Sep 12, 2019

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय २




॥ श्रीगणेशाय नमः ॥ 

हे अज, अजिता, सर्वेश्वरा, चंद्रभागातटविहारा तुझा जयजयकार असो.हे पूर्णब्रह्मा,रुक्मिणीवरा,दीनबंधो तू मजकडे कृपादृष्टीने पहा.।।१।।हे देवा, तुझ्या वशिल्यावांचून अवघेंच व्यर्थ आहे. देहात जर प्राण नसेल तर निष्प्राण देहास कोण विचारतो ?।।२।।पद्मनाभा, सरोवराचे दिव्य सौंदर्य केवळ त्यातील जलामुळेच असते.आतल्या रसरशीत गाभ्यामुळेच टरफलाला महत्त्व येते.।।३।।त्याचप्रमाणे तुझी कृपा शरणांगतास सामर्थ्यवान बनवते. तेव्हा आता माझे पाप, ताप आणि दैन्य तू दूर कर,हेच माझे तुझ्या चरणांशी मागणें आहे।।४।।मागील अध्यायात समर्थ निघून गेले ही कथा आली आहे. त्यामुळे बंकटलालास हुरहूर वाटूं लागली.।।५।।त्यास अन्नपाणी गोड लागेनासे झाले. बंकटलालाच्या मनी सतत समर्थांचा ध्यास लागला.ते गजाननाचें रुप त्याच्या डोळ्यासमोरुन हालेनासे झाले.।।६।। त्याला जिकडे पहावें तिकडे केवळ समर्थांचा भास होऊ लागला. श्रोते हो भक्ताच्या या स्थितीला ध्यास असे नाव आहे.ह्या काही पोरचेष्टा नव्हेत.।।७।। वनात चुकलेल्या धेनूच्या वासराची जशी स्थिती होते, त्याचप्रमाणे हे बुधजनहो बंकटलालाची अवस्था झाली.।।८।।परंतु हे मनीचे हितगुज कोणाला सांगावे हे त्याला कळेना.स्वत:च्या वडिलांपाशी हे सर्व बोलण्याची त्याची छाती होईना.।।९।।अशा रितीने त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. अक्षरश: अवघे शेगांव धुंडाळूनसुद्धा त्याला समर्थांचा काही पत्ता लागेना.।।१०।।तो तसाच घरीं येतां त्याचे वडील भवानीराम विचारू लागले,"बाळा, आज असा तू उदास का दिसतो आहेस?नेहेमीसारखा उत्साही दिसत नाहीस? चेहराही उतरलेला दिसतोय तुझा. तुला कसला त्रास होतोय, ते तू मला सांग. तू तरुण आहेस, तुला कसलीच कमी नाही. असे असूनही असा चिंतातुर का बरे दिसतोस? किंवा काही शारिरीक व्याधींने त्रस्त आहेस का? मुलाने वडिलांपासुन कुठलीही गोष्ट कधी लपवू नये."।।११-१४।।तेव्हा बंकटलालाने आपल्या पित्याचें कांहीं तरी सांगून समाधान केले व पुन्हा शेगावात समर्थांना शोधत फिरुं लागला।।१५।।बंकटलालाचे शेजारीं एक सज्जन गृहस्थ रहात होते. ते जमीनदार होते, परंतु त्याचा त्यांना गर्व नव्हता.।।१६।।त्यांचे नाव रामाजीपंत देशमुख होते. ते आता वयोवृद्ध झाले होते.त्यांना बंकटलालानें समर्थांविषयी इत्यंभूत हकीकत सांगितली.।।१७।।तेव्हा ते बंकटलालाला म्हणाले,"तू हा जो वृत्तान्त सांगितला, तो ऐकून हे जे कोणी तुला भेटले ते कोणीतरी थोर योगी असावेत. योग्यांशिवाय असे वर्तन कुठे पहावयास मिळत नाही.पूर्वसुकृतावाचून अशा थोर विभूतींचे दर्शन होत नाही.तुला त्यांचे दर्शन झाले, तुझा जन्म खरेच धन्य झाला. ते तुला परत भेटले तर तू मलाही त्यांच्या दर्शनास ने."।।१८-२०।।असेच चार दिवस गेले, बंकटलालाला क्षणभरसुद्धा श्रींचा विसर पडला नाही.।।२१।।गोविंदबुवा टाकळीकर नावाचे एक कीर्तनकार होते.त्यांचे मधुर कीर्तन ऐकून जणु शारंगधर प्रसन्न होत असे.।।२२।।त्यांचा वर्‍हाडांत मोठया प्रमाणांत लौकिक पसरला होता.ते फिरत फिरत शेगांवीं कीर्तन करण्यासाठी आले.।।२३।।शंकराच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम ठरला. कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे स्त्री-पुरुष जमले.।।२४।। बंकटलालही कीर्तन ऐकण्यासाठी शिवमंदिराकडे निघाला.वाटेत त्याला पितांबर नावाचा शिंपी भेटला.।।२५।।हा पितांबर शिंपी फार भोळां भाविक होता. त्यालाही बंकटलालाने समर्थांचे वृत्त सांगितले.।।२६।।दोघेही कीर्तनासाठी जात असतांना अवचितच त्यांना समर्थ तिथेच मागच्या बाजूस ओट्यावर बसलेले दिसले.।।२७।।तेव्हा ते दोघेही कीर्तन सोडुन श्रींकडे धावतच गेले. जसा एखादा निर्धन मनुष्य धनानी भरलेला घट पाहून अत्यानंदित होईल, तसेच पितांबर शिंपी व बंकटलालाचे झाले.।।२८।।स्वाती नक्षत्रातील मेघजल पाहून जसा चातक वा मेघदर्शनाने मोर किंवा चंद्राला पाहून चकोर जसा अत्यानंदित होतो, तसेच त्या दोघांना वाटले. जरा दूर उभे राहून ते समर्थांना काही खाण्यास आणु का? असे अतिशय विनयाने विचारू लागले.।।२९-३०।। त्यावर महाराज उत्तरले, तुला जर गरज वाटत असेल तर समोरच्या माळणीच्या घरातून माझ्यासाठी झुणकाभाकरी आण.।।३१।।ते ऐकताच बंकटलालाने सत्वर चून व अर्धी भाकरी त्या योगेश्वराच्या हातात आणुन दिली.।।३२।।चून भाकरी खात खात समर्थांनी पितांबरास ओढ्यावर जाऊन तांब्या बुडवून पाणी भरून आणण्यास सांगितले.।।३३।।त्यावर पितांबर म्हणाला,"सध्या ओढ्यास पाणी खूप कमी आहे. त्यामुळे पाण्यांत तांब्या बुडवून पाणी भरणे शक्य नाही. तसेच तें पाणी गुरांनी व जाणार्‍या येणार्‍यांनीं खराब केलें आहे. तेव्हा ते पाणी पिण्याच्या योग्य अजिबात नाही."।।३४-३५।।यास्तव तुमची मर्जी असल्यास मी दुसरीकडून तांब्याभरून स्वच्छ पाणी आणतो. तेव्हा गजानन महाराज वदले की आम्हाला ओढ्याशिवाय दुसरें पाणी नको.।।३६।। तू माझ्यासाठी नाल्याचेंच पाणी तांब्या बुडवून आण. उगीच ओंजळी-ओंजळींनीं तांब्यात पाणी भरुं नको.।।३७।।हे ऐकून पितांबर तांब्या घेऊन तात्काळ नाल्यावर गेला. पण तांब्या बुडेल इतके पाणी त्याला कुठेच दिसेना.।।३८।।केवळ पायांचे तळवे जेमतेम भिजतील एवढेच तिथे पाणी होते.पण हातांची ओंजळ करून तांब्यात पाणी भरण्यास समर्थांनी मनाई केली होती.।।३९।। पितांबराची अशी इकडे आड अन तिकडे विहीर अवस्था झाली. तो चिंतीत झाला. अखेर मनाचा हिय्या करुन त्याने तांब्या पाण्यात बुडवला.।४०।।तोच एक नवल घडले.जिथे जिथे पितांबर तांब्या पाण्यात बुडवी, तिथे तिथे ओढयाला खोल खड्डा पडे व तांब्या पूर्णपणे पाण्यात बुडे.।।४१।।त्याशिवाय अजून एक चमत्कार म्हणजे,नाल्यातील गढुळ पाणी तांब्यात येताच स्फटिकासमान निर्मळ होई. हे पाहून तो शिंपी अतिशय मनात चकित झाला.।।४२।।आज हे काय नवल घडले असा तो विचार करू लागला. शेवटी ही सर्व त्या योगेश्वराची महती आहे, याविषयी मनात संशय नको असे त्याने अनुमान काढले.।४३।।नंतर त्याने पाण्याने भरलेला तांब्या योगेश्वरांना आणुन दिला. झुणकाभाकर खाल्ल्यावर समर्थांनी ते पाणी पिले.।।४४।।श्रींनी यानंतर बंकटलालाला सुपारी मागितली व हसून म्हणाले केवळ माळिणीची झुणकाभाकर देऊन माझी सेवा करतोस कां?।।४५।।आता खिशांतून सुपारी काढुन मला फोडून दे. हे ऐकून बंकटलालाला अतिशय समाधान वाटले.।।४६।।सुपारीबरोबरच तो दोन पैसे समर्थांच्या हातावर दक्षिणा म्हणुन ठेवता झाला.।।४७।।त्या वेळी वर्‍हाड प्रांतांत खडकु दुदंडी व्याघ्रांबरी हीं मुसलमानी नाणीं व्यवहारीं वापरत होते.।।४८।।ते पैसे पाहून महाराज हसून बोलले, मला तू काय व्यापारी समजून हे अर्पण करतो आहेस का?।।४९।।ही नाणी तुमच्या व्यवहारासाठी ठीक आहेत.पण मला काही त्याची जरुरी नाही. मी केवळ भावभक्ति या एकाच नाण्यामुळे संतुष्ट होतो।।५०।।तेच तुझ्याजवळ होतें, म्हणूनच मी तुला पुन्हा भेटलो.याचा तू शांतपणे विचार कर म्हणजे ते तुझ्या ध्यानात येईल.।।५१।।आतां तुम्ही मंदिरात दोघे जाऊन कीर्तन ऐका. मी याच लिंबापाशीं बसून कीर्तनकथा ऐकतो.।।५२।।तेव्हा ते दोघे कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात गेले.महाराज लिंबापाशींच  बसले.गोविंदबुवांचें आरंभींचें निरुपण सुरु झालें.।।५३।।निरुपणासाठी बुवांनी भागवतातील हंसगीतामधील एकादश स्कंधाचा एक श्लोक घेतला होता.।।५४।। बुवांनीं पूर्वार्ध कथन केला.त्याचाच उत्तरार्ध समर्थ बोलू लागले.तें ऐकून गोविंदबुवा मनांत फारच आश्चर्यचकित झाले.।।५५।।आणि ते सर्वांना उद्देशून बोलले,"हा उत्तरार्ध वदणारा पुरुष खरोखर महाज्ञानी,अधिकारी दिसतो आहे,त्याला कीर्तनश्रवणासाठी मंदिरात घेऊन या."।।५६।। बंकटलाल ,पितांबर आणि इतर मंडळी लगेचच समर्थांना कीर्तनासाठी बोलावण्यास निघाली.।।५७।।श्रोतेहो, त्या सर्वांनी समर्थांस मंदिरात चालण्याची अत्यंत नम्र विनंती केली. पण बसल्या जागेवरून महाराज मुळींच हलले नाहीत.।।५८।।अखेर गोविंदबुवांनी बाहेर येऊन हात जोडुन नमस्कार केला व शिवमंदिरात येण्याची कृपा करावी अशी विनवणी केली.।।५९।।"तुम्ही साक्षात शंकरच आहांत,तेव्हा असे बाहेर बसणे बरे नव्हे.हे समर्था, देवाशिवाय मंदिर शून्य असते. माझें पूर्वजन्मींची पुण्याई आज फळाला आली,म्हणूनच साक्षात शिवचरण आज माझ्या दृष्टीस पडले.आज मला माझ्या कीर्तनाची फलप्राप्ती झाली. तेव्हा माझ्यासोबत महाराज तुम्ही मंदिरात चला, हे गुरुमूर्ती आता कृपा करून उशीर करू नका."।।६०-६२।।असे गोविंदबुवा बोलल्यावर समर्थ लगेच उत्तरले,"गोविंदा,आपल्या बोलण्यात व वागण्यात नेहेमीच एकवाक्यता ठेव.अवघ्या चराचराला ईश्वराने व्यापले आहे,आत-बाहेर,सगळीकडेच त्या ईश्वराशिवाय काही नाही.हे तू आत्ताच कीर्तनात प्रतिपादन केलेस.मग हा असा हट्ट का धरतो ? जें जें ज्याने सांगावें तेच त्याने आचरणात आणावे. साधकानें कधीही शब्दच्छल करू नये.भागवताचा श्लोक लोकांस समजावून सांगतोस, आणि त्याविरुद्ध वागतोस. गोविंदा, कीर्तनकाराचे हे वागणे बरे नव्हे.केवळ उदरनिर्वाहासाठी तू कीर्तनकार होऊ नकोस.जा,आता मंदिरात जाऊन कीर्तन समाप्त कर.ते मी इथूनच ऐकतो."।।६३-६७।।बुवा कीर्तनासाठी मंदिरात परत आले,आणि मोठ्याने सर्वांना बोलले,"तुमच्या शेगांवीं अमोल रत्न आले आहे,ते तुम्ही सांभाळा. आता हे शेगांव राहिलें नसून खचितच पंढरपूर झाले आहे. साक्षात चालते बोलते पांडुरंगच इथे आले आहेत. त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. यांची सेवा करा. अगदी वेदवाक्याप्रमाणे यांची आज्ञा माना.तरच निःसंशय तुमचें कल्याण होईल. अनायासेच हा अनमोल पुण्यठेवा तुम्हाला प्राप्त झाला आहे.ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका."।।६८-७१।।कीर्तन संपल्यावर लोक आपापल्या घरी निघून गेले. बंकटलालही हे ऐकून अतिशय आनंदित होऊन समाधानाने घरी आला.।।७२।।त्याने आपल्या पित्याला कीर्तनाची हकीकत अत्यंत उत्साहाने सांगितली व बाबा आपण आपल्या घरी गजानन महाराजांना बोलावू या का ? असे विचारले.।।७३।।भवानीरामाने आपल्या मुलाचा वृत्तांत ऐकला व बंकटलालासच श्रींना घरी घेऊन येण्यास हर्षाने सांगितले.।।७४।।अशाप्रकारे वडिलांनी संमती दिल्यावर बंकटलालाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता गुरुमूर्ती कधी भेटेल आणि कधी माझ्या घरी येणार असा तो सतत विचार करू लागला.।।७५।।त्यानंतर चार दिवसांनी सायंकाळी माणिक चौकांत सद्‌गुरुनाथांचे बंकटलालास पुन्हा दर्शन झाले.।।७६।।ती सूर्यास्ताची वेळ होती खरी, पण बंकटलालाच्या भाग्यानें माणिक चौकरूपी पूर्व दिशेला जणू काही बोधसूर्यच उदयास आला.।।७७।।सांजवेळी गुराखी दिवसभर वनात चरावयास नेलेल्या आपल्या गाईंना परत घराकडे नेऊ लागले होते.तो त्या गाई तेव्हा समर्थांच्याभोवती एकत्र जमा झाल्या होत्या.।।७८।।साक्षात नंदसुतच इथे प्रगटला आहे असा भास होत होता. सभोवतालच्या झाडांवर बसून पक्षी आनंदाने किलकिलाट करत होते.।।७९।।दुकानदार आपल्या दुकानात संध्याकाळच्या दिवाबत्तीची तयारी करू लागले होते. अशा वेळी बंकट महाराजांना घेऊन आपल्या घरी आला.।।८०।।बंकटलालाच्या पित्यास सदगुरुमूर्ती पहाता क्षणीच अतीव आनंद झाला.भवानीरामाने त्यांस साष्टांग नमस्कार करून अत्यंत आदराने पाटावर बसावयास आसन दिले.।।८१।।आणि हात जोडुन विनंती केली, "आता इथे भोजनच करावे. या प्रदोष वेळीं साक्षात पार्वतीकांताचेच तुमच्या रूपात माझ्या घरी आगमन झाले आहे. प्रदोषकाळी शिव आराधन घडले तर तो मनुष्य अत्यंत भाग्यशाली होतो, अशी स्कंदपुराणातील कथा मी ऐकली आहे."।।८२-८३।।असे म्हणुन त्यांनी एक बिल्वपत्र समर्थांच्या मस्तकी परमभक्तीनें ठेवले.।।८४।।आता इथेच भोजन करा असे मी बोलून तर गेलो खरा, पण स्वयंपाकास अजून थोडा अवकाश आहे.।।८५।।समर्थ जर स्वयंपाक होईपर्यंत इथे थांबले नाहीत तर प्रदोषकाळी पार्वतीकांत माझ्या घरातून उपाशी निघून गेल्याचे पातक मला लागेल.।।८६।।ह्यांवर काय उपाय करावा बरे? मी तर अगदी धर्मसंकटातच सापडलो आहे,असा ते विचार करू लागले.एव्हाना समर्थांच्या दर्शनासाठी घरात स्त्री-पुरुषांची गर्दीही जमू लागली होती.।।८७।।अखेर घरातील दुपारच्या जेवणासाठी केलेल्या पुऱ्याच आपण नेवैद्य म्हणुन समर्थांपुढे ठेवू या असा त्या बंकटलालाच्या पित्याने विचार केला.।।८८।।समर्थ अंतर्यामी आहेत, माझ्या मनात काही कपट नाही हे ते नक्की जाणतील.श्रद्धा, भाव असेल तर उमापती नक्की भेटतो, असा पुराणातील सिद्धांत आहे.।।८९।।मी श्रींना शिळे अन्न मुद्दामून अर्पण करीत नाही. तसेच शिजवलेल्या अन्नांस शिळे म्हणणे योग्यही नव्हे.।।९०।।मनात असा विचार करून त्यांनी तत्काळ तयारी सुरु केली व समर्थांच्यासमोर नेवैद्याचे पान आणुन ठेवले.।।९१।।भवानीरामाने महाराजांच्या कपाळाला बुक्का लावला. गळ्यात पुष्पहार घातला.भोजनासाठी पुऱ्या,बदाम,खारका, केळीं, मोसंबीं व इतर फळे अर्पण केली.।।९२।।गुरुमूर्तीसुद्धा सर्व काही प्रसन्नपणे सेविते झाले.जे जे पानात वाढले जात होते, ते ते सर्व भरभर खाऊ लागले.।।९३।।असे जवळ जवळ तीन शेर अन्न त्यांनी खाल्ले.त्या रात्री श्रीगजानन महाराज बंकटलालाच्याच घरी राहिले.।।९४।।दुसऱ्या दिवशी पहाटे बंकटलालाने अतिशय आनंदाने समर्थांना मंगल स्नान घातले.त्या सोहळ्याचे वर्णन तरी किती करावे?।।९५।। तिथे जमलेल्या स्त्रीपुरुषांनी अगदी स्वत:च्या आवडीनुसार श्रींना स्नान घातले.गरम पाण्याच्या सुमारें शंभर घागरी त्या सोहळ्यासाठी वापरल्या गेल्या.।।९६।।कोणी शिकेकाई लावत होते,कोणी समर्थांचे हात तर कोणी समर्थांचे चरण आवडीने साबण लावून स्वच्छ करीत होते.।।९७।।तर इतर काही जण दवणा,हीना,चमेली वा बेलाच्या तेलाने समर्थांना स्वहस्ते मालिश करू लागले.।।९८।।बंकटलालाच्या घरी कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती.त्यामुळे अशा विविध उपचारांनी ते सर्व जण श्रींना मंगलस्नान घालू लागले.।।९९।। स्नानविधि संपल्यावर त्यांना पितांबर नेसवण्यात आला. नंतर त्या योगिराजाला अतिसन्मानाने गादीवर स्थानापन्न केले गेले.।।१००।।तिथे जमलेल्या भक्तांनी श्रींच्या भाळी केशरी गंध लावले व कंठी निरनिराळे हार घातले. तर कोणी मस्तकावर तुळशीमंजिरी वाहूं लागले.।।१०१।।नाना तऱ्हेचे नैवेद्य समर्थांना अर्पण करण्यात आले.खचितच त्या बंकटलालाचें भाग्य उदयांस आले.।।१०२।।त्या बंकटलालाच्या घराला जणु  द्वारकेचे स्वरूप प्राप्त झाले.त्या दिवशी शिव शंभो महादेवाचा वार, सोमवार होता.।।१०३।।अशा रितीने अवघ्या मंडळींनीं आपापले मनोरथ पूर्ण केले.इच्छाराम शेटजींची मात्र अजून एक मनीषा होती.।।१०४।।हा बंकटलालाचा चुलत बंधु होता.तो शिवभक्त असून अतिशय भाविक मनाचा होता.त्याला वाटले की आज सोमवारचा माझा उपवास आहेच आणि प्रत्यक्ष चालते बोलते शंकरच घरी आलेले आहेत.तेव्हा सायंकाळी त्यांची यथासांग पूजा करून आपण उपवासाचे पारणं करू.ही इच्छा त्याच्या अंतरी निर्माण झाली.।।१०५-१०७।।तो अस्तमानाची वेळ झाली, सूर्यनारायण मावळतीला गेला.प्रदोषकाली इच्छारामाने स्नान केले.।।१०८।।नंतर पूजासाहित्य घेऊन अत्यंत श्रद्धेने त्याने साधू गजाननाचे पूजन केले.।।१०९।।आणि प्रार्थना केली,"हे गुरुराया,आपले भोजन जरी दुपारीच झाले आहे, तरी आताही थोडे खावे.आपण जेवल्याशिवाय मी माझा सोमवारचा उपवास सोडणार नाही.तुम्ही अवघ्या भक्तांच्या मनीषा पूर्ण केल्या, तेव्हा माझीही ही इच्छा पुरवून आपण माझ्यावर कृपा करावी."।।११०-११२।।तिथे जमलेले अवघे जन हे कौतुक बघत होते.तोच इच्छाराम नैवेद्याचे पान घेऊन आला.।।११३।।त्या नैवेद्याचा थाट काय वर्णावा?आंबेमोहर तांदळापासून बनवलेल्या गरम गरम भाताच्या दोन मुदी इतर नानाविध पक्वान्नांसहित त्या पात्रात होत्या.।।११४।।जिलेबी,राघवदास,मोतीचूर लाडु,करंज्या,अनारसे,खीरी,निरनिराळ्या भाज्यांचे प्रकार इत्यादींनी युक्त अशा त्यां नैवेद्याचे वर्णन तरी कोठवर करावे?।।११५।।तसेच ताज्या दह्याची वाटी आणि अगणित चटण्या व कोशिंबिरी त्या पानांत होत्या. वरण भाताच्याच शेजारी साजूक तुपाची वाटी ठेवलेली होती.।।११६।।असा जवळ जवळ चार माणसांना पुरेल इतका परिपूर्ण नैवेद्य इच्छारामानें समर्थांपुढें आणून ठेवला.।।११७।।तो नैवेद्य पाहून महाराज मनात विचार करू लागले,"अरे गणप्या, इथे आल्यापासून सतत तुझे खाणेच चालू आहे. आता हे ही अन्न तू अवघेच खाऊन टाक.हे आचरण जरी अघोरी असले तरी तू अन्नाचा अपमान करू नकोस.ह्या अघोरीवृतीला इथे जमलेले सर्व लोक बघत आहेत."।।११८-११९।।असे बोलून महाराज भोजनास बसले व पानातील सर्व अन्न त्यांनी संपवले. अक्षरश: मीठ,लिंबू हे ही पात्रात ठेवले नाही.।।१२०।।अति आग्रह केल्यास काय परिणाम होतो हेच दाखविण्यासाठी गुरुवराने ही लीला केली.।।१२१।।जेवणानंतर महाराजांनी खणाणून उलटी केली.नुकतेच खाल्लेले अन्न उलटीद्वारे बाहेर पडले. असाच प्रकार एकदा श्रीरामदासांनी केला होता.।।१२२।।श्री रामदास स्वामींच्या मनात एकदा खीर खाण्याची प्रबळ इच्छा झाली.त्या मोहावर मात करण्यासाठी ते आकंठ खीर प्याले.।।१२३।।ती उलटीद्वारे बाहेर काढुन श्रीरामदासस्वामी समर्थ परत ती खाऊ लागले. अशा प्रकारे अन्नवासनेवर त्यांनी जय मिळविला.।।१२४।।त्याचप्रमाणे योगकला अवगत असूनही लोकाग्रहाला शीघ्र आळा घालण्यासाठीच गजानन महाराजांनी हा उलटीचा प्रकार केला.।।१२५।।संत पुरुषाचे आचरण हे नेहमीच पुढील पिढीला मार्गदर्शक असते.तसेच विधीलिखित वा निसर्गधर्माचे संत कायमच संरक्षण करतात.।।१२६।।तेच समर्थांनी इथे केले. अति आग्रह करणे हे चांगलें नाही व तो विपरीत फळ देईल असेच यांतून त्यांनी लोकांस सुचविले.।।१२७।।ते असो.उलटी झालेली जागा स्वच्छ केली गेली.महाराजांनाही स्नान घालून परत योग्य जागी स्थानापन्न केले गेले.।।१२८।।अतिशय प्रसन्न दिसणाऱ्या महाराजांचे सर्व स्त्री-पुरुष दर्शन घेऊ लागले. तोच तिथे भजन करणाऱ्या दोन दिंडया आल्या.।।१२९।।त्या भजनी मंडळींचे आवाज अत्यंत सुस्वर होते.खड्या पहाडी आवाजात ते विठ्ठलाचा नामगजर तन्मयतेने करुं लागले.।।१३०।।त्यांच सुरांत सूर मिसळुन आसनस्थ महाराज "गणगण गणांत बोते" हे भजन करू लागले.।।१३१।।समर्थ सदा सर्वदा हेच भजन टिचक्या वाजवून करीत असत. असा तो आनंद सोहळा त्या ठिकाणी रात्रभर सुरु होता.।।१३२।।सतत ’गण गण’ हें भजन महाराज करत असल्यामुळे लोक त्यांना श्री गजानन म्हणु लागले.।।१३३।।जो स्वयमेव ब्रह्म होता त्यांस नावाचे खरोखर प्रयोजन ते काय?केवळ प्रकृतीच्या आश्रयासच हे नामारूपाचे संबोधन लागते.।।१३४।।हा योगेश्वर अस्ति-भाति-प्रियाठायींच सतत निमग्न असे.त्या आनंदाचे वर्णन करावयास योग्य अशी उपमा सापडणे केवळ अशक्यच आहे.।।१३५।।पंढरपूर येथे आषाढी एकादशीस, वा गोदातीरी सिंहस्थ पर्वास अथवा कुंभमेळ्यास हरिद्वारीं अतिशय गर्दी होते.।।१३६।।तशीच गर्दी शेगावी बंकटलालाच्या घरांत होऊ लागली.दूरदुरून असंख्य भक्तगण श्रींच्या दर्शनास येत होते.।।१३७।।त्यांच्यासाठी स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल वा नारायण  होते.ते जणु काही निश्चयरूपी विटेवर पाय ठेवून उभे होते.।।१३८।।त्यांचे वचन हे गोदातीर व आनंद हेच हरिद्वार होते.तर बंकटलालाचे घर हेच विठ्ठल मंदिर होते.अशा रितीने शेगांव नगरी अवघी गजबजून गेली.।।१३९।।ज्याने ब्रह्मपदास प्राप्त केले, त्यांस जातीचे प्रयोजनच काय? सूर्यप्रकाश सर्व ठिकाणी सारखाच प्रकाश देतो.।।१४०।।शेगावी नित्य नव्या यात्रा भरू लागल्या.भक्त सतत समाराधना करू लागले.त्याचे वर्णन करता करता शेषही निःसंशय थकून जाईल.।।१४१।।मी तर एखाद्या कीटकासमानच आहे,तेव्हा तिथे माझा तो काय पाडाव लागणार? हे सर्व काही स्वयं श्री गजाननच माझ्या मुखातून वदवून घेत आहे. मी तर केवळ एक निमित्तमात्र आहे.।।१४२।।आता मी इथे श्री समर्थांच्या  दिनचर्येचे थोडे वर्णन करतो.खरे तर त्यांचे अगाध चरित्र गायन मजसारख्या पामरास शक्य नाही.।।१४३।।कधी मंगलस्नान करावे, तर कधी ओढ्याचे गढूळ जल प्राशन करावे.त्यांच्या दिनचर्येचा ठराविक असा कोणताही नियम नव्हता.वायूच्या गतीची दिशा कोणांस ठरविता येते का?।।१४४-१४५।।श्रींना चिलीम अतिशय आवडत असे. जरी ते चिलीम वरचेवर ओढत असत,तरी ते अर्थातच व्यसनाधीन झाले नव्हते.ते एक केवळ त्यांचे कौतुक होते.।।१४६।।असो, आता पुढील अध्याय भावपूर्वक ऐकावा.श्रोते हो, तुमच्या भाग्यामुळे ही पर्वणी तुम्हांस प्राप्त झाली आहे, ती तुम्ही दवडू नका.।।१४७।।भाविकांना हें श्रीगजाननचरित्र आदर्श ठरो हीच हा दासगणू हात जोडुन ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहे.।।१४८।।श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥ 


No comments:

Post a Comment