Dec 11, 2017

श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं श्रीदत्तात्रेयस्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


अनसूयात्रिसम्भूत दत्तात्रेय महामते ।

सर्वदेवाधिदेव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ १॥


शरणागतदीनार्ततारकाऽखिलकारक ।

सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ २॥


सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वाधिव्याधिभेषज ।

सर्वसङ्कटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ३॥


स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः ।

भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ४॥


सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः ।

योऽभीष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ५॥


य एतत्प्रयतः श्लोकपञ्चकं प्रपठेत्सुधीः ।

स्थिरचित्तः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ॥ ६॥

।। इति श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं श्रीदत्तस्तोत्रं सम्पूर्णम् ॥


Dec 3, 2017

श्रीगुरुचरित्र अध्याय - ४ ( श्रीदत्त-जन्म )


श्रीगणेशाय नमः II श्रीसरस्वत्यै नमः II श्री गुरुभ्यो नमः II ऐशी शिष्याची विनंती I ऐकोन सिद्ध काय बोलती I साधु-साधु तुझी भक्ति I प्रीति पावो गुरुचरणीं II १ II ऐक शिष्यचूडामणी I धन्य धन्य तुझी वाणी I आठवतसे तुझिया प्रश्नीं I आदि-मध्य-अवसानक II २ II प्रश्न केला बरवा निका I सांगेन तुज विवेका I अत्रिऋषीच्या पूर्वका I सृष्टीउत्पत्तीपासोनि II ३ II पूर्वी सृष्टि नव्हती कांही I जलमय होतें सर्वांठायीं I 'आपोनारायण ' म्हणोनि पाहीं I वेद बोलती याचिकारणें II ४ II आपोनारायण आपण I सर्वां ठायीं वास पूर्ण I बुद्धि संभवे प्रपंचगुण I अंड निर्मिलें हिरण्यवर्ण II ५ II तेंचि ब्रह्मांड नाम जाहलें I रजोगुणें ब्रह्मयासि निर्मिलें I 'हिरण्यगर्भ' नाम पावलें I देवतावर्ष एक होतें II ६ II तेंचि ब्रह्मांड देखा I फुटोनि शकलें झालीं द्वैका I एक आकाश एक भूमिका I होऊनि ठेलीं शकलें दोनी II ७ II ब्रह्मा तेथें उपजोन I रचिलीं चवदाही भुवनें I दाही दिशा मनस वचन I काळकामक्रोधादि सकळ II ८ II पुढें सृष्टि रचावयासी I सप्त पुत्र उपजवी मानसीं I नामें सांगेन परियेसीं I सातै जण ब्रह्मपुत्र II ९ II मरीचि अत्रि आंगिरस I पुलस्त्य पुलह क्रतु वसिष्ठ I सप्त पुत्र जाहले श्रेष्ठ I सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण II १० II सप्त पुत्रांमधील 'अत्रि' I तेथूनि पीठ गुरुसंतति I सांगेन ऐक एकचित्तीं I सौभाग्यवंता नामधारका II ११ II अत्रिऋषीची भार्या I नाम तिचें 'अनसूया ' I पतिव्रताशिरोमणिया I जगदंबा तेचि जाण II १२ II तिचें सौंदर्यलक्षण I वर्णूं शके ऐसा कोण I जिचा पुत्र चंद्र आपण I तिचें रूप केवीं सांगों II १३ II पतिसेवा करी बहुत I समस्त सुरवर भयाभीत I स्वर्गैश्वर्य घेईल त्वरित I म्हणोनि चिंतिती मानसीं II १४ II इंद्रादि सुरवर मिळूनि I त्रिमूर्तीपाशीं जाऊनि I विनविताति प्रकाशोनि I आचार अत्रिऋषीचा II १५ II इंद्र म्हणतसे स्वामियां I पतिव्रता स्त्री अनसूया I आचार तिचा अगम्य I काय सांगों विस्तारोनि II १६ II पतिसेवा करी भक्तीसीं I मनोवाक्कायकर्मेसीं I अतिथीपूजा महाहर्षी I विमुख नव्हे कवणे काळीं II १७ II तिचा आचार देखोनि I सूर्य भीतसे गगनीं I उष्ण तिसी लागे म्हणोनि I मंद मंद तपतसे II १८ II अग्नि झाला अति भीत I शीतळ असे वर्तत I वायु झाला भयचकित I मंद मंद वर्ततसे II १९ II भूमि आपण भिऊनि देखा I नम्र जाहली तिचिया पादुका I शाप देईल म्हणोनि ऐका I समस्त आम्ही भीतसों II २० II नेणों घेईल कवण स्थान I कवण देवाचें हिरोन I एखादिया वर देतांचि क्षण I तोही आमुतें मारुं शके II २१ II त्यासि करावा उपावो I तूं जगदात्मा देवरावो I जाईल आमुचा स्वर्गठावो I म्हणोनि तुम्हां सांगो आलों II २२ II न कराल जरी उपाव यासी I सेवा करूं आम्ही तिसी I तिच्या द्वारी अहर्निशीं I राहूं चित्त धरुनि II २३ II ऐसें ऐकोनि त्रयमूर्ति I महाक्रोधें कापती I चला जाऊं कैसी सती I पतिव्रता म्हणताति II २४ II व्रतभंग करूनि तिसी I ठेवूनि येऊं भूमीसी I अथवा वैवस्वतालयासी I पाठवूं म्हणोनि निघाले II २५ II वास पाहावया सतीचें I त्रयमूर्ति वेष धरिती भिक्षुकाचे I आश्रमा आले अत्रीचे I अभ्यागत होऊनि II २६ II ऋषि करावया गेला अनुष्ठान I मागें आले त्रयमूर्ति आपण I अनसूयेसी आश्वासून I अतिथि आपण आलों म्हणती II २७ II क्षुधेंकरुनि बहुत पीडोन I आलों आम्ही ब्राह्मण I त्वरित द्यावें सती अन्न I अथवा जाऊं आणिका ठायां II २८ II सदा तुमच्या आश्रमांत I संतर्पण अभ्यागत I ऐकिली आम्ही कीर्ति विख्यात I म्हणोनि आलों अनसूये II २९ II इच्छाभोजनदान तुम्ही I देतां म्हणोनि ऐकों आम्ही I ठाकोनि आलों याचि कामीं I इच्छाभोजन मागावया II ३० II इतुकें ऐकोनि अनसूया I नमन केलें अतिविनया I बैसकार करूनियां I क्षालन केलें चरण त्यांचे II ३१ II अर्घ्य पाद्य देऊनि त्यांसी I गंधाक्षतापुष्पेसीं I सवेंचि म्हणतसे हर्षी I आरोगण सारिजे II ३२ II अतिथि म्हणती तये वेळी I करोनि आलों आपण आंघोळी I ऋषि येतील बहुतां वेळीं I त्वरित आम्हांसी भोजन द्यावें II ३३ II वास पाहोनि अतिथींतें I काय केलें पतिव्रतें I ठाय घातले त्वरितें I केला तेथें बैसकार II ३४ II बैसवोनियां पाटावरी I घृतेसीं पात्राभिधार करी I घेवोनि आली अनसूया नारी I शाक पाक तये वेळीं II ३५ II तिसी म्हणती अवो नारी I आम्ही अतिथि आलों दूरी I देखोनि तुझें रूप सुंदरी I अभीष्ट मानसीं आणिक वसे II ३६ II नग्न होऊनि आम्हांसी I अन्न वाढावें परियेसीं I अथवा काय निरोप देसी I आम्ही जाऊं नाहीं तरी II ३७ II ऐकोनि अतिथींचे वचन I अनसूया करी चिंतन I आले विप्र पहावया मन I पुरुष कारणिक होतील II ३८ II पतिव्रताशिरोमणी I विचार करी अंतःकरणीं I अतिथि विमुख, तपोहानि I पतिनिरोप केवी उल्लंघूं II ३९ II माझें मन असे निर्मळ I काय करील मन्मथ खळ I पतीचें असे जरी तपफळ I तारील मज म्हणतसे II ४० II ऐसें विचारूनि मानसीं I तथास्तु म्हणे तयासी I भोजन करा स्वचित्तेंसी I वाढीन नग्न म्हणतसे II ४१ II पाकस्थाना जाऊनि आपण I चिंतन करी पतीचे चरण I वस्त्रें फेडूनि झाली नग्न I म्हणे अतिथि बाळें माझीं II ४२ II नग्न होऊनि सती देखा I घेऊनि आली अन्नोदका I तंव तेचि जाहलीं बाळकां I ठायांपुढें लोळतीं II ४३ II बाळकें देखोनि अनसूया I भयचकित होऊनियां I पुनरपि वस्त्रें नेसूनियां I आली तयां बाळकांपाशीं II ४४ II रोदन करिताति तिन्ही बाळें I अनसूया राहवी वेळोवेळें I क्षुधार्त झालीं केवळें I म्हणोनि कडे घेतलें II ४५ II कडे घेवोनि बाळकांसी I स्तनपान देतसे हर्षी I एका सोडोनी एकासी I निवारण करीं क्षुधेचें II ४६ II पाहें पां नवल काय घडलें I त्रयमूर्तीचे बाळक झाले I स्तनपानमात्रें क्षुधा गेली I तपफळ ऐसें पतिव्रतेचें II ४७ II ज्याचे उदरी चवदा भुवने I सप्त समुद्र वडवान्न I त्याची क्षुधा निवारण I पतिव्रतास्तनपानमात्रें II ४८ II चतुर्मुख ब्रह्मयासी I सृष्टि रचणें अहर्निशी I त्याची क्षुधा स्तनपानेसीं I केवीं झाली निवारण II ४९ II भाळाक्ष कर्पूरगौर I पंचवक्त्र काळाग्निरुद्र I स्तनपान करवी अनसूयासुंदर I तपस्वी हो अत्रि ऐसा II ५० II अनसूया ऐशी अत्रीची रमणी I न होती मागें ऐकिली कवणीं I त्रयमूर्तीची झाली जननी I ख्याति झाली त्रिवभूनी II ५१ II कडे घेवोनि बाळकांसी I खेळवीतसे तिघांसी I घालूनि बाळकां पाळणेसीं I पर्यंदे गाई तये वेळीं II ५२ II पर्यंदे गाय नानापरी I उपनिषदार्थ अतिकुसरीं I अतिउल्हासें सप्त स्वरीं I संबोखीतसे त्रिमूर्तीसी II ५३ II इतुकें होतां तये वेळीं I माध्यान्हकाळीं अतिथिवेळीं I अत्रिऋषि मन निर्मळीं I आले आपुले आश्रमा II ५४ II घरांत आला अवलोकित I तंव देखिली अनसूया गात I कैंची बाळें ऐसें म्हणत I पुसतसे तयेवेळीं II ५५ II तिणें सांगितला वृत्तांत I ऋषि ज्ञानें असे पहात I त्रिमूर्ति हेचि म्हणत I नमस्कार करीतसे II ५६ II नमस्कारितां अत्रि देखा I संतोष विष्णु-पिनायका I आनंद झाला चतुर्मुखा I प्रसन्न झाले तये वेळीं II ५७ II बाळें राहिली पाळणेंसी I निजमूर्ति ठेले सन्मुखेंसी I साधु-साधु अत्रिऋषि I अनसूया पतिव्रता II ५८ II तुष्टलों तुझिये भक्तीसी I वर माग जे इच्छिसी I अत्रि म्हणतसे सतीसी I जें वांछिसी तें माग आतां II ५९ II अनसूया म्हणे अत्रीसी I प्राणेश्वरु तूंचि होसी I देव पातले तुमचे भक्तीसी I पुत्र मागा तुम्ही आतां II ६० II तिघे बाळक आमच्या घरीं I राहावे आमुच्या पुत्रांपरी I हेंचि मागणें निर्धारीं I त्रिमूर्ति असावे एकरूप II ६१ II ऐसें वचन ऐकोनि I वर दिधला मूर्ती तिन्हीं I राहतीं बाळकें म्हणोनि I आपण गेले निजालयासी II ६२ II त्रिमूर्ति राहिले तिचे घरी I अनसूया पोशी बाळकांपरी I नामें ठेविलीं प्रीतिकरीं I त्रिवर्गाचीं परियेसा II ६३ II ब्रह्मामूर्ति 'चंद्र' झाला I विष्णुमूर्ति 'दत्त' केवळा I ईश्वरातें 'दुर्वास' नाम ठेविलें I तिघे पुत्र अनसूयेचे II ६४ II दुर्वास आणि चंद्र देखा I उभे राहूनि माताभिमुखा I निरोप मागती कवतुका I जाऊं तपा निजस्थाना II ६५ II दुर्वास म्हणे अहो जननी I आम्ही ऋषि अनुष्ठानी I जाऊं तीर्थे-आचरणीं I म्हणोनि निरोप घेतला II ६६ II चंद्र म्हणे अवो माते I निरोप द्यावा आम्हां त्वरितें I चंद्रमंडळीं वास आमुतें I नित्य दर्शन तुम्हांचरणीं II ६७ II तिसरा दत्त विष्णुमूर्ति I असेल तुम्हांतें धरोनि चित्तीं I त्रिमूर्ति निश्चित म्हणोनि सांगती I हें मनीं धरावें तुम्हीं II ६८ II त्रयमूर्ति तोचि जाण दत्त I ' सर्वं विष्णुमयं जगत् ' I राहील धरोनि तुमचें चित्त I श्रीविष्णुमूर्ति दत्तात्रेय II ६९ II त्रयमूर्ति ऐक्य होऊन I दत्तात्रेय राहिला आपण I दुर्वास चंद्र निरोप घेऊन I गेले स्थाना आपुलाले II ७० II अनसूयेच्या घरीं देखा I त्रयमूर्ति राहिली मूर्ति एका I नाम दत्तात्रेय ऐका I मूळपीठ श्रीगुरूचें II ७१ II ऐसेपरी सिद्ध देखा I सांगे कथा नामधारका I संतोषेंकरूनि प्रश्र्न ऐका I पुसतसे सिद्धासी II ७२ II जय जया सिद्ध योगीश्वरा I भक्तजनाच्या मनोहरा I तारक संसारसागरा I ज्ञानमूर्ति कृपासिंधु II ७३ II तुझेनि प्रसादें मज I ज्ञान उपजलें, सतीकाज I तारक आमुचा योगिराज I विनंति माझी परियेसा II ७४ II दत्तात्रेयाचा अवतारू I सांगितला पूर्वापारू I पुढें मागुती अवतार जाहले गुरु I कवणेपरी निरोपावे II ७५ II विस्तारुनि बाळकासी I सांगावें स्वामी प्रीतीसीं I श्रीगुरूमूर्ति अवतार जाहले कैसी I अनुक्रमें निरोपावें II ७६ II म्हणे सरस्वती गंगाधरू I पुढील कथेचा विस्तारू I ऐकतां होय मनोहरु I सकळाभीष्टे साधती II ७७ II

IIइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे त्रैमूर्ति-अवतारकथनंनाम चतुर्थोSध्यायः II 

II श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु II श्रीगुरुदेवदत्त II


Dec 1, 2017

॥ श्री दत्तजन्माख्यान ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ जयजयावो गजवदना ॥ मंगलारंभी तुझीच प्रार्थना ॥ वंदितां हो तुझिया चरणा ॥ ग्रंथ पावो सिद्धीसी ॥१॥ जयजयावो सरस्वती ॥ आदिमाया तूंचि शक्ति ॥ बैसनि माझे जिव्हेवरुती ॥ ग्रंथ सिद्धी नेइंजे ॥२॥ जयजयावो गुरुनाथा ॥ कृपाकर ठेवूनि माझिया माथां ॥ सिद्धीस न्यावें या ग्रंथा ॥ हाचि वर मज द्यावा ॥३॥ तुमचें होतां कृपाबळ ॥ ग्रंथ सिद्धीसि जाय सकळ ॥ हें वेदवाक्य जाश्वनीळ ॥ पुराणांतरीं बोलतसे ॥४॥ ॐ नमोजी श्रीदत्ता ॥ गुणातीता अपरिमिता ॥मूळमायाविरहिता ॥ जगतारका जगद्गुरु ॥५॥ पूर्णब्रह्म सनातना ॥ निष्कलंका निरंजना ॥ हे शून्यातीतनिर्गुणा ॥ गुणनिर्गुणातीत तूं ॥६॥ जयजयावो अत्रिनंदना ॥ जयजयावो परात्परगहना ॥ जयजयावो मधुसूदना ॥ कृपागहना जगद्गुरू ॥७॥ जयजयावो दिगंबरा ॥ जयजयावो करुणाकरा ॥ जयजयावो दयासागरा ॥ करुणार्णवा दीनबंधु ॥८॥ जयजयावो भक्तपालका ॥ जयजयावो जगव्यापका ॥ जयजयावो जगन्नायका ॥ कृपा करीं दीनावरी ॥९॥ जयजयावो अवधूता ॥ जयजयावो विश्वकर्ता ॥ जयजयावो कृपावंता ॥ अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ति ॥१०॥ ऐसा महाराज गुरुदत्त ॥ त्यांचे माहात्म्य ऐसें वर्णीत ॥ चित्त देवोनि सावचित्त ॥ ऐका सकळ श्रोते हो ॥११॥ पूर्वीं नारदें तप अपार केलें ॥ तयासी श्रीविष्णु प्रसन्न जाहले ॥ वर द्यावयासी आले ॥ मग तेणें केला प्रणिपात ॥१२॥ करोनि साष्टांग नमस्कार ॥ उभा राहिला जोडोनि कर ॥ जयजय विष्णु करुणाकर ॥ अपेक्षित वर देइंजे ॥१३॥ अवघे रजोगुण तमोगुण ॥ हे द्वयविरहित करून ॥ मुख्य सत्त्वरूप जाण ॥ तें दाखवीं मजलागीं ॥१४॥ ऐसें बोलतां नारदमुनी ॥ सांगता जाहला कैवल्यदानी ॥ ऐक सखया चित्त देऊनी ॥ सत्त्वरूपाचा विचार ॥१५॥ त्रिभुवनींचें सत्त्वरूप जें ॥ तें मीच आहें बा जाणिजे ॥ परी तम मजसी पाहिजे ॥ म्हणोनि सत्त्व कमी हो ॥१६॥ ऐसें बोलतां मोक्षदानी ॥ नारदमुनि जोडोनि पाणी ॥ विचारिता जाहला तये क्षणीं ॥ तम कासया सांग पां ॥१७॥ मग श्रीविष्णु बोलत ॥ जरी मी सत्त्वरूपीं राहात ॥ तरी माझेनि हस्तें दैत्य ॥ मरणार नाहीं सहसाही ॥१८॥ हें जाणोनियां मानसीं ॥ किंचित् सत्त्व विधिहरांसी ॥ देऊनियां तमोगुणासी ॥ रजोगुणासी जवळ केलें ॥१९॥ ऐसा विचार आहे नारदा ॥ जरी तुज पाहिजे सत्त्वगुणसंपदा ॥ तरी एक आहे ब्रह्मवृंदा ॥ सांगतों सकळ परियेसीं ॥२०॥ जरी ब्रह्माविष्णुत्रिनेत्र ॥ तिघे होतील एकत्र ॥ तरीच सत्त्वरूप स्वतंत्र ॥ दृष्टीं पडेल जाण पां ॥२१॥ ऐसें ऐकूनि उत्तर ॥ बोलतां जाहला मुनिवर ॥ त्रिपुरांतक विधि चक्रधर ॥ करितों एकत्र जाण पां ॥२२॥ ऐसें बोलोनि ते वेळीं ॥ नारद आले भूमंडळीं ॥ तटस्थ जाहली सुरमंडळी ॥ हा संवाद ऐकोनियां ॥२३॥ भुमंडळीं नारदमुनी ॥ विचार करी अंतःकरणीं ॥ ब्रह्मा विष्णु शूळपाणी ॥ एकत्र कैसे होती ते ॥२४॥ ऐसा विचार करीत ॥ त्रिभूवनीं नित्य हिंडत ॥ तंव एके दिवशीं अवचित ॥ अत्रिसदना पातला ॥२५॥ ऋषि नव्हता आश्रमांत ॥ उभा राहिला ब्रह्मसुत ॥ अनसूयेनें देखोनि त्वरित ॥ आसन दिधले बैसावया ॥२६॥ आसनीं बैसवूनि नारदमुनी ॥ आपण कांडणा बैसे अंगणीं ॥ इतुकियांत अत्रिमुनी ॥ अकस्मात पातला ॥२७॥ स्त्रियेप्रती बोले उत्तर ॥ उदक देई वो सत्वर ॥ ऐसें ऐकतांचि ते सुंदर ॥ उठती झाली ते काळीं ॥२८॥ मुसळ गेलें हातें वरुतें ॥ तें तसेंच सोडिलें तेथें ॥ आणोनि दिधली पतीतें ॥ उदकझारी तेधवां ॥२९॥ ऐसें देखोनि ब्रह्मसुत ॥ मनांत तेव्हां आश्चर्य करीत ॥ धन्य धन्य माऊली सत्य ॥ अनसूया सती हो ॥३०॥ मनीं विचारीं नारदमुनी ॥ अनसूया पतिव्रतेमाजीं शिरोमणी॥हिचे दर्शनेंकरूनी ॥ दोष जातील निर्धारें ॥३१॥ मग तेथोनि नारद निघाला ॥ मनांत विचार एक योजिला ॥ आतां जाऊनि वैकुंठाला ॥ लक्ष्मीपाशीं सांगावें ॥३२॥ तेणें होईल कार्यसिद्धी ॥ हें जाणोनियां आत्मशुद्धी ॥ तेथूनि निघाला त्रिशुद्वी ॥ पवनवेगें करुनियां ॥३३॥ वैकुंठासी जाऊनि सत्वर ॥ लक्ष्मीपाशी समाचार ॥ सांगता झाला मुनीश्वर ॥ अनसूयेचा तेधवां ॥३४॥ नारद सांगे लक्ष्मीलागोनी ॥ अनसुया सती अत्रिपत्नी ॥ त्रिभुवनांत पाहतां शोधोनी ॥ तिची सरी न येचि पां ॥३५॥ पतिव्रतांमाजीं शिरोमणी ॥ स्वरूपें जैसी लावण्यखाणी ॥ तिचें चातुर्य पाहतां नयनीं ॥ परमानंद वाटतसे ॥३६॥ हा सकळ वृत्तांत ऐकतां ॥ लक्ष्मी जाहली विस्मितचित्ता ॥ म्हणे मृत्युलोकीं पतिव्रता ॥ ऐसी सत्त्वरक्षक आहे कीं ॥३७॥ तरी आतां श्रीविष्णूसी पाठवूनी ॥ तिचें सत्त्व घेईन हिरोनी ॥ ऐसे ऐकतां नारदमुनी ॥ परम संतोष पावला ॥३८॥ मग तेथूनि नारद निघाला ॥ मनोवेगें कैलासासी गेला ॥ पार्वतीसी वृत्तांत सांगितला ॥ लक्ष्मीसारिखा तेधवां ॥३९॥ वृत्तांत ऐकूनि पार्वती ॥ विस्मित जाहली परम चित्तीं ॥ म्हणे नारद सांगती कीर्ती ॥ काय आश्चर्य मानवाचें ॥४०॥ नारद म्हणे वो मृडानी ॥ अनसूयेचे तुलनेलागुनी ॥ तुंही न पुरसी गजास्यजननी ॥ ऐसें मज वाटतसे ॥४१॥ उमा ऐकूनि ते अवसरीं ॥ परम क्रोधावली अंतरी ॥ आदिमाया निर्धारीं ॥ काय बोले ब्रह्मसुतासी ॥४२॥ आतां धाडून कैलासपती ॥ सत्त्वहरण करीन निश्चितीं ॥ ऐसें बोलतां पार्वती ॥ नारदासी आनंद ॥४३॥ मग नारद निघाला तेथुनी ॥ गेला सत्यलोकलागुनी ॥ सर्व वृत्तांत पूर्ववत सांगोनी ॥ सावित्री तेव्हां क्षोभविली ॥४४॥ सावित्री क्षोभली हें देखतां ॥ आनंद वाटे ब्रह्मसुता ॥ म्हणे आपुलें कार्य आतां ॥ सत्वरचि होईल ॥४५॥ ऐसें विचारुनि चित्तीं ॥ नारद निघाला पवनगती ॥तंव ते समयीं त्रैमूर्ती ॥ आपुलाले स्थाना पातले ॥४६॥ तंव स्त्रिया वृत्तांत सांगती ॥ मृत्युलोकीं मानव वस्ती॥ त्यांत एक अनसूया सती ॥ आहे पहा ऋषिपत्नी ॥४७॥ पतिव्रतांमाजी शिरोमणी । स्वरूपें असे लावण्यखाणी ॥ नारदमुनि सांगोनी ॥ गेला आतां निर्धारें ॥४८॥ तरी जाऊनि अत्रिआश्रमासी ॥ तिचें सत्त्व हरावें निश्चयेंसी ॥ ऐसें ऐकोनि हृषीकेशी ॥ ब्रह्मा त्रिनयन अवश्य म्हणे ॥४९॥ विधि रुद्र शार्ङ्गगणी ॥ त्रैमूर्ति एकत्र मिळोनी ॥ अत्रिमुनीच्या सदनीं ॥ येऊनि उभे राहिले ॥५०॥ द्विजरूप धरूनि जाण ॥ उभे राहिले  अंगणीं येऊन ॥ हें अनसूयेनें देखोन ॥ आसन दिधलें बैसावया ॥५१॥ आसनीं बैसतां सत्वर ॥ म्हणती क्षुधा लागली फार ॥ नग्न होऊनि निर्धार ॥ इच्छाभोजन देईजे ॥५२॥ ऐसें ऐकोनि ते सती ॥ विस्मय करी बहुत चित्तीं ॥ काय बोले तयांप्रती ॥ ऐका सादर श्रोते हो ॥५३॥ अवश्य म्हणोनी ते अवसरीं ॥ गृहांत गेली हो सुंदरी ॥ पतीलागीं निवेदन करी ॥ नमस्कारूनि तेधवां ॥५४॥ ऋषि अंतरीं विलोकोनी ॥ पाहे जंव आत्मज्ञानी ॥तंव चतुर्मुख रुद्र पन्नगशयनीं ॥ छळणालागीं पातले ॥५५॥ हें जाणोनिया मानसीं ॥ तीर्थगंडी देई कांतेसी ॥ गंगा प्रोक्षूनि तिघांसी ॥ भोजन देई जाण पां ॥५६॥ तीर्थगंडी घेऊनि सत्वरी ॥ बाहेर आली ते सुंदरी ॥ गंगोदक प्रोक्षण करी ॥ त्रैमूर्तीवरी तेधवां ॥५७॥ गंगोदकाचा स्पर्श होतां ॥ बाळें जाहलीं हो तत्वतां ॥ हें देखोनि पतिव्रता ॥ काय करी ते वेळ ॥५८॥ कंचुकीसहित परिधान ॥ फेडूनि ठेवी न लगतां क्षण ॥ नग्न होवोनियां जाण ॥ बाळांजवळी बैसतसे ॥५९॥ बाळें घेऊनि मांडीवरी ॥ स्तनीं लावी तेव्हां सुंदरी ॥ पान्हा फुटला ते अवसरीं ॥ देखोनि सती आनंदे ॥६०॥ तिन्ही बाळें शांत करुन ॥ पाळण्यांत निजवी नेऊन ॥ जन्मकथा सांगोन ॥ हालवीतसे निजछंदें ॥६१॥ ऐसे कित्येक संवत्सर लोटले ॥ तंव नारद अकस्मात पातले ॥ अत्रिमुनीनें आसन दिधलें ॥ बैसावया नारदासी ॥६२॥ तंव नारद विलोकोनि पहात ॥ ब्रह्मा चतुर्भुज कैलासनाथ ॥ हे तिन्ही बाळ खेळत ॥ मठामाजी कौतुकें ॥६३॥ ऐसें दखोनि ब्रह्मसुत ॥ मुनीं जाहला हर्षभरित ॥ आतां जाऊनि वैकुंठांत ॥ लक्ष्मी पाशीं सांगावें ॥६४॥ ऐसें विचारोनि चित्तीं ॥ नारद निघाला पवनगती ॥ जाऊनियां वैकुंठाप्रती ॥ लक्ष्मीसी पुसतसे ॥६५॥ म्हणं वो आदिमाये वाहिले ॥ श्रीविष्णु कोठें गेले ॥ ऐसे ऐकून लक्ष्मी बोले ॥ सुतसुतासी तेधवां ॥६६॥ ऐक सखया विरिंचिसुता ॥ मी नेणें विष्णूची वार्ता ॥ ऐसें सिंधुजा सांगतां ॥ सृष्टिकरसुत बोलतसे ॥६७॥ कर्ममुपीसी अतिपावन ॥ अत्रि-आश्रम आहे जाण ॥ तें ठायीं जनार्दन ॥ विधिहरांसह वसतसे ॥६८॥ ऐसें सांगोन कमळजेप्रती ॥ नारद गेला कैलासपथीं ॥ गिरिजेस सांगोन निश्चितीं ॥ सत्यलोकासी ॥ जातसे ॥६९॥ नारद आला हें पाहोन ॥ सावित्री पुसे वर्तमान ॥ म्हणे नारदा ऐक वचन ॥ चित्त दऊनि निर्धारें ॥७०॥ नारद म्हणे सावित्रीसी ॥ काय हो मजलागीं पुससी ॥ येरी म्हणे चतुर्वक्त्र पंचवक्त्र हृषीकेशी ॥ कोठें गेले सांग पां ॥७१॥ विधिसुत म्हणे ते अवसरीं ॥ सावित्री सांगतों तें अवधारीं ॥ चतुर्भुज चतुर्वक्त्र द्विपंचकरी ॥ मृत्युलोकीं वसताती ॥७२॥ ऐसें बोलतां ब्रह्मपुत्र ॥ तिघी मिळाल्या एकत्र ॥ जोडोनियां पाणिपात्र ॥ नारदासी विचारिती ॥७३॥ पूर्वीपासोनि वृत्तांत ॥ नारद कैसा सांग त्वरित । येरू म्हणे ऐका त्वरित ॥ चित्त देऊनि पूर्वींचा ॥७४॥ अत्रिमुनीचे आश्रमासी ॥ तुम्हीं पाठविलें छळणासी ॥ ऐसें सांगती नारदासी ॥ काय बोलिल्या तेधवां ॥७५॥ अत्रिआश्रम कर्मभूमीसी ॥ कोठें आहे सांग आम्हांसी ॥ आम्ही जाऊं तया ठायासी ॥ घेऊनि येऊ भ्रतार ॥७६॥ ऐसें ऐकतां ब्रह्मसुत ॥ तिघींपती काय बोलता ॥ माझिया मागें यावें त्वरित ॥ दाखवीन तुम्हांसी ॥७७॥ दुरूनि दाखवीन आश्रमासी ॥ मी न यें हो तया ठायासी ॥ ऐसें बोलोन तिघींसी । विधिसुत घेऊनि निघाला ॥७८॥ पुढें जातसे नारदमुनी । मागें येताती तिघीजणी ॥ आश्रमासमीप येऊनि ॥ उभा राहिला ब्रह्मसुत ॥७९॥ उमा सावित्रींसह लक्ष्मीसी ॥ पहा म्हणे आश्रमासे ॥ येरी म्हणती नारदासी ॥ चाल आतां मठांत ॥८०॥ नारद म्हणे मी न यें आश्रमांत ॥ तुम्हींच जावें यथार्थ ॥ ऐसें ऐकोनियां त्वरित ॥ आश्रमांत प्रवेशल्या ॥८१॥ तंव ते पतिव्रता महासती । जिची त्रिभुवनांत जाहली कीर्ती ॥ ती मांडीवरी घेऊनि त्रैमूर्ती ॥ खेळवीतसे आनंदें ॥८२॥ हें देखोनि उमा रमा सावित्री ॥ नमस्कार घालिती धरित्री ॥ धन्य धन्य ऋषी अत्री ॥ धन्य अनसूया सती हो ॥८३॥ मग उठोनिया सत्वर ॥ उभ्या राहिल्या जोडोनि कर ॥ अनसूयेनें देखोनि साचार ॥ पुसती जाहली तयांतें ॥८४॥ कोण तुम्ही सांगा त्वरित ॥ काय अपेक्षित असेल चित्त ॥ तें सांगावें निश्चित ॥ देईन जाण तुम्हांतें ॥८५॥ हें ऐकोनियां निश्चितीं ॥ सावित्री लक्ष्मी पार्वती ॥ बोलत्या झाल्या अनसूयेप्रती ॥ पति आम्हांतें देईजे ॥८६॥ येरी म्हणे तुमचे पती ॥ कोठें आहेत सांगा निश्चितीं ॥ ऐसें ऐकोनि पार्वती ॥ सावित्री लक्ष्मी काय बोले ॥८७॥ शिव ब्रह्मा वैकुंठपती ॥ माते हे जाणिजे आमुचे पती ॥ तुझे घरीं बाळें निश्चितीं ॥ होऊनि क्रीडाती स्वच्छंदें॥८८॥ ऐसें अनसूयेनें ऐकुनी ॥ गृहांत गेली उठोनी ॥पतीलागीं नमस्कारूनी ॥ सर्व वृत्तांत सांगितला ॥८९॥ ऐकोनि तेव्हां ऋषि बोलत ॥ तीर्थगंडी नेई त्वरित ॥ गंगा प्रोक्षून पूर्ववत ॥ करूनि देई जाण पां ॥९०॥ ऐसें ऐकूनि ते अवसरी ॥ तीर्थगंडी घेतली सत्वरीं ॥ बाहेर येऊनि झडकरी ॥ काय बोलली तिघींतें ॥९१॥ तुमचे पति निश्चित ॥ खेळताती आंगणात ॥ ते घेऊनियां त्वरित ॥ जावे आपुले स्वस्थाना ॥९२॥ हें ऐकोनि मृडानी ॥ सावित्री लक्ष्मी तिघीजणी ॥बोलत्या जाहल्या सतीलागोनी ॥ वोळख आम्हासी पुरेना ॥९३॥ तरी माते तूंचि जाण ॥ पूर्ववत देई वो करून ॥ ऐसें तीस नमस्कारून ॥ प्रार्थित्या झाल्या तेधवां ॥९४॥ निरभिमानी जाहल्या चित्तीं ॥ हें देखोनि अनसूयासती ॥ काय बोले तिघींप्रती ॥ देतें निश्चितीं पति तुम्हां ॥९५॥ मग तिनें गंगोदक प्रोक्षून ॥ विधि नीलकंठ नीलवर्ण ॥ त्रैमूर्ति पूर्ववत करून ॥ दाखविल्या सर्वांतें ॥९६॥ तंव ऋषी जाहला बोलता ॥ आम्हांलागीं टाकूनि जातां ॥ देवाधिदेवा हो काया आतां ॥ त्रैमूर्तींसी बोलतसे ॥९७॥ अत्रि अनसूया ऐसें बोलती ॥ हें ऐकोनि त्रैमूर्ती ॥ बोलते झाले ऋषीप्रती ॥ आम्हांसि येथूनि न जाववे ॥९८॥ तंव अकस्मात नारद पातला ॥ श्रीविष्णूसी नमस्कार केला ॥ म्हणे आतां त्रैमूर्तीं एक जाहलां ॥ दाखवा कोठें सत्त्वरूप ॥९९॥ माझें पूर्वपुण्य फळा आलें ॥ त्रिगुणात्मक ऐक्य जाहलें ॥ हें ऐकोनि देव बोलिले ॥ नारदासी तेधवां ॥१००॥ तुम्हीं पूर्वीं प्रयत्न केला अमूप ॥ युगयुगादि तप ॥ तरी पाहें बां आजि सत्त्वस्वरूप ॥ डोळेभरी नारदा ॥१०१॥ तो दिवस परमपावन ॥ ऐका त्याचें नामाभिधान ॥ सांगतसें सविस्तर पूर्ण ॥ चित्त देवोनि ऐकावें ॥१०२॥ मासांमाजीं मार्गेश्वर ॥ उत्तम महिना प्रियकर ॥ तिथीमाजी तिथी थोर ॥ चतुर्दशी शुद्ध पैं ॥१०३॥ वार बुधवार कृतिका नक्षत्र ॥ ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ॥ तिघे मिळोनि एकत्र ॥ शुद्ध सत्त्व निवडिलें ॥१०४॥ त्रैमूर्तीचें सत्त्व मिळोन ॥ मुर्तिं केली असे निर्माण॥ ठेविते झाले नामभिधान ॥ दत्तात्रेय अवधूत ॥१०५॥ हा सोहळा देखोनि अनसूया सती ॥ हर्षभरित जाहली चित्तीं ॥ म्हणे परब्रह्म सत्त्वमूर्ती ॥ दृष्टीं पडला आज हो ॥१०६॥ धन्य धन्य भाग्य आजिचें ॥ निधान देखिलें त्रिभुवनींचें ॥ फळ पावलें पूर्वपुण्याचें ॥ जन्मोजन्मींचें येधवां ॥१०७॥ तंव इंद्रादिक सुरवर ॥ येते जाहले सत्वर ॥ करुनी साष्टांग नमस्कार ॥ उभे राहिले बद्धांजली ॥१०८॥ पूजा करूनि षोडशोपचार ॥ उभे राहिले जोडोनि कर ॥ नारद तुंबर गंधर्व किन्नर ॥ गायन करिती एकसरें ॥१०९॥ यथाविधि पुजा करून ॥ स्तुति करी ब्रह्मनंदन ॥ तैसाचि तो सहस्त्रनयन ॥ स्तवन करी प्रीतीनें ॥११०॥ जयजयावो अत्रिनंदना ॥ जयजयावो कृपाघना ॥ जयजयावो मधुसूदना ॥ पूर्ण ब्रह्मा सनातन तूं ॥१११॥ जयजयावो करुणाकरा ॥ जयजयावो दयासागरा ॥ जयजयावो कृपाकरा ॥ त्रिगुणात्मका दयाब्धी ॥११२॥ जयजयावो निर्विकारा ॥ जयजयावो अत्रिकुमरा ॥ तूं परात्पराचा सोयरा ॥ भवतारक भवाब्धी ॥११३॥ जंव तुमची कृपा होत ॥ तंव मुक तो होय पंडित ॥ तयासी काय न्युन पदार्थ ॥ त्रिभुवनींही असेना ॥११४॥ गुरुकृपा होतां पूर्ण ॥ तयासी होय ब्रह्मज्ञान । हें पुराणांतरीं वचन ॥ ब्रह्मादिक बोलती ॥११५॥ ऐसी स्तुति जंव करीत ॥ तवं प्रसन्न झाला कृपाघन दत्त ॥ देता जाहला अपेक्षित ॥ वरदान वेधवां ॥११६॥ कोणी करील आराधन ॥ उपासना विधियुक्त पूर्ण ॥ तये ठायीं रात्रंदिन ॥ मी राहीन जाण नारदा ॥११७॥ दत्तात्रेय नामेंकरून ॥ कोणी करितां माझें स्मरण ॥ तत्काळ उभा राहीन ॥ सहस्त्रनयना जाण पां ॥११८॥ जो प्रातःकाळीं नित्यनेम ॥ दत्त दत्त उच्चारी नाम ॥ तयालागीं मी सकाम ॥ भेट देईन निर्धारें ॥११९॥ कोणतेही रूपेंकरून ॥ द्वादशमास भरतां पूर्ण ॥ तयालागीं मी भेटेन ॥ हें वचन सत्य सत्य ॥१२०॥ उपासना विधियुक्त करोनी ॥ गुरुवचनीं विश्वास ठेवोनी ॥ जो रात्रंदिन माझे ध्यानीं ॥ लक्ष लावील नारदा ॥१२१॥ तयालागीं मी एकक्षण ॥ नारद न जाय कोठें टाकोन ॥ प्रातःकाळीं तयालागून ॥ भेट देईन प्रत्यक्ष ॥१२२॥ ऐसें देतां वरदान ॥ आनंदला ब्रह्मनंदन ॥ सुरादिक सहस्त्रनयन ॥ हर्षभरित जाहले ॥१२३॥ करूनियां जयजयकार ॥ सुमनें वर्षती सुरवर ॥ विमानारूढ शचीवर ॥ जाता झाला स्वस्थाना ॥१२४॥ ऐसा दत्तात्रेयजन्म पूर्ण ॥ ऐकती पढती रात्रंदिन ॥ तयांसी मी निजांगेकरून ॥ रक्षीन रक्षीन त्रिवाचा ॥१२५॥ हा ग्रंथ गृहामाजी असावा ॥ नित्यनेमें सप्रेमें पूजावा॥ देवपूजेमाजीं ठेवावा ॥ आदरेंकरूनि समस्तीं ॥१२६॥ त्याची फळश्रुती हेचि पूर्ण ॥ ऐश्वर्य चढे रात्रंदिन ॥यश कीर्ति सदा कल्याण ॥ प्राप्त होय तयांसी ॥१२७॥ स्वामीकृपेचा हा ग्रंथ ॥ वरी दाशरथीचा आशीर्वाद ॥ त्याचे चरणीं मस्तक ठेवीत ॥ मनोमाधव निजप्रेमें ॥१२८॥
इति श्रीदत्तजन्माख्यानं संपूर्णम् ॥