Nov 4, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय १


व्याघ्रेश्वर शर्माची भक्तीगाथा 

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री शंकरभट्ट नावाचे भारद्वाज गोत्रांतील देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे समकालीन असून प्रभूंचे भक्त होते. शंकरभट्टांनी अखिल ब्रह्मांडनायक श्री दत्तमहाराजांचे कलियुगातील प्रथम अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला होता. या कलियुगांत अनसूया-अत्रिनंदन भगवान दत्तात्रेयांचा प्रथम अवतार आंध्र प्रदेशातील पीठिकापुरम् या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने झाला होता.

परंपरेनुसार, श्रीवल्लभ चरित्रामृताच्या प्रारंभी मंगलाचरण करतांना ते श्री महागणपती, श्री महासरस्वती,  श्रीकृष्ण भगवान,  सर्व चराचरवासी  देवी-देवता आणि सकल गुरु परंपरेचे स्मरण करून मनःपूर्वक नमन करतात. एकदा शंकरभट्ट ' उडपी ' या तीर्थस्थानी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या मनोहारी द्वारकाधीशानें त्यांना कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. तदनुसार त्यांनी कन्याकुमारीस प्रयाण केले. तिथे अंबामातेची भक्तिपूर्वक पूजा करून प्रार्थना केल्यावर, देवीने प्रसन्न होऊन त्यांना कुरवपूरांस जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे असा दृष्टांत दिला. शंकरभट्ट तात्काळ कुरवपुरास निघाले. प्रवासा दरम्यान ते मरुत्वमलै या स्थानी पोहोचले. या पवित्र ठिकाणी अनेक गुहा असून अनेक सिद्धपुरुष गुप्तपणे तिथे तप:श्चर्या करीत असतात, असा या स्थानाचा महिमा आहे. 

शंकरभट्ट सहजच एका गुहेत शिरले असता, तिथे त्यांना आत एक वाघ  शांत  बसलेला  दिसला. त्या वाघाला पाहताच शंकरभट्ट अतिशय भयभीत झाले आणि त्यांनी '' श्रीपाद  !  श्रीवल्लभा  !'' अशी अत्यंत व्याकुळतेने साद घातली. त्या निर्जन गुहेत त्यांच्याच आरोळीचा पडसाद उमटला. त्या आवाजाने एक वृद्ध तपस्वी त्या गुहेतून बाहेर आले आणि म्हणाले, "श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेणारा तू त्यांचा भक्त असावास. ह्या वाघाबद्दल किंचितही भय तू मनात आणू नकोस. हा वाघ  एक  ज्ञानी  महात्मा  आहे. त्याला नमस्कार कर." तेव्हा, शंकरभट्टांनी अत्यंत  नम्रभावाने  त्या  वाघास  नमस्कार  केला असता त्या  वाघाने उच्चस्वरांत ॐ काराचा  उच्चार  केला.  त्या  आवाजाने  सारा  मरुत्वमलै  पर्वत  दुमदुमला. क्षणार्धात त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य पुरुष प्रगट झाला आणि त्या वृद्ध तपस्व्यास वंदन करून अंतर्धान पावला. त्यानंतर ते वृद्ध तपस्वी शंकरभट्टांना गुहेत घेऊन गेले. तिथे त्यांनी संकल्पमात्रें अग्नी तसेच आहुतीसाठी लागणारे सर्व साहित्यही निर्माण केले आणि वैदिक मंत्रोच्चारांसह आहुती देऊ लागले. त्यानंतर त्यांनी ' या  यज्ञाचे  फल  स्वरूप  म्हणून  तुला  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  प्रत्यक्ष दर्शन  होईल.' असा शंकरभट्टांस आशीर्वाद दिला. 

अत्यंत सदगदित होऊन शंकरभट्टांनी त्या तेजस्वी सिद्धपुरुषांस प्रणिपात करत आपला सर्व वृत्तांत कथन केला. तसेच ते व्याघ्ररूपी महात्मा कोण होते ? आणि श्री दत्तप्रभू, श्रीपाद श्रीवल्लभ यांची महती विस्तारपूर्वक सांगावी अशी प्रार्थना केली. त्यावर अत्यंत संतुष्ट होऊन ते वृद्ध तपस्वी त्या व्याघ्ररूपी महात्म्यांची पूर्वकथा सांगू लागले. 

आंध्रप्रदेशातील गोदावरी नदीच्या तीरावर अत्री मुनींची तपोभूमी आहे. त्या स्थानास आत्रेयपूर असेही संबोधतात. तिथेच एक काश्यप गोत्रीय अत्यंत विद्वान, आचारसंपन्न ब्राह्मण राहत होता. त्यास परमेश्वराच्या कृपेने एक पुत्र झाला खरा, परंतु तो पुत्र मतिमंद  होता.  ब्राह्मण पती-पत्नींनी त्याचे  नांव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वराचे व्रतबंधांस योग्य वय झाले तरी तो संध्यावंदनही करू शकत नसे. त्याच्या पित्याने त्याला गायत्री मंत्र, वेदाध्ययन आदि शिकवण्याचे  खूप  प्रयत्न  केले.  परंतु व्याघ्रेश्वर ते काहीच आत्मसात करू शकला नाही. एवढया विद्वान ब्राह्मणाचा एक अज्ञानी पुत्र अशीच गावातील लोक त्याची थट्टा, उपेक्षा करीत असत. गावकऱ्यांचे ते अपमानजनक बोलणें ऐकून व्याघ्रेश्वर अतिशय दुःखी होत असे आणि अत्यंत दुःखी-कष्टी होत ईश्वराची निरंतर प्रार्थना करीत असे. एके दिवशी, ब्राह्ममुहूर्तावर त्यास स्वप्नदृष्टांत झाला. त्याला स्वप्नांत एका दिव्य बालकाचे दर्शन  झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरणकमल भूमीस लागताच, भूमीसुद्धा दिव्य आणि कांतीमान झाली. ते बालक हळू हळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे  आले आणि त्यास म्हणाले,  " बाळा, मी असताना तुला भय कशाचे ? या आत्रेयपूर ग्रामाचे व माझे प्राचीन ऋणानुबंध आहेत. तू  हिमालयातील बदरिकारण्यात जा. तेथे तुझे सारे शुभ होईल." त्या अति तेजस्वी बालमूर्तीला व्याघ्रेश्वर सद्गदित होऊन वंदन करीतच होता, तेव्हढ्यांत त्याला जागृती अली. त्या दृष्टांतानुसार, व्याघ्रेश्वर शर्माने हिमालयातील बदरीकारण्याकडे लवकरच प्रयाण केले. श्री दत्तप्रभूंच्या कृपेनें , त्याला प्रवासमार्गात काहीही त्रास झाला नाही. योग्य स्थानी आसरा, अन्न, जल आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन सहजच विनासायास मिळत गेले. मार्गक्रमण करीत असतांना एक कुत्रा सतत त्याच्याबरोबर येऊ लागला.  अगदी बदरीवनापर्यंतच्या प्रवासांत त्या श्वानाची व्याघ्रेश्वरास सोबत मिळाली. तिथे आल्यावर, उर्वशी कुंडात त्याने स्नान केले. त्याच वेळी एक तपस्वीही आपल्या शिष्यांसह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले होते. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा, अशी अत्यंत नम्र स्वरांत त्यांची प्रार्थना केली. त्यावर त्या तेजस्वी यतींनी व्याघ्रेश्वरास शिष्य करून घेण्याचे मान्य केले. अन काय आश्चर्य व्याघ्ररेश्वरासोबत आलेले ते श्वान तात्काळ अंतर्धान पावले. तेव्हा ते तपस्वी वदते झाले, “ अरे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो श्वान म्हणजे तुझ्या पूर्व जन्मातील केलेल्या पुण्याचे प्रतीक होते. त्या पुण्यरूपी श्वानाने तुला आमच्या स्वाधीन केले आणि अंतर्धान पावले. ही सर्व श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचीच लीला आहे. केवळ त्यांच्या कृपेनेच तू या नर-नारायणांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तपोभूमीत आला आहेस. 

अत्यंत सद्गदित होऊन व्याघ्रेश्वर शर्माने त्या तेजस्वी माहात्म्यास वंदन केले आणि म्हणाला, “ गुरुवर्य, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू कोण आहेत? त्यांनी माझ्यासारख्या मतिमंद विप्रपुत्रावर एवढी कृपा का केली बरें ?” त्यास दत्तगुरूंची महती सांगतांना ते यती म्हणाले “ अरे, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्त प्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी “सावित्री काठक चयन” नांवाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठीकापुरम येथे संपन्न केला होता. त्या दिव्य यज्ञाचे फलित म्हणून  पिठीकापुरम येथे श्रीपादप्रभूंनी अवतार घेतला. त्यांची तुझ्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे.” त्यानंतर त्यांनी व्याघ्रेश्वरास ज्ञानोपदेश केला आणि “ मी लवकरच माझ्या श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी प्रस्थान करीन व पुन्हा एका वर्षाने परत येईन. तोपर्यंत, तू ह्या गुहेत बसून तपश्चर्या कर. श्रीपादांच्या आशीर्वादाने तुला लवकरच आत्मज्ञान प्राप्ती होईल." असे सांगून ते गुरूवर द्रोणागिरी पर्वताकडे प्रयाण करते झाले. 

गुरूंच्या आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या गुहेत तपश्चर्येस बसला. परंतु, तप करतांना त्याचे सर्व ध्यान व्याघ्ररुपाकडे असल्याने त्यास वाघाचे रूपच प्राप्त झाले. आपल्या गुरूंवर दृढ निष्ठा ठेवून त्याची अशी तपश्चर्या एक वर्षभर सुरूच होती. यथावकाश गुरुवर्यांचे तिथे आगमन झाले. ते तेजस्वी महात्मा आपल्या सर्व शिष्यांच्या साधनास्थितीचे अवलोकन करू लागले. परंतु या सर्वांमध्ये त्यांना व्याघ्रेश्वर कोठेच दिसला नाही, तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने आपल्या शिष्याचा शोध घेतला. त्यानुसार ते एका गुहेत प्रवेशले आणि एक ध्यानस्थ वाघ पाहून हाच आपला शिष्य व्याघ्रेश्वर आहे, हे त्या तपस्व्यांनी क्षणार्धात ओळखले. अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी व्याघ्रेश्वरास आशीर्वाद दिला आणि ओंकार मंत्राचे ज्ञान दिले. तसेच, “ श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ” हा गुरुमंत्रही जपण्यास सांगितला. गुरूंच्या उपदेशानुसार, त्याने मंत्रसाधना सुरु केली. 

पुढें, गुरूंच्या आज्ञेनुसार वाघाच्या रुपातच त्याने कुरुगड्डीस प्रयाण केले. लवकरच तो कुरुगड्डी येथील कृष्णा नदीच्या अलीकडील तीरावर येऊन पोहोचला. तिथेच तो “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” या मंत्राचा जप करू लागला. त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या शिष्यांसह कुरुगड्डी ग्रामीं वार्तालाप करीत बसले होते. ते तात्काळ उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतो आहे, असे म्हणून ते स्मर्तुगामी नदीच्या पाण्यावरून चालत पैलतीरावर गेले. आपल्या इष्टदेवतेच्या प्रत्यक्ष दर्शनाने सदगदित झालेल्या व्याघ्रेश्वराने श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक टेकवून अत्यंत भक्तीपूर्वक नमन केले. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला कृपाहस्त त्या वाघाच्या मस्तकावर ठेवताच त्याचे अष्टभाव जागृत झाले आणि तो भक्तिरसात रंगून गेला. त्यानंतर प्रभू त्या वाघावर स्वार होऊन कृष्णा नदी पार करीत कुरुगड्डीस पोहोचले. श्रीपाद श्रीवल्लभांना अशा प्रकारे वाघावर बसून आलेले पाहून त्यांच्या शिष्यांसहित सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यांनी प्रभूंचा जयजयकार केला. 

श्रीपादस्वामी वाघावरून उतरता क्षणीच, त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्या तेजस्वी पुरुषाने व्याघ्राजीन काढले. त्यानंतर, श्रीपाद श्रीवल्लभांना श्रद्धापूर्वक नमन करून त्या व्याघ्राजीनाचा त्यांनी आसन  म्हणून स्वीकार करावा अशी प्रार्थना केली. त्यावेळी आत्मानंदी तल्लीन झालेल्या त्या भक्ताच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनी तो जणू प्रभूंच्या अत्यंत पावन चरणकमलांवर अभिषेकचं करत आहे, असाच भाव तेथे असलेल्या सर्व शिष्यांठायी होता. अत्यंत वात्सल्यतेनें श्रीपाद स्वामींनी आपल्या लाडक्या भक्तास उठविले, आणि मृदू स्वरांत ते बोलू लागले, “ अरे व्याघ्रेश्वरा, पूर्वजन्मात तू अत्यंत बलशाली मल्ल होतास. त्यावेळी तू वाघांशी द्वंद्व करून त्यांना अत्यंत क्रूरपणे त्रास देत होतास. त्या मूक पशूंस जड साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवीत होतास. तसेच, त्यांना पुरेसे अन्न,पाणीही देत नव्हतास. तुझ्या या दुष्कर्मांमुळे तुला अनेक नीच योनींत जन्म घ्यावा लागला. परंतु, माझ्या अनुग्रहाने तुझे पूर्वसंचित नष्ट झाले आहे. तू दीर्घ काळ व्याघ्ररुपात माझी उपासना केल्यामूळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल. तुझी योगमार्गांत उत्तरोत्तर प्रगती होऊन तू अत्यंत प्रज्ञावंत होशील. हिमालयातील अनेक गुहांमधून कित्येक हजारो वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील." प्रभूंचे ते आशीर्वचन ऐकून व्याघ्रेश्वर शर्मा अत्यंत कृतार्थ झाला. 

व्याघ्रेश्वर शर्माची ही भक्तीगाथा सांगून ते वृद्ध तपस्वी शंकरभट्टास म्हणाले, " तू पाहिलेला वाघ अन्य कोणी नसून व्याघ्रेश्वर शर्माच होता. श्रीपादांच्या कृपाप्रसादानें हे व्याघ्ररूप धारण करून येथील गुहेत तपश्चर्या करणाऱ्या असंख्य सिद्धपुरुषांचे तो रक्षण करीत होता. तसेच त्यांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे कार्यसुद्धा करीत होता. खरोखर,  श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे बरें ?" 

पुढें, शंकरभट्टांनी त्या वृद्ध संन्याशाचा निरोप घेतला. आज त्यांना श्रीपाद प्रभूंच्या एका श्रेष्ठ भक्ताचे दर्शन झाले होते आणि त्या आनंदातच त्यांनी कुरवपुराकडे प्रयाण केलें.               

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - सुखप्राप्ती, घरात शांती नांदते. 


*** श्री दत्तप्रभूंचा प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची आरती ***


No comments:

Post a Comment