Mar 24, 2021

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - ४


 || श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या अर्जुनाने आपल्या कुलगुरुंचे आशीर्वाद घेऊन सह्याद्रीची वाट धरली. लवकरच तो सह्याद्रीच्या शिखरावर पोहोचला. अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य असे ते स्थान पाहताच युवराज अर्जुन आपल्या प्रवासाचा शीण क्षणभर विसरला. झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्याचे अति मधुर जल प्राशन केल्यावर त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मंदपणे वाहणारा शीतल वायू, पक्ष्यांचा मोहक किलबिलाट, कोकिळांचे गोड कूजन आणि असंख्य प्रकारच्या फळाफुलांनी बहरलेले वृक्षवेली पाहून आपण जणू नंदनवनातच आलो आहोत, असे अर्जुनाला वाटले. त्या अतिपवित्र स्थानी वाघ, इतर हिंस्त्र पशु आणि गाई-हरणे आदि सर्व प्राणी आपला वैरभाव विसरून एकमेकांबरोबर राहत होते. त्या परिसराचे अवलोकन करीत असतांनाच अर्जुनास श्री दत्तप्रभूंच्या चरणकमलांचे ठसे उमटलेले दिसले. वज्र, अंकुश, पताका, शंख, चक्र आणि कमळ आदि शुभ चिन्हांकित ते ठसे पाहून अर्जुनाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि अंतर्बाह्य भान हरपून, डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. प्रभूंच्या केवळ चरणकमलांच्या ठशांचे दर्शन घेतल्याने योग्यांनाही अगम्य अशी अवस्था अर्जुनाला सहज प्राप्त झाली. महत्प्रयत्नानें तो भानावर आला आणि त्या पावलांना अत्यंत भक्तिपूर्वक साष्टांग नमन करून ती मृत्तिका त्याने आपल्या भाळीं लावली.

हे स्थावर वृक्ष, अचेतन पर्वत, मधुर जलाचे हे वाहते स्रोत हे सर्व जणू दत्तप्रभूंचे कुठल्या जन्मीचे भक्तच असून दत्तसेवेत अविरत कार्यरत आहेत, अशी त्या युवराजाची धारणा झाली. फिरत फिरत लवकरच तो दत्ताश्रमांत पोहोचला. अलौकिक अशा दैवी स्वरांतील वेदध्वनीचा नाद त्या अतिपवित्र वातावरणांत भरून राहिला होता. श्री दत्तप्रभूंच्या अनुपम आणि आसेचनका म्हणजेच ज्यांच्या रूपाकडे पाहून तृप्ती होतच नाही, अशा सौंदर्यमूर्तीला पाहताच अर्जुनाचे भान हरपले, त्याचे मन अनिर्वचनीय अशा आनंदाने भरून गेले. अत्यंत स्वरूपवती आदिमाया, अनाघालक्ष्मी माता श्रीदत्तप्रभूंच्या मांडीवर स्थित होती. तिच्यासोबत मद्य पित क्रीडा करणाऱ्या दत्त महाराजांना बघून तो क्षणभरही विचलित झाला नाही. आपले कुलगुरू, गर्गमुनींच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवून अर्जुन दत्तप्रभूंची अत्यंत भक्तिने सेवा करू लागला. आत्मसमाधीत निमग्न असणाऱ्या एखाद्या योग्याच्या चित्ताप्रमाणेच कार्तवीर्याचेही चित्त पूर्णतः दत्तमहाराजांच्या चरणीं स्थिरावले होते. श्री दत्तप्रभूंनी मात्र प्रथम त्याच्याकडे सर्वथा दुर्लक्षच केले. कधी अर्जुनाची निर्भत्सना करून तर कधी क्रोधाविष्ट होऊन त्याने आपले हे स्थान सोडून त्वरित निघावे, असे सांगितले. इतुकेच नव्हें तर वारंवार त्याला मारण्याची धमकीही दिली. अर्जुन मात्र प्रभूंची ही लीलाच आहे, असा दृढ भाव ठेवून सेवा करीतच राहिला. आपली निद्रा व आळस त्यागून, तो चंदनादि सुगंधी पदार्थ, फळे, फुलांच्या माळा, जल नित्य दत्तचरणीं ठेवत असे. तसेच प्रभूंनी आज्ञा करताच, मद्य-मांसदेखील आणून देत असे. तो दत्तमहाराजांचे चरण दाबण्याची सेवा करत असतांना कित्येक वेळीं प्रभूंनी त्याला लाथाडले, तरीही हा शिष्योत्तम मात्र आपली तहान-भूक यांची पर्वा न करतां दत्तसेवेत रंगून गेला होता.

त्या अढळ भक्तीने केलेल्या सेवेने, दत्तप्रभूंच्या नित्य दर्शनाने आणि सतत त्यांचेच स्मरण-ध्यान केल्याने हळूहळू कार्तवीर्याचे चित्त निर्मळ होऊन सात्विक भाव वाढू लागले, कर्माला अकर्मता येऊ लागली. एके दिवशी, तो दत्तप्रभूंचे चरण चुरत असतांना दत्तमहाराजांनी आपल्या दृष्टिक्षेपानें त्याचे दोन्ही हात तोडून टाकले, आणि त्याला उपहासात्मक स्वरांत म्हणाले, " अर्जुना, हे अशुद्ध संगतीचे फळ आहे. माझ्यासारख्या अमंगळ, कर्मभ्रष्ट आणि स्त्रीलंपट पुरुषाचा हा संसर्ग तुझी अपरिमित हानी तर करेलच, पण तुझे प्राणही घेईल. तेव्हा, अजूनही वेळ आहे तोवर तू येथून पळून जावेस." आपल्या आराध्य देवतेचे हे कठोर वचन ऐकताच, अर्जुनाला पुन्हा एकदा गर्गमुनींनी केलेल्या हितोपदेशाचे स्मरण झाले. हीच आपल्या दृढभक्तीची, कसोटीची वेळ आहे हे ध्यानात ठेवून तो अनन्य शरणागत होत म्हणाला, " प्रभो, तुमचे हे वचन, वर्तन म्हणजे तुमच्या अतर्क्य लीलाच आहेत, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आपण विश्वात्मक, विराट पुरुष असून त्रिगुणातीत आहात. तूं अनघ निश्चळ । अनघा ही शक्ती केवळ ।, तरीही आपल्या मायेच्या प्रभावाने आपण आम्हांस सगुण भासता. तूं आणि हे अवघे चराचर विश्व ह्यांच्यात किंचितही भेद नाही, मात्र ' जो उभयांचें नेणे अंतर । तो भेददर्शी पामर ।' असे अज्ञानी पामर, जगत आणि भगवंत यांच्यात भेद करतात आणि ते अजाण जीव शास्त्रबंधनात गुंतून पडतात. ' नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध । ' हेच केवळ सत्य आहे आणि हे जाणणाराच खरा ज्ञानी होय. तेव्हा हे भगवंता, ' देह जावो अथवा राहो । त्वद्रूपीं मन निश्चळ होवो । विपरीत भावना न राहो ।' अर्थात आता हा माझा देह राहो अथवा पडो, माझ्या मनांत आपल्याविषयी किंचितही विपरीत भावना न येता तुमच्या या स्वरूपातच माझे चित्त स्थिर व्हावे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना ! " अर्जुनाचे हे मोह-अज्ञानरहित बोलणे ऐकून दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, " राजपुत्रा, भक्तीचे तत्त्व तुला पूर्णपणे ज्ञात झाले आहे. तुझ्या या अविचल भक्तीने तू मला प्राणप्रिय झाला आहेस. माझ्या भक्तांचे मी इहपर कल्याण आणि उद्धार करणारच, असे माझे ब्रीद आहे. तुला हवा तो वर मागून घे. " आपल्या इष्टदेवतेचे हे वचन ऐकताच कार्तवीर्यास अतिशय आनंद झाला. आपण केलेली सेवा दत्तमहाराजांनी मान्य केली, आपले जीवन जणू सार्थक झाले असा विचार करीत तो प्रभूचरणीं नतमस्तक झाला आणि लीनतेने वदला, " देवा, आपण खरोखर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला सर्व प्रकारचे ऐश्वर्य तसेच धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ प्राप्त व्हावेत. आपल्या आशीर्वादाने ' यावें मला एकुलत्यासी । प्रजापालनसामर्थ्य ।' आणि मी बलवंत होऊन माझी दिगंत कीर्ती व्हावी. ' देवो मन्नाम नष्टलाभ ' अर्थात माझ्या नामस्मरणाने नाहीसे झालेले, हरवलेले परत लाभावे. इच्छित स्थळी जाण्यासाठी अकुंठित गती, अष्टसिद्धी, परचित्तज्ञान, सहस्त्र बाहू आणि सदा सर्वज्ञता लाभावी. जो माझे स्मरण करील त्याला माझे दर्शन घडावे, मला स्वर्गीं-पाताळीं सहज गमन करता यावे, सदा सत्संगती घडावी, मी कधीही कुमार्गांकडे वळू नये, धर्माने प्रजापालन करावे तसेच, पूजनीय अतिथी माझ्या घरी यावेत आणि माझे द्रव्य भांडार अक्षय असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ' आयुष्य पूर्ण असावें । धारातीर्थीं मरावें । भवत्तुल्यानें मारावें । तुमचें असावे नित्य स्मरण ' हे वरदान मला प्राप्त व्हावे. " अर्जुनाची ही प्रार्थना ऐकून श्री दत्तप्रभूंनी ' तथास्तु ' असा वर दिला. तत्क्षणीच त्याला दोन सुंदर भुजा प्राप्त झाल्या, सद्गदित होऊन त्याने श्री दत्तात्रेयांना दृढ अलिंगन दिले. भगवंताचा दिव्य स्पर्श होताच तो तटस्थ होऊन समाधी अवस्थेत गेला. परंतु, आपले वरदान सिद्ध करण्यासाठी दत्तप्रभूंनी आपल्या मायेच्या प्रभावाने अर्जुनाला त्या भावसमाधीतून बाहेर काढले आणि मंद स्मित करत म्हणाले, " वत्सा, तू पृथ्वीतलावरील सातही द्वीपांचा अधिपती होशील. तू आता सत्वर आपल्या माहिष्मती नगरीस जा आणि स्वतःला विधियुक्त राज्याभिषेक करून घे, ही माझी आज्ञा आहे." यावर कार्तवीर्याने " हे प्रभो, आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे," असे म्हणत पुनश्च वंदन केले आणि ' विस्मरण न व्हावें तुमचें । आपले हे चरण । हेंचि माझें जीवन ।' अशी विनवणी करीत, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत आणि दत्तप्रभूंच्या त्या विलक्षण स्वर्गीय रूपाची आपल्या हृदयमंदिरात प्रतिष्ठापना करून अर्जुनाने माहिष्मतीकडे गमन केले. श्री दत्तप्रभूंनी दिलेल्या वरदानामुळे अर्जुन काही क्षणांतच माहिष्मतीला येऊन पोहोचला. नगरीच्या वेशीवरच कुलगुरू गर्गमुनी, मंत्रीगण, नगरवासी यांनी त्याचे स्वागत केले आणि समारंभपूर्वक नगरीत घेऊन गेले. लवकरच एका शुभमुहूर्तावर अर्जुनाला विधीवत राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी अनेक देवता, ऋषीगण, राजे-महाराजे उपस्थित होते. राज्याभिषिक्त झाल्यावर अर्जुनाने विपुल दानधर्म केला आणि उपस्थितांचे उचित पूजन-सत्कारही केले. श्री दत्तात्रेयांकडून प्राप्त झालेल्या वरदानांमुळे तो धर्मानुसार प्रजापालन, शत्रू-नैसर्गिक आपत्तींपासून राज्याचे संरक्षण आणि एकछत्री शासन आदि राजकर्तव्ये उत्तमरीत्या पार पाडू लागला. त्याच्या राज्यांतील प्रजा सुखी होती, सतत यज्ञादिक अनुष्ठानें आयोजित केली जात होती, देवदेवता-ऋषी, ब्राह्मण तृप्त होते, योग्य पर्जन्यमानामुळे भूमीही सुफला होती आणि शरणागतांस अभय होते. ब्रह्मदेव आणि श्री शंकरांच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या रावणासही त्याने सहजच पराजित करून त्रैलोक्यांत ख्याती मिळविली. श्री दत्तकृपेचे अमोघ कवच कार्तवीर्याला लाभले होते. त्याला प्रथम श्री दत्तदर्शन झाले, तो दिवस माघ महिन्यातील वद्य अष्टमीचा होता. प्रतिवर्षी त्या दिवशी तो अनघाष्टमीचे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्यंत भक्तिभावाने करत असे. सर्व भक्तीत श्रेष्ठ अशी स्मरणभक्ती करून कार्तवीर्याने श्री दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद मिळविला. अशा रितीने महापराक्रमी, परम तेजस्वी, कर्तव्य-तत्पर, धर्माचरणीं, सहस्रबाहु असणारा आणि श्री दत्तात्रेयांचा प्रिय भक्त अर्जुन सर्वत्र विजय संपादन करून या पृथ्वीतलावरील सातही द्वीपांचा अधिपती झाला. ' न नूनं कार्तवीर्यस्य । गतिं यास्यंति पार्थिवा: । यज्ञदानतपोयोगश्रुतवीर्यजयादिभि: ॥' असे त्याचे उचित वर्णन केले जाते, अर्थात यज्ञ, दान, तप, योग, ज्ञान, शौर्य आणि जय या सर्वांत कार्तवीर्याची बरोबरी करेल, असा राजा होणे सर्वथा अशक्य आहे. कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् । तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ हा मंत्र तर सर्वश्रुत आहेच. या मंत्राचा श्रद्धेनें जप केल्यास गमावलेली वस्तू अवश्य मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. त्या परम दत्तभक्त राजाचा ' नमस्ते कार्तवीर्याय ' हा मंत्र आहे. प्रत्यक्ष ' दत्त निवेशित नष्ट प्रयुक्त ' असे आशीर्वचन लाभलेल्या या दिव्य मंत्रास विविध बीज लावून जप केल्यास साधकांच्या अनेक मनोकामना त्वरित फलित होतात. ॐ नमस्ते कार्तवीर्याय - भवबंधनातून मुक्ती, असाध्य विकार आणि नैसर्गिक प्रलयांपासून संरक्षण ऐं नमस्ते कार्तवीर्याय - वाचासिद्धी, विद्याप्राप्ती श्रीं नमस्ते कार्तवीर्याय - धनप्राप्ती द्रां नमस्ते कार्तवीर्याय - अपमृत्यूनिवारण, रोगनाशक आणि आरोग्यप्राप्ती धूप-दीप लावून वरील मंत्रांचा जप केल्यास अभीष्टप्राप्ती निश्चितच होते. प. प. श्री टेम्ब्येस्वामी महाराजरचित मंत्रविधानम् या ग्रंथातील पृ. क्र. ४२ आणि ४३ वर कार्तवीर्याचे इतर प्रभावी मंत्र विस्तृतपणें सांगितले आहेत.

|| इति कार्तवीर्याख्यानं संपूर्णम ||

|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||


Mar 19, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ११


श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्म रहस्य, बापानार्यांचे दिव्य अनुभव, श्री नरसिंह वर्मांस इष्ट देवतेचे दर्शन, बिल्वमंगल आणि चिंतामणी यांचा उद्धार  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादि उरकून शंकरभट्ट कुटीत परतले. सुबय्या श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते. त्यावेळीं सुबय्या आपली नित्य पूजा आटपून ध्यानाला बसले होते. शंकरभट्टही मग तिथेच आसनस्थ होऊन मनोमन नामस्मरण करू लागले. काही घटकांनंतर सुब्बय्यानें आपले ध्यान संपवले आणि शंकरभट्टांकडे पाहून म्हणाले, " महोदय, तुम्हांला श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता, हे माहित आहे का ? अनसूया मातेसमान असलेली सुमती महाराणी शनिप्रदोष व्रत अतीव श्रद्धेनें करीत असे. त्याच पुण्यप्रभावानें श्री दत्तप्रभू तिच्या उदरी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपानें अवतरले. योगसाधनेत असतांना अप्पळराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांमधून एकेक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले. ही एक अनाकलनीय, दैवी योगप्रक्रिया होती. त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ ज्योतीरूपानें श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. केवळ दोन वर्षाचे बालक असतांनाच त्यांच्या असंख्य लीला पीठिकापुरवासियांनी अनुभवल्या. अर्थात सर्व देव-देवतास्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय ? प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहजच नाश पावतात. श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पळराज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या. श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यांतील चंद्रशेखर या सत्शील ब्राह्मणाशी झाला. तर दुसरी भगिनी राधेचा विवाह विजयवाटिका या क्षेत्रांतील विश्वनाथ कृष्णावधानुलु या विद्यासंपन्न विप्राशी आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील ताडपल्ली दत्तात्रेय अवधानुलु नावाच्या वेदपारंगत द्विजाशी झाला."

" गोदावरी मंडलातील ताटंकपूर गावांतील वाजपेय याजी पौंडरिक महायाग विधीवत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पीठिकापुरम येथील मल्लादि आणि वाजपेय याजींचा निकट संबंध होता. हे वाजपेय याजी ' इदं ब्राह्मं इदं क्षात्रं ' या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते, म्हणजेच ते ब्राह्मतेजाने युक्त तर होतेच, तसेच त्यांनी क्षात्रतेजही अंगिकारले होते. कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटंकपुरातून मायणाचार्युलु नामक वाजपेय याजी यांना पाचारण करण्यात आले होते. तिथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला. मायणाचार्यांस माधवाचार्य आणि सायणाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते. सायणाचार्य हे वेदपारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते, तर माधवाचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपानुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते. त्यांमुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले असता, ' मी लोखंडास स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे. ' असा कृपाशिर्वाद माधवाचार्यांनी मागितला. तेव्हा, आदिशक्ती वदली, " वत्सा, या जन्मीं हे सर्वथा अशक्यप्राय वाटते, तू दुसरे वरदान मागावेस." त्यांवर अत्यंत लीनतेने माधवाचार्य म्हणाले, " माते, मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का ? तेव्हा, माझ्यावर तुझी कृपा व्हावी, हीच प्रार्थना आहे. " त्यांच्या चातुर्यतेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला. संन्यासाश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव विद्यारण्यस्वामी असे घेतले. त्यांना श्रीपाद प्रभुंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता. मात्र त्यांचे त्या जन्मीं कर्मफळ नष्ट न झाल्यानें ते पुढील शतकात, सायनाचार्यांच्या वशांत गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि तंजावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील, असा आशीर्वाद देऊन श्रीपादप्रभूंनी त्यांचा उद्धार केला. त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारात त्यांचे दीक्षा गुरु होते. खरोखरच श्रीदत्तप्रभू आपल्या साधकांच्या, भक्तांच्या सर्वच शुभकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात." एव्हढे बोलून सुबय्या श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला.

त्यानंतर थोडे जल प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगावयास सुरुवात केली. - श्रीपाद श्रीवल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापनार्युलुंबरोबर विशेष स्नेहबंध होता. आपण दत्तावतार आहोत, हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती. शंकरा, दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते, हे तर तुला ज्ञात आहेच. योगी, अवतारी महापुरुषांचे हे ज्ञानकेंद्र त्यांच्या अतींद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते. याचमुळें ते भूत-वर्तमान-भविष्य जाणू शकतात. असेच एकदा, श्रीपादांनी बापानार्यांच्या भ्रूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांसंबधी अभिज्ञान दिले. आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणले, " तुम्हांला संन्यासाश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे, हे मी जाणतो. परंतु, ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पांनुसार या किंवा पुढच्या जन्मींदेखील हे शक्य नाही. यास्तव, माझा पुढील अवतारात मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधनें, वासना आदिंचा नाश करणार आहे." तेव्हा, समाधिमग्न झालेल्या बापानार्यांना, काही क्षणांसाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले. पुढच्याच क्षणीं ते प्रयाग या महाक्षेत्रांतील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले. काही वेळांत, तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलिन झाले. त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापनार्यांची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली. त्याच अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू-खेळू लागले. क्षणार्धात, ते तान्हें बालक एक षोडशवर्षीय युवक दिसू लागले. दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी रूपांतील तेजस्वी युवक हुबेहूब बापनार्यांसारखाच दिसत होता. बापनार्यांकडे पाहून मंद स्मित करीत तो योगी म्हणाला, " मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात. मी गंधर्वपूर येथे वास करतो." इतके बोलून ते नदीतील पुष्पासनावर बसून श्रीशैल्यास गमन करते झाले. तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कौपिनधारी वृद्ध तपस्वी वेषांत अवतरित झाले. आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैल्य येथील मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले. त्याचवेळी, त्या शिवलिंगातुन देववाणी ऐकू आली, " बापनार्या ! तू केलेल्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता. त्याचेच फलस्वरूप म्हणून तुला, त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपांचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे." अष्टभाव जागृत झालेले बापनार्य सद्गदित होऊन नमन करीतच होते, त्याच क्षणीं ते समाधीतून बाहेर आले अन काय आश्चर्य ! तीन वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता. समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेनें त्यांनी आपल्या नातवास कवटाळले.

बापनार्य आणि अप्पळराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत. साधारणपणें, शमी अथवा पिंपळाची काष्ठें अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात. मात्र, बापनार्य आणि अप्पळराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेदमंत्रोच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत. त्यादिवशी मात्र, बापनार्युलुंनी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही अग्नी प्रगट झाला नाही. बापनार्य अगदीच हताश झाले. तिथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टीक्षेप करीत म्हणाले, " अग्निदेवा, माझ्या आजोबांच्या देवकार्यांत तू अडथळा आणू नये, अशी माझी तुला आज्ञा आहे." तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाला. हा चमत्कार पाहून बापनार्य दिग्मूढ झाले. दुसऱ्या एका प्रसंगी, बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली. कृतयुगात बापानार्युलु हे लाभाद नामक महर्षी होते. त्यांचा मंगल महर्षि नावाचा एक शिष्य होता. एकदा, दर्भ कापतांना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली. ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्धावस्था प्राप्त झाली आहे, असा अहंकार निर्माण झाला. तेव्हा, श्री महादेव तिथे अवतीर्ण झाले. मंगल महर्षींकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला अन हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली. सदाशिव गंभीर स्वरांत म्हणाले, '' त्रेतायुगात भारद्वाज ऋषी पीठिकापुरम इथे सवितृकाठक यज्ञ करतील, त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लवमात्र विभूती मी तुला दाखविली. " श्री शंकरांचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभूंस साष्टांग नमन केले. पीठिकापुरम या क्षेत्राचे असे माहात्म्य आहे. श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैवी चमत्कार बापनार्य, वेंकटप्पय्या श्रेष्ठी, आणि नरसिंह वर्मा यांनी अनुभवले होते.

एके दिवशी, नरसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखविण्यासाठी आपल्या घोडागाडीतून घेऊन गेले. त्यांची मुबलक जमीन होती. त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके, भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे. मात्र एका शेतातील दोडक्याचा वेल बहरत नसे, कधी काळी चुकून एखादे फुल आले तरी ते एक तर गळून जाई अथवा सुकून जायचे. त्यातूनही त्या वेलीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे. नरसिंह वर्मांनी तो दोडक्याचा वेल बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले, " श्रीपादा, या वेलीचे दोडके नेहेमीच कडू निघतात, बरें !" त्यांवर हसत श्रीपाद उत्तरले, " आजोबा, ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्तोपासक इथे साधना करीत होते. श्री दत्तात्रेयांचे बाल स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणीमाता आतुर झाली होती. तिचे हे मागणें तिच्या भाषेत आपणांस सांगत होती. आज या भूमातेची प्रार्थना फळांस आली आणि तुम्ही मला इथे घेऊन आला. यापुढे, ह्या वेलीस उत्तम प्रकारचे दोडके येतील." बाळ श्रीपादांचे हे वरप्रद बोलणे ऐकून नरसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले, " प्रभो, आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चवदार दोडके या शेतात उत्पन्न होतील, यांत काहीच शंका नाही. मात्र, माझी एक प्रार्थना आहे. आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा." त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले, " आजोबा, आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते. तुम्ही तयार झालेले दोडकें आमच्या घरी पाठवा, मी ते अवश्य ग्रहण करीन." नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले.

बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांच्या शेतांतून खेळत-बागडत फिरू लागले. थोड्या वेळाने, तिथे आसपासच्या पहाडांवर राहणारे काही भिल्ल युवक-युवती आले. ग्रामस्थ त्यांना चेंचु असे संबोधत असत. त्या सर्वांनी श्रीपादप्रभूंना भक्तिभावानें वंदन केले. त्यावेळी, नरसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजोवलय दिसले. त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले, " आजोबा, हे चेंचुलोक नरसिंहावताराशी निगडित आहेत. ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात. तुम्हीही श्रीहरी विष्णूंचा अवतार नरसिंह यांचे भक्त आहात. तुम्ही या चेंचुलोकांची मनःपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हांला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल." क्षणभर, बाळ श्रीपाद आपली थट्टा-मस्करीच करीत आहे, असे नरसिंह वर्मांना वाटले. तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यांनी त्या चंचु युवक-युवतींस श्री नरसिंह स्वामींचा दर्शनलाभ व्हावा, अशी विनवणी केली. त्यावर, " आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चंचुलक्ष्मी आणि तिचा पती नरसिंह यांस आपणाकडे घेऊन येतो." असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली. क्षणभर विश्रांती घेऊन सुबय्या म्हणाले, " शंकरभट्टा, श्रीपादांचे प्रत्येक वचन, लीला त्यांच्या साधक-भक्तांच्या हितकल्याणासाठीच असत. त्यांना अनन्यभावानें शरण आलेले अभक्त, पशु, पक्षी, इतकेच नव्हें तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला. कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी नरसिंह वर्मांच्या शेताजवळून चाललो होतो. श्रीपादप्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले, " सुबय्या श्रेष्ठीं, त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे, ते पाहिलेस का ? अरे, ते बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या आहेत. तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीग करून पेटव." श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नरसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो. मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेनें वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्वमंगल आणि चिंतामणी वैश्या श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते."

" ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोहोचलेही नव्हते, तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळा करून पेटवल्या. जसा त्या शुष्क काष्ठांनी पेट घेतला, त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्वमंगल आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे, अशी पीडा होत होती. त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली, अन ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहाय्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो, परंतु श्रीपादस्वामींनी आम्हांस थांबविले. काही क्षणांतच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांचाच सारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नींत भस्मसात झाल्या. या अकल्पित प्रकारानंतर बिल्वमंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले. तिथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यांस अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सद्गदित होऊन आपली कहाणी सांगू लागले - ते दोघेही गुरुवायुर क्षेत्री श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवानें तिथेच त्यांना कुरूरअम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला. तिने सहजच त्या दोघांना ' श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु ' अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांचे तुम्हांस लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशिर्वाद दिला. त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभीप्सिताच्या दैवीप्रभावाने बिल्वमंगल आणि चिंतामणीच्या मनांत भक्ति, वैराग्याचे बीज पेरले गेले. पीठीकापुराकडे येत असतांना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले. तेथील नरसिंहस्वामींचे दर्शन घेत असतांना त्यांनी, " हे स्वामी, कुरूरअम्मांच्या शुभाशीर्वादाने जेव्हा आम्हांस दत्तावतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल, त्याचवेळी त्यांच्याबरोबर आम्हांस आपले म्हणजेच श्री नृसिंहांचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हांस प्राप्त व्हावे. " अशी आर्त प्रार्थना केली. मी आणि नरसिंह वर्मा ह्या सर्व अतर्क्य घटना पाहून स्तंभित झालो होतो."

" एव्हढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचुलक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळीं आले. त्या युवक-युवतींबरोबर श्री नृसिंहदेवही होते. दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंहदेवास त्या चेंचुलोकांनी श्रीपादप्रभूंसमोर आणून उभे केले. अशा एकामागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगांत झाल्या असतील, असे मला वाटत नाही. श्री नृसिंहस्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले, " पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना ? ही चेंचुलक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना ? आणि तूच हिरण्यकश्यपूचा वध करून आपला भक्त, प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना ? " उत्तरादाखल श्री नृसिंहदेवांनी त्रिवार होकार उच्चारला. त्याच क्षणीं श्री नृसिंहदेव व चेंचुलक्ष्मी हे दिव्य ज्योतींत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले. त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचुलोकही अंतर्धान पावले. श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली. त्यावेळीं, ' या चित्रविचित्र घटना घडलेल्या नरसिंह वर्मांच्या जमिनींवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव ' चित्रवाडा ' असेल.' अशी श्रीपाद श्रीवल्लभांनी भविष्यवाणी केली. अर्थात हादेखील दत्तप्रभूंचाच सिद्धसंकल्प होता, हेच सत्य आहे. " हा कथाभाग सांगून सुबय्या श्रेष्ठींनी उच्च स्वरांत तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावानें प्रभूंचा जयजयकार करू लागले. स्वामींच्या ह्या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्तिमित झालेले शंकरभट्ट, त्यांच्याही नकळत त्या जयजयकारांत सुबय्यांना साथ देऊ लागले.  

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - दुर्गुणांपासून मुक्ती


Mar 12, 2021

श्री शिवलीलामृत सार


श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नम: शिवाय

स्कन्दपुराणांतील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेल्या शिवलीलांवर आधारित श्री शिवलीलामृत हा एक दिव्य आणि सिद्ध ग्रंथ आहे. भगवान शिव शंकरांच्या अनेक कथा, शिवभक्तांसाठी विविध व्रत-वैकल्ये, उपासना, स्तोत्र, महादेवांचे जप, तसेच आध्यत्मिक बोध आदिंनी परिपूर्ण असा हा ग्रंथ अतिशय सुगम आणि रसाळ भाषेंत लिहिला आहे. या महान काव्याचे रचनाकार श्रीधर कवींवर विद्यादेवता शारदेचा वरदहस्त आहे, हे सहजच जाणवते. श्री शिवलीलामृताचे एकूण १४ अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय शिवोपासनेबरोबरच विविध प्रकारच्या भक्तींचीही ओळख करून देतो. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांनी प्रार्थना केली असता, महामुनी सूत त्या सर्वांस शिवमाहात्म्य सांगू लागले. त्या संवादावर आधारित या ग्रंथाची रचना आहे. संक्षिप्त शिवलीलामृत : अध्याय १ : पहिल्या अध्यायात दोन शिवमंत्रांचे माहात्म्य वर्णिले आहे. पहिला पंचाक्षरी - नम: शिवाय आणि दुसरा षडाक्षरी - ॐ नम: शिवाय हे दोन तारक मंत्र आणि त्यांची फलप्राप्ती सांगितली आहे. वेदांतील हे दोन दिव्य मंत्र शिवकृपेबरोबरच इष्ट मनोकामना, निर्गुण भक्ती आणि मुक्तीही सहज प्रदान करतात. मात्र, योग्य सदगुरूंकडून मंत्रदीक्षा घेऊन हा शिवमंत्र सिद्ध करावा, हे ग्रंथकार आवर्जून सांगतात. यासाठी भक्ती, वैराग्य, आणि ज्ञान अशी सद्गुरूंची विविध लक्षणेंही कथन करतात. सर्वज्ञ, दयाळू, आत्मज्ञानी, क्रोधरहित, मितभाषी आणि सर्वदा आपल्या शिष्यांचे हित बघणारे गुरूच आपले सद्गुरू असतात. यानंतर, या दिव्य शिवमंत्रामुळेच दाशार्ह राजाचा कसा उद्धार झाला, ही कथा विस्तारपूर्वक वर्णिली आहे. अध्याय २ : द्वितीय अध्यायात महाशिवरात्री माहात्म्य आणि शिवपूजनातील बिल्वपत्रांचे महत्व सांगितले आहे. यांत एका व्याधाची आणि शिकार करतांना त्याला दिसलेल्या मृग परिवाराची कथा वर्णन केली आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी केवळ संयोगामुळे शिवभक्त नसलेल्या व्याधास उपवास घडतो, याचबरोबर विनोद म्हणून केलेला ' हर हर ' हा जप आणि शिवलिंगावर नकळत वाहिलेली बिल्वपत्रें यांमुळे तो भोळा सांब त्याचा कसा उद्धार करतो, हे सांगितले आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्य प्राप्त होते. भावभक्तीबरोबरच कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा यांचे महत्व अधोरेखित करत हा अध्याय कर्मविपाक सिद्धांत विस्तारपूर्वक वर्णन करतो. अध्याय ३ : तिसऱ्या अध्यायांत मित्रसह उर्फ कल्माषपाद राजाची कथा आहे. त्याला श्री गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे माहात्म्य विशद करतांना गौतम ऋषींनी एका अत्यंत पापी स्त्रीचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला. ती पापिणी गोकर्णक्षेत्रीं आली असता, शिवरात्रीस तिला उपोषण, जागरण, आणि शिवपूजनही घडले. केवळ त्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी गेली. पुढे, गौतम ऋषींच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवाराधना करतो आणि ब्रह्महत्येच्या महापातकातून मुक्त होतो, हा कथाभाग आहे. अध्याय ४ : चतुर्थ अध्यायात विमर्षण राजा व राणी कुमुद्वती यांची कथा वर्णिली आहे. पूर्वजन्म पशु योनीत मिळूनही महाशिवरात्रीस उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्यामुळे त्यांना पुढचा जन्म राजघराण्यांत मिळतो. तसेच, त्यांच्या पुढील सहा जन्मांची कथाही आहे. दुसरी कथा उज्जयिनी नगरीतील महाकाळेश्वर ज्योतिर्लिगांची आहे. एका सहा वर्षाच्या गोप बालकाने अत्यंत भक्तिभावाने केवळ दगड आणि मृत्तिकेने केलेली पूजा स्वीकारत महादेव प्रसन्न झाले. त्या प्रभावाने राज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंची वृत्ती बदलली आणि शिवभक्त उज्जयिनी नरेश, चंद्रसेनाचा दिव्य मणी व राज्य सुरक्षित राहिले. त्यावेळी, प्रत्यक्ष हनुमंताने प्रगट होऊन त्या गोपपुत्राचे नाव श्रीकर ठेवले. तोच पुढील जन्मी गोकुळांत नंदराजा म्हणून जन्मला. ईश्वर केवळ भावाचा भुकेला आहे, हेच ही कथा अधोरेखित करते. अध्याय ५ : पाचव्या अध्यायात प्रदोषव्रताचे माहात्म्य सांगितले आहे. शाल्व देशाच्या राजाने विदर्भ नगरीचा राजा सत्यरथ याचा रणांत पराभव करून वध केला. सत्यरथाची गरोदर राणी अरण्यांत पळून गेली. तिथे तिने एका पुत्रास जन्म दिला, परंतु दुर्दैवाने एका मगरीने तिला भक्षण केले. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने त्या राजपुत्राचा आपल्या मुलाबरोबर सांभाळ केला. पुढे, शांडिल्य ऋषींनी त्या दोन्ही मुलांना शिवमंत्राचा उपदेश केला आणि प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. त्या व्रतप्रभावाने, ब्राह्मणपुत्राचे दारिद्र्य दूर झाले आणि राजपुत्रास राज्य परत मिळाले, हा कथाभाग आला आहे. अध्याय ६ : सहाव्या अध्यायात सोमवार व्रत माहात्म्य सांगितले आहे. चित्रवर्मा राजाची कन्या सीमंतिनीची कथा यांत वर्णिली आहे. याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यानुसार, आपला वैधव्यदोष दूर होण्यासाठी सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. अनेक संकटे आल्यावरदेखील तिने आपले शिवव्रत सुरूच ठेवले आणि शिवकृपेमुळे तिचे सर्वतोपरी कल्याण झाले, याचे यांत वर्णन आहे. कठीण परिस्थितीतदेखील ठेवलेली परमेश्वरावरील दृढ श्रद्धा काय फळ देते, हेच इथे विस्तृतपणें सांगितले आहे. अध्याय ७ : सातव्या अध्यायांत शिवव्रतदिनीं राणी सीमंतिनी करीत असलेल्या दाम्पत्यपूजनाची कथा आहे. केवळ द्रव्याभिलाषेने दोन ब्राह्मणपुत्रांपैकी एक जण स्त्रीवेष धारण करतो आणि दाम्पत्य म्हणून ते राणी सीमंतिनीकडे येतात. तीही ते दोघे पुरुषच आहेत हे ओळखते, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे भक्तिपूर्वक पूजन करते. तसेच, भोजन, वस्त्रालंकार आणि भरपूर दक्षिणाही देते. परिणामस्वरूप स्त्रीवेष धारण केलेला ब्राह्मणपुत्र खरोखरच स्त्री होतो. पूर्व पुरुषरूप प्राप्तीसाठी देवीची उपासना करूनही, सीमंतिनीच्या दृढ भक्तीमुळे तो ब्राह्मणपुत्र स्त्रीच राहणार, असे अदिशक्ती सांगते. तर दुसऱ्या कथेत मदन ब्राह्मण आणि पिंगला वैश्या या दोघांनी ऋषभ योगींची सेवा केल्याने त्यांना पुढील जन्म कसा राजघराण्यांत मिळतो, तसेच भस्म माहात्म्य यांचे वर्णन केले आहे. अध्याय ८ : आठव्या अध्यायांत भद्रायु नामक राजपुत्र ( पूर्वजन्मीचा मदन ब्राह्मण ) आणि कीर्तिमालिनी ( पूर्वजन्मीची पिंगला वैश्या ) यांची कथा सविस्तर वर्णिली आहे. शिव-पार्वती त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या शिवार्चन आणि भक्तीमुळे प्रसन्न होतात, तसेच त्यांना शिवलोकांत अक्षयपद असा आशीर्वाद देतात, हा कथाभाग आहे. अध्याय ९ : नवव्या अध्यायांत वामदेव नामक महाज्ञानी मुनी एका ब्रह्मराक्षसाला शिवप्रणीत भस्म-माहात्म्य सांगतात. एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला केवळ भस्म स्पर्श झाल्याने तो यमलोकीं न जाता त्याला कैलासलोकी कशी गती मिळाली, हे कथन केले आहे. तर पुढील कथा चिताभस्माने शिवलिंगाची नित्य पूजा करणाऱ्या एका भिल्ल भक्ताची आहे. एके दिवशी, त्याला चिताभस्म मिळाले नाही. तेव्हा, पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याची पत्नी स्वतःला जाळून घेते, त्या भस्माने तो भक्तिभावाने शिवार्चन करतो. मात्र, महादेवांच्या कृपेने तीच पत्नी नैवेद्य घेऊन येते. अशा रीतीने ते पती-पत्नी शिवरूप होतात आणि शिवलोकी जातात. अध्याय १० : दहाव्या अध्यायांत नैधृव नामक अंध ऋषी गतधवा शारदेला सौभाग्य आणि पुत्र प्राप्तीचा वर देतात. सत्य परिस्थिती समजताच, आपले वचन खरे करण्यासाठी नैधृव ऋषी शारदेला ' ॐ नम: शिवाय ' या मंत्राचा जप करण्यास सांगतात. तसेच, तिच्याकडून उमामहेश्वर व्रतही करवून घेतात. त्या व्रतप्रभावाने भवानी देवी प्रसन्न होऊन दर्शन देते आणि नैधृव ऋषींची प्रार्थना खरी करण्यासाठी सौभाग्य, पुत्रप्राप्तीचा शारदेला आशीर्वाद देते, हा कथाभाग आहे. अध्याय ११ : अकरावा अध्याय रुद्राध्याय आहे. नंदिग्रामातील महानंदा नामक शिवोपासना करणाऱ्या वैश्येची कथा यांत सांगितली आहे. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला आपल्या चरणीं अक्षय स्थान दिलेच, पण तिने पाळलेल्या कोंबडा व माकड यांनादेखील भस्मधारण व शिवपुराण श्रवणाच्या प्रभावाने काश्मीर नगरीचा राजपुत्र आणि प्रधानपुत्र असा उत्तम जन्म मिळाला. याच राजपुत्र सुधर्माचे मृत्यू गंडांतर टाळण्यासाठी पराशर ऋषींनी रुद्राध्यायाची पारायणे केली. सातव्या दिवशी मृत्युघटका येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला, तेव्हा पराशर ऋषींनी रुद्रोदक शिंपडून राजपुत्राचा अकालमृत्यू हरून आयुष्यवर्धन केले, याचे सविस्तर वर्णन आहे. अध्याय १२ : बाराव्या अध्यायात विदुर आणि बहुला या वेदधर्मविवर्जित, अत्यंत अनाचारी अशा ब्राह्मण दाम्पत्याची कथा आहे. गोकर्ण क्षेत्रीं पुराण श्रवण केल्यावर बहुलेस आपल्या दुर्वर्तनाचा पश्चात्ताप होतो आणि ती शिवभक्तीत रंगून जाते. पुराणिक बुवांनी दिलेल्या ' ॐ नम: शिवाय ' या दिव्य मंत्राचा जप करून ती उमा-महेश्वरांस अनन्यभावानें शरण जाते आणि स्वतःसह पतीचाही उद्धार करते, हे विस्तृतपणें वर्णिले आहे. तसेच, भस्मासुराची उत्पत्ती, श्री शंकरांचे त्यास वरदान आणि तो उन्मत्त झाल्यावर श्रीहरी विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून केलेला त्याचा वध हे आख्यानही सविस्तर कथिले आहे. अध्याय १३ : तेराव्या अध्यायात दक्ष राजाने आयोजित केलेल्या महायज्ञात भवानी मातेचे आत्मसमर्पण आणि त्यानंतर आदिशक्तीने हिमालयाच्या पोटी पार्वती या नावाने जन्म घेतला, हा कथाभाग आहे. उमा पार्वती शंकराच्या प्राप्तीसाठी कडक तपश्चर्या करू लागली. इकडे, श्री शंकरांनी वीरभद्रासह चढाई करून तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन यांचा संहार केला. ' तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे.' ही भविष्यवाणी लक्षात घेऊन सर्व सुरगण शिव-पार्वतीच्या विवाहासाठी प्रयत्न करू लागले. यथावकाश, त्यांचा विवाह होऊन कार्तिकेयाचा जन्म झाला आणि त्याने पुढे तारकासुराचा वध केला, ही कथा सविस्तर सांगितली आहे. अध्याय १४ : चौदाव्या अध्यायात एकदा पार्वतीबरोबर सारीपाटाच्या खेळांत शिव हरले आणि रागावून हिमालयांत एकांतात राहू लागले. तेव्हा, पार्वतीने भिल्लीणीचा वेष धारण करून त्यांची समजूत काढली याचे वर्णन आहे. तसेच, नारद मुनींकडून धर्मपरायण आणि उदार श्रियाळ राजाची स्तुती ऐकून महादेव त्याची परीक्षा घेतात. अतिथीरूपांत आलेल्या शंकरांची विचित्र मागणी राजा श्रियाळ आणि राणी चांगुणा पुरवतात. तेव्हा प्रसन्न होऊन शिव त्या सर्वांस दर्शन देतात, तसेच बाळ चिलयास शुभाशिर्वाद देऊन राजा राणीस दिव्य विमानातून शिवलोकी नेतात, ही कथा आहे. शके सोळाशे चाळीस । विलंबीनाम संवत्सरास । शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास । रविवारी ग्रंथ संपविला ॥ब्रह्मकमंडलूच्या तीरी । द्वादशमती नाम नगरी । आद्यंत ग्रंथ निर्धारी । तेथेचि झाला जाणिजे ॥ शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत । चतुर्दश अध्यायापर्यंत । जय जय शंकर उमानाथ । तुजप्रीत्यर्थ हो का सदा ॥ असे निरूपण करून श्रीधर कवी शिवलीलामृत ग्रंथ संपूर्ण झाला, असे सांगतात. या काव्यांतील अध्यायांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ ईश्वर प्रार्थनेने होतो. ईश्वराच्या नामस्मरणांत किती सामर्थ्य असते, हे प्रचिती आल्याशिवाय कळत नाही. अर्थात परमेश्वर, सद्गुरू यांचा कृपाशिर्वाद असल्याखेरीज प्रासादिक ग्रंथ निर्मिती होऊ शकत नाही, हे ही खरेच ! श्रीधर कवींचे प्रतिभाचातुर्य असे की प्रत्येक अध्यायांतील प्रारंभीच्या या काही ओव्या एकत्र केल्या तर संपूर्ण शिवलीलामृताचे सार तयार होते. काही कारणांमुळे भक्त जर पूर्ण ग्रंथ वाचन करू शकत नसतील, तर श्रद्धापूर्वक या ४२ ओव्या वाचल्या तरी संपूर्ण शिवलीलामृत वाचनाचे/पारायणाचे फळ मिळते. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । ह्या बेचाळीस ओव्या समग्र । शिवलीलामृताचे होय सार । श्रोती निरंतर परिसाव्या ॥ सकळ शिवलीलामृताचे । आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे । श्रवण पठण केल्याचे । फळ असे समान ॥ नित्य समस्त नोहे पठण । तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण । वाचिता शुद्धभावे करून । मनोरथ पूर्ण होतील ॥ अशी ग्वाहीही ग्रंथकार देतात. नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या :

ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्गुरु ॥१॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥२॥ जय जय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमना मनमोहना । कर्ममोचका विश्वम्भरा ॥३॥ जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथें भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकटें विघ्नें दारुण । न बाधती कालत्रयीं ॥४॥ संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिषें घडो शिवस्मरण । न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥५॥ न कळत प्राशितां अमृत । अमर काया होय यथार्थ । औषध नेणतां भक्षीत । परी रोग हरे तत्काळ ॥६॥ जय जय मंगलधामा । निजजनतारका आत्मारामा । चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥७॥ हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंदा भाललोचना । भवभंजना महेश्वरा ॥८॥ हे शिवा वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्वरा । अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥९॥ धराधरेंद्र मानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं । तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥१०॥ न कळे तुझें आदिमध्यावसान । आपणचि सर्व कर्ता कारण । कोठें प्रकटसी याचें अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मांदिका ॥११॥ जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रकटसी जगन्निवास । सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥१२॥ ' सदाशिव ' ही अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । तो परमपावन संसारी । होऊनि तारी इतरांतें ॥१३॥ बहुत शास्त्रवक्ते नर । प्रायश्चित्तांचे करितां विचार । परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्चित्तां आगळें ॥१४॥ नामाचा महिमा अद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥१५॥ जय जयाजी पंचवदना । महापापद्रुमनिकृंतना । मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥१६॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥१७॥ नीलग्रीवा अहिभूषणा । नंदिवहना अंधकमर्दना । दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥१८॥ जयजय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा । त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥१९॥ कोटिभानुतेजा अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्ता त्रयीमूर्ते ॥२०॥ परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा । पशुपते पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥२१जयजय श्रीब्रह्मानंदमूर्ती । तू वंद्य भोळा चक्रवर्ती । शिवयोगीरुपें भद्रायूप्रती । अगाध नीती कथिलीस ॥२२जयजय भस्मोद्धूलितांगा । योगिध्येया भक्तभवभंगा । सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपासीं ॥२३जेथें नाही शिवाचें नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम । धिक् गृह पुर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥२४जेथें शिवनामाचा उच्चार । तेथें कैंचा जन्ममृत्युसंसार । ज्यांसी शिवशिव छंद निरंतर । त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥२५ जयाची शिवनामीं भक्ती । तयाचीं पापें सर्व जळती । आणि चुके पुनरावृत्ती । तो केवळ शिवरुप ॥२६जैसें प्राणियांचे चित्त । विषयीं गुंते अहोरात । तैसें शिवनामीं जरी लागत । तरी मग बंधन कैचें ॥२७कामगजविदारक पंचानना । क्रोधजलदप्रभंजना । लोभांधकारचंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥२८मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना । लोभमहासागरशोषणा । अगस्त्यमहामुनिवर्या ॥२९आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा । रुंडमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥३०धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥३१सूत सांगे शौनकादिकांप्रती । जे भस्म रुद्राक्ष धारण करिती । त्यांच्या पुण्यासी नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥३२ जे करिती रुद्राक्षधारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण । केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥३३ब्राह्मणादि चारी वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमीं संपूर्ण । स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यांहीं शिवकीर्तन करावें ॥३४शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र । लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥३५जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशुसमान । मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥३६शिव शिव म्हणतां वाचें । मूळ न राहे पापाचें । ऐसें माहात्म्य शंकराचें । निगमागम वर्णिती ॥३७जो जगदात्मा सदाशिव । ज्यासी वंदिती कमलोद्भव । गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥३८जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाह्रदयाब्जमिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकंद । विश्वम्भर दयाब्धी ॥३९जो पंचमुख पंचदशनयन । भार्गववरद भक्तजीवन । अघोर भस्मासुरमर्दन । भेदातीत भूतपती ॥४०तो तूं स्वजनभद्रकारका । संकटीं रक्षिसी भोळे भाविकां । ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडीं ॥४१म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन । तरी या संकटांतून । काढूनि पूर्ण संरक्षीं ॥४२

॥ नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ॥
ॐ नम: शिवाय श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु


Mar 5, 2021

श्री गजानन महाराज आवाहन - मानसपूजा


|| श्री गणेशाय नम: ||

गजानना या करी आवाहन आसनस्थ व्हावे |

शुद्धोदक हे पाद्य, अर्ध्य अन आचमना घ्यावे |

दूध, दही, घृत, मध, शर्करा पंचामृत स्नान |

अथर्वशीर्षे, रुद्रसुक्तसह श्री सुक्ते स्नान ||

जरतारीची शाल अर्पिली, यज्ञोपवितही तसे |

सर्वांगाला परिमल, भाळी तिलक केशरी असे |

फुले सुगंधी, हिरव्या नाजूक दुर्वा एकवीस |

धूप, निरंजन, चुन-भाकरी ते नैवेद्यास ||

कर्पुरार्ती, मंत्रपुष्प घ्या प्रदक्षिणा, नमन |

चिलिम दिधली सेवा करितो अनन्य मी शरण |

मंत्र, कर्म वा भक्ती न जाणे काल्पनिक पूजा |

सदभावाने केली उद्धरी निस्सिम भक्त तुझा ||

' गण गण गणात बोते ' भजनी दंग सदा तुम्ही |

सिद्ध मंत्र हा जपुनी सर्वदा पावन हो आम्ही |

एक मागणे शिरी असावा वरदहस्त तुझा |

गजानना ही आस पुरवी घ्या नमस्कार माझा ||

मानसपूजा श्लोक त्रिकाली एकवीस आवर्तने |

उच्चारुनी संकल्प आपुला करी जो श्रद्धेने |

मिटतील चिंता, हरतील व्याधी, टळतील आपत्ती |

गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्षप्राप्ती ||

|| श्री गजानन महाराज की जय ||


Mar 4, 2021

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - २ ( ओवी १ ते १० )


|| श्री गणेशाय नम: ||

१/१ जयजय अज अजिता सर्वेश्वरा | हे चंद्रभागा तटविहारा |
पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा | दीनबंधो पाहि माम ||
१/२ कुडीमाजी नसल्या प्राण | कोण विचारी मढ्याते |
तुझ्या वाशिल्यावाचून | अवघेच आहे देवा शीण ||
१/३ सरोवराची दिव्य शोभा | तोयामुळे पद्मनाभा |
पाप ताप दैन्य वारी | हेच मागणे ||
१/४ रसभरीत आतला गाभा | टरफलाते महत्व आणी ||
तुझी कृपा त्याच परि | शरणागताते समर्थ करी |
हे पांडुरंगा, हे पंढरीनाथा, प्राणेश्वरा तुझ्याच कृपेने व आशीर्वादाने श्रीगजानन चरणी भक्तीभाव निर्माण झाला, त्याचेमुळे तुझे पाय सापडले. ओवी चिंतन करताना पहिला अध्याय संपवून दुसऱ्या अध्यायात केंव्हा शिरलो कळलेही नाही. पण खरे तर हे आहे की आपल्याला महाराजांचे दास होता आले पाहिजे. आपण दास न बनता मालक बनण्याचा प्रयत्न करायला गेलो रे गेलो की तो भुयारात बसलेला प्रत्यक्ष ईश्वर दिसावा, भेटावा मुक्ती मिळावी म्हणून आपण त्याचे जवळ जायचा जितका प्रयत्न करू तितका तो आपल्या पासून दूर दूर जायला लागतो व त्याला कधीही पकडणे शक्य होत नाही. त्याची कृपा होणे तर दूरच. दास होता आले पाहिजे, ते प्रारब्धात असायला हवे तर सेवा मिळते, नाहीतर हाताला यायचे तेही केंव्हा निसटले याचे भानही राहत नाही, मालक बनण्याच्या नादात. एखाद्या कार्य उभारणीत भगवंत कुणाला तरी कार्य करण्याची प्रेरणा देतो तो भाग्यवंत ठरतो, तोही ईश कार्य समजून तळमळीने कार्यात सर्वस्व सोडून वाहून घेतो, त्या कार्यपूर्तीसाठी कष्ट उपसतो, भगवंत त्याला यश देतो आणि भगवंताचे आपल्यावर फर ऋण झाले असे समजून मरेपर्यंत त्या कार्याचा वसा सोडत नाही हा भाव वेगळा. अशा कार्याचा वारसा त्यांना प्रभूकृपेने लाभत असतो, कारण भगवंताने त्यासाठीच त्यांची योजकता केली असते. त्यात खारीचा वाटा उचलण्याने त्यांना सुद्धा खूप समाधान लाभते व त्याचा नम्र भाव होतो की ईशकृपेने ही सेवा लाभली बरें ! तोही स्वत:ला कृतार्थ मानतो. जो शरणागत भावाने अशा कार्यात सेवा देतो त्यास श्री गजानन महाराज समर्थ करतात, त्याची इच्छापूर्ती करून असल्यास त्याचे पाप, ताप, दैन्य नाहीसे करतात. बंकटलाल प्रेमयुक्त भक्तीचा जाणकार होता, कारण त्यास श्रीमद भागवत ऐकण्याचा योग आला असावा. त्यामुळेच त्याच्या अंत:करणात श्रींबद्दल प्रेमयुक्त भक्ती उपजली. एखादा मन हेलावणारा प्रसंग जसा आपल्यासमोर घडावा आणि त्या दृश्यामुळे आपले मन जर त्याच घटनेचा विचार करीत राहिले तर तो प्रसंग डोळ्यासमोरून जाता जात नाही कारण हा मनाला बसलेला चटका असतो. त्या घटनेचा त्याला नकळत ध्यास लागतो. त्याच घटनेचे चिंतन होत राहते जोपर्यंत मनाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत. बंकटलालाचे असेच काही झाले असावे. मनाने तो श्री महाराजांशी एकसंध झाला होता, पण महाराज अचानक दूर निघून गेल्याने डोळ्याने तर दिसत नव्हते. तो कासावीस झाला होता. बेचैन झाला. हवी असलेली वस्तू दिसली नाही, तर त्या वस्तुविषयी अजून आकर्षण वाढते. त्या साठी तो झुरतो. त्याच गोष्टीचा ध्यास घेतो. या भावावस्थेत बंकाटलाल अडकून पडला. आई थोडा वेळ जर डोळ्याला दिसली नाही तर लहान बाळ जसे रडायला लागते तसे त्यांचे मन श्रीसाठी आक्रंदन करू लागले.
फार पूर्वी कारंजा गावी एक तळे पाहण्याचा योग आला होता, तेंव्हा त्या तळ्यात कमळें असायची, पाणी पण मुबलक होते. त्या कमळांमुळे तलावाचे सौंदर्य खुलुन उठले होते. तलाव परिसरात चिंताग्रस्त मनुष्य गेला तरी त्याचे मन तलावाकडे बघून शांत व्हायचे. काही कवी म्हणत्तात की जशी मनाची अवस्था असेल तसा निसर्ग दिसतो, पण येथील निसर्ग सौंदर्य इतके दिव्य होते कुणीही गेले की निसर्ग सानिध्यात मन प्रसन्न व्हायचे. मनाचा भाव बदलायचा. मन:परिवर्तन करण्याची शक्ती व किमया जशी निसर्गात आहे तशीच शक्ती श्री नामस्मरणात आहे. नामस्मरणात भगवंत चिंतन घडते, त्याचे अस्तित्व हृदयात जाणवते. ही भावना बनते की मी विश्वासाने एकदा स्मरण केले की तो भगवंत माझी काळजी घ्यायला समर्थ आहे, मग मला काहीच करावे लागणार नाही. श्रीचरणी शरणागत झाला की तादात्म्य पावतो तो ईशशक्ती बरोबर. हा भाव निर्माण झाला की त्यातून ज्याचा मनात इतर सटरफटर विचार येत नाहीत. त्यांचे जिणे दिव्य होते व पुनरपि जन्म घेऊन भूतलावर दु:ख भोगण्यासाठी यावे लागत नाही. शरीर, मन, बुद्धी, भगवंतात विलीन झाली की आपण जेथून आलो त्या स्वरूपात परत विलीन होतो व आत्मसुख भोगतो. साधू संतांचे चरण दर्शन घडले की चैतन्य वाटायला लागते करण त्या संतांच्या स्पदनांचा परिणाम मनावर व आपल्या शरीरावर होत असतो. संतसंगतीत सुखाचा अनुभव येतो कारण त्यांचा आत्मा हा परमात्म्याशी संयोग पावलेला असतो आणि ज्यात रसभरीत आत्माराम वसला आहे त्याला देहाचे काय ते तेवढेच महत्व वाटणार. पण टरफल जसे आतील रसभरीत गाभा सांभाळते, त्यामुळेच आपोआपच त्या टरफलाही महत्व प्राप्त होते. तसे या मानवी शरीराचे आहे.
ध्यानधारणा, योग, सत्संग, श्री नामस्मरण हे राग, लोभ, मोह, मत्सर, हेवेदावे, स्वार्थ, मीपणा, अहंकार यांना दूर सारते. भक्तीतील दिखाऊ वृत्ती नकोशी होते. अर्थात, त्यासाठी सदैव भगवंताला न विसरता आवाहन करावे लागते. नामस्मरण करावे लागते, निर्मोही व रिते मन करून. तरच सेवा भाव निर्माण होतो. शरीर चैतन्यमयी बनते. परमात्मा आपल्या आत्म्यात येऊन सुखावतो. विनम्र व शरणागत भाव निर्माण होतो.
मी माझा मालक, देवाचा व माझा संबंध काय? मी माझा समर्थ आहे, माझे जीवन घडवायला असे मानणे म्हणजे अज्ञान ठरेल. निरंतर आपण जो श्वास घेतो तोच भगवंत असतो, प्राण असतो, चैतन्य असते, जीवन असते, सजीवता असते. आणि नि:श्वास सोडतो तेंव्हा आपल्या मनातील वाईट विचार, आशा, चिंता, दु:ख, वेदना, तो विश्वासरुपी भगवंत बाहेर बाहेर घेऊन जातो. मग आपणास हलके हलके वाटायला लागते. मनात जागा रिती झाली की तेथे सुविचार जाऊन बसतात. अशी संधी हरघडी तुमच्या समोर उभी असते. त्याचे सोने करता आले पाहिजे. प्रारब्धाने व संतकृपेने हे घडते. सत-तत्वाची जाण असायला हवी, मीपण सोडावे व समर्पित भाव सिद्ध झाला की निश्चित समजावे भगवंताची कृपा आपल्यावर झाली आहे.
सकाळी उठताचं श्री स्मरणाने भावशुद्धी होते व मन जागृत होऊन आनंद मिळतो. यावेळी शुद्धभावाने घेतलेले श्री दर्शन शरणागत भाव निर्माण करते. पाप, ताप, दैन्य, दु:ख सोडून चैतान्यमयी शुद्धभाव घेऊन आपण जय गजानन म्हणत बाहेर पडतो. चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहतो. नामस्मरण सुखाने संसार करण्यासाठी केले की जो आनंद होतो, तेच भक्ताचे तप व मुक्ती होय.
तासाभरा पूर्वी अचानक माणूस भेटला आणि तो निघून गेला तर मला सांगा कुणाला रडायला येईल का ? नाही हेच तुमचे उत्तर आहे ना. बरोबर आहे. पण मग आता प्रश्न उभा राहतो तो हा की हा बंकटलाल का रडतोय? तो वेडां होता का? खुळा का होता तो? असे काय त्याने गमावले की तो रडायला लागला. हा सामान्य प्रसंग नाही, सामान्य स्थिती नाही. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याना हा भाव नाही कळणार. आपला देव आपल्याला सोडून गेला, आता आपण एकटे पडलो, पोरके झालो अशी जाण त्यास झाली. बंकटलालाची ही आध्यत्मिक उत्क्रांती नव्हे, श्री कृपेने क्षणात घडलेली क्रांती आहे बंकटलालाच्या जीवनात. हा भक्तीचा, शरणागतीचा, विश्वासाचा, श्रद्धेचा दृश्य परिणाम श्रींनी प्रगट केला शेगावात पहिल्याच भेटीत. बर अस झाल नाही की श्री दिसत नाहीत, आता ते आपल्याला भेटणारच नाहीत म्हणून बंकटलाल स्वत:ला दोष देतोय, मी दुर्दैवी, कमनशिबी अस म्हणत नाही. माझे दुर्दैवाने लाभलेला हिरा मी गमावून बसलो म्हणत नाही. कारण एकदा का तो श्रींच्या प्रभाव क्षेत्रात आला व श्रींनी त्याला आपले म्हटले की त्याचा मुक्तीचा काळ या जन्मी आहे हे निश्चित मानावे. महाराज आणि बंकटलाल हे नाते जन्मोजन्मीचे असावे, माय लेकराचे असावे, म्हणूनच आई दिसली नाही की मूल जसे कावरे बावरे होते तसा तो भावविभोर झाला, बाळाला जशी हुरहूर वाटते तशी हुरहूर वाटायला लागली बंकटलालास. आई नाही तर आता दूध कोण देईल हा स्वार्थ भाव त्याच्या मनाला स्पर्श करीत नाही, तर आई नाही म्हणजे माझे सर्वस्व संपले, असे समजून तो झुरणीला लागतो आईच्या प्रेमापोटी, तसे येथे प्रेमापोटी बंकटलालाची तहान-भूक हरवली. त्याला भूक होती ती प्रेममयी भक्तीची व आपल्या माउलीची. तो सुन्न झाला, काय केले म्हणजे श्री सापडतील, तसे शेगाव फार मोठे नव्हते, त्याला वाटले काढू आपण शोधून पण भगवंत असा शोधून पकडल्या जातो का? किती सान्निध्य लाभले तर तासभर आणि एवढ्या कमी वेळात कुणावर एवढे प्रेम उपजू शकते का ?, असा प्रश्न अनेक विद्वान विचारतात, पण प्रेमवीर विचारीत नाहीत कारण एका दृष्टीक्षेपात हे घडू शकते हे अनुभवाने ते सांगू शकतील. पण ते सत्य असावे, त्यात निष्ठा असावी व विश्वासाने केलेले भावपूर्ण प्रेम असावे लागते.
म्हणूनच भक्ताला तप करण्यासाठी घरदार, संसार सोडून, अंगाला राख लाऊन हिमालयात जावे लागत नाही... मुलबाळ, संसार सोडावा लागत नाही. कारण त्याला आता परोपकारी जीवन अर्थपूर्ण जगायचे असते. मनाला टवटवीत ठेवायचे असते. आत्म्यातील परमात्म्याचे निरंतर स्मरण ठेऊन त्याल रसभरीत बघायचे असते व त्यासाठी जपायचा असते शरीर, कारण ज्या शरीरात भगवंत राहतो त्या शरीराचे मोल व महत्व तो भक्त जाणत असतो. कुडीमाजी नसल्या प्राण | कोण विचारी मढ्याते || प्राण असेपर्यंत तो पुरुष असतो, बाई असते त्याला मानवी अस्तित्व असत. पण एकदाचा शेवटचा श्वास सोडला आणि परत श्वास घेताच आला नाही की ते शरीर त्याक्षणी आपला भाव बदलते. त्या प्राणहीन शरीराला आता इंग्रजीत ‘इट’ या संबोधनाने ओळखतात. लोक पटापट जमून त्या मढ्याची स्मशानात अग्नी देऊन विल्हेवाट लावतात, त्याला निरोप देतात. त्याचे आभार मानून की त्याने प्राण जपला. जीवनात भगवंतांचे अस्तित्व व्यक्त केल सुसंकल्पनातून, शुद्ध आचार-विचारातून, परोपकारी भावनेतून. तोपर्यंत तो देवमाणूस होता तोही भगवंताच्या कृपेने ,सत्शील वर्तनाने, प्रफुल्ल व शांत मनाने आणि आनंदी, हसऱ्या टवटवीत चेहऱ्याने, पण प्रभू कृपा संपली, तो शेवटचा श्वास ठरला त्या शरीराचा, पण आत्मा तर अमर आहे ना.
१/५ मागले अध्यायी झाले कथन | समर्थ गेले निघून |
तेणे बंकटलाला लागून | हुरहूर वाटू लागली ||
न हाले दृष्टिपासोनी | गजाननाचे रूप ते ||
१/६ गोड न लागे अन्नपाणी | समर्थाचा ध्यास मनी |
याचे नाव श्रोते ध्यास | उग्या नसती पोरचेष्टा ||
१/७ जिकडे पाहावे तिकडे भास | होवो लागला त्यांचा खास | १/८ चुकलेल्या धेनूची | वत्स शुद्धि करी साची
वडीलापासी बोलावया | छाती त्याची होईना ||
तैसी बंकटलालाची | स्थिती झाली विबुध हो || १/९ हे हितगुज सांगावया | जागा नव्हती कोठे तया | १/१० ऐशा रिति चित्त भले | विचाराचे काहूर झाले |
पहिल्या अध्यायाच्या अंतिम चरणात आपण बघीतले की बंकटलांल आता पूर्ण भावविवश झाला होता, समोरची व्यक्ती ही माणूस नसून प्रत्यक्ष भगवंत आहेत याची पक्की मनाला खात्री पटली, म्हणून तो जमिनीवर बसलेल्या श्रींना वाकून व डोळे मिटून नमस्कार करायला लागला, त्याच क्षणी श्री महाराज केंव्हा उठून दूरवर निघून गेले हे कळले देखील नाही. डोळे उघडून पाहतो तर श्री कोठे ही दिसत नाहीत, भीरी भीरी इकडे तिकडे तो पहायला लागला पण महाराज त्याला कोठे दिसले नाहीत. परत परत सर्व दिशांना दूरवर नजर टाकली पण श्री नाहीत, हे पाहून त्याला जत्रेत आई हरविलेल्या निरागस मुलाला रडू कोसळावे तसे बंकटलाल रडायला लागलेत.
शेगाव अवघे धुंडाळीले | परि न पता लागला ||
श्री गजानन महाराजांनी कोठेही एका शब्दाने उपदेश केल्याचे दिसत नाही, त्यासाठी माध्यम वापरले ते स्वत:चे जीवन चरित्र. लोक सहयोगातून व सहवासातून आपल्या विलक्षण कृपेने व सहयोगातून विदर्भाच्या सर्व भक्तांवर बत्तीस वर्षे अधिराज्य गाजविले. त्या बंकटलालाला एवढा आपलासा केला की श्रींशिवाय जगणे त्यास नामंजूर होते, म्हणून हुरहूर वाटणाऱ्या या सद्भक्ताला त्याचा शोध घ्यावासा वाटला. हे खरच असे नवल प्रथमच शेगावात घडले व याचे नायक होते श्री. आपल्या जीवनातून असे आगळे वेगळे दर्शन घडविणारे ते फक्त आध्यात्मिक गुरु नव्हते तर एक थोर संत होते, थोर समाजाची धारणा करणारे श्रेष्ठ लोकनेते होते. सर्व जनतेला समान मनुष्य पातळीवर आणून समतेचा धडा शिकविणारे वारकरी होते. त्यासाठी लागते थोर नशीब तर भक्ताला असा थोर गुरु लाभतो, व संताला आपल्या तपाने सद्भक्त. हा एक ईश्वरी चमत्कार घडला विदर्भात शेगाव नगरी.
दुसरा मुद्दा असा निर्माण होतो की बंकाटलालाचे महाराज काय घेऊन गेले होते. त्याच्या जीवनाचा अर्थ, संतकृपेने प्राप्त होणारी कृपादृष्टी, की त्याचे श्रद्धास्थान? एवढे मात्र खरे की श्री नाहीत म्हणजे जीवनात आता काही राम उरला नाही. त्यांच्या विना जिणे व्यर्थ आहे. बेचैन होऊन सगळे शेगाव पालथे घातले पण बंकटलालास महाराज काही गवसले नाहीत. एकच ध्यास महाराज कोठे व कधी भेटतील? एकच विचार काय केले म्हणजे भेटतील. पण आता मी शोधू तर कोठे शोधू? लहान बाळाला आईचा लळा लागावा तसा माऊलीचा लळा लागला या सदभक्तास. शोधूनही श्री दिसत नाहीत त्यामुळे त्याच्या जीवाची तगमग व्हायला लागली. जीव घाबरा व्हायला आला. तशी हुरहूर अजून वाढली. महाराज तर क्षणभरही त्याच्या डोळ्यासमोरून सरकत नव्हते. मन इतरत्र रमत नव्हते. अशी काय जादू केली असेल बरें या भक्तावर श्रींनी काही कळायला मार्ग नाही. तहान नाही, भूक नाही. आग्रहाने कुणी दिलेच तर त्यात ना गोडवा, ना आनंद ना सुख समाधान. एखाद्याने गजानन अशी हाक जरी कुणाला मारली तर हा तिकडे मान वळवून पाही व कान टवकारून ऐकत असे, एवढा श्रींचा ध्यास घेतला होता. आज कुणाला ही अतिरंजित गोष्ट वाटेल पण अध्यात्मात गुरु आपल्या शिष्याला सहज भावाने- तो योग्य असल्यास स्वत:कडे खेचून घेतो जसे लोहचुंबकाकडे लोखंड. अध्यात्मात म्हणूनच स्वानुभवाला फार महत्व आहे. ते शरीराने वेगवेगळे असले तरी मनाने एकात्मता अनुभवतात. जंगलात भटकलेल्या गाईलासुद्धा वासराजवळ लवकर पोहचता यावे अशी तळमळ असते, इकडे वासरूसुद्धा सारखे हंबरडा फोडत असते, केविलवाणे होऊन आपल्या मातेसाठी. बंकटलालास याची जाण होती की सर्वांनाच ही माझी अवस्था कळणार नाही, त्यामुळे दुसऱ्याजवळ बोलायची सोय नव्हती. त्याला भीती वाटत होती, ते आपल्याला हसतील म्हणून. इकडे वडिलांना सांगायची हिम्मत होत नव्हती. आणि एकट्याने हे दु:ख पचविण्याची हिंमत नव्हती. अशा अवस्थेत त्याचे मन आक्रंदन करू लागले. बुद्धीत एकच विचार व लक्ष्य होते श्रींची भेट. पण उपाय तर सापडत नव्हता. काय करणार बिचारा ? अशी अवस्था एखाद्याच सद्भक्ताला लाभते, कारण गुरु त्याची परीक्षा घेत असतात. संताला विरक्त भाव आवडतो, त्यामुळे सामान्य माणसाचा वाराही त्यांना सहन होत नसतो. पण शेगावचे हे बैरागी बाबा फार वेगळ होते बरं ! जन-कल्याणार्थ त्यांनी एकांतातून लोकांतात येणे पसंत केले. लोकांतात एकाकी जीवन जगणारे हे अवतारी बाबा होते. त्यांना अशाच एकांतात लोकांच्या उद्धाराचा नवीन मार्ग शोधायचा होता. म्हणूनच श्रींनी आपल्या दिव्य शक्तीने बंकटलालासारख्या सदभक्तात तासाभरात एवढा बदल घडवून आणला असावा.

|| श्री गजानन महाराजार्पणमस्तु ||

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ