Apr 20, 2020

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय ७


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः । नृसिंहदेवा नमोस्तुते ॥१॥ गताध्यायीं हे वाचिले । पंडितागृही यति निघाले । लोकसमुदाय तोहि चाले । अति उत्कंठे पहावया ॥२॥ अल्पावकाशे ते सर्वही । जाहले उपस्थित पंडितागृहीं । आश्चर्य पावुनि जो तो पाही । अवचित कैसे श्री आले ॥३॥ शास्त्रीबुवा पुढे होती । अतिनम्रत्वे श्रींस नमिती । उच्चासनीं त्यां बैसविती । प्रेमादरे करोनिया ॥४॥ पुष्पमाला घालिती गळां । मस्तकी लावितो केशरी टिळा । धूप , कर्पूर त्या वेळा । लावुनी त्यांना ओवाळिती ॥५॥ नाना तर्‍हेची पक्व फळे । गोरसाचे रुपेरी पेले । तांबूल दक्षिणा अर्पुनी भले । अंगी लाविली केशरी उटी ॥६॥ सौभाग्य द्रव्ये अर्पिती स्त्रिया । फुले , अक्षता , तुळशी तयां । वाहुनी, महिला पडोनि पाया । सन्मानिती समर्थांसी ॥७॥ अवतीभवतीचे लोक जमले । दर्शन होतां सुखावले । ऐशा महात्म्या ना देखिले । सूर्यासम हे तेजस्वी ॥८॥ चाले मंजूळ वाद्य गजर । स्वामी समर्थ जयजयकार । शास्त्रीबुवा सोहळा फार । भक्तिभावे करिती ते ॥९॥ समर्थ पंडिता पुसती । कोठे तुमचे पिता असती । तदा मंडळी सर्व वदती । विद्यमान ते असती ना ॥१०॥ स्वामी म्हणती काय वदता । अंतर्गृही पिता असता । पालख असे नातवाकरिता । झोके तयासी कोण देई ॥११॥ लोक बघाया जाती आंत । बाळ खेळे पाळण्यांत । भुजंग देखतां झोके देत । लोक किंचाळले तदा ॥१२॥ अरे बापरे केवढा साप । अर्भका डसता होईल ताप । अहो हा कैंचा तुमचा बाप । मारा मारा ठार याते ॥१३॥ गलका ऐकोनी हसती स्वामी । संधी साधिली असे नामी । मारिला असता तयाते तुम्ही । जरी आम्ही असतो ना ॥१४॥ कासया मारिता त्या गरीबाते । मीच पाचारितो त्यातें । महाभुजंगा ये ये येथे । वृथा नातरी मरशील ॥१५॥ सरसर आला तो भुजंग । खडा राहिला झाडुनी अंग । शीळ वादनीं जाहला गुंग । स्वामीसन्मुख डोले तो ॥१६॥ सुवर्णापरी अंगकांती । विशाल काया सुदृढ अती । सळसळे जिव्हा चंचला ती । टाकुनी फूत्कार बोले जणू ॥१७॥समर्थ प्रेमे पुसती तया । सुटली नसे कां मोह-माया । अरे टपले तुज मारावया । पुत्र -पौत्रादि सर्वही ॥१८॥ बा फणिंद्रा सोडि हा छंद । तीव्र वासना घालिती बंध । मोह-माया तोडी संबंध । कासया वृथा मरतोसी ॥१९॥ जगीं नाही कुणाचे कुणी । लाभास्तव मानिती धनी । माता , पिता ,भगिनी । स्वार्थ साधण्य़ापुरते हे ॥२०॥ ऐक नागा तुज सांगतो । वासनात्याग करावा तो । तव उद्धारास्तव दावितो । मार्ग तोचि जो हितकारी ॥२१॥ फूत्कारें तो कांहीतरी । वदे , सुंदर फणा पसरी । यतिवर्य त्याचे मस्तकावरी । प्रेमे निज कर ठेविती ॥२२॥ नजिक सरोवर नारायण । तयामाजी करी गमन । योगियांच्या कुळीं जनन । प्राप्त होईल तुजला कीं ॥२३॥ समजले जणूं तया वचन । स्वामींपदीं फणा नमवुन । पुत्र -पौत्रादी विलोकुन । सरसर केले गमन तये ॥२४॥ जातं तेथुनी सर्पवीर । लोकनेत्रीं चालला पूर । परम ज्ञानी योगेश्वर । लीला यांची अपूर्व कीं ॥२५॥ यतिवर्य वदती त्या पंडिता । पाहिलात का तुमचा पिता । वासनाबले राहिला होता । भुजंग होऊनी जगतीं या ॥२६॥ होता तयाचा मुक्तियोग। यास्तव आला हा सुयोग । नातरी मरता , भोगिता भोग । वासना प्राबल्य असते असे ॥२७॥ पंडिते यतीचरण । याचिती असो क्षमा म्हणुन । आम्हास कोठले हे ज्ञान । मी तों असे अपंडित ॥२८॥ माझिया पितयाचा कळवळा । आपणा आला आजि या वेळा । या निमित्तें प्रसंग सगळा । आगळाची अनुभविला ॥२९॥ स्वामी थोर त्रिकालज्ञानी । जाणिली पित्याची सर्पयोनी । येऊनी मुक्ति दिधली झणीं । अनंत उपकार असती कीं ॥३०॥ याकारणें आपुले चरण । गृहीं लागले झालों पावन। अनन्य भावे तुम्हां शरण । माथीं घेतसें पदांबुज ॥३१॥ सर्वांस प्रेमें मुनी वदती । निरोप द्यावा जाण्याप्रती । ईश्वरभजनीं ठेवुनी मती । सुखे वर्तणे संसारी ॥३२॥ जावया उठतां समर्थ मूर्ती । लोक श्रींचा जयघोष करिती । भेटाल केव्हा दीनांप्रति । साश्रुनयनें पुसती तयां ॥३३॥ आम्हास जाणे सर्व प्रांतीं । नानाविध त्या स्थलांप्रती । मार्गदर्शना मुमुक्षांप्रति । नित्य नूतन हिंडत असू ॥३४॥ सुखे असावे निजस्थानीं । साधुसेवा सदा करुनी । सन्मार्गाने संसार करुनी । सार्थकी जिणें लावावे ॥३५॥ निरोपे घेतो असे म्हणुनी । त्रिविक्रम हे स्थान त्यजुनी । गमन केले कीं तयांनी । क्षणांत होती अदृश्य ॥३६॥ तेथून येती द्वारकापुरीं । परम श्रेष्ठ ती दिव्य नगरी । जिथे नांदले कीं श्रीहरी । स्वामी जाहले प्रकट तिथे ॥३७॥ असंख्य येती साधु -संत। कराया तेथे तप अनंत । भेटावया श्रीभगवंत । साधने करिती कठिण महा ॥३८॥ लोक नगरीचे भाग्यवंत । पुण्यवान नि श्रीमंत । भगवत्कथाश्रवणीं रत । सदाचरणी असती ते ॥३९॥ घराघरांतुनी कृष्णभक्ति । कृष्णकथामृत जन सेविती । तयांच्या पुण्या नसे मिती । ऐसे सारे कृष्णमय ॥४०॥ पाणिया जाता हो नर-नारी । गायनामाजी वर्णिती हरी । कृष्णप्रेमीं तयांची सरी । कुणासि येणे शक्य नसे ॥४१॥ जनसंघ अवघाचि कृष्णमय । तापत्रयांचे तयां न भय । जीवनामध्ये ते निर्भय । वृत्ति तयांची सुप्रसन्न ॥४२॥ कृष्णभक्ती ती अपार । द्वारकापुरीं तो प्रेमपूर । जन्म -मरणाच्या व्हावया पार । तपःसाधने जन करिती ॥४३॥ भुर्‍याबुवा नामें ख्यात । सान थोरां असे विदित । मंदिरामाजीं ध्यान करित । बैसले असती निजासनीं ॥४४॥ भगवंतदर्शना तळमळती । तदर्थ साधने घोर करिती । ज्वलंत वैराग्य मूर्ती ती । पाहतां जन नमिती तयां ॥४५॥ गोमती तीर्थावरी वसती । त्रिकाल समयीं स्नान करिती । संध्या-वंदन जपादि करीती । तपाचरणी मग्न सदा॥४६॥ अतिवृद्ध असती भुर्‍याबुवा । जो जो यात्री येईल गावा । घेति तयाचा मागोवा । करिती सेवा सद्भावे ॥४७॥ हव्योगाच्या मुद्रा साधने । अति कठोर तरी ते नेमाने । अनेकदां अन्न पाण्याविणे । करिती ऐसे परिश्रम ॥४८॥ समस्त जनांसी ते सेविती । मधुर बोलुनी तुष्ट करिती । अडले नाडले जाणती । साह्य करण्यासि तत्पर ॥४९॥ धर्मग्रंथ वाचती नाना । पुराण कीर्तनीं रमविती मना । वेदांतचर्चा केलियाविना । अन्नग्रहण ते करिती ना ॥५०॥ अमृताहुनी वाणी गोड । श्रवण करिता जन उद्दंड । सुधारती ते धरोनि चाड । ऐशी वाणी हितकारी ॥५१॥ असत्य बोलणे नसे ठावे । परम हितकर ज्ञान द्यावे । मूढ जनांसी उद्धरावे । ऐसे बुवा महापुरुष ॥५२॥ द्वारकास्थानीं लोकप्रिय । संत-सज्जनां आदरणीय । वृत्ति जयांची भगवंतमय । अधिकारी ते भुर्‍याबुवा ॥५३॥ भुर्‍याबुवा हे नामकरण । मिळाले तया या कारण । रोम सर्वांगी शुभ्र म्हणून । संबोधिती त्यां भुर्‍य़ाबुवा ॥५४॥ तप:श्चर्या अपूर्व केली । अतिवृद्धता वयां आली । ईश्वरमूर्ती नसे दिसली । ऐशा विचारे निराशले ॥५५॥ सगुण रुप ते पाहिल्याविण । व्यर्थ वाटे त्यां जीवन । ज्ञान-विज्ञान वांझ हे जाण । असे वाटुनी तळमळती ॥५६॥ भाग्योदयाची वेळ आली । भुर्‍याबुवा ती परि न कळली । नित्याप्रमाणे प्रातःकाळी मंदिरी ध्यानस्थ बसती ते ॥५७॥ ध्यानीं एकाग्रता येता । वेळ आली ते अवचिता । पाहती ते प्रकाशझोता । चित्त क्षणभर बावरले ॥५८॥प्रकाशीं पाहती दिव्य मूर्तीं । ऐकिली होती जिची कीर्ति । परम सुंदर दत्तमूर्ती । साक्षात् ‍ राहिली पुढे उभी ॥५९॥ शंख , चक्र , गदा , पद्म । त्रिमुखी दत्त मनोरम । केतकीपरी कांति परम । पाहता घालिती लोटांगणे ॥६०॥ क्षणांत बघती दत्तमूर्ती । क्षणांत मूर्ती कौपिनवती । आलट पालट असा बघती । गूढतेने गोंधळले ॥६१॥ भगवंतांसी ते प्रार्थित । कोण आपण हो निश्चित । प्रार्थना ऐकोनि कर ठेवित । मस्तकावरी दिव्य प्रभू ॥६२॥ डोळे उघडा , उठा , पहा । पाहती तों आश्चर्य महा । आजानुबाहू तेजाळ अहा । कौपिनधारी दिसती यती ॥६३॥ कलियुगीं या उग्र तप । अखंड केलात तीव्र जप । साधने केली ती अमाप । तेणे आम्ही संतुष्टलो ॥६४॥ नृसिंहदत्तात्रय हे नाम । त्रिलोकीं आम्हा नित्य काम । निर्दाळुनिया भव-भ्रम । उद्धार करितो भक्तांचा ॥६५॥ श्रींस बसविती निजासनी । चरण सेविती निज करांनी । गोरस फळे त्यां अर्पुनी । अत्यादरे सन्मानिती ॥६६॥ झालांत आता तुम्ही वृद्ध । कठोर साधनीं न व्हा बद्ध । नाम-चिंतन नित्य सिद्ध । मोक्षप्राप्ती व्हावया ॥६७॥ प्रसन्न मनें सद्‌गुरुराय । सांगती त्यां वेदांत गुह्य । आत्मरुपा जाणण्या साह्य । निज सामर्थ्ये गुरु देती ॥६८॥ दास्यवृत्तिने बुवा वदले । अलभ्य आपुले चरण दिसले । अंगी पाहिजे कीं बाणले । अद्वैत ज्ञान ते तुमच्या कृपें ॥६९॥ ‘ तत्त्वमसी ’ वाक्यार्थ ज्ञान । स्वामी करिती त्या प्रदान । ब्रह्मानंद वाटला पूर्ण । बुवा वदती धन्य झालो ॥७०॥ आनंदाश्रू घळघळा गळती । रोमांच अंगी थरारती । कंठ जाहला रुद्ध अति । शब्द मुखांतुनी उमटेना । ॥७१॥ भुर्‍याबुवाची प्रेमवृत्ती । पाहतां हर्षले जगत्पती । अखंड समाधी त्यां दाविती । माथी ठेवुनी कर तयांच्या ॥७२॥ दिव्य स्पर्श तो होतां तयां । देहभानही गेले लया । जीवन्मुक्तस्थितीसी या । बुवा सद‌गुरुकृपें पावलें ॥७३॥ खवळला सागर व्हावा शांत । बुवा बैसले अति निवांत । सर्व वृत्ती निमाल्या आत । आनंद समाधी लागे त्यां ॥७४॥ बुवांचे पाठी कर फिरविती । समाधी तत्क्षणी उतरे ती । भानावरी बुवा येती । कवटाळिले श्रीचरणां ॥७५॥ आनंदसागरीं मी असतां । जागृत केले मजसी वृथा । नको जीवन भोगण्या आता । अखंड समाधी मज द्यावी ॥७६॥ कार्यपूर्ती व्हावयासी । वेळ लागते यावयासी । हेच तत्व कीं अनुभवासी । ऐशा प्रसंगे कीं येई ॥७७॥ इतुक्यामाजीं पसरले वृत्त । मंदिरीं कोणी येत संत । आजानुबाहू कौपीनवंत । तेजे गभस्ती गमती जणूं ॥७८॥ मंदिरी गर्दी तो उसळली । मुंगीस जाया वाट नुरली । नृसिंहस्वामी मूर्ति दिसली । जनांसि अत्यंत तेजस्वी ॥७९॥ बुवा सांगती कर जोडूनी । साक्षात दत्तनृसिंहमुनी । प्रकट झाले द्वारकाभुवनीं । चरण वंदुनी कृतार्थ व्हा ॥८०॥ बसविती तयां उच्चासनी । सान्निध बुवा कर जोडुनी । अबिर-बुक्काही उधळुनी । प्रेमानंदे पूजिती त्यां ॥८१॥ आरती , स्तोत्रें , पदे गाती । भक्ति पाहतां तुष्ट होती । संत सेवेची आसक्ति । तारील तुम्हां सुनिश्चित ॥८२॥ भोंवती दाटता भक्तजन । आला मंदिरी एक जण । काठी टेकित समोरुन । अंध येई हळूहळू ॥८३॥ भुर्‍याबुवा होती पुढे । धरोनि हाती आणिती कडे । स्वामी चरणारविंदी पडे । स्वामींस प्रार्थी कळवळोनी ॥८४॥देवा , नाथा तुम्ही दयाळ । रुप बघाया मनिं तळमळ । परि न माझे नेत्र सबळ । जन्मांध मी महापापी ॥८५॥ सूर्यपूजा कीं उधळिली । सांजवात कीं मी विझविली । महापातके काय मी केली । यास्तव जाहलो गर्भांध ॥८६॥ मूर्तिमंत मी पापी , करंटा । अन्यांस देणे दोष खोटा । कर्मदोष हा माझाचि वाटा । भोगणे यास्तव भाग असे ॥८७॥ दया कराहो, श्रीदयाळा । पहावे वाटे रुप डोळा । नेत्री पहावा हा सोहळा । ऐसे वाटते मज दीना ॥८८॥ करुण प्रार्थना येता कानीं । अंतरीं कळवळे चक्रपाणी । तयाते आणा सन्निध कुणी । नेति संन्निध भुर्‍याबुवा ॥८९॥ श्रीचरणांसी आलंगिती । करुणारवे आक्रंदती । दाखवा मजला अंधाप्रती । निजरुप देवा साजिरे ते ॥९०॥ कुरवाळिले त्या अंधाप्रती । ऐसा न करणे शोक अति । प्रेमे वदोनी, कर फिरविती । नेत्रांवरोनी तयाच्या कीं ॥९१॥ तोचि घडला चमत्कार । लोक पाहती खरोखर । नेत्र उघडता चराचर । दिसो लागले सर्वही ॥९२॥ नेत्रकमळे ती उमलली । दृष्टीपुढे धरा फुलली । दिव्य विभुती तया दिसली । श्रीस्वामीही प्रत्यक्ष ॥९३॥ चक्षूंसि दिसताच यति मूर्ती । परमानंद त्या होय अती । अपूर्व सत्ता तुम्हां हाती।आपण प्रत्यक्ष परमेश्वर ॥९४॥ घळाघळा वाहे अश्रुपूर । घेतली लोळण चरणांवर । अनंता, अनंत हे उपकार । अनंत जन्मीं फिटते ना ॥९५॥ ऐसे बोलोनी नम्र झाले । दुजे भक्त तों पुढे आले । बघता तयासी यती वदले । यावे रावजी यावेळीं ॥९६॥ अचुक नामे पुकारिता । वाटे तयासि आश्चर्यता । ओळख आमुची मुळी नसता । नामे कैसे पाचारिती ॥९७॥ क्षणांत जाहला मुखस्तंभ । ‘आ ’ वासुनी जाहला खांब । कासया बसता असे लांब । बसावे आमुच्या संन्निध हो ॥९८॥ भुर्‍याबुवांस वदती स्वामी । ओळख यांची आहे जुनी । रावजी गेलेत विस्मरुनी । सांगतो आम्ही सुनिश्चित ॥९९॥ स्वामी आग्रहे रावजी बसती । गोंधळली परि मनःस्थिती । जाणुनी तया यती वदती । सर्व सांगतो ऐकावे ॥१००॥ राव तुम्हा नसे स्मरण । काशीक्षेत्रीं बांधुनी सदन । वसत होता वैद्यकी करुन । मातें सवे आपुल्या ॥१०१॥ माता होय रुग्ण । उपचार केलेति संपूर्ण । वाटतां माता सोडील प्राण । शोकाकुल जाहला तदा ॥१०२॥ मातेचे नाम रखुमाबाई । वात ज्वरे शुद्धी जाई । स्थिती अत्यंत कठिण होई । केलांत तदा आकांत ॥१०३॥ एक संन्यासी तदा येई । अवलोकुनी तयां दया येई । करांगुलीतुनी तीर्थ देई । माते मुखीं , रावांच्या ॥१०४॥ नेत्र उघडूनी मज पाहिले । आम्ही स्वहस्ते तिज उठविले । पाठीस जेव्हा गोजारिले । माय सावध जाहली ॥१०५॥ मृत्युवेळ ती तदा टळली । मरता मरता माय जगली । यांच्या हर्षास सीमा नुरली । ह्रदयीं धरिले पद आमुचे ॥१०६॥ पत्नी अहल्या , कन्यका काशी । वसतिस्थान सदैव काशी । मृत पावली सानुली काशी । दिधली आम्ही तिज सद्गती ॥१०७॥ रावजी सच्छील अत्यंत । जगदंबेचे महाभक्त । जपानुष्ठानीं अति आसक्त । जाणतो यांच्या सात पिढ्या ॥१०८॥ ऐकतां सर्व हा वृत्तांत्त । रावजी नेत्री अश्रुपात । साष्टांग करिती प्रणिपात । योगेश्वरांसी अत्यादरे ॥१०९॥ विस्मरणाची असावी क्षमा । मज मतिमंदा दयारामा । आशीर्वाद आपुले आम्हा । समर्थ असती रक्षावया ॥११०॥ करणे नलगे व्यर्थ चिंता । तिघेही तुमचे पुत्र आता । संपादितील ते श्रेष्ठता । ज्ञान-वैराग्ये जगतीं ॥१११॥ रावास दिले आशिर्वचन । वर्णिले गोमती तीर्थगहन । उपदेशुनी सोडिता सदन । जयजयकार निनादला ॥११२॥ पुढील अध्यायीं सुरस कथा । सिद्ध असणे ऐकण्या आता । ऐकता वाटेल सार्थकता । निजमानसी सुनिश्चित ॥११३॥ इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपें सर्वथा ॥११४॥

॥ श्रीस्वामीसमर्थ की जय ॥

सौजन्य : https://www.transliteral.org/


Apr 17, 2020

नवनाथ भक्तिसार आणि कथासार - अध्याय ४०



॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीमातापितृभ्यां नमः ॥ ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य जालंदरनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य अडबंगनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य चौरंगीनाथाय नमः ॥  ॐ चैतन्य रेवणनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य भर्तरीनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य गहिनीनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य नवनाथाय नमः ॥ जयजयाजी पंढरीनाथा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ पुढें ग्रंथा बोलवीं ॥१॥ मागिलें अध्यायीं रसाळ वचन ॥ तुवां बोलविलें कृपेंकरुन ॥ स्वर्गी चरपटीनाथें जाऊन ॥ इंद्राचा गर्व हरिलासे ॥२॥ हरिहरांची जिंकूनि कोटी ॥ पुढे लोभाची भेटी ॥ गमनकळा नारदहोटीं ॥ प्राप्त झाली महाराजा ॥३॥उपरी मणिकर्णिकेचें करुनि स्नान ॥ पुढें पातले पाताळभुवन ॥ घेवूनि बळीचा गौरव मान ॥ वामनातें भेटला ॥४॥भोगावतीची करुनि आंघोळी ॥ पुनः पातला भूमंडळीं ॥ यावरी कथा पुढें कल्होळीं ॥ नवरसातें वाढी कां ॥५॥ असो आतां रमारमण ॥ ग्रंथाक्षरीं बैसला येवून ॥ तरी पुढें श्रोतीं सावधान ॥ कथारस घ्यावा कीं ॥६॥इंद्र चरपटीनें जिंकला ॥ वैभवें मशकतुल्य केला ॥ तरी तो विस्मयवान खोंचला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥मग जो गुरु वाचस्पती ॥ परम ज्ञाता सर्वमूर्ती ॥ सहस्त्रनयन तयाप्रती ॥ घेवूनियां बैसलासे ॥८॥ देवमंडळांत सहस्त्रनयन ॥ घेवूनि बैसलासे कनकासन ॥ जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण ॥ अति तेजें मिरवला ॥९॥ऐशा रीती पाकशासन ॥ बैसला सेवूनि सभास्थान ॥ मग बृहस्पती विस्मयरत्न ॥ चरपटप्रताप सांगतसें ॥१०॥अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥ परी अर्कासमान थोर प्रताप ॥ हरिहरादि करुनि लोप ॥ स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥ देवदानव झाले निर्बळ ॥ नाथपंथीं हें महाबळ ॥ आतळलें कैसें कळेना ॥१२॥तरी यातें करुनि उपाय ॥ साध्य करावी इतुकी ठेव ॥ या कर्मासी कोण लाघव ॥ स्वीकारावें महाराजा ॥१३॥कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥ दास्य करावें मनोधर्मे ॥ तोषवूनि सर्व कर्म ॥ महीवरी मिरवावें ॥१४॥असो यापरी यत्न करुन ॥ भेट घ्यावी त्या गंवसून ॥ परी ते जोगी तीव्रपणें ॥ वर्तताती सर्वदा ॥१५॥तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥ अर्थ वदावा तयासी निकट ॥ परी काय चाड आमुची अलोट ॥ कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥तरी भिडेचें उपजेपण ॥ उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥ तयामागें रानोरान ॥ अपार मही हिंडावी ॥१७॥तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपानव्हाळी ॥ अमरपुरीची देवमंडळी ॥ तेजोयुक्त होईल ॥१८॥ म्हणाल ऐसें कासयानें ॥ हा विपर्यास येईल घडोन ॥ तरी महीं होतो पुण्यपावन ॥ आसन माझें घेतसे ॥१९॥तरी मी येथें सावधान ॥ करुनि रक्षितों आपुलें आसन ॥ तस्मात् अमरावती सोडून ॥ जाणें नाहीं मजलागीं ॥२०॥ऐसें बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचस्पती ॥ म्हणे महाराजा नाथाप्रती ॥ येथेंचि आणावे महायत्नें ॥२१॥तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥ यज्ञ करावा सोमभासा ॥ त्या निमित्तें नाथ राजसा ॥ घेवोनि यावें स्वर्गासी ॥२२॥ मग तो येथें आल्यापाठी ॥ दावूनि भक्तीची अपार कोटी ॥ मोह उपजवोनि नाथापोटीं ॥ कार्य साधूनि घेइजे ॥२३॥ऐसें बोलतां तपोद्विज ॥ परम तोषला अमरराज ॥ उपरी म्हणे महाराज ॥ कोणा पाठवूं पाचाराया ॥२४॥यावरी बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥ मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥ उपरिचर नामें मिरवतसे ॥२५॥उपरिचर जातां महीतळवटीं ॥ मच्छिंद्राची घेईल भेटी ॥ सांगूनि त्यातें कार्य शेवटीं ॥ मग मच्छिंद्र आम्हां बोधील ॥२६॥तरी त्यातें पाचारुन ॥ कार्ययज्ञाचा वदूनि काम ॥ विमानयानीं रुढ करुन ॥ पाठवावा महाराजा ॥२७॥यापरी मच्छिंद्रनाथ ॥ आला असतां अमरपुरींत ॥ गौरवोनि तुवां त्यातें ॥ तुष्टचित्तीं मिरवावा ॥२८॥तरी शक्ति तव सरितालोट ॥ मच्छिंद्र उदधिपोट ॥ संगमिता पात्र अलोट ॥ प्रेमतोय भरलें असे ॥२९॥तरी सुमुखाचें पडतां जळ ॥ कार्यशुक्तिकामुक्ताफळ ॥ तूतें ओपील तपोबळ ॥ नवनाथ आणोनियां ॥३०॥मग तो मुक्त अविंधविधी ॥ लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधीं ॥ मग तें रत्न कर्णविधीं ॥ स्वीकारी कां महाराजा ॥३१॥ ऐसे ऐकूनि गुरुवचन ॥ परम तोषला सहस्त्रनयन ॥ मग रथीं मातली पाठवोन ॥ उपरिचरा पाचारी ॥३२॥ उपरिचर येतां वदे त्यातें ॥ म्हणे महाराजा कामना मनांत ॥ उदेली करुं सोममखातें ॥ पूर्ण करीं आतां तूं ॥३३॥तरी विमानयानीं करोनि आरोहण ॥ जाऊनियां मच्छिंद्रनंदन ॥ उपरी त्यातें सवें घेऊन ॥ जावें नवनाथमेळीं ॥३४॥मग ते आर्या भावार्थित ॥ मेळवोनि आणी अमरपुरींत ॥ सोममखाचें सकळ कृत्य ॥ तया हस्तें संपादूं ॥३५॥अवश्य म्हणे वसुनाथ ॥ तत्काळ विमानयानीं बैसत ॥ बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ ॥ लक्षूनियां पातला ॥३६॥तों गोरक्ष धर्मनाथ ॥ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ॥ बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ ॥ तीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे ॥३७॥ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें ॥ अवचटपणीं देखिला ताते ॥ मग उठोनि मौळी चरणातें ॥ समर्पीत महाराजा ॥३८॥मग नाथ वसु भेटून ॥ बैसला सकळांमध्यें वेष्टून ॥ म्लानवाणीं कार्यरत्न ॥ अमरांचें सांगतसे ॥३९॥ म्हणे महाराज हो शक्रापोटीं ॥ अर्थ उदेला मखकोटी ॥ तरी आपण नवही जेठी ॥ साह्य व्हावें कार्यार्था ॥४०॥बहुतांपरी करुनि भाषण ॥ सर्वांचे तुष्ट केलें मन ॥ उपरी मच्छिंद्रातें बोधून ॥ अवश्यपणीं वदविलें ॥४१॥मग जालंदर कानिफा चौरंगी ॥ मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी ॥ गोपीचंद रायादि अन्य जोगी ॥ आरुढ झाले विमानीं ॥४२॥गौडबंगाली हेलापट्टण ॥ प्रविष्ट झालें तैं विमान ॥ राव गोपीचंद मातेसी भेटून ॥ समागमें घेतली ॥४३॥उपरी विमानयानी होऊन ॥ पहाते झाले वडवालग्राम तेथून ॥ तेथें वटसिद्धनागनाथ पाहून ॥ आरुढ केला विमानीं ॥४४॥तेथूनि भर्तरीचें करुनि काम ॥ विमान चालविती इच्छिल्या व्योमें ॥ तों गौतमतीरीं नाथ उत्तम ॥ जती भर्तरी अवतरला असे ॥४५॥यापरी तीर्थ करितां महीपाठीं ॥ महासिद्ध जो नाथ चरपटी ॥ अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं ॥ सवें घेतला महाराजा ॥४६॥तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानें ॥ पहाते झाले विमानयानें ॥ तेथें रेवणसिद्ध बोधून ॥ आरुढ केला विमानीं ॥४७॥ असो नवनाथ परिवारासहित ॥ ते विमानयानीं झाले स्थित ॥ चौर्‍यायशीं सिद्धांसमवेत ॥ अमरपुरीं पातले ॥४८॥ विमान येतां ग्रामद्वारी ॥ सामोरा आला वृत्रारी ॥ परम गौरवोनि वागुत्तरीं ॥ चरणांवरी लोटला ॥४९॥सकळां करोनि नमनानमन ॥ नेत सदना सहस्त्रनयन ॥ आपुल्या आसनीं बैसवोन ॥ षोडशोपचारें पूजिले ॥५०॥नवनाथां पाहोनि सकळ अमर ॥ मनीं संतोषले अपार ॥ तेज पाहोनियां गंभीर ॥ उभे तेथें ठाकलें ॥५१॥मग हवनकृत्य मनकामना ॥ वदतां झाला सकळ जनां ॥ म्हणे महाराजा कवणे स्थाना ॥ सिद्ध अर्थ अर्थावा ॥५२॥मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणती सुरवरपाळा ऐक मात ॥ सिंहलद्वीपीं स्थान अदभुत ॥ यज्ञ तेथें करावा ॥५३॥अटव्य कानन आहे तुमचें ॥ शीतळ छायाभरित जळाचें ॥ तेथें न्यून साहित्याचें ॥ पडणार नाहीं कांहींच ॥५४॥ उपरिचर वसु गंधर्व घेऊन ॥ पाहत झालें अटव्यवन ॥ तेथें यज्ञसाहित्य आहुती करुन ॥ यज्ञ आरंभ मांडिला ॥५५॥दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन ॥ मंत्रप्रयोगीं बृहस्पती आपण ॥ यज्ञ आहुती नवही जण ॥ स्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती ॥५६॥परी किलोतळेचे सीमे आंत ॥ अटव्यवन होते अदभुत ॥ यज्ञ होतां मीननाथ ॥ मच्छिंद्रातें आठवला ॥५७॥मग पाचारोनि उपरिचर तात ॥ मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ ॥ सिंहलद्वीपीं मीननाथ ॥ कवण ग्रामीं ठेविला ॥५८॥येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत ॥ अटव्यवन हें विख्यात विराजित ॥ तरी कीलोतळेसहित मीननाथ ॥ पाचारितों आतांचि ॥५९॥मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन ॥ मीननाथासह कीलोतळारत्न ॥ पाचारुनि एक क्षण ॥ भेटी केली उभयतां ॥६०॥परम स्नेहानें क्षण एक कांहीं ॥ वाहवले मोहप्रवाही ॥ उपरी दारा सुत तया ठायीं ॥ मच्छिंद्रानें ठेविले ॥६१॥चौरंगी आणि अडबंगीनाथ ॥ मिरवीत बैसविले समुदायांत ॥ यज्ञआहुती तयांचे हस्तें ॥ स्वीकारीत महाराजा ॥६२॥दहा नाथ यज्ञआहुती ॥ प्रवाहीं चाले मच्छिंद्रजती ॥ पुत्रमोह धरुनि चित्तीं ॥ अभ्यासातें बैसविला ॥६३॥अभ्यास करितां मीननाथ ॥ वाचस्पती शक्रासी बोलत ॥ म्हणे महाराजा यज्ञार्थ ॥ तुम्ही बैसतां सरेना ॥६४॥तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु ॥ बैसवोनि पहावा अर्थ सुरसु ॥ ऐसे बोलतां प्राज्ञ विशेषु ॥ अमरपाळ समजला ॥६५॥मग हातींचें सोडूनि यज्ञकंकण ॥ वसुहाती केलें स्थापन ॥ मग न्यूनपणें बहुतां प्रार्थून ॥ निजदृष्टीं विलोकी ॥६६॥सर्व पदार्थ आणवोनि आपण ॥ अंगें झिजवी शचीरमण ॥ उदकपात्र सांगतां जाण ॥ सिद्ध होय पुढारी ॥६७॥खाद्य भोज्य षड्रस अन्न ॥ करें आणीतसे पात्रीं वाढून ॥ शेवटीं शिणले तयाचे चरण ॥ निजहस्तीं चुरीतसे ॥६८॥ऐसी सेवा करितां संपन्न ॥ तुष्ट होतसे जतीचे मन ॥ हदयीं भाविती यावरुन ॥ प्राणसांडी करावी ॥६९॥येरीकडे मीननाथ- ॥ -सुतासी विद्या अभ्यासीत ॥ तो समय जाणोनि सापेक्ष ॥ इंद्र मयूरवेषें नटलासे ॥७०॥निकटतरुशाखेवरती ॥ विद्या अभ्यासीत गुप्तपंथीं ॥ तों अकस्मात वातास्त्र जपती ॥ वाताकर्षण लाधलें ॥७१॥दैवें सर्व तपराहटी ॥ सकळ लाधली हातवटी ॥ उपरी वाताकर्षणविद्या पाठीं ॥ वातप्रेरक अस्त्र लाधलें ॥७२॥ऐसी विद्या होतां सघन ॥ परम हरुषला सहस्त्रनयन ॥ परी एक संवत्सर होतां यज्ञ ॥ अभ्यासीत तंववरी ॥७३॥असो हवनअर्पण आहुती ॥ मख पावूनि पूर्ण समाप्ती ॥ मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती ॥ अग्रपूजे बैसला ॥७४॥मग पूजा करोनि सांगोपांग ॥ उपरी त्रिदर्शनाथें पूजिलें अंग ॥ वस्त्रभूषणें चांग ॥ देऊनिया गौरविलें ॥७५॥सकळां बैसवोनि कनकासनीं ॥ उभा राहिला जोडीनि पाणी ॥ सर्वांसी वदे म्लानवदनीं ॥ नाथ वचन माझें परिसा ॥७६॥मातें घडला एक अन्याय ॥ परी आपण सहन करा समुदाय ॥ म्यां मयूरवेष धरुनि मायें ॥ अभ्यासिलें विद्येतें ॥७७॥मीनजतीचा प्रताप गहन ॥ मज सांपडलें विद्यारत्न ॥ तरी आपुला वर त्यातें देऊन ॥ सनाथपणीं मिरवावें ॥७८॥ऐसें बोलतां अमरनाथ ॥ सर्वासी समजलें तस्करीकृत्य ॥ मग ते कोपोनि परम चित्तांत ॥ शापवचन बोलताती ॥७१॥म्हणती इंद्रा तूं कृत्रिम ॥ आणिलें ठकवावया कारण ॥ तरी चोरुनि घेतलें विद्यारत्न ॥ निष्फळ होईल तुजलागीं ॥८०॥ऐसें बोलता सकळ जती ॥ मग उपरिचर वसु वाचस्पती ॥ गौरवोनि अपार युक्तीं ॥ तुष्ट केलें चित्तांत ॥८१॥ म्हणती महाराजा शापमोचन ॥ पुढें बोला कांहीं वचन ॥ मग ते बोलती तयाकारण ॥ तप आचरावें इंद्रानें ॥८२॥द्वादश वर्षे तप आचरितां ॥ विद्या फळेल तत्त्वतां ॥ परी नाथपंथी छळ न होतां ॥ पदरावरी पडेल ॥८३॥ऐसें बोलोनि सकळ जती ॥ विमानारुढ झाले समस्ती ॥ खाली उतरुनि महीवरती ॥ नाना तीर्थे भ्रमताती ॥८४॥ऐसें भ्रमण करितां जती ॥ तीर्थे झालीं अपरिमिती ॥ याउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजती ॥ पुसोनिया चालिला ॥८५॥ मग तें कीलोतळेचें नमन ॥ अवर्ण्य आहे अनुष्ठान ॥ नेत्रीं प्रेमबिंदु आणोन ॥ बोळविलें नाथासी ॥८६॥सवें घेऊनि मीननाथ ॥ विमानयानी झाले समस्त ॥ खालीं उतरुनि मृत्युमहींत ॥ नाना तीर्थे पाहिलीं ॥८७॥हेलापट्टणीं मैनावती ॥ पोहोंचवोनि तीर्थे हिंडती ॥ तेव्हां मीननाथें तीर्थक्षितीं ॥ सिद्ध तीन निर्मिले ॥८८॥तयांचें सांगितलें पूर्वी नाम ॥ आतां सांगावया नाहीं काम ॥ असो सिद्धकटकासह उत्तम ॥ तीर्थे करीत भ्रमताती ॥८९॥येरीकडे अमरनाथ ॥ लक्षूनियां सह्याद्रिपर्वत ॥ द्वादश वरुषें तप निश्चित ॥ तीव्रपणी आचरला ॥९०॥परी तें आचरितां तीव्रपणीं ॥ मंत्रप्रयोगें सोडी पाणी ॥ तेणें सरिता लोट लोटोनी ॥ भीमरथीतें भेटली ॥९१॥तें मणिकर्णिकेचे जीवन ॥ आणिलें होतें कमंडलू भरोन ॥ परी इंद्रहस्तीं प्रवाही होऊन ॥ इंद्रायणीं पडियेलें ॥९२॥ऐसें तप करोन ॥ स्वस्थानासी इंद्र जाऊन ॥ उपरी नवनाथ करितां तीर्थाटन ॥ बहुत दिवस लोटले ॥९३॥शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भगिरीं नांदतसे ॥९५॥ त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवाळग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥विटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥गोपीचंद आणि धर्मनाथ ॥ ते स्वसामर्थ्येंं गेले वैकुंठांत ॥ विमान पाठवोनि मैनावतीतें ॥ घेऊनि विष्णु गेलासे ॥९९॥ पुढें चौर्‍यायशीं सिद्धांपासून ॥ नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्यानें ॥ येथूनि चरित्र झालें संपूर्ण ॥ सर्व नाथांचें महाराजा ॥१००॥तरी आतां सांगतों मुळापासून ॥ कथा वर्तली कवण ॥ प्रथमाध्यायीं गणपतिस्तवन ॥ सुंदरपणीं मिरवले ॥१॥उपरी सांगूनि रेतक्षिती ॥ आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती ॥ तो बद्रिकाश्रमाप्रती ॥ तपालागीं बैसला ॥२॥या प्रसंगाचें श्रवण पठण ॥ नित्य करितां भावेंकरुन ॥ तरी समंधबाधा घरांतून ॥ जाईल त्रासुनी  महाराजा ॥३॥द्वितीय अध्यायीं अत्रिनंदन ॥ विद्यार्णव केला अनुग्रह देऊन ॥ उपरी नागपत्रीं अश्वत्थी जाऊन ॥ सिद्धयर्थकळा साधिली ॥४॥तो अध्याय करितां नित्य पठण ॥ अपार धन लाभेल संसारी जाण ॥ विजयलक्ष्मी पाठीं बैसून ॥ करील हरण दरिद्र ॥५॥तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुती ॥ युद्धा प्रवर्तले श्वेतक्षितीं ॥ युद्ध करुनि उपरांतीं ॥ ऐक्यचित्त झालें असे ॥६॥याचें झालिया पठण ॥ शत्रु होतील क्षीण ॥ मुष्टिविद्यासाधन ॥ तया होत सर्वथा ॥७॥मुष्टिबाधा झाली असोन ॥ अपकार होईल तियेने ॥ मुर्तिमंत मारुती करोनि रक्षण ॥ राहे तया घरीं सर्वदा ॥८॥चतुर्थ अध्यायीं वदली कथा ॥ अष्टभैरव चामुंडा समस्ता ॥ रणीं जिंकूनि वसुसुता ॥ ज्वालामुखी भेटली ॥९॥तो अध्याय नित्य पठण करितां ॥ चुकेल कपटाची बंधनव्यथा ॥ शत्रु पराभवोनि सर्वथा ॥ निरंतर शांति मिरवेल ॥११०॥ पांचवे अध्यायींचे कथन ॥ भूतें घेतलीं प्रसन्न करुन ॥ अष्टपती जिंकून ॥ विजयी झाला मच्छिंद्र ॥११॥ती कथा नित्य करिता पठण ॥ भूतसंचार नोहे त्या घराकारण ॥ आले असतां जाती सोडोन ॥ परम त्रासेंकरोनियां ॥१२॥सहाव्या अध्यायांत ॥ शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ ॥ युद्ध करुनि प्रसन्नचित्त ॥ वश्य झालीं अस्त्रें ती ॥१३॥तो अध्याय नित्य करितां पठण ॥ शत्रूलागीं पडेल मोहन ॥ निष्कपट तो करुनि मन ॥ किंकर होईल द्वारींचा ॥१४॥ सातव्या अध्यायीं अपूर्व कथा ॥ जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता ॥ उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा ॥ इच्छेसमान झालीसे ॥१५॥ती कथा नित्य गातां ऐकतां ॥ लिप्त नोहे चौर्‍यायशींची व्यथा ॥ झाली असेल मिटेल सर्वथा ॥ चिंता व्यथा हरतील ॥१६॥जखीणभयापासुनी ॥ त्वरित मुक्त होईल जनीं ॥ एक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनी ॥ फलप्राप्ति घेइजे ॥१७॥आठवे  अध्यायीं सकळ कथन ॥ पाशुपतरायासी रामदर्शन ॥ रणीं मित्रराज जिंकोन ॥ केला प्रसन्न विद्येसीं ॥१८॥तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ आपुला सखा देशावरता ॥ तो गृहासी येऊन भेटेल तत्त्वतां ॥ चिंताव्यथा हरेल कीं ॥१९॥नववे अध्यायीं कथन ॥ गोरक्षाचा होऊनि जन्म ॥ उपरी सेवूनि बद्रिकाश्रम ॥ विद्यार्णव झालासें ॥१२०॥तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ साधेल विद्या इच्छिल्या अर्था ॥ ब्रह्मज्ञान रसायन कविता ॥ चवदा विद्या करोनि राहे ॥२१॥दशम अध्यायीचें कथन ॥ स्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदन ॥ अंजनीसुतअर्थी पाठवोन ॥ अर्थ किलोतळेचे पुरविले ॥२२॥एकांतीं बैसूनि अनुष्ठान ॥ संजीवनी पाठ करी गौरनंदन ॥ गहिनीनाथाचा झाला जन्म ॥ कर्दमपुतळा करितां तो ॥२३॥तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रियांचे दोष जातील कपटपण ॥ मुलें वाचतील होतां जाण ॥ जगीं संतती मिरवेल ॥२४॥उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत ॥ उदय पावला जालिंदरनाथ ॥ तो एकादश अध्याय पठण करितां नित्य ॥ अग्निपीडा होईना ॥२५॥आणि जयाचे धवळारांत ॥ पूर्वीचा कांहीं दोष असत ॥ तो जाऊनि संपत्तिविशेषातें ॥ संततीसह भोगील कीं ॥२६॥ बाराव्यांत हें कथन ॥ जालिंदरें गुरु केला अत्रिनंदन ॥ उपरी कानिफाचा होऊनि जन्म ॥ विटंबिले देवांसी ॥२७॥ तो अध्याय करितां पठण ॥ क्षोभ न पावे कोणी देवता जाण ॥ क्षोभित असल्या होतील शमन ॥ सुख सर्व त्याचि देती ॥२८॥तेराव्या अध्यायांत ॥ मैनावतीतें प्रसन्न नाथ ॥ होऊनि केलें अचल सनाथ ॥ ब्रह्मरुपीं आगळी ॥२९॥तरी तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रीहत्येचें दोष सघन ॥ त्यांचे होऊनि सकळ निरसन ॥ उद्धरील पूर्वजां ॥१३०॥चतुर्दश अध्यायीं कथन ॥ गर्तेत जालिंदर गोपीचंदानें ॥ स्त्रीबोलें घातले नेऊन ॥ गुप्त निशीमाझारी ॥३१॥ तो अध्याय पठण करितां ॥ असेल बंध कारागृहीं व्यथा ॥ तरी त्याची होईल मुक्तता ॥ निर्दोष जनीं वर्तेल ॥३२॥पंचदशांत सुढाळ कथन ॥ कानिफामारुतीचे युद्धकंदन ॥ उपरी स्त्रीराज्यांत जाऊन ॥ आतिथ्य पूर्ण भोगिलें ॥३३॥तो अध्याय गातां ऐकता नित्य ॥ घरचे दारचे कलह नित्यकृत्य ॥ शांति पावोनि सर्व सुखांत ॥ निर्भयपणें नांदेल ॥३४॥सोळावे अध्यायांत ॥ कानिफा भेटला गोपीचंदातें ॥ तरी तो अध्याय वाचितां नित्यानित्य ॥ दुःस्वप्नातें नाशील ॥३५॥ सप्तदश अध्यायीं कथन ॥ जालिंदर काढिला गर्तेतून ॥ उपरी नाथाची दीक्षा घेऊन ॥ गोपीचंदें अर्चिला ॥३६॥तोचि अध्याय पठण करितां ॥ योग साधेल आचरतां ॥ दुष्टबुद्धि जाईल सर्वथा ॥ सुपंथपंथा लागेल तो ॥३७॥अष्टादश अध्यायीं कथन ॥ बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन ॥ तपःपूर्ण भगिनी उठवोन ॥ तीव्रपणीं आचरला ॥३८॥तो अध्याय नित्य पठण करितां ॥ ब्रह्महत्या नासेल सर्वथा ॥ पूर्वज कुंभीपाकीं असतां ॥ सुटका होईल तयांची ॥३९॥ एकोणिसाव्यात गोरक्षाकारण ॥ भेटला मारुति श्रीरामप्रीतीने ॥ तरी तो अध्याय करितां पठण ॥ तया मोक्षार्थ साधेल कां ॥१४०॥ विसाव्यात अदभुत कथन ॥ श्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारण ॥ गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन ॥ स्नेहसंपन्न जाहला ॥४१॥ तो अध्याय पठण करितां गोड ॥ लागलें असेल अत्यंत वेड ॥ तरी ती चेष्टा जाऊनि धड ॥ होऊनि प्रपंच आचरेल ॥४२॥एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून ॥ मच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदनें ॥ नानापरी बोधूनि मन ॥ दुष्टकर्मातें निवटिलें ॥४३॥तो नित्य अध्याय पठण करितां ॥ नासेल बहुजन्माची गोहत्या ॥ निष्कलंक होऊनि चित्ता ॥ तपोलोकीं मिरवेल ॥४४॥बाविसाव्यांत सोरटीग्रामी ॥ गोरक्षें मीननाथा मारोनी ॥ पुन्हां उठविला मंत्रेंकरोनी ॥ मच्छिंद्रमोहेंकरुनियां ॥४५॥तरी तो अध्याय नित्य पठण करितां ॥ पुत्रांर्थिया पुत्र तत्त्वतां ॥ तो होईल विद्यावंत ॥ विद्वज्जना मान्य कीं ॥४६॥तेविसाव्यांत रसाळ कथन ॥ मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन ॥ सुवर्णविटेकरितां सुवर्ण ॥ गर्भगिरि केला असे ॥४७॥आणिक केला तेथें उत्सव ॥ तरी तो अध्याय पठण नित्य भावे ॥ करितां घरीं सुवर्ण नव ॥ अखंड राहे भरोनि ॥४८॥ चोविसाव्यांत भर्तरीनाथ ॥ जन्मोनि आला अवंतिकेंत ॥ तरी तो अध्याय पठण करितां नित्य ॥ बाळहत्या नासेल ॥४९॥बाळहत्या जन्मांतरी ॥ तेणें समस्त वांझ होती नारी ॥ तरी ते नासेल संसारीं ॥ सुखी होऊनि बाळ वांचे ॥१५०॥पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन ॥ रासभ झाला शापेंकरुन ॥ तरी तो अध्याय केलिया पठण ॥ शापवचन बाधेना ॥५१॥आणि मानवाविण दुसरा जन्म ॥ होणार नाही तयाकारण ॥ आरोग्य काया पतिव्रता कामिन ॥ पुत्र गुणी होईल ॥५२॥सव्विसावे अध्यायांत ॥ गणगंधर्व झाला विक्रमसुत ॥ आणि विक्रम भर्तरीसुत एकचित्त ॥ भेटी होऊनि राहिले ॥५३॥तो अध्याय करितां पठण ॥ गोत्रहत्या जाति नासून ॥ पोटीं पाठीं शत्रुसंतान ॥ न राहे होऊनियां ॥५४॥सत्ताविसाव्यांत अदभुत कथन ॥ राज्यपदी बैसला राव विक्रम ॥ भर्तरी पिंगलेचें होऊनि लग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥५५॥तरी तो अध्याय करितां पठण ॥ पदच्युत पावेल पूर्वस्थान ॥ गेली वस्तु पुनः परतोन ॥ सांपडेल तयांची ॥५६॥अठ्ठाविसाव्या अध्यायांत ॥ पिंगलेकरितां स्मशानांत ॥ विरक्त होऊनि भर्तरीनाथ ॥ पूर्ण तप आचरला ॥५७॥तो अध्याय करितां श्रवण पठण ॥ त्या भाविकाचें होईल लग्न ॥ कांता लाभेल गुणवान ॥ सदा रत सेवेसी ॥५८॥एकुणतिसावे अध्यायींचे चरित्र ॥ भर्तरी होऊनि विरक्त पवित्र ॥ गोरक्षा सांगती अत्रिपुत्र ॥ गुरुनाथ पैं केला ॥५९॥तो अध्याय नित्य करितां पठण ॥ सुटेल क्षयरोगापासून ॥ आणि त्रितापांची वार्ता जाण ॥ कालत्रयीं घडेना ॥१६०॥ तिसाव्या अध्ययांत ॥ जन्मला चौरंगीनाथ ॥ परी तें चरित्र पठण करितां ॥ तस्करी दृष्टी बंधन होय ॥६१॥एकतिसाव्यांत चौरंगीनाथ ॥ तपा बैसला हिमालयांत ॥ तरी तो अध्याय पढतां ॥ कपटमंत्र न चालती ॥६२॥ बत्तिसाव्यांत सुगम कथन ॥ मच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोन ॥ द्वादश वर्षे राज्य करोन ॥ पुत्र दिधला रेवतीसी ॥६३॥त्या अध्यायाचें करितां पठण ॥ आयुष्य असतां देहाकारण ॥ गंडांतरें करुं येतील विघ्नें ॥ आपोआप टळतील कीं ॥६४॥ तेहतिसाव्यांत गौरनंदन ॥ वीरभद्राचा घेऊनि प्राण ॥ मच्छिंद्रशव स्वर्गाहून ॥ महीवरती उतरविलें ॥६५॥तरी ती कथा करितां पठण ॥ धनुर्वाताचें निरसे विघ्न ॥ झालेल्यातें होतां श्रवण ॥ पीडा हरेल तयाची ॥६६॥चौतिसाव्यांत रेवणजन्म ॥ होऊनि भेटला अत्रिनंदन ॥ सहज सिद्धिकळा दावून ॥ गेला असे महाराजा ॥६७॥तरी ती कथा करितां पठण ॥ जाणें कोणत्याही कार्याकारण ॥ तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन ॥ यश घेऊन येईल तो ॥६८॥पस्तिसाव्यांत पूर्ण कथन ॥ रेवण झाला विद्यावान ॥ दत्तकृपें स्वर्गी जाऊन ॥ बाळें आणिलीं विप्राचीं ॥६९॥तरी ती कथा करितां पठण ॥ महासिद्ध येईल उदराकारण ॥ बेचाळिसांचें करुनि उद्धारण ॥ गातील आख्यान लोक परी ॥१७०॥छत्तिसाव्यांत अपूर्व कथा ॥ जन्म झाला वटसिद्धनाथा ॥ आस्तिक ऋषि झाला ताता ॥ तयाचिये मातेसी ॥७१॥ती कथा करितां श्रवण पठण ॥ सर्पवृश्चिकदंश जयाकारण ॥ झालिया विषाचें उत्तीर्ण ॥ श्रवण केलिया अध्याय तो ॥७२॥सदतिसाव्या अध्यायांत ॥ नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत ॥ उपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथ ॥ जिंकियेले भिडोनी ॥७३॥ती कथा करितां श्रवण पठण ॥ सदना न लागे कुशीलपण ॥ लागल्या त्याचें होईल बंधन ॥ विद्यावंत होऊनियां ॥७४॥अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म ॥ होऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊन ॥ विद्येमाजी करुनि संपन्न ॥ तीर्थावळी धाडिला ॥७५॥तरी ती कथा सुरस ॥ श्रवण पठण होतां त्यास ॥ हिंवताप मधुरा नवज्वरास ॥ शांति होईल सर्वस्वीं ॥७६॥ एकूणचाळिसाव्यांत कथा ॥ चरपटीनें जिंकिलें अमरनाथा ॥ हरिहरादि देवां समस्तां ॥ स्वर्गी ख्याती लाविली ॥७७॥तरी तो अध्याय करितां पठण ॥ तो युद्धां जातां तपोधन ॥ शस्त्रबाण पावोन ॥ जय घेऊन येईल कीं ॥७८॥यावरी चाळिसाव्यांत कथन ॥ सर्व नाथांतें पाकशासन ॥ स्वर्गी नेऊनि करी हवन ॥ विद्यार्थिरुपें अर्थ पुरविला ॥७९॥तरी चाळिसावा नित्य पठण करितां ॥ लाभेल सर्व इच्छिल्या अर्था ॥ यश श्री ऐश्वर्य योग्यता ॥ पुत्रपौत्रीं नांदेल ॥१८०॥ एकुणचाळिसांचा फलार्थ ॥ तोचि प्राप्त तदर्थ ॥ कीं चाळिसावा एक परिस ॥ कीं कामधेनु कल्पतरु ॥८१॥गोरक्ष बोलतो वाचेकरुन ॥ त्यातें असत्य मानील जन ॥ जो निंदक यातें दावील निंदून ॥ तो अधिकारी विघ्नांचा ॥८२॥इहलोकीं परलोकीं ॥ राहणार नाहीं परम सुखी ॥ निर्वश पावोनि शेवटीं वंशीं ॥ पिचेल ग्रंथ निंदितां हा ॥८३॥अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार ॥ आहे गोरक्षाचा किमयागार ॥ परी पालटोनि भाषांतर ॥ महाराष्ट्र अक्षरीं रेखिला ॥८४॥म्हणोनि श्रोते हो भाविक जन ॥ सोडोनि द्या कीं निंदावचन ॥ विश्वासापर स्वार होऊन ॥ मोक्षमुक्काम करी कीं ॥८५॥तरी हा ग्रंथ संग्रह करुन ॥ चमत्कार पाहावा पठण करुन ॥ हे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण ॥ महासिद्धीचे असती कीं ॥८६॥हे चाळीस मंत्र परोपकारी ॥ आहेत दुःखाची करतील बोहरी ॥ तरी संग्रह करुनि उगलेचि घरी ॥ ठेवा विश्वास धरुनियां ॥८७॥ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र ॥ सुखकारक असती अति पवित्र ॥ दुःखदरिद्रहरण सर्वत्र ॥ गोरक्षकानें निर्मिलें ॥८८॥ पठण करितां षण्मासमिति ॥ जो अध्याय ज्या कार्याप्रति ॥ तें कार्य होईल निःसंशय चित्तीं ॥ पठण करुनि पहावें ॥८९॥याउपरी वाचितां न ये जरी ॥ तरी संग्रह करुनि ठेवावा घरीं ॥ नित्य वंदितां नमस्कारीं ॥ कार्य त्यांतचि घडेल ॥१९०॥एक कुसुम झोंकूनि वरती ॥ चला म्हणावें मम कार्याप्रति ॥ नवनाथ वंदूनि उक्ति ॥ नमस्कार करावा ॥९१॥ऐसा याचा आहे मार्ग ॥ करुनि पहावा चमत्कार चांग ॥ नवनाथ ओडवोनि अंग ॥ कार्य तुमचें करितील कीं ॥९२॥तरी असो विजय संपत्ती ॥ नांदो श्रोत्याच्या गृहाप्रति ॥ धुंडिसुत हेंचि प्रार्थी ॥ मालू नरहरी देवाते ॥९३॥शके सत्राशें एकेचाळीस ॥ प्रमाथीनाम ज्येष्ठ मास ॥ शुक्लपक्ष प्रतिपदेस ॥ ग्रंथ समाप्त जाहला ॥९४॥जरी ओंव्या सर्व नेमस्त ॥ सप्तसहस्त्र सहाशत ॥ उपरी ऐसे दैदीप्यवंत ॥ ओंव्या मंत्र असती ह्या ॥९५॥अध्याय वाचावया न बनेल ज्यासी ॥ तरी अध्यायांतील एक ओंवीसी ॥ पठण करुनि नाथनामासी ॥ कार्यकाज करावें ॥९६॥असो आतां बहु भाव ॥ श्रोते असोत चिरंजीव ॥ इहलोकीं परलोकीं ठेव ॥ आनंदाची होतसे ॥९७॥तरी समस्त नाथांतें धुंडीसुत ॥ मालू नरहरि हेंचि विनवीत ॥ कीं श्रोते असोत सुखरुपवंत ॥ सर्व अर्थी सर्वदा ॥९८॥स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ४० ॥ नवनाथभक्तिसार चत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥


॥ श्रीनवनाथांचा श्र्लोक ॥  


॥ गोरक्ष-जालंदर-चर्पटाश्च । अड्भंग-कानीफ-मच्छिंद्राद्याः । चौरंगी-रेवाणक-भर्तरिसंज्ञा । भूम्यां बभुवुर्नवनाथसिद्धा: ॥


************************************************************

कथासार : इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन,नाथांचा आशिर्वाद व समारोप


चरपटीनाथानें श्रीशिव, श्रीविष्णू आणि देवेंद्र यांच्यासह सर्व देवतांचा पराभव करून देवलोक हादरवून सोडला होता. या पराभवाचे शल्य देवेंद्रांस सलत होते. अत्यंत व्यथित होऊन तो बृहस्पतीस म्हणाला, " चरपटी नावाच्या एका तेजस्वी नाथपंथीय बालकाने हरी हर यांच्यासह देवलोकाची दुर्दशा करून महान पराक्रम केला आहे. नाथपंथीयांकडे वाताकर्षण विद्या असल्याने त्यांच्यापुढे देवदानव दुबळे ठरले आहेत. ती विद्या आपणांस प्राप्त होईल, यासाठी काहीतरी युक्ती सांगावी. नाहीं पेक्षा त्यांच्या घरीं जाऊन त्यांचें दास्यत्व स्वीकारुन त्यांस आनंदीत करावें." अशा भावार्थाचें इंद्राचें भाषण ऐकून बृहस्पतीनें सांगितलें कीं, नाथांस सन्मानपूर्वक येथें आणावें हें फार चांगलें ! सोमयाग यज्ञ करण्याच्या निमित्ताने नाथांस देवलोकांत घेऊन यावे. तें इथे आल्यानंतर तूं त्यांच्या सेवेंत तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरुप वागून त्यांस प्रसन्न करुन घेऊन, आपला स्वार्थ साधून घे, हाच एक सुलभ व साध्य मार्ग दिसतो.

ही बृहस्पतीची युक्ति इंद्रास मान्य झाली व त्यास आनंद झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावें हा विचार पडला. बृहस्पति म्हणाला, अष्टवसुपैकीं उपरिक्षवसु हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय, तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथें आला. होता तेव्हां त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे. तो नवनाथांस घेऊन येऊन तुझा हेतु सफल करील, हें ऐकून इंद्रानें उपरिक्षवसुस बोलावुन त्यास आपला हेतु सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविलें.

मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपिचंद्र चालंदर अडबंगी आदि नाथमंडळीही तेथेंच होती. उपरिक्षवसु येतांच मच्छिंद्रनाथानें उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें. त्यानें सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करुन नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठीं फारच आग्रह केला व त्याजकडून येण्याचें कबूल करुन घेतलें. मग जालंदर , कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष , अंडबंगी, गोपीचंद्र आदिकरुन जोगी विमानांत बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदानें आपल्या आईस घेतलें. मग तेथून वडवाळ गांवीं जाऊन वटसिद्धनाथास बोध करुन बरोबर घेतलें. तसेंच गोमतीच्या तीरीं जाऊन भर्तृहरीस घेतलें. ताम्रपर्णीचें कांठीं जाऊन चरपटीनाथास घेतलें. पूणें प्रांतांत विटगांवाहून रेवणनाथास घेतलें. याप्रमाणें चौर्‍यांयशीं सिद्धासंह नवनाथ विमानांत बसुन सोमयागाकरितां अमरावतीस गेले.

त्यांचें विमान आलेलें पाहिल्याबरोबर, इंद्र नाथांस सामोरा गेला आणि नम्रपणानें बोलून त्यांच्या पायां पडला. मग त्यानें सर्वांस आदराने नेऊन आसनावर बसविलें व त्यांची षोडशोपचांरानीं पूजा केली. सर्व देव आनंदानें त्यांच्यापुढें उभे राहिलें. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतु इंद्रानें सर्वास सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हें कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पति यांनीं आपपसांत विचार करून सिंहलद्वीपामध्यें जें अटव्य अरण्य आहे, तेथें शीतल छाया असून, उदकाचा सुकाळ असल्यानें त्या स्थानीं  यज्ञाची तयारी केली. सर्वसंमतीने यज्ञास प्रारंभ करून स्वतः देवराज इंद्र व त्याची पत्नी शची यजमानपदी बसले. बृहस्पती मंत्रोच्चार करू लागले आणि नऊ नाथ 'स्वाहा' म्हणत समिधा आहुती टाकू लागले.

हें वन किलोतलेच्या सीमेंअंतर्गत होतें, तेंव्हा तेथें असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणुन मच्छिंद्रनाथानें उपरिक्षवसुस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितलें . त्याप्रामाणें किलोतलेसही मी येथें घेऊन येतो, असें सांगुन उपरिक्षवसु गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यांना राहवुन घेतलें. मच्छिंद्रनाथानें मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें कीं, आपण यज्ञास न बसतां उपरिक्षवसुस बसवावें व तुम्ही इतरत्र लक्ष द्यावे. त्यांतील गर्भितार्थ लक्षात घेऊन इंद्रानें उपरिक्षवसुच्या हातांत यज्ञकंकण बांधिलें व आपण देखरेख ठेवूं लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता. त्यानें सेवा करण्यांत कसुर ठेवली नाहीं. ता वेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले.

मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत असतां, इंद्रानें मयुराच्या रूपानें गुप्तपणें झाडावर राहुन वाताकर्षणमंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला. असा एक वर्ष यज्ञ चालला होता. तोंपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत होता. यज्ञ समाप्ती होतांच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला, मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्रानें दुसर्‍या नाथांची पूजा केली व वस्त्रेंभूषणें देऊन सर्वांचा सन्मान केला. सर्वांना सिंहासनावर बसवून इंद्र हात जोडून याचना करीत म्हणाला, माझ्याकडून एक अपराध घडला आहे, त्याबद्दल मला क्षमा करावी. मीननाथाचा विद्याभ्यास सुरु असतांना मी मोराच्या रूपात तिथे उपस्थित राहून कपटाने चोरून विद्या शिकली. तरी आपण मला क्षमा करून आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवावा आणि ती विद्या फलद्रूप करावी.

इंद्राचें हें चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागानें शाप दिला कीं तू कपटाने आम्हांस इथे आणून विद्या अवगत केली आहेस, पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरिक्षवसु व बृहस्पति मध्यस्थी करू लागले. त्यांनी अनेक प्रकारांनीं नाथांस विनवून संतुष्ट केलें. मग नाथ म्हणाले, इंद्रानें बारा वर्षे तप:श्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करूं नये, म्हणजे त्यास ती फलद्रुप होईल. असा उःशाप देऊन विमानारुढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले. त्यावेळीं मच्छिंद्रनाथानें किलोत्तमेचा निरोप घेतला आणि मीननाथासहि सोबत घेतलें. नंतर मैनावतीस हेळापट्टाणास पोंचविलें. मीननाथाचें तीन सिद्ध शिष्य झाले. त्यानंतर सर्व नाथ तीर्थयात्रा करीत भ्रमण करू लागले.

इकडें, इंद्रानें सह्याद्री पर्वतावर बारा वर्षें तप:श्चर्या केली. मंत्रप्रयोग म्हणत असतांना तो जें पाणी सोडी, त्या उदकाचा प्रवाह भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असें नाव पडलें . या प्रमाणें तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला.

नवनाथ अनेक दिवस तीर्थयात्रा करीत होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ, ज्याला मायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरीवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ, त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. श्रीविष्णुनें विमान पाठवुन मैनावतीस वैकुंठास नेलें. अशा प्रकारें, चौर्‍यांयशीं सिद्धांपासून नाथपंथ उदयास आला.

या ग्रंथाचे आद्य ग्रंथकार श्री गोरक्षनाथांनी म्हणतात, " यांतील सर्व कथा अद्भुत आणि सत्य आहेत. जो कोणी या कथांस असत्य मानेल किंवा निंदा करेल, तो विघ्नसंतोषी इहपरलोकीं सुखी न राहतां त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकांत पडेल.म्हणून नाथभक्तांनी निंदा सोडून या ग्रंथावर श्रद्धा ठेवावी आणि नवनाथ कृपेचा चमत्कार अनुभवावा. फलश्रुतीमध्ये कथन केल्याप्रमाणे, मनोरथ पूर्तीसाठी तो तो अध्याय दररोज वाचनात ठेवावा. नवनाथांच्या कृपेनें सहा महिन्यांत निःसंशय मनोकामना पूर्ण होईल. यशप्राप्ती होईल. हा अत्यंत पवित्र ग्रंथ घरांत ठेवून दररोज केवळ एक फुल वाहून नवनाथांचे स्मरण करावे. नवनाथांची कृपा होऊन अवश्य कार्यसिद्धी होईल. अध्याय वाचण्यास जमला नाही तरी अध्यायातील एक ओवी वाचावी आणि नवनाथांचे स्मरण करावे.

श्री नवनाथांच्या चरित्राचे असे वर्णन करून मालुकवि म्हणतात, हा श्रीनवनाथभक्तिसार ग्रंथ शके सत्राशें एकेचाळीस, प्रमाथीनाम संवत्सरीं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस पूर्ण झाला. तसेच श्रीदत्तात्रेयांस व नवनाथांना, 'श्रोत्यांस सुखरुप ठेवावें आणि त्यांचे मनोरथ परिपूर्ण व्हावें.' अशी प्रार्थना मालुकवि करतात.