Sep 22, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ३


॥ श्री गणेशाय नम: श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ ॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥ भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥ केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे आपल्या कुलस्वामींच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे महारूद्रराव गेले असता, श्री विठ्ठलमूर्तीच्या जागी त्यांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या अक्कलकोटनिवासी योगिश्वरांच्या कृपेनें हा अद्वैताचा साक्षात्कार घडल्यावर महारूद्ररावांची त्यांच्या चरणी असलेली श्रद्धा अधिकच दृढ झाली अन आपली श्रीगुरुदेवमूर्ति कधी एकदा पाहीन, असा ध्यास लागला. पुढें काही दिवसांनी अक्कलकोटास जाण्याचा योग आला आणि श्री स्वामी समर्थ हेच आपले कुलदैवत रुक्मिणीकांत श्रीजनार्दन आहेत असा भाव ठेवून त्यांनी महाराजांना लोटांगण नमन घातले. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटांत असतांना काही ठराविक भक्तमंडळींच्या गृहीं वारंवार येत असत. तेथील ग्रामजोशी बाळकृष्णबुवा हे त्या भाग्यवंत भक्तांपैकीच एक होते. ते विद्वान, वैष्णव आणि ज्योतिषी असून अनेक लोक आपले कार्य प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या घरी सतत येत असत. त्याशिवाय स्वामींच्या दर्शनासाठी बाहेरगावांहून येणारी गणपतराव अरब आदि अनेक मंडळीही बाळकृष्णबुवांच्याच घरी मुक्कामास राहत असत. हैदराबादचे हे गणपतराव अरब हे मराठी, पण त्यांच्याकडे निजामाचा अरब रिसाला होता. त्यामुळे, त्यांना अरब नाव पडले. हे श्री दत्तभक्त होते. सदाचारी, विद्यासंपन्न आणि सुस्वभावी असे बाळकृष्णबुवा अत्यंत अगत्यपूर्वक सर्वांचे आतिथ्य करीत असत. त्यांच्याच गृही महारूद्रराव आपल्या कुटुंबियांसहित उतरले. मनोभावें श्री स्वामीराजांचे पूजन करून त्यांनी सहस्र-भोजन समाराधना केली. शुक्ल पक्षींच्या चंद्रकलासम । श्रीस्वामीसमर्थ चरणीं निरुपम । महारूद्ररावांची शुद्धभक्ति नि:सीम । जडली सप्रेम सर्वदा ॥ अशा रीतीने श्री समर्थांचे कल्याणप्रद असे आशीर्वचन घेऊन अत्यंत समाधानाने महारूद्रराव आपल्या घरीं केज येथे परतले. ते श्री नृसिंह-मुनींचे नित्य स्मरण करीत असत. अक्कलकोटाहून घरीं आल्यावर पुढे चार-आठ दिवसांतच महारूद्ररावांना पुनः श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती आली. त्यांच्या जागेंत काही काम सुरु होते, आणि तिथेच त्यांना द्रव्याचें हांडे सापडले. विपुल अशा धनसंपत्तीचा लाभ झाल्याने सर्व देशपांडे मंडळी अत्यंत आनंदित झाली. दिवसोंदिवस भाग्यकाळ वृद्धिंगत होऊ लागला, ' जगन्नाथ स्वामी सदाशिव कृपाल । साह्य होतां काय उणे ' या उक्तीची प्रचिती येऊ लागली आणि महारूद्ररावांची श्री स्वामी समर्थ चरणीं भक्ती अधिकच दृढ होऊ लागली. गृहस्थाश्रमीं असूनही त्यांची आपल्या सद्गुरूंवर नितांत श्रद्धा होती, आपल्या या आराध्यदैवतास ते अनन्यभावें शरण आले होते. असेच एकदा, महारूद्रराव सहपरिवार श्री महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले आणि नेहेमीप्रमाणेच श्री बाळकृष्णबुवांच्या गृहीं मुक्कामास उतरले. नित्यनियमांनुसार, श्री दत्तगुरु स्वामी समर्थांचे दर्शन झाले खरें, मात्र त्यावेळीं महारूद्ररावांना ज्वर येऊन वायुप्रकोप झाला. वैद्योपचार घेऊनही उतार पडण्याची काहीच चिन्हें दिसेनात आणि बघतां बघतां त्यांची प्रकृती अतिशय खालावत गेली. ते या आजारांतून वाचतील अशी काहीच लक्षणें दिसत नव्हती. देशपांडे कुटुंबियांचा आता मात्र धीर खचला आणि श्री स्वामी समर्थांनाच आता शरण जावें, त्याशिवाय आता कुठलाच मार्ग नाही असा विचार त्या सर्वांनी केला. तेव्हा, महारूद्ररावांचे ज्येष्ठ पुत्र रघूत्तमराव त्या जगत्सूत्रधारक समर्थांकडे आले आणि अत्यंत चिंतीत होऊन ' आमचे पित्याची घातली घटिका । त्यावीण आमचा प्रपंच लटिका । प्राप्त व्हावी कृपारूप अंजनगुटिका । ' अशी त्यांची करुणा भाकली. ' हे दयासागरा, तुम्हीच सर्वथा आमचे मायबाप आहात, असे म्हणत त्याने श्रीमद्दत्तात्रेय स्वामींना साष्टांग नमस्कार केला आणि त्यांचे चरण दृढतेने धरले. त्याची प्रार्थना ऐकून करुणाघन कळवळले आणि आश्वासक स्वरांत म्हणाले, " अरे तुझ्या पित्यास लवकरच बरें वाटेल आणि तो व्याधीमुक्त होईल. तू अजिबात चिंता करू नकोस, सत्वर आपल्या स्वस्थानीं जा." समर्थांचे ते अमृतवचन ऐकताच रघूत्तमरावांस संतोष वाटला आणि स्वामींचा तीर्थप्रसाद घेऊन ते धावतच आपल्या बिऱ्हाडीं परतले. आपल्या पित्यास ते तीर्थ देऊन ते स्वामीनाम जपू लागले. अन काय आश्चर्य ! महारूद्ररावांच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. ' आठ चार दिवसांत आला शुभ प्रत्यय । महारूद्ररावांची प्रकृति झाली निरामय ' स्वामीभक्तहो, त्या पूर्णप्रतापी योगीश्वराची कृपा असता अशक्य काय ते सांगा बरें ? महारूद्ररावांना आरोग्यप्राप्ती झाल्यामुळे देशपांडे कुटुंबीय अतिशय सुखावले. रघूत्तमराव सत्वर स्वामींच्या दर्शनासाठी आले आणि त्यांना अनन्यभावानें वंदन करून म्हणाले, " हे दयाघना, आपल्या आशीर्वादाने माझ्या पित्यावर आलेले गंडांतर दूर झाले. ते व्याधीमुक्त होऊन त्यांना आरोग्यता लाभली. स्वामी, मला आपल्या चरणीं दहा सहस्त्र रौप्यमुद्रा अर्पण करण्याची इच्छा आहे, आपण त्यास अनुमती द्यावी." त्यांचे हे बोल ऐकून त्या ब्रह्मांडनायकास हसू आले आणि अत्यंत प्रसन्नतेने ते म्हणाले, " आम्हांसि न लगे द्रव्य-अघ । आपल्या घरासि जा रे नीघ । घराचे उकीरड्यांत टाकून दे ओघ । हा दगड तेथे नेऊन ठेव रे ॥" क्रमश: ॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत स्वामीभक्तहो, या उपक्रमातील सर्व लेख इथे वाचता येतील.


No comments:

Post a Comment