Dec 8, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ७१ ते ८० )


|| श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


नृसिंहवाटिकास्थो यः प्रददौ शाकभुङ्-निधिम् ।

दरिद्रब्राह्मणायासौ श्रीदत्तः शरणं मम ॥७१॥

भावार्थ : ज्या दत्तप्रभूंनी नृसिंहवाडीत वास्तव्य केले, ज्यांनी एका विप्राघरीं घेवड्याच्या शेंगांच्या भाजीची भिक्षा घेऊन त्या दरिद्री ब्राह्मणास द्रव्यनिधीचा खजिना प्रसाद म्हणून दिला, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.


भक्ताय त्रिस्थलीयात्रां दर्शयामास यः क्षणात् ।

चकार वरदं क्षेत्रं स श्रीदत्तः शरणं मम ॥७२॥

भावार्थ : ज्या दत्तगुरूंनी आपल्या भक्ताला एका क्षणात काशी-प्रयाग-गया ह्या त्रिस्थळीं यात्रेचे दर्शन घडविले, तसेच कृष्णा-पंचगंगा संगम स्थानास वरद क्षेत्र (श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे, प्रत्यक्ष दत्तप्रभूंची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले दत्तक्षेत्र आहे) केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

प्रेतार्तिं वारयित्वा यो ब्राह्मण्यै भक्तिभावितः ।

ददौ पुत्रौ स गतिदः श्रीदत्तः शरणं मम ॥७३॥

भावार्थ : ज्या प्रभूंनी शिरोळ येथील ब्राह्मण स्त्रीचा दृढ भक्तिभाव पाहून पिशाच्चबाधेचे निवारण केले आणि ज्या गुरूंच्या आशीर्वादाने तिला दोन पुत्र झाले, असे ते मोक्षप्राप्ती देणारे श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.


तत्त्वं यो मृतपुत्रायै बोधयित्वाप्यजीवयत् । मृतं कल्पद्रुमस्थः स श्रीदत्तः शरणं मम ॥७४॥

भावार्थ : ज्या श्री गुरूंनी त्या विप्र स्त्रीचा पुत्र मृत झाला असता, तिला (ब्रह्मचारी रूपांत तिथे येऊन) आत्मज्ञानाचा उपदेश केला, इतकेच नव्हें तर तिच्या मृत पुत्राला पुन्हा जिवंतही केले, असे ते औदुंबररूपी कल्पवृक्षातळीं सर्वदा वास करणारे श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. दोहयामास भिक्षार्थं यो वन्ध्यां महिषीं प्रभुः । दारिद्र्यदावदावः स श्रीदत्तः शरणं मम ॥७५॥ भावार्थ : ज्या दत्तप्रभूंनी आपल्या भिक्षेच्या पूर्ततेसाठी वांझ म्हैस दुभती केली आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्यरूपी वन जाळणारे जणू अग्निदेवच भासणारे, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. राजप्रार्थित एत्यास्थान्मठे यो गाणगापुरे । ब्रह्मरक्षः समुद्धर्ता श्रीदत्तः शरणं मम ॥७६॥ भावार्थ : जे श्रीगुरु गाणगापूर ग्रामीच्या राजाने प्रार्थना केल्यामुळे संगमस्थानाहून गाणगापूर गावांत मठांत येऊन राहिले आणि त्यावेळीं वेशीजवळील ब्रह्मराक्षसाचा ज्यांनी उद्धार केला, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. विश्वरूपं निन्दकाय शिबिकास्थः स्वलङ्कृतः । गर्वहा दर्शयद्यः स श्रीदत्तः शरणं मम ॥७७॥ भावार्थ : ज्या गुरुरायांनी (हत्ती, घोडे दळ शृंगारून तसेच) सजवलेल्या पालखीत स्वतः बसून आपली (दांभिक संन्यासी अशी) निंदा करणाऱ्या त्रिविक्रम यतींना विश्वरूप दर्शन दिले आणि त्या यतीचा गर्व दूर केला (त्याच्या मनांतील कुशंकांचे निवारण केले ), असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

त्रिविक्रमेण चानीतौ गर्वितौ ब्राह्मणद्विषौ । बोधयामास तौ यः स श्रीदत्तः शरणं मम ॥७८॥ भावार्थ : त्रिविक्रम यतींनी दोन विद्वान आणि गर्विष्ठ ब्राह्मणांस श्री गुरूंकडे वेदांविषयीं वादविवाद करण्यासाठी आणले असता, ज्या गुरु महाराजांनी त्या दोन ब्राह्मणांस वादविवाद करण्यापासून परावृत्त करण्यासाठी परोपरीचा उपदेश केला, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.

उक्त्वा चतुर्वेदशाखातदङ्गादिकमीश्वरः । विप्रगर्वहरो यः स श्रीदत्तः शरणं मम ॥७९॥ भावार्थ : सर्वज्ञ ईश्वरच असलेल्या ज्या श्रीगुरुंनी चारही वेद, त्यांच्या शाखा आणि सर्व वेदमंत्रांचे ज्ञान चांडाळामुखी वदवून त्या दोन ब्राह्मणांचा गर्व हरण केला, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत. सप्तजन्मविदं सप्तरेखोल्लङ्घनतो ददौ । यो हीनाय श्रुतिस्फूर्तिः श्रीदत्तः शरणं मम ॥८०॥ भावार्थ : ज्या गुरुमहाराजांनी सात रेषा ओलांडताच आपल्या पूर्वीच्या सात जन्मांचे ज्ञान प्राप्त झालेल्या मातंगास अथांग अशा वेदविद्येची अनुभूती दिली, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. || श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||


क्रमश:

No comments:

Post a Comment