|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||
श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या अर्जुनाने आपल्या कुलगुरुंचे आशीर्वाद घेऊन सह्याद्रीची वाट धरली. लवकरच तो सह्याद्रीच्या शिखरावर पोहोचला. अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य असे ते स्थान पाहताच युवराज अर्जुन आपल्या प्रवासाचा शीण क्षणभर विसरला. झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ झऱ्याचे अति मधुर जल प्राशन केल्यावर त्याचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मंदपणे वाहणारा शीतल वायू, पक्ष्यांचा मोहक किलबिलाट, कोकिळांचे गोड कूजन आणि असंख्य प्रकारच्या फळाफुलांनी बहरलेले वृक्षवेली पाहून आपण जणू नंदनवनातच आलो आहोत, असे अर्जुनाला वाटले. त्या अतिपवित्र स्थानी वाघ, इतर हिंस्त्र पशु आणि गाई-हरणे आदि सर्व प्राणी आपला वैरभाव विसरून एकमेकांबरोबर राहत होते. त्या परिसराचे अवलोकन करीत असतांनाच अर्जुनास श्री दत्तप्रभूंच्या चरणकमलांचे ठसे उमटलेले दिसले. वज्र, अंकुश, पताका, शंख, चक्र आणि कमळ आदि शुभ चिन्हांकित ते ठसे पाहून अर्जुनाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि अंतर्बाह्य भान हरपून, डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. प्रभूंच्या केवळ चरणकमलांच्या ठशांचे दर्शन घेतल्याने योग्यांनाही अगम्य अशी अवस्था अर्जुनाला सहज प्राप्त झाली. महत्प्रयत्नानें तो भानावर आला आणि त्या पावलांना अत्यंत भक्तिपूर्वक साष्टांग नमन करून ती मृत्तिका त्याने आपल्या भाळीं लावली.
त्या अढळ भक्तीने केलेल्या सेवेने, दत्तप्रभूंच्या नित्य दर्शनाने आणि सतत त्यांचेच स्मरण-ध्यान केल्याने हळूहळू कार्तवीर्याचे चित्त निर्मळ होऊन सात्विक भाव वाढू लागले, कर्माला अकर्मता येऊ लागली. एके दिवशी, तो दत्तप्रभूंचे चरण चुरत असतांना दत्तमहाराजांनी आपल्या दृष्टिक्षेपानें त्याचे दोन्ही हात तोडून टाकले, आणि त्याला उपहासात्मक स्वरांत म्हणाले, " अर्जुना, हे अशुद्ध संगतीचे फळ आहे. माझ्यासारख्या अमंगळ, कर्मभ्रष्ट आणि स्त्रीलंपट पुरुषाचा हा संसर्ग तुझी अपरिमित हानी तर करेलच, पण तुझे प्राणही घेईल. तेव्हा, अजूनही वेळ आहे तोवर तू येथून पळून जावेस." आपल्या आराध्य देवतेचे हे कठोर वचन ऐकताच, अर्जुनाला पुन्हा एकदा गर्गमुनींनी केलेल्या हितोपदेशाचे स्मरण झाले. हीच आपल्या दृढभक्तीची, कसोटीची वेळ आहे हे ध्यानात ठेवून तो अनन्य शरणागत होत म्हणाला, " प्रभो, तुमचे हे वचन, वर्तन म्हणजे तुमच्या अतर्क्य लीलाच आहेत, याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आपण विश्वात्मक, विराट पुरुष असून त्रिगुणातीत आहात. तूं अनघ निश्चळ । अनघा ही शक्ती केवळ ।, तरीही आपल्या मायेच्या प्रभावाने आपण आम्हांस सगुण भासता. तूं आणि हे अवघे चराचर विश्व ह्यांच्यात किंचितही भेद नाही, मात्र ' जो उभयांचें नेणे अंतर । तो भेददर्शी पामर ।' असे अज्ञानी पामर, जगत आणि भगवंत यांच्यात भेद करतात आणि ते अजाण जीव शास्त्रबंधनात गुंतून पडतात. ' नाहीं जयाहून शुद्ध । तो तूं खास अशुद्ध । ' हेच केवळ सत्य आहे आणि हे जाणणाराच खरा ज्ञानी होय. तेव्हा हे भगवंता, ' देह जावो अथवा राहो । त्वद्रूपीं मन निश्चळ होवो । विपरीत भावना न राहो ।' अर्थात आता हा माझा देह राहो अथवा पडो, माझ्या मनांत आपल्याविषयी किंचितही विपरीत भावना न येता तुमच्या या स्वरूपातच माझे चित्त स्थिर व्हावे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना ! " अर्जुनाचे हे मोह-अज्ञानरहित बोलणे ऐकून दत्तप्रभू प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, " राजपुत्रा, भक्तीचे तत्त्व तुला पूर्णपणे ज्ञात झाले आहे. तुझ्या या अविचल भक्तीने तू मला प्राणप्रिय झाला आहेस. माझ्या भक्तांचे मी इहपर कल्याण आणि उद्धार करणारच, असे माझे ब्रीद आहे. तुला हवा तो वर मागून घे. " आपल्या इष्टदेवतेचे हे वचन ऐकताच कार्तवीर्यास अतिशय आनंद झाला. आपण केलेली सेवा दत्तमहाराजांनी मान्य केली, आपले जीवन जणू सार्थक झाले असा विचार करीत तो प्रभूचरणीं नतमस्तक झाला आणि लीनतेने वदला, " देवा, आपण खरोखर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला सर्व प्रकारचे ऐश्वर्य तसेच धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ प्राप्त व्हावेत. आपल्या आशीर्वादाने ' यावें मला एकुलत्यासी । प्रजापालनसामर्थ्य ।' आणि मी बलवंत होऊन माझी दिगंत कीर्ती व्हावी. ' देवो मन्नाम नष्टलाभ ' अर्थात माझ्या नामस्मरणाने नाहीसे झालेले, हरवलेले परत लाभावे. इच्छित स्थळी जाण्यासाठी अकुंठित गती, अष्टसिद्धी, परचित्तज्ञान, सहस्त्र बाहू आणि सदा सर्वज्ञता लाभावी. जो माझे स्मरण करील त्याला माझे दर्शन घडावे, मला स्वर्गीं-पाताळीं सहज गमन करता यावे, सदा सत्संगती घडावी, मी कधीही कुमार्गांकडे वळू नये, धर्माने प्रजापालन करावे तसेच, पूजनीय अतिथी माझ्या घरी यावेत आणि माझे द्रव्य भांडार अक्षय असावे. सर्वात महत्वाचे म्हणजे, ' आयुष्य पूर्ण असावें । धारातीर्थीं मरावें । भवत्तुल्यानें मारावें । तुमचें असावे नित्य स्मरण ' हे वरदान मला प्राप्त व्हावे. " अर्जुनाची ही प्रार्थना ऐकून श्री दत्तप्रभूंनी ' तथास्तु ' असा वर दिला. तत्क्षणीच त्याला दोन सुंदर भुजा प्राप्त झाल्या, सद्गदित होऊन त्याने श्री दत्तात्रेयांना दृढ अलिंगन दिले. भगवंताचा दिव्य स्पर्श होताच तो तटस्थ होऊन समाधी अवस्थेत गेला. परंतु, आपले वरदान सिद्ध करण्यासाठी दत्तप्रभूंनी आपल्या मायेच्या प्रभावाने अर्जुनाला त्या भावसमाधीतून बाहेर काढले आणि मंद स्मित करत म्हणाले, " वत्सा, तू पृथ्वीतलावरील सातही द्वीपांचा अधिपती होशील. तू आता सत्वर आपल्या माहिष्मती नगरीस जा आणि स्वतःला विधियुक्त राज्याभिषेक करून घे, ही माझी आज्ञा आहे." यावर कार्तवीर्याने " हे प्रभो, आपली आज्ञा मला शिरसावंद्य आहे," असे म्हणत पुनश्च वंदन केले आणि ' विस्मरण न व्हावें तुमचें । आपले हे चरण । हेंचि माझें जीवन ।' अशी विनवणी करीत, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत आणि दत्तप्रभूंच्या त्या विलक्षण स्वर्गीय रूपाची आपल्या हृदयमंदिरात प्रतिष्ठापना करून अर्जुनाने माहिष्मतीकडे गमन केले. श्री दत्तप्रभूंनी दिलेल्या वरदानामुळे अर्जुन काही क्षणांतच माहिष्मतीला येऊन पोहोचला. नगरीच्या वेशीवरच कुलगुरू गर्गमुनी, मंत्रीगण, नगरवासी यांनी त्याचे स्वागत केले आणि समारंभपूर्वक नगरीत घेऊन गेले. लवकरच एका शुभमुहूर्तावर अर्जुनाला विधीवत राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी अनेक देवता, ऋषीगण, राजे-महाराजे उपस्थित होते. राज्याभिषिक्त झाल्यावर अर्जुनाने विपुल दानधर्म केला आणि उपस्थितांचे उचित पूजन-सत्कारही केले. श्री दत्तात्रेयांकडून प्राप्त झालेल्या वरदानांमुळे तो धर्मानुसार प्रजापालन, शत्रू-नैसर्गिक आपत्तींपासून राज्याचे संरक्षण आणि एकछत्री शासन आदि राजकर्तव्ये उत्तमरीत्या पार पाडू लागला. त्याच्या राज्यांतील प्रजा सुखी होती, सतत यज्ञादिक अनुष्ठानें आयोजित केली जात होती, देवदेवता-ऋषी, ब्राह्मण तृप्त होते, योग्य पर्जन्यमानामुळे भूमीही सुफला होती आणि शरणागतांस अभय होते. ब्रह्मदेव आणि श्री शंकरांच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या रावणासही त्याने सहजच पराजित करून त्रैलोक्यांत ख्याती मिळविली. श्री दत्तकृपेचे अमोघ कवच कार्तवीर्याला लाभले होते. त्याला प्रथम श्री दत्तदर्शन झाले, तो दिवस माघ महिन्यातील वद्य अष्टमीचा होता. प्रतिवर्षी त्या दिवशी तो अनघाष्टमीचे व्रत शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्यंत भक्तिभावाने करत असे. सर्व भक्तीत श्रेष्ठ अशी स्मरणभक्ती करून कार्तवीर्याने श्री दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद मिळविला. अशा रितीने महापराक्रमी, परम तेजस्वी, कर्तव्य-तत्पर, धर्माचरणीं, सहस्रबाहु असणारा आणि श्री दत्तात्रेयांचा प्रिय भक्त अर्जुन सर्वत्र विजय संपादन करून या पृथ्वीतलावरील सातही द्वीपांचा अधिपती झाला. ' न नूनं कार्तवीर्यस्य । गतिं यास्यंति पार्थिवा: । यज्ञदानतपोयोगश्रुतवीर्यजयादिभि: ॥' असे त्याचे उचित वर्णन केले जाते, अर्थात यज्ञ, दान, तप, योग, ज्ञान, शौर्य आणि जय या सर्वांत कार्तवीर्याची बरोबरी करेल, असा राजा होणे सर्वथा अशक्य आहे. कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् । तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥ हा मंत्र तर सर्वश्रुत आहेच. या मंत्राचा श्रद्धेनें जप केल्यास गमावलेली वस्तू अवश्य मिळते, असा अनेकांचा अनुभव आहे. त्या परम दत्तभक्त राजाचा ' नमस्ते कार्तवीर्याय ' हा मंत्र आहे. प्रत्यक्ष ' दत्त निवेशित नष्ट प्रयुक्त ' असे आशीर्वचन लाभलेल्या या दिव्य मंत्रास विविध बीज लावून जप केल्यास साधकांच्या अनेक मनोकामना त्वरित फलित होतात. ॐ नमस्ते कार्तवीर्याय - भवबंधनातून मुक्ती, असाध्य विकार आणि नैसर्गिक प्रलयांपासून संरक्षण ऐं नमस्ते कार्तवीर्याय - वाचासिद्धी, विद्याप्राप्ती श्रीं नमस्ते कार्तवीर्याय - धनप्राप्ती द्रां नमस्ते कार्तवीर्याय - अपमृत्यूनिवारण, रोगनाशक आणि आरोग्यप्राप्ती धूप-दीप लावून वरील मंत्रांचा जप केल्यास अभीष्टप्राप्ती निश्चितच होते. प. प. श्री टेम्ब्येस्वामी महाराजरचित मंत्रविधानम् या ग्रंथातील पृ. क्र. ४२ आणि ४३ वर कार्तवीर्याचे इतर प्रभावी मंत्र विस्तृतपणें सांगितले आहेत.
|| इति कार्तवीर्याख्यानं संपूर्णम ||
|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||
No comments:
Post a Comment