Sep 23, 2019

श्री दत्त महाराज धावा


|| श्री गणेशाय नमः ||

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||


 वाडीग्रामी जाउनिया, नमूया गुरूपदा ।

कृपे हरतो जो, नाना आपदा ||

माथा टेकूया, नृसिंह स्वामीपदा ।

निरखितसे जो, कृपादृष्टी सदा ||

सद्-गद वाचे हो, त्याचे नामवदा ।

रूप पाहुनिया,  हृदयी मोद सदा ||

औदुंबर तळवटी, ध्यानस्थ सदा ।

भावे प्रदक्षिणा, करुनि नमू पदा ||

कृष्णदास,  हृदयी अधीर सदा ।

दर्शन करण्यासी, श्रीनृसिंहपदा ||

झिजवा काया गुरुसेवेस । संपतील मग सर्व प्रयास ।

सुखकर होईल जीवनप्रयास । करतील गुरु अंतरी वास ||

नित्य करी जो गुरु स्मरण । गुरुस कसे त्याचे विस्मरण ।

गुरुसेवेची घ्या रे आण । सापडेल गुरुकृपेची खाण ||


Sep 21, 2019

श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित श्रीवेंकटेशस्तोत्र


।। श्री गणेशाय नमः ।।


व्येमित्यव्ययमाख्यातं मुनिभिः पापवाचकम् । कटते नाशनार्थत्वात्पापहा वेंकटेश्वरः।।१।।

यो भक्तरक्षणार्थाय विष्णुर्वैकुंठवास्ययम् । शेषाचले महालक्ष्म्या सह तिष्ठति वेंकटः।।२।।

चतुर्बाहुरुदारांगो निजलांछनलांछितः । वेंकटेश इति ख्यातो देवः पद्मावतीप्रियः।।३।।

शेषाचलं महत्तुंगं सर्वसंपत्समन्वितम् । वैकुंठतुल्यमकरोच्छ्रीनिवास: स नोsवतु।।४।।

यद्दर्शनार्थमखिला ऋषियोगिसुरादयः । आयान्ति परया भक्त्या सपत्नीकाश्च सानुगाः।।५।।

विशेषादाश्विने मासे महोत्सवदिदृक्षवः । भक्तानुकंपी भगवान्वेंकटेशः स नोsवतु।।६।।

स त्वं मां पाहि देवेश लक्ष्मीश गरुडध्वज । सर्वापत्तिविनाशाय प्रसन्नो भव सर्वदा।।७।।

प्रसीद लक्ष्मीरमण प्रसीद प्रसीद शेषाद्रिशय प्रसीद । दारिद्र्यदुःखौघभयं हरंतं तं वेंकटेशं शरणं प्रपद्ये।।८।।


इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीवेंकटेशस्तोत्रं संपूर्णम् ।।


श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्रीशंकरस्तोत्रं


।। श्री गणेशाय नमः ।।


नमस्तुभ्यं भगवते शंकराय महात्मने । जगदुत्पत्तिविनाशानां हेतवे मोक्षहेतवे ।।१।।

सर्वदेवाधिदेवाय पार्वतीपतये नमः । ऋषियोगिमुनीन्द्राणां त्वमेव परमा गतिः ।।२।।

ब्रह्मांडगोलके देव दयालूनां त्वमग्रणीः । अत एवोल्बणं पीतं त्वया हालाहलं विषम् ।।३।।

गंगाधर महादेव चन्द्रालंकृतमस्तक । परमेश्वर मां पाहि भयं वारय वारय ।।४।।

सर्वपापं प्रशमय सर्वतापं निवारय । दुःखं हर हराशेषं मृत्युं विद्रावय द्रुतम् ।।५।।

स्तुतिं कर्तुं न मे शक्तिस्तव वाग्गत्यगोचर । देहि सत्संगतिं भक्तिं निश्चलां त्वयि शंकर ।।६।।

सर्वारिष्टं परिहर सर्वशत्रून्विनाशय । दारिद्र्यं हर सर्वेश सर्वान्कामान् प्रपूरय ।।७।।

मुखे नाम दृशो रूपं हृदये त्वत्पदाम्बुजम् । ममास्तु ते नमः सांब प्रसन्नो भव सर्वदा ।।८।।

त्वदर्चनविधिं जाने न भक्तिस्त्वयि मे हृदि । अथाप्यनुग्रहाणेश केवलं दययोद्धर ।।९।।


।। इति श्री प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं शंकरस्तोत्रं संपूर्णम् ।।


Sep 13, 2019

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय ६


श्रीगणेशाय नमः । श्री सरस्वत्यै नमः ।श्रीसमर्थ चरणाभ्याम नमः ।लक्ष्मीनृसिंह नमोस्तुते ॥१॥ षष्टाध्याय व्हावया सुरस । प्रार्थितो मी गुरुचरणांस । रात्रंदिन मनीं ध्यास । ग्रंथ संपूर्ण हा व्हावा ॥२॥ समर्थाचे स्तवन करितां । भस्म होती सर्व चिंता । प्रसन्नता ती मनां येता । कार्य होईल सत्वर ॥३॥ करारे ते मन प्रसन्न । आत्मलाभा ते कारण । उपदेशिता तुकाराम । भक्तजनांच्या कल्याणा ॥४॥ रामदासही तेचि कथिती। भली, बुरी येवो स्थिती । राम स्मरतां सदा चित्तीं । संरक्षितो भक्तांसी ॥५॥संसारसागरीं अति वादळें । अशा समयीं भाव डळमळे । भक्ति करोनी फळ ना मिळे । विकल्प मनीं उठताती ॥६॥ उद्विग्न होतां मनःस्थिती । संतोपदेश आणुनी चित्तीं । सावरावी आपुली स्थिती । साधावया हित आपुले ॥७॥ भोग कोणासि चुकती ना । भोगल्याविणे सुटकाचि ना । मनें चिंतुनी गुरुचरणां । सन्मुख व्हावे प्रसंगासी ॥८॥ सफल व्हाया निजजीवन । करुया आता गुरुवर्णन । वाया न घालवू एक क्षण । कल्याण आपुले साधूया ॥९॥ गत अध्यायीं हो वाचिले । समर्थे जनां उपदेशिले । "नाम चिंतिता हित आगळे । होईल" वदले सुनिश्चित ॥१०॥ ऐसे उपदेशुनी सकलां । वेगे निघाले पुढील स्थला । भक्तवृंद तो अस्वस्थ झाला । स्वामींमागुनी धावती ॥११॥ धनुष्यापासुनी सुटता बाण । जेविं वेगे करी गमन । तेवि स्वामी जात निघोन । पाहती जन आश्चर्ये ॥१२॥ जन वदती आपसांत । क्षणीं कैसे निघोनि जात । गुप्त जाहले की गगनांत । काहीच आम्हा कळेना ॥१३॥ दुःखमिश्रित मने जन । जावया निघाले परतोन । मुर्खे स्तविती पुरुषोत्तम । आत्मशांती मिळावया ॥१४॥ वायू गतीनें स्वामी आले । सानुल्या क्षेत्रीं तदा वसले । कृष्ण त्रिविक्रम ‍ नांव कळले । काठेवाडांत ते असे ॥१५॥ श्रीकृष्ण मंदिर अति सुंदर । समीप तयाचे सरोवर । प्रफुल्ल कमळे मनोहर । नाम तयाचे नारायण ॥१६॥ प्रशांत सारा आसमंत । आनंदले समर्थ चित्त । स्नान करावे सरोवरांत । वाटता ऐसे जाती तिथे ॥१७॥ कौपीन कटीं , दुजे न वस्त्र । रुद्राक्ष माला कंठी असत । अति तेजस्वी , रत्नवत नेत्र । आजानुबाहू गौर मूर्ती ॥१८॥ मुखचंद्रमा परम विमल । मुखीं हास्य अति प्रेमळ । स्वामींस बघतां लोक सकल । संत, सज्जन नमिती त्यां ॥१९॥ भोवती प्रेमे लोक जमले । अत्यादरे पद वंदिले । नाम आपुले पाहिजे कळले । आपुल्या मुखें सर्वासी ॥२०॥ ऐसे स्वरुप ना देखिले । बहुत साधू आले नि गेले । तेज आपुले अति आगळे ।आम्हां गमतसा परब्रह्म ॥२१॥ चरण वंदनी होत घाई । कोणी ठेविती पदीं डोई । सेवा आपुली करु देई । आम्हां पामरां जनार्दना ॥२२॥ स्वामीपदीची घेत माती । मस्तकी आपुल्या ती वाहती । कृपा करावी आम्हांवरती । प्रार्थिती जन नम्रत्वे ॥२३॥ लोकभक्ती विलोकुनी । नाथ सद्‍गद जाहले मनीं । ईशसेवा नित्य करुनी । साधणे आपुले कल्याण ॥२४॥ आमुच्या संगे सरोवरांसी । येतसा कां स्नानासी । ऐशिया प्रातः समयासी । संधी पुन्हा ना येईल ॥२५॥ ऐसे ऐकता श्री वचन । हर्षोत्फुल्ल जाहले जन । परंतु त्यांतील एकजण । स्वामींस वदे तात्काळ ॥२६॥ स्वामी आपुले वचनामृत । ऐकता होय संतुष्ट चित्त । पंडे येथले अति उन्मत्त । त्रस्त करिती यात्रिकां ॥२७॥ समर्थ वदले जाऊं । जे जे होईल ते ते पाहूं । उगिच अंतरीं नका भिऊ । आम्ही आहोत सांगाती ॥२८॥ ऐकतां जन आनंदले । स्वामींसवे स्नानां निघाले । सरोवराच्या समीप आले । जलीं लागले उतराया ॥२९॥ तोंचि पंडे तिथे आले । स्वामींस दरडावुनी वदले । तयां मारावया सजले । आणि बोलती अपशब्द ॥३०॥ अरे तूं अससी कोठचा कोण । आपणां समजसी तूं महान । ऐसे पाहिले तुज समान ।आजपर्यंत कित्येक ॥३१॥ मोठा उन्मत्त दिसतोसी । भुलवुनी लोकां तूं जमविसी । धंदा तुझा या क्षेत्रासी । आम्ही न चालू देणार ॥३२॥ कौपिन नेसुनी, फासूनि रक्षा । वेधुनी घेसी जनांच्या लक्षा । परंतु ज्ञानी तुझियापेक्षा । आम्ही आहोत येथे कीं ॥३३॥ थोर अससी जरी गारुडी । परतु उडवूं तव रेवडी। वागण्याची वाट वाकडी । सोड आपुल्या हितास्तव ॥३४॥ महा दक्षिणा दिधल्याविण। जासी कैसा कराया स्नान । आमुचे सरोवर नारायण । धनी आम्हीच कीं त्याचे ॥३५॥ अनुज्ञा आमुची प्रथम घ्यावी । दक्षिणा चोख ती मोजावी । मग स्नानार्थ सिद्धता व्हावी । ना तरी व्हावे चालते ॥३६॥ द्रव्य संपत्ती अपार । वाटेचि आम्हां परमेश्वर । द्रव्याविणे सर्व निःसार । हाचि वेदांत आमुचा ॥३७॥ धनास्तवं या अहर्निश । आम्ही करितसो सायास । बुडवू पाही जो दक्षिणेस । थारा तयांसी ना इथे ।३८॥ चला काढा ती दक्षिणा । अन्यथा संधी न मिळे स्नाना । सोंगा, ढोंगा फसतो न जाणा । इंगा दाखवूं समयासी ॥३९॥ समर्थ पाहती पुंडाई । दक्षिणेची तयां घाई । लाज लज्जा जयां नाही । पंडे उन्मत्त देखिले ॥४०॥ साधु संतासि नोळखती । बोलण्याची नसे रीती । श्वानापरी जे भुंकती । ऐसे पंडे अनुभविले ॥४१॥ ईश्वर दिधले सरोवर । तोचि तयाचा धनी थोर । स्नान कराया नारी - नर । भक्तिभावे येताती ॥४२॥ भक्तजनांसी कां नाडिता । द्रव्य सर्वदा अपेक्षिता । यात्रेकरुंसी कां पीडिता । साधाल तेणे हित कोणते ॥४३॥ अमाप ऐसे धन मिळविता । अनाथांचे शाप कां घेता । अधोगतीसी कारण होता । तुमचे तुम्हीच जाणा हे ॥४४॥ ऐशा उद्दंड वर्तनानें । सज्जनांची दुखविता मनें । धर्मतत्त्वें तुडविल्यानें । अधोगतीसी जाल तुम्ही ॥४५॥ ऐकता ही उपदेश वाणी । पंडे उठले चवताळुनी । पुरे करा ही बोधवाणी । आम्हांसि नलगे उपदेश ॥४६॥ आमुची दक्षिणा असे अटळ । वृथा न करणे हो खळखळ । द्यावयासी नसले बळ । तरी येथूनी काळे करा ॥४७॥ क्रोधा-विरोधा यति हांसले । बोलणे ऐसे ना चांगले । सुमधुर वाचे जरी वदले । तरी समजते आम्हांसी ॥४८॥ पांडित्य आम्हा नको तुमचे । टाका पैसे दक्षिणेचे । धक्के मारुनी पाठवू साचे । आम्ही तुम्हास मागुती ॥४९॥ देतो दक्षिणा ही घ्या वदुनी । स्वामी उडाले उंच गगनीं । बाहु-द्वय उभारोनी । या,या म्हणती पुजार्‍यासी ॥५०॥ ‘ आ ’ वासुनी पुजारी बघती। गाळण उडे भ्यायले अती । अरे बापरे कोण हा यती । आमुच्या पित्याने देखिला ॥५१॥ तेव्हा उडाला अति गोंधळ । जिकडे तिकडे पळापळ। योगेश्वराचे पाहता बळ । नको दक्षिणा म्हणती ते ॥५२॥ गगनीं घालुनी सिद्धासन । तैसे उतरती जलीं म्हणुन । आश्चर्य पावले सकल जन । बघतां ध्यानस्थ जलावरी ॥५३॥ योगियांचे महायोगी । स्वामी निरिच्छ अति विरागी । जगदुद्धारास्तव ते जगीं । संचार करिती सर्वत्र ॥५४॥ मोह माया नसे स्वार्थ । जीवन कैसे करावे सार्थ । ईश्वरनिष्ठे विना व्यर्थ । निजाचरणे शिकविती ॥५५॥ चिरंतन सुखासी भुलावे । तत्प्रीत्यर्थ प्रयत्न व्हावे । द्रव्य, दारा नच मानावे । परमोच्च सुख म्हणोनी ॥५६॥ निज बाळाची कराया वृद्धी । माता योजिते आपुली बुद्धी । निःस्वार्थता नी चित्तशुद्धी । ऐसे वागणे प्रत्येकी ॥५७॥ चमत्कारे लोक वळती । सांगता कांहीं ते न ऐकती । येणे कारणे अपूर्व घडती । घटना जीवनीं सिद्धांच्या ॥५८॥ माय - बाप ते संतमहंत । कार्य तयांचे मानवी हित । परमानंद तयांना त्यांत । निरपेक्ष सर्वदा ते असती ॥५९॥ विषयकर्दमीं रुतले जन । कराया तयांचे उद्धरण । वारंवार ते अवतरुन । कार्य अविरत करिताती ॥६०॥ आश्चर्य , भीती अति आदर । विविध वृत्तिचा सभोवार । जनसंघ दाटला अनिवार । दृश्य विलक्षण पहायासी ॥६१॥ दृश्य देखता असामान्य । जन गर्जती धन्य , धन्य । शिवावतार हा , नसे अन्य । साष्टांग घालुनी त्यां नमिले ॥६२॥ देवा यावे , मागतो क्षमा । दया दाखवा अम्हा अधमा । प्रार्थना प्रभो हे शिवरामा -। मूढ आम्ही करित असो ॥६३॥ जनगणाची ही प्रार्थना । ऐकतां येई दया त्यांना । उभे राहिले जलतरणा । चालु लागले पाण्यावरी ॥६४॥ सुहास्य वदनें तीरावरी । प्रकटता हर्षला लोक भारी । समर्थांच्या जयजयकारीं । धुंद जाहला आसमंत ॥६५॥ गर्दी जाहली लोटांगणा । घातली मिठी कुणी चरणां । अज्ञ जनांवरी करी करुणा । हीच प्रार्थना पदकमली ॥६६॥ पुजारी कांपती ते थरथरा । अपराध आमुचे क्षमा करा । शरण येतसो योगेश्वरा । घालिती चरणीं लोटांगण ॥६७॥ लोक उधळिता बुक्का , फुले । सुगंध सर्वत्र तो दरवळे । पुढें सराया मार्ग न मिळे । ऐसा दाटला समुदाय ॥६८॥ जनमनाची बघुनि स्थिती । श्रींचे द्रवले ह्रदय अती । नेत्र तयांचे पाझरती । क्षणभर राहिले निःस्तब्ध ॥६९॥बहुत घालिती पुष्पमाला । प्रेमसागर उचंबळला । अपूर्व देखती जन सोहळा । धन्य जाहलो सर्वस्वी ॥७०॥ चालतां स्वामी बोलती मंद । देवभक्तीचा धरा छंद । कृपा करिल श्रीगोविंद । विकल्प अंतरीं न धरावा ॥७१॥ कृष्ण मंदिरीं यती आले । जनां स्वामी कृष्ण गमले । जय गोविंद गर्जना चाले । नभ निनादे त्या नादे ॥७२॥ मंदिरीं जनां न दिसे कान्हा । स्वामी भासले तया स्थाना । जन वदती परस्परांना । स्वामी प्रत्यक्ष श्रीकृष्ण ॥७३॥ अत्यादरे समर्थासी । उच्चासनी बसवुनी त्यांसी । महापूजा करायासी । सिद्ध जाहले जन सारे ॥७४॥ अत्यादरे आरती चाले । टाळ - मृदंगी दंग झाले । देहभानही ते हरपले । प्रेमातिरेके सर्वजन ॥७५॥ गंधाक्षता, सुगंधी फुलें । तेवि अर्पिली मधुर फळें । धूप, दीप ते ओवाळिले । सुग्रास अर्पिले नैवेद्य ॥७६॥ पाद्यपूजेचा थाट ऐसा । वाटेल हेवा इंद्रा असा । योगेश्वरांचा महिमा असा । जाणिला कीं भक्तांनी ॥७७॥ पूजा - अर्चा झालियावरी । आग्रहे प्रार्थिता समर्थस्वारी । भोजना उठली वाद्यगजरीं । षड्रस भोजन करावया ॥७८॥ भोजनाचा अपूर्व थाट । हारिने मांडिले चंदनी पाट । अगरबत्तीचा घमघमाट । दरवळे तो सर्वत्र ॥७९॥ रंगवल्लिका अति सुंदर । पात्रांभोवती मनोहर । पदार्थ वाढिती अति मधुर । एकामागोनि एक ते ॥८०॥ सनया वाजती अति मंजुळ । प्रेमें जेविती लोक सकळ । वाळ्याचे ते शीतल जल । प्यावया वाढिती नर - नारी ॥८१॥ परस्परां आग्रह करिती । हास्य -विनिदे रमली मती । प्रेमे विनविती सर्वाप्रती । करा आकंठ भोजन ॥८२॥ पदें गाती , श्लोक म्हणती । कुणी श्रींचा घोष करिती । परमानंदा येतसे भरती । ऐसा भोजनसोहळा ॥८३॥ स्वामींसवे जेवावया । यावे लागते भाग्य उदया । संधी न ऐशीं लाभे जया । अभागी ते खरोखर ॥८४॥ कृष्णासवे जेविता गोप । हर्ष त्यांसी हो अमूप । संतसंगे वागता ताप । जातसे तो विलया कीं ॥८५॥ भोजनोत्सव ऐसा सरता । तांबूल - दक्षिणा श्रींस देता । अत्तरादी माला अर्पिता । भक्त वंदिती यति चरणां ॥८६॥ प्रसन्न मनें सर्वांसी कथिती । श्रोते तेव्हा कर जोडिती । एकचित्ते श्रवण करिती । अमृतवाणी स्वामींची ॥८७॥तुम्ही आहांत संसारी । सागर तराया कठिण भारी । तरोनि जाया युक्ति न्यारी । सांगतो ती श्रवण करा ॥८८॥ यथा शक्ती यथा मती । साह्य द्याया असा पुढती । सदा सर्वदा तो श्रीपती । मनीं स्मरावा अखंड ॥८९॥ तडी तापसी संन्यासी । साधू महंत ऐशियांसी । पीडा न द्यावी कदा त्यांसी । द्रव्यार्जन करावया ॥९०॥ द्रव्य, दारा, पुत्र, मित्र। हे न देती सुख सर्वत्र । सद्‌गुण, ईश्वरभक्ती मात्र । सौख्यदायक सर्वदा ॥९१॥ देवाचरणीं अर्पिता मन । होईल तुमचा नारायण। हांक मारितां ये धावुन । देव ऐसा कनवाळू ॥९२॥ मर्म यांतले जाणावे । लाभ साधण्या यत्न व्हावे । आयुष्य व्यर्थ ना दवडावे । वागवा हे नित्य मनीं ॥९३॥ यतिवर्य असतां उपदेशित । ये समोरी वृद्ध पंडित । विलोकुनी त्या यती वदत । हीन कर्मे का करिता ॥९४॥ आम्ही करितसो इंद्रजाल । मोहिनी  गारुडी आणि रमल । साध्य यक्षिणी, नि वेताळ । हाडळी, जखिणी साध्य आम्हा ॥९५॥पिशाच्च विद्या या साधुनी । हिंडतो आम्ही सदा भुवनीं । चुकते कोठे सांगा मुनी । मार्गदर्शन करावे ते ॥९६॥ स्वामी पाहती रोखुन तया । भय वाटले ह्रदयी तया । शरण जावे अशा समया । हेचि आपणा योग्य असे ॥९७॥ भयग्रस्त ते पंडित भले । पुनः पुन्हा चरण धरिले । निजाश्रूंनी अभिषेकिले। द्रवले तेणे श्री समर्थ ॥९८॥ घोर अपराधांची क्षमा । असलिया सोडतो श्रीचरणां। नातरी त्यागीन स्वप्राणां । शपथपूर्वक सांगतसे ॥९९॥ त्यावरी स्वामी तयां वदती । ज्ञात आपुली आम्हा स्थिती । आम्ही रुष्ट ना तुम्हावरती । अभय देतसो तुम्हासी ॥१००॥ श्रवणीं पडता देववाणी । परमानंद जाहला मनीं । भाग्यवान मी असे भुवनीं। नाथ कृपाळू मज भेटला ॥१०१। आपुल्या वाचोनि नाही गती । वाटे ऐसे मज श्रीपती । दास्यत्व आपुले दीनाप्रती । लाभो मजसी आजन्म ॥१०२॥ गेहीं आपुल्या कोण कोण । माता, पिता, बंधु, बहिण। पत्नी, पुत्र आणखी कोण । प्रेमे पुसती स्वामी तयां ॥१०३॥ आपुल्या कृपे आहो सुखी । पत्नी, पुत्र, सुना, लेकी। माता-पिता स्वर्गस्थ कीं । आतां आपण मायबाप ॥१०४॥ सप्रेम स्वामी तदा वदती । काय येतसे बघू प्रचिती । आम्हांसि येणे गृहाप्रती । महाशास्त्री चला उठा ॥१०५॥ पिता असता तुमच्या गृहीं । आम्हां वदता जगीं नाहीं । समक्ष दावितों सर्वांसही । उठा सत्वरी चलावे हो ॥१०६॥लोक आश्चर्य करिती महा । आहे काय प्रकार हा । स्वामींसवे निघती गृहा । सत्यासत्य पहावया ॥१०७॥ इथे संपवू हा अध्याय । मनीं स्मरुयां सद्‌गुरु पाय । सुरस कथेचा सप्तमाध्याय । ऐकावयाते सिद्ध असा ।१०८॥ इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०९॥

॥ श्रीस्वामीसमर्थ की जय ॥

सौजन्य : https://www.transliteral.org/


Sep 12, 2019

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय २




॥ श्रीगणेशाय नमः ॥ 

हे अज, अजिता, सर्वेश्वरा, चंद्रभागातटविहारा तुझा जयजयकार असो.हे पूर्णब्रह्मा,रुक्मिणीवरा,दीनबंधो तू मजकडे कृपादृष्टीने पहा.।।१।।हे देवा, तुझ्या वशिल्यावांचून अवघेंच व्यर्थ आहे. देहात जर प्राण नसेल तर निष्प्राण देहास कोण विचारतो ?।।२।।पद्मनाभा, सरोवराचे दिव्य सौंदर्य केवळ त्यातील जलामुळेच असते.आतल्या रसरशीत गाभ्यामुळेच टरफलाला महत्त्व येते.।।३।।त्याचप्रमाणे तुझी कृपा शरणांगतास सामर्थ्यवान बनवते. तेव्हा आता माझे पाप, ताप आणि दैन्य तू दूर कर,हेच माझे तुझ्या चरणांशी मागणें आहे।।४।।मागील अध्यायात समर्थ निघून गेले ही कथा आली आहे. त्यामुळे बंकटलालास हुरहूर वाटूं लागली.।।५।।त्यास अन्नपाणी गोड लागेनासे झाले. बंकटलालाच्या मनी सतत समर्थांचा ध्यास लागला.ते गजाननाचें रुप त्याच्या डोळ्यासमोरुन हालेनासे झाले.।।६।। त्याला जिकडे पहावें तिकडे केवळ समर्थांचा भास होऊ लागला. श्रोते हो भक्ताच्या या स्थितीला ध्यास असे नाव आहे.ह्या काही पोरचेष्टा नव्हेत.।।७।। वनात चुकलेल्या धेनूच्या वासराची जशी स्थिती होते, त्याचप्रमाणे हे बुधजनहो बंकटलालाची अवस्था झाली.।।८।।परंतु हे मनीचे हितगुज कोणाला सांगावे हे त्याला कळेना.स्वत:च्या वडिलांपाशी हे सर्व बोलण्याची त्याची छाती होईना.।।९।।अशा रितीने त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. अक्षरश: अवघे शेगांव धुंडाळूनसुद्धा त्याला समर्थांचा काही पत्ता लागेना.।।१०।।तो तसाच घरीं येतां त्याचे वडील भवानीराम विचारू लागले,"बाळा, आज असा तू उदास का दिसतो आहेस?नेहेमीसारखा उत्साही दिसत नाहीस? चेहराही उतरलेला दिसतोय तुझा. तुला कसला त्रास होतोय, ते तू मला सांग. तू तरुण आहेस, तुला कसलीच कमी नाही. असे असूनही असा चिंतातुर का बरे दिसतोस? किंवा काही शारिरीक व्याधींने त्रस्त आहेस का? मुलाने वडिलांपासुन कुठलीही गोष्ट कधी लपवू नये."।।११-१४।।तेव्हा बंकटलालाने आपल्या पित्याचें कांहीं तरी सांगून समाधान केले व पुन्हा शेगावात समर्थांना शोधत फिरुं लागला।।१५।।बंकटलालाचे शेजारीं एक सज्जन गृहस्थ रहात होते. ते जमीनदार होते, परंतु त्याचा त्यांना गर्व नव्हता.।।१६।।त्यांचे नाव रामाजीपंत देशमुख होते. ते आता वयोवृद्ध झाले होते.त्यांना बंकटलालानें समर्थांविषयी इत्यंभूत हकीकत सांगितली.।।१७।।तेव्हा ते बंकटलालाला म्हणाले,"तू हा जो वृत्तान्त सांगितला, तो ऐकून हे जे कोणी तुला भेटले ते कोणीतरी थोर योगी असावेत. योग्यांशिवाय असे वर्तन कुठे पहावयास मिळत नाही.पूर्वसुकृतावाचून अशा थोर विभूतींचे दर्शन होत नाही.तुला त्यांचे दर्शन झाले, तुझा जन्म खरेच धन्य झाला. ते तुला परत भेटले तर तू मलाही त्यांच्या दर्शनास ने."।।१८-२०।।असेच चार दिवस गेले, बंकटलालाला क्षणभरसुद्धा श्रींचा विसर पडला नाही.।।२१।।गोविंदबुवा टाकळीकर नावाचे एक कीर्तनकार होते.त्यांचे मधुर कीर्तन ऐकून जणु शारंगधर प्रसन्न होत असे.।।२२।।त्यांचा वर्‍हाडांत मोठया प्रमाणांत लौकिक पसरला होता.ते फिरत फिरत शेगांवीं कीर्तन करण्यासाठी आले.।।२३।।शंकराच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम ठरला. कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे स्त्री-पुरुष जमले.।।२४।। बंकटलालही कीर्तन ऐकण्यासाठी शिवमंदिराकडे निघाला.वाटेत त्याला पितांबर नावाचा शिंपी भेटला.।।२५।।हा पितांबर शिंपी फार भोळां भाविक होता. त्यालाही बंकटलालाने समर्थांचे वृत्त सांगितले.।।२६।।दोघेही कीर्तनासाठी जात असतांना अवचितच त्यांना समर्थ तिथेच मागच्या बाजूस ओट्यावर बसलेले दिसले.।।२७।।तेव्हा ते दोघेही कीर्तन सोडुन श्रींकडे धावतच गेले. जसा एखादा निर्धन मनुष्य धनानी भरलेला घट पाहून अत्यानंदित होईल, तसेच पितांबर शिंपी व बंकटलालाचे झाले.।।२८।।स्वाती नक्षत्रातील मेघजल पाहून जसा चातक वा मेघदर्शनाने मोर किंवा चंद्राला पाहून चकोर जसा अत्यानंदित होतो, तसेच त्या दोघांना वाटले. जरा दूर उभे राहून ते समर्थांना काही खाण्यास आणु का? असे अतिशय विनयाने विचारू लागले.।।२९-३०।। त्यावर महाराज उत्तरले, तुला जर गरज वाटत असेल तर समोरच्या माळणीच्या घरातून माझ्यासाठी झुणकाभाकरी आण.।।३१।।ते ऐकताच बंकटलालाने सत्वर चून व अर्धी भाकरी त्या योगेश्वराच्या हातात आणुन दिली.।।३२।।चून भाकरी खात खात समर्थांनी पितांबरास ओढ्यावर जाऊन तांब्या बुडवून पाणी भरून आणण्यास सांगितले.।।३३।।त्यावर पितांबर म्हणाला,"सध्या ओढ्यास पाणी खूप कमी आहे. त्यामुळे पाण्यांत तांब्या बुडवून पाणी भरणे शक्य नाही. तसेच तें पाणी गुरांनी व जाणार्‍या येणार्‍यांनीं खराब केलें आहे. तेव्हा ते पाणी पिण्याच्या योग्य अजिबात नाही."।।३४-३५।।यास्तव तुमची मर्जी असल्यास मी दुसरीकडून तांब्याभरून स्वच्छ पाणी आणतो. तेव्हा गजानन महाराज वदले की आम्हाला ओढ्याशिवाय दुसरें पाणी नको.।।३६।। तू माझ्यासाठी नाल्याचेंच पाणी तांब्या बुडवून आण. उगीच ओंजळी-ओंजळींनीं तांब्यात पाणी भरुं नको.।।३७।।हे ऐकून पितांबर तांब्या घेऊन तात्काळ नाल्यावर गेला. पण तांब्या बुडेल इतके पाणी त्याला कुठेच दिसेना.।।३८।।केवळ पायांचे तळवे जेमतेम भिजतील एवढेच तिथे पाणी होते.पण हातांची ओंजळ करून तांब्यात पाणी भरण्यास समर्थांनी मनाई केली होती.।।३९।। पितांबराची अशी इकडे आड अन तिकडे विहीर अवस्था झाली. तो चिंतीत झाला. अखेर मनाचा हिय्या करुन त्याने तांब्या पाण्यात बुडवला.।४०।।तोच एक नवल घडले.जिथे जिथे पितांबर तांब्या पाण्यात बुडवी, तिथे तिथे ओढयाला खोल खड्डा पडे व तांब्या पूर्णपणे पाण्यात बुडे.।।४१।।त्याशिवाय अजून एक चमत्कार म्हणजे,नाल्यातील गढुळ पाणी तांब्यात येताच स्फटिकासमान निर्मळ होई. हे पाहून तो शिंपी अतिशय मनात चकित झाला.।।४२।।आज हे काय नवल घडले असा तो विचार करू लागला. शेवटी ही सर्व त्या योगेश्वराची महती आहे, याविषयी मनात संशय नको असे त्याने अनुमान काढले.।४३।।नंतर त्याने पाण्याने भरलेला तांब्या योगेश्वरांना आणुन दिला. झुणकाभाकर खाल्ल्यावर समर्थांनी ते पाणी पिले.।।४४।।श्रींनी यानंतर बंकटलालाला सुपारी मागितली व हसून म्हणाले केवळ माळिणीची झुणकाभाकर देऊन माझी सेवा करतोस कां?।।४५।।आता खिशांतून सुपारी काढुन मला फोडून दे. हे ऐकून बंकटलालाला अतिशय समाधान वाटले.।।४६।।सुपारीबरोबरच तो दोन पैसे समर्थांच्या हातावर दक्षिणा म्हणुन ठेवता झाला.।।४७।।त्या वेळी वर्‍हाड प्रांतांत खडकु दुदंडी व्याघ्रांबरी हीं मुसलमानी नाणीं व्यवहारीं वापरत होते.।।४८।।ते पैसे पाहून महाराज हसून बोलले, मला तू काय व्यापारी समजून हे अर्पण करतो आहेस का?।।४९।।ही नाणी तुमच्या व्यवहारासाठी ठीक आहेत.पण मला काही त्याची जरुरी नाही. मी केवळ भावभक्ति या एकाच नाण्यामुळे संतुष्ट होतो।।५०।।तेच तुझ्याजवळ होतें, म्हणूनच मी तुला पुन्हा भेटलो.याचा तू शांतपणे विचार कर म्हणजे ते तुझ्या ध्यानात येईल.।।५१।।आतां तुम्ही मंदिरात दोघे जाऊन कीर्तन ऐका. मी याच लिंबापाशीं बसून कीर्तनकथा ऐकतो.।।५२।।तेव्हा ते दोघे कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात गेले.महाराज लिंबापाशींच  बसले.गोविंदबुवांचें आरंभींचें निरुपण सुरु झालें.।।५३।।निरुपणासाठी बुवांनी भागवतातील हंसगीतामधील एकादश स्कंधाचा एक श्लोक घेतला होता.।।५४।। बुवांनीं पूर्वार्ध कथन केला.त्याचाच उत्तरार्ध समर्थ बोलू लागले.तें ऐकून गोविंदबुवा मनांत फारच आश्चर्यचकित झाले.।।५५।।आणि ते सर्वांना उद्देशून बोलले,"हा उत्तरार्ध वदणारा पुरुष खरोखर महाज्ञानी,अधिकारी दिसतो आहे,त्याला कीर्तनश्रवणासाठी मंदिरात घेऊन या."।।५६।। बंकटलाल ,पितांबर आणि इतर मंडळी लगेचच समर्थांना कीर्तनासाठी बोलावण्यास निघाली.।।५७।।श्रोतेहो, त्या सर्वांनी समर्थांस मंदिरात चालण्याची अत्यंत नम्र विनंती केली. पण बसल्या जागेवरून महाराज मुळींच हलले नाहीत.।।५८।।अखेर गोविंदबुवांनी बाहेर येऊन हात जोडुन नमस्कार केला व शिवमंदिरात येण्याची कृपा करावी अशी विनवणी केली.।।५९।।"तुम्ही साक्षात शंकरच आहांत,तेव्हा असे बाहेर बसणे बरे नव्हे.हे समर्था, देवाशिवाय मंदिर शून्य असते. माझें पूर्वजन्मींची पुण्याई आज फळाला आली,म्हणूनच साक्षात शिवचरण आज माझ्या दृष्टीस पडले.आज मला माझ्या कीर्तनाची फलप्राप्ती झाली. तेव्हा माझ्यासोबत महाराज तुम्ही मंदिरात चला, हे गुरुमूर्ती आता कृपा करून उशीर करू नका."।।६०-६२।।असे गोविंदबुवा बोलल्यावर समर्थ लगेच उत्तरले,"गोविंदा,आपल्या बोलण्यात व वागण्यात नेहेमीच एकवाक्यता ठेव.अवघ्या चराचराला ईश्वराने व्यापले आहे,आत-बाहेर,सगळीकडेच त्या ईश्वराशिवाय काही नाही.हे तू आत्ताच कीर्तनात प्रतिपादन केलेस.मग हा असा हट्ट का धरतो ? जें जें ज्याने सांगावें तेच त्याने आचरणात आणावे. साधकानें कधीही शब्दच्छल करू नये.भागवताचा श्लोक लोकांस समजावून सांगतोस, आणि त्याविरुद्ध वागतोस. गोविंदा, कीर्तनकाराचे हे वागणे बरे नव्हे.केवळ उदरनिर्वाहासाठी तू कीर्तनकार होऊ नकोस.जा,आता मंदिरात जाऊन कीर्तन समाप्त कर.ते मी इथूनच ऐकतो."।।६३-६७।।बुवा कीर्तनासाठी मंदिरात परत आले,आणि मोठ्याने सर्वांना बोलले,"तुमच्या शेगांवीं अमोल रत्न आले आहे,ते तुम्ही सांभाळा. आता हे शेगांव राहिलें नसून खचितच पंढरपूर झाले आहे. साक्षात चालते बोलते पांडुरंगच इथे आले आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. यांची सेवा करा. अगदी वेदवाक्याप्रमाणे यांची आज्ञा माना.तरच निःसंशय तुमचें कल्याण होईल. अनायासेच हा अनमोल पुण्यठेवा तुम्हाला प्राप्त झाला आहे.ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका."।।६८-७१।।कीर्तन संपल्यावर लोक आपापल्या घरी निघून गेले. बंकटलालही हे ऐकून अतिशय आनंदित होऊन समाधानाने घरी आला.।।७२।।त्याने आपल्या पित्याला कीर्तनाची हकीकत अत्यंत उत्साहाने सांगितली व बाबा आपण आपल्या घरी गजानन महाराजांना बोलावू या का ? असे विचारले.।।७३।।भवानीरामाने आपल्या मुलाचा वृत्तांत ऐकला व बंकटलालासच श्रींना घरी घेऊन येण्यास हर्षाने सांगितले.।।७४।।अशाप्रकारे वडिलांनी संमती दिल्यावर बंकटलालाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता गुरुमूर्ती कधी भेटेल आणि कधी माझ्या घरी येणार असा तो सतत विचार करू लागला.।।७५।।त्यानंतर चार दिवसांनी सायंकाळी माणिक चौकांत सद्‌गुरुनाथांचे बंकटलालास पुन्हा दर्शन झाले.।।७६।।ती सूर्यास्ताची वेळ होती खरी, पण बंकटलालाच्या भाग्यानें माणिक चौकरूपी पूर्व दिशेला जणू काही बोधसूर्यच उदयास आला.।।७७।।सांजवेळी गुराखी दिवसभर वनात चरावयास नेलेल्या आपल्या गाईंना परत घराकडे नेऊ लागले होते.तो त्या गाई तेव्हा समर्थांच्याभोवती एकत्र जमा झाल्या होत्या.।।७८।।साक्षात नंदसुतच इथे प्रगटला आहे असा भास होत होता. सभोवतालच्या झाडांवर बसून पक्षी आनंदाने किलकिलाट करत होते.।।७९।।दुकानदार आपल्या दुकानात संध्याकाळच्या दिवाबत्तीची तयारी करू लागले होते. अशा वेळी बंकट महाराजांना घेऊन आपल्या घरी आला.।।८०।।बंकटलालाच्या पित्यास सदगुरुमूर्ती पहाता क्षणीच अतीव आनंद झाला.भवानीरामाने त्यांस साष्टांग नमस्कार करून अत्यंत आदराने पाटावर बसावयास आसन दिले.।।८१।।आणि हात जोडुन विनंती केली, "आता इथे भोजनच करावे. या प्रदोष वेळीं साक्षात पार्वतीकांताचेच तुमच्या रूपात माझ्या घरी आगमन झाले आहे. प्रदोषकाळी शिव आराधन घडले तर तो मनुष्य अत्यंत भाग्यशाली होतो, अशी स्कंदपुराणातील कथा मी ऐकली आहे."।।८२-८३।।असे म्हणुन त्यांनी एक बिल्वपत्र समर्थांच्या मस्तकी परमभक्तीनें ठेवले.।।८४।।आता इथेच भोजन करा असे मी बोलून तर गेलो खरा, पण स्वयंपाकास अजून थोडा अवकाश आहे.।।८५।।समर्थ जर स्वयंपाक होईपर्यंत इथे थांबले नाहीत तर प्रदोषकाळी पार्वतीकांत माझ्या घरातून उपाशी निघून गेल्याचे पातक मला लागेल.।।८६।।ह्यांवर काय उपाय करावा बरे? मी तर अगदी धर्मसंकटातच सापडलो आहे,असा ते विचार करू लागले.एव्हाना समर्थांच्या दर्शनासाठी घरात स्त्री-पुरुषांची गर्दीही जमू लागली होती.।।८७।।अखेर घरातील दुपारच्या जेवणासाठी केलेल्या पुऱ्याच आपण नेवैद्य म्हणुन समर्थांपुढे ठेवू या असा त्या बंकटलालाच्या पित्याने विचार केला.।।८८।।समर्थ अंतर्यामी आहेत, माझ्या मनात काही कपट नाही हे ते नक्की जाणतील.श्रद्धा, भाव असेल तर उमापती नक्की भेटतो, असा पुराणातील सिद्धांत आहे.।।८९।।मी श्रींना शिळे अन्न मुद्दामून अर्पण करीत नाही. तसेच शिजवलेल्या अन्नांस शिळे म्हणणे योग्यही नव्हे.।।९०।।मनात असा विचार करून त्यांनी तत्काळ तयारी सुरु केली व समर्थांच्यासमोर नेवैद्याचे पान आणुन ठेवले.।।९१।।भवानीरामाने महाराजांच्या कपाळाला बुक्का लावला. गळ्यात पुष्पहार घातला.भोजनासाठी पुऱ्या,बदाम,खारका, केळीं, मोसंबीं व इतर फळे अर्पण केली.।।९२।।गुरुमूर्तीसुद्धा सर्व काही प्रसन्नपणे सेविते झाले.जे जे पानात वाढले जात होते, ते ते सर्व भरभर खाऊ लागले.।।९३।।असे जवळ जवळ तीन शेर अन्न त्यांनी खाल्ले.त्या रात्री श्रीगजानन महाराज बंकटलालाच्याच घरी राहिले.।।९४।।दुसऱ्या दिवशी पहाटे बंकटलालाने अतिशय आनंदाने समर्थांना मंगल स्नान घातले.त्या सोहळ्याचे वर्णन तरी किती करावे?।।९५।। तिथे जमलेल्या स्त्रीपुरुषांनी अगदी स्वत:च्या आवडीनुसार श्रींना स्नान घातले.गरम पाण्याच्या सुमारें शंभर घागरी त्या सोहळ्यासाठी वापरल्या गेल्या.।।९६।।कोणी शिकेकाई लावत होते,कोणी समर्थांचे हात तर कोणी समर्थांचे चरण आवडीने साबण लावून स्वच्छ करीत होते.।।९७।।तर इतर काही जण दवणा,हीना,चमेली वा बेलाच्या तेलाने समर्थांना स्वहस्ते मालिश करू लागले.।।९८।।बंकटलालाच्या घरी कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती.त्यामुळे अशा विविध उपचारांनी ते सर्व जण श्रींना मंगलस्नान घालू लागले.।।९९।। स्नानविधि संपल्यावर त्यांना पितांबर नेसवण्यात आला. नंतर त्या योगिराजाला अतिसन्मानाने गादीवर स्थानापन्न केले गेले.।।१००।।तिथे जमलेल्या भक्तांनी श्रींच्या भाळी केशरी गंध लावले व कंठी निरनिराळे हार घातले. तर कोणी मस्तकावर तुळशीमंजिरी वाहूं लागले.।।१०१।।नाना तऱ्हेचे नैवेद्य समर्थांना अर्पण करण्यात आले.खचितच त्या बंकटलालाचें भाग्य उदयांस आले.।।१०२।।त्या बंकटलालाच्या घराला जणु  द्वारकेचे स्वरूप प्राप्त झाले.त्या दिवशी शिव शंभो महादेवाचा वार, सोमवार होता.।।१०३।।अशा रितीने अवघ्या मंडळींनीं आपापले मनोरथ पूर्ण केले.इच्छाराम शेटजींची मात्र अजून एक मनीषा होती.।।१०४।।हा बंकटलालाचा चुलत बंधु होता.तो शिवभक्त असून अतिशय भाविक मनाचा होता.त्याला वाटले की आज सोमवारचा माझा उपवास आहेच आणि प्रत्यक्ष चालते बोलते शंकरच घरी आलेले आहेत.तेव्हा सायंकाळी त्यांची यथासांग पूजा करून आपण उपवासाचे पारणं करू.ही इच्छा त्याच्या अंतरी निर्माण झाली.।।१०५-१०७।।तो अस्तमानाची वेळ झाली, सूर्यनारायण मावळतीला गेला.प्रदोषकाली इच्छारामाने स्नान केले.।।१०८।।नंतर पूजासाहित्य घेऊन अत्यंत श्रद्धेने त्याने साधू गजाननाचे पूजन केले.।।१०९।।आणि प्रार्थना केली,"हे गुरुराया,आपले भोजन जरी दुपारीच झाले आहे, तरी आताही थोडे खावे.आपण जेवल्याशिवाय मी माझा सोमवारचा उपवास सोडणार नाही.तुम्ही अवघ्या भक्तांच्या मनीषा पूर्ण केल्या, तेव्हा माझीही ही इच्छा पुरवून आपण माझ्यावर कृपा करावी."।।११०-११२।।तिथे जमलेले अवघे जन हे कौतुक बघत होते.तोच इच्छाराम नैवेद्याचे पान घेऊन आला.।।११३।।त्या नैवेद्याचा थाट काय वर्णावा?आंबेमोहर तांदळापासून बनवलेल्या गरम गरम भाताच्या दोन मुदी इतर नानाविध पक्वान्नांसहित त्या पात्रात होत्या.।।११४।।जिलेबी,राघवदास,मोतीचूर लाडु,करंज्या,अनारसे,खीरी,निरनिराळ्या भाज्यांचे प्रकार इत्यादींनी युक्त अशा त्यां नैवेद्याचे वर्णन तरी कोठवर करावे?।।११५।।तसेच ताज्या दह्याची वाटी आणि अगणित चटण्या व कोशिंबिरी त्या पानांत होत्या. वरण भाताच्याच शेजारी साजूक तुपाची वाटी ठेवलेली होती.।।११६।।असा जवळ जवळ चार माणसांना पुरेल इतका परिपूर्ण नैवेद्य इच्छारामानें समर्थांपुढें आणून ठेवला.।।११७।।तो नैवेद्य पाहून महाराज मनात विचार करू लागले,"अरे गणप्या, इथे आल्यापासून सतत तुझे खाणेच चालू आहे. आता हे ही अन्न तू अवघेच खाऊन टाक.हे आचरण जरी अघोरी असले तरी तू अन्नाचा अपमान करू नकोस.ह्या अघोरीवृतीला इथे जमलेले सर्व लोक बघत आहेत."।।११८-११९।।असे बोलून महाराज भोजनास बसले व पानातील सर्व अन्न त्यांनी संपवले. अक्षरश: मीठ,लिंबू हे ही पात्रात ठेवले नाही.।।१२०।।अति आग्रह केल्यास काय परिणाम होतो हेच दाखविण्यासाठी गुरुवराने ही लीला केली.।।१२१।।जेवणानंतर महाराजांनी खणाणून उलटी केली.नुकतेच खाल्लेले अन्न उलटीद्वारे बाहेर पडले. असाच प्रकार एकदा श्रीरामदासांनी केला होता.।।१२२।।श्री रामदास स्वामींच्या मनात एकदा खीर खाण्याची प्रबळ इच्छा झाली.त्या मोहावर मात करण्यासाठी ते आकंठ खीर प्याले.।।१२३।।ती उलटीद्वारे बाहेर काढुन श्रीरामदासस्वामी समर्थ परत ती खाऊ लागले. अशा प्रकारे अन्नवासनेवर त्यांनी जय मिळविला.।।१२४।।त्याचप्रमाणे योगकला अवगत असूनही लोकाग्रहाला शीघ्र आळा घालण्यासाठीच गजानन महाराजांनी हा उलटीचा प्रकार केला.।।१२५।।संत पुरुषाचे आचरण हे नेहमीच पुढील पिढीला मार्गदर्शक असते.तसेच विधीलिखित वा निसर्गधर्माचे संत कायमच संरक्षण करतात.।।१२६।।तेच समर्थांनी इथे केले. अति आग्रह करणे हे चांगलें नाही व तो विपरीत फळ देईल असेच यांतून त्यांनी लोकांस सुचविले.।।१२७।।ते असो.उलटी झालेली जागा स्वच्छ केली गेली.महाराजांनाही स्नान घालून परत योग्य जागी स्थानापन्न केले गेले.।।१२८।।अतिशय प्रसन्न दिसणाऱ्या महाराजांचे सर्व स्त्री-पुरुष दर्शन घेऊ लागले. तोच तिथे भजन करणाऱ्या दोन दिंडया आल्या.।।१२९।।त्या भजनी मंडळींचे आवाज अत्यंत सुस्वर होते.खड्या पहाडी आवाजात ते विठ्ठलाचा नामगजर तन्मयतेने करुं लागले.।।१३०।।त्यांच सुरांत सूर मिसळुन आसनस्थ महाराज "गणगण गणांत बोते" हे भजन करू लागले.।।१३१।।समर्थ सदा सर्वदा हेच भजन टिचक्या वाजवून करीत असत. असा तो आनंद सोहळा त्या ठिकाणी रात्रभर सुरु होता.।।१३२।।सतत ’गण गण’ हें भजन महाराज करत असल्यामुळे लोक त्यांना श्री गजानन म्हणु लागले.।।१३३।।जो स्वयमेव ब्रह्म होता त्यांस नावाचे खरोखर प्रयोजन ते काय?केवळ प्रकृतीच्या आश्रयासच हे नामारूपाचे संबोधन लागते.।।१३४।।हा योगेश्वर अस्ति-भाति-प्रियाठायींच सतत निमग्न असे.त्या आनंदाचे वर्णन करावयास योग्य अशी उपमा सापडणे केवळ अशक्यच आहे.।।१३५।।पंढरपूर येथे आषाढी एकादशीस, वा गोदातीरी सिंहस्थ पर्वास अथवा कुंभमेळ्यास हरिद्वारीं अतिशय गर्दी होते.।।१३६।।तशीच गर्दी शेगावी बंकटलालाच्या घरांत होऊ लागली.दूरदुरून असंख्य भक्तगण श्रींच्या दर्शनास येत होते.।।१३७।।त्यांच्यासाठी स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल वा नारायण  होते.ते जणु काही निश्चयरूपी विटेवर पाय ठेवून उभे होते.।।१३८।।त्यांचे वचन हे गोदातीर व आनंद हेच हरिद्वार होते.तर बंकटलालाचे घर हेच विठ्ठल मंदिर होते.अशा रितीने शेगांव नगरी अवघी गजबजून गेली.।।१३९।।ज्याने ब्रह्मपदास प्राप्त केले, त्यांस जातीचे प्रयोजनच काय? सूर्यप्रकाश सर्व ठिकाणी सारखाच प्रकाश देतो.।।१४०।।शेगावी नित्य नव्या यात्रा भरू लागल्या.भक्त सतत समाराधना करू लागले.त्याचे वर्णन करता करता शेषही निःसंशय थकून जाईल.।।१४१।।मी तर एखाद्या कीटकासमानच आहे,तेव्हा तिथे माझा तो काय पाडाव लागणार? हे सर्व काही स्वयं श्री गजाननच माझ्या मुखातून वदवून घेत आहे. मी तर केवळ एक निमित्तमात्र आहे.।।१४२।।आता मी इथे श्री समर्थांच्या  दिनचर्येचे थोडे वर्णन करतो.खरे तर त्यांचे अगाध चरित्र गायन मजसारख्या पामरास शक्य नाही.।।१४३।।कधी मंगलस्नान करावे, तर कधी ओढ्याचे गढूळ जल प्राशन करावे.त्यांच्या दिनचर्येचा ठराविक असा कोणताही नियम नव्हता.वायूच्या गतीची दिशा कोणांस ठरविता येते का?।।१४४-१४५।।श्रींना चिलीम अतिशय आवडत असे. जरी ते चिलीम वरचेवर ओढत असत,तरी ते अर्थातच व्यसनाधीन झाले नव्हते.ते एक केवळ त्यांचे कौतुक होते.।।१४६।।असो, आता पुढील अध्याय भावपूर्वक ऐकावा.श्रोते हो, तुमच्या भाग्यामुळे ही पर्वणी तुम्हांस प्राप्त झाली आहे, ती तुम्ही दवडू नका.।।१४७।।भाविकांना हें श्रीगजाननचरित्र आदर्श ठरो हीच हा दासगणू हात जोडुन ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे.।।१४८।।श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥