Sep 15, 2021

श्री सत्यदत्त व्रत आख्यान - अध्याय ५ आणि उत्तरपूजन


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॥


अध्याय ५

॥ श्रीदत्त ॥ सूत म्हणाले, " शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा, हा परमेश्वर ( दत्तात्रेय ) आहे. हे मुनिश्रेष्‍ठ हो, पुन्हा आदराने त्यांची महती श्रवण करा.॥१॥ गोदावरीतटी राहणारा हरिशर्मा नामक एक ब्राह्मण होता. त्याला वीस वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म ( पानथरी ), आठ वर्षांचा क्षय, तीन वर्षांचा जलोदर, एक वर्षाचा जीर्णज्वर व सहा महिन्यांचा दमायुक्त अतिसार व चार महिन्यांपासून भगंदर हे विकार झाले होते.॥२-३॥ शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून, अत्यंत दुःखी झालेली त्याची सोळा वर्षांची पत्नी, परम दत्तभक्त विष्णुदत्तांना शरण गेली,॥४॥ व त्यांना म्हणाली, "हे ब्राह्मणदेवा, मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत आणि त्यांना केलेले अतिशय चांगले औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत."॥५॥ त्या साध्वी स्त्रीने अशाप्रकारे प्रार्थना केली असता, दयाळू विष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या पतीला पाहून व कर्मविपाक शास्त्राचे अवलोकन करुन त्या साध्वी स्त्रीकडून श्रीसत्यदत्तव्रत करविते झाले.॥६॥ त्या व्रतप्रभावानें, क्रमाने प्रत्येक व्रतांपासून ते ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर विष्णुदत्तांनी त्या ब्राह्मणाच्या ह्रदयाला स्पर्श करुन उपनिषन्मंत्राचा जप केला.॥७॥ त्यामुळे तो ब्राह्मण, रोगमुक्त होऊन, इहलोकी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व श्रीदत्तभक्ती यांचा लाभ करुन घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीस प्राप्त झाला.॥८॥ याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत, मनुष्यांना पापनाशक, तुष्‍टी देणारे, पुष्‍टी देणारे, भुक्ती व मुक्ती देणारे असे आहे. श्रीदत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे."॥९॥ वेदधर्मा म्हणाले, "हे दीपका, असे सूतांच्या मुखातून श्रवण करुन, नैमिष्यारण्यातील महर्षींनी, एकाग्रचित्त होऊन, श्रद्धेने श्रीसत्यदत्ताचे व्रत केले.॥१०॥ हे वत्सा दीपका, यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी, प्रभू श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे, एकाग्रचित्ताने श्रीदत्तदेवांच्या चरणकमलांचे ध्यान करू लागले.॥११॥ नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे, असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्रीदत्तात्रेय स्वमायेच्या योगाने प्रकट झाले.॥१२॥ उदय पावणार्‍या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडलाच्या मध्ये असणार्‍या श्रीसत्यदत्ताला, चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत.॥१३॥ नेत्र मिटून ते ब्राह्मण शांतपणे, ह्रदयामध्ये श्रीहरीची प्रार्थना करु लागले.॥१४॥ आम्हांला प्रभूचे दर्शन कसे होईल, याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असतांना, मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली. ती अशी की, "हे ऋषीहो, नेत्र उघडा." अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत्स्वरुप पाहते झाले व शुद्धचित्त होऊन स्तुती करु लागले.॥१५॥ ऋषी म्हणाले, "खरोखर आपण ऋषी नाही. तसेच वर्णाश्रमचिह्न धारण करणारेही नाही, तर आपण त्रिगुणातीत परब्रह्मस्वरुप आहात. आपणच स्वांशांशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे.॥१६॥ आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक, आपले दिव्य, उत्तम, व सत्य असे तेजोमय रुप जाणत नाहीत म्हणूनच या संसारात फार श्रमतात.॥१७॥ तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्व तूच आहेस. हे परमात्मन् ! हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरुप आहे आणि तू सर्वात्मा आहेस.॥१८॥ तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते व तुझ्या स्वरुपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री ब्राह्मण या आठ रुपांनी जगन्मय तूच भासत आहेस.॥१९॥ तुझे अत्यंत गूढ असे स्वरुप, सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रुप आम्ही काही प्रमाणांत जाणू शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे."॥२०॥ वेदधर्मा ऋषी पुढे कथन करू लागले. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्‍ट झालेले परमात्मा दत्तात्रेय, त्या ऋषींना, सर्व विश्व आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी दाखवून मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले,॥२१॥ "हे ब्राह्मणहो ! तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे, ब्रह्मचर्य, यमनियम, यज्ञयाग इत्यादि साधनानुष्‍ठानामुळे, तसेच या तुम्ही केलेल्या सत्यदत्तव्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्‍ट झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्‍ट तो वर मागून घ्या."॥२२-२३॥ त्यावेळी शौनकादि ऋषी म्हणाले, "हे महादेवा ! तूच आम्हास स्वस्वरुपाचे ज्ञान करुन देऊन, स्वभक्त व शांतचित्त कर. कारण तूच सर्वसाक्षी आहेस. आम्ही काय बोलावे ? आपणच आमचा मनोरथ जाणून, सर्वतोपरी योग्य असा अनुग्रह करा."॥२४॥ तेव्हा श्रीसत्यदत्त म्हणाले, "जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले, ते मनुष्यांना योगसिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे.॥२५॥ हे उत्तम अनुष्‍ठानशील ब्राह्मणहो ! तुम्ही या जन्मीच देहांती, मन व वाणीला गोचर न होणार्‍या माझ्या परमानंदस्वरुप श्रेष्‍ठपदाला प्राप्त व्हाल, यात शंका नाही.॥२६॥ तसेच हे सत्यदत्तव्रत, सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्‍ठ, श्लेष्म, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशांत स्वचक्र, परचक्र, इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील.॥२७॥ या व्रताने, वंध्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्यप्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल. मुमुक्षू पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्‍ट असेल, ते त्याला या श्रीसत्यदत्तव्रताच्या योगाने प्राप्त होईल."॥२८॥ श्रीवेदधर्मामुनी म्हणाले," दीपका,याप्रमाणे बोलून, स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्यराशीप्रमाणे तेजोराशी, देवाधिदेव श्रीदत्तराज एकदम अंतर्धान पावले. हे अवलोकन करुन शौनकादि ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले.॥२९॥ वत्सा श्रीदीपका, असा ज्या श्रीप्रभूंचा प्रभाव आहे अशा, शरणागतांविषयी दयाळू, स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणार्‍या सर्वेश्वर श्रीदत्तात्रेयांचे पूजन, श्रद्धाभक्तीने करुन तूही परमानंदाला प्राप्त हो."॥३०॥
श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा पाचवा अध्याय आहे.
॥ इति सत्यदत्त व्रतोपाख्याने पंचमोध्यायः ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीदत्त ॥ 
**********************************************************
उत्तरपूजन 

अध्याय कथा वाचन पूर्ण झाल्यावर, 
॥ अनेन यथा शक्ति श्री सत्यदत्त व्रतकथा वाचनेन नैवेद्यसाहित पूजनेन श्री दत्तात्रेय: साङग: सपरिवार: प्रियताम् ॥ 
हा मंत्र म्हणून उत्तर पूजन करावे. 
नंतर, दीपारती अथवा कर्पूरारती करावी. 

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन ॥ दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ॥धृ.॥
धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व । कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापूनि सगर्व । 
योग याग तप दान नेणती असताही अपूर्व । सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धरी जो शर्व ॥१॥
अत्रिमुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येती । भिक्षुक होऊनि अनसूयेप्रति बोलती त्रयमूर्ति । 
नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असे वदति । परिसुनि होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती ॥२॥
दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेंद्र । ब्रह्मदेव तो जाहला चंद्र जाहला तो उपेंद्र । 
दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारका योगीन्द्र । वासुदेव यच्चरण चिंतूनि हो नित्यातंद्र ॥३॥ 

त्यानंतर, श्री. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचित घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् म्हणावे. 
॥ घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ॥
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ॥
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ॥
त्वं सर्वस्वं नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यम् । भीतिं क्लेशं त्वं हराऽऽशु त्वदन्यम् ॥
त्रातारं नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ॥
॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं
घोरकष्टोद्धारणस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ यस्या स्मृत्या च नामोक्त्या तपोयज्ञक्रियादिषु । न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तम् अच्युतम् ॥ अशी श्री दत्तात्रेयांची प्रार्थना करावी. 
॥ ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥  






॥ श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ॥ श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु  

No comments:

Post a Comment