Showing posts with label पोथी. Show all posts
Showing posts with label पोथी. Show all posts

Apr 30, 2025

श्री स्वामी समर्थ महाराजांचे दुर्मिळ चरित्र आणि 'श्रीस्वामी सत्संग'


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे प्राचीन व दुर्मिळ चरित्र पुणे नगर वाचन मंदिर यांनी सर्व स्वामीभक्तांसाठी उपलब्ध करून दिले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला, आरत्या, पदें, अष्टकें आणि स्तोत्र यांचे अतिशय सुंदर संकलन केलेला हा ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्ताने आवर्जून सतत नित्योपासनेसाठी संग्रही ठेवावा असाच आहे.

*** पदामृत सागर - श्रीअक्कलकोटनिवासी स्वामीसमर्थ मंडळ ***


'श्रीस्वामी सत्संग' अर्थात अँफी थिएटर, बोरिवली पूर्व इथे आयोजित केलेले श्री संजय नारायण वेंगुर्लेकर यांचे ओघवत्या शैलीतील भक्तिरसमय असे व्याख्यान प्रत्येक स्वामीभक्ताने वारंवार ऐकावे असेच आहे.

 

 

॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥  

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Nov 21, 2024

संतकवी श्री दासगणु महाराजविरचित श्री गुरूचरित्र सारामृत


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्री सरस्वती गंगाधररचित महाप्रसादिक श्रीगुरुचरित्र हा सिद्धमंत्ररूप आणि वरदग्रंथ आहे. त्यांमुळे मंत्राच्या अनुष्ठानविधीचे सर्व नियम या ग्रंथाचे पारायण करतांना विशेष पाळावे लागतात. या वेदतुल्य ग्रंथाचे वाचन सर्वच दत्तभक्तांना मुक्तपणे करता यावे यासाठी भक्तवत्सल श्रीदत्तात्रेय महाराजांनी अनेक अधिकारी संत-महात्म्यांना प्रेरणा दिली आणि श्रीगुरुचरित्रावर आधारित अशा विशेष पाठावृत्तींची निर्मिती झाली. प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजरचित श्री सप्तशतीगुरुचरित्रसार, प. पू. सद्‌गुरु श्री. मामा महाराजविरचित श्रीगुरुचरित्र नित्यपाठ, स्वामी दत्तावधूतरचित संक्षिप्त श्रीगुरुचरित्र या अशाच काही प्रासादिक पाठावृत्ती प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद आहेत. कित्येक दत्तभक्त या पोथींच्या केवळ वाचनानेही श्रीगुरूंच्या अपार कृपेची अनेक प्रकारे अनुभूती घेऊन कृतार्थ झाले आहेत, होत आहेत. संतकवी श्री दासगणु महाराजरचित श्री गुरूचरित्र सारामृत ही अशीच एक दिव्य पाठावृत्ती आहे. मूळ गुरुचरित्रातील सर्व कथाप्रसंग साररुपाने या ग्रंथात कथित केले आहेत. सिद्धकवी श्री दासगणु महाराजांनी अत्यंत रसाळपूर्ण आणि सुलभतेने रचलेले हे प्रासादिक काव्य दत्तभक्तांनी आवर्जून वाचावे असेच आहे. संतकवी श्री दासगणु महाराजविरचित श्री गुरूचरित्र सारामृत   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 14, 2023

श्रीगुरुचरित्र नित्यपाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

भक्तांच्या कल्याणासाठी पदोपदी तळमळणाऱ्या त्या दत्तमाऊलीच्या लीलांचे किती वर्णन करावे बरें ? महाप्रसादिक श्रीगुरुचरित्र हा सिद्धमंत्ररूप आणि वरदग्रंथ आहे. त्यांमुळे मंत्राच्या अनुष्ठानविधीचे सर्व नियम या ग्रंथाचे पारायण करतांना विशेष पाळावे लागतात. मात्र आपल्यासारख्या अतिसामान्य दत्तभक्तांनाही हा परमलाभ प्राप्त व्हावा, यासाठी - " सर्वजनसुलभ अशी श्रीगुरुचरित्राची पाठावृत्ती करावी." असा श्रीदत्तात्रेय प्रभूंचा प. पू. सद्‌गुरु श्री. मामा महाराजांना आदेश झाला. दत्तमहाराजांच्या या आज्ञेनुसार प. पू. श्री. मामांनी श्रीगुरुचरित्राच्या प्रकाशित पोथ्या, विविध हस्तलिखिते आणि प. प. श्री. टेम्ब्ये स्वामी महाराजांचे 'समश्लोकी गुरुचरित्र' अशा अनेक उपलब्ध साहित्याचा आधार घेऊन पाठभेद निश्चित केला आणि श्रीगुरुचरित्र नित्यपाठ कसा तयार करायचा, याचे संकलन केले.

प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद असलेल्या श्रीगुरुचरित्र नित्यपाठ या ग्रंथाच्या मनोगतात श्री. शिरीष शांताराम कवडे लिहितात - अनेक साधकांनी, भाविकांनी, श्रीदत्तभक्तांनी मुक्तकंठाने या नित्यपाठाची महती मान्य करून अनुभवलेली आहे. मूळ श्रीगुरुचरित्राची नित्य पारायणे करणाऱ्या अनेकांनी, नित्यपाठाचीच पारायणे करणे सुरू केलेले आहे; इतके हे संस्करण पारायण - सुलभ झालेले आहे. या नित्यपाठामुळे अनेकजण श्रीगुरुचरित्राच्या अमृतगंगेत सुस्नात होऊन धन्यता अनुभवू शकले आहेत; श्रीगुरूंच्या अपार कृपेची अनेक प्रकारे अनुभूती घेऊन कृतार्थ होत आहेत. ही सगळी भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या प. पू. सद्‌गुरु श्री. मामांवर असलेल्या पूर्णकृपेचीच प्रचिती आहे.

वेदतुल्य अशा श्रीगुरुचरित्र वाचनाचे पूर्णत: समाधान अन अनुभूती देणाऱ्या या नित्यपाठाचे वैशिष्ट्य असे की - प्रत्येक अध्यायातील काही निवडक ओव्या घेऊन त्या त्या अध्यायाचे पूर्ण सार आणि कथानके, आख्याने संक्षिप्त रूपांत वर्णिली आहेत. द्विरुक्ती असलेला अथवा धर्मशास्त्रीय चर्चा, कर्मकांड निरूपणाचा भाग वगळलेला आहे. वेदतुल्य, मंत्ररूप ग्रंथराज अशा श्रीगुरुचरित्रातील केवळ निवडक २७३३ ओव्या असलेला ( मूळ श्रीगुरुचरित्र ओवीसंख्या ७४९१ आहे.) हा नित्यपाठ मूळ ग्रंथाइतकाच प्रासादिक आहे, हे निःसंशय !

मागील काही काळ हा ग्रंथ सहज उपलब्ध नव्हता. मात्र प. पू. सद्‌गुरु योगिराज श्री. गुळवणी महाराजांच्या आशीर्वादस्वरूप आणि दत्तभक्तांच्या मागणीनुसार श्रीगुरुचरित्र नित्यपाठ या ग्रंथाची आता चतुर्थ आवृत्ती राजसंस्करण स्वरूपांत प्रकाशित झाली आहे. श्रीवामनराज प्रकाशनाच्या या प्रासादिक ग्रंथाचे मूल्य केवळ दोनशे रुपये आहे. शक्य झाल्यास सर्व दत्तभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

श्रीवामनराज प्रकाशनाच्या अधिकृत संस्थळावर या ग्रंथाविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

अर्थात श्रीगुरुचरित्र हा वरदग्रंथही असल्याने म्हणजेच प्रत्यक्ष श्रीगुरुंचा वर या ग्रंथास प्राप्त झाला असल्याने तो सर्वथैव सिद्धीप्रद आहे. या ग्रंथाच्या केवळ वाचनानेही भगवान दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती निश्चितच येते.

भगवान दत्तमहाराजांची कुठल्या ना कुठल्या रूपांत सतत सेवा घडावी, व त्या भक्ताभिमानी, शरणागतवत्सल परब्रह्मानेही ही सेवा त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावी, आणि आपल्या सर्वांवर त्यांची सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना !

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Aug 15, 2022

सोरटी सोमनाथ करंजे माहात्म्य


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय ॥


सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम ।

भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ॥

अर्थात चंद्रदेवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन, त्या सोमाच्या तपाचे फलित म्हणून जो परम कृपाळू शिवशम्भू या सौराष्ट्र देशांत अवतरित झाला आहे, ज्याने प्रत्यक्ष चंद्राला आभूषण म्हणून स्वतःच्या मस्तकी धारण केले आहे, तो ज्योतिर्लिंगस्वरुप भगवान श्री सोमनाथ माझा आश्रयदाता आहे.  
जागृत बारा ज्योतिर्लिंगांतील प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून सोरटी सोमनाथ हे प्रसिद्ध आहे. हा भोळा सांब, शिवभक्त मालूबाई हिच्यासाठी करंजे क्षेत्रीं येऊन राहिला. या करंजे क्षेत्राचे वैशिष्ट्य असे की श्रावण महिन्यातील सोमवारी सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच सर्परूपात इथे येतो असे मानले जाते. त्या नागराजरूपी श्री गिरिजापतीलाच, स्थानिक भाविक ' स्वारी येणे ' असे म्हणतात. या सर्पाच्या मस्तकावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची खूण स्पष्ट दिसते.

सोमनाथांची आरती जय देव जय देव सोमनाथा । आरती ओवाळीतो मनोभावें आतां ॥धृ. ॥ मालुबाई सती पतिव्रता थोर । भक्ति करुनी आणिले सोरटी सोमेश्वर ॥ पतीने पाळत धरुनी पाहिला चमत्कार । जावा नणंदांचा त्रास सोसिला फार ॥१॥ देखोनी सतीच्या त्रासाते देव । स्वप्नी प्रगटोनी सांगितसे सर्व । शेषरुपी येऊनी करीन वास्तव्य । धेनुसी वेष्ठुनी दुग्ध प्राशीन मी बरवे ॥२॥ स्वप्नाप्रमाणें नाथ शेषरुपी आले । धेनु वेष्ठुनी दुग्ध पिऊं लागले । देखोनी खोमणेराव भयचकित झाले । कुऱ्हाड फेकुनी देवा तुम्हां मारिले ॥४॥ उत्तर ऐकता मालू त्रासली फार । देखोनी खोमणा शाप दिलासे थोर । ऐकोनी शाप खोमणा कापे थरथर । प्रगटोनी देवा त्याचा केला उद्धार ॥४॥ खोमण्याचा उद्धार मालू देखोनी । देवा तुजला मी बोलू कशा रीतीनी । मालूचे शब्द देवा ऐकोनी कानी । तत्काली उद्धरिली मालू भामिनी ॥५॥ सर्परुपे निघतां भक्ति पाहूनी । भक्त घेताती आनंदे उचलोनी । विधीयुक्त तुमची पुजा करोनी । पाजिती दूग्ध तुम्हां शर्करा घालोनी ॥६॥ सोमनाथा तुम्ही भक्ति भुकेला । मालू महादू यांचा उद्धार केला । अल्पबुद्धि खोमणा तोही उद्धरिला । आबा पाटील दास लागें चरणाला ॥७॥

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥


॥ ॐ नमः शिवाय ॥

श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु


Jun 23, 2022

स्मरता जो भक्तां भेटे... श्री दत्तात्रेय ध्यान आणि वाङ्मय संग्रह


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

दत्तभक्तहो, श्रीगुरुचरित्राची प्रासादिकता तर सर्वश्रुत आहेच. श्री प. प. वासुदेवानंद सरस्वतीमहाराजांच्यासारख्या अवतारी, साक्षात्कारी प्रभुतींनी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने आणि अर्थातच आशीर्वादाने या परमपवित्र आणि दिव्य ग्रंथाचे संस्कृतमध्ये संक्षिप्त भाषांतर केले. या गीर्वाणवाणीचे वैशिष्ट्य असे की कमीत कमी शब्दांत अधिक आशयपूर्ण आणि रसाळ वर्णन सहजच करता येते. याउपर, सिद्धहस्त रचनाकार श्री प. प. वासुदेवानंद सरस्वतीमहाराज म्हणजे दत्तोपासकांसाठी हा खचितच दुग्ध-शर्करा योग आहे. श्री टेम्ब्ये स्वामीरचित श्रीगुरुचरितं (द्विसाहस्त्री) हा असाच एक भक्तिरसपूर्ण ग्रंथ आहे. या वेदतुल्य अशा दिव्य ग्रंथाचे माहात्म्य अधोरेखित करतांना श्री टेम्ब्ये स्वामीमहाराज लिहितात, ' स एवात्रेयगोत्रोत्थगणेशब्रह्मपुत्रगाः । पुनानोऽर्यो जयत्यत्र ग्रंथात्मा तारकोऽव्ययः ' अर्थात, तोच (नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधरलिखित) श्रीगुरुचरित्रग्रंथरूपी परब्रह्मस्वरूप, भक्तवत्सल श्रीदत्तात्रेय या अत्रिगोत्रोत्पन्न गणेशब्राह्मणाच्या पुत्राच्या वाणीचे निमित्त करून इथे पुन्हा प्रगटला आहे. श्रीगुरुचरित्राच्या पठणाने वा श्रवणाने दत्तभक्तांचा इह-पर अभ्युदयच होईल, ही ग्वाहीच जणू श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दिली आहे.
याच कल्याणकारी ग्रंथातील श्री दत्तप्रभूंचे ध्यानपर काही श्लोक पाहू या. या वरदप्रद श्लोकांचे नित्य पठण करून श्री दत्तात्रेयांच्या ध्यानमूर्तीचे पूजन करावे. हे ध्यान द्विभुज असून श्रीदत्तमहाराजांच्या चरणद्वयांपासून आरंभ करून शेवटी त्यांच्या दिव्य मुखकमलाचे वर्णन केले आहे. स्वामींच्या आराध्यदेवतेचे हे ध्यान दिगंबर असून ह्यांत कोणत्याही वस्त्र, आयुध किंवा आभरणें यांचे वर्णन नाही. श्री टेम्ब्ये स्वामी महाराजविरचित श्रीदत्तात्रेय वज्रकवचांत श्री दत्तप्रभूंचे साधारण असेच स्वरूप-वर्णन आहे. त्यांना श्री दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर केलेले हे वर्णन आहे. अर्थातच याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.   

स त्वं परात्मा पुरुषोत्तम श्रुति-ख्यातः समाविश्य जगत्त्रयं सदा । ईशाव्ययानन्त बिभर्षि दत्त ते पादाब्जयुग्माय नमोऽस्तु सर्वदा ॥१॥  वज्राङ्कुशध्वजाब्जाड़्क-युग्रक्ताब्जाभपत्तलः। गूढगुल्फः कूर्मपृष्ठोल्लसत्पादोपरिस्थलः ॥२॥ जानुपूर्वकजङ्घश्च विशालजघनस्थलः । पृथुश्रोणिश्च काकुत्स्थश्चारुनाभिर्दलोदरः ॥३॥  अररोरा मांसलांसो युगव्यायतबाहुकः । सुचिह्नचिह्नितकरः कम्बुकण्ठः स्मिताननः ॥४॥ 

स्नैग्ध्यधावल्ययुक्ताक्षश्चलत्-पिङ्गजटाधरः। चन्द्रकान्तिः प्रभुः कृष्ण-भ्रूरःश्मश्रुकनीनिकः ॥५॥

भावशुद्धद्विजाकीर्ण-स्वास्याब्जोऽभीवरप्रदः । दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥६॥

भावार्थ : सर्वांतर्यामी, क्षर-अक्षर अर्थात सर्व जड-स्थावर-चेतन पदार्थांचा नियंता, वेदश्रुतींनी पुरुषोत्तम असे समर्पक वर्णन केलेला, त्रैलोक्यव्यापी, पालनकर्ता, अव्यय आणि अनंत ईश्वररूपी असा तू परमात्मा आहेस. तुझ्या या भवतारक चरणद्वयांना सतत वंदन असो.  वज्र, अंकुश, ध्वजा आणि पद्म या शुभ चिह्नांनी युक्त, लाल कमळाप्रमाणे आरक्त तळवे, पदांचा वरील भाग कांसवाच्या पाठीसारखा फुगीर आणि टांचा झांकलेले असे ज्याचे चरण आहेत, ज्याने मांडीच्या वरच्या भागावर एक पाय ठेवलेला आहे, स्थिर आणि विशाल बैठकीवर सिद्धासन घालून जो बसलेला आहे, जो दिगंबर आहे, ज्याच्या पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ अशा उदरावर (पोटावर ) शोभायमान नाभी आहे, तसेच रुंद छाती असलेला, मांसल आणि विशाल स्नायूयुक्त असे द्विबाहू असलेला, ज्याचे हात शुभचिन्हांनी मंडित आहेत, ज्याचा कंठ एखाद्या शंखाप्रमाणे तीन वलयांनी युक्त आहे, प्रसन्न चेहऱ्यावर मधुर स्मित विलसत आहे, ज्याचे नयन अतिशय तेजस्वी आणि कृपार्द्र आहेत, (ज्याच्या कपाळावर) पिंगट अशा जटा रुळत आहे, चंद्राप्रमाणे ज्याची कांती दिव्य आहे, ज्याच्या भुवया, छाती, दाढीमिशा आणि डोळ्यांतील बुबुळे काळी आहेत, सुंदर अशा दंतपंक्तीने ज्याचे मुखकमल शोभत आहे, आणि आपल्या दोन वरदहस्तांनी, आपल्या भक्तांना सर्वदा अभय तसेच वरदान देणारा तो अत्रि-अनसूयानंदन श्री दत्तप्रभू सदैव माझ्या हृदयांत वास करो. 
श्री दत्तात्रेय-स्वरूप वर्णनपर श्री टेम्ब्ये स्वामीमहाराजविरचित अशीच एक भक्तीरसपूर्ण पदरचना दत्तभक्तांसाठी देत आहोत.      चिंतूं दत्तात्रेया अनसूयातनया । श्रुतिगणगेया ध्येया वंद्या ॥१॥ वराभयकर सिद्धासनावर । बसे निरंतर सुरवर्य ॥२॥ जो खेचरी मुद्रा लावी सोडी तंद्रा । सदा योगनिद्रा मुद्रायुक्त ॥३॥ प्रफुल्ललोचन सुहास्यवदन । दयेचें सदन मनमोहन ॥४॥ स्मरता जो भक्तां भेटे वासुदेव । स्वचित्ती सदैव भावें चिंती ॥५॥ श्री दत्तात्रेय वाङ्मय संग्रह
दत्तभक्तांसाठी अत्यंत अमौलिक असा वाङ्मय संग्रह आतां उपलब्ध झाला आहे. श्री दत्तात्रेयांचे स्वरूप, इतिहास, दत्तचरित्र, श्री दत्तात्रेयांचे अवतार, श्री दत्तोपासना, श्रीदत्तक्षेत्रें, प्रमुख दत्तभक्त आणि त्यांची ग्रंथसंपदा अशा अनेक विषयांचे सुरेख विवेचन आणि दत्तभक्ती वृद्धिंगत करणारे हे संदर्भग्रंथ दत्तभक्तांना नित्य उपयुक्त होतील. श्री दत्तप्रभूंची ही वाङ्मयपूजा त्यांच्याच चरणीं समर्पित!  

दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


Jan 26, 2021

श्री प. प. श्रीधर स्वामी महाराज



॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीराम समर्थ ॥

हृदयीं वेदगर्भ विलसे l मुखीं सरस्वती विलासे l साहित्य बोलता जैसे l भासती देवगुरु l शांति दया क्षमाशील l पवित्र आणि सत्त्वशील l अंतरशुद्ध ज्ञानशील l ईश्वरीपुरुष ॥ ( श्रीमत दासबोध )

श्रीसमर्थ रामदास स्वामीनीं श्रीमत दासबोधात केलेले हे ईश्वरीपुरुषाचे वर्णन वाचतांना श्री प. प. सद्गुरू श्रीधरस्वामी महाराजांचेच स्मरण होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांत देगलूर नामक तालुक्याचे गांव आहे. तिथल्याच पतकी या देशस्थ ऋग्वेदी कुटुंबात श्रीधरस्वामींचा जन्म झाला. नारायणराव आणि कमलाबाई या सुशील दाम्पत्यांस तीन अपत्यें झाली. तथापि, त्यांच्या कुलोपाध्यायानें ' पतकी ' घराण्यास सर्पशाप असून लवकरच हे घराणे निर्वंश होईल, असे भविष्य वर्तविले. तसेच, वंशोद्धारासाठी श्री क्षेत्र गाणगापूर येथे जाऊन श्री दत्तात्रेयांचे अनुष्ठान करावे, असे सांगितले. तदनुसार, नारायणरावांनी सहकुटुंब गाणगापुरास जाऊन श्री दत्तप्रभूंची कठोर उपासना केली. त्याचेच, फलस्वरूप म्हणून ' मी स्वतः अंशरूपानें तुमच्या वंशात जन्म घेईन.' असा श्री दत्त महाराजांचा नारायणरावांस दृष्टांत झाला आणि १९०८ साली मार्गशीर्ष पौर्णिमेस श्री दत्तजयंतीच्या शुभदिनीं श्रीधरस्वामींचा जन्म झाला.

यथावकाश, श्रीधर स्वामींनी श्रीसमर्थ रामदास यांच्या प्रतिमेसमोर त्रयोदशाक्षरी श्रीराम या दिव्य मंत्राचा अनुग्रह घेतला आणि श्रीक्षेत्र सज्जनगड येथे तपश्चर्या केली. शके १८५१च्या श्रीदासनवमी उत्सवांत श्रीधर श्रीसमर्थ चिंतन करीत असतांना त्यांना श्री रामदास स्वामींचे दिव्य दर्शन झाले. त्यावेळीं श्रीसमर्थांनी त्यांना ' दक्षिणेकडे धर्मप्रचारार्थ भ्रमण करावे. ' अशी आज्ञा केली. गुरुवचनांचे श्रीधर स्वामींनी पालन केले. त्यांनी रचलेली विपुल वाङ्मय संपदा, श्री स्वामींची प्रवचने, आणि त्यांचे चरित्रग्रंथ आता भाविकांसाठी उपलब्ध आहे.

श्री प. प. सद्गुरू श्रीधरस्वामी यांचा दिव्य मंत्र :

नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरुपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः ॥ 

श्री श्रीधर स्वामींची वाङ्मय संपदा  

श्रीधर स्वामींचे दिव्य अनुभव      

श्रीधरस्वामींची प्रवचनें

श्रींची मराठी ध्वनी पुस्तकें


Dec 30, 2020

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर पुण्यतिथी महोत्सव २०२०-२१


|| श्रीराम समर्थ ||

ब्रह्माला चैन पडेना म्हणून चैतन्यरूपाने खाली आले ते श्रीब्रह्मचैतन्य ! 

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान, गोंदवले यांच्या विश्वस्तांतर्फे श्रींचा १०७वा पुण्यतिथी दि. ३१ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत श्रीक्षेत्र गोंदवले येथे साजरा झाला. 

संस्थानच्या अधिकृत वेबसाईट लिंकवर आपण दर्शनाचा लाभ दररोज घेऊ शकता.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर १०७वा पुण्यतिथी महोत्सव  

श्री सद्-गुरु श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे ओवीबद्ध चरित्र :

संपूर्ण श्री सद्-गुरुलीलामृत 

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरविरचित श्रीरामपाठ

हाचि सुबोध गुरूंचा ...

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति


Mar 19, 2020

नित्योपासनेसाठी काही पोथी - पुस्तकें


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 



दत्तभक्तांच्या नित्योपासनेसाठी ऑनलाईन उपलब्ध असलेली काही पुस्तकें : 



॥ श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


Jun 22, 2019

श्री वासुदेव निवास


परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीवामनराव गुळवणी महाराज हे दत्तसंप्रदायातील एक अधिकारी सत्पुरुष होते. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने त्यांचा जन्म मातोश्री सौ. उमाबाई आणि पिताश्री पं. दत्तंभटजी या दत्तोपासक दांपत्याच्या पोटी दि. २३ डिसेंबर १८८६ रोजी कुडूत्री जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांची दत्तोपासना होती. प. पू. श्रीगुळवणी महाराजांनी त्यांचे सदगुरू प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी चौदाशे किलोमीटर प्रवास केला, त्यातील तब्बल सातशे किलोमीटर प्रवास पायी केला. शेवटी कर्नाटकातील हावनुर येथे त्यांचे दर्शन झाले. याच भेटीत श्रीस्वामी महाराजांनी त्यांना मंत्रोपदेश केला आणि स्वतःमध्ये व्याघ्रांबरधारी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घडविले. प. पू. श्रीगुळवणी महाराज चित्रकार होते, त्यांना झालेल्या दर्शनाचे तैलचित्र त्यांनी तयार केले जे आजही श्रीवासुदेव निवास मध्ये देवघरात विराजमान आहे. श्रीस्वामीमहाराजांच्यानंतर पू. श्री गुरुमहाराजांची योगसाधना व महायोगाची जिज्ञासा पाहून प.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. दत्तभक्ती आणि महायोग अर्थात शक्तिपातविद्या यांचा अपूर्व संगम सदगुरू योगीराज श्रीगुळवणी महाराज यांच्या जीवनात झाला आहे. आर्त, मुमुक्षु भक्तांच्या अंतिम कल्याणासाठी भक्तीमार्ग आणि शक्तिपात मार्ग या दोन्हींच्या प्रसारासाठी योगीराजांनी संपूर्ण जीवनभर दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले.

गुरुतत्व हेच ईश्वरी तत्व आहे तसेच ते विश्व व्यापक आहे, त्याचे वर्णन ‘वासुदेवः सर्वम्’ असेच आहे या भुमिकेतून परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीगुळवणी महाराजांनी सन १९६५ साली ‘श्रीवासुदेव निवास’ ची स्थापना ‘१२/४७, कर्वे पथ, एरंडवणे, पुणे’ येथे केली. ‘श्री वासुदेव निवास’  शक्तिपात योगविद्येचे आद्यपीठ आणि नित्य प्रकाशित दीपस्तंभ म्हणून जगभर विख्यात आहेच. तसेच प. पू. श्री महाराजांच्या मातोश्री सौ. उमाबाई यांना भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका प्रसाद रूपाने प्राप्त झाल्या, त्याच ‘श्रीप्रसाद पादुका’ श्रीवासुदेव निवासमध्ये अधिष्ठित आहेत.

प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांची समग्र ग्रंथसंपदा तसेच प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र आणि परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीगुळवणी महाराजांचा जीवनपट ‘श्रीवासुदेव निवास’ यांच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे. भाविकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.   


प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी विरचित समग्र ग्रंथसंपदा, स्तोत्रसंग्रह, नित्य उपासना  


Mar 28, 2019

श्री दत्तचरित्र सार


30 Best Dattatreya images | Hindu gods, Indian gods, Swami samarth


श्री विष्णु गोपाळ नातू रचित श्री दत्तचरित्र सार हा सुरस ग्रंथ विनामूल्य उपलब्ध आहे. अत्रिमुनींची तपश्चर्या, अनसूया सत्त्वपरिक्षा, श्रीदत्त त्रैमूर्ती जन्म, श्रीदत्तात्रेय स्तोत्र, श्री नवनाथ कथा, परशुराम - श्रीराम- श्रीकृष्ण कथा,श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती चरित्र, चिदंबर दिक्षित आणि श्री स्वामी समर्थ चरित्र कथा अशा दत्तमहाराजांच्या अनेक लीलांचा ह्या ग्रंथात समावेश आहे. अनादि अनंत अश्या श्री दत्तमहाराजांच्या चरित्राचे वर्णन करण्यास खरे तर कोण समर्थ आहे? श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या आशीर्वादाने सुलभ, सोप्या आणि रसाळ ओव्यांतून ग्रंथकर्ते  श्री दत्तचरित्राची सुंदर सफर वाचकांस घडवून आणतात. तसेच श्री दत्तप्रभू नमनावली आणि ह्या ग्रंथाचे लेखनकर्ते ह्यांचे मनोगतही अत्यंत वाचनीय आहे. दत्तभक्तांनी ह्या सुरेख ग्रंथाचे अवश्य वाचन करावे.  



श्री दत्तचरित्र सार - अंतरंग  


श्री दत्तचरित्र सार - अध्याय १ ते ९


श्री दत्तचरित्र सार - अध्याय १० ते २६


श्री दत्तचरित्र सार - अध्याय २७ ते ४४


श्री दत्तचरित्र सार - अध्याय ४५ ते ५०


श्री दत्तचरित्र सार - अध्याय ५१ ते ५३


श्री दत्तचरित्र सार - अध्याय ५४ ते ५९


श्री दत्तचरित्र सार - अध्याय ६० ते ६८


श्री दत्तचरित्र सार - अध्याय ६९ ते ७२


श्री दत्तचरित्र सार - अध्याय ७३ ते ७७