Showing posts with label श्रीधर स्वामी महाराज. Show all posts
Showing posts with label श्रीधर स्वामी महाराज. Show all posts

Mar 15, 2024

अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

भक्तास्तव प्रगट होऊनि शुष्ककाष्ठी केली तयावरि कृपामृतपूर्ण दृष्टी तेणे परीच चुकवी मम जन्म फेरे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥१विश्वासलों दृढ मनें तुझिया पदासी की वारिसील म्हणुनि मम आपदांसी ते दाविशील नयना कधि सांग बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥२देवा तुझे हृदय कोमल फार आहे ऐशापरी निगमशास्त्रहि आण वाहे ते काय वाक्य लटिकें करतोसि बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥३मी दीन हीन कुमती तुज वर्म ठावें ऐशापरि त्यजुनि कोप उदार व्हावे गाती तुझे पतितपावन नाम सारे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥४माझे अपारतम पातकसंघ जाळी क्रोधाग्निनें हरि तझ्या सहमूळ जाळी तैसा करी दृढ जसा भवबंध बा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥५श्रीपद्महस्त मम मस्तकी ठेवी बापा दृष्टीस दाखवि बरें निजचित्स्वरुपा हे दान दे वचन अन्य न मी वदें रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥६आयुष्य घालूनि अधिक मृत द्विजाला त्वां वांचवोनि जनिं वाढविली स्वलीला होसी समर्थ मज चाळविसी वृथा रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥७वेंचावयासि करुणाघन लोभ वाटे टाकून दे बिरुद लावि मला अवाटे नाही तरी झडकरी मज भेट दे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥८पाप्यासि तारुनि बळे जन सोकवीले तुझेचि कृत्य तुज मुख्य फळासि आले हे सोडीसी तरि सुटेल तुला कसे रे अद्यापि कां नरहरी करुणा न ये रे ॥९हे श्रीधरे रचुनिया नवरत्नमाला प्रेमेचि अर्पिली बरी पुरुषोत्तमाला हे वर्णिता नरहरी संकट सर्व वारी श्रीपादसद्‌गुरु यतीश्वर चिद्विहारी ॥१० 


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Feb 16, 2024

श्री श्रीधरस्वामीकृत सद्‌गुरुंची मानसपूजा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री राम समर्थ ॥ 

मानसपूजा म्हणजे ज्या पूजेत आपले मनच सारे सोपस्कार थोड्या थोड्या प्रमाणात करते, ती पूजा. परमात्म्याला मानसपूजा खूप आवडते, असे श्री समर्थांनी सांगितले आहे. सगुण व निर्गुण ही परमात्म्याची दोन रूपे आहेत. सगुण साकार रूपात देहाचा आकार असतो, निर्गुण-निराकार रूपात एकाच एक बिंदूत आनंद असतो. त्यात देह-आकाराशी सुतराम् संबंध नसतो. सगुणरूपात श्रीगुरू व देव दोन्ही प्रकार असतात. श्रीगुरू सगळ्या देवांचे रूप व आनंदघन-परब्रह्म असतो. श्रीगुरूचे रूप हे मुमुक्षूंसाठी मोक्षाची वाट दाखवणारे, प्रत्येकाला मंगलमय आनंद देणारे असते. आपल्या देहात मस्तक हे उत्तमांग असे गणले जाते. त्यातही त्याच्या मधोमध असलेले ब्रह्मरंध्र हे अत्युत्तम. येथे येणाऱ्या ब्रह्म या शब्दावरून याची महती समजते. ही जागा जी आहे ती अनंतानंदरूप असलेली, ब्रह्मस्वरूप जागा मानली जाते. 'गुरुर्ब्रह्म नमाम्यहम्', साक्षात् परब्रह्मस्वरूप गुरूला वंदन करतो - म्हणून श्रीगुरूला नमस्कार करताना, त्याचे रूप लक्षात घेऊन नमस्कार करण्याची पद्धत गुरुतत्त्वाचे प्रतिपादन करणारे ग्रंथ सांगतात. हे ब्रह्मरंध्र श्रीगुरूचे वासस्थान आहे. याला सहस्रदल कमल असेही म्हणतात. या सहस्रदल कमलाच्या मध्यकर्णिकेवर लक्ष केंद्रित करून अनंत आनंदरूप श्रीगुरूचे ध्यान करावे. त्याचे बरेच प्रकाश आहेत, पण नव्या साधकाला कल्पना यावी यासाठी श्रीगुरूचा प्रकाश हा निष्कलंक चंद्रप्रकाशासारखा आहे, असे समजून त्याने ध्यान करावे.

तो अमृतरूप चांदण्याचा पसरलेला प्रकाश हाच श्रीगुरूचा देह समजावा. चोहीकडे पसरलेल्या त्या आनंदानेच अमृतरूप चांदण्याच्या प्रकाशाचे रूप धारण केलेल्या, शुभ्रवर्णाच्या आपल्या शुभ रूपाला त्या सहस्रदल कमलाच्या मध्यकर्णिकेच्या मधोमध बसलेल्या प्रसन्नवदन श्रीगुरूचे ध्यान करावे. नंतर आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, गंध-अलंकार, पांढरे सुवासिक फूल, सुगंधी अत्तर अर्पण करावे. तुलसीदल, बिल्वदल किंवा पांढरे फूल घेऊन एकशे आठ किंवा एक हजार एक वेळा 'श्रीधराय नमः'ची नामपूजा करावी. त्यानंतर धूप-दीप व नैवेद्यात हव्या त्या पक्वान्नांची निर्मिती करून सोन्याच्या थाळीत श्रीगुरूला पोटभर जेवू घालावे. हात धुतल्यानंतर अनेक फलार्पण करून श्रीगुरूला तृप्त करावे. त्यानंतर मुखशुद्धीसाठी तुलसीपत्र देऊन, असेल तेवढे नाणे नवरत्न महादक्षिणा म्हणून द्यावे. नंतर मंगलारती, मंत्रपुष्प, स्तोत्र, प्रदक्षिणा आटोपून नमस्कार करून, श्रीगुरूच्या कृपाळू, प्रसन्न मुखकमलावरील मंदहास्य पाहात जप करावा. ब्रह्मानंदाच्या अद्‌भुत प्रकाशाने युक्त अर्चना समर्पित करावी. पाणी, धूप-दीप व नैवेद्य, सगळे आपण तृप्त होईपर्यंत अर्पण करावे. 

इति शिवम्

- श्री श्रीधरस्वामी

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


मूळ स्रोत : श्रीसद्‌गुरुबोधामृत


Mar 30, 2023

श्रीरामनवमी विशेष - श्रीधरस्वामींचे श्रीरामनवमी प्रवचन आणि श्रीरामोविजयतेतरामस्तोत्रं


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीराम जय राम जय जय राम


श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधरस्वामींचे श्रीरामनवमी प्रवचन


आज श्रीरामनवमीचा दिवस आहे हें आपणांस माहीत आहेच. आज श्रीरामरायांचा जगाच्या उद्धारार्थ झालेला दिव्य जन्म, त्यावेळची ती आनंददायी आठवण तो आपणास प्रतिवर्षी करून देत असतो. अधर्म, अनिती, दुष्प्रवृत्ती म्हणजे अधिक विषयसुखाचा पेटलेला वणवा व स्वेच्छाचार जगांत माजला म्हणजे जगाचें हें दुःख घालविण्यासाठी आणि स्वतःच्या आनंदाचा आविर्भाव सर्वत्र करण्यासाठी परमात्मा अवतार घेत असतो. स्वेच्छाचारापासून, अनीतीपासून जें दुःख झालें तें नष्ट करून धर्माच्या नीतीच्या सदाचाराच्या स्थापनेसाठीं तो आनंदरूप परमात्मा आविर्भूत होत असतो. दशरथ म्हणजे साधक व कौसल्यारूपी बुद्धी ही त्यांची धर्मपत्नी. साधक जेव्हां श्रद्धेनें, भक्तीनें वैराग्य आंगी बाणवून आत्मसाक्षा- त्काराला सर्वतोपरी अनुकूल असें आचरू लागतो तेव्हां त्याच्या बुद्धीरूपी कौसल्येत आनंदघनरूपाचा आविर्भाव होतो. तोच आत्म- साक्षात्कार आणि तोच श्रीरामाचा अवतार. बुद्धीरूपी कौसल्येचा गर्भ म्हणजे मीपणाची स्मृति त्या स्मृतींत आत्मसाक्षात्कार व्हावयाचा आहे व त्या आत्मसाक्षात्कारानेंच आपली तृप्ती व्हावयाची आहे. हें मीपणाचें भान देहरूप नसून तें ज्या मंगलमय आनंदमहोदधींपासून निर्माण झालें. तो आनंदमहोदधीच 'मी' अशा ख-या आनंदाचा अनुभव येऊन आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तो आनंद अखंड स्थिरावून प्रगट झाला म्हणजे रामरायाचा अवतार झाला. श्रीसमर्थांचाहि जन्म आजचाच. श्रीसमर्थ व श्रीराम यांच्यात भेद नाही हेंच आजच्या श्रीरामजन्मकालीं सिद्ध होतें. 'जय जय रघुवीर समर्थ ।' श्रीरामोविजयतेतरामस्तोत्रं अथवा श्रीराममन्त्रराजस्तोत्रम्  हे स्तोत्र श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधरस्वामींनी अयोध्या येथे रचले असून याचे वैशिष्ट्य असे की या प्रभावी स्तोत्रातील प्रत्येक श्लोकाच्या चरणातील पहिले अक्षर घेतले असता “श्रीराम जय राम जयजयराम” हा तारक पावनमंत्र तयार होतो.

श्रीरामः श्रीकरः श्रीदः श्रीसेव्यः श्रीनिकेतनः । राक्षसान्तकरो धीरो भक्तभाग्यविवर्धनः ॥१॥ भावार्थ : विश्वव्यापक प्रभू श्रीराम हेच ऐश्वर्यदाता, भाग्यविधाता, प्रत्यक्ष श्री म्हणजे लक्ष्मी ज्यांच्या चरणीं वास करते असे, वैभवाचे आगर, राक्षसांचा विनाश करणारे, धैर्यशाली आणि भक्तांचे भाग्य वाढविणारे आहेत.     रेति व्यस्तंयन्नाम जपन् व्याधोऽभवदृषिः । न्मदुःखनुदं काव्यं दिव्यं व्यरचयन्महत् ॥२॥ भावार्थ : ‘मरा,मरा’ अशा उलट्या नामाचा जप करूनही एक व्याध म्हणजे पारधी महर्षी अर्थात वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनी श्रीमद्वाल्मीकीय रामायण नामक महाकाव्य रचले. जन्म घ्यावा लागणे, हे सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. त्या चक्राचा समुळ नाश करणारे असे हे दिव्य काव्य आहे.  दा यदा भवेद्ग्लानिर्धर्मस्य स तदा तदा । राक्षसान्तकरो रामो सम्भवत्यात्ममायया ॥३॥ भावार्थ : जेव्हां, जेव्हां धर्माचा ऱ्हास होवूं लागतो, तेव्हां तेव्हां अधर्मी राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी ते लीलाविग्रही श्रीराम पुन्हा अवतार घेतात.  हामोहकरी माया यत्प्रसादाद्विनश्यति । घन्या अपि पूज्याश्च पावना बहवोऽभवन् ॥४॥ भावार्थ : ज्यांचा कृपाप्रसाद प्राप्त झाल्यावर, मोहजालाने ग्रासून टाकणाऱ्या मायेचा सहजच नाश होतो. अशा त्या प्रभू रामचंद्राच्या वरदानाने अनेक पापीजनदेखील पवित्र आणि पूज्य होतात.     स्य प्रसादतो जातो हनूमान् महतो महान् । न्ममृत्युजरादुःखान्मुक्तोऽद्यापि विराजते ॥५॥ भावार्थ : त्यांच्या कृपाप्रसादाचा परमलाभ झाल्याने श्री हनुमान महान योगी तर झालाच, शिवाय  जन्म-मृत्यु आणि जरा म्हणजे वृद्धत्व ह्या भवतापांतून मुक्त होऊन अर्थात चिरंजीव होऊन कीर्तिवंत झाला आहे. स्मात्परतरन्नास्ति यस्य नाम महद्यशः । रामं लोकाभिरामं तं व्रजामः शरणं मुदा ॥६॥ भावार्थ : या जगती ज्याच्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणीच नाही, ज्याचे नाम परम यशदायक आहे, जो लोकांना सर्वदा आनंदप्रदान करतो, त्या प्रभू श्रीरामचंद्रांना मी अनन्यभावाने शरण जाऊन, भक्तिपूर्वक नमन करतो.  मैतयिति नः सर्वान् संसारात्तारयिष्यति । श्री राम जयरामेति जयजयेति जपाद्ध्रुवम् ॥७॥ भावार्थ : ‘मी अन माझे’ ह्या आसक्तिरुपी संसारात गुरफटलेल्या सर्व जीवांनी केवळ  ”श्रीराम जय राम जय जय राम” या महामंत्राचा जप केल्यास ते या भवसागरातून निश्चित तरुन जातील. राम एव परम्ब्रह्म राम एव परागतिः । नः शान्तिकरोरामो मन्मथारि नमस्कृतः ॥८॥ भावार्थ : श्रीरामप्रभू हे साक्षात परब्रह्म आहेत आणि श्रीराम हेच अंतिम साध्य अर्थात मोक्षप्राप्तीचे साधन आहेत. मनाला असीम शांती देणारे, मनाला विचलित करण्याऱ्या वाईट विचारांचे निरसन करणारे असे हे श्रीराम- त्यांना मी भक्तिपूर्वक नमन करतो. यत्रययुतः श्रेष्ठो रामत्रययुतो मनुः । त्र श्रीराममहिमा त्रिसत्यमिति वर्ण्यते ॥९॥ भावार्थ : तीन प्रकारचा जय प्राप्त करणारा असा सर्वश्रेष्ठ मनु म्हणजे राजा श्रीराम होय. असे  श्रीरामांचे चरित्र महात्म्याचे वारंवार मनन करणे म्हणजे त्रिवार सत्यच सांगणे होय.  रामः श्रीसीतया युक्तः सर्वैश्वर्यव् इत्यपि । हत्वमस्यानन्तं यत् तच्छ्रीरामपदे स्थितम् ॥१०॥ भावार्थ : भगवती सीतेसह असलेले श्रीराम हे सर्व ऐश्वर्य प्रदाता आहेत. जो श्रीरामचरणीं लीन झाला, त्यास अनंत भाग्य प्राप्त होते.   य रामपदेनायं जयरूप इतीर्यते । तोऽसौ जयरूपो हि जयार्हो जयदस्तथा ॥११॥ भावार्थ : ‘जय राम’ ह्या पदाने ज्याचे स्वरुपवर्णन केले जाते आणि तो स्वतःच जयरूप आहे.    त्याच्या या नामाचा सतत जप केला असता, ते सर्वदा जयच म्हणजे यश-सफलताच प्रदान करते. यजयेति पदेऽर्थोऽयं द्योतते सर्वसिद्धिदः । स्मिन्न माया नाविद्यां तस्मिन्मोहःकथं भवेत् ॥१२॥ भावार्थ : ‘जय जय’ या मंत्राचा अर्थ सर्व सिद्धिदायक असाच आहे. या मंत्रप्रभावामुळे माया, अविद्या ह्यांचा सहजच नाश होतो तर मग तिथे मोह तरी कसा राहणार ? अर्थातच या तीनही विकारांचा या रामनामाने पराजय होतो.  रामत्रये दाशरथिश्चेशो ब्रह्मेति कथ्यते । रूदात्मजसन्त्राता मोचयेन्मन्दनादपि ॥१३॥ भावार्थ : दाशरथी (दशरथपुत्र), ईश (परमेश्वर) आणि ब्रह्म ही प्रभू श्रीरामांचीच तीन नामे आहेत. अशा रामरायांचे भक्तिपूर्वक स्मरण केले असता प्रत्यक्ष वायुपुत्र हनुमान आपले रक्षण करतात.      श्री रामेति पदं पूर्वं जयरामेति वै ततः । रामोऽत्र द्विर्जयात्पश्चाद्वर्तते मनुराजके ॥१४॥ भावार्थ : ‘श्रीराम’ ह्या पदाच्या आधी ‘जय राम’ या पदाचा उच्चार करणे याचाच अर्थ प्रभू रामचंद्रांचा सर्वत्र विजय असो, हा आहे. अर्थात दोनदा असा जयजयकार केल्यावर सर्व मानवांत श्रेष्ठ आणि रत्नांप्रमाणे दैदिप्यमान, तेजस्वी असे राजाराम शोभून दिसतात.  हासंसारव्यामोहान्मोचयत्याश्वयं मनुः । पनीयः कीर्तनीयो मुदा सर्वैश्च सर्वदा ॥१५॥ भावार्थ : या  विशाल भवसागरांत मोहादि विकारांमुळे गटांगळया खात असतांना हेच ‘राजाराम’ नाम मनुष्याला तारू शकते. म्हणून सर्वांनी आनंदपूर्वक या सुखदायक रामनामाचा जप करावा. तसेच त्यांच्या लीलांचे गुणगानही नेहेमी करावें. ज्ञराक्षसभूताद्या पीडाऽनेन विनश्यति । रामो धनुर्धरो नित्यं संरक्षति पदे पदे ॥१६॥ भावार्थ : धनुर्धारी श्रीराम यज्ञादी शुभकार्यांत विघ्नें आणणाऱ्या भूत-राक्षसांचा समूळ नाश करून, धर्मकार्य आणि त्यांच्या भक्तांचे नेहेमीच संरक्षण करतात. अर्थात् ‘श्रीराम’ या पवित्र नामजपाने पदोपदी आपले कल्याण होईल.  दोन्मत्तनरैश्चापि न दुःख लभते कदा । न्मसन्तापचन्द्रोऽयं ज्ञानविज्ञानदो मनुः ॥१७॥ भावार्थ : श्रीरामचंद्रांचे सतत स्मरण केल्यास अत्यंत मदोन्मत्त मनुष्यांपासूनही आपल्याला कधीच त्रास होणार नाहीं. या भवतापाचे मूळ कारण हे जन्म-मृत्यूचे चक्र आहे, याची जेव्हा जाणीव होते. तेव्हा, दिव्य रामनामाचा जप मनुष्यास चंद्राप्रमाणे शीतलता देतो आणि त्या परब्रह्मस्वरूपाचे ज्ञानही प्राप्त करून देतो.  त्रकुत्रापिजप्योऽयं शुचिर्वाप्यशुचिस्तथा । पतःशान्तिमाप्नोति प्रशस्तोऽस्मिन्कलौमतः ॥१८॥ भावार्थ : कुठेही आणि कधीही ह्या पवित्र नामाचा जप केला असता, तसेच शुचित्व म्हणजे सोवळं-ओवळं पाळून अथवा अगदी शुचिर्भूततेचे नियम न पाळतासुद्धा जरी अंतःकरणपूर्वक म्हणजेच पूर्ण श्रद्धेने रामनाम घेतले तरी ते सर्वदा सुखकारक आणि शांतिदायक होते. या सांप्रत कलियुगात हे दिव्य रामनाम अतिकल्याणकारी आहे.   ज्ञानां जपयज्ञोऽस्मि भगवद्वाक्यमीदृशम् । रामेणैव पुरादिष्टः षडङ्गादिविवर्जितः ॥१९॥ भावार्थ : “ यज्ञांमधील जो जपयज्ञ आहे, ते साक्षात माझे स्वरूप आहे. “ अशी भगवान श्रीकृष्णांनी गीतेत ग्वाही दिली आहे. तर, षडङ्गादिविवर्जित असा नामजप भवतारक आहे, असे त्रेतायुगात प्रभू श्रीरामांनीही त्यांच्या भक्तांस वचन दिले होते.    रूत्सुतावताराय रामदासाय धीमते । श्रीरामवरयुक्तोऽयं सुलभोऽपि फलाधिकः ॥२०॥ भावार्थ : प्रत्यक्ष वायुसुत हनुमानाचेच अवतार असणारे, बुद्धीमंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांना केवळ रामनामाच्या तपोबळावरच प्रभू रामचंद्रांचे वरदान प्राप्त झाले. खरोखर, रामनामासारखे अति सुलभ आणि अनंत फळ देणारे दुसरे काहीच नाही.  त्रैलोक्यपावनी पुण्या मुक्तिदाराघवस्तुतिः । भद्रं तनोतु लोकेषु गङ्गेव किल सर्वदा ॥ भावार्थ : श्रीरामप्रभूंचे स्तवन हे गंगाजलाप्रमाणेच सर्वदा पुण्यकारक असून तीनही लोकांना पावन करते. ते परम कल्याणकारी आहे.    ॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सद्‌गुरु भगवान श्रीधरस्वामीमहाराजविरचितं श्रीरामोविजयतेतरामस्तोत्रं / श्रीराममन्त्रराजस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

॥ श्री गुरुदेव दत्त


स्रोत : https://shridharamrut.com/


Feb 15, 2023

नमी तो विभू श्रीगुरू रामदास


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ श्री कृष्णदास महाराजविरचित अभंग सह्याद्री खोऱ्यात गर्जला गजर ! जय जय रघुवीर समर्थ !, जय जय रघुवीर समर्थ !! हा तर समर्थ रामदासांचा संचार ! पायी खडावा, हाती कुबडी, सवे झोळी खांद्यावर, भगवी छाटी अंगावर, हाती असे जपमाळ, दाढीजटांचा केशसंभार, शरीर अति सुदृढ, कारण सूर्यनमस्कार ! रूप दिसे ते अति सुंदर, स्वारी करी अखंड संचार ! भेटी होता मज येई गहिवर, भानचि विसरुनि पडलो चरणांवर ! श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य सदगुरू श्रीधरस्वामी महाराजविरचित श्री समर्थाष्टक स्तवावा मनी की गुरु रामदास । कृपे या जयाच्या तुटे मोहपाश । निजानंदरूपें जया नित्य वास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥१॥ तपोज्ञानयज्ञानिकां साधकांस । करूनि मनः शुद्धि एकान्तवास । मनी ज्या सदा आठवीता उदास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥२॥ भवी दुःखदावानलें जे उदास । जगी होति ते गुरूदेवदास । जया ध्याति की सद्‌गुरु हे उदास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥३॥ गुरुसेविं जी प्राप्ती होते जनास । समाधान लाभे जयाच्या मनास । जनीं नित्य ज्या मानितीं की सुखास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥४॥ तनधर्मकर्मादिकांचा निरास । करूनी अजीवेश होती तयास । सदा ज्या स्थळीं वाटतो शांत वास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥५॥ असे ईशरुपेंची जो योगियांस । अनेका मतीं अन्य सांख्यादिकांस । मला जो सदा ब्रह्मरुपेचि खास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥६॥ जयाच्यावारी विश्व जीवेश भास । जसा एक दोरी फणीचा विलास । जया दर्शने सर्व मिथ्याची सोस । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥७॥ जयाच्या स्वरूपी न हा कीं विभास । अवस्थात्रयांती जयाचा विकास । तया मस्त्वरूपी न हा भिन्न भास । नमी तो विभू श्रीगुरू रामदास ॥८॥ (इंद्रवज्रा) श्लोकाष्टके तोषवि जो गुरूस । होई कृपे त्या परिपूर्ण आस । नासूनि सारा जगभिन्न भास । लाभे तया तत्पदिं नित्य वास ॥९॥ ॥ श्रीसमर्थार्पणमस्तु ॥


 ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Apr 18, 2022

श्रीधर स्वामी नित्यपाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ नमो भगवते श्रीधराय

 

जय जय श्रीगुरुमाऊली । तुझ्या कृपेची जिवा साऊली । तुजविण न कोणी वाली । भवतप्ताया ॥१

तूं नारी नरासी अभेद । सर्वात्मरूप आनंदकंद । तुज भजतां विषयछंद । नासोनि जाये ॥२ जय जय श्रीसद्‌गुरु । भवाब्धीचे तूं सुदृढ तारू । मज या पाववी पैलपारु । अनाथनाथा ॥३ अज्ञाननिशीच्या अंती । निजात्मरूपेची तुझी प्राप्ती । तूं चित्सुखसूर्य दिनराती । प्रकाशसी स्वप्रभे ॥४ ‘मी’ ‘माझे हे दयाळा । नुरवोनि प्रतिपाळी बाळा । उपेक्षा करू नेणसी कृपाळा । शरणागताची ॥५ माझे शरीर, इंद्रिये प्राण । सकळ वासनेसह हें मन । ससर्व कर्म बुद्धि ही जाण । अर्पियली तुज ॥६ तूं शुद्ध, बुद्ध, सच्चिदानंद । निष्कलंक निर्लेप अभेद । स्वरूपबोधे नाशिसी खेद । शरणागताचा ॥७ मज दीना अभय द्यावें । माया निर्मुक्त मज करावे । भवभय घालवूंनि न्यावें । मज निजधामा ॥८ बाधा कसलीहि नसावी । सकळ आपदा नष्ट व्हावी । निर्विघ्नपणेचि गा मज मिळवी । ब्रह्मपदी तुझ्या ॥९ तूं निराकार ब्रह्म निर्गुण । होसी बा ! साकार आणि सगुण । सद्‌गुरुरूपे आले कळून । आम्हा सोडविण्या ॥११ जय जयाजी दीनदयाळा । घालवी संसारसुखाचा हा चाळा । मिळवी निजरूपीं निर्मळा । शिघ्रचि आता ॥११ माया अविद्येहूनि पर । जीवेशी कल्पना विदूर । सृष्टिस्थितिलयादि वेव्हार । तुजमाजी नसे ॥१२ गुरुराया ! तूं आमचे स्वरूप । अरूप सुखसमुद्र अमूप । अद्वय तव चिद्रूपी ऐक्यरूप । आम्ही सर्वदा ॥१३ सदाचारे श्रीगुरुभक्ति युक्त । नित्यपाठ करता होई मुक्त । तेरा ओव्या या श्रीधरोक्त । भवदुःख विनाशिती ॥१४


आदिनारायणं विष्णूं ब्रह्माणं च वसिष्ठकम् । श्रीरामं मारुती वन्दे रामदासं च श्रीधरम् नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः

॥ श्री श्रीधर स्वामी महाराजार्पणमस्तु


Jan 26, 2021

श्री प. प. श्रीधर स्वामी महाराज



॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीराम समर्थ ॥

हृदयीं वेदगर्भ विलसे l मुखीं सरस्वती विलासे l साहित्य बोलता जैसे l भासती देवगुरु l शांति दया क्षमाशील l पवित्र आणि सत्त्वशील l अंतरशुद्ध ज्ञानशील l ईश्वरीपुरुष ॥ ( श्रीमत दासबोध )

श्रीसमर्थ रामदास स्वामीनीं श्रीमत दासबोधात केलेले हे ईश्वरीपुरुषाचे वर्णन वाचतांना श्री प. प. सद्गुरू श्रीधरस्वामी महाराजांचेच स्मरण होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत देगलूर नामक तालुक्याचे गांव आहे. तिथल्याच पतकी या देशस्थ ऋग्वेदी कुटुंबात श्रीधरस्वामींचा जन्म झाला. नारायणराव आणि कमलाबाई या सुशील दाम्पत्यांस तीन अपत्यें झाली. तथापि, त्यांच्या कुलोपाध्यायानें ' पतकी ' घराण्यास सर्पशाप असून लवकरच हे घराणे निर्वंश होईल, असे भविष्य वर्तविले. तसेच, वंशोद्धारासाठी श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन श्री दत्तात्रेयांचे अनुष्ठान करावे, असे सांगितले. तदनुसार, नारायणरावांनी सहकुटुंब गाणगापुरास जाऊन श्री दत्तप्रभूंची कठोर उपासना केली. त्याचेच, फलस्वरूप म्हणून ' मी स्वतः अंशरूपानें तुमच्या वंशात जन्म घेईन.' असा श्री दत्त महाराजांचा नारायणरावांस दृष्टांत झाला आणि १९०८ साली मार्गशीर्ष पौर्णिमेस श्री दत्तजयंतीच्या शुभदिनीं श्रीधरस्वामींचा जन्म झाला.

यथावकाश, श्रीधर स्वामींनी श्रीसमर्थ रामदास यांच्या प्रतिमेसमोर त्रयोदशाक्षरी श्रीराम या दिव्य मंत्राचा अनुग्रह घेतला आणि श्रीक्षेत्र सज्जनगड येथे तपश्चर्या केली. शके १८५१च्या श्रीदासनवमी उत्सवांत श्रीधर श्रीसमर्थ चिंतन करीत असतांना त्यांना श्री रामदास स्वामींचे दिव्य दर्शन झाले. त्यावेळीं श्रीसमर्थांनी त्यांना ' दक्षिणेकडे धर्मप्रचारार्थ भ्रमण करावे. ' अशी आज्ञा केली. गुरुवचनांचे श्रीधर स्वामींनी पालन केले. त्यांनी रचलेली विपुल वाङ्मय संपदा, श्री स्वामींची प्रवचने, आणि त्यांचे चरित्रग्रंथ आता भाविकांसाठी उपलब्ध आहे.

श्री प. प. सद्गुरू श्रीधरस्वामी यांचा दिव्य मंत्र :

नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरुपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ॥ 

श्री श्रीधर स्वामींची वाङ्मय संपदा  

श्रीधर स्वामींचे दिव्य अनुभव      

श्रीधरस्वामींची प्रवचनें

श्रींची मराठी ध्वनी पुस्तकें