Sep 8, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी २१ ते २५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


पर उपकार विस्मरण । पापे केली अघटित कर्म । अहंभाव क्रोधा लागून । सदाचि गृही ठेवियले ॥२१॥ हे क्षमा करोनि दातारा । मज तारावे लेकरा । तुजविण आसरा । नाही नाही जगत्रयी ॥२२॥ हे दयानिधी, मी एक अति सामान्य असा मनुष्य आहे. काम, क्रोधादि षड्रिपु, दुर्वासना यांच्या दुष्टचक्रांत अडकल्याने माझ्या हातून अनेक दुराचरणें घडली. माझ्या सख्या-सोयऱ्यांनी केलेली मदत आणि उपकार मी सोयीस्कररित्या विसरलो. माझ्या अल्प ज्ञानामुळे अहंकाराने मला ग्रासले. सतत क्रोध अनावर झाल्याने अविचारी, विवेकहीनही झालो. परिणामी, मी असंख्य दुष्कृत्यें केली. सर्व दुर्गुण, विकार अंगी असलेला मी हीन-दीन, महापातकी आहे. हे जरी खरे असले, तरी तू करुणामूर्ती आहेस. अनन्यभावानें शरण आलेल्या आपल्या भक्तांस तू नेहेमीच आपल्या कृपाछत्राखाली घेऊन त्यांचा उद्धार करतोस. या त्रैलोक्यांत तुझ्याशिवाय मला कोणीही आश्रयदाता नाही. आश्रितांचे तुम्ही कल्पवृक्ष आहात. त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस. मीही आपले अजाण बालक आहे, माझ्या अनंत अपराधांबद्दल मला क्षमा करावी. हे भक्तवत्सला, मला तू अव्हेरू नकोस अन माझ्यावर कृपा कर.

मज न घडे नेम धर्म । न घडे उपासना कर्म । नाही अंतरी प्रेम । परी ब्रीदाकरण तारणे ॥२३॥ विहित म्हणजेच वेदशास्त्रसंमत कर्म केल्याशिवाय साधकाची चित्तशुद्धी होत नाही. नित्य आणि नैमित्तिक कर्मांनी चित्ताची मलिनता जाते. हे जरी सत्य असले तरी, हे सद्गुरुराया, माझ्या हातून ना कधी धर्माचरण घडले ना कधी मी तुझी उपासना केली. उपासना म्हणजे अगदी निकट असणे. आपल्या इष्टदेवतेचे श्रद्धेने, भक्तिभावाने केलेले चिंतन-ध्यान म्हणजेच उपासना. जन्म-मरणाच्या ह्या संसृतिचक्रातून सुटका होण्यासाठी कर्म आणि उपासना ही साधना निश्चितच केली पाहिजे. परंतु हे दयाळा, माझ्या अंतःकरणात ईश्वराविषयी दृढ भक्तिभाव, प्रेम नाही. मग मला आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे बरें होणार ? तुला शरण आलेल्यांना तू नेहेमीच अभय देतोस. किंबुहना, तुझी प्रतिज्ञाच आहे तशी ! तेव्हा, तुझ्या कृपाकटाक्षाने मला अंतर्बाह्य शुद्धता लाभावी, हीच प्रार्थना.

नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही । ऐसे देती ग्वाही । संत सज्जन पुराणे ॥२४॥ मागे बहुत तारिले । हे त्यांही अनुभविले । मज का अव्हेरिले । निष्ठुर केले मन किंनिमित्त ॥२५॥ कृतयुगीं जें प्राप्त ‘ध्यानें’ । त्रेतीं ‘यजनें’ द्वापारीं ‘अर्चनें’ । तें प्राप्त सर्व ‘नामसंकीर्तनें’ । गुरुभजनें कलियुगीं ॥ अर्थात ईश्वरप्राप्तीसाठी कृतयुगात ध्यान केले जात असे, त्रेतायुगात त्यासाठी यज्ञादिक अनुष्ठानें तर द्वापारयुगी पूजाविधानें केली जात असत. मात्र या कलियुगात नामस्मरण हा परमार्थाचा सहजसोपा उपाय आहे. नामसाधनेस सोवळ्या-ओवळ्याचे नियम नाहीत. सहज जाता येता पण मनापासून घेतलेले नाम परमार्थ, ईश्वरप्राप्ती आदि लाभ देते. चार वेद, सहा शास्त्रें, आणि अठरा पुराणेंदेखील 'अखंड हरिभजनाशिवाय मायेचे निरसन होणे अशक्य आहे.' हेच प्रतिपादित करतात. सद्वर्तन आणि अनन्यभावानें घेतलेले नाम परमानंदाची अनुभूती देते. ब्रह्मर्षी नारदमुनींच्या उपदेशानुसार ' मरा मरा ' या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली असता वाल्या कोळ्याच्या जिव्हेवर ' राम ' नाम अवतरले. अन त्या वाल्या कोळ्याचे वाक्सिद्धी प्राप्त झालेले वाल्मिकी ऋषी झाले. श्री समर्थ रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांसारख्या अनेक सत्पुरुषांनीही नाममहिमाच गायला आहे. कित्येक साधक, सद्भक्त यांनी केवळ नामसाधना करून भगवत्प्राप्ती साध्य केली. मग हे सदगुरो, तू मलाच का तुझ्या कृपेपासून वंचित ठेवले ? तू करुणेचा सागर आहेस. माझ्या हातून असा कुठला अक्षम्य अपराध घडला की तू माझ्याविषयी असा निष्ठुर झाला आहेस? हे दयाळा, मला क्षमा कर आणि या वेद-वेदान्तातील वचनांची प्रचिती दे.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ क्रमश:


No comments:

Post a Comment