प्रसन्न चित्ताने भक्तिपूर्वक त्यांचीही पूजा करीत व त्यांच्या चरणी तुलसीपत्रे वाहून त्यांच्या चरणावर लोटांगण घालीत. एक दिवस श्रीसमर्थांची स्वारी अशीच पूजेच्या वेळी दत्त म्हणून टोळाच्या घरी उपस्थित झाली. टोळांनी त्यांची यथासांग पूजा केली. धूप-दीप-नैवेद्य दाखविला व त्यांच्या चरण कमलावर पवित्र तुलसीपत्रे वाहिली. त्या दिवशी श्रीसमर्थांची स्वारी विशेषच प्रसन्न दिसत होती. त्यांच्या तेजोमय मुखमंडलाभोवती चांदण्यासारखे आल्हादक आणि शांत तेज पसरलेले दिसत होते. पाद्यपूजा आटोपल्यावर चिंतोपंत डोळ्यात आसवे आणून म्हणाले, " महाराज, आपले परमपवित्र चरण पूजेसाठी निरंतर सन्निध असावेत अशी इच्छा आहे. " श्रीसमर्थ पाटावरून उठत म्हणाले, " ठीक आहे, तुझी मनोकामना पूर्ण होईल. " एवढे आश्वासन देऊन समर्थ निघून गेले. काही वेळाने चिंतोपंत पाटावर पाहतात तो पाटावर समर्थांचे दोन्ही चरण उमटलेले ! त्या अदभुत चमत्कार पाहून चिंतोपंतांना विलक्षण आश्चर्य वाटले व त्यांनी त्या चैतन्यमय पादुकांवर डोके ठेऊन त्यावर प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. कुशल कारागीर अनेक हत्यारे उपयोगात आणून काष्ठावर कोरीव काम करतो; परंतु श्री समर्थांना हत्यारांची काय आवश्यकता ? संकल्प हेच त्यांचे हत्यार ! हल्ली सदरच्या प्रासादिक पादुका ज्या पाटावर उमटल्या आहेत, तो पाट अक्कलकोटास जोशीबुवांच्या मठात आहे.
|| श्री स्वामी समर्थ || || श्री गुरुदेव दत्त ||

सौजन्य- ll श्री अक्कलकोट स्वामी चरित्र ll लेखक- वि.के.फडके

Jul 20, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - प्रस्तावना


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः


आम्ही नमू दीनानाथ l श्री गुरु स्वामी हा समर्थ l तोची बुद्धीचा दातार l भक्तवत्सल करुणाकर l चौदा विद्या चौसष्ट कळा l ज्याच्या दारीचा धुरोळा l वेद जेथे लोटांगणी l नेती बोलती वदनी l चारी मुक्तीची पायरी l सदा झुले ज्याचे द्वारी l आणिकाची कथा काय l शिव वंदी भावे पाय l कर जोडी शारंगधर l होऊनी पायाचा किंकर l ब्रह्मा बापुडा तो किती l काळा लागी ज्याची भीती l देव दानव किंकर l मुनी घेती निराकार l तया मानव भुलुनी गेले l अभिमाने नागवले l आनंद म्हणे दीनानाथ l निर्गुण की समर्थ l भगवान श्री दत्तात्रेयांचा तृतीय अवतार, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक स्वरूपाचे माहात्म्य अतिशय भक्तिपूर्ण आणि सहज सुंदर शब्दांत वर्णन करणारा हा अभंग ! अशा अनेक नितांतसुंदर रचनांचे रचयिता म्हणजेच परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमशिष्य, भक्तशिरोमणी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज. यांचे मूळ नाव ' गुरुदास एकनाथ वालावलकर ' असे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यांत महुरे नामक छोट्या गांवात ते वास्तव्यास होते. वंश परंपरेने त्यांच्या घराण्यांत दत्तभक्तीचा वारसा होता. लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे संपन्नताही होती. तरुणपणी ते मुंबईस राहून काथ्याचा आणि हरड्याचा धंदा करीत असत. त्यांचे राहणीमान उच्च थाटाचे होते. एकदा, ते भेंडे यांच्या म्हणजेच स्वामी समर्थांचे भक्त असलेले तात महाराज यांच्या पेढीवर बसले असता, त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ यांची महती ऐकली. अनेक भक्तांचे अनुभव आणि काहींना आलेली परमार्थिक प्रचिती ऐकून गुरुदासांना श्री स्वामी दर्शनाची ओढ लागली. ते अस्वस्थ झाले आणि कुणालाही न सांगता अक्कलकोटास प्रयाण करते झाले. मार्गांत श्री स्वामींचेच ध्यान करीत करीत लवकरच गुरुदास अक्कलकोटास पोहोचले. तेथील वडाजवळ असलेल्या तलावांत ते हातपाय धुण्यासाठी म्हणून उतरले. त्यांचे चित्त मात्र श्री स्वामींच्या दर्शनाच्याच ध्यासाने व्यापले होते. तेव्हढ्यांत त्यांच्या डोक्यावर त्या वटवृक्षाची एक सुकलेली डहाळी पडली. दचकून त्यांनी वर पाहिले तो काय आश्चर्य! श्री स्वामी समर्थ त्या वडाच्या एका फांदीवर बसून खळखळून हास्य करीत होते. त्यांनीच ती सुकलेली डहाळी त्यांच्या मस्तकावर टाकली होती. आनंदातिशयाने धावतच गुरुदास त्या वटवृक्षाजवळ गेले. तोपर्यंत स्वामी महाराजही वडावरून खाली उतरले होते. गुरुदासांनी श्री स्वामी समर्थांना अत्यंत भक्तिभावाने प्रणिपात केला, आपले मस्तक त्यांच्या चरणकमलांवर टेकविले. श्री स्वामींनी त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना समाधी लागली. अशा रितीने, प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि कृपांकित केले. काही दिवस, समर्थांच्या सान्निध्यांत राहून गुरुदास आपल्या घरी परतले आणि प्रपंचातील त्यांचे ध्यान उडाले. ते सदा सर्वदा स्वामींच्या ध्यानांत मग्न राहू लागले. त्यानंतर, पुढील सहा वर्ष ते नित्य श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाऊन त्यांची सेवा करू लागले. श्री स्वामींवरील त्यांची श्रद्धा आणि भक्ती वृद्धिगंत होऊन ते 'गुरुदासा' चे 'आनंदनाथ' झाले. श्री स्वामींची स्तवनगाथा, अभंग, स्तोत्र असे प्रासादिक वाङ्मय आनंदनाथ महाराजांनी स्वामीकृपेनें रचले. एकदा आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींना, 'आपणांस कृपाप्रसाद द्यावा.' अशी प्रार्थना केली असता, प्रसन्न होऊन श्री स्वामी समर्थांनी आपल्या मुखातून आत्मपादुका काढून त्यांना दिल्या आणि आपली कार्यध्वजा उभारण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थांच्या त्या आत्मपादुका घेऊन आनंदनाथ महाराज नाशिक जिल्ह्यांतील सावरगाव येथे वास्तव्यास आले आणि तेथेच त्यांनी आपल्या या आराध्यदेवतेचा मठ स्थापन केला. काही काळानंतर त्या मठाची धुरा एका भक्ताकडे सोपवून आनंदनाथ महाराज श्री नृसिंहवाडी इथे काही काळ आराधना करीत राहिले. त्यानंतर बेळगांवला जाऊन सावंतवाडी तालुक्यांतील होडावडे या गांवी आले. त्या ग्रामींच एका औदुंबराखाली त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या. कालांतराने, तिथेच श्री स्वामींचा मठही उभा राहिला. त्यानंतर, वेंगुर्ल्याजवळ धावडे या गांवी तिसरा मठ स्थापन केला. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या त्या दिव्य आत्मपादुका ( आत्मलिंग ) आजही या मठांत नित्यपूजेत आहे. तसेच, स्वामीभक्त दर गुरुवारी त्यांचा दर्शन लाभही घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थांच्या समाधी नंतरही पंचवीस वर्षांहून अधिक काळ आनंदनाथ महाराजांनी स्वामीभक्ती प्रसाराचे कार्य चालू ठेवले होते. ते ऐश्वर्यसंपन्न होते. त्यांच्या श्रीमंतीच्या थाटाचे काय वर्णन करावें ? ते घोड्यावरून फिरत असत. श्री दत्तजयंती आदी उत्सवांस सहस्त्रभोजन, अमाप दान-दक्षिणा करीत असत. मात्र त्यांची वृत्ती विरक्त होती. शिर्डीवासी श्री साईनाथांचे माहात्म्य यांनीच प्रथम सर्वांस कथन केले. १९०३ साली आनंदनाथ महाराजांनी 'संजीवन समाधी' घेतली आणि ते श्री स्वामी चरणीं लीन झाले. श्री आनंदमहाराजकृत 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' ( कामधेनू स्तोत्र ) हे स्वामीभक्तांच्या नित्यपठणांत असते. या दिव्य स्तोत्राचे चिंतन आणि मननाचा हा अल्प प्रयास आपण पुढील काही लेखांमधून करणार आहोत.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश: