Sep 11, 2021

श्री गणेश कवच - प्राकृत


॥ श्री गणेशाय नमः ॥


[ १: नमन ] श्री गणेशदेवा लालितां । मुनितें म्हणे गौरी माता । अहो, अचपल बाल आतां । कळा याची कळों नेदी ॥ १ ॥ जृंभा, सिंदूर थोर स्थूल । साधु-देव-द्रोही खल । यातें हा आतांचि प्रबळ । चिंता याची व्यापी मातें ॥ २ ॥ यातें कीं तें व्यापितील । दैत्य दुष्ट बहु कुटिल । दैत्य नाशन हा अवखळ । रक्षिण्यासि या, द्या कवच-थोर ॥

[ २ : ध्यान ] मुनि म्हणे करावें ध्यान । विनायक हा मृगवदन । सत्ययुगीं दिग्बाहु गहन । मयुर-वाहन त्रेतायुगीं ॥ ४ ॥ सिद्धीदाता श्रीगणनाथ । तदा त्यासि सहा हात । द्वापारीं मात्र चार हात । रक्तरंग, अंगकान्ती ॥ ५ ॥ कलियुगीं भुजा दोन । धवलांग हिमाहून । पुरवी सर्व वर देऊन । रक्षितसे हा सर्वकालीं ॥ ६ ॥ ॥ श्री ॥ ॥ गणेश गौरीचा नंदन । सिद्धीबुद्धीचा दाता पूर्ण । आधीं वंदावा गजवदन । मंगलमूर्तीं मोरया ॥

[ ३ : न्यास ] शिखा रक्षूं हा विनायक । पराहूनि पर, परमात्मक । तनु सुरेख, तैंसें मस्तक । उत्कट, थोर, विशाल ॥ ७ ॥ कश्यप रक्षूं ललाटस्थलीं । महोदर राखूं भ्रुकुटीवल्ली, । भालचंद्र नयन, युगुलीं, । ओष्ट-पल्लव गजास्य ॥ ८ ॥ जिव्हा रक्षूं गजक्रीडन । हनुवटी ही गिरिजानंदन । विनायक रक्षूं वाणी, वचन । विघ्नहंता दन्त माझे ॥ ९ ॥ कान रक्षूं पाशधर्ता । नाक रक्षूं इच्छितें-दाता । मुख रक्षूं गणांचा कर्ता । कंठ माझा गणंजय ॥ १० ॥ स्कंध रक्षूं गजस्कंधन । गणनाथ ह्र्दयांगण । स्तन-भाग विघ्ननाशन । जठर रक्षूं हेरंब ॥ ११॥ पृथ्वीधर रक्षूं पार्श्वभाग । विघ्नहर शुभ, पृष्ठभाग । वक्रतुंड गुप्त, गुह्यांग । सर्वांग रक्षूं महाबल ॥ १२ ॥ गणक्रीड रक्षूं गुडघे जंघा । मंगलमुर्ति उरु-जंघा । घोटे पाय, दैत्यभंगा । एकदंत रक्षूं, महाबुद्धी ॥ १३ ॥ बाहू रक्षीं त्वरित-वरदायका । हात संरक्षीं आशापूरका । नखें, बोटें अरिनाशका । कमलहस्तका रक्षीं सर्व ॥ १४ ॥ सर्व अंगें मयूरेश । विश्वव्यापी विश्वेश । रक्षीं सदा परमेश । नच वदलो स्थान तेंही ॥ १५ ॥ धूम्रकेतु राखो तें स्व-बलें । भलें मागणें केंले अबले । नच केंले न जें सुचलें । तेंहि पुरवीं रक्षका ॥ १६ ॥

[ ४ : दिग्बंध ] समोरोनि देवें आमोदें । मागें राहोनियां प्रमोदें । पूर्वेकडोनि देवें बुद्धीदें । सिद्धीदें रक्षावी आग्नेयी ॥ १७ ॥ दक्षिणेसि राहो उमासुत । नैरृतीस गणेशाच्युत । पश्चिमेस विघ्नहर्तृ । वायव्येसि शूर्पकर्ण ॥ १८ ॥ उत्तर पाळीं निधिरक्षक । ईशान्येस शिवसुत शिवात्मक । दिनभागीं एकदन्तक । विघ्नहर सायं, रात्रौ ॥१९ ॥ रक्षीं पाशांकुशधर । सत्वरजतम-स्मर । राक्षस वेताल असुर । भूतग्रह, वेताल, पिशाचां हातोनि ॥ २० ॥ ज्ञानधर्म, लज्जालक्ष्मी । कुल, कीर्ति तेंविं गृह्लक्ष्मी । धन, धान्य, तैसा देहचि मी । सोयरे, सखे, पुत्रादिक ॥ २१ ॥ आतां सर्वांयुधधरें देवें । पौत्रादिसारें रक्षावें । मयूर-कपिल-पिंगाक्ष देवें । गुरें-मेंढरें संरक्षावीं ॥ २२ ॥ हत्ती, घोडे, सदा-साक्षी । विकट-मूर्ते तूंचि संरक्षी । अंतर्यामीं राहोनि दक्षी । रक्षी हेरंब-देवा तूं ॥ २३ ॥

[ ५ : कवचबंधन ] भूर्जपानीं हें लिहावें । कवच कंठीं मग बांधावे । भय-मुक्त सुबुध्दें व्हावें । यक्ष, राक्षस, पिशाच्चांपासून ॥ २४ ॥

[ ६ : फले ] तिन्हीं संध्या समयांसी । जपतां या कवचासी । वज्र-तनु-लाभ मानवासी । निर्भय जावें रणांगणीं ॥ २५ ॥ यात्राकालीं करावें पाठ । विघ्नें जातीं, फलें साठ । युध्दकालीं आठपट । विजय त्वरें पठन देईं ॥ २६ ॥ सातवेळ जप उपायीं । एकवीस दिनांचे ठायीं । मारणोच्चाटनें फलतीं । तींही आकर्ष-स्तंभन, मोहनादिकरण ॥ २७ ॥ एकवीस वेळां जपतां देखा । एकवीस दिनीं कोणी सखा । तुरुंगमुक्त होतसे सुखा । मोचन पावे यमपाशहि ॥ २८ ॥ राज्ञीराजदर्शन-वेळीं । पढावें तीन वेळां सकाळीं । राजसभा, लोकसभा, बळी । जिंकेल पाठक निश्चयें ॥ २९ ॥

[ ७ : प्राप्ति ] कश्यपें दिलें हें गणेश कवच । मुद्द्लें मांडव्यास वच । मांडव्य देईं मजसी साच । जय, यश, सिद्धी-दायक ॥ ३० ॥

[ ८ : बंधनें ] भक्तिहीनासि हें न द्यावें । श्रद्धावानचि शुभ पावे । कवचें न होतीं राक्षसासुर-गोवें । वेताल दानव, दैत्यादीचें ॥ ३१ ॥ ऐसें संपूर्ण केलें हें । श्रीगणेशपुराणीं पाहे । गणेश कवच जें गूढ आहे । संस्कृतीं तें प्राकृतीं ॥ ३२ ॥


॥ श्री गजाननार्पणमस्तु


No comments:

Post a Comment