Sep 11, 2021

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ५













॥ श्री गणेशाय नमः ॥

हे अज, अजित, अद्वया सच्चिदानंदा, करुणालया हा दासगणू तुझ्या पायां पडतो. तू मला आतां अभय दे.।।१।। हे देवा, मी अतिशय हीन-दीन,पातकी मनुष्य आहे.मला कोणताही अधिकार नाही, सर्व बाजूंनी मी लाचार आहे.।।२।। परंतु अत्यंत हीन-दीनांवर थोर नेहेमीच कृपा करतात.पहा बरे, श्रीशंकरानें आपल्या अंगास खरोखर विभूति लावली आहे.।।३।। तो हीनांचा हीनपणा थोरांस काही कमीपणा आणत नाही. नारायणा, हे सर्व लक्षात घेऊन हा गणू तुझ्या पदी ठेवावा.।।४।। लेकराचे सर्व लाड आई नक्कीच पुरविते.त्याप्रमाणेच ह्या दासगणूचें सर्व ओंझे तुझ्याच शिरीं आहे.।।५।। तुझ्याच इच्छेने सारे घडते. त्यामुळे जे करशील ते मला मान्य आहे, पण तुझ्या अंतरी दया असूं दे, हीच प्रार्थना.केवळ तुझ्याच जोरावर दासगणूच्या साऱ्या उड्या आहेंत.।।६।। गजानन महाराज शेगांवीं असतांना नित्य नवनवीन यात्रेकरू येत असत.त्यांच्या भक्तीस सीमा नव्हती.त्या भक्तियात्रेचे वर्णन तरी कोठवर करावे ?।।७।। महाराजांची कीर्ती व महिमा फारच वाढला, तो दूर करण्यासाठी गजानन साधुवर वनांत भटकू लागले.।।८।। तें महिनोंमहिने वनातच राहू लागले.तसेच महाराज हवे तिथेच बसून रहात. अशाप्रकारे आपुलें चरित्र ते कोणासही एवढेसुद्धा उमगू देत नव्हते.।।९।। श्रोतेहो, एकदा महाराज पिंपळगांवाला गेले असतांना तिथे काय घडले त्याची गोष्ट ऐका.।।१०।। त्या पिंपळगांवच्या वेशीजवळच असलेल्या अरण्यांत एक शंकरांचें, जुनें पुराणें हेमाडपंती मंदिर होते.।।११।। अशा त्या मंदिरात साक्षात्कारी गजानन माऊली येती झाली अन तें शिवशंभोच्या गाभाऱ्यात पद्मासन लावून बसले.।।१२।। सूर्यास्ताच्या वेळी त्या गांवचे गुराखी आपापल्या गुरांचे कळप घेऊन गांवाकडे निघाले होते.।।१३।। महादेवाच्या मंदिरापुढेंच एक लहान ओढा होता.तिथेच आपल्या गाई-गुरांना पाणी पाजण्यासाठी सर्व गुराखी आले.।।१४।। त्यातील काही जण सहजच शिव-महादेवाला नमस्कार करण्यासाठी मंदिरांत गेले. गाभाऱ्यात श्रीसमर्थांस पाहून ते आश्चर्यचकित झाले.।।१५।। आजपर्यंत ह्या मंदिरात सूर्यास्ताच्या वेळी कुणीही पुरुष समाधी अवस्थेत बसलेला आपण पाहिला नाही,अशी ती मुले आपापसांत बोलु लागली.।।१६।। कांहीं गुराखी बाहेर येऊन इतरांस बोलावूं लागले.तर काही जण तिथेच सत्पुरुषाच्या समोर बसून राहिले.।।१७।। पण तो साधुपुरुष काहीच बोलेना,अथवा त्याने आपले डोळेही उघडले नाहीत.त्या गुराखी बालकांना त्याचे कारण काहीच कळेना.।।१८।। कोणी म्हणे, हा साधू पुरुष अतिशय थकलेला दिसतो आहे.काही बोलण्याचीही त्याच्यात शक्तीच मुळी उरलेली नाही.।।१९।। तर कोणी म्हणे, हा खरोखर उपाशी दिसत आहे. आपण त्याला खायला थोडी भाकरी देऊ या.।।२०।। असे म्हणून त्यांनी समर्थांच्या मुखासमोर थोडी भाकरी धरली. मुळातच भाविक असलेली ती गुराखी बालके समर्थांस हलवून जागे करण्याचा प्रयत्न करू लागली.।।२१।। परंतु तो साधू काही जागा झाला नाही वा त्याने मुखातून एक शब्दही बोलला नाही. त्यामुळे त्या गुराखी बालकांना विशेष नवल वाटले.।।२२।। यांवर ती गुराखी मुले आपापसांत चर्चा करू लागली.ह्या साधू पुरुषाची स्थिती मुळीच कळत नाही.जरी ह्यांस मेलेला म्हणावे तर हा व्यवस्थित बसलेला आहे.।।२३।। ह्यांचे अंगही थंडगार पडलेले नसून छान गरम आहे,यावरून हा सत्पुरुष जिवंत आहे का याची शंकाच नको.।।२४।। काही जण हे मायावी रुप धारण केलेले भूत आहे असे म्हणू लागले.त्यावर काही जण शिवापुढे कधीही भूत येत नाही हे सत्य आहे असे म्हणु लागले.।।२५।। काही बालके हा निश्चितच स्वर्गीचा देव असावा व त्याच्या दर्शनाचा आपल्याला लाभ झाला हेच आपले भाग्य होय असे बोलू लागली.।।२६।। आपण सर्व मिळुन आतां ह्या सत्पुरुषाचे पूजन करू या.त्यांच्या स्नानाकरिता ओढ्याचे पाणी घेऊन येऊ या.।।२७।। ती बालके ओढ्यावर गेली व त्यांनी पाणी पिण्याच्या भांड्यातून पाणी आणून समर्थांच्या पायांवर अत्यंत भक्तिभावाने घातले.।।२८।। कोणी वन्यपुष्पें आणून त्यांची माळ तयार केली. ती माळ त्या गुराख्यांनीं साधूच्या कंठामध्यें घातली.।।२९।। तर कोणी वडाच्या पानावर कांदाभाकर नेवैद्य म्हणून समर्थांसमोर ठेवली.।।३०।। त्यानंतर गुराख्यांनीं श्रींना सद्भावे आदरपूर्वक नमन केले. समर्थांच्या पुढें बसून कांहीं वेळ भजनही केले.।।३१।। असा तिथे आनंदोत्सव चालला होता, इतक्यात एक गुराखी बालक बोलला,'अरे आपणांस खूप उशीर झाला आहे,आता गावांत गेले पाहिजे.।।३२।। सूर्यास्तदेखील होऊन गेला आहे, त्यामुळे मुले गाई-गुरांना घेऊन अजून रानांतून परत का आली नाहीत असे लोक बोलत असतील.।।३३।। कदाचित आपणांस शोधत या वनांतदेखील येतील. घरातील तान्ही वांसरेंसुद्धा एव्हाना आपल्या आईसाठी हुंबरत असतील.।।३४।। आपण ह्या साधू पुरुषाविषयी गांवांत जावून सांगू या, म्हणजे गावातील चतुर व वडीलधाऱ्या माणसांस सर्व कळेल.'।।३५।। हे गुराखी बालकांस पटले व ते सर्व तिथून गावांत निघून गेले. त्यांनी मंदिरातील हे वृत्त सर्व गावकऱ्यांस सांगितले.।।३६।। श्रोतेहो, पुढें प्रातःकाळीं गांवातील काही मंडळी समर्थांस पहाण्यासाठी त्या गुराखी बालकांबरोबर (मंदीरात)आली.।।३७।। समर्थ आदल्या दिवशी जसे समाधिस्थ बसले होते, त्याच स्थितीत अजूनही असल्याचे त्यांनी पाहिले.नेवैद्य म्हणुन जी भाकरी त्यांच्यापुढे ठेवली होती, त्या भाकरीलादेखील त्यांनी स्पर्श केला नव्हता. ती जशीच्या तशीच होती.।।३८।। हे पाहून हा कोणी तरी योगी पुरुष असावा व सध्या या शंकरांच्या मंदिरात आला आहे असे ते गांवकरी म्हणूं लागले.।।३९।। तर प्रत्यक्ष शिव आपल्याला दर्शन देण्यास ह्या पिंडीच्या बाहेर आले आहेत व आपण ह्यांस गांवांत नेऊ या, असे काही जण बोलू लागले.।।४०।। ह्या साधू पुरुषाची जेव्हा समाधी उतरेल,तेव्हाच ते काही बोलतील. पण ती समाधी उतरण्यास अजून वेळ आहे,तोपर्यंत ह्यांस त्रास देऊं नका.।।४१।। बंगालमध्ये जालंदरनाथ एका गर्तेत बारा वर्षे समाधिस्थ होऊन स्थिर राहिले होते, हे तर सर्व जगविख्यातच आहे.।।४२।। अशी काही काळ तिथे भवति न भवति झाली. शेवटी त्या ग्रामस्थांनी एक पालखी आणली अन समर्थांची मूर्ति त्या पालखीत उचलून ठेवली.।।४३।। हे सज्जनहो,गावांतील सर्व स्त्री-पुरुष त्या पालखीबरोबर चालत होते आणि पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता.।।४४।। गावांतील बालके/लोक अधून मधून महाराजांना तुळशीफुलें वाहत होती.उधळलेल्या गुलालानें समर्थाचें अंग लाली लाल झाले होते.।।४५।। घंटाघडयाळें यांचा नाद होत होता.अवघे लोक उंच स्वरात 'जय जय योगिराज मूर्ति' असे भजन करत होते.।।४६।। अशा रीतीने ती मिरवणूक गावांतील मारुतीच्या मंदिरांत आली.श्री सद्‌गुरुनाथांस एका भव्य पाटावर आणून बसवले गेले.।।४७।। तो दिवसही मावळला.(समर्थ अजूनही समाधीमग्नच होते.) मग आपण आता उपवास करून समर्थांपुढे स्तवन करण्यास बसावे असा विचार ते गांवकरी लोक करू लागले.।।४८।। असा जो ते विचार करतच होते,तोंच श्रीसद्‌गुरुमूर्ति, योग्यांचे मुगुटमणी गजानन महाराज समाधीतून बाहेर आले.।।४९।। मग काय विचारतां ? सर्वांनाच अतिशय आनंद झाला.प्रत्येक स्त्रीपुरुष स्वामींच्या चरणांवर माथा ठेऊ लागले.।।५०।। ज्यानें त्यानें अन्नाची पात्रें वाढून आणली व मारुतीच्या मंदिरांत श्रींच्या नेवैद्याची धूम-गडबड सुरु झाली.।।५१।। श्री समर्थांनी त्या अवघ्या नेवैद्याचा थोडाफार स्वीकार केला.गांवातील गल्लोगल्लीत हे वृत्त सहजच श्रुत झाले.।।५२।। पुढें दुसर्‍या मंगळवारीं पिंपळगांवचे काही गांवकरी नेहेमीप्रमाणेच शेगांवी बाजारासाठी आले.।।५३।। आमच्याही पिंपळगावी एक सिद्धपुरुष अवलिया आले आहेत असे त्यांनी सहजच भाविकतेने शेगांवच्या लोकांस सांगितले.।।५४।। ते अवलिया एक थोर अधिकारी पुरुष असून प्रत्यक्ष श्रीहरीच आहेत. आमची पिंपळगांव नगरी त्या साधू पुरुषाचे पाय लागल्याने धन्य झाली आहे.।।५५।। आम्ही खरोखर त्या योगीश्वरांला कोठेही जाऊ देणार नाही. आपल्यां घरी (दैवयोगाने)अमुल्य ठेवा चालून आला तर त्यास कधी कुणी सोडतं का ?।।५६।। जिकडे तिकडे शेगांवच्या बाजारांत हीच वार्ता पसरली. बंकटलालासही तें अवलियाचें वर्तमान कळले.।।५७।। (ते ऐकून लगेचच)बंकटलाल पत्‍नीसहित पिंपळगांवी गेला. श्री समर्थांस हात जोडुन पुन्हा पुन्हा विनवूं लागला.।।५८।। आपण लगेचच येतो असे म्हणुन घरांतून निघून गेलात.त्यासही आतां पंधरा दिवस उलटून गेले. महाराज,तुम्ही हे कृपा करून लक्षात घ्या हो.।।५९।। गुरुराया, तुमच्याशिवाय माझे सदन उदास दिसते. शेगांवचे अवघे जनदेखील चिंतातुर झाले आहेत.।।६०।। मी आपणांसाठीं गाडी आणली आहें. हे ज्ञानजेठी आपण कृपा करून शेगांवीं चला. माय-लेकरांची अशी ताटातुट होणे हे कांही बरे नाही.।।६१।। हे दयाळा,त्या शेगांव शहरांत आपले नित्य दर्शन घेणारे कित्येक भक्त उपोषित राहिले असतील.।।६२।। तुम्ही शेगांवीं आला नाहीत तर मी ह्या तनुचा खरोखर त्याग करेन.हे गुरुवर्या,आमचा हा हट्ट कोण तुमच्याशिवाय पुरवणार बरे?।।६३।। बंकटलाल असे बोलल्यावर महाराज गाडीत बसले व पिंपळगांव सोडुन शेगांवी जाण्यास निघाले.।।६४।। जसा पूर्वी गोकुळातून श्रीकृष्णाला घेऊन जाण्यासाठी अक्रूर आला होता, तसाच बंकटलालही समस्त पिंपळगावातील लोकांस अक्रूर भासला.।।६५।। पिंपळगांवच्या लोकांस बंकटलाल समजावू लागला,' तुम्ही मनांत दु:ख्खी होऊ नका.साधू महाराज कोठेही लांब जात नाही आहेत.।।६६।। तुम्ही हवे तेव्हा दर्शनांस येऊन आपल्या मनीषा पूर्ण करां.मात्र या अमोल मूर्तीला तिच्या मूळ स्थानीच असू द्यावे.।।६७।। पिंपळगांवातील बहुतेकांचा बंकटलाल हाच सावकार होता,त्यांमुळे त्याच्या बोलण्याच्या विरोधात जाण्याची कुळांची हिम्मत नव्हती.।।६८।। चुरमुर्‍याचे लाडू खात अवघे पिंपळगांव स्वस्थ राहिले. गाडींत बसून महाराज शेगांवास जाण्यास निघाले.।।६९।। शेगांवच्या रस्त्यास लागल्यावर श्री गुरुमूर्ति बंकटलालास विचारू लागली, दुसर्‍याचा माल बळजबरीने न्यायचा हीच का सावकाराची रीत आहे?।।७०।। तुझ्या घरीं येण्यास मनातून मला खूप भय वाटतें.तुझ्या घराची रीत काही बरी नाही, हे मी पाहतो आहे.।।७१।। प्रत्यक्ष लोकमाता श्री लक्ष्मी जी महाविष्णूंची पत्नी आहें, जिची अगाध सत्ता (ह्या विश्वावर) आहें. तिलाही तू कोंडून ठेवले आहेस.।।७२।। तिथे माझा पाड कसा लागणार ? असा विचार करून मी पळुन गेलो. श्री जगदंबेचे हाल पाहून माझें चित्त भयभीत झाले.।।७३।। (समर्थांचे) असे बोलणे ऐकून बंकटलालास हसूं आले. त्यावर त्याने अतिशय विनम्रतेने काय उत्तर दिले ते तुम्ही शांत चित्ताने ऐका.।।७४।। बंकट बोलू लागला, हे गुरुनाथा, माझ्या कुलूपास जगन्माता घाबरली नसून,केवळ आपला तिथे वास होता म्हणूच ती (माझ्या घरी) स्थिर झाली.।।७५।। जिथे बाळ असते, तिथेच आई रहाते.तेव्हा इतरांची पर्वा कशाला ?आपल्या चरणसेवेपेक्षा जास्त मला धनाचे काही महत्व नाही.।।७६।। खरें तर तेंच माझें श्रेष्ठ धन आहे,म्हणूनच मी इथे आलो. माझें घरदेखील आता माझें नसून ते सर्वस्वीं आपलेच आहे.।।७७।। घरमालकाला कधी शिपाई अडवतो का ? जशी तुमच्या मनीं इच्छा होईल, तसेच तुम्ही वागावें.।।८०।। माझी आपणांस इतकीच विनंती आहें की तुम्ही केवळ शेगांवीं वास्तव्य करावे.गाय जशी वनांत (चरावयास) जाते,तरीही पुन्हा आपल्या घरीच येते.।।७९।। तुम्हींही तसेच करावे(ही प्रार्थना).अवघ्या जगांस उद्धरावें, परंतु आम्हांस विसरू नका व आपण शेगांवी वरचेवर यावे.।।८०।। अशा रीतीने समजूत घालून श्री गजानन महाराजांस शेगांवात परत आणले. तिथे काही दिवस राहून महाराज पुन्हा निघून गेले.।।८१।। ती कथा मी आतां इथे सांगतो,ती तुम्ही ऐकावी.श्रोतेहो, त्या वर्‍हाड प्रांतीं अडगांव नावाचे एक गांव होते.।।८२।। प्रातःकाळीं दयाघन अवघ्या शेगांवकरांची नजर चुकवून त्या गावांस जाण्यास निघाले.।।८३।। महाराजांची चालण्याची गती वायूसमान होती.(तो वेग पाहून)अंजनीपुत्र मारूतीच जणु आला आहे,असे वाटे.।।८४।। तो वैशाख महिना होता. सूर्य आपल्या सोळा कलांनी तप्त झाला होता. क्वचित, कुठेतरी पाणी (जलाशयांत शिल्लक)राहिले होते, असा प्रखर उन्हाळा होता.।।८५।। अशा त्या माध्यान्ही हे योगयोगेश्वर साधू गजानन महाराज अकोली गांवी आले.।।८६।। त्यावेळी काय घडले, ह्याची कथा (श्रोतेहो) तुम्ही ऐका.समर्थांना तहान लागली होती,चारही दिशांना शोधूनही त्यांना तेव्हा पाणी कुठेही दिसले नाही.।।८७।। अंगातून घामाच्या धारां वारंवार वाहू लागल्या होत्या.पाण्यावाचून समर्थांचे ओठही सुकून गेले होते.।।८८।। अशा त्या दुपारी, भास्कर नावाचा शेतकरी आपल्या शेतांत (नांगरट करून) पाळी करत होता.।।८९।। खरे पाहतां शेतकरी हे सर्वांत मुख्य आहेत. कारण कृषीवल हे निश्चितच या जगाचे अन्नदाता आहेत.।।९०।। असे मोठेंपण अंगी असूनही अत्यंत दारुण यातना ते सहन करतात. बिचार्‍यांना कडक ऊन्हातान्हांत तहान-भूक विसरून काम करावे लागते.।।९१।। त्यावेळी त्या अकोली गावांच्या परिसरात जलाचे अत्यंत दुर्भिक्ष्य होते.एक वेळ तूप मिळणे सहज शक्य होते,परंतु पाण्याचा मात्र अभावच होता.।।९२।। भास्करानें शेतांत येतांना स्वत:साठी गांवांतून मातीच्या घागरीतून पाणी आणले होते.।।९३।। खाण्यासाठी भाकरीची शिदोरी अन डोक्यावर पाण्याची घागर घेऊन तो नेहमी शेतांत येत असे.।।९४।। भास्करानें ती घागर एका झाडाखाली ठेवली होती. त्या ठिकाणीं समर्थांची स्वारी आली आणि भास्करास पाणी मागू लागली.।।९५।। समर्थ भास्कराला म्हणाले,"अरे,मला खूप तहान लागली आहे. तेव्हां मला पिण्यास तू पाणी दे. मला नाही असे तू म्हणू नकोसं.।।९६।। बाबां रे ,पाणी पाजण्याचें पुण्य अतिशय श्रेष्ठ आहे.(कारण) पाण्यावांचून प्राणाचें रक्षण होणें अशक्य आहें.।।९७।। मुख्या रस्त्यांवर धनिक लोकं पाणपोया उभारतात.ह्याचे कारण नक्की काय असावे असा तू विचार करून बघ म्हणजे तुला त्याचे महत्व कळून येईल."।।९८।। भास्कर त्यांवर उत्तरला,"तू तर एक धडधाकट नंगा धूत दिगंबर आहेस.तुला पाणी दिले तर कसला पुण्यलाभ होणार?।।९९।। अनाथ-पंगू-दुबळ्यां लोकांसाठीं जर काही केले तर ह्या पुण्याच्या गोष्टीं शोभतात अथवा जो समाजहितासाठीं झटतों त्यांस साह्य करावे.।।१००।। असे शास्त्राचें वचन आहें. तुझ्यासारख्या रिकामटेकड्यास (कांहीही काम न करणाऱ्यांस ) जर आम्ही पाणी पाजले तर तें उलटें पापच होय.।।१०१।। केवळ भूतदयेच्या तत्वांसाठी कधी कोण सर्प पाळतो का ? अथवा एखाद्या चोराला आपल्या घरांत कोणी जागा देतो काय?।।१०२।। घरोघरी भीक मागून तूं हे तुझे शरीर पुष्ट केलेंस. आपल्या वर्तनाने तू खरोखर धरणीस भार झाला आहेस.।।१०३।। ही पाण्याची घागर सकाळीं मीं माझ्यासाठीं डोक्यावरून वाहून आणली आहे.त्या आयत्या पिठावर तू रेघोटया तूं ओढूं नकोस.।।१०४।। तू कितीही विनवणी केलींस तरी मी काही तुला पाणी कांही देणार नाही. तेव्हा अरे चांडाळा,तू येथून आपलें काळें (तोंड घेऊन) चल चालू लाग.।।१०५।। तुझ्यासारखे निरुद्योगी आमच्यांत जागोजागी जन्मले आहेत,म्हणूनच आम्ही चारही खंडात अभागी झालों आहोत."।।१०६।। भास्कराचें ते बोलणे ऐकून समर्थ थोडेसे हसले अन तिथून निघून गेले.।।१०७।। थोडया दूर अंतरावर तिथे एक विहीर होती. स्वामीरायांनीं अखेर तिकडे धाव घेतली.।।१०८।। स्वामी तिकडे जाऊं लागतांच भास्कर मोठ्याने त्यांना बोलला,"अरे वेड्या, उगाचच तिकडे कशाला जातोस ?।।१०९।। ती विहीर कोरडी व ठणठणीत आहें.अरे मूर्खा,ह्या अवघ्या एक कोसांत पाणी कुठेच नाही,हेच सत्य आहे."।।११०।। त्यावर समर्थ बोलले,' तुझे बोलणे सत्य आहें,जरी त्या विहिरींत पाणी नाहीं तरी मी प्रयत्न करतो.।।१११।। तुझ्यासारखे बुद्धिमान लोक पाण्यासाठी जर हैराण झालें असतील आणि ते मी डोळ्यांनी पाहूनसुद्धा जर स्वस्थ बसलो तर समाजहितासाठीं मी काय चांगल्या गोष्टी केल्या हे सांग बरे ? आपला हेतू शुद्ध असल्यावर तो जगत्स्वामी परमेश्वर नक्की सहाय्य करतो.'।।११२-११३।। समर्थ विहिरीपाशीं आले, पण त्या विहिरीत एक थेंबभरसुद्धा पाणी नव्हते.तें हताश होऊन एका झाडाजवळ असलेल्या दगडावर बसले.।।११४।। त्यांनी डोळे मिटून ध्यान केले आणि मनांत नारायण म्हणजेच जो सच्चिदानंद, दयाघन, दीनांचा उद्धार करणारा जगद्‌गुरु आहे त्याचे स्मरण करू लागले.।।११५।। समर्थ म्हणाले,हे परमेश्वरा, हे वामना, वासुदेवा, प्रद्युम्ना, राघवा व हे विठ्ठला, नरहरी, देवा ही अवघी आकोली पाण्यावांचून त्रस्त झाली आहे. देवा अरे,विहिरींतूनदेखील कुठेही ओल राहिलेली नाही.।।११६-११७।। अवघे मानवी प्रयत्न हरले आहेत.म्हणुन हे जगन्माउले तुला मी या विहिरीस पाणी द्यावे अशी प्रार्थना करतो.।।११८।। तुझी करणी अघटीत आहे. जे घडण्यास अशक्य आहें, ते ही तुझ्या कृपेने घडते हे सत्य आहे. पांडुरंगा ! तूं जळत्या वणव्यांत मांजरांचे रक्षण केले आहेस.।।११९।। तुझा भक्त प्रल्हाद याचे बोलणे खरे करण्यासाठी हे जगदोद्धारा, तू खांबात प्रगट झालास.तू गोकुळांत असतांना बारा गांव जाळणाऱ्या अग्नीस गिळले होते.।।१२०।। तसेच हे मुरारी,तू तुझ्या करांगुलीच्या नखावर (गोवर्धन)पर्वत उचललास.ह्या तिन्ही जगतात तुझ्या कृपेची सर कोणालाही येत नाही.।।१२१।। ठाणेदार दामाजीपंत यांच्यासाठी तू महार झालास.तर चोख्यासाठीं तू गुरे ओढलीस,त्या माळ्याच्या पाखरांचे रक्षण केलेस.।।१२२।। भक्त उपमन्यूसाठीं तू विशाल असा क्षीरसमुद्रही दिलास.नामदेवाला जेव्हा मारवाड प्रांती तहान लागली,तेव्हाही तू चमत्कार केलास.त्या निर्जल अशा विहिरीस तू केवळ नाम्यासाठीं सजल केलेस, हे लक्षात घे.।।१२३-१२४।। अशी परमेश्वरांस विनवणी केल्यावर विहिरीस अत्यंत वेगवान प्रवाहशाली असा झरा फुटला व विहीर क्षणांतच भरली गेली.।।१२५।। जगन्नाथाचे कृपासहाय्य झाल्यावर काय होत नाही बरे? ईश्वरी सत्ता अगाध असते,जे घडण्यास अशक्य असते तेच सहज घडवते.।।१२६।। श्री समर्थांनी ते जल प्राशन केले, तें भास्करानें पाहिलें.त्याचें चित्त गोंधळून गेले.त्याचा काहीच तर्क चालेनासा झाला.।।१२७।। बारा वर्षे तर या विहिरीस काहीच पाणी नव्हते, तिलाच एका घटकेत यानें जलमय केले खरे!।।१२८।। यावरुन हा कोणीतरी, खरोखरच साक्षात्कारी आहे, मात्र मुद्दामून एखाद्या वेड्यासारखा फिरतो हें आतां कळून चुकले.।।१२९।। भास्कर शेतीचें काम सोडून धावतच आला. समर्थांचे चरण त्याने घट्ट पकडले व तोंडाने स्तोत्र पठण आरंभिले.।।१३०।। हे नरदेहधारी परमेश्वरा, दयासागरा या लेकरावर कृपा करा. मी तुमचेच अर्भक आहे.।।१३१।। तुमचे श्रेष्ठत्व न जाणतां मी तुम्हांला टाकून बोललो, याचा मला आतां पश्चात्ताप होतो आहे. तरी तुम्ही त्यासाठी मला क्षमा करा हो.।।१३२।। गवळणी जरी टाकून बोलल्या तरी चक्रपाणी कधी त्यांच्यावर रागावला नाही.हे दयाळा, तुझ्या ह्या बाह्य वेषांमुळे मी फ़सलो.।।१३३।। हा चमत्कार दाखवून तूंच त्याचें निरसनदेखील केलेस.हे भगवंता, तुझे देवपण कृतीनेंच खरोखर कळलें.।।१३४।। तसाच तुझा अधिकारदेखील किती थोर आहे ते मला या जलाच्या कृतीनें नक्कीच कळले आहें.।।१३५।। आतां काहीही झाले तरी हें सद्‌गुरुनाथा मी काही तुम्हाला सोडणार नाही. एकदा आई भेटल्यावर लेंकरानें (तिला सोडुन)इतर कुठेही राहू नयें हेच खरे नाही का?।।१३६।। ही प्रपंच माया खोटी आहे हे आज मला कळून आले. आतां या दीन अर्भकास परत दूर करू नका.।।१३७।। भास्करास श्रीसमर्थ म्हणाले,'असा तू तुझ्या मनी दुःखित होऊ नकोस.आतां गांवांतून पाण्याची घागर तू डोक्यावर वाहून आणु नकोस.।।१३८।। तुझ्यासाठीं हें पाणी मी विहिरींत निर्माण केले.आतां तुला कसलीच उणीव उरली नाही.मग तू हा प्रपंच का बरे त्यागतो आहेस? ।।१३९।। हे जल तुझ्याकरितां आलें आहे, आतां तू हा बगीचा फ़ुलव.' त्यावर भास्कर उत्तरला,'हे आमीष तुम्ही मला दाखवू नका.।।१४०।। माझी निश्चयरूपी ही विहीर अगदी कोरडी ठणठणीत होती. दयाळा, आजवर त्यांत एकही पाण्याचा थेंब नव्हता.।।१४१।। ती विहीर फोडण्यासाठी तुम्हीच तर हा प्रयत्‍न केला.हा खडक फोडण्यासाठी साक्षात्काररूपी सुरुंग जणू लावला.।।१४२।। त्यामुळेच तर हा खडक फुटला आणि भावारूपी उदक (ह्या विहिरीस )लागलें. आतां मी निःशंकपणे भक्तिपंथाचा मळा फुलवीन.।।१४३।। हे माझे आई,तुझ्या कृपेंमुळेच ह्या वर्तनरूपी मातीत सन्नीतीची फळझाडें लावीन.।।१४४।। मी जिकडे तिकडे सत्कर्माचीं फुलझाडें लावीन.आतां ह्या क्षणिक बैलवाडे यांचा संबंध नको.'।।१४५।। श्रोतेहो, पहा बरे, अगदी क्षणभरच संतसंगति भास्करांस घडतांच त्याला किती उपरती झाली.याचा तुम्ही जरूर विचार करा हो.।।१४६।। निश्चितच खर्‍या संताचें दर्शन हे सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ असते. श्री तुकाराम महाराजांनी "संतचरणरजा" चे एका अभंगात वर्णन केलें आहें.।।१४७।। तो अभंग पहावा अन मनांत विचार करावा आणि स्वतःच्या हितासाठीं त्याचा अनुभव घ्यावा.।।१४८।। विहिरीस पाणी लागलें ही वार्ता आसपास पसरल्यावर अवघें लोकं स्वामींच्या दर्शनास धावतच येऊ लागले.।।१४९।। ज्याप्रमाणें मधाचा सुगावा लागतांच मधमाश्या धाव घेतात वा साखरेचा रवा पाहून मुंग्या धांवून येतांत.।।१५०।। त्याचप्रमाणे श्रोतेहो,तिथे अपार जनसमूह जमला अन त्यांनी त्यावेळी विहिरीचें पाणी पिऊन पाहिलें.।।१५१।। तें जल अतिशय निर्मळ,शीत अन मधुर होतें. जणू काही अमृताहूनही गोड असे ते पाणी होते. सारे लोक श्री गजानन महाराजांचा जयजयकार करुं लागले.।।१५२।। असो. पुढें अडगांवास परत ना जातां भास्कारांस बरोबर घेऊन सिद्धयोगी श्रीगजानन महाराज शेगांवी आले.।।१५३।। स्वस्ति श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नामें ग्रंथ संतमहिमा जाणून घेण्यासाठी अवघ्या जगांस आदर्शभूत होवो.।।१५४।।शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥


No comments:

Post a Comment