शिवशर्मा ब्राह्मणाची कथा, कुरवपुरांत वासवांबिकेचे दर्शन आणि श्री पळनीस्वामींचा पर-काया प्रवेश
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री गुरुवे नम: ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
स्नान-संध्या करून श्री पळनीस्वामी, शंकरभट्ट आणि माधव तिघेही गुहेत परतले. आसनस्थ झाल्यावर श्री पळनीस्वामींनी थोडा वेळ ॐकार प्रणवाचा जप केला, श्रीपाद श्रीवल्लभांची हृदयमंदिरांत प्रतिष्ठापना करून मानसपूजा केली आणि गंभीर आवाजांत ते बोलू लागले, "बाळांनो, आज शुक्रवार असून हूणशकानुसार दिनांक २५-५-१३३६ आहे. या शुभयोगांनी युक्त असलेल्या दिवशी ईशकृपेनें आपल्याला काही आध्यात्मिक अनुभव येणार आहेत. तेव्हा, आपण आता श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेचे पालन करत, त्यानुसार संकल्पपूर्वक ध्यानांस बसावे. आपण त्यांना अनन्यभावानें शरण जाऊन त्यांच्या दिव्य स्वरूपाचे ध्यान करू या. आज ध्यानांत श्रीपादांची मला आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरवपुरला जाऊन त्यांचे दर्शन घेईन."
पळनीस्वामींचे हे बोल ऐकून, शंकरभट्टांनी आपल्या मनांतील शंका त्यांना विचारली, " स्वामी, या माधवाने सूक्ष्म रूपाने श्रीपादांच्या मंगल आणि दिव्य रूपाचे दर्शन घेतले आहे, तसेच आपणही श्रीवल्लभांचे प्रत्यक्ष दर्शन तर घेतलेच आहे शिवाय कधीही सूक्ष्मरूपांत कुरवपुरांत जाऊन त्या स्मर्तुगामी दत्तात्रेयांच्या सान्निध्याचा लाभ घेऊ शकता. मी मात्र केवळ त्यांचे नाव आणि काही लीलाच ऐकल्या आहेत. तेव्हा त्यांच्या त्या दिव्य स्वरूपाचे मी ध्यान कसे करु?" त्यांवर पळनीस्वामी मंदहास्य करीत आश्वासक वाणींत म्हणाले, " शंकरा, तू फक्त श्रीपादांवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण कर, त्यांच्या कृपेची अनुभूती तुला सत्वरच येईल." एवढें बोलून त्यांनी श्रीपादांचे अमूर्तचिंतन करीत ध्यानमुद्रा धारण केली. शंकरभट्ट आणि माधवही प्रभूंचे एकाग्रपणें चिंतन करत ध्यानमग्न झाले. सुमारे दहा घटका सरल्यावर पळनीस्वामी ध्यानांतून बाहेर आले. त्यांवेळी ते अत्यंत प्रसन्न दिसत होते. कुतूहलाने शंकरभट्ट व माधव यांनी त्या थोर तपस्व्यास, त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा उल्हासित स्वरांत पळनीस्वामी शिवशर्मा ब्राह्मणाची कथा सांगू लागले.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या वास्तव्यामुळें पावन झालेल्या कुरवपूर द्वीपांत शिवशर्मा नावाचा यजुर्वेदी, काश्यप गोत्री ब्राह्मण आपली पत्नी अंबिकेसह रहात होता. तो विद्वान, वेदपारंगत आणि कर्मठ धर्माचरण करणारा होता. गावांतील एकमेव ब्राह्मण असल्याने आजूबाजूच्या परिसरांतही जाऊन तो अनुष्ठान, शास्त्रोक्त विधी करत असे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणीं त्याची दृढ भक्ती आणि निष्ठा होती. पूर्वजन्मींच्या कर्मभोगांमुळे त्याची संतती जगत नसे. अनेक व्रत-वैकल्य करून अखेर त्याचा एक पुत्र जीवित राहिला. मात्र दुर्दैवानें तो मंद बुद्धीचा असल्यानें शिवशर्मा त्यास काहीच वेदाध्ययन करू शकला नाही. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या चिंतेनें तो ब्राह्मण फार दुःखी-कष्टी झाला. एके दिवशी श्रीपादांसमोर वेद पठण केल्यानंतर तो अतिशय उदासपणे उभा होता. अंतर्ज्ञानी प्रभूंनी त्याच्या दुःखाचे कारण जाणून ' तुझें काय मागणें आहे ?' असे विचारले. त्यावर शिवशर्मा श्रीपादांच्या चरणीं नतमस्तक होऊन म्हणाले, "हे परमेश्वरा, तू हे सर्व चराचर व्यापले आहेस. तुम्हांस या जगतीं अशक्य असे काही नाही आणि तुम्हांस शरण आलेल्यांचा तू नेहेमीच उद्धार करतोस. आपल्या कृपादृष्टीनें माझा जड व मंदबुद्धी असलेला पुत्र विद्वान आणि वेदापारगंत व्हावा, हीच माझी प्रार्थना आहे." त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले, " अरे, प्रारब्ध हे सर्वांना भोगावेच लागते. पूर्वजन्मींच्या काही पातकांमुळेच तुझा पुत्र मंदबुद्धी झाला आहे. मी त्याचे ते कर्म नष्ट करून त्यास वेदज्ञानी करेन, मात्र कर्मसूत्रांच्या सिद्धांतानुसार तुझे उर्वरित आयुष्य त्याला द्यावे लागेल."
“स्वामी, माझा पुत्र बृहस्पतीप्रमाणे सर्व वेदांचे ज्ञान असलेला, उत्तम वक्ता व्हावा आणि आपला कृपाहस्त त्याच्या मस्तकीं सतत असावा, हीच माझी इच्छा आहे." असे म्हणत वृद्धावस्थेकडे झुकलेला शिवशर्मा देहत्याग करण्यास तात्काळ तयार झाला. श्रीपाद प्रभू अत्यंत प्रेमानें त्याला म्हणाले, '' वत्सा, हा देहत्याग केल्यावर, तू सूक्ष्म देहाने धीशीला नगरामध्ये ( सध्याचे शिर्डी ) एका निंबवृक्षाच्या तळाशी असलेल्या भुयारांत थोडाकाळ तपसाधना करशील. त्यानंतर, पुण्यभूमी महाराष्ट्रदेशी तुझा पुनर्जन्म होईल. मात्र माझी ही भविष्यवाणी तू गुप्त ठेव.''
श्रीपाद प्रभूंच्या वचनांनुसार, काही काळाने शिवशर्मा कालवश झाले. त्याची पत्नी अंबिका भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. मात्र गांवातील लोक त्या ब्राह्मणपुत्राची 'विद्वान पित्याचा मूर्ख मुलगा' अशी सतत टिंगल टवाळी, अवहेलना करीत असत. असा वारंवार अपमानित झालेला तो ब्राह्मणपुत्र एके दिवशीं त्या त्रासास कंटाळून आपला जीव देण्यास नदीकडे धावत निघाला. त्याची आई अंबिकासुद्धा असहाय्य होऊन त्याच्याबरोबर आपला प्राण त्यागण्यास निघाली. मात्र त्या दयाळू ईश्वराची काही वेगळीच लीला होती. नदीवर येतांच त्यांना श्रीपादयतींचे दर्शन झाले. त्या दिव्यमूर्तीस पाहताच अंबिकेने त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार केला. त्या करुणासागर श्रीपाद श्रीवल्लभांनी कृपाकटाक्षानें पाहताच तो मुलगा अत्यंत तेजस्वी दिसू लागला. प्रभूंनी आपला वरदहस्त त्या विप्रपुत्राच्या मस्तकावर ठेवताच तो क्षणांत वेदशास्त्रसंपन्न झाला. अंबिकादेखील अनन्यभावानें श्रीपदयतींच्या चरणीं लीन झाली आणि " स्वामी, पुढच्या जन्मीं मला आपणांसारखा त्रैलोक्यांत वंदनीय असा पुत्र व्हावा." अशी तिने प्रार्थना केली. त्यांवर प्रभूंनी तिला शनिप्रदोष व्रताचे माहात्म्य सांगून शिवाराधना करण्यास सांगितले आणि त्या व्रताचे फलित म्हणून पुढील जन्मीं तुला माझ्यासारखाच पुत्र होईल, असा तिला वर दिला. मात्र या त्रैलोक्यांत त्यांच्यासम कुणीही नसल्याने, आपल्या त्या आशीर्वचनाच्या पूर्तीसाठी स्वतः तिच्या पोटी जन्म घेण्याचा श्रीपादप्रभूंनी निर्णय घेतला. शिवशर्माची ही कहाणी सांगून श्री पळनीस्वामी पुढे म्हणाले, " वत्सांनो, श्री दत्तप्रभू केवळ स्मरणमात्रेच भक्तांवर प्रसन्न होतात, त्यांना दर्शनही देतात. मानवाचे पतन होण्याचे जितके मार्ग आहेत, त्याहीपेक्षा असंख्य मार्ग श्रीचरणांचा अनुग्रह आणि कृपा प्राप्त होण्यासाठी आहेत. हेच परम सत्य आहे. स्मरण, अर्चन, त्यांच्या लीलांचे श्रवण, मनन अशी अनेक प्रकारे नवविधा भक्ती करून साधकांस श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे सतत सान्निध्य लाभते. साधकांचे जे काही पापकर्म, दोष, अथवा विषयवासना आहेत, तें सर्व श्रीपाद श्रीवल्लभांच्या योगाग्नीनेच नष्ट होतात. यासाठीच अनन्यभावानें श्रीगुरु-पादुकांना शरण जावे. श्रीगुरुचरण सर्वशक्तीसंपन्न असतात. आपल्या भक्तांचे कर्मबंधन कितीही जडस्वरूपी असू दे, त्यांतून सुटका करण्याचे सामर्थ्य केवळ श्रीगुरुंना असते, मात्र साधकांची ईश्वरावर, आपल्या गुरूंवर श्रद्धादेखील हवी. शंकरा, भगवान दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या अधीन असल्यामुळेच श्रीपादप्रभूंच्या ह्या अवतारानंतर त्यांचा पुढील अवतार करंज नगरींत श्री नृसिंहसरस्वती म्हणून प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा ३०० वर्षे समाधींत राहून प्रज्ञापुरात(अक्कलकोट) श्री स्वामी समर्थांच्या रूपांत अवतरित होऊन आपले भक्तांच्या उद्धाराचे कार्य सुरु ठेवतील."
आपल्या सूक्ष्म देहाने कुरवपुरांस गेल्यावर आपणांस श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यकांबाच्या दर्शनाचाही लाभ झाला होता, हेदेखील पळनीस्वामींनी कथन केले. तसेच भविष्यकाळांत घडणाऱ्या अनेक घटनांचा वृत्तांत, कर्मफल सिद्धांत, सृष्टी-स्थिती-लय-तिरोधान अनुग्रह विवरण आणि श्रीपाद प्रभूंचे कार्य यांविषयीही शंकरभट्ट आणि माधवास प्रबोधन केले. त्यानंतर पळनीस्वामींनी त्या दोघांस त्यांचा ध्यानानुभव विचारला. त्यांवर शंकरभट्टांनी आपणास एका तप करीत असलेल्या यवनवेषधारी संन्याशाचे दर्शन झाले असे सांगितले. तो संन्यासी एका भुयारांत असून त्याच्या चारही बाजूला दिवे तेवत होते, ह्याचेही वर्णन केले. ध्यानमग्न असतांना आपणाला आलेले अनुभव सांगताना माधव म्हणाला, “ स्वामी ! मी ध्यानांत एका कौपीनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले. ते अग्नीची व सूर्याची आराधना करीत होते. त्यानंतर मी सूक्ष्म देहानी पीठिकापुर येथे पोहोचलो असता एका स्थानी दोन दिव्यपादुकांचे मला दर्शन झाले."
त्यांचे हे अनुभव ऐकून श्री पळनीस्वामी म्हणाले, " बाळांनो, या सर्व भविष्यकाळांत घडणाऱ्या घटना आहेत. शंकरा, तुझ्या मनीची श्रीप्रभूंच्या चरित्र लेखनाची इच्छा सुफळ होणार आहे. श्रीपाद प्रभूंच्या प्रत्यक्ष आशीर्वादाने भक्तकल्याणासाठी तुझ्या हातून हे अदभूत कार्य होणार आहे. माधवा, तू दर्शन घेतलेले स्थान म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान म्हणजेच त्यांच्या आजोबांचे गृह आहे. त्या मातुलगृहात तू पाहिलेल्या दिव्य पादुका पुढील काळांत प्रतिष्ठापीत होतील."
पळनीस्वामींचे हे स्पष्टीकरण ऐकून शंकरभट्टांचे अष्टसात्त्विक भाव जागृत झाले. श्रीहरि कृष्णांच्या आशीर्वादाने ते उडुपीहून श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपुरांस जाण्यास निघाले होते. मार्गांत कितीतरी अकल्पित घटना घडल्या, मात्र श्रीपाद प्रभू आपल्या पाठीशी आहेत, याची त्यांना सतत प्रचिती येत होती.
इतके बोलून पळनीस्वामींनी थोडा वेळ मौन धारण केले. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेऊन त्यांनी गुहेजवळ पुरलेल्या गांवातील युवकाचा मृतदेह बाहेर काढायला सांगितला. त्यांच्या सूचनेनुसार शंकरभट्ट आणि माधव यांनी तो मृतदेह त्या खड्डयातून बाहेर काढला. श्री पळनीस्वामी प्रणवोच्चार करु लागले. इतक्यात “ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये " असा जयघोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा व्याघ्ररूपातच तिथे प्रगट झाला. श्री पळनीस्वामींनी त्या नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. व्याघ्रेश्वर शर्मा पळनीस्वामींचा वृद्ध, जीर्ण देह तिथे जवळच असलेल्या नदीत विसर्जित करण्यासाठी घेऊन गेला. नूतन शरीर धारण केलेले श्री पळनीस्वामी शंकरभट्ट आणि माधवास म्हणाले, “ तुम्ही दोघेही आता आपल्या पुढील प्रवासास निघा. माधवा, तू तुझ्या विचित्रपुर नगरीला परत जा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वादाने तू सूक्ष्मरूपाने त्यांचे आणि पीठिकापुरमच्या पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस. तू कृतकृत्य झाला आहेस. शंकरा, तू तिरुपती पुण्यक्षेत्री प्रयाण करावेस. तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाचा लाभ लवकरच प्राप्त होवो." त्या थोर सिद्धपुरुषास नमन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन माधव विचित्रपुराकडे व शंकरभट्ट तिरुपतीकडे मार्गस्थ झाले. खरोखर श्रीपाद स्वामींच्या लीलांचा अंत लागत नाही हेच खरें !
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय फलश्रुती - विवाहयोग्य कन्यांस उत्तम वर प्राप्ति, गुरुनिंदा-दोष-निवारण
No comments:
Post a Comment