Dec 2, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ५


साडेसाती निवारण, भक्त तिरुमलदास आणि स्वयंभू वरसिद्धी विनायकाची कथा  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री पळनीस्वामींनी वर्णन केलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य रूपाचे चिंतन करत करत शंकरभट्टांचा चिदंमबरम येथून महाक्षेत्र तिरुपतीकडे प्रवास सुरु झाला. त्या सिद्ध तपस्व्याचे प्रबोधन आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यानें शंकरभट्ट समाधान पावले होते. तिरुपती या अतिपवित्र तीर्थक्षेत्री येताच त्यांना अपूर्व अशा मनःशांतीची अनुभूती आली. पुष्करणीमध्यें स्नान करून त्यांनी श्री वेंकटेश्वराचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले आणि त्या भव्य मंदिराच्या प्रांगणातच थोडा वेळ ध्यान करण्याचे ठरविले. ध्यानस्थ असतांना शंकरभट्टांना श्री वेंकटेश्वरांचे दर्शन प्रथम बालत्रिपुरसुंदरीच्या रूपांत तदनंतर श्री महाविष्णुंच्या स्वरूपांत झाले. काही क्षणांतच ती मूर्ती एका बालयतीरूपांत दिसू लागली. तेजस्वी आणि अमृतमय दृष्टीचा जणू कृपा वर्षाव करणाऱ्या त्या वामनास त्यांनी मनोमन नमस्कार केला. त्या दिव्य बालकाचा कृपाहस्त आपल्या मस्तकावर आहे, असा साक्षात्कार त्यांना झाला. अन अचानक त्या बालयतीजवळ एक काळाकुट्ट, कुरूप मनुष्य प्रगटला. त्या बालयतीस प्रणाम करून तो म्हणाला, " हे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू ! या सकळ सृष्टीचे आपण जगन्नियंते आहात. आपला भक्त शंकरभट्टाची आजपासून साडेसाती प्रारंभ होत आहे, हे आपणांस ज्ञात आहेच. या काळांत त्यास त्याच्या कर्मांनुसार अनेक प्रकारचे कष्ट, यातना भोगाव्या लागतील. आपली आज्ञा घेण्यासाठी मी येथे आलो आहे." त्यांवर मंद स्मित करत ते करुणासागर प्रभू शांत स्वरांत बोलू लागले, " हे शनैश्चरा, तू कर्मकारक ग्रह आहेस. सर्व जीवांना त्यांच्या कर्मफळांप्रमाणे अनुभव देऊन तू त्यांना कर्मबंधनातून मुक्तच करतोस. तू तुझ्या या धर्मकर्तव्यांचे अवश्य पालन करावेस. तथापि, ' माझ्या भक्तांचा मी कधीही नाश होऊ देत नाही. ' अशी माझी प्रतिज्ञा आहे, हे तुला ठाऊक आहेच. माझे कृपाकवच सदैव शंकरभट्टांचे रक्षण करेल." हे दृश्य पाहून शंकरभट्टांचे ध्यान भंगले. येणारा काही काळ कठीण असणार आहे, याची त्यांना जाणीव झाली. मात्र श्रीपाद श्रीवल्लभांवर त्यांची दृढ श्रद्धा असल्यानें, प्रभुंवरच आपण आपला पूर्ण भार टाकून निश्चिंत रहावे, असे त्यांनी ठरविले.

शंकरभट्ट तिरुमलाहुन खाली तिरुपतीला आले. तेथील रस्त्यांवरून चालत असतांना अचानक एक न्हावी त्यांच्यासमोर आला आणि त्यांचा हात धरून मोठ्या आवाजांत विचारू लागला, " अरे, तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या आहेस ना ? तुझ्या आई-वडिलांची आणि तुझ्या तरुण पत्नीची तुझ्या काळजीने काय अवस्था झाली आहे, ते जरा घरी जाऊन बघ." त्याच्या त्या आवाजाने त्यांच्याभोवती अनेक लोक जमा झाले. हा प्रकार पाहून शंकरभट्ट भांबावून म्हणाले, "अहो, मी कन्नड देशांतील ब्राह्मण असून श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरूगड्डीला निघालो आहे. तुम्ही समजतां तो सुबय्या न्हावी नाही." परंतु त्या बोलण्यावर गावकऱ्यांनी अविश्वास दाखवून त्यांना सुब्बय्याच्या घरी जबरदस्तीनें ओढत नेले. सुब्बय्याचे वृद्ध आई-वडील बिचारे आपलाच मुलगा घरी परत आला आहे हे पाहून आनंदित झाले आणि शंकरभट्टांची समजूत घालू लागले. " मी स्मार्त ब्राह्मण असून श्रीपाद प्रभूंचा भक्त आहे. हे माझे यज्ञोपवित पाहा." असे शंकरभट्ट वारंवार सांगत होते, पण त्यांचे बोलणें ऐकून न घेता त्या लोकांनी त्यांचे बळजबरीने क्षौर कर्म केले आणि पवित्र यज्ञोपवितसुद्धा काढून टाकले. त्यानंतर तेथील मांत्रिकाला बोलावून काही विधीही केले. त्या मांत्रिकाने या सुब्बय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे, असे सांगताच ते सर्वजण गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे गेले. तिथेही शंकरभट्टांनी आपण भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण असून संध्या-वंदन, नमक चमक आदि शास्त्रकर्म करू शकतो असे शपथपूर्वक सांगितले. मात्र त्या द्विजवरांनीही हाच सुब्बय्या असून त्याला एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे, तेव्हा योग्य चिकित्सा करून त्याची या त्रासांतून सुटका करावी, असाच निर्णय दिला. ते ऐकून शंकरभट्टांची उरलीसुरली आशादेखील मावळली आणि आपल्या साडेसातीच्या कष्टकाळाची सुरुवात झाली आहे, याची त्यांना कल्पना आली. आता केवळ श्रीपादप्रभूच आपले रक्षण करतील, अशी दृढ श्रद्धा ठेवून ते मनांत श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करू लागले.

तो मांत्रिक मात्र चित्र-विचित्र पूजा करीतच होता. सतत तीन दिवस असा त्रास सहन केल्यावर एक चमत्कार घडला - चौथ्या दिवशीं शंकरभट्ट प्रभूंच्या नामस्मरणांत मग्न असतांनाच तो मांत्रिक त्यांना चाबकाने मारू लागला, पण नवल असे की त्या चाबकाचे वळ त्याच्याच शरिरावर उठू लागले. ही श्रींचीच लीला आहे, हे शंकरभट्ट समजून चुकले आणि ' श्रीवल्लभा शरणं शरणं ' अशी आर्तपणें विनवणी करू लागले. पाचव्या दिवशी त्या भगताचे घर जळून राख झाले. एव्हढें घडूनसुद्धा, तो भोंदू मांत्रिक अधिक पूजाविधींसाठी सुब्बय्याच्या भोळ्या आई-वडिलांकडे धनाची मागणी करतच होता. हे पाहून शंकरभट्ट त्या वृद्ध दाम्पत्यांस हात जोडून म्हणाले, '' तुम्ही मला माझ्या माता-पित्यासमान आहात. या मांत्रिकावर विश्वास ठेवू नका, मी अगदी ठीक-ठाक आहे.'' त्यांचे ते बोल ऐकून सुब्बयाचे आई-वडील संतोष पावले आणि त्यांनी त्या मांत्रिकास घराबाहेर काढले. शंकरभट्टही आपला धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये, अशी अत्यंत दीनपणे श्रीपादांची अखंड प्रार्थना करीतच होते. सुब्बय्याच्या तरुण पत्नीलाही त्यांनी आपली खरी ओळख सांगितली आणि मी तुला माझ्या बहिणीच्या रूपांतच कायम पाहीन असेही सांगितले. तिचीही शंकरभट्टांचे आत्तापर्यंतचे वर्तन पाहून हा संस्कारी ब्राह्मण सत्यच बोलत असावा अशी खात्री झाली होती आणि तिने आपल्या पतीच्या परतण्याची वाट पाहत, पतिव्रता धर्माचे पालन करीत यापुढचे आयुष्य काढायचे असे ठरविले. " तुमच्या आराध्यदेवतेला म्हणजेच श्रीपाद प्रभूंना ह्या जटिल समस्येचे लवकरात लवकर धर्माला अनुसरुन निवारण करावे, अशी प्रार्थना करावी." अशी विनंती तिने शंकरभट्टांना केली.

अखेर आठव्या दिवशी त्यांची प्रार्थना फळाला आली. एक भविष्यवेत्ता माला जंगम सुब्बय्याच्या घरीं आला. त्याच्याकडे ताडपत्रांवर लिहिलेले नाडी ग्रंथ होते आणि त्या आधारें सर्व भाविकांना तो अचूक भूत-भविष्य सांगत असे. त्यानें थोड्या कवड्या शंकरभट्टांना देऊन खाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर काही गणित करून त्याने आपल्या जवळच्या ग्रंथातून एक पत्र काढून वाचण्यास सुरूवात केली - प्रश्नकर्ता शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण असून त्याच्या हातून दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रलेखनाचे अदभूत कार्य घडणार आहे. पूर्वजन्मी हा कंदुकूर नगराजवळील मोगलीचर्ला ह्या ग्रामात असलेल्या स्वयंभू श्री दत्तप्रभूंच्या मंदिराच्या पुजाऱ्यांच्या घरी जन्मला. तरुण वयांत येताच त्याला जुगार खेळण्याचे व्यसन लागले. एके दिवशी तो आपल्या मित्राबरोबर त्या जागृत दत्त मंदिरातच जुगार खेळू लागला. त्यावेळी ह्याने आपल्या मित्रास त्याच्या पत्नीस पणाला लावण्यास सांगितले. श्री दत्तप्रभूंच्या समोर आपण हे दुष्कृत्य करतोय, याची त्याला ना जाणीव होती ना खंत ! खेळामध्ये पूर्वजन्मांतील शंकरभट्ट विजयी झाल्यावर मात्र त्या मित्राने आपल्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. त्यांवर चिडून त्याने गावांतील सुज्ञ लोकांस निवाडा करण्यास सांगितले. त्या ज्ञानी मंडळींनी पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे वामकृत्य घडले, याबद्दल अत्यंत खेद व्यक्त केला आणि परस्त्रीचा मोह केल्याच्या अपराधाबद्दल शंकरभट्टांस आणि आपल्या पत्नीस पणाला लावल्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांच्या मित्रास कठोर शिक्षा करून ग्रामातून बहिष्कृत केले. दत्तप्रभूंची अल्पकाळ सेवा केल्याने शंकरभट्टांस या जन्मीं ब्राह्मणकुळांत दत्तभक्त म्हणून जन्म मिळाला. त्यांचा मित्र सुब्बय्या या नावाने परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्री क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी जन्मला. हे भविष्य जेव्हा वर्तविले जाईल, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुब्बय्या त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने परत येईल आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेनें या कर्मभोगाची शंकरभट्टांची साडेसाती केवळ साडेसात दिवसांत संपेल.

हे भविष्य ऐकून शंकरभट्टांनी श्रीपाद प्रभूंना मनोमन नमन करून त्यांची करुणा भाकली. त्या भविष्यवेत्त्याने अचूक भविष्य वर्तविले होते. श्रीपाद श्रीवल्लभांची पूर्ण कृपादृष्टी शंकरभट्टांवर होती. दुसऱ्या दिवशीच सुब्बय्या स्वगृहास परतला. श्रीपाद प्रभूंच्या कृपेने संशय आणि संभ्रमाचे सर्व ढग विरून गेले. सुब्बय्याची सर्वांनाच ओळख पटली आणि त्याच्या घरांत आनंदीआनंद झाला. शंकरभट्टांनीही सुब्बय्याच्या माता-पित्याची परवानगी घेऊन पुढील प्रवास सुरु केला.

दत्तप्रभूंच्या भक्तवात्सल्यतेची प्रचिती आल्यामुळें शंकरभट्ट अतिशय तुष्ट चित्ताने मार्गक्रमण करत होते. लवकरच ते चित्तूर जिल्हयातील काणिपाकं या गांवी पोहोचले. तेथील प्रसिद्ध वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भक्तिभावानें दर्शन घेतले. जवळच असलेल्या वरदराज स्वामीं आणि मणिकंठेश्वर स्वामींच्या देवळांतही जाऊन त्यांनी प्रार्थना केली. वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन बाहेर येताच त्यांना एक चमत्कारिक दृश्य दिसले. त्या मंदिरातील पुजारी प्रसादाचे गाठोडे मंदिराबाहेर असलेल्या एका उंच कुत्र्याला देत होते. त्याच्याबरोबर आणखी तीन तसेच उंच श्वानदेखील तिथे होते. त्या श्वानांना पाहून शंकरभट्ट खरें तर घाबरले होते. मात्र पुजाऱ्याने त्यांना धीर देत सांगितले, " महाशय, तुम्ही या कुत्र्यांस अजिबात घाबरू नका. ते कोणालाही त्रास देत नाहीत. एका दत्तप्रभूंच्या भक्ताचे हे पाळीव श्वान आहेत. तो धोबी असल्याने या मंदिरांत येत नाही, मात्र ह्या चौघांना प्रसाद घेण्यास पाठवतो. दत्तप्रभूच श्रीपाद श्रीवल्लभ रूपांत अवतार घेते झाले आहेत, असे तो सर्वांना सांगत असतो. तू ह्या श्वानांबरोबर जाऊन त्या दत्तभक्ताची अवश्य भेट घे."

आपल्या या प्रवासांतील प्रत्येक घटना ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेची अनुभूतीच देत असते, अशी शंकरभट्टांचीही आता दृढ धारणा झाली होती. तिरुपती येथे घडलेल्या प्रसंगातून त्यांना एक कळून चुकले होते की कर्मसिद्धांतानुसार प्रारब्धभोग सर्वांनाच भोगावा लागतो. पूर्वजन्मांतील संचितानुसार कुठल्याही वंशात जन्म होऊन चांगल्या अथवा वाईट कर्मांनुसारच आपल्याला अनुभव येत असतात. आपण केवळ भगवंतावर श्रद्धा ठेवून हा भवसागर तरून जाण्याची प्रार्थना करत राहणेच योग्य आहे. तसेच श्रीपाद श्रीवल्लभांच्या भक्ताला भेटण्याची ही संधी सोडू नये, असा विचार करीत शंकरभट्टही त्या कुत्र्यांच्या मागोमाग चालत त्या धोब्याच्या झोपडीजवळ आले. त्यांचा आवाज ऐकून तो धोबी त्याच्या झोपडीतून बाहेर आला. आपली ओळख करून देत त्याने शंकरभट्टांची अत्यंत आपुलकीने चौकशी केली. सुमारें ७० वर्षे वय असलेल्या त्या श्रीपाद प्रभूंच्या भक्ताचे नाव तिरुमलदास असे होते. तो त्यांना आपल्या झोपडीत घेऊन गेला आणि त्याने शंकरभट्टांचे उत्तम आदरातिथ्य केले. आत्तापर्यंतच्या प्रवासांत आलेल्या अनुभवांमुळे शंकरभट्टांचा आपण ब्राह्मण असल्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त केवळ एव्हढीच ओळख त्यांना आता पुरेशी वाटत होती. तिरुमलदासाने त्यांना वरसिद्धी विनायकाच्या मंदिरातील प्रसाद आणि जलपानही दिले.

त्यानंतर तिरुमलदास म्हणाले, " मी आपली अत्यंत आतुरतेनें वाट पाहत होतो. माल्याद्रीपुर आणि श्रीपीठिकापुर येथील विशेष वार्ता मी तुला कथन करणार आहे. शंकरभट्टा, आज आपणांस वरसिद्धी विनायकाच्या प्रसादाचा लाभ झाला, या शुभदिनींच तू श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्रीगणेशा कर. श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच, तसेच तुला कुरवपुरांत त्यांचे दर्शनही घडेल." ते ऐकून शंकरभट्ट अतिशय सद्गदित झाले त्यांनी तिरुमलदासाला नमन केले आणि म्हणाले, " प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल आपण मला सविस्तर सांगावे. आपण त्यांचे भक्त कसे झाला, तसेच माल्याद्रीपुरांत घडलेली विशेष वार्ता ऐकण्यास मी उत्सुक झालो आहे. "

तिरुमलदास आपला पूर्ववृतांत सांगतांना म्हणाला, " पूर्वजन्मी मी एक प्रतिष्ठित वेदपारंगत ब्राह्मण होतो. परंतु अतिशय लोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी, नुकतेच जन्मलेले एक गाईचे वासरू जुन्या चिंधीस चघळत असलेले मी पहिले. माझ्या कृपण स्वभावानुसार माझ्या मुलांना मी ते जीर्ण वस्त्र जपून ठेवण्यास सांगितले. मृत्यूसमयीं मलिन वस्त्रावर नजर ठेवल्यामुळें मला रजकाचा जन्म प्राप्त झाला. शंकरभट्टा, प्राणत्याग करतांना आपल्या मनांत जो संकल्प असतो, त्यालाच अनुसरून आपणांस पुढील जन्म मिळतो. माझ्या काही पूर्वपुण्याईमुळे माझा गर्तपुरी (गुंटुरू) मंडळातील पल्यनाडू प्रांतातील माल्याद्रीपूर इथे पुनर्जन्म झाला. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील." त्यानंतर त्या तिघा नास्तिकांकडे पाहत श्री गणपती क्रोधायमान स्वरांत म्हणाले, " माझे हे सत्यस्वरूप पाहुनदेखील तुम्ही ते असत्य आहे, असा अविश्वास दाखवला. त्यांमुळे मी तुम्हांस शाप देत आहे. पुढील जन्मीं तुमच्या पैकी एक आंधळा, एक मुका आणि एक बहिरा जन्मेल. मात्र आजच्या या मंगल दिनीं मी तुम्हांस उ:शापदेखील देत आहे, माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावर तुम्ही त्वरित दोषरहित व्हाल." एवढे बोलून श्री गणेश अंतर्धान पावले.

यथावकाश ते तिघे नास्तिक मृत्यू पावले आणि काणिपूर या गांवात तीन भाऊ म्हणून जन्मले. महागणपतींच्या शापवाणीनुसार मोठा भाऊ आंधळा, मधला बहिरा आणि तिसरा धाकटा मुका होता. ते आपल्या एक एकर जमिनीत शेती करुन उदर निर्वाह करीत होते. एके वर्षी त्या गावात भयंकर दुष्काळ पडला. सर्व जलाशयांतील जल आटून गेले. ह्या तीन भावंडांच्या शेतातील विहिरीतदेखील पाणी टंचाई जाणवू लागली. शेवटी, आपली विहीर अजून खोल खणावी असा विचार करून ते तिघे भाऊ विहिरीत उतरले. विहीर खणावयास प्रारंभ केल्यावर काही वेळाने त्यांची कुदळ एका टणक दगडावर आदळली अन एक नवल वर्तले, त्या खडकातून रक्ताची धार वर उडाली. ते रक्त मुक्या भावाच्या हातास लागता क्षणीच त्याला बोलता येऊ लागले. त्याचवेळी विहिरीला पाणीही लागले आणि विहीर जलमय झाली. त्या पाण्याचा स्पर्श होताच बहिरा असलेल्या भावास स्पष्ट ऐकू येऊ लागले. आपल्या दोन्ही भावांचे ते आनंदोद्गार ऐकून आंधळा भाऊदेखील त्यांच्या दिशेने जाऊ लागला. तेव्हा, त्याचा त्या विहिरीतील खडकास स्पर्श झाला अन काय आश्चर्य, त्याला दृष्टी प्राप्त झाली. विहिरीतील तो खडक म्हणजे एक स्वयंभू विनायकाची दगडी मूर्ती होती. त्या मूर्तीच्याच मस्तकावर कुदळीचा घाव बसल्याने तो रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्या तीन बंधूंनी ती स्वयंभू विनायकाची मूर्ती विहिरीतून काळजीपूर्वक बाहेर काढली.

पुढे ग्रामस्थांनी त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापन्नाचार्युलू जे आता सत्यऋषिश्वर या नावाने ओळखले जात होते आणि त्यांचे मेहुणे श्रीधरावधानी त्या ग्रामी आले होते. कृपाप्रसाद देतांना श्रीवरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, “ आईनविल्ली येथे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्माचेच हे रूप आहे. तुमच्यावर मी एक विशेष कार्य सोपवणार आहे. श्रीशैल्य या क्षेत्री कळा कमी आहेत. तेथे तुम्ही सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात केला पाहिजे. श्रीशैल्यास जेव्हा शक्तिपात होईल, त्या दिवशीच गोकर्ण क्षेत्री, काशीमध्ये, बदरी आणि केदार या क्षेत्री एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्री दत्तात्रेय लवकरच श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपांत अवतार घेणार आहेत. श्रीधरा, कौशिक गौत्रीय तुझे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावाने ओळखले जातील.” असा आशीर्वाद देऊन वरसिद्धी विनायक अंतर्धान पावले.

स्वयंभू वरसिद्धी विनायकाचा हा कथावृत्तांत सांगून तिरुमलदास शंकरभट्टांस पुढे म्हणाले, " शंकरा, काही काळाने सत्यऋषिश्वर म्हणजेच बापन्नाचार्युलू आणि श्रीधर पंडित पीठिकापुरांत वास्तव्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक अगम्य बाललीला पाहिल्या आहेत, त्या तुला उद्या सविस्तर सांगेन. मला माझ्या प्रथम पत्नीपासून रविदास नावाचा एक मुलगा आहे. तो सध्या कुरवपुरांत राहत असून श्रीपाद प्रभूंची यथामती यथाशक्ती सेवा करीत असतो. मी मात्र श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार इथे काणिपुरातच माझ्या दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर राहून प्रभूंच्या नामस्मरणांत आणि त्यांच्या लीलांचे चिंतन करीत काळ व्यतीत करत आहे. श्रीपाद स्वामींच्या कृपेने तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी नावाचे श्रेष्ठ भक्त ज्यांच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे, तसेच वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मा नामक श्रीपादांशी घनिष्ट संबंध असणारे निष्ठावंत उपासक यांची तू अवश्य भेट घे. त्यांच्याकडून श्रीपादांच्या चरित्र लेखनाकरिता तुला अनेक महत्वपूर्ण माहिती मिळेल. तू लिहीलेल्या या ग्रंथाखेरीज इतर कोणताही ग्रंथांत श्रीपादांच्या संपूर्ण चरित्र कथा अथवा लीला असणार नाहीत, असा श्रीपाद प्रभूंचा तुला आशीर्वाद आहे." तिरुमलदासाचे हे बोलणे शंकरभट्ट एकाग्रतेनें ऐकत होते. श्रीपादप्रभूंची ही आपल्यावर केवढी कृपा आहे, याचा त्यांना नित्य अनुभव येतच होता. ' कृतार्थ झालो काय मागू तुला । देई भक्तीसुधारस नित्य प्यावया मजला ' अशी कळकळीची प्रार्थना त्यांनी श्रीपादचरणीं केली.  

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - विघ्नें निवारण होण्यासाठी, देवतांचा कोप दूर होतो.

No comments:

Post a Comment