Dec 29, 2020

श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पारायण


|| श्री गणेश-दत्त -गुरुभ्यो नमः ||

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: | द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ||

श्री सरस्वती गंगाधर रचित ' श्री गुरुचरित्र '  हा ७४९१ ओव्यांचा अत्यंत प्रासादिक  ग्रंथ आहे. ह्या वेदतुल्य ग्रंथाच्या वाचनाचे / पारायणाचे काही नियम आहेत. या ग्रंथाचे वाचन सर्वांना मुक्तपणे करता यावे यासाठी, प.प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी 'श्री सप्तशतीगुरुचरित्रसार ' हा सातशे ओव्यांचा ग्रंथ लिहिला. संपूर्ण श्रीगुरुचरित्र ह्या छोटया ग्रंथात साररूपाने कथन केला आहे. थोरल्या महाराजांनी रचलेल्या प्रत्येक ग्रंथात अथवा स्तोत्रांत नेहेमीच त्यांची असामान्य प्रतिभा, तीव्र बुद्धीमत्ता आणि उत्कट दत्तभक्ती यांचा प्रत्यय येतो. अर्थातच, श्री सप्तशतीगुरुचरित्रसार ग्रंथही त्यास अपवाद नाही. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास भगवदगीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. तसेच, श्री टेम्ब्ये स्वामींच्या प्रश्नावलीतील आठवे सूचित साधन श्री सप्तशती गुरुचरित्रसाराच्या आवर्तनांची उपासना करण्यास सांगते. या दिव्य ग्रंथाच्या वाचनाने श्री गुरुचरित्र वाचनाचे फळ तर मिळतेच, शिवाय अत्यंत अल्प वेळांत श्री दत्तमहाराज, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या लीलांचा आनंदही घेता येतो. श्री वासुदेव निवास, पुणे इथे श्री दत्तजयंती सप्ताह अंतर्गत श्री सप्तशतीगुरुचरित्रसार या ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले होते. दत्तभक्तांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. 

|| श्री गुरुदेव दत्त ||      

श्री टेम्ब्ये स्वामींरचित श्री सप्तशतीगुरुचरित्रसार ग्रंथ इथे वाचता येईल.


No comments:

Post a Comment