Sep 13, 2021

संक्षिप्त रुद्राध्याय - श्री शिवलीलामृत


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनी परायण । सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥१॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती । त्यांच्या पुण्यास नाही मिती । त्रिजगती तेचि धन्य ॥२॥ जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण । तो शंकरचि त्याचे दर्शन । घेता तरती जीव बहू ॥३॥ अष्टोत्तरशत माळा । सर्वदा असावी गळा । एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजिता भाग्य विशेष ॥४॥ पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक । सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करिता ॥५॥ नित्य रुद्राक्षपूजन । तरी केले जाणिजे शिवार्चन । रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयी ॥६॥ काश्मीर देशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन । विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥७॥ असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करिता अनुष्ठान । दोघांसी झाले नंदन । शिवभक्त उपजतांचि ॥८॥ राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम । दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानी ॥९॥ आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत । बोलती शिवनामावळी नित्य । पाहाणे शिवपूजा सर्वदा ॥१०॥ आश्चर्य करिती राव प्रधान । यांस का नावडे वस्त्रभूषण । करिती रुद्राक्षभस्मधारण । सदा स्मरण शिवाचे ॥११॥ विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रे भूषणे लेवविती । ते सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥१२॥ शिक्षा करिता बहुत । परी ते न सांडिती आपुले व्रत । राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावे काय आता ॥१३॥ तो उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर । सवे वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥१४॥ ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनि ॥१५॥ राव प्रधान सामोरे धावती । साष्टांग नमूनि घरासी आणिती । षोडशोपचारी पूजिती । भाव चित्ती विशेष ॥१६॥ समस्तां वस्त्रे भूषणे देऊन । राव विनवी कर जोडून । म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचे ॥१७॥ नावडती वस्त्रे अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर । वैराग्यशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासी ॥१८॥ पुढे हे कैसे राज्य करिती । हे आम्हांसी गूढ पडिले चित्ती । मग ते दोघे कुमर आणोनि गुरूप्रती । दाखविले भद्रसेने ॥१९॥ यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे का झाले शिवभक्त । यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतो ॥२०॥ पूर्वी काश्मीर देशात उत्तम । महापट्टण नंद्रिग्राम । तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचे ॥२१॥ त्या ग्रामीचा तोचि भूप । पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप । ललिताकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥२२॥ जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसे तिजवरी विराजे छत्र । रत्‍नखचित याने अपार । भाग्या पार नाही तिच्या ॥२३॥ दास दासी अपार । घरी माता सभाग्य सहोदर । जिचे गायन ऐकता किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥२४॥ वेश्या असोन पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वता । त्याचा दिवस न सरता । इंद्रासही वश्य नव्हे ॥२५॥ परम शिवभक्त विख्यात । दानशील उदार बहुत । सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेसी ॥२६॥ अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळे शिव पूजीत । ब्राह्मणहस्ते अद्भुत । अभिषेक करवी शिवासी ॥२७॥ याचक मनी जे जे इच्छीत । ते ते महानंदा पुरवीत । कोटि लिंगे करवीत । श्रावणमासी अत्यादरे ॥२८॥ ऐक भद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरून । त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन । नाचू शिकविले कौतुके ॥२९॥ आपुले जे का नृत्यागार । तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर । कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीने ॥३०॥ करी शिवलीलापुराणश्रवण । तेही ऐकती दोघेजण । सवेंचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढे ॥३१॥ महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेकरून । त्यांच्या गळा कपाळी जाण । विभूति चर्ची स्वहस्ते ॥३२॥ एवं तिच्या संगतीकरून । त्यांसही घडतसे शिवभजन । असो तिचे सत्त्व पाहावया लागोन । सदाशिव पातला ॥३३॥ सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला । त्याचे स्वरूप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवा ॥३४॥ पूजा करोनि स्वहस्तकी । त्यासी बैसविले रत्‍नमंचकी । तो पृथ्वीमोलाचे हस्तकी । कंकण त्याच्या देखिले ॥३५॥ देखता गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण । विश्वकर्म्याने निर्मिली जाण । मानवी कर्तृत्व हे नव्हे ॥३६॥ सौदागरे ते काढून । तिच्या हस्तकी घातले कंकण । येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासी ॥३७॥ पृथ्वीचे मोल हे कंकण । मीही बत्तीसलक्षणी पद्मिण । तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झाले मी ॥३८॥ तयासी ते मानले । सवेंचि त्याने दिव्यलिंग काढिले । सूर्यप्रभेहूनि आगळे । तेज वर्णिले नवजाय ॥३९॥ लिंग देखोनि ते वेळी । महानंदा तन्मय झाली । म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनी वंदी लिंगाते ॥४०॥ म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी । कोटि कंकणे टाकावी ओवाळूनी । सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवी जतन हे ॥४१॥ म्हणे या लिंगापाशी माझा प्राण । भंगले की गेले दग्ध होऊन । तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझे ॥४२॥ येरीने अवश्य म्हणोन । ठेविले नृत्यागारी नेऊन । मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकी ॥४३॥ तिचे कैसे आहे सत्त्व । धैर्य पाहे सदाशिव । भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥४४॥ त्याच्या आज्ञेकरून । नृत्यशाळेस लागला अग्न । जन धावो लागले चहूकडोन । एकचि हांक जाहली ॥४५॥ तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी । येरी उठली घाबरी । तव वातात्मज चेतला ॥४६॥ तैशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून । कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥४७॥ नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर । यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवा ॥४८॥ माझे दिव्यलिंग आहे की जतन । महानंदा घाबरी ऐकोन । वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले ॥४९॥ सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन । मी आपुला देतो प्राण । लिंगाकारणे तुजवरी ॥५०॥ मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथे जाती ज्वाळा । सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥५१॥ अति लाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग । उडी घातली सवेग । ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥५२॥ ऐसे देखता महानंदा । बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा । लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥५३॥ रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । ह्रदयी चिंतिले शिवध्यान । हर हर शिव म्हणवून । उडी निःशंक घातली ॥५४॥ सूर्यबिंब निघे उदयाचळी । तैसा प्रगटला कपाळमौळी । दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटी पाळी भक्तांते ॥५५॥ वरचेवरी कंदुक झेलीत । तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात । महानंदेसी झेलूनि धरीत । ह्रदयकमळी परमात्मा ॥५६॥ म्हणे जाहलो मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान । ती म्हणे हे नगर उद्धरून । विमानी बैसवी दयाळा ॥५७॥ माताबंधूसमवेत । महानंदा विमानी बैसत । दिव्यरूप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥५८॥ पावली सकळ शिवपदी । जेथे नाही आधिव्याधी । क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैची तेथे ॥५९॥ जेथे वोसणता बोलती शिवदास । ते ते प्राप्त होय तयास । शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथे पावली ॥६०॥ हे कथा परम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास । म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥६१॥ कंठी रुद्राक्षधारण । भाळी विभूति चर्चून । त्याचि पूर्वपुण्येकरून । सुधर्म तारक उपजले ॥६२॥ हे पुढे राज्य करतील निर्दोष । बत्तीस लक्षणी डोळस । शिवभजनी लाविती बहुतांस । उद्धरतील तुम्हांते ॥६३॥ अमात्यसहित भद्रसेन । गुरूसी घाली लोटांगण । म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरी जन्मले ॥६४॥ भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षै करिती । आयुष्यप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥६५॥ ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख । हे सभा सकळिक । दुःखार्णवी पडेल पै ॥६६॥ भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान । तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण । झाली असता जाण पा ॥६७॥ आजपासोनि सातवे दिवशी । मृत्यु पावेल या समयासी । राव ऐकता धरणीसी । मूर्च्छा येऊनि पडियेला ॥६८॥ करूनिया हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर । मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥६९॥ याकरिता भद्रसेन अवधारी । अयुत रुद्रावर्तने करी । शिवावरी अभिषेकधार धरी । मृत्यु दूरी होय साच ॥७०॥ अथवा शत घट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून । रुद्रे उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करी ॥७१॥ नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण । क्षोणीपाळा करी सप्तदिन । राये धरिले दृढ चरण । सद्‌गद होवोनि बोलत ॥७२॥ सकळ ऋषिरत्नमंडित पदक । स्वामी तू त्यात मुख्य नायक । काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनी ॥७३॥ तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण । तुजसवे जे आहेत ब्राह्मण । आणीक सांगसी ते बोलावून । आताचि आणितो आरंभी ॥७४॥ मग सहस्त्र विप्र बोलावून । ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ति पूर्ण । न्यासध्यानयुक्त पढून । गुरूपासून जे आले ॥७५॥ ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन । सहस्त्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥७६॥ स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून । रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिले ॥७७॥ शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशी माध्याह्नी आला चंडांश । मृत्युसमय येता धरणीस । बाळ मूर्च्छित पडियेला ॥७८॥ एक मुहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिले समस्त । परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकारा ॥७९॥ रुद्रोदक शिंपून । सावध केला राजनंदन । त्यासी पुसती वर्तमान । वर्तले तेचि सांगत ॥८०॥ एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर । विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारिखे ॥८१॥ तो मज घेऊनि जात असता । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वता । पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळभवांडी दुजी नसे ॥८२॥ ते महाराज येऊन । मज सोडविले तोडोनि बंधन । त्या काळपुरुषासी धरून । करीत ताडण गेले ते ॥८३॥ ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर । भद्रसेन करी जयजयकार । ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रू नेत्री आले ॥८४॥ अंगी रोमांच दाटले । मग विप्रचरणी गडबडा लोळे । शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमने वर्षती ॥८५॥ चंद्रानना धडकती भेरी । नाद न माये नभोदरी । असो भद्रसेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥८६॥ षड्रस अन्ने शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रे देत । अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ॥८७॥ ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता । ऐसा अति आनंद होत असता । तो अद्भुत वर्तले ॥८८॥ की निर्दैवासी सापडे चिंतामणी । की क्षुधितापुढे क्षीराब्धि ये धावूनी । तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी । नारदमुनी पातला ॥८९॥ तो नारद देखोनि तेचि क्षणी । कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी । दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखता ॥९०॥ पराशरादि सकळ ब्राह्मण । प्रधानासहित भद्रसेन । धावोनि धरिती चरण । ब्रह्मानंदे उचंबळले ॥९१॥ दिव्य गंध दिव्य सुमनी । षोडशोपचारे पूजिला नारदमुनी । राव उभा ठाके कर जोडोनी । म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तू ॥९२॥ त्रिभुवनी गमन तुझे सर्व । काही देखिले सांग अपूर्व । नारद म्हणे मार्गी येता शिव । दूत चौघे देखिले ॥९३॥ दशभुज पंचवदन । तिही मृत्यु नेला बांधोन । तुझ्या पुत्राचे चुकविले मरण । रुद्रानुष्ठाने धन्य केले ॥९४॥ तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा । शिवे वीरभद्र मुख्य पाठविला । मज देखता मृत्यूसी पुसू लागला । शिवसुत ऐका ते ॥९५॥ तो सार्वभौम होईल तत्त्वता । रुद्रमहिमा तुज ठाऊक असता । शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वता । कैसा आणीत होतासी ॥९६॥ मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून । तव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होते ॥९७॥ ते महत्पुण्ये निरसूनि सहज । दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य । मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधे कष्टी बहू ॥९८॥ मग उभा ठाकूनि कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत । हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळत घडला हा ॥९९॥ ऐसे नारद सांगता ते क्षणी । राये पायावरी घातली लोळणी । आणीक सहस्त्र रुद्र करूनी । महोत्साह करीतसे ॥१००॥ शतरुद्र करिता निःशेष । शतायुषी होय तो पुरुष । हा अध्याय पढता निर्दोष । तो शिवरूप याचि देही ॥१०१॥ तो येथेचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थे तरती बहुत । असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥१०२॥ आनंदमय शक्तिनंदन । राये शतपद्म धन देऊन । तोषविला गुरु संपूर्ण । ऋषींसहित जाता झाला ॥१०३॥ हे भद्रसेनआख्यान जे पढती । त्यासी होय आयुष्य संतती । त्यांसी काळ न बाधे अंती । वंदोनि नेती शिवपदा ॥१०४॥ एवं महापापपर्वत तत्त्वता । भस्म होती श्रवण करिता । हा अध्याय त्रिकाळ वाचिता । गंडांतरे दूर होती ॥१०५॥ मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रासी राज्य देऊन । युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळी ॥१०६॥ मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना । शिवअनुष्ठान रुद्रध्याना । करिता महारुद्र तोषला ॥१०७॥ शेवटी शिवपदासी पावून । राहिले शिवरूप होऊन । हा अकरावा अध्याय जाण । स्वरूप एकादश रुद्रांचे ॥१०८॥ हा अध्याय करिता श्रवण । एकादश रुद्रा समाधान । की हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिले फळ देणार ॥१०९॥ मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न । पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥११०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । संक्षिप्त एकादशाध्याय हा ॥१११॥

॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥


No comments:

Post a Comment