Dec 31, 2016

श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


आज पौष शुध्द २ , श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांची जयंती. 

दुपारी १२ वाजता महाराजांचा जन्मकाळ , जन्म स्थान : कारंजा. जन्मोत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडी.

माधवस्त्री अंबिका कारंज सती थोर l पूर्वजन्मी तिजसि श्रीवल्लभ वर ll

पुढील जमनी तव कुशि धरीन अवतार l म्हणवूनी आंबे कुशि आले ऐका तिथिवार ll

द्वितीया पौष शुध्द शततारावरी,l माध्यान्ही अवतरले नरहरि शनिवारी ll

आदौ माघ कृष्ण शुभ तिथी भृगुवारी l पुष्पासनी आरुढले त्रिगुण यतिधारी ll

जयदेव जयदेव जयजय त्रिगुणात्मा l श्री दत्त श्रीपाद नरहरी परमात्मा जयदेव जयदेव ll

कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान , "काळे वाडा".

श्री नृसिंह सरस्वतींचे संक्षिप्त चरित्र खाली दिले आहे.

श्री नृसिंह सरस्वती - संक्षिप्त चरित्र (इ.स. १३७८ ते १४५८)

श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते. पती-पत्नी दोघेही शिवभक्त होते. मुलाचे नाव जन्मतःच शाळिग्रामदेव असे ठेवले. नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले.

जन्मतःच हे मूल 'ॐ' कार हा शब्द म्हणू लागले. बालक मोठे होऊ लागले. तीन वर्षाचे झाले तरी 'ॐ' काराखेरीज एकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते. मुलगा सात वर्षाचा झाला तरीही 'ॐ' काराशिवाय काहीही बोलू लागला नाही. माधवराव व अंबा भवानी मनात फार कष्टी झाले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा, या गोष्टीमुळे ते पती-पत्नी खूप दुःखी बनली.

एक दिवस अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, ''बाळ, तू अवतारी पुरुष आहेस, युगपुरुष आहेस, असे ज्योतिषी सांगतात. आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास. तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे. तू शक्तिमान आहेस. तू बोलू का लागत नाहीस? तुझे बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे. तेवढी पुरी कर !'' मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की, माझी मुंज करून दिलीत की, मला सगळे काही बोलता येईल !''

व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरविण्यात आला. सर्व तयारी केली. मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले. मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी लोटली. माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजीबंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार केला. नरहरीने मनातल्या मानत गायत्री मंत्राचा उच्चार केला. उघडपणे केला नाही. लोक हसले; म्हणाले, ''मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार?''

अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून, ऋग्वेद म्हणून दाखवला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भाग व यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले. माधवराव व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा चारी वेद बोलून दाखवू लागला, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले.

नरहरी आपल्या आईला म्हणाले, ''आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे.'' हे ऐकून आईला फारच दुःख झाले.

''जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन.'' असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षा घेण्यास मान्यता दिली.

नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले.

श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ''आम्ह्ची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे.

जे जे असती माझ्या प्रेमी l

त्यांते प्रत्यक्ष दिसे नयनी l

लौकिकमते अविद्याधर्मी l

जातो श्रीशैल्ययात्रेसी ll

श्री गुरु म्हणाले, ''जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांति लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ''लौकिकमताने मी जात आहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.'' असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली.

तू भक्तजना कामधेनु l मनुष्यदेही अवतरोनु l

तुझा पार न जाणे कवणू l त्रैमूर्ती तूच होसी ll

श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.



सौजन्य : Shripad Joshi (श्री. श्रीपाद जोशी), श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी).


https://www.facebook.com/narsobachiwadi 


Dec 22, 2016

श्री बावनश्लोकी गुरुचरित्र


|| श्रीगणेशाय नमः ।| श्रीमद्दत्तात्रेयगुरवे नमः ॥

|| अथ ध्यानम् ॥

||श्‍लोक॥

दिगंबरं भस्मसुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च ।

पद्मासनस्थं रविसोमनेत्र्म दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदम् ॥१॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं ।

चक्रं गदाभूषितभूषणाढयं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥२॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः ।

द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥३॥

श्री गुरुचरित्र

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा ।

जयजयाजी लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥

श्‍लोक ॥ त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करुनि बोजा ।

सद्भक्त तेथें करिती आनंदा । त्या देव स्वर्गीं बघती विनोदा ॥२॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी ।

संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥३॥

ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती ।

साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥४॥

भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ ।

सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥५॥

तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी ।

कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥६॥

ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं ।

वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥७॥

गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्‍ती ।

तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥८॥

श्रीपाद कुरवपुरीं असताम । पुढें वर्तली कैसी कथा ।

विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥९॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी ।

अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥१०॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा ।

पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची ॥११॥

श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी ।

अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥१२॥

श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत ।

शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥१३॥

ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।

श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥१४॥

ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी ।

तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥१५॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत ।

सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥१६॥

ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी ।

तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥१७॥

ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्‍ति नोहे अंतःकरणीं |

कथामृत संजीवनी ।आणिक निरोपाची दातारा ॥१८॥

अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त ।

श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥१९॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी ।

गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥२०॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका ।

उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥२१॥

तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां ।

परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥२२॥

लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्‍तीसीं ।

नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥२३॥

शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी ।

ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥२४॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला ।

सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥२५॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्‍तीसी ।

वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥२६॥

चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी ।

पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥२७॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी ।

उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥२८॥

पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । 

निरुपावें विस्तारीं । सिद्धमुनी कृपासिंधू ॥२९॥

श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस ।

परि तृ‍प्‍त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥३०॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।

योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥३१॥

पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती ।

सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥३२॥

श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी ।

विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥३३॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि ।

तया काश्‍मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥३४॥

पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली ।

मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥३५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु ।

सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥३६॥

ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु ।

सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥३७॥

आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा ।

चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥३८॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका ।

साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥३९॥

सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका ।

वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥४०॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी ।

नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥४१॥

मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले ।

श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥४२॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी ।

सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥४३॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन ।

आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥४४॥

तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख ।

सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥४५॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु ।

लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥४६॥

सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र ।

ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥४७॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी ।

मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥४८॥

त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर ।

राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥४९॥

तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर ।

प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥५०॥

राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं ।

योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥५१॥

म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार ।

कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥५२॥

इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे

द्विपंचाशत् श्‍लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥


Dec 21, 2016

भवतारक या तुझ्या पादुका


भवतारक या तुझ्या पादुका वंदिन मी माथां । करावी कृपा गुरूनाथा ॥धृ०॥

बहु अनिवार हें मन माझें चरणीं स्थिर व्हावें । तव पदभजनी लागावें ॥

कामक्रोधादिक हे षड्रिपु समूळ छेदावे । हेंचि मागणें मला द्यावें ॥ चला ॥

अघहरणा करिं करुणा दत्ता धांव पाव आतां । करावी कृपा गुरूनाथा ॥१॥

तूंचि ब्रह्मा तूंचि विष्णु तूंचि उमाकांत । तूची समग्र दैवत॥ माता पिता इष्ट बंधू तूंचि गणगोत।

तूंचि माझें सकळ तीर्थ ॥ चाल ॥ तुजविण मी गा कांहिंच नेणें तूंची कर्ता हर्ता । करावी कृपा गुरूनाथा ॥२॥

तनमनधन हें सर्व अर्पुनी कुरवंडिन काया । उपेक्षूं नको गुरूराया ॥ कर्महीन मी, मतीहीन मी, सकळ श्रम वायां ॥

लज्जा राखीं गुरु सदया ॥ चाल ॥ मातृबालकापरि सांभाळीं तूंचि मुक्तिदाता । करावी कृपा गुरूनाथा ॥३॥

शेषा ब्रह्मया वेदां न कळे महिमा तव थोर । तेथें मी काय पामर ॥ वियोग नसुं दे तव चरणांचा हाचि देई वर ।

शिरीं या ठेवीं अभकर ॥ चाल ॥ हीच विनंती दर्शन द्यावें दासा रघुनाथा । करावी कृपा गुरूनाथा ॥४॥

===========================


श्रीगुरूचे चरणकंज हृदयीं स्मरावे ॥ध्रु०॥

निगमनिखिलसाधारण सुलभाहुनि सुलभ बहू । इतर योग योगविषयपंथिं कां शिरावें ? ॥१॥

नरतनुदृढनावेसी बुडवुनि अतिमूढपणें । दुष्ट नष्ट कुकर-सुकरतनु कां फिरावें ? ॥२॥

रामदास विनवी तुज अजुनि तरी समज उमज । विषयवीष पिउनियां फुकट कां मरावें ? ॥३॥

===========================


श्रीगुरुमहाराज गुरू जय जय परब्रह्म सद्गुरू ॥ध्रु०॥

चारी मुक्तीदायक दाता उदार कल्पतरू । जय०॥१॥

रूप जयाचें मन-बुद्धीपर वाचे अगोचरू । जय० ॥२॥

अलक्ष्य अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परू । जय० ॥३॥

बद्ध मुमुक्षू साधक शरणागता वज्रपंजरू । गुरू० ॥४॥

आत्मारामीं रामदास गोपाल करुणाकरू । गुरू० ॥५॥

===========================


झाल्यें बाई ! वेडी । दरबार गुरूचा झाडीं ॥ध्रु०॥

देहपीतांबर फाडिला । नवरत्‍नांचा हार काढिला । सद्गुरूचे गळां घातला । वासना सोडीं ॥ दरबार० ॥१॥

कल्पनाकाचोळी काढिली । त्रिगुणांची वेणी सोडिली । चारि देहांची मुक्ति साधिली । परी ती थोडी ॥ दर० ॥२॥

वेडी झाल्यें सद्गुरुघरची । चिंता हरपली मनाची । सोय दाखविलि स्वसरूपाची । लागली गोडी ॥ दर० ॥३॥

चिन्मयस्वरूप दाखवीलें । आपणामध्यें मेळवीलें । पूर्णानंद गुरुनें केलें । पाय न सोडीं ॥ दरबार० ॥४॥

===========================


तो मज आठवतो । गुरुराजा । प्राणविसांवा माझा ॥ध्रु॥

श्रवणीं पाजुनियां । अमृत । मस्तकिं ठेवुनि हस्त ॥१॥

विवेकसिंधूचीं । चिद्रत्‍नें । लेवविलीं मज यत्‍नें ॥२॥

अखंड देउनियां । स्मरणासी । द्वैतभयातें नासी ॥३॥

अक्षयप्राप्तीचा । सुखदाता । केशवकवि म्हणे आतां ॥४॥

===========================


Dec 19, 2016

॥ दत्तगुरु हें परब्रह्म आहे ॥


नरा दत्तगुरु हें परब्रह्म आहे । 

होई जागृत उगा फससि मोहें ॥ध्रु०॥


दत्तगुरु, मन्मनीं, दत्तगुरु लोचनीं । 

दत्तगुरु यद्वचनिं भरुनि कानीं ॥

दत्तगुरु बाहेरी, दत्तगुरु अंतरीं,

दत्त सर्वांतरीं भरुनि राहे ॥१॥


ब्रह्म हा दत्तगुरु, विष्णु हा दत्तगुरु ।

रुद्र हा दत्तगुरु सत्य आहे ॥

दत्तगुरु तारक, दत्तगुरु कारक ।

शक्तिधर लोकसाक्षीच आहे ॥२॥


दत्तगुरु वांचुनी किमपि नाहीं जनीं ।

दत्तगुरु वांचुनी सुरहि नोहे ॥

दत्तगुरु वांचुनी काय फळ वांचुनी ।

जाय फळ सोडुनी भोगिता हे ॥३॥


माय फळ पाजिते, काय फळ होय तें ।

जाय फळ पुण्य तें भोग नासे ॥

मोह फळ दे त्यजुनि, नाहिं फळ पाहुनी ।

म्हणुनि तूं दत्तगुरुपाद पाहें ॥४॥


भोग खोटा नको, यागताठा नको ।

योगताठा नको धरुं विमोहें ॥

दत्तगुरु वांचुनी चित्त न धरीं जनीं ।

दत्तगुरु घे मनीं भरुनि स्नेहें ॥५॥


या युगीं साधनें वाउगीं गुरुविणें ।

ना उगीं तूं शिणें शास्त्रमोहें ॥

दत्तगुरु देव हा, दत्तगुरु तारि हा ।

स्वानुभवें वासुदेवचि वदे हें ॥६॥


Dec 16, 2016

॥ श्रीदत्तात्रेय मानसपूजा ॥


श्रीगणेशायनमः

श्रीगुरुभ्यो नमः


प्रथम होवोनि सुस्नात । मन करुनिया पवित्र । आसनी बैसावें स्वस्थचित्त । श्रीगुरुमानसपूजेसी ॥१॥

सिद्धासनारुढ ध्यानीं । खेचरी मुद्रा धारणीं । तूंचि तारक आम्हां लागुनी । हरि स्वरुपी दत्तगुरु ॥२॥

मानसपूजें कारणें । परिवारासह तुम्ही येणें । उतावीळ मी दर्शनाकारणे । ऐसी प्रार्थना करावी ॥३॥

सुवर्णयुक्त रत्‍नजडित । देवतामय सुंदर खचित । सिंहासन मी कल्पिलें येथ । बैसावें जी सद्‌गुरु मूर्ती ॥४॥

कर्पुर चंदन मिश्रित तेलें । पादप्रक्षालना जल कल्पिलें । स्वीकार कर हो येवेळें । तव चरण प्रक्षाळितों ॥५॥

गंधतुलसी बिल्वपत्र । उदक अक्षता शमी पवित्र । यांनीं भरलें हें सुवर्णपात्र । सुवास तयांचा घ्याहो स्वामी ॥६॥

सुवासिक जल मनांत आणिलें । सुवर्णपात्रीं मग तें भरलें । भक्तीनें तुम्हा अर्पण केलें । आचमन मधुपर्क दिगंबरा ॥७॥

सुगंधित सुंदर तेलें । स्नानालागीं मी कल्पियलें । पंचामृतें गंगोदकें न्हाणिलें । स्वीकारजी देवराया ॥८॥

दिगंबराहो आचां त्यजलें । भक्तीनें तुम्हां अभिषेकिलें । भगवें वस्त्र मृगचर्म अर्पिलें । स्वीकार करा हीच प्रार्थना ॥९॥

बहू सूत्रांनीं असे युक्त । ऐसें हे ब्रह्मसुत्र । म्हणूनी देवतामय सूत्र । धारण करा गुरुवर्या ॥१०॥

भस्म कस्तुरी आणि केशर । चंदनयुक्त परिकर । रत्‍नाक्षता असती तयार । अलंकृत तुम्हां करितसें ॥११॥

तुळसीगंध शमिबिल्वपत्र । सुवासिक नानापुष्पें येथ । मनात कल्पिलीं म्यां बहूत । अर्पिली ती सद्‌गुरुचरणी ॥१२॥

लाक्षासिता अभ्रक श्रीवास । श्रीखंड अगरु गुग्गुल खास । युक्तअग्नींत धूपास । घातलासे यतिराया ॥१३॥

सुवर्णपात्र मी कल्पिलें । तयांमध्यें दीप लाविले । कर्पुरयुक्त प्रज्वाळिलें । स्वीकाराहो दत्तप्रभू ॥१४॥

षड्‌रसाचें पक्वान्न परिकर । गोरसयुक्त मिष्टान्न साचार । सुवर्णपात्रीं ठेविलें सत्वर । भक्षण जलपान करावें ॥१५॥

हस्तमुख प्रक्षालून । सवेचि आचमन करुन । तांबुल दक्षिणादिफलेन । संतुष्ट व्हावें स्वामिया ॥१६॥

रत्‍नदीपांची आरती लावून । आणि आपणा नमस्कार करुन । करितों तवगुण वर्णन । प्रदक्षिणा सहितपैं ॥१७॥

दिगंबराहो तव मस्तकीं । अर्पिली मंत्रपुष्पांजली कीं । गायन वादन नर्तनादि । उपचार षोडश अर्पिले ॥१८॥

तव प्रेरणेनें प्रेरित । अज्ञान पामर मी खचित । पूजा केलीहो त्वरित । प्रेरक तुम्हीं संतुष्ट व्हावें ॥१९॥

मग घालोनि प्रदक्षिणा । करितों साष्टांग नमना । करद्वय जोडोनि जाणा । तव प्रार्थना करीतसें ॥२०॥

जयजयाजी दिगंबरा । जयजयाजी अत्रीकुमरा । ब्रह्मा विष्णू महेश्वरा । सांभाळावें बालकांसी ॥२१॥

तूं दीनांचा कैवारी । अवतरलासी अनुसूयोदरीं । तुझी भक्ती जो निरंतरीं । प्रतिपाळिसी वरदहस्तें ॥२२॥

ऐसी प्रार्थना करुन । मागतसें तुजलागुन । या मानसपूजेचें पठण । करितां दुःखें हरावीं ॥२३॥

भक्तांची व्हावी कामना पूर्ण । पिशाच्चादि बाधा निरसन । अनेक संकटांपासून । मुक्त व्हावे भक्तानें ॥२४॥

येणेंपरी मागतां वर । प्रसन्न झाला यतिवर । जो भक्तिभावें पठण करील नर । संकटें त्याचीं दूरी पळती ॥२५॥

विश्वास धरील जो मानसीं । त्यासी कृपा करील औदुंबरवासी । न म्हणाहो असत्य यासीं । अनुभवें कळों येईल ॥२६॥

इति श्री दत्तदास विरचितं दत्तात्रेय मानसपूजास्तोत्रं संपूर्णम् ।

॥ श्रीदत्तार्पणमस्तु ॥


॥ दिगंबर दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥


Dec 15, 2016

॥ श्री गिरनार यात्रा ॥


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


वाट चाललो गिरनारीची, दशसहस्त्र त्या पथवाटेची ।।

पदी पदी आठव त्या दत्ताची, दत्तगुरुंची दत्तगुरुंची ।।

जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी ॥


प्रथम ओलांडली मी तीन शिखरे, काम क्रोध लोभ ही खरे ।।

दिसू लागली मग गुरुचरणे ।।

लगबग लगबग वरती गेलो, पवित्र मंगल चरणांवरी त्या मस्तक ठेवुनी ।।

धन्य मी झालो, धन्य मी झालो ॥


भानावरती मग मी येता, समजुनी चुकलो मी हा पुरता ।।

केवळ दत्तकृपेने मी हो, शिखर ते चढलो, शिखर ते चढलो ॥


त्या शिखरी हो प्रचंड वारा, त्या शिखरी हो प्रचंड वारा, गुरुकृपेचा तो हा सारा ।।

त्या वार्‍याने मी पण माझे, कधी उडविले मज नच कळले ।।

वाटे माझे तप अजि फळले, वाटे माझे तप अजि फळले ।।


दत्ताच्या ह्या दरबारी अजि, कधी पोहोचले, ते नच कळले ।।

दत्ताच्या ह्या दरबारी अजि, मी रुजु झाले, रुजु मी झाले ! ।।