Sep 16, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - २


॥ श्री गणेशाय नम: श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥ अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

केजकर स्वामी - महारूद्रराव देशपांडे

मोगलाई प्रांतात आंबे-जोगाईनजिक केज नांवाचे छोटेसे गांव आहे. तेथे महारुद्र देशपांडे नामक ऋग्वेदी ब्राह्मण जहागिरदार होते. लक्ष्मी आणि सरस्वती या दोघींचाही वरदहस्त त्यांच्या घराण्यांवर होता. महारूद्ररावांना तीन कनिष्ठ बंधू होते. एके काळीं काही कारणांनी त्यांचे निजाम-सरकारांतील उत्पन्न जप्त झाले होते. ते सोडविण्यासाठी या तीन बंधूंनी विशेषतः महारूद्ररावांनी अथक प्रयत्न केले, परंतु त्यांस यश आले नाही. त्याकाळी, बीड प्रांतात एक साधुपुरुष प्रसिद्ध होते. महारूद्ररावही त्या संत महात्म्यांच्या दर्शनास वारंवार जात असत. असेच, एकदा ते दर्शनासाठी गेलें असता, त्यांनी त्या साधू महाराजांस आपलें अडलेले कार्य पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. त्यांवर त्या संतपुरुषानें महारूद्ररावांना अक्कलकोट येथे जाऊन तेथील परमहंस स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावें असे सांगितले. श्री स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्न पुन्हा लवकरच सुरु होईल असा त्या संत महात्म्यांनी विश्वास दिल्यानंतर महारूद्रराव ह्यांस आशेचा किरण दिसु लागला. त्यानुसार, लवकरच ते अक्कलकोटास रवाना झाले. महाराज त्यावेळीं विरुपाक्ष मोदींच्या गृहीं आहेत हे समजताच श्रीफलादि पूजा साहित्य घेऊन ते समर्थांच्या दर्शनास निघाले. देशपांड्यांनी श्रीफलादी अर्पून । घातले प्रेमे साष्टांग नमन । तदा महारूद्ररावांचे हृद्गत जाणून । अवधूत निरंजन वदले - " तुम्ही चार मनोरे आहेत तेथे जावें, म्हणजे तुमचे शेत सोडुन देऊ..!! ". हे आशीर्वचन ऐकताच महारूद्ररावांना श्री स्वामी समर्थांच्या अंतर्साक्षीत्वाची प्रचिती आली आणि स्वामींचरणी त्यांची श्रद्धा दृढ झाली. त्याच दिवशी भोजन झाल्यावर स्वामींची आज्ञा घेऊन ते हैद्राबादेस निघाले. समर्थांच्या वचनांवर त्यांचा विश्वास होताच, तेव्हा वंदूनि श्रीदत्त-दिगंबरपदांस । त्वरेकरूनि निघाले ।


महारूद्रराव हैद्राबाद शहरी येताच अगदीच स्वल्प-अल्प प्रयन्तांत त्यांचे उत्पन्नाचे अडलेले काम पूर्ण झाले. याच कार्यासाठी पूर्वी अनेक प्रयत्न-साधने केली होती, द्रव्यही खर्चले होते, परंतु बराच काळ वाट पाहूनही यश काही आले नव्हते. मात्र तेच श्री अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्राप्त होताच, अगदीच विनासायास साधले गेले. श्री स्वामीकृपेची अशी प्रचिती येताच, महारूद्ररावांची श्री स्वामी समर्थांच्या ठायीं श्रद्धा, भक्ती अधिकच दृढ झाली. स्वामीभक्तहो, ' विश्वास: फलदायक: ' असे शास्त्रवचन आहे. अर्थात विश्वासच फलद्रूप होतो, याचा पुरेपूर अनुभव देशपांड्यांना आला. पूर्ववत उत्पन्न मिळताच, महारूद्रराव त्वरित अक्कलकोटास आले. श्री स्वामींचे दर्शन घेऊन त्यांनी सर्व वृत्तांत कथिला. मूळच्याच भक्तिवंत असलेल्या महारूद्ररावांनी समर्थांचे श्रद्धापूर्वक पूजन केले, त्यांना महानैवेद्य अर्पण केला आणि भरपूर दानधर्मही केला. काही दिवस अक्कलकोट नगरीत राहून ते केजधारुरास परतले.

पुढें काही दिवसांनी, महारूद्रराव आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या कुलदेवतेच्या श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी, भूलोकीचे वैकुंठ अर्थात पंढरपूर येथे आले. चंद्रभागेत स्नान करून ते श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले असता, त्यांना ' तो विटेवरी विठ्ठल-पांडुरंग-मूर्ति नसून । दिसले संन्यासी दैदीप्यमान । विटेवर उभे कटीवर हसत ठेवून ।' असा अनुभव आला. मंदिरातील विठ्ठलमूर्तीच्या स्थानी त्यांना श्री अक्कलकोटस्वामी समर्थांचे दर्शन झाले. त्या यतींद्रमूर्तीच्या मनोहर दर्शनाने देशपांडे यांना अतिशय हर्ष झाला आणि अपूर्व अशी चित्तशांती त्यांनी अनुभवली. आपले कुलस्वामी पंढरीनाथ विठ्ठल आणि यतीश्वर अभिन्न स्वरूप असून एकाच परब्रह्माचे मूर्तिमंत चैतन्याविष्कार आहेत, हेच समजाविण्यासाठी योगीराज श्री स्वामी समर्थांनी सहज लीलेने हा चमत्कार महारूद्ररावांना दाखविला. पुढें, षोडषोपचारें श्रीविठ्ठल पूजन, यथाशक्ति ब्राह्मणभोजनादि करून देशपांडे आपल्या ग्रामीं परतले. मात्र, अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावें असा त्यांना ध्यास लागला. - महारूद्ररावांचे चित्ती । तळमळ लागली दर्शन-प्रीति । केव्हां पाहीन श्रीगुरुदेवमूर्ति । स्वामीसमर्थ जगदीश

क्रमश:
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत


No comments:

Post a Comment