Sep 15, 2021

श्री सत्यदत्त व्रत आख्यान - अध्याय ३ आणि अध्याय ४


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः ॥


अध्याय ३ ॥ श्रीदत्त ॥ शौनकादि ऋषी म्हणाले, " हे सूत मुनिवर्य, आपण अत्यंत बुद्धिमान् असून पौराणिकांमध्ये श्रेष्‍ठ आहात, तरी श्रीसत्यदत्ताचे माहात्म्य आम्हाला आणखी सांगा. कारण ते श्रवण करण्याची इच्छा आम्हांस झाली आहे."॥१॥ ते ऐकून सूत म्हणाले, " चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान, दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट राजा होता. पण त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखी होता.॥२॥ मुनींनी सांगितलेले दत्तात्रेयांचे माहात्म्य श्रवण करुन अत्यंत विश्वासाने, नम्रतापूर्वक तो शौनक गुरुवर्यांना पुत्रप्राप्तीसाठी शरण गेला.॥३॥ तेव्हा त्यास शौनक म्हणाले, " हे राजेंद्रा, श्रीसत्यदत्तांचे व्रत यथाविधी कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुला सुपुत्र निश्चित प्राप्त होईल."॥४॥ असे सद्गुरुंचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्रचित्त होऊन, यथाविधी श्रीसत्यदत्तांचे व्रत करिता झाला आणि मोठया भक्तीने पत्नी व बंधुजन यांच्यासह प्रसाद सेवन करीता झाला.॥५॥ नंतर त्याच्या राणीस, महापुरुषांच्या लक्षणांनी संपन्न असा एक तेजस्वी पुरुष येऊन, त्याने आपणास मोठे पाणीदार मोती दिले व दूध भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला, असे स्वप्न पडले. ते स्वप्न तिने राजास कथन केले.॥६-७॥ राजाही प्रातःकालीन स्नानदानादि क्रियांनी शुद्ध होऊन, ते स्वप्न शौनकमुनींस सांगता झाला. ते ऐकून शौनकमुनी म्हणाले, " अनुसूयेच्या गर्भातील रत्न असणार्‍या श्रीदत्तात्रेय प्रभूंनी हे फल अर्पण केले आहे. धर्मात्मा, विष्णुभक्त, उत्तम अशा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल, हे या स्वप्नाने सूचित केले आहे, याविषयी काहीच शंका नाही."॥८-९॥ याच वेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणीसह नंदवनामध्ये गेली होती. तेथे काही चारण परस्परांमध्ये बोलत होते, " आयुराजास होणारा पुत्र हुंडासुराचा नाश करील." असे त्यांचे भाषण त्या मुलीने ऐकले आणि तात्काळ नगरांत परत येऊन तिने ते वृत्त आपला पिता, हुंडासुरास कथन केले.॥१०-११॥ दुरात्मा दुष्‍ट दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखरच हा माझा शत्रू आहे. याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे.॥१२॥ असा निश्चय करुन तो राक्षस, इंदुमती राणीस दुष्‍ट-वाईट स्वप्ने दाखविता झाला. तथापि श्रीदत्तांनी रक्षण केलेला इंदुमतीचा तो भाग्यवान् गर्भ नाश पावला नाही.॥१३॥इतकेच नव्हे, तर दिवसेंदिवस तो वृद्धिंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर, शुभ काली, रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे पांचही ग्रह उच्चस्थानी असून अस्तंगत नसताना, महाभाग्यवान् अशा पुत्रास इंदुमती प्रसविती झाली.॥१४॥ त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंदित झाली. आयुराजानेही पुत्रजन्माची वार्ता श्रवण करुन, प्रेमाने पुत्राचा जातकर्मसंस्कार केले व अनेक प्रकारची दाने दिली. इतक्यात, कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली.॥१५-१६॥ मायावी हुंडासुराने त्या दासीच्या अंगात प्रवेश केला आणि बालकाला तेथून नेण्याची इच्छा करणार्‍या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी या हेतूने मंत्र विद्येचा जप केला.॥१७॥ त्यामुळे राणीसह सर्व मोहित होऊन झोपले असता, हंडासुर दैत्य आपल्या खर्‍या रुपाने प्रकट होऊन त्या बालकाचे अपहरण करिता झाला.॥१८॥ त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीला बोलाविले व तिच्या स्वाधीन ते बालक करुन दैत्य म्हणाला,॥१९॥ " हे प्रिये, तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारुन व त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरिता मला दे."॥२०॥" बरे आहे", असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणा‍र्‍या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणाने अशी आज्ञा केली, " कोणताही विचार न करता या बालकाला मारुन व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्यराजास खाण्यास दे." असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्य स्त्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीनेही ते बालक मारुन शिजविण्यासाठी आचार्‍याच्या हाती दिले.॥२१-२२॥ हुंडासुराची स्त्री, विश्वासाने बालकाला मारण्यासाठी दासीजवळ देऊन दुसर्‍या कामाकरिता निघून गेली. तेथे फक्त ती दासी राहिली.॥२३॥ नंतर त्या निर्दय आचार्‍याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्याकरिता त्याच्यावर शस्त्रप्रहार केला, पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही.॥२४॥ उलट, श्रीदत्तांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आचार्‍याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षितच राहिले. ते पाहून या बालकाच्या सुदैवाने, ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली.॥२५॥ आणि ती त्या आचार्‍यास म्हणाली, "हे बुद्धिमाना, तू या बालकाला मारु नकोस." त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे त्या बालकासह नगराबाहेर गेले आणि वसिष्‍ठऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्‍याने एका मृग शिशूला मारुन, ते मांस शिजवून दैत्यराजास विश्वासपूर्वक दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासुर मोठया आनंदाने मांस खाऊन स्वतःस कृतकृत्य समजता झाला. त्यानंतर प्रभातकाळी, ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्‍ठ असे वसिष्ठऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहतात, तो त्यांना एक दिव्य बालक एकटेच तेथे निजलेले दिसले. तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन बोलू लागले.॥२६-२७-२८-२९-३०॥ " ऋषीहो, हे कोणाचे सुंदर बालक, रात्री येथे कोणी आणून ठेवले ते समजत नाही."॥३१॥ ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञ योगी वसिष्‍ठऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले,॥३२॥" हा सोमवंशातील आयुराजापासून दत्तसेवेचे फल म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्रीदत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने, हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे.॥३३॥ हुंडासुराने, हा आपला नाश करणारा आहे असे जाणून सूतिकागृहातून याचा अपहार केला. पण दैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे." याप्रमाणे बोलून महान् तत्त्वज्ञानी वसिष्‍ठ ऋषीही त्या दिव्य बालकाला पाहून ईशमायेने मोहित झाले.॥३४॥ आणि मोठया दयेने दोन्ही हातांत त्या बालकाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले. आणि म्हणाले, " श्रीदत्तप्रसादामुळे देवांना व मनुष्यांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करुन विजयी असा हा सम्राट राजा होईल." या प्रमाणे वसिष्‍ठऋषी बोलत असता देव पुष्पवृष्‍टी करते झाले.॥३५-३६॥ अप्सरा नृत्य करू लागल्या व गंधर्व सुस्वर गायन करू लागले. त्यावेळी आश्रमातील ऋषीही संतुष्‍ट होऊन कुमाराला आशीर्वाद देते झाले.॥३७॥ "हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न होवो.", असा आशीर्वाद ऋषींनी कुमाराला दिला. नंतर वसिष्‍ठ ऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला.॥३८॥ "बालभावांनी ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतःकरण दूषित झाले नाही त्याअर्थी, हे देववंदिता, तू नहुष या नावाने प्रसिद्ध होशील. तुझे कल्याण असो."॥३९॥ महासती अरुंधतीही वात्सल्यामुळे त्याचे लालनपालन करुन, औरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करती झाली.॥४०॥ नहुषाला अकरावे वर्ष लागले असता, वसिष्ठांनी क्षत्रियाला उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन करुन त्याला वेद,वेदांग, शास्त्रें यथार्थ शिकविली.॥४१॥ सरहस्य धनुर्वेद, विशेषतः सविधान अस्त्रविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण या सर्वांचे अध्ययन त्याच्याकडून करविते झाले.॥४२॥ याप्रमाणे विद्याग्रहण करीत असताना, यथाविधी शिष्यत्व स्वीकारुन तो नहुष मन, वाणी, शरीरादिकांनी सद्गुरु वसिष्‍ठ ऋषींचे सेवन भक्तिपूर्वक करिता झाला.॥४३॥ या प्रमाणे निर्मत्सर व सर्वगुणांनी पूर्ण असा नहुष, वसिष्‍ठ ऋषींच्या प्रसादाने सर्व विद्यापारंगत झाला.॥४४॥ श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा तिसरा अध्याय आहे. ॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोध्यायः ॥३॥

**************************************************************

अध्याय ४ ॥ श्रीदत्त ॥ सूत पुढें म्हणाले, " आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर, अशी जे एकदाच प्रार्थना करतात, त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची, नित्य चिंतन करणार्‍या भक्तांविषयी उपेक्षाबुद्धी कशी असेल ?॥१॥ इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता, प्रातःकाल झाल्यावर, प्रस्वापिनी विद्येमुळे झोपी गेलेले सर्व लोक जागे झाले.॥२॥ राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली व चोहीकडे पाहते तो आपले बालक दिसत नाही, कोणी नेले तेही कळत नाही, यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाःकारपूर्वक विलाप करती झाली.॥३॥ " माझा सर्व लक्षणांनी युक्त, देवपुत्राप्रमाणे असणारा, श्रीदत्तांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र येथून कुणी कसा बरे नेला व कशासाठी नेला ?॥४॥ हाय हाय ! हे पुत्रा, हे बाळा गुणनिधाना, तू कोठे आहेस ?" याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मृतवत् मूर्च्छित पडली.॥५॥ आयु राजाही ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सूतिकागृहामध्ये आला आणि मूर्च्छित झालेल्या राणीस त्याने पाहिले. त्यामुळे अतिशय विव्हळ व दीन होऊन विलाप करीत म्हणाला, " श्रीदत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अक्षय्य असते, असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान् असा पुत्रही झाला. पण एकाएकी हे संकट कसे आले, ते मला समजत नाही."॥६-७॥ दुःखातिरेकाने मोहित होऊन आयुराजा पुढे बोलू लागला, " या लोकांत धर्माचरणाचे फळ काहीच नाही. तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला श्रीदत्तप्रभो, या आर्तभक्ताचे आपण रक्षण करावे."॥८॥ यानंतर श्रीदत्तांनी प्रेरित असे दिव्यदर्शन नारदमुनी त्या ठिकाणी आले. श्रीहरिभक्त नारद मुनी आलेले पाहून, आयुराजा त्यांना सामोरा गेला व त्यांचे यथाविधी पूजन करुन आपले दुःख निवेदन केले.॥९॥ ते ऐकून नारदमुनी म्हणाले, "राजा, नाशिवंत पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार ? तसेच हे नश्वर गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार ? नित्य प्रकाशमान् आनंदरुप श्रीदत्तपरमात्मा तुझ्या हृदयांतच आहेत. त्यांनाच तू शरण जा.॥१०॥ ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस, तो तुझा पुत्र हुंडासुराने मारण्याकरिता उचलून नेला असताही, दैवयोगाने एका श्रेष्‍ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे.॥११॥ धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा नाश करील व पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून, मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल."॥१२॥ असे सांगून नारदमुनी निघून गेले असता, ते वृत्त राजाने राणीस कथन केले. " हे प्रिये, देवऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्रीदत्तप्रभूंचा वरही सत्यच आहे.॥१३॥ श्रीदत्तांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल ? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे." याप्रमाणे देवर्षी नारदमुनींवर विश्वास असल्यामुळे, श्रीदत्तांचे माहात्म्य स्मरण करुन व श्रीसत्यदत्तांचे पूजन करुन ते राजाराणी सुखाने राहू लागले. त्या व्रताच्याप्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्‍ठ वसिष्‍ठ ऋषी, एके दिवशी असे नहुषाला बोलावून म्हणाले,॥१४-१५॥ " हे नहुषा, तू आयुराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने, तुलाच मारुन टाकावे म्हणून हुंडासुराने सूतिकागृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरिता आचार्‍याजवळ दिले. पण सुदैवाने त्या आचार्‍यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेविले.॥१६-१७॥ हे चंद्रवंशास भूषण असणार्‍या वत्सा, तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्त्र पशूंचा नाश करण्यासाठी मृगया कर आणि हे आयुष्मन् महाबाहो, धनुर्विद्यानिष्णात अशा नहुषा, श्रीदत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू सत्वर जाऊन हुंडासुराचा नाश कर.॥१८-१९॥ ब्राह्मण, पितर, देव, स्वर्ग,पृथ्वी व पूषा हे सर्व संकटांपासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासुर निष्प्रभ होवो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त होवो. "॥२०॥ असे सांगून सद्गुरुंनी त्याला युद्धाकरिता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुष भक्तीने आपल्या गुरुवर्यांस नमस्कार करुन व श्रीदत्तांचे स्मरण करुन म्हणाला,॥२१॥ " ज्यांनी गर्भाधानापासून आजपर्यंत वात्सल्यानें माझे रक्षण केले, ते अत्रिनंदन दत्तात्रेय युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो."॥२२॥याप्रमाणे बोलून तो नहुष, हुंडासुराला मारण्यासाठी निघाला. त्यावेळी देव पुष्पवृष्‍टी करु लागले व सर्व ऋषींनी आशीर्वाद दिला.॥२३॥ त्या वेळी इंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी मातली, नहुषाजवळ रथासह येऊन म्हणाला, " मला देवेंद्राने तुला सहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे. म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून तू हुंडासुराचा नाश कर." ते ऐकून नहुष आनंदित होऊन व नमस्कार करुन रथामध्ये बसला.॥२४-२५॥ वेदोक्तमंत्रांनी सन्नद्ध होऊन (चिलखत घालून) तो महिषासुराला मारण्यासाठी निघाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या सहाय्यासाठी देवसैनिक आले.॥२६॥ नहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकला शब्द ऐकून, भयभीत झालेला हुंडासुर म्हणाला,॥२७॥ "हे दुता, जा, हा मोठा कोलाहल कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये." दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि प्रयत्नपूर्वक काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास म्हणाला, " आयुराजाचा मोठा शूर व अजिंक्य असा पुत्र नहुष, इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता आलेला आहे." हे ऐकून क्रुद्ध झालेला हुंडासुराने पत्नी, दासी व आचारी यांना हाक मारुन पुनः पुनः विचारले, "अरे, तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा." तेव्हा ते म्हणाले, "त्याच वेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले.॥२८-२९-३०॥ खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून, ज्याची आज्ञा अत्यंत उग्र व कठोर आहे, असा तो हुंडासुर दैत्यांना म्हणाला, " तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिऊन राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारीन."॥३१॥ याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करुन तो हुंडासुर, चिलखत घालून दैत्यसेनेसह नहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला तो हुंडासुर गर्जना करीत नहुषासमोर येऊन त्याला म्हणाला,॥३२॥ "अरे मनुष्यपुत्रा, उगीच गर्जना करु नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासुर आहे. तू माझ्यापुढे युद्धाकरिता उभा राहशील, तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस."॥३३॥ ते ऐकून नहुष म्हणाला, " चंद्रवंशांत उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील, तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा ?॥३४॥ प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस. पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षांत ठेव. भगवान् श्रीदत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील ?"॥३५॥ असे कठोर बोलून, धनुष्य आकर्ण ओढून, त्यावर बाण लावून, सैन्यासह ते परस्परांशी युद्ध करु लागले.॥३६ ॥ अहोरात्र ते तुमुल (तुंबळ) युद्ध चालले होते. त्यात पुष्कळच हत्ती-घोडे घायाळ झाले. काही मृत झाले. काहींचे रथही भग्न झाले.॥३७॥ मांसरुपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी आपल्या गुरूंना प्रणाम करुन व अत्रिनंदन श्रीदत्तात्रेयांचे स्मरण करुन नहुषाने वासवी,ऐंद्री शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगाने तो छिन्नभिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोकसुंदरी, त्या विजयी नहुषाकडे येऊन म्हणाली, "हे नहुषा, तुझी मी धर्मपत्नी आहे म्हणून माझ्याबरोबर तू विवाह कर." हे ऐकून नहुष म्हणाला, " माझ्या गुरुवर्यांच्या अनुमतीने त्यांच्यासमोरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे जर तुला मान्य असेल तर पाहा."॥३८-३९-४०॥ "बरे आहे, "असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये ती व रंभा बसली. नहुषाने वसिष्‍ठऋषींकडे येऊन त्यांना नमस्कार केला व सर्व वृत्त कथन केले.॥४१॥ ते ऐकून आनंदित झालेल्या वसिष्‍ठमहर्षींनी, सुलग्नसमयी अशोकसुंदरी व नहुष यांचा विवाह लावला आणि नंतर मातापितरांना भेटण्यासाठी नहुषाला पत्नीसह पाठविले.॥४२॥ वसिष्‍ठ-ऋषींना नमस्कार करुन, प्रभेसह निघणार्‍या सूर्याप्रमाणे, आपल्या भार्येसह रथारुढ झालेला नहुष मातापितरांच्याकडे आला आणि सांत्वनपूर्वक त्यांचा शोक नाहीसा करता झाला.॥४३॥ नंतर त्याने रथासह मातलि व रंभा यांना स्वर्गांत परत पाठविले. श्रीदत्तात्रेयांचा वर व सद्गुरुवाक्य यांची आयुराजा आणि इंदुमती राणी यांना आठवण होऊन, तसेच रती व मदनाप्रमाणे असणार्‍या आपल्या सुनेला व मुलाला पाहून आनंद झाला. आयुराजाने नंतर त्या नहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला.॥४४-४५॥ त्या पित्यापासून प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण नहुषानेही उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले व इहलोकी उत्तम सुख भोगून, त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेतला. तसेच आयुराजानेही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारुन पत्नीसह वनामध्येच वास्तव्य केले.॥४६॥ नित्य अत्रितनय श्रीदत्तप्रभूंच्या ध्यानप्रभावाने अक्षय्य अशा सायुज्य मुक्तिप्रत गेला. अर्थार्थी भक्त आयुराजा श्रीदत्तात्रेयांची सेवा करुन, ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन, क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही, इतकेच नव्हे, तर उत्तरोत्तर त्याचे कल्याणच होते.॥४७॥ श्रीमत सत्यदत्त हेच सर्वांच्या हृदयरूपी कमलात विराजमान आहेत, ते श्रेष्ठ संन्यासीजनांचे आचार्य असून, त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती या संन्यासी स्वामींच्या बुद्धीला प्रेरणा दिली. त्यानुसार, त्यांनी रचलेल्या श्री सत्यदत्त व्रत आख्यानातील हा चौथा अध्याय आहे. ॥ इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने चतुर्थोऽध्यायः ॥४॥


क्रमश:


No comments:

Post a Comment