Nov 17, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ३


राजपुत्रास वाचाप्राप्ती, श्री पळनीस्वामी दर्शन आणि माधव विप्राची संजीवन कथा  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

' सदगुरूंसारखा असता पाठीराखा ...' या वचनांची प्रचिती घेत श्री शंकरभट्ट विचित्रपुरांत अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगातून अलगद बाहेर पडले. पुन्हा कुरवपुराच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु झाला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण करत तर कधी प्रभूंच्या लीलांचे मनन करीत तीन दिवस शंकरभट्टाची वाटचाल सुरुच होती. चौथ्या दिवशी ते अग्रहारपूर नामक गावांत पोहोचले. माध्यान्हींची वेळ झाल्यामुळें कुठेतरी भिक्षा मागावी, असा विचार करून ते ' ॐ भिक्षां देही ' असे म्हणत एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहिले. तेव्हा एक अतिशय संतापलेली स्त्री घराबाहेर आली आणि " इथे भिक्षा मिळणार नाही. " असे अत्यंत क्रोधीत स्वरांत शंकरभट्टांना म्हणाली. त्या स्त्रीचे असे बोल ऐकून अचंबित झालेले शंकरभट्ट तिथून निघतच होते, इतक्यांत त्या घरातील गृहस्थ धावतच बाहेर आले आणि " अतिथीमहाराज क्षमस्व ! माझा माझ्या पत्नीशी कलह झाला आणि त्याची परिणीती म्हणून पैसे आणल्याशिवाय या घरांत येऊ नका, असे सांगून तिने मला घराबाहेर हाकलले. तेव्हा मीही आपल्याबरोबरच भिक्षा मागण्यास येतो." असे म्हणत त्यांच्याबरोबर चालू लागले. शंकरभट्टही " जशी प्रभूंची इच्छा !" असे पुटपुटत काही अंतरावर असलेल्या एका विशाल पिंपळवृक्षाच्या छायेत बसले. मात्र क्षुधेने व्याकुळ झाल्यानें दत्तभजनांत त्यांचे मन काही लागेना.

तोच एक नवल वर्तलें ... शंकरभट्टांचा शोध घेत तिथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. त्यांना तिथे पाहून ते दूत म्हणाले, "तुम्ही प्रयाण केल्यानंतर, आमच्या मुक्या युवराजांना वाचा प्राप्ती झाली. त्यांमुळे प्रसन्न होऊन विचित्रपुराच्या महाराजांनी आपणांस घेऊन यावे, अशी आज्ञा केली आहे. तेव्हा आपण कृपा करून राजदरबारांत यावे." त्यांवर शंकरभट्ट उत्तरले, " मी अवश्य आपल्यांसोबत येईन, मात्र माझा हा मित्रसुद्धा माझ्याबरोबर येईल." राजदूतांनी ही विनंती मान्य करून, शंकरभट्ट आणि त्या गृहस्थांस घोडयावर बसवले. थोड्याच वेळांत ते सर्वजण विचित्रपुर नगरीत पोहोचले. सारे प्रजाजन त्यांच्याकडे आश्चर्याने पहात होते. राजवाड्यात आल्यावर राजाने स्वतः पुढे येऊन शंकरभट्टांचे उत्तम स्वागत आणि आदरातिथ्य केले.

त्यानंतर अत्यंत नम्रपणें राजा बोलू लागला, " विप्रदेव, आपण इथून प्रयाण केल्यावर आमचा युवराज जो बोलू शकत नसे, तो एकाएकी मूर्च्छित झाला. आम्ही राजवैद्यांना तातडीने बोलावणें पाठवले, परंतु ते येण्याआधीच युवराज शुद्धीवर आला आणि '' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " असा मंत्रोच्चार करीत उठून बसला आणि आमच्याकडे पाहत अत्यंत शांतपणे म्हणाला, " मी मूर्च्छित झाल्यावर एक सोळा-सतरा वर्षाचे आजानबाहु, अत्यंत दैदिप्यमान असे यती तिथे आले. त्यांनी माझ्या जिभेवर विभूती लावली, अन त्याच क्षणी मी स्पष्टपणें बोलू लागलो." इतके बोलून राजाने शंकरभट्टांना वंदन केले आणि प्रार्थनापूर्वक स्वरांत म्हणाला, " ब्राह्मण महाराज, ते तेजस्वी यती कोण होते ? श्रीदत्तप्रभूंशी त्यांचे काय नाते आहे ? हे सारे मला कथन करावे.'' हे ऐकून शंकरभट्ट श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्मरणभक्तीत रंगून गेले. भानावर येत ते राजास म्हणाले, " हे राजन, युवराजांना ज्या दिव्य यतींचे दर्शन झाले ते निश्चितच श्रीदत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांच्याच कृपाप्रसादाने तुझ्या पुत्रास वाचा प्राप्ती झाली आहे. मी त्यांच्याच दर्शनासाठी कुरुगड्डी क्षेत्रास जात आहे.” श्री दत्तप्रभूंचा असा महिमा ऐकून सर्वांनी एकमुखाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार केला. अति प्रसन्न झालेल्या राजाने त्यांचा आणि त्यांच्या बरोबर आलेल्या त्या ब्राह्मणाचा सुवर्णमुद्रा देऊन सत्कार केला. राजाचा निरोप घेऊन ते दोघे परत अग्रहारपूरास निघाले. विचित्रपुरांतील माधव नंबुद्री नावाचा एक ब्राह्मणही त्यांच्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनासाठी निघाला. ते तिघे मार्गक्रमण करीत अग्रहारपूरास येऊन पोहोचले. त्या गृहस्थानें राजानें दान केलेल्या त्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दाखवून श्री दत्तप्रभूंची लीलाही कथन केली. तो महिमा ऐकून तिचीदेखील श्रीपाद श्रीवल्लभांच्या ठायीं श्रद्धा दृढ झाली. तिने या तिघांना उत्तम भोजन दिले. त्यानंतर शंकरभट्ट आणि माधव नंबुद्री चिदंबरम या गांवी जाण्यास निघाले.

गुंटूर (गर्तपुरी) मंडलातील नंबुरु हे माधवाचे मूळ गांव होते. मळियाळ देशातील राजाने ह्या गांवातील अनेक विद्वान ब्राह्मणांना राजाश्रय दिला होता. नंबुरु या ग्रामातील हे आचारसंपन्न आणि वेदपारंगत ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नांवाने प्रसिद्ध झाले. दुर्दैवानें, माधवाचे माता-पित्याचे छत्र त्याच्या लहानपणीच हरपले होते. त्यांमुळे त्याचा वेदाभ्यास अथवा काही अध्यापन झाले नव्हते. मात्र त्याची श्री दत्तात्रेयांवर असीम श्रद्धा होती. शंकरभट्ट आणि माधव लवकरच चिदंबरम क्षेत्री पोहोचले. तेथील पर्वतावरील एक गुहेत श्री पळनीस्वामी नांवाच्या एक सिद्ध माहात्म्यांचे वास्तव्य आहे असे कळताच, ते दोघेही त्यांच्या दर्शनासाठी गेले. गुहेच्या द्वाराजवळ येता श्री पळनीस्वामी यांनी " शंकरा, माधवा यावे !", असे म्हणत प्रेमाने स्वागत केले. या प्रथम भेटीतच शंकरभट्ट आणि माधव यांना त्या वृद्ध तपस्व्याच्या अंतर्ज्ञानाची,श्रेष्ठत्वाची प्रचिती आली. श्री पळनीस्वामींनी त्या दोघांस कणाद महर्षींचा कण- सिद्धांत आणि कुंडलिनी शक्ती यांविषयी ज्ञानोपदेश केला. ते पुढें म्हणाले, "श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेत. सुमारे १०८ वर्षांपूर्वी याच क्षेत्रीं त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन माझ्यावर अनुग्रह केला होता. त्यावेळी हिमालयातील काही महायोगी बद्रीकेदार तीर्थातील ब्रह्मकमळे बद्रीनारायणांस अर्पण करत होते, तीच कमलपुष्पें आणि ते सर्व उपचार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांवर येऊन पडत होते." तो दिव्य अनुभव शंकरभट्ट आणि माधव अतिशय विस्मयचकित होऊन ऐकत होते. या ब्रह्मकमळांची विशेषता सांगतांना पळनीस्वामी म्हणाले," श्री महाविष्णूंनी श्री महादेवाचे पूजन याच ब्रह्मकमळाने केले होते. चतुराननाचे जन्मस्थान म्हणजेच श्री विष्णुंचे नाभीकमळ, हेदेखील ब्रह्मकमळ आहे. पृथ्वीतलावर हे दिव्य लोकांतील पुष्प केवळ हिमालयांत अतिशय दुर्गम उंचीवर वर्षातून फक्त एकदाच उमलते. हिमालयात तपस्या करत असलेल्या असंख्य सिद्धपुरुषांना अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण पौर्णिमेस होते, त्याच मध्यरात्रीं केवळ याच महान तपस्व्यांसाठी हे दैवी पुष्प पूर्ण विकसित होऊन उमलते. त्यावेळीं सभोवतालचा परिसर एका अद्भूत सुवासाने भरून जातो. या ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा, सिद्धमार्गांतील विघ्नांचा नाश होऊन साधकांस उच्च स्थिती प्राप्त होते. ज्या उच्चकोटी भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाच्या दर्शनाचा योग असतो, त्या सर्व सिद्धांचे दर्शन घेऊन झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते.''

थोडा वेळ ध्यानमग्न होऊन श्री पळनीस्वामी अत्यंत शांत, गंभीर स्वरांत बोलू लागले, " माझ्या या देहाचे वय तीनशे वर्षे असून, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार लवकरच मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण देहात प्रवेश करणार आहे. शंकरा, मी पुढील दहा दिवस समाधीमग्न असणार आहे, त्या काळांत माझे दर्शनार्थी भक्त आल्यास तुम्ही त्यांना दुरूनच माझे दर्शन घडवा. जेणेकरून माझा समाधीभंग होणार नाही. तसेच या काळांत कुणीही जर सर्पदंशानें मृत झाले तर तो मृतदेह नदीच्या प्रवाहात अथवा भूमींत पुरून ठेवावा, अशी माझी आज्ञा आहे, हे त्यांना सांगावे."

त्यानंतर श्री पळनीस्वामी सिद्धासनात बसले, त्यांची दृष्टी नासाग्रीं स्थिर झाली आणि ते हळूहळू समाधी अवस्थेत गेले. ही वार्ता त्या परिसरांत पसरताच अनेक भाविक भक्त स्वामींचे दर्शन घेण्यास येऊ लागले. स्वामींच्या आज्ञेनुसार, शंकरभट्ट आणि माधव विप्र दुरूनच त्या भक्तांस दर्शन घेण्यास सांगत होते. दर्शनास आलेल्या काही भक्तांनी शिधासामग्री आणली होती. माधव ब्राह्मणानें ते साहित्य वापरून स्वयंपाक करण्याचे ठरविले. त्याने काही दगड रचून चूल बनविली. त्याला जवळच पडलेले एक शुष्क, मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले. तेच आता सरपण म्हणून वापरावे, असा विचार करून ते पान त्याने उचलले, पण त्या पानाखाली विश्रांती घेत असलेल्या एका सर्पाने त्यास दंश केला. त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव नंबुद्री काही क्षणांतच काळा-निळा होऊन जमिनीवर कोसळला आणि मृत झाला. तिथे जमलेल्या दोघा-तिघा भक्तांनी त्याचे मृत शरीर गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून, शंकरभट्ट अत्यंत भयभीत झाले. मात्र पुढच्याच क्षणी स्वामींच्या आज्ञेचे त्यांना स्मरण झाले आणि त्यानुसार एक मोठा खड्डा खणून त्यात माधवाचा मृत देह ठेवला. अत्यंत खिन्न मनाने शंकरभट्ट गुहेत येतच होते, तेवढ्यांत जवळच्या गावांतील कांही लोकांनी सर्पदंश झालेल्या एका युवकास आणले. दिवसभरांतील ही दुसरी दुर्दैवी घटना पाहून शंकरभट्टांस दुःखाने अश्रू अनावर झाले. त्यांनी गावकऱ्यांना स्वामींची आज्ञा सांगताच, गावकऱ्यांनी त्या गुहेजवळच अजून एक खड्डा खणून त्यात त्या मृत युवकाचा देह पुरला. शंकरभट्ट अतिशय खिन्न झाले होते, मात्र स्वामींची आज्ञा प्रमाण मानून ते पुढील काही दिवस दर्शनाला येणाऱ्या भाविकांची व्यवस्था पहात होते.

अकराव्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावरच श्री पळनीस्वामी समाधीतून बाहेर आले आणि ' माधवा ! माधवा !' असे पुकारू लागले. शंकरभट्टांनी विषण्ण होऊन माधवाचा वृत्तांत स्वामींना सांगितला. तो ऐकून स्वामींनी योगदृष्टीने त्यांच्याकडे बघताच शंकरभट्टांच्या सर्व वेदना नष्ट झाल्या, नंतर स्वामी गंभीर स्वरांत बोलू लागले, " शंकरा, या माधव विप्राच्या प्रारब्धात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन त्याच्या ह्या स्थूल शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून कुरवपुरांस श्रीपाद प्रभूंच्या सानिध्यात होते. त्याला पुन्हा एकदा ह्या स्थूल शरीरात आणण्याचे कार्य प्रभूंनी मजवर सोपविले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला जाणण्यास आपण असमर्थ आहोत, हेच खरें ! " त्यानंतर, स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह तिथे आणला. दक्षिण दिशेस असलेल्या त्या ताडाच्या वृक्षाजवळ जाऊन स्वामी उच्च स्वरांत म्हणाले, “ या माधवास दंश करणाऱ्या नागराजा, तू पळनीस्वामींच्या जवळ यावे, अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे.” त्यावेळीं स्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवडया काढल्या व त्या माधवाच्या देहाच्या चारी बाजूस ठेवल्या. कांही क्षणातच त्या कवड्या आकाशात चार दिशांना उडाल्या. थोड्याच वेळांत उत्तरेकडून एक विशाल सर्प फूत्कार टाकीत तिथे आला, त्या चार कवडया त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. स्वामींच्या आदेशानुसार, त्याने माधवाच्या शरीरातील विष शोषून घेतले. श्री पळनीस्वामींनी आपल्या आराध्य देवतेचे, श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केले आणि त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या त्यांना तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार करून निघून गेला.

हा चमत्कार पाहून शंकरभट्ट दिग्मूढ झाले होते. तेव्हा श्री पळनीस्वामी म्हणाले, " पूर्वजन्मीं हा सर्प एक स्त्री होता. त्या जन्मांतील कर्मभोगांनुसार तिला सर्पयोनींत जन्म घ्यावा लागला. मात्र गेल्या जन्मात एका दत्तभक्ताला भोजन दिल्याचे पुण्य तिच्या गाठीशी होते, ह्या अल्पसेवेनेच तिला मुक्ती मिळाली. माधवाचीही पूर्वजन्मीच्या पातकांमुळेच अशी ही मरणासन्न अवस्था झाली होती. मात्र श्रीदत्तप्रभू अल्पसंतुष्टी आहेत. ते भक्तांच्या थोडया सेवेवर प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. दहा दिवस जमिनीत पुरुनही माधवच्या शरीरास कांही झाले नाही, ही तर श्री दत्तात्रेयांचीच कृपा होय. श्रीपाद श्रीवल्लभांचे केवळ नामस्मरण केले असता लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान विनासायास प्राप्त होतात. त्यांचा अनुग्रह झालेल्या भक्तांच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरें !" ह्या दोन भक्तांचा असा पूर्वजन्म वृत्तांत स्वामी सांगतच होते, एवढ्यात माधवामध्ये पुन्हा चैतन्य येऊ लागले आणि तृषार्त होऊन तो थोडे पाणी मागू लागला. मात्र पळनीस्वामींनी त्याला प्रथम तूप पिण्यास दिले. काही वेळानें थोडा फळांचा रसदेखील दिला आणि त्यानंतरच पाणी देण्यास अनुमती दिली. अशा रितीने, माधव पुनर्जिवित झाल्याचे पाहून शंकरभट्टांच्या हर्षाला पारावार राहिला नाही.

माधवही आता बराच पूर्ववत झाला होता. त्याने आपला अनुभव सांगण्यास प्रारंभ केला. " मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरांस पोहोचलो. तिथे मला आजानुबाहु, विशाल नेत्र असलेल्या श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. श्रीवल्लभांनी मला '' कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा.'' असे अतिशय दयार्द्र स्वरांत सांगितले. मी स्वामींना नमन केले आणि नामस्मरण करत करत त्या स्थानी गेलो. अनेक भव्य प्रासाद, दालनें असलेला तो नक्कीच पाताळलोक असावा. तेथे नाग जातीचे लोक होते. त्यातील कांहीना हजार फणे होते, तर कांहींच्या शिरावर दिव्य मणी होते. ते त्यांच्या इच्छेनुसार कुठलेही रूप धारण करू शकत होते. भगवान श्रीविष्णु जसे शेषनागावर शयन करतात, तसेच श्रीपाद श्रीवल्लभ तेथील एका सहस्त्र फण्याच्या नागावर शयन करीत होते. तेथे असलेले काही महासर्प प्रभूंकरिता वेदगायन करीत होते. त्या दिव्य लोकांतील एका महासर्पाने मला श्रीदत्तप्रभूंचा जन्म, महिमा आणि त्यांचे अवतारकार्य आदिंविषयीं विस्तृत कथन केले. तो महासर्प आपल्या दिव्य वाणींत बोलू लागला, " माधवा, आम्हाला ' कालनाग ऋषिश्वर ' असे म्हणतात. महर्षी अत्री आणि महासती अनसूयेचा पुत्र म्हणून या जगतांत प्रख्यात असलेले श्री दत्तात्रेय पूर्वायुगांत या पृथ्वीतलांवर अवतरले. त्यांचे अवतारकार्य अविरत सुरु असून ते सूक्ष्मरूपांत निलगिरी शिखर, श्रीशैल शिखर, शबरगिरी शिखर, सहयाद्री, गिरनार आदि क्षेत्रीं संचार करीत असतात. कार्तवीर्य, परशुराम, गोरक्षनाथ, ज्ञानेश्वरादि त्यांचे असंख्य शिष्योत्तम असून दत्तसंप्रदायाचा इतिहास फार प्राचीन आहे. हजारो वर्षें या पृथ्वीतलाचे परिपालन केल्यानंतर त्यांनी यापुढे गुप्तरूपांत कार्य करण्याचे ठरविले. ते या नदींत अदृश्य झाल्यावर आम्ही त्यांच्या पुनर्दर्शनासाठी तप करण्यास सुरुवात केली. काही काळाने, प्रसन्न होऊन श्री दत्तात्रेयांनी अनघालक्ष्मी देवीसमवेत आम्हांला दर्शन दिले. पुनरपि ह्या भूमीवर प्रभूंनी अवतार घ्यावा, अशी आम्ही त्यांची प्रार्थना केली असता श्री दत्तात्रेयांनी पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. दत्तप्रभू ज्या ठिकाणी अदृश्य झाले, ती जागा म्हणजेच हे आजचे परम पवित्र कुरवपुर आहे.'' मी त्या महासर्पास नमस्कार केला आणि परत पाण्यातून वर येऊन कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले."

त्यावेळीं माधव पुन्हा एकदा मनानें कुरवपुरांस प्रभुचरणीं पोहोचला होता. पुढे तो सांगू लागला - यानंतर श्रीपाद प्रभू मला म्हणाले “ वत्सा, तुला झालेले हे दिव्य भव्य दर्शन म्हणजे मोठा अलभ्य योगच आहे. ज्या महासर्पानें तुला हे माहात्म्य कथन केले, तो येणाऱ्या शताब्दीमध्ये ' ज्योती रामलिंगेश्वर स्वामी' या नावाने अवतार घेईल तर दुसरा महासर्प ‘सदाशिव ब्रह्मेंद्र’ या नावाने अवतार घेऊन अनेक लीला करेल. पिठीकापुरम येथील माझ्या जन्मस्थानीं म्हणजे माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. तू आता श्री पीठिकापुरातील माझ्या पादुकास्थानजवळील पाताळात जा आणि तेथील तपोनिष्ठ कालनागांची भेट घेऊन ये.” प्रभूंचे ते भाषण ऐकून मी अनन्य भावानें त्यांच्या चरणीं नतमस्तक झालो.

माधवाचे हे इत्यंभूत कथन ऐकून शंकरभट्ट अतिशय रोमांचित झाले. आपल्या भाग्यांत श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा योग कधी येणार ? असा ते विचार करू लागले. तेव्हा मंदहास्य करीत श्री पळनीस्वामी म्हणाले, " माधवा, पीठिकापुरातील कालनागांचा वृत्तांत तू आम्हांस थोड्यावेळानें सांग. आता आपण स्नान-संध्या करून ध्यानांस बसावे, अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे."

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - नागदोष निवारण, संतान-प्रतिबंधक-दोष निवारण


No comments:

Post a Comment