॥ श्रीगणेशायनमः ॥
॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
प्रथम होवोनि सुस्नात । मन करुनिया पवित्र । आसनी बैसावें स्वस्थचित्त । श्रीगुरुमानसपूजेसी ॥१॥
सिद्धासनारुढ ध्यानीं । खेचरी मुद्रा धारणीं । तूंचि तारक आम्हां लागुनी । हरि स्वरुपी दत्तगुरु ॥२॥
मानसपूजें कारणें । परिवारासह तुम्ही येणें । उतावीळ मी दर्शनाकारणे । ऐसी प्रार्थना करावी ॥३॥
सुवर्णयुक्त रत्नजडित । देवतामय सुंदर खचित । सिंहासन मी कल्पिलें येथ । बैसावें जी सद्गुरु मूर्ती ॥४॥
कर्पुर चंदन मिश्रित तेलें । पादप्रक्षालना जल कल्पिलें । स्वीकार कर हो येवेळें । तव चरण प्रक्षाळितों ॥५॥
गंधतुलसी बिल्वपत्र । उदक अक्षता शमी पवित्र । यांनीं भरलें हें सुवर्णपात्र । सुवास तयांचा घ्याहो स्वामी ॥६॥
सुवासिक जल मनांत आणिलें । सुवर्णपात्रीं मग तें भरलें । भक्तीनें तुम्हा अर्पण केलें । आचमन मधुपर्क दिगंबरा ॥७॥
सुगंधित सुंदर तेलें । स्नानालागीं मी कल्पियलें । पंचामृतें गंगोदकें न्हाणिलें । स्वीकारजी देवराया ॥८॥
दिगंबराहो आचां त्यजलें । भक्तीनें तुम्हां अभिषेकिलें । भगवें वस्त्र मृगचर्म अर्पिलें । स्वीकार करा हीच प्रार्थना ॥९॥
बहू सूत्रांनीं असे युक्त । ऐसें हे ब्रह्मसुत्र । म्हणूनी देवतामय सूत्र । धारण करा गुरुवर्या ॥१०॥
भस्म कस्तुरी आणि केशर । चंदनयुक्त परिकर । रत्नाक्षता असती तयार । अलंकृत तुम्हां करितसें ॥११॥
तुळसीगंध शमिबिल्वपत्र । सुवासिक नानापुष्पें येथ । मनात कल्पिलीं म्यां बहूत । अर्पिली ती सद्गुरुचरणी ॥१२॥
लाक्षासिता अभ्रक श्रीवास । श्रीखंड अगरु गुग्गुल खास । युक्तअग्नींत धूपास । घातलासे यतिराया ॥१३॥
सुवर्णपात्र मी कल्पिलें । तयांमध्यें दीप लाविले । कर्पुरयुक्त प्रज्वाळिलें । स्वीकाराहो दत्तप्रभू ॥१४॥
षड्रसाचें पक्वान्न परिकर । गोरसयुक्त मिष्टान्न साचार । सुवर्णपात्रीं ठेविलें सत्वर । भक्षण जलपान करावें ॥१५॥
हस्तमुख प्रक्षालून । सवेचि आचमन करुन । तांबुल दक्षिणादिफलेन । संतुष्ट व्हावें स्वामिया ॥१६॥
रत्नदीपांची आरती लावून । आणि आपणा नमस्कार करुन । करितों तवगुण वर्णन । प्रदक्षिणा सहितपैं ॥१७॥
दिगंबराहो तव मस्तकीं । अर्पिली मंत्रपुष्पांजली कीं । गायन वादन नर्तनादि । उपचार षोडश अर्पिले ॥१८॥
तव प्रेरणेनें प्रेरित । अज्ञान पामर मी खचित । पूजा केलीहो त्वरित । प्रेरक तुम्हीं संतुष्ट व्हावें ॥१९॥
मग घालोनि प्रदक्षिणा । करितों साष्टांग नमना । करद्वय जोडोनि जाणा । तव प्रार्थना करीतसें ॥२०॥
जयजयाजी दिगंबरा । जयजयाजी अत्रीकुमरा । ब्रह्मा विष्णू महेश्वरा । सांभाळावें बालकांसी ॥२१॥
तूं दीनांचा कैवारी । अवतरलासी अनुसूयोदरीं । तुझी भक्ती जो निरंतरीं । प्रतिपाळिसी वरदहस्तें ॥२२॥
ऐसी प्रार्थना करुन । मागतसें तुजलागुन । या मानसपूजेचें पठण । करितां दुःखें हरावीं ॥२३॥
भक्तांची व्हावी कामना पूर्ण । पिशाच्चादि बाधा निरसन । अनेक संकटांपासून । मुक्त व्हावे भक्तानें ॥२४॥
येणेंपरी मागतां वर । प्रसन्न झाला यतिवर । जो भक्तिभावें पठण करील नर । संकटें त्याचीं दूरी पळती ॥२५॥
विश्वास धरील जो मानसीं । त्यासी कृपा करील औदुंबरवासी । न म्हणाहो असत्य यासीं । अनुभवें कळों येईल ॥२६॥
इति श्री दत्तदास विरचितं दत्तात्रेय मानसपूजास्तोत्रं संपूर्णम् ।
॥ श्रीदत्तार्पणमस्तु ॥
॥ दिगंबर दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥
No comments:
Post a Comment