Mar 12, 2021

श्री शिवलीलामृत सार


श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नम: शिवाय

स्कन्दपुराणांतील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेल्या शिवलीलांवर आधारित श्री शिवलीलामृत हा एक दिव्य आणि सिद्ध ग्रंथ आहे. भगवान शिव शंकरांच्या अनेक कथा, शिवभक्तांसाठी विविध व्रत-वैकल्ये, उपासना, स्तोत्र, महादेवांचे जप, तसेच आध्यत्मिक बोध आदिंनी परिपूर्ण असा हा ग्रंथ अतिशय सुगम आणि रसाळ भाषेंत लिहिला आहे. या महान काव्याचे रचनाकार श्रीधर कवींवर विद्यादेवता शारदेचा वरदहस्त आहे, हे सहजच जाणवते. श्री शिवलीलामृताचे एकूण १४ अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय शिवोपासनेबरोबरच विविध प्रकारच्या भक्तींचीही ओळख करून देतो. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांनी प्रार्थना केली असता, महामुनी सूत त्या सर्वांस शिवमाहात्म्य सांगू लागले. त्या संवादावर आधारित या ग्रंथाची रचना आहे. संक्षिप्त शिवलीलामृत : अध्याय १ : पहिल्या अध्यायात दोन शिवमंत्रांचे माहात्म्य वर्णिले आहे. पहिला पंचाक्षरी - नम: शिवाय आणि दुसरा षडाक्षरी - ॐ नम: शिवाय हे दोन तारक मंत्र आणि त्यांची फलप्राप्ती सांगितली आहे. वेदांतील हे दोन दिव्य मंत्र शिवकृपेबरोबरच इष्ट मनोकामना, निर्गुण भक्ती आणि मुक्तीही सहज प्रदान करतात. मात्र, योग्य सदगुरूंकडून मंत्रदीक्षा घेऊन हा शिवमंत्र सिद्ध करावा, हे ग्रंथकार आवर्जून सांगतात. यासाठी भक्ती, वैराग्य, आणि ज्ञान अशी सद्गुरूंची विविध लक्षणेंही कथन करतात. सर्वज्ञ, दयाळू, आत्मज्ञानी, क्रोधरहित, मितभाषी आणि सर्वदा आपल्या शिष्यांचे हित बघणारे गुरूच आपले सद्गुरू असतात. यानंतर, या दिव्य शिवमंत्रामुळेच दाशार्ह राजाचा कसा उद्धार झाला, ही कथा विस्तारपूर्वक वर्णिली आहे. अध्याय २ : द्वितीय अध्यायात महाशिवरात्री माहात्म्य आणि शिवपूजनातील बिल्वपत्रांचे महत्व सांगितले आहे. यांत एका व्याधाची आणि शिकार करतांना त्याला दिसलेल्या मृग परिवाराची कथा वर्णन केली आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी केवळ संयोगामुळे शिवभक्त नसलेल्या व्याधास उपवास घडतो, याचबरोबर विनोद म्हणून केलेला ' हर हर ' हा जप आणि शिवलिंगावर नकळत वाहिलेली बिल्वपत्रें यांमुळे तो भोळा सांब त्याचा कसा उद्धार करतो, हे सांगितले आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्य प्राप्त होते. भावभक्तीबरोबरच कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा यांचे महत्व अधोरेखित करत हा अध्याय कर्मविपाक सिद्धांत विस्तारपूर्वक वर्णन करतो. अध्याय ३ : तिसऱ्या अध्यायांत मित्रसह उर्फ कल्माषपाद राजाची कथा आहे. त्याला श्री गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे माहात्म्य विशद करतांना गौतम ऋषींनी एका अत्यंत पापी स्त्रीचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला. ती पापिणी गोकर्णक्षेत्रीं आली असता, शिवरात्रीस तिला उपोषण, जागरण, आणि शिवपूजनही घडले. केवळ त्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी गेली. पुढे, गौतम ऋषींच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवाराधना करतो आणि ब्रह्महत्येच्या महापातकातून मुक्त होतो, हा कथाभाग आहे. अध्याय ४ : चतुर्थ अध्यायात विमर्षण राजा व राणी कुमुद्वती यांची कथा वर्णिली आहे. पूर्वजन्म पशु योनीत मिळूनही महाशिवरात्रीस उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्यामुळे त्यांना पुढचा जन्म राजघराण्यांत मिळतो. तसेच, त्यांच्या पुढील सहा जन्मांची कथाही आहे. दुसरी कथा उज्जयिनी नगरीतील महाकाळेश्वर ज्योतिर्लिगांची आहे. एका सहा वर्षाच्या गोप बालकाने अत्यंत भक्तिभावाने केवळ दगड आणि मृत्तिकेने केलेली पूजा स्वीकारत महादेव प्रसन्न झाले. त्या प्रभावाने राज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंची वृत्ती बदलली आणि शिवभक्त उज्जयिनी नरेश, चंद्रसेनाचा दिव्य मणी व राज्य सुरक्षित राहिले. त्यावेळी, प्रत्यक्ष हनुमंताने प्रगट होऊन त्या गोपपुत्राचे नाव श्रीकर ठेवले. तोच पुढील जन्मी गोकुळांत नंदराजा म्हणून जन्मला. ईश्वर केवळ भावाचा भुकेला आहे, हेच ही कथा अधोरेखित करते. अध्याय ५ : पाचव्या अध्यायात प्रदोषव्रताचे माहात्म्य सांगितले आहे. शाल्व देशाच्या राजाने विदर्भ नगरीचा राजा सत्यरथ याचा रणांत पराभव करून वध केला. सत्यरथाची गरोदर राणी अरण्यांत पळून गेली. तिथे तिने एका पुत्रास जन्म दिला, परंतु दुर्दैवाने एका मगरीने तिला भक्षण केले. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने त्या राजपुत्राचा आपल्या मुलाबरोबर सांभाळ केला. पुढे, शांडिल्य ऋषींनी त्या दोन्ही मुलांना शिवमंत्राचा उपदेश केला आणि प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. त्या व्रतप्रभावाने, ब्राह्मणपुत्राचे दारिद्र्य दूर झाले आणि राजपुत्रास राज्य परत मिळाले, हा कथाभाग आला आहे. अध्याय ६ : सहाव्या अध्यायात सोमवार व्रत माहात्म्य सांगितले आहे. चित्रवर्मा राजाची कन्या सीमंतिनीची कथा यांत वर्णिली आहे. याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यानुसार, आपला वैधव्यदोष दूर होण्यासाठी सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. अनेक संकटे आल्यावरदेखील तिने आपले शिवव्रत सुरूच ठेवले आणि शिवकृपेमुळे तिचे सर्वतोपरी कल्याण झाले, याचे यांत वर्णन आहे. कठीण परिस्थितीतदेखील ठेवलेली परमेश्वरावरील दृढ श्रद्धा काय फळ देते, हेच इथे विस्तृतपणें सांगितले आहे. अध्याय ७ : सातव्या अध्यायांत शिवव्रतदिनीं राणी सीमंतिनी करीत असलेल्या दाम्पत्यपूजनाची कथा आहे. केवळ द्रव्याभिलाषेने दोन ब्राह्मणपुत्रांपैकी एक जण स्त्रीवेष धारण करतो आणि दाम्पत्य म्हणून ते राणी सीमंतिनीकडे येतात. तीही ते दोघे पुरुषच आहेत हे ओळखते, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे भक्तिपूर्वक पूजन करते. तसेच, भोजन, वस्त्रालंकार आणि भरपूर दक्षिणाही देते. परिणामस्वरूप स्त्रीवेष धारण केलेला ब्राह्मणपुत्र खरोखरच स्त्री होतो. पूर्व पुरुषरूप प्राप्तीसाठी देवीची उपासना करूनही, सीमंतिनीच्या दृढ भक्तीमुळे तो ब्राह्मणपुत्र स्त्रीच राहणार, असे अदिशक्ती सांगते. तर दुसऱ्या कथेत मदन ब्राह्मण आणि पिंगला वैश्या या दोघांनी ऋषभ योगींची सेवा केल्याने त्यांना पुढील जन्म कसा राजघराण्यांत मिळतो, तसेच भस्म माहात्म्य यांचे वर्णन केले आहे. अध्याय ८ : आठव्या अध्यायांत भद्रायु नामक राजपुत्र ( पूर्वजन्मीचा मदन ब्राह्मण ) आणि कीर्तिमालिनी ( पूर्वजन्मीची पिंगला वैश्या ) यांची कथा सविस्तर वर्णिली आहे. शिव-पार्वती त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या शिवार्चन आणि भक्तीमुळे प्रसन्न होतात, तसेच त्यांना शिवलोकांत अक्षयपद असा आशीर्वाद देतात, हा कथाभाग आहे. अध्याय ९ : नवव्या अध्यायांत वामदेव नामक महाज्ञानी मुनी एका ब्रह्मराक्षसाला शिवप्रणीत भस्म-माहात्म्य सांगतात. एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला केवळ भस्म स्पर्श झाल्याने तो यमलोकीं न जाता त्याला कैलासलोकी कशी गती मिळाली, हे कथन केले आहे. तर पुढील कथा चिताभस्माने शिवलिंगाची नित्य पूजा करणाऱ्या एका भिल्ल भक्ताची आहे. एके दिवशी, त्याला चिताभस्म मिळाले नाही. तेव्हा, पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याची पत्नी स्वतःला जाळून घेते, त्या भस्माने तो भक्तिभावाने शिवार्चन करतो. मात्र, महादेवांच्या कृपेने तीच पत्नी नैवेद्य घेऊन येते. अशा रीतीने ते पती-पत्नी शिवरूप होतात आणि शिवलोकी जातात. अध्याय १० : दहाव्या अध्यायांत नैधृव नामक अंध ऋषी गतधवा शारदेला सौभाग्य आणि पुत्र प्राप्तीचा वर देतात. सत्य परिस्थिती समजताच, आपले वचन खरे करण्यासाठी नैधृव ऋषी शारदेला ' ॐ नम: शिवाय ' या मंत्राचा जप करण्यास सांगतात. तसेच, तिच्याकडून उमामहेश्वर व्रतही करवून घेतात. त्या व्रतप्रभावाने भवानी देवी प्रसन्न होऊन दर्शन देते आणि नैधृव ऋषींची प्रार्थना खरी करण्यासाठी सौभाग्य, पुत्रप्राप्तीचा शारदेला आशीर्वाद देते, हा कथाभाग आहे. अध्याय ११ : अकरावा अध्याय रुद्राध्याय आहे. नंदिग्रामातील महानंदा नामक शिवोपासना करणाऱ्या वैश्येची कथा यांत सांगितली आहे. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला आपल्या चरणीं अक्षय स्थान दिलेच, पण तिने पाळलेल्या कोंबडा व माकड यांनादेखील भस्मधारण व शिवपुराण श्रवणाच्या प्रभावाने काश्मीर नगरीचा राजपुत्र आणि प्रधानपुत्र असा उत्तम जन्म मिळाला. याच राजपुत्र सुधर्माचे मृत्यू गंडांतर टाळण्यासाठी पराशर ऋषींनी रुद्राध्यायाची पारायणे केली. सातव्या दिवशी मृत्युघटका येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला, तेव्हा पराशर ऋषींनी रुद्रोदक शिंपडून राजपुत्राचा अकालमृत्यू हरून आयुष्यवर्धन केले, याचे सविस्तर वर्णन आहे. अध्याय १२ : बाराव्या अध्यायात विदुर आणि बहुला या वेदधर्मविवर्जित, अत्यंत अनाचारी अशा ब्राह्मण दाम्पत्याची कथा आहे. गोकर्ण क्षेत्रीं पुराण श्रवण केल्यावर बहुलेस आपल्या दुर्वर्तनाचा पश्चात्ताप होतो आणि ती शिवभक्तीत रंगून जाते. पुराणिक बुवांनी दिलेल्या ' ॐ नम: शिवाय ' या दिव्य मंत्राचा जप करून ती उमा-महेश्वरांस अनन्यभावानें शरण जाते आणि स्वतःसह पतीचाही उद्धार करते, हे विस्तृतपणें वर्णिले आहे. तसेच, भस्मासुराची उत्पत्ती, श्री शंकरांचे त्यास वरदान आणि तो उन्मत्त झाल्यावर श्रीहरी विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून केलेला त्याचा वध हे आख्यानही सविस्तर कथिले आहे. अध्याय १३ : तेराव्या अध्यायात दक्ष राजाने आयोजित केलेल्या महायज्ञात भवानी मातेचे आत्मसमर्पण आणि त्यानंतर आदिशक्तीने हिमालयाच्या पोटी पार्वती या नावाने जन्म घेतला, हा कथाभाग आहे. उमा पार्वती शंकराच्या प्राप्तीसाठी कडक तपश्चर्या करू लागली. इकडे, श्री शंकरांनी वीरभद्रासह चढाई करून तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन यांचा संहार केला. ' तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे.' ही भविष्यवाणी लक्षात घेऊन सर्व सुरगण शिव-पार्वतीच्या विवाहासाठी प्रयत्न करू लागले. यथावकाश, त्यांचा विवाह होऊन कार्तिकेयाचा जन्म झाला आणि त्याने पुढे तारकासुराचा वध केला, ही कथा सविस्तर सांगितली आहे. अध्याय १४ : चौदाव्या अध्यायात एकदा पार्वतीबरोबर सारीपाटाच्या खेळांत शिव हरले आणि रागावून हिमालयांत एकांतात राहू लागले. तेव्हा, पार्वतीने भिल्लीणीचा वेष धारण करून त्यांची समजूत काढली याचे वर्णन आहे. तसेच, नारद मुनींकडून धर्मपरायण आणि उदार श्रियाळ राजाची स्तुती ऐकून महादेव त्याची परीक्षा घेतात. अतिथीरूपांत आलेल्या शंकरांची विचित्र मागणी राजा श्रियाळ आणि राणी चांगुणा पुरवतात. तेव्हा प्रसन्न होऊन शिव त्या सर्वांस दर्शन देतात, तसेच बाळ चिलयास शुभाशिर्वाद देऊन राजा राणीस दिव्य विमानातून शिवलोकी नेतात, ही कथा आहे. शके सोळाशे चाळीस । विलंबीनाम संवत्सरास । शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास । रविवारी ग्रंथ संपविला ॥ब्रह्मकमंडलूच्या तीरी । द्वादशमती नाम नगरी । आद्यंत ग्रंथ निर्धारी । तेथेचि झाला जाणिजे ॥ शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत । चतुर्दश अध्यायापर्यंत । जय जय शंकर उमानाथ । तुजप्रीत्यर्थ हो का सदा ॥ असे निरूपण करून श्रीधर कवी शिवलीलामृत ग्रंथ संपूर्ण झाला, असे सांगतात. या काव्यांतील अध्यायांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ ईश्वर प्रार्थनेने होतो. ईश्वराच्या नामस्मरणांत किती सामर्थ्य असते, हे प्रचिती आल्याशिवाय कळत नाही. अर्थात परमेश्वर, सद्गुरू यांचा कृपाशिर्वाद असल्याखेरीज प्रासादिक ग्रंथ निर्मिती होऊ शकत नाही, हे ही खरेच ! श्रीधर कवींचे प्रतिभाचातुर्य असे की प्रत्येक अध्यायांतील प्रारंभीच्या या काही ओव्या एकत्र केल्या तर संपूर्ण शिवलीलामृताचे सार तयार होते. काही कारणांमुळे भक्त जर पूर्ण ग्रंथ वाचन करू शकत नसतील, तर श्रद्धापूर्वक या ४२ ओव्या वाचल्या तरी संपूर्ण शिवलीलामृत वाचनाचे/पारायणाचे फळ मिळते. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । ह्या बेचाळीस ओव्या समग्र । शिवलीलामृताचे होय सार । श्रोती निरंतर परिसाव्या ॥ सकळ शिवलीलामृताचे । आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे । श्रवण पठण केल्याचे । फळ असे समान ॥ नित्य समस्त नोहे पठण । तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण । वाचिता शुद्धभावे करून । मनोरथ पूर्ण होतील ॥ अशी ग्वाहीही ग्रंथकार देतात. नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या :

ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्गुरु ॥१॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥२॥ जय जय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमना मनमोहना । कर्ममोचका विश्वम्भरा ॥३॥ जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथें भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकटें विघ्नें दारुण । न बाधती कालत्रयीं ॥४॥ संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिषें घडो शिवस्मरण । न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥५॥ न कळत प्राशितां अमृत । अमर काया होय यथार्थ । औषध नेणतां भक्षीत । परी रोग हरे तत्काळ ॥६॥ जय जय मंगलधामा । निजजनतारका आत्मारामा । चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥७॥ हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंदा भाललोचना । भवभंजना महेश्वरा ॥८॥ हे शिवा वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्वरा । अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥९॥ धराधरेंद्र मानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं । तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥१०॥ न कळे तुझें आदिमध्यावसान । आपणचि सर्व कर्ता कारण । कोठें प्रकटसी याचें अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मांदिका ॥११॥ जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रकटसी जगन्निवास । सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥१२॥ ' सदाशिव ' ही अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । तो परमपावन संसारी । होऊनि तारी इतरांतें ॥१३॥ बहुत शास्त्रवक्ते नर । प्रायश्चित्तांचे करितां विचार । परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्चित्तां आगळें ॥१४॥ नामाचा महिमा अद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥१५॥ जय जयाजी पंचवदना । महापापद्रुमनिकृंतना । मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥१६॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥१७॥ नीलग्रीवा अहिभूषणा । नंदिवहना अंधकमर्दना । दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥१८॥ जयजय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा । त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥१९॥ कोटिभानुतेजा अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्ता त्रयीमूर्ते ॥२०॥ परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा । पशुपते पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥२१जयजय श्रीब्रह्मानंदमूर्ती । तू वंद्य भोळा चक्रवर्ती । शिवयोगीरुपें भद्रायूप्रती । अगाध नीती कथिलीस ॥२२जयजय भस्मोद्धूलितांगा । योगिध्येया भक्तभवभंगा । सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपासीं ॥२३जेथें नाही शिवाचें नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम । धिक् गृह पुर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥२४जेथें शिवनामाचा उच्चार । तेथें कैंचा जन्ममृत्युसंसार । ज्यांसी शिवशिव छंद निरंतर । त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥२५ जयाची शिवनामीं भक्ती । तयाचीं पापें सर्व जळती । आणि चुके पुनरावृत्ती । तो केवळ शिवरुप ॥२६जैसें प्राणियांचे चित्त । विषयीं गुंते अहोरात । तैसें शिवनामीं जरी लागत । तरी मग बंधन कैचें ॥२७कामगजविदारक पंचानना । क्रोधजलदप्रभंजना । लोभांधकारचंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥२८मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना । लोभमहासागरशोषणा । अगस्त्यमहामुनिवर्या ॥२९आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा । रुंडमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥३०धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥३१सूत सांगे शौनकादिकांप्रती । जे भस्म रुद्राक्ष धारण करिती । त्यांच्या पुण्यासी नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥३२ जे करिती रुद्राक्षधारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण । केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥३३ब्राह्मणादि चारी वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमीं संपूर्ण । स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यांहीं शिवकीर्तन करावें ॥३४शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र । लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥३५जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशुसमान । मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥३६शिव शिव म्हणतां वाचें । मूळ न राहे पापाचें । ऐसें माहात्म्य शंकराचें । निगमागम वर्णिती ॥३७जो जगदात्मा सदाशिव । ज्यासी वंदिती कमलोद्भव । गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥३८जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाह्रदयाब्जमिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकंद । विश्वम्भर दयाब्धी ॥३९जो पंचमुख पंचदशनयन । भार्गववरद भक्तजीवन । अघोर भस्मासुरमर्दन । भेदातीत भूतपती ॥४०तो तूं स्वजनभद्रकारका । संकटीं रक्षिसी भोळे भाविकां । ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडीं ॥४१म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन । तरी या संकटांतून । काढूनि पूर्ण संरक्षीं ॥४२

॥ नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ॥
ॐ नम: शिवाय श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु


No comments:

Post a Comment