Showing posts with label श्रीगुरुस्तवन स्तोत्र. Show all posts
Showing posts with label श्रीगुरुस्तवन स्तोत्र. Show all posts

Feb 20, 2022

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ४६ ते ५०


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


तेथून प्रगट भुवन । मग उद्धरु धरा जाण । धर्माते वाढवून | तोडू बंधन कलीचे ॥४६॥ ऐशी ध्वनी निर्धार । गर्जला गुरु दिगंबर । सर्व देवी केला नमस्कार । आनंद थोर प्रगटला ॥४७॥ या भूतलावर जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, त्यावेळीं संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, जीवमात्रांचे दुःख दूर करून त्यांना सुखी करण्यासाठी, त्यांना भक्तिमार्गाकडे वळविण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. श्रीशैल्य यात्रेच्या वेळी अदृश्य झालेले श्रीनृसिंहसरस्वती सुमारे तीनशे वर्षे समाधी अवस्थेत राहिले आणि श्री स्वामी समर्थ म्हणून पुन्हा एकदा अवतरित झाले. असंख्य संसारी जीवांना आत्मकल्याणाचा मार्ग दाखविणे, धर्माची अधोगती थोपवून कलीच्या प्रभावांतून सामान्य जनांस मुक्त करणे हेच आपले अवतारकार्य आहे, असे श्री गुरूंनी गर्जून सांगितले. श्री दत्तप्रभूंचे हे वचन ऐकून सर्व देवी-देवता हर्षोल्हासित झाल्या आणि त्यांनी अत्यंत भक्तिपूर्वक समर्थांना नमन केले, प्रभूंचा जयजयकार केला. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी श्री स्वामी समर्थ कर्दळीवनांतून निघाले. तेथून भ्रमण करीत ते बंगालमध्ये गेले. पुढें, गंगातटाने हरिद्वार, केदारेश्वर आदि तीर्थक्षेत्रांना भेटी देत ते गोदावरीकाठीं आले. तिथे त्यांनी बरीच वर्षे वास्तव्य केले. नंतर, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, सोलापूर असे फिरत फिरत अक्कलकोट नगरीत आले आणि तिथेच स्थिरावले. मात्र, स्मर्तृगामी श्री दत्तात्रेयांचा अवतार असल्याने स्वामींनी अनेक भक्तांना गिरनार, आबू पर्वत, वाराणसी, बडोदा, श्री गिरी पर्वत या आणि अशा अनेक ठिकाणीही दर्शन दिले. त्यांच्या लीला अगम्य आहेत, हेच खरें !

शालिवाहन शके तीनशे चाळीस । शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास । अवतार घेतला द्वितीयेस । वटछायेसी दिगंबरु ॥४८॥ तै धरा आनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार । सेवा करीन निर्धार । पादकिंकरी होऊनिया ॥४९॥ श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या पूर्वावतारांप्रमाणे, अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांचा जन्म माता-पित्याच्या पोटी झालेला नाही. ते अयोनिज आहेत. त्यांच्या प्रकटीकरणाबाबतदेखील त्यांच्या अधिकारी भक्तगणांत मत-मतांतरे आहेत. यासंदर्भात, श्री स्वामी समर्थांचे कृपांकित भक्त श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - कलीच्या वाढत्या प्रभावाने धर्माला ग्लानी येऊ लागली होती. सिद्ध-योगी धर्मकार्य करू शकत नव्हते, संत-सज्जनांना पीडा होऊ लागली होती. सर्वत्र अनाचाराचेच राज्य होते. अखेर, त्रस्त झालेल्या भूदेवीने त्या परब्रह्माची करुणा भाकली. तेव्हा, जगत्कल्याणासाठी श्री दत्तप्रभूंनी शालिवाहन शके ३४० ( इ.स. ४१८ ) मधील चैत्र शुद्ध द्वितीयेला, गुरुवारी नगाधिराज हिमालयाच्या उत्तरभागांत एका वटवृक्षातळीं अवतार घेतला. परमेश्वराचे ते दिव्य स्वरूप पाहून भूमातेला अतिशय आनंद झाला. श्री स्वामींच्या पावन पदस्पर्शाने कृतार्थ झालेल्या धरेनें त्यांचा जयजयकार केला. तसेच हे जगत्प्रभो, आपली सेवा करण्याचे भाग्य मला निरंतर लाभावे, अशी प्रार्थनाही केली.

ऐसी गर्जना प्रकट । आनंद बोधवी हितार्थ । गुह्य हे निजबोधार्थ । न बोलावे दांभिका ॥५०॥ अशाप्रकारे, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचे अवतार-रहस्य, दिव्य स्वरूप, आणि अवतार कार्य आदिंचे वर्णन करून श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - केवळ स्मरण करताच धावत येणारे, अल्प सेवेनेही संतुष्ट होणारे, आणि करुणेचा सागर असणारे भगवान दत्तात्रेय मानवदेहाने या पृथ्वीतलावर अवतरले ! राव, रंक, सज्जन, दुर्जन, सामान्य जन इतकेच नव्हे तर पशु-पक्षी-वृक्ष यांनादेखील श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ झाला. त्या योगीश्वरानें आपल्या सर्वच भक्तांचे ऐहिक कल्याण तर केलेच, तसेच अनेक अधिकारी भक्तांना आत्मसाक्षात्कार घडवून मुक्तीही दिली. तेव्हा स्वामीभक्तहो, आपल्या भक्तांचा अखंड योगक्षेम चालवणा-या, अनन्यभावानें शरण आलेल्या भक्तांवर सदैव कृपानुग्रह करणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे तुम्ही सदैव नामस्मरण करा. जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातून मुक्त होण्यासाठी हीच सहज सोपी साधना आहे. हा भक्तिमार्ग तुम्हांस निश्चितच परमात्म्याची प्राप्ती करून देईल. मात्र, यासाठी अढळ श्रद्धा आणि शुद्ध अंतःकरण अत्यंत आवश्यक आहे. याच कारणास्तव, तुम्ही हे भक्तिरहस्य दांभिकांना कधीही सांगू नका.


॥ इति श्रीगुरुस्तवनस्तोत्रं संपूर्णं

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

Feb 3, 2022

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ४१ ते ४५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


हे जगा हितकारी । चुकवि चुकवि भ्रमफेरी । मृगजळ दाऊनि संसारी । मग तारी जीवाते ॥४१॥
या दिव्य गुरुस्तवन स्तोत्राचे माहात्म्य पुन्हा अधोरेखित करतांना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - हे स्तोत्र अतिशय कल्याणकारी असून जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातून सुटका होण्याचा हा सहजसोपा मार्ग आहे. भवभयभंजन अशा सद्गुरूंच्या कृपेने, योग्य साधना केली असता मोक्षप्राप्ती निश्चितच असते. मात्र तत्पूर्वी हा मायाध्यक्ष आपल्या भक्तांना या संसाररूपी मोहप्रवाहांत गुंतवितो. मायेच्या प्रभावाने अल्पसुखाने मोहित झालेला हा जीव या मिथ्या संसारालाच आपले सर्वस्व मानतो. लोकेषणा, वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा ईषणात्रयांच्या बंधनात पुरता अडकत जातो. ही माया म्हणजे खरें तर मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे काय तर जे जसे आहे ते तसे न दिसता काहीतरी वेगळे भासणे. त्याला तुम्ही दृग्भ्रम अर्थात दृष्टीचा खेळ अथवा भास म्हणू शकता. या मृगजळाचे ज्ञान झालें की तें पूर्णपणे मिथ्याच आहे, हे ध्यानांत येते. त्याच न्यायाने, सदगुरुंना पूर्णपणे शरण गेले की अमूर्त असणारे शुद्ध ईशचैतन्य हे तुझेंच मूळ स्वरूप आहे या सत्याची जाणीव होते. हे सर्वबंधमोक्षदायका, या मिथ्या संसारातील फोलपणा दाखवून तुम्हीच तर आमचा उद्गार करता.

ही आनंदनाथांची वाणी । जग तारक निशाणी । स्मरता झुलवी निरंजनी | योगी ध्यानी डुलविले ॥४२॥
हे गुरुस्तवन स्तोत्र हा भवसागर तरून जाण्याचे सुलभ साधन आहे आणि मुमुक्षु भक्तांना त्याची अवश्य अनुभूती येईल हे आनंदनाथ महाराजांचे वचन आहे. हे सर्वेश्वरा, तुझ्याच कृपेनें ईश्चराधिष्ठित असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन होऊन निर्विकार परमात्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. परिणामस्वरूप, भक्तांना सहजच निरंजन म्हणजेच निर्विकल्प, विमल दोषरहित अशी योगसमाधी अनुभवता येते आणि परमानंदाचा लाभ होतो.

ऐसा ऐकता गुरुस्तवन । जागे केले सच्चित गुरु कारण । केवळ तो हरि हर ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूर्ण । गुरुहृदय भुवन व्यापिले ॥४३॥
श्री दत्तप्रभूंना जगदगुरु मानण्यात येते. भक्तांनी केलेल्या अत्यल्प सेवेने ते संतुष्ट होतात. आपल्या प्रिय भक्ताने, शिष्योत्तमाने केलेले हे आपले स्तवन ऐकताच सद्गुरू प्रसन्न झाले. अत्यंत निर्मळ, शुद्ध आणि विमल असे हे मूळ परमतत्व भक्तांकरिता सगुण, साकार झाले. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रह्मा, विष्णु आणि महेश अशा तीन शक्तींचे समन्वित स्वरूप असणारे हे गुरुतत्त्व जागृत झाले. वागिंद्रियांनीं केलेल्या या स्तवनाने गुरुतत्त्वाची अनुभूती येऊ लागली आणि श्रीगुरुमूर्ती अंतःकरणात स्थिर झाली.

तेणे होवुनि स्मरती । स्वये प्रगटली स्फूर्ती । नाभी नाभी आवरती । अवतार स्थिती बोलतो ॥४४॥
गुरुतत्वाच्या कृपाप्रसादामुळे आनंदनाथ महाराज कृतार्थ झाले. सद्‌गुरूंशी अशी तादात्म्यता पावल्यावर, ईश्चराधिष्ठित असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन सहजच झाले. सद्‌गुरूंचे अभयवचन प्राप्त झाल्यामुळे आता कुठलीही भीती राहिली नाही. मन निर्भय, निःशंक झाले आणि अत्यंत उत्स्फूर्तपणें त्या परमात्म्याचे अवतार रहस्य वाणीतून शब्दरूपांत साकार होऊ लागले.
अयोनिसंभव अवतार । हिमालय उत्तरभागी निर्धार । होऊनी पूर्ण हंस दिगंबर । व्यापू चराचर निजलीले ॥४५॥
माधवशास्त्री रचित श्री स्वामी महाराज चरित्र हा संस्कृत श्लोकबद्ध ग्रंथ आहे. त्यांत स्वामी समर्थांचे स्वरूप वर्णन करतांना ते लिहितात - जन्मशून्यो दिव्यरुपो रविभा: सुरवंदित: । अर्थात श्री स्वामी महाराज जन्मशून्य आहेत. सूर्याप्रमाणे तेजस्वी असे त्यांचे रूप दिव्य असून सर्व देवांनादेखील ते वंदनीय आहेत. साक्षात परब्रह्माचा हा अवतार अयोनिसंभव आहे. श्री स्वामी महाराज यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे माता-पिता कोण ? यांविषयी खात्रीलायक माहिती मिळत नाही. मात्र काही अधिकारी भक्तांच्या मतांनुसार उत्तर हिंदुस्थानात हिमालय पर्वतराजींमधील एका अरण्यांत ते प्रथम प्रगट झाले. ' सर्व चराचरांत मीच ईश्वरीय चैतन्य रूपाने भरून आहे. ', या स्वानंदात सदैव निमग्न असलेला हा श्री दत्तप्रभूंचा पूर्णावतार दिगंबर होता. जणू दशदिशांना त्यांनी वस्त्र म्हणून धारण केले होते. संपूर्ण चराचर सृष्टीला, या ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले हे परमतत्त्व सकल जीवांच्या उद्धारासाठीच, त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविण्यासाठीच अवतरले होते. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थांना अशक्य ते काय असणार ? त्यांच्या लीला खरोखर अनंत, अनाकलनीय आणि अगाध आहेत. पण ते केवळ चमत्कार नव्हते, तर त्यांनी संसारी, मुमुक्षु जन, मूक प्राणी अशा सर्वच शरणागतांना भुक्ति-मुक्ती देऊन त्यांचे इहपर कल्याण केले.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Jan 12, 2022

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ३६ ते ४०


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


म्हणोनि सांगणे खूण । हा स्तव नित्य प्रेमे जाण । जो वाचील अनुप्रमाण । अकरा वेळा निर्धारे ॥३६॥ शुचिस्मित करूनि चित्ता । जो जपे प्रेमभरिता । पुरवि तयांच्या मनोरथा । सत्य सत्य त्रिवाचा ॥३७॥
गुरुस्तवनाच्या महतीचे वर्णन करतांना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - स्वामीभक्तांनो, श्री स्वामीकृपा प्राप्त होण्यासाठी मी तुम्हांस एक सहज सोपा उपासनामार्ग सांगतो. हे गुरुस्तवन स्तोत्र अत्यंत श्रद्धेनें आणि त्यांतील बोध, अर्थ जाणून घेऊन वाचावे. अनुप्रमाण म्हणजे एखाद्या गोष्टीचे यथार्थ ज्ञान होणे. अत्यंत नि:शंक मनाने, या स्तवनातील शब्द, वचनें यांचा यथायोग्य अर्थ जाणून घेऊन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थांवर दृढ श्रद्धा ठेवून या दिव्य स्तोत्राचे अकरा वेळा आवर्तन करावे. अंतःकरण पवित्र ठेवून जो या स्तवनाचे भक्तिभावाने पठण करेल, त्या भक्ताच्या सर्व इष्ट मनोकामना श्री समर्थांच्या कृपेने फलद्रुप होतील. हे त्रिवार सत्य आहे.
'त्रिवाचा' या शब्दाचा एक अर्थ असा आहे की तीन वेळा उच्चारलेले वचन, जे सत्यरूप असते. थोडा वेगळा आणि आध्यात्मिक अर्थ पाहू जाता, ‘ त्रिवाचा ’ हा शब्द वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या तीन वाणींना दर्शवितो. आपल्या वाणीचं व्यक्त रूप अर्थात प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी म्हणजे वैखरी आहे. तर मनातील विचार, मनातल्या मनात केलेले बोलणे असे मध्यमा हे वाणीचे अंतर्मनातलं रूप आहे, तर पश्यंती म्हणजे आपल्या विचारांचे सुप्त रूप अथवा स्फुरण होय. थोडक्यात, ईशस्तवन अथवा नामस्मरण जर मोठ्याने केले जे आपणही ऐकू शकतो आणि आजूबाजूचेही जन ऐकू शकतील तर ते वैखरी वाणीतील स्तवन होय. तेच मध्यम स्वरांत केलेले स्तवन जे आपण ऐकू शकतो मात्र बाजूला बसलेली व्यक्ती ऐकू शकत नाही, ते मध्यमा वाणीतील स्तवन होते. योगीपुरुष, उच्च कोटीचे साधक हे मात्र ईशस्तवन अथवा परमेश्वराच्या नामाचा जप करत नाहीत तर त्यातून नामजपाची धून ऐकतात. अर्थात नामाचा जप न होता ते त्यांच्या श्वासातच तद्रूप झालेले असते. असा जप त्या सिद्धपुरुषांच्या रोमारोमांत अविरत, अखंड सुरु असतो आणि हाच जप त्यांना परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करवून देतो. अर्थात श्री आनंदनाथ महाराजांसारखे सिद्ध योगी आणि श्री स्वामी समर्थांचे कृपांकित थोर शिष्य ज्यांनी त्या परमानंदाची अनुभूती वारंवार घेतली आहे, त्यांनी आपल्यासारख्या अतिसामान्य लोकांनाही श्री स्वामींच्या कृपेचा लाभ व्हावा यासाठी किती सहज-सुलभ तरीही अमौलिक असा हा श्रीगुरुस्तवनाचा ठेवा दिला आहे. श्री आनंदनाथ महाराजांचे स्मरण-वंदन करून आपणही श्री स्वामी समर्थांचे हे स्तवन नित्य पठणांत ठेवावे आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावरही राहो हीच प्रार्थना करू या !

हे लघु स्तव स्तवन । तारक जगाच्या कारण । भक्तिभावे पूर्ण । चुके चुके भव फेरा ॥३८॥ जो हा स्तव करील पठण । त्या घरी आनंद प्रकटेल जाण । देवोनि भक्ता वरदान । तारक त्रिभुवनी करील ॥३९॥ हा स्तव नित्य वाचा । भाव धरुनि जीवाचा । फेरा चुकवा चौऱ्यांशीचा । गर्भवास पुन्हा नाही ॥४०॥
श्री स्वामी समर्थांचे हे लघु स्तवन स्तोत्र अतिशय प्रभावी असून या भवसागरातून तरून जाण्याचा सुलभ मार्ग आहे. ईश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी केवळ त्याला अनन्यभावाने शरण जाणे आवश्यक आहे. अर्थात पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जो हे स्तवन पठण करेल, तो या जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सहजच मुक्त होईल. आपल्यासारखे सामान्य जन सहसा सकाम भक्ती करतात, म्हणजेच काही ठराविक इच्छापूर्ती, सांसारिक कामना आदि गोष्टींसाठी स्वामींची उपासना करतात. तर थोर तपस्वी, योगी-मुनी यांचे केवळ ' हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ' असेच मागणे असते. संकल्पसिद्धीदाते श्री समर्थ मात्र ह्या दोन्ही प्रकारच्या भक्तांवर नेहेमीच आपल्या कृपेचा वर्षाव करतात. हे पूर्णतः जाणणारे श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - नित्यनियमाने या स्तवनाचे पठण केले असता, श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येईल. दत्तप्रभूंच्या वरदानाने भक्तांच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण होतील आणि हा संसार तरून जाण्यासाठी शक्तिसुद्धा प्राप्त होईल. जिथे या प्रासादिक स्तोत्राचे पठण होईल, तिथे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांचा वास असेल अर्थातच तेथील वातावरण प्रसन्न, मंगलमय आणि पवित्र होईल. याचकरिता स्वामीभक्तहो, सूक्ष्म जीव ते मानव अशा चौऱ्यांशी लक्ष योनींच्या या संसृतिचक्रातून मुक्त होण्यासाठी त्या अवधूत दत्तात्रेयांचे हे स्तोत्र श्रद्धापूर्वक नित्य वाचा. योगीश्वर श्री स्वामी हे स्वतःच सत्य संकल्पाचे मूळ आहे. अशक्यप्राय आणि अतर्क्य गोष्टीसुद्धा स्वामी कृपेने सहज शक्य होतात. सर्व लौकिक आणि कर्मबंधने नष्ट करून मोक्ष प्रदान करणारे हे श्रीसद्‌गुरु आहेत. तेव्हा, शरणागतकवच असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुन्हा गर्भवास भोगावा लागणार नाही, अशी ग्वाहीही श्री आनंदनाथ महाराज देतात.

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Nov 30, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ३१ ते ३५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी । तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ॥३१॥
हे समर्था, संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेले ते विश्वम्भर परब्रह्म तूच आहेस याची प्रचिती येण्यासाठी नामोपासना हेच उत्तम साधन आहे, हे मी पूर्णतः जाणले आहे. हेच परब्रह्म सर्वव्यापी असल्याने विशाल आणि सूक्ष्मदेखील आहे. या पिंडातील स्थूल, सूक्ष्मादि देहांची तत्त्वें आणि स्वरूप यांचे आकलन झाले की सर्वत्र परब्रह्मच आहे हे विवेकबुद्धीने जाणता येते. ' तत्त्वमसि ' अर्थात ते तूच आहेस, हे ज्ञान प्राप्त होते. परब्रह्माचे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असले तरी, ते वाच्यार्थाने सांगितले जाते. पिंड आणि ब्रह्मांडाचे हेच समानत्व दर्शवण्यासाठी ' पिंडी ते ब्रह्मांडी ' ही संकल्पना परमार्थात सर्वार्थाने प्रचलित आहे. ब्रह्मांडाचा परमात्मा तर पिंडामध्ये जीवात्मा असतो. या सर्व दृश्य अदृश्य चराचराचा नियंता परमात्मा असून जीवात्मा हा त्याचाच अंश आहे. सद्गुरुंच्या कृपेनें असा ' जीव-ब्रह्म-ऐक्य ' आत्मसाक्षात्कार सहज प्राप्त होऊ शकतो. याच सिद्धांताला पुष्टी देत श्री आनंदनाथ महाराज म्हणतात, " ज्याच्या अस्तित्वामुळे हे चराचर विश्व निर्माण झाले, ज्याच्या आधारामुळे या सृष्टींत नियमबद्ध सुसूत्रता आहे, आणि जो या चराचरांत अनंत आहे असा व्यापक परमात्मा म्हणजेच सदगुरु होय. अशा या व्यापकाचे चिंतन, नामस्मरण केले म्हणजे साहजिकच ते सदोदिताला म्हणजेच पावते. सदोदित म्हणजे सदा उगवलेले असते ते अर्थात नित्य, निरंजन असे परब्रह्मच होय."
म्हणोनि मौन्यगती । तुज निजानंदी स्तविती । जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ॥३२॥
म्हणूनच तुझ्या या अगम्य, निराकार स्वरूपाचे ज्ञान झालेले योगीजन त्या परमानंद स्थितीची अनुभूती घेतात आणि तुझे वर्णन करणे सर्वथा शब्दातीत असल्याने केवळ मौन धारण करून तुझे मनोमन स्तवन करतात. अद्वैताची प्रचिती आल्यावर जे सुख, समाधान मिळते तो आत्मसाक्षात्काराचा आनंद केवळ अनुभवायचा असतो, ती निर्विकार परमात्मस्वरूप अनुभूती शब्दबद्ध करणे सर्वथा अशक्यच होय. मात्र हे कृपाळा, तुला शरणागत आलेल्या मुमुक्षु साधकांसाठी, भक्तांसाठी तू मला वाचाशक्ती प्रदान कर आणि तुझे स्तवन रचण्याची बुद्धी दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. हे अनंतशक्तिसूत्रधारा, आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी तू नेहेमीच असंख्य लीला करतोस, तेव्हा एव्हढें वरदान तू मला दे.
म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी जाणोनिया ॥३३॥
हे भक्तचिंतामणी, तुझी ही स्तवनगाथा गात असतांना माझे एकच मागणें आहे. हे सद्गुरो, तू हा अवतार घेण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या भक्तांवर कृपा करणे आणि त्यांचा उद्धार करणे हेच आहे. तू आपल्या भक्तांच्या नेहेमीच अधीन असतोस. हे दत्तप्रभो, या तुझ्या स्तवनांत मी केवळ तुला याच गोष्टीचे स्मरण करून देत आहे. तुझ्याच कृपाशिषाने आणि इच्छेने, मी हे जे काही तुझे यथामति, यथाशक्ति स्तवन रचतो आहे, ते तुला मान्य व्हावे. माझ्या या साध्या, भोळ्या-भाबड्या भक्तीने तू प्रसन्न व्हावे, हेच माझे तुझ्या चरणीं मागणे आहे. अनन्यभावानें शरण आलेल्या भक्तांचे कवच बनून संरक्षण करणाऱ्या समर्था, आम्हांलाही तुझा कृपाप्रसाद लाभावा, हीच प्रार्थना !
अहंभाव तुटोनि गेला । प्रेमभाव प्रगटला । देव तेथेचि राहिला । अनुभवशुद्धी खेळवी ॥३४॥
बोध हीच खरी आत्मज्ञानाची पहिली पायरी आहे. सदगुरु मुमुक्षु शिष्यांना त्यांच्या योग्यतेनुसार मार्गदर्शन करतात आणि अहंकार, पाप-पुण्यादि, कर्माभिमान यांच्या गुंत्यातून अलगद बाहेर काढतात. परिणामी, अहंकार-चित्ताचे जडत्व लोप पावून प्रेम आणि भक्तीचा उदय होतो. 'जीवो ब्रह्मैव नापरा' असा आत्मसाक्षात्कार झालेला हा शिष्य त्या परब्रह्मी तादात्म्य पावतो. हे भक्तनिधाना, केवळ तुझ्याच कृपेनें ईश्वराधिष्ठित असणाऱ्या या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन होतें, अनुभव येतो. तुझ्या लीला अतर्क्य, अनाकलनीय आहेत, हेच खरें !

यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ॥३५॥
परमेश्वर हा केवळ भावाचा भुकेला आहे. विशुद्ध भक्ती, अनन्य शरणागत भाव असलेल्या भक्तांच्या तो नेहेमीच अधीन असतो. यासाठीच श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - कोटी यज्ञ केले आणि इष्टदेवतेप्रित्यर्थ काही भाव नसला तर त्याचे कधीच फळ मिळत नाही. मात्र आपल्या सद्गुरुंचे अकृत्रिम प्रेमाने, भक्तिपूर्वक स्तवन केले, त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवली तरी या भवसागरातून आपण सहजच तरून जाऊ. आपल्या देहाभिमानामुळेच आपण या जन्म-मृत्यूच्या भवसागरात अडकलो आहोत. या भवबंधनांतून पैलपार जाण्याचे सहज-सुलभ साधन म्हणजे आपल्या गुरूला अनन्यभावानें शरण जाणे हेच आहे. 

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Oct 4, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी २६ ते ३०


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


तू विश्वाकारु विश्वाधारू । त्वांचि रचिले चराचरू । तूचि बीज आधारू । व्यापक निर्धारु जगत्रयी ॥२६॥
हे स्वामी समर्था, तुझ्याच अस्तित्वामुळे ही चराचर सृष्टी आकारास आली. हे सच्चिदानंदघनस्वरूप, स्वयंसिद्ध चैतन्य जे या चराचर विश्वाचा आधार आहे, ते तूच आहेस. तुझ्याच आधारामुळे या विश्वात सुसूत्रता आहे. या चराचर विश्वाची निर्मिती करणारा तूच तर तो परमात्मा आहे. त्या चिद्‌घन परमात्म्याची अभिन्न शक्ति म्हणजेच माया. ' सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज ।' हे तर वेदवचन आहे. वडाचे बीज किती सूक्ष्म असते, परंतु त्याच्या गर्भात वडाच्या वृक्षाची शक्ती साठवलेली असते. त्यातूनच प्रचंड वटवृक्ष निर्माण होतो. या दृश्य विश्वात जे काही जड, स्थावर आहे ते सर्व या मूळमायेचा पसारा आहे आणि हे सच्चिदानंदघना, मूळ संकल्प असणाऱ्या या मूळमायेचा आधार तूच तर आहेस. हे सर्वगामी, ह्या समस्त चराचर सृष्टीत तूच चैतन्य रूपाने वास करतोस. या दहाही दिशांत, अखिल त्रैलोक्यात खरोखर तूच भरलेला आहेस.
चार देहाच्या सूक्ष्मी । तूचि झुलविशी निज लगामी । हे ठेऊनी कारणी । अहंभाव तोडावया ॥२७॥
' स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण । हे चारी पिंडीचे देह जाण ॥' असे शास्त्रवचन आहे. पंचमहाभूतांनी बनलेला हा स्थूल देह चर्मचक्षूंना दिसतो. अंत:करण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या पाच पंचकांनी सूक्ष्म देह बनतो. वेदश्रुतींच्या तत्त्वांनुसार कारण देह अज्ञानरूप आहे, तर ज्ञान म्हणजेच महाकारण देह होय. श्री समर्थ रामदास स्वामी या चार देहांचे निरूपण करतांना म्हणतात - स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे देह अनुक्रमे जागृती, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या या अवस्थांमध्ये कार्यरत असतात. जागृतीमध्ये दृश्य पदार्थांचा अनुभव घेता येतो. स्वप्नावस्था म्हणजे मिथ्या-वृथा विषयांचा अनुभव असतो. तर सुषुप्ती अवस्थेत आनंदाचा भोग असतो. परमार्थामध्ये विशिष्ट साधना झालेल्या साधकास तुर्यावस्थेत ब्रह्मज्ञान अनुभवता येते, मात्र या अवस्थेत मायेचा प्रभाव असल्याने भक्तांस विमल परमानंद प्राप्त होत नाही. परब्रह्म निर्मळ, निराकार आणि शाश्वत तर माया चंचल आणि चपळ आहे. त्यामुळे साधक मनांत साशंक होतो. हे परब्रह्मा, तूच या स्वानंद, सुखादी चार अवस्थांचा आम्हांला अनुभव देऊन पूर्वकर्मांनुसार सुख-दु:ख भोगावयास लावतो. आमचा अहंकार तुझ्या स्वकाराने समूळ नष्ट करून आत्मानंदाची अनुभूती देतो. देहाहंकार जेव्हा विरून जातो, तेव्हाच परमात्मस्थिती प्राप्त होते. ' अहं ब्रह्मास्मि ' असे साधकास ज्ञान झाले की तुझ्या परमात्मस्वरूपाचे प्रबोधन करतो.
जन्ममरणाच्या व्यापारी । जे भ्रमुनी पडले माया भरारी । ते सोडविशी जरी । निजनामे करुनिया ॥२८॥
हे सर्वेश्वरा, आम्ही या मायेच्या भवपाशात पूर्णतः गुंतत जातो आणि निजरूप विसरतो. कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार अनेक योनींतून जन्म घेत या जन्म-मरणाच्या चक्रांत पुन्हा पुन्हा अडकतो. हे गुरुराया, केवळ तूच या भवबंधनातून पैलपार नेऊ शकतो. तुझ्या नामसंकीर्तनाचा महिमा वेदशास्त्र, श्रुती-स्मृतींनाही अगम्य आहे. तुझ्या नामस्मरणाने मनःशांति लाभते. अनन्य भक्तिभावाने तुझे नित्य चिंतन केल्यावर परमानंदाची प्राप्ती नक्की होतेच. तुझा कृपाकर आमच्या मस्तकीं सदैव ठेव.
ऐसा तू अनादि आधारू । तुज म्हणती वेद्गुरू । परी हे व्यापुनी अंतरु । स्थिरचरी व्यापिले ॥२९॥
हे चैतन्यघना, आदि-अंतरहित असा तू या चराचराचा आधार आहेस. प्रकाश आणि आनंद यांच्याही पैलाड असणाऱ्या हे परब्रह्मा तूच या चराचराला आधार देतोस. तुझ्या निर्विकल्प आणि निरूपाधिक स्वरूपाचे वर्णन करतांना चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणेदेखील मौन झाली. यास्तव, तुला वेदगुरूही म्हणतात. हे भक्तवत्सला, तू भक्तांच्या अंतःकरणात सदा सर्वदा विराजमान असतोस आणि तूच या सकल विश्वाला गुप्तरूपानें व्यापून असणारा अमूर्त परमात्मा आहेस. स्वयंप्रकाशी, नित्य शुद्ध, निरहंकार परब्रह्म हे सच्चिदानंद स्वरूप असते आणि शरीरात आत्मरूपाने त्याचा अंश असतो, याची अनुभूती समर्थकृपेने आनंदनाथ महाराजांनी घेतली होती.
भावभक्ती चोखट । करणे नेणे बिकट । नाम तुझे सुभट । तोडी घाट भवाचा ॥३०॥
कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती हे चार मार्ग ईश्वरप्राप्तीचे साधन आहेत. साधकाने कुठल्याही मार्गाने उपासना केली असेल तरी त्याचे फळ एकच असते ते म्हणजे भगवत्स्वरूपाचे ज्ञान, त्या परमात्म्याची प्राप्ती ! भक्तीमार्ग तसा सोपा, सुलभ वाटत असला तरी त्याचे वर्म जाणणे आवश्यक आहे. भक्ती ही बाभळीच्या वनातील वाट आहे. त्यात खाच-खळगे, काटे खूप आहेत. मात्र, अनन्य शरणागत भाव, अकृत्रिम प्रेम आणि शुद्ध अंतःकरण असल्यास हा भक्तीमार्ग साधकास परमात्म्याच्या अगदी जवळ नेतो. निष्काम भक्तीनें आपल्या मायारहित, बंधनरहित आत्मस्वरूपाचे ज्ञान तर होतेच, पण “अंते मतिः सा गतिः ” या उक्तीनुसार जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातूनही सुटका होते. या कलियुगात हेच फळ नामसंकीर्तनाने प्राप्त होते. कीटकाला जसे भ्रमराचे म्हणजे भुंग्याचे ध्यान लागले की तो स्वतःच भ्रमर होतो, त्याचप्रमाणे निःसंग आणि निर्मळ वृत्तीने अखंड नामस्मरण करणारा साधक परब्रह्मस्वरूप पावतो. श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - हे स्वामी समर्था, विशुद्ध भावभक्ती करणे हेच विनासायास साधन असले, तरी तुझे केवळ नाम घेतल्याने परम परमार्थ सहज प्राप्त होईल. आमचे संचित आणि क्रियमाण थोडेसुद्धा शिल्लक राहणार नाही आणि तुझ्या कृपेने या दुस्तर भवसागरातून आम्ही सहज तरून जाऊ.
' हम गया नही, जिंदा है ।' हे अभिवचन देणारे भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ नेहेमीच आपल्या भक्तांना अभय देतात. समाधिस्थ होतांनादेखील श्री स्वामी समर्थांनी भगवद्-गीतेतील श्रीकृष्ण भगवंतानी दिलेल्या वचनाचाच पुनरुच्चार केला होता - अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ भक्त आणि भगवंताचे सर्वोच्च पातळीवरचे नाते हा श्लोक सूचित करतो. अर्थात जे भक्त अनन्यभावानें माझे निरंतर चिंतन करतात, नित्य माझी उपासना करतात अशा माझ्या भक्तांचा मी सदैव योगक्षेमाचा भार वाहतो.

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Sep 8, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी २१ ते २५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


पर उपकार विस्मरण । पापे केली अघटित कर्म । अहंभाव क्रोधा लागून । सदाचि गृही ठेवियले ॥२१॥ हे क्षमा करोनि दातारा । मज तारावे लेकरा । तुजविण आसरा । नाही नाही जगत्रयी ॥२२॥ हे दयानिधी, मी एक अति सामान्य असा मनुष्य आहे. काम, क्रोधादि षड्रिपु, दुर्वासना यांच्या दुष्टचक्रांत अडकल्याने माझ्या हातून अनेक दुराचरणें घडली. माझ्या सख्या-सोयऱ्यांनी केलेली मदत आणि उपकार मी सोयीस्कररित्या विसरलो. माझ्या अल्प ज्ञानामुळे अहंकाराने मला ग्रासले. सतत क्रोध अनावर झाल्याने अविचारी, विवेकहीनही झालो. परिणामी, मी असंख्य दुष्कृत्यें केली. सर्व दुर्गुण, विकार अंगी असलेला मी हीन-दीन, महापातकी आहे. हे जरी खरे असले, तरी तू करुणामूर्ती आहेस. अनन्यभावानें शरण आलेल्या आपल्या भक्तांस तू नेहेमीच आपल्या कृपाछत्राखाली घेऊन त्यांचा उद्धार करतोस. या त्रैलोक्यांत तुझ्याशिवाय मला कोणीही आश्रयदाता नाही. आश्रितांचे तुम्ही कल्पवृक्ष आहात. त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करतोस. मीही आपले अजाण बालक आहे, माझ्या अनंत अपराधांबद्दल मला क्षमा करावी. हे भक्तवत्सला, मला तू अव्हेरू नकोस अन माझ्यावर कृपा कर.

मज न घडे नेम धर्म । न घडे उपासना कर्म । नाही अंतरी प्रेम । परी ब्रीदाकरण तारणे ॥२३॥ विहित म्हणजेच वेदशास्त्रसंमत कर्म केल्याशिवाय साधकाची चित्तशुद्धी होत नाही. नित्य आणि नैमित्तिक कर्मांनी चित्ताची मलिनता जाते. हे जरी सत्य असले तरी, हे सद्गुरुराया, माझ्या हातून ना कधी धर्माचरण घडले ना कधी मी तुझी उपासना केली. उपासना म्हणजे अगदी निकट असणे. आपल्या इष्टदेवतेचे श्रद्धेने, भक्तिभावाने केलेले चिंतन-ध्यान म्हणजेच उपासना. जन्म-मरणाच्या ह्या संसृतिचक्रातून सुटका होण्यासाठी कर्म आणि उपासना ही साधना निश्चितच केली पाहिजे. परंतु हे दयाळा, माझ्या अंतःकरणात ईश्वराविषयी दृढ भक्तिभाव, प्रेम नाही. मग मला आत्मस्वरूपाचे ज्ञान कसे बरें होणार ? तुला शरण आलेल्यांना तू नेहेमीच अभय देतोस. किंबुहना, तुझी प्रतिज्ञाच आहे तशी ! तेव्हा, तुझ्या कृपाकटाक्षाने मला अंतर्बाह्य शुद्धता लाभावी, हीच प्रार्थना.

नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही । ऐसे देती ग्वाही । संत सज्जन पुराणे ॥२४॥ मागे बहुत तारिले । हे त्यांही अनुभविले । मज का अव्हेरिले । निष्ठुर केले मन किंनिमित्त ॥२५॥ कृतयुगीं जें प्राप्त ‘ध्यानें’ । त्रेतीं ‘यजनें’ द्वापारीं ‘अर्चनें’ । तें प्राप्त सर्व ‘नामसंकीर्तनें’ । गुरुभजनें कलियुगीं ॥ अर्थात ईश्वरप्राप्तीसाठी कृतयुगात ध्यान केले जात असे, त्रेतायुगात त्यासाठी यज्ञादिक अनुष्ठानें तर द्वापारयुगी पूजाविधानें केली जात असत. मात्र या कलियुगात नामस्मरण हा परमार्थाचा सहजसोपा उपाय आहे. नामसाधनेस सोवळ्या-ओवळ्याचे नियम नाहीत. सहज जाता येता पण मनापासून घेतलेले नाम परमार्थ, ईश्वरप्राप्ती आदि लाभ देते. चार वेद, सहा शास्त्रें, आणि अठरा पुराणेंदेखील 'अखंड हरिभजनाशिवाय मायेचे निरसन होणे अशक्य आहे.' हेच प्रतिपादित करतात. सद्वर्तन आणि अनन्यभावानें घेतलेले नाम परमानंदाची अनुभूती देते. ब्रह्मर्षी नारदमुनींच्या उपदेशानुसार ' मरा मरा ' या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली असता वाल्या कोळ्याच्या जिव्हेवर ' राम ' नाम अवतरले. अन त्या वाल्या कोळ्याचे वाक्सिद्धी प्राप्त झालेले वाल्मिकी ऋषी झाले. श्री समर्थ रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांसारख्या अनेक सत्पुरुषांनीही नाममहिमाच गायला आहे. कित्येक साधक, सद्भक्त यांनी केवळ नामसाधना करून भगवत्प्राप्ती साध्य केली. मग हे सदगुरो, तू मलाच का तुझ्या कृपेपासून वंचित ठेवले ? तू करुणेचा सागर आहेस. माझ्या हातून असा कुठला अक्षम्य अपराध घडला की तू माझ्याविषयी असा निष्ठुर झाला आहेस? हे दयाळा, मला क्षमा कर आणि या वेद-वेदान्तातील वचनांची प्रचिती दे.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ क्रमश:


Aug 6, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी १६ ते २०


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
श्री आनंदनाथ महाराजाय नमः

तेथे मी लडिवाळ । खरे जाणिजे तुझे बाळ । म्हणवोनी पुरवि माझी आळ । माय कनवाळ म्हणविसी ॥१६॥ 

श्री स्वामी समर्थांचे ' अकारणकारुण्यमूर्ती ' असेही एक नाम आहे. श्री स्वामी महाराज अकारण म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय आपल्या सद्-भक्तांवर कृपा करणारे आहेत. म्हणूनच श्री आनंदनाथ महाराज आपल्या श्रीगुरुंना प्रार्थना करतात, " हे गुरुराया, मी अज्ञानी, दुर्गुणी कसाही असलो तरी तुझेच लाडके बाळ आहे. लेकरांनी आईशिवाय कुणाकडे जावे बरें ? आपले मूल कसेही असले तरी आई त्याचे लाड करतेच. तू तर करुणेचा सागर आहेस, आपल्या भक्तांवर कृपावर्षाव करणारा दयाघन आहेस. तेव्हा, तू माझा हा हट्ट पूर्ण कर." श्री स्वामींच्या कृपेची अनुभूती येतेच, मात्र त्यासाठी भावही तितकाच निर्मळ, अनन्य शरणागतीचा हवा. ' जो जो मज भजें जैसा जैसा भावें, तैसा तैसा पावे मीही त्यासी ' या वचनाच्या प्रचितीचे असंख्य दाखले सद्गुरुंच्या चरित्रांत आढळतात.              


मी अन्यायी नानापरी । कर्मे केली दुर्विचारी । ती क्षमा करोनि निर्धारी । मज तारी गुरुराया ॥१७॥

हे स्वामीराया, समस्त अवगुण माझ्या ठायीं वास करून आहेत. दुष्ट वृत्ती आणि विचारांनी माझ्या मनाला ग्रासले आहे. अनेक वाईट वासना आणि विकारांनी अंध होऊन माझ्या हातून अगणित दुष्कर्मे घडली आहेत. कित्येकांवर मी जाणता-अजाणता अन्याय केले आहेत. तुला जे जे शरण आले, त्यांना तू नेहेमीच अभय दिले आहेस. हे दयानिधी, माझ्या सर्व अपराधांबद्दल मी तुझी मनापासून क्षमा प्रार्थित आहे. ‘ भक्तकाम कल्पद्रुम ’ असे तुझे बिरुद आहे, हे लक्षांत आणून माझा उद्धार कर. हे भक्तवत्सला, मला तुझ्या चरणीं आश्रय दे ! 


मनाचिया वारे । जे उठवि पापांचे फवारे । तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवि फेरे भवाचे ॥१८॥ 

माझे मन म्हणजे अनेक दुर्वासना, दोष यांचे आगरच आहे. तसेच, माझ्या मूढ बुद्धीमुळे अज्ञानवशात मी कधी तुझे स्मरण केले नाही. अनंत अपराध, पापकर्मे केल्यामुळे चौऱ्यांशी लक्ष योनींतून नाना क्लेश भोगत या भवसागरांत जन्म घेत राहिलो. हा दुर्लभ असा मनुष्य देह लाभल्यावरही माझ्या अल्प ज्ञानामुळे मी कधी तुझे ध्यान अथवा स्मरण  केले नाही. भोग-विषयांत रमल्यामुळे  माझ्या हातून कधी सत्कर्मे घडली नाहीत. वास्तविक पाहता, त्या परमात्म्याची प्राप्ती हीच नरजन्माची इतिकर्तव्यता आहे. मात्र ' आला आला प्राणी जन्मासि आला... ' अशीच स्थिती जन्मोजन्मी होत असते. हेच संचित-क्रियमाण माझ्या पुढील जन्मांस कारणीभूत होणार आहे. पाप-पुण्य आणि त्यांच्या परिणामांच्या चक्रातून, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मला मुक्त कर. हे दयाळा, ' लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात ' याची मला प्रचिती दे. तुझ्या कृपाकटाक्षाने माझ्या सर्व कर्मबंधनांचा नाश करून माझा उद्धार कर. 


कायिक वाचिक मानसिक । सर्व पापे झाली जी अनेक । ती क्षमा करुनी देख । मज तारी गुरुराया ॥१९॥ 

वेद-शास्त्रांत दहा प्रकारची पातके वर्णिली आहेत. कायिक पापे म्हणजे चोरी, हिंसा आणि परस्त्रीगमन होत. एखाद्याशी कठोरपणें बोलणे, असत्य अथवा खोटें बोलणें,  चहाडी करणे आणि शिव्या-शाप देणें अशी चार वाचिक पातके आहेत. मानसिक पापे म्हणजे इंद्रियांवाचून केलेली पापे - दुसऱ्यांच्या धनाचा अपहार करावा असे विचार, इतरांविषयी वाईट चिंतणे आणि देहाभिमान होत. हे गुरुराया, ही जी कायिक, वाचिक आणि मानसिक अशी पातके माझ्या हातून कळत-नकळत झालेली आहेत, त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. हे कृपासिंधू, या माझ्या असंख्य कुकर्मांसाठी मला क्षमा कर. मी तुला पूर्णतः शरण आलो आहे, मला तुझ्या भवतारक चरणद्वयीं आश्रय दे अन माझा उद्धार कर !      


माता उदरी तुम्ही तारिले । ते विस्मरण जिवासी पडिले । हे क्षमा करोनि वहिले । मज तारी गुरुराया ॥२०॥

हे पूर्णब्रह्मा, मातेच्या उदरीं पूर्वजन्मींचे ज्ञान देऊन तुम्हीच रक्षण केले. जीवा-शिवाचे अद्वैतत्व अर्थात 'सोहं' ची मला जाणीव करून दिली.  तथापि, मातेच्या गर्भात मल-मूत्र-रक्त यांनी वेष्टित असा देह धारण केल्यावर मायेच्या प्रभावाने मी देहभाव स्वीकारला. या अज्ञानाच्या गर्तेत अडकल्यामुळे जन्म होताच कोहं कोहं म्हणू लागलो. हे दयाळा, या मूढ बालकावर तू सत्वर दया कर. मला तुझ्या चरणीं आश्रय दे अन माझा उद्धार कर !


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ 

क्रमश:


Aug 3, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ११ ते १५


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः

कर्ण कुंडलाकृती । वदन पाहता सुहास्य मूर्ति । भ्रुकुटी पहाता मना वेधती । भक्त भाविकांचे ॥११॥
प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांचे स्वरूप अवर्णनीय आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने भक्तांना अनिर्वचनीय असा आनंद होतो. आश्वासक, मंद सुहास्य असलेले त्यांचे वदन पाहताच भाविकांचे भान हरपते. मंगलमूर्तीप्रमाणे कुंडलाकृती विशाल कान, कोरीव भुवया आणि प्रेमळ तरीही तेजस्वी नजर असे हे परब्रह्म चैतन्य पाहता क्षणीच कोणाचे चित्त आकर्षित होणार नाही ?
भोवयांचा आकारू । जेथे भुले धनुर्धरु । ऐसे रूप निर्धारु । नाही नाही जगत्रयी ॥१२॥ सरळ दंड जानु प्रमाण । आजानुबाहु कर जाण । जो भक्तां वरद पूर्ण । ज्याचे स्मरणे भवनाश ॥१३॥
श्री स्वामी समर्थांच्या भुवयांचा आकार एखाद्या धनुष्याप्रमाणे कोरीवाकृती होता. त्यांच्यासारखे रेखीव, तेजस्वी रूप सर्व त्रैलोक्यांत इतरत्र कुठेही आढळणार नाही. श्री स्वामींची उंची सहा फुटांपेक्षाही अधिक होती. केळीच्या खांबासारखे सरळ लांब पाय, गुढघ्यापर्यंत पोहोचणारे लांब आजानुबाहु हात अशा अनेक दैवी लक्षणांनी युक्त अशी त्यांची तनु पाहताच भक्तांची दृष्टी खिळून राहत असे. सिद्ध किंवा अवतारी पुरुषांची जी शुभ लक्षणे वेदश्रुतींनी वर्णिलेली आहेत, ती सर्व स्वामी समर्थांच्या ठायीं होती. असा आपला हा वरदहस्त ते नेहेमीच भक्तांच्या मस्तकीं ठेवीत असत. गुडघ्यापर्यंत लांब असे हे हात सर्वव्यापकताही दर्शवतात. संपूर्ण स्थावर-जंगम अशा चराचराला व्यापून राहिलेल्या स्वामींचे हात भक्तांच्या उद्धारासाठी, रक्षणासाठी कोठेही पोहोचू शकतात. भक्तांनी केवळ स्मरण केले असता प्रगट होणारे, भक्तांसाठी धावत येणारे असे हे स्मर्तृगामी अवधूत आहेत. त्यांचे केवळ नाम घेतले असता या संसारतापापासून आपली सुटका होते.
ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्गुरू । मज दावुनि ब्रह्म चराचरू । बोलविला आधारू जगतासी ॥१४॥
असा तू परात्परू म्हणजेच सर्वश्रेष्ठ परमात्मा, ईश्वर आहेस. तूच परमहंसरूपी सद्गुरू आहे. परमहंस ही एक योगमार्गातील सर्वोच्च अवस्था आहे. अशी अवधूत संन्यासावस्था प्राप्त करणारा महायोगीपुरुष गुणातीत तर असतोच, त्याच्या स्वरूपाचे वर्णन करणेदेखील शब्दातीत असते. हे प्रभो, सकल जीवांच्या उद्धारासाठी सदेह रूप धारण केलेले तू परब्रह्म चैतन्य आहेस. नाम, रूप, आकृती, स्थावर-जंगमादि सृष्टीमध्यें तूच अष्टधा प्रकृतीने नटलेला आहेस. या सकल ब्रह्मांडामध्ये तूच भरून राहिला आहेस. या सर्व जगताचा आधार आणि आश्रयदेखील तूच आहेस. तुझ्या या 'स्व' रूपाचे ज्ञान आणि दर्शन होताच स्वानंदरसाची तृप्ती अनुभवता येते. हे समर्था, माझ्यावर हा कृपानुग्रह करून या जगाच्या कल्याणासाठीच तू हे स्तवन रचण्याची मला प्रेरणा दिली.
ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी । वेद श्वान होऊनी । सदा द्वारी तिष्ठती ॥१५॥
पुराणादिकांत कथन केल्यानुसार, आपल्या सहस्त्रमुखांनी स्तुती करण्यासाठी जो विशेष प्रसिद्ध आहे असा शेषही तुझे वर्णन न करू शकल्याने मौन झाला. हे गुरुराया, अगम्य असा तुझा महिमा गातांना जिथे वेदांनीही ' नेति नेति 'म्हणजे न-इती म्हणत गर्जून हात टेकले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार मुख्य वेदांमध्ये या सृष्टीच्या सूत्रांचे धर्मविषयक नियम विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत. असे हे शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण वेददेखील, श्वानरूप धारण करून तुझ्या द्वारी तिष्ठत उभे असतात. मग, मन-बुद्धी-वाचा यांना अगोचर असलेल्या या परमेश्वरी तत्त्वाचे वर्णन आम्ही अज्ञानी बालकांनी कसे करावे बरें ?

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

क्रमश:


Jul 28, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ६ ते १०


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ऐसा तू बा अपरंपारू । या अनंत ब्रह्माचा आधारू । चराचरीचा आकारू । पूर्णाधारू म्हणविले ॥६॥ असा तुझा महिमा अपरंपार आहे. हे गुरुराया, तूच या अनंत ब्रह्मांडाचा आधारभूत होऊन राहिलेला आहेस. विश्वापेक्षाही ब्रह्मांडाची संकल्पना फार विशाल आहे. वेदशास्त्रांनुसार, ब्रह्मांडात कृतक लोक, महर्लोक आणि अकृतक लोक हे तीन लोक असतात. कृतक लोकात भूलोक, भूवर्लोक, स्वर्लोक यांचा समावेश होतो. तर, जनलोक, तपोलोक, सत्यलोक यांच्या समूहास अकृतक लोक म्हणतात. नऊ खंड व सप्त द्वीपांनी युक्त अशी ही पृथ्वी, सप्त पाताळें, आणि भू:, भुवः आदि सप्त स्वर्ग या सर्वांना निर्माण करणारे हिरण्यगर्भांड अथवा ब्रह्मांड आहे. या सर्व ब्रह्मांडाचे तूच अधिष्ठान आहे. अशाप्रकारे, तूच तर या संपूर्ण चराचराला व्यापून राहतोस. तूच तर या सर्वांचा सांभाळ करतोस. यास्तव, तुला पूर्णाधार म्हणतात.

ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती । तू जाणसि हे चित्ती । विश्वव्यापक म्हणवूनी ॥७॥ आम्हां सामान्य मनुष्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असलेले हे तुझे निरामय, शुद्ध चैतन्य, अगोचर स्वरूप आहे. त्या रूपाचे वर्णन करण्याची माझ्यासारख्या अज्ञानी, पामराची गती नाही. हे समर्था, तू सर्वांच्या अंतरात्म्यांत वास करणारा विश्वव्यापक आहेस. अर्थातच, ह्या सीमित बुद्धीमुळे ' नेति नेति शब्द, न ये अनुमाना ' अशी माझी झालेली अवस्था तू जाणतोसच. तरी देवा मतिदान । देणे तुजचि कारण । जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ॥८॥ तरी हे मायाध्यक्षा, तू मायेचे हे पटल दूर करून 'स्व' स्वरूपाचे ज्ञान होईल, अशी मला सुबुद्धी दे. हे केवळ तूच करू शकतोस. तुझ्या प्रकृतीच्या अर्थात मायेच्या भ्रमात आम्हा अजाण बालकांना गुंतवू नकोस. भक्तवत्सल, भक्ताभिमानी हे तुझे ब्रीद आहे. ' मला अनन्यभावानें शरण आलेल्यांचा मी उद्धार करणारच.' अशी तुझी प्रतिज्ञा आहे. हे ध्यानात आणून, आता मला योग्य तो बोध कर आणि अद्वैताची अनुभूती दे. ह्या तुझ्या भवतारक चरणद्वयीं माझी बुद्धी अखंड स्थिर राहू दे, हीच प्रार्थना ! अहा जी निर्गुणा । विश्वव्यापक सगुणा । सत्य निराकार निरंजना । भक्तांकारणे प्रगटलासी ॥९॥ हे गुरुराया, तुझे परब्रह्मस्वरूप निर्गुण, निराकार, आणि अनंत आहे. या सृष्टीच्या आरंभाच्याही आधीपासून अस्तित्वात असलेले तूच विमल, शब्दातीत, अवर्णनीय असे परमात्मा तत्व स्वरूप आहेस. अज्ञान, विकार, माया आदिंच्या पलीकडे असलेले तूच पूर्ण सत्य आहेस. संपूर्ण विश्वाला तू व्यापले असून सर्व जीवमात्रांत तुझाच अंश आहे. मुमुक्षु जीवांचा उद्धार करण्यासाठीच तू सगुण रूप धारण करतोस. सगुणाची उपासना करणे सहज शक्य असते. जे रूप डोळ्यांना दिसते, ज्या ठिकाणी मन एकाग्र करून पूजन करता येते, ध्यान करता येते तेच सगुण, साकार होय. वर्षानुवर्षे सगुणाचे असे चिंतन झाले की निर्गुणाची संकल्पना ध्यानांत येते. यासाठीच हे गुरुतत्त्व सगुण रूपांत अवतरित झाले आहे. रूप पहाता मनोहर । मूर्ति केवळ दिगंबर । कोटी मदन तेज निर्धार । ज्याच्या स्वरूपी नटले ॥१०॥ तुझे हे रूप अतिशय लोभस आहे, मनास सुखकारक असे आहे. तुलाच दिगंबर म्हणजेच दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे, असेही म्हणतात. दिशा जशा सर्वव्यापक असतात, त्यांना सीमा नसते, तसेच श्री स्वामींनीदेखील आपल्या चैतन्यरूपाने या सर्व विश्वाला व्यापून टाकले आहे. तुझे हे स्वरूप पाहताच जणू कोटी मदनांचे तेज एकत्र करून ही दिव्य मूर्ती घडविली आहे, असेच वाटते. अतिशय आल्हाददायक अशा तुझ्या रूपाचे वर्णन करणे सर्वथा अशक्य आणि अनाकलनीय आहे, हेच खरे !


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

क्रमश:


Jul 22, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी १ ते ५



॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥ 

श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेऊनि माथा । स्तवितो ताता तुजलागी ॥१॥

ॐकार म्हणजेच परब्रह्माचे स्वरूप ! या विशुद्ध चैतन्याचे मूर्तीमंत रूप म्हणजेच गुरुमहाराज. श्री दत्तात्रेय हे आद्यगुरू आहेत. त्या अनसूयानंदनापासूनच गुरुपरंपरा चालू झाली. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तप्रभूंचाच अवतार आहेत. अशा माझ्या श्री गुरुनाथांना नमन असो. आर्त, अर्थार्थी, मुमक्षु आणि जिज्ञासू अशा सर्व प्रकारचे भक्त श्री स्वामी समर्थांकडे येत असत. श्री स्वामी समर्थ नेहेमीच त्यांना अभय देत असत. अभाविकांचेदेखील त्यांनी कल्याणच केले. आपल्या भक्तांविषयी विशेष ममत्व असलेल्या त्या समर्थांच्या चरणीं मी माझे मस्तक ठेवून वंदन करतो आणि तुझे स्तवन म्हणजेच स्तुतीगाथा गातो. इथे आनंदनाथ महाराज श्री स्वामी समर्थांना पिता असे संबोधतात. आपल्या सद्गुरूंविषयींचा हा सहजभाव त्यांच्या भक्तीची उत्कटता दर्शवितो. तू नित्य निरंजन । तुज म्हणती निर्गुण । तूच जगाचे कारण । अहंभावे प्रगटलासि ॥२॥ तू नित्य निरंजन म्हणजेच सदासर्वदा निर्विकल्प, दोषरहित आहेस. श्री स्वामी समर्थ साक्षात परब्रह्म असल्याने पूर्ण, शुद्ध ज्ञानस्वरूप आहेत. त्यांच्यामध्ये अज्ञान, माया अशी कुठल्याही प्रकारची अशुद्धी नाही. सर्व ऋषी-मुनी, तपस्वी-योगी, ज्ञानी जन तुम्हांस निर्गुण म्हणतात. असे हे वर्ण आणि आकार विरहित निर्गुण, निराकार चैतन्य सर्वांठायीं असूनही अलिप्त असते. अनंतकोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला तूच तर संकल्पमात्रें या विश्वाची निर्मिती करतो. या जगाचा उत्पत्तीकर्ता, पालनकर्ता आणि संहार करणाराही तूच आहेस. तसेच जगत्कल्याणासाठी तूच अनंत रूपें, अनंत वेष धारण करून प्रगटतोस. तुझी स्तुती करावया । शक्ति नसे हरि-हर-ब्रह्मया । परि अघटित तुझी माया । जी संशयभया निवारीत ॥३॥ तुझी स्तुती अथवा तुझ्या या स्वरूपाचे वर्णन करण्याचे सामर्थ्य तर प्रत्यक्ष त्रैमूर्तींनाही नाही. ( तिथे माझ्यासारख्या पामराची काय कथा ?) सर्व सृष्टीला आपल्या प्रकृतीरूपी मायेच्या प्रभावाने निर्माण करणाऱ्या हे मायाध्यक्षा, तूच आपल्या कृपासामर्थ्यानें हे मायेचे पटल दूर करून आमच्या अज्ञानाचे, भयाचे निवारण करतोस. हे प्रभो, तुझ्या परमकृपेने आम्हांस अद्वैताचा साक्षात्कार होऊ दे !

मूळ मुळीचा आकारू । तुज म्हणती श्रीगुरू । सच्चित शक्तीचा आधारू । पूर्णाधारू ॐकारासी ॥४॥ या सृष्टीच्या प्रारंभाच्याही आधीपासून जो निरामय, शुद्ध चैतन्य रूपांत विद्यमान आहे आणि जो या विश्वाच्या उगमाचे मूळ आहे, त्यालाच तर श्रीगुरु महाराज असे संबोधतात. सत् म्हणजे शाश्वत अर्थात कधीही नाश न पावणारे, सदोदित असणारे आणि चित् म्हणजे शुद्ध ज्ञान होय. अशी ही शाश्वत ज्ञानाची कला/शक्ती म्हणजेच आदिमाया. हा सृष्टीरूपी खेळ मांडण्यासाठी म्हणून त्यानेच तर या मायेची निर्मिती केली आहे. तोच हा प्रणव ॐकार रूपी श्रीगुरु सकल विश्वाचा आणि चित्कलेचा आधार आहे. ऐसा तू देवाधिदेव । हे विश्व तुझेचि लाघव । इच्छेचे वैभव । मूळब्रह्मी नटविले ॥५॥ हे समर्था, तू तर देवांचाही देव आहेस. सर्व देवी-देवता ही तुझीच तर रूपें आहेत. तूच कधी श्री गणेश, कधी श्री हरि, कधी सदाशिव म्हणून प्रगट होतोस आणि आपल्या भक्तांचे संरक्षण करतोस. तुझ्याच संकल्पमात्रें देवी-देवता अवतार घेतात आणि कार्यसिद्धी करतात. तूच हे विश्व निर्माण केले आहेस. या सर्व विश्वाचा नियंता, सूत्रधार असलेला तूच या सकल जीवमात्रांत, स्थावर वृक्षांत चैतन्यरूपाने राहतोस. हा सृष्टीरूपी खेळ मांडून तूच सर्वांचा प्रतिपाळ करतोस, उद्धार करतोस आणि आपल्याच ह्या लीलेचा साक्षीभूत होतोस. या प्रत्येकाला ' सोहं ' ची जाणीव सुप्तरूपांत करून देतोस. तरीही, तू अंतर्यामी मूळ निराकार, ब्रह्मस्वरूपांत अखंड निजानंदी रममाण असतोस.


" महाराज आपण मूळचे कोण ?" , असा एका भक्ताने प्रश्न विचारला असता श्री स्वामी समर्थ उत्तरले, " दत्तनगर... मूळ पुरुष वडाचे झाड... मूळ,मूळ,मूळ... ". अधिकारी भक्तांच्या मते याचा अर्थ एव्हढाच की श्री स्वामी समर्थ हेच मूळ परब्रह्म असून योगमायेच्या सहाय्याने त्यांचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे झालेला आहे. मात्र ह्यांतून तरून जाण्याचा मार्ग म्हणजेच ह्या वटवृक्षाचे मूळ अर्थात श्री स्वामी समर्थांचे चरण आहेत. तेव्हा, ' भवतारक ह्या तुझ्या पादुका, वंदीन मी माथा, करावी कृपा गुरुनाथा ' असाच भाव स्वामीभक्तांठायीं नित्य असावा.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

क्रमश:


Jul 20, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - प्रस्तावना


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः


आम्ही नमू दीनानाथ l श्री गुरु स्वामी हा समर्थ l तोची बुद्धीचा दातार l भक्तवत्सल करुणाकर l चौदा विद्या चौसष्ट कळा l ज्याच्या दारीचा धुरोळा l वेद जेथे लोटांगणी l नेती बोलती वदनी l चारी मुक्तीची पायरी l सदा झुले ज्याचे द्वारी l आणिकाची कथा काय l शिव वंदी भावे पाय l कर जोडी शारंगधर l होऊनी पायाचा किंकर l ब्रह्मा बापुडा तो किती l काळा लागी ज्याची भीती l देव दानव किंकर l मुनी घेती निराकार l तया मानव भुलुनी गेले l अभिमाने नागवले l आनंद म्हणे दीनानाथ l निर्गुण की समर्थ l भगवान श्री दत्तात्रेयांचा तृतीय अवतार, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक स्वरूपाचे माहात्म्य अतिशय भक्तिपूर्ण आणि सहज सुंदर शब्दांत वर्णन करणारा हा अभंग ! अशा अनेक नितांतसुंदर रचनांचे रचयिता म्हणजेच परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमशिष्य, भक्तशिरोमणी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज. यांचे मूळ नाव ' गुरुदास एकनाथ वालावलकर ' असे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यांत महुरे नामक छोट्या गांवात ते वास्तव्यास होते. वंश परंपरेने त्यांच्या घराण्यांत दत्तभक्तीचा वारसा होता. लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे संपन्नताही होती. तरुणपणी ते मुंबईस राहून काथ्याचा आणि हरड्याचा धंदा करीत असत. त्यांचे राहणीमान उच्च थाटाचे होते. एकदा, ते भेंडे यांच्या म्हणजेच स्वामी समर्थांचे भक्त असलेले तात महाराज यांच्या पेढीवर बसले असता, त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ यांची महती ऐकली. अनेक भक्तांचे अनुभव आणि काहींना आलेली परमार्थिक प्रचिती ऐकून गुरुदासांना श्री स्वामी दर्शनाची ओढ लागली. ते अस्वस्थ झाले आणि कुणालाही न सांगता अक्कलकोटास प्रयाण करते झाले. मार्गांत श्री स्वामींचेच ध्यान करीत करीत लवकरच गुरुदास अक्कलकोटास पोहोचले. तेथील वडाजवळ असलेल्या तलावांत ते हातपाय धुण्यासाठी म्हणून उतरले. त्यांचे चित्त मात्र श्री स्वामींच्या दर्शनाच्याच ध्यासाने व्यापले होते. तेव्हढ्यांत त्यांच्या डोक्यावर त्या वटवृक्षाची एक सुकलेली डहाळी पडली. दचकून त्यांनी वर पाहिले तो काय आश्चर्य! श्री स्वामी समर्थ त्या वडाच्या एका फांदीवर बसून खळखळून हास्य करीत होते. त्यांनीच ती सुकलेली डहाळी त्यांच्या मस्तकावर टाकली होती. आनंदातिशयाने धावतच गुरुदास त्या वटवृक्षाजवळ गेले. तोपर्यंत स्वामी महाराजही वडावरून खाली उतरले होते. गुरुदासांनी श्री स्वामी समर्थांना अत्यंत भक्तिभावाने प्रणिपात केला, आपले मस्तक त्यांच्या चरणकमलांवर टेकविले. श्री स्वामींनी त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना समाधी लागली. अशा रितीने, प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि कृपांकित केले. काही दिवस, समर्थांच्या सान्निध्यांत राहून गुरुदास आपल्या घरी परतले आणि प्रपंचातील त्यांचे ध्यान उडाले. ते सदा सर्वदा स्वामींच्या ध्यानांत मग्न राहू लागले. त्यानंतर, पुढील सहा वर्ष ते नित्य श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाऊन त्यांची सेवा करू लागले. श्री स्वामींवरील त्यांची श्रद्धा आणि भक्ती वृद्धिगंत होऊन ते 'गुरुदासा' चे 'आनंदनाथ' झाले. श्री स्वामींची स्तवनगाथा, अभंग, स्तोत्र असे प्रासादिक वाङ्मय आनंदनाथ महाराजांनी स्वामीकृपेनें रचले. एकदा आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींना, 'आपणांस कृपाप्रसाद द्यावा.' अशी प्रार्थना केली असता, प्रसन्न होऊन श्री स्वामी समर्थांनी आपल्या मुखातून आत्मपादुका काढून त्यांना दिल्या आणि आपली कार्यध्वजा उभारण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थांच्या त्या आत्मपादुका घेऊन आनंदनाथ महाराज नाशिक जिल्ह्यांतील सावरगाव येथे वास्तव्यास आले आणि तेथेच त्यांनी आपल्या या आराध्यदेवतेचा मठ स्थापन केला. काही काळानंतर त्या मठाची धुरा एका भक्ताकडे सोपवून आनंदनाथ महाराज श्री नृसिंहवाडी इथे काही काळ आराधना करीत राहिले. त्यानंतर बेळगांवला जाऊन सावंतवाडी तालुक्यांतील होडावडे या गांवी आले. त्या ग्रामींच एका औदुंबराखाली त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या. कालांतराने, तिथेच श्री स्वामींचा मठही उभा राहिला. त्यानंतर, वेंगुर्ल्याजवळ धावडे या गांवी तिसरा मठ स्थापन केला. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या त्या दिव्य आत्मपादुका ( आत्मलिंग ) आजही या मठांत नित्यपूजेत आहे. तसेच, स्वामीभक्त दर गुरुवारी त्यांचा दर्शन लाभही घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थांच्या समाधी नंतरही पंचवीस वर्षांहून अधिक काळ आनंदनाथ महाराजांनी स्वामीभक्ती प्रसाराचे कार्य चालू ठेवले होते. ते ऐश्वर्यसंपन्न होते. त्यांच्या श्रीमंतीच्या थाटाचे काय वर्णन करावें ? ते घोड्यावरून फिरत असत. श्री दत्तजयंती आदी उत्सवांस सहस्त्रभोजन, अमाप दान-दक्षिणा करीत असत. मात्र त्यांची वृत्ती विरक्त होती. शिर्डीवासी श्री साईनाथांचे माहात्म्य यांनीच प्रथम सर्वांस कथन केले. १९०३ साली आनंदनाथ महाराजांनी 'संजीवन समाधी' घेतली आणि ते श्री स्वामी चरणीं लीन झाले. श्री आनंदमहाराजकृत 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' ( कामधेनू स्तोत्र ) हे स्वामीभक्तांच्या नित्यपठणांत असते. या दिव्य स्तोत्राचे चिंतन आणि मननाचा हा अल्प प्रयास आपण पुढील काही लेखांमधून करणार आहोत.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


May 24, 2018

॥ श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र ॥


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः

परब्रह्म परमेश्वर सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे अंतरंग शिष्य श्री आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामींच्या प्रेरणेने रचिलेले दिव्य “श्रीगुरुस्तवन स्तोत्र”. श्री आनंदनाथ महाराजांचे नातू श्रीगुरुनाथबुवा गणपती वालावलकर (परमपूज्य श्री अण्णा) ह्यांच्या नित्य उपासनेत त्यांच्याच आजोबांनी रचिलेले श्रीस्वामीचरित्र स्तोत्रं आणि श्रीगुरुस्तवन स्तोत्रं आवर्जून असायचे. ते प्रत्येक भक्ताला हक्काने ही दोन स्तोत्रे म्हणायला सांगत आणि स्तोत्रांच्या दिव्य अनुभूतीसुद्धा भक्तांना आल्या आहेत. श्री अण्णांची आजी म्हणजेच श्री आनंदनाथ महाराजांची पत्नी गंगुबाई नेहमी सांगत की गुरुस्तवनस्तोत्रांत एवढी ताकद आहे की ते मेलेल्या माणसाला पण जिवंत करेल.

ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेऊनि माथा । स्तवितो ताता तुजलागी ॥१॥ तू नित्य निरंजन । तुज म्हणती निर्गुण । तूच जगाचे कारण । अहंभावे प्रगटलासि ॥२॥ तुझी स्तुती करावया । शक्ति नसे हरि-हर-ब्रह्मया । परि अघटित तुझी माया । जी संशयभया निवारीत ॥३॥ मूळ मुळीचा आकारू । तुज म्हणती श्रीगुरू । सच्चित शक्तीचा आधारू । पूर्णाधारू ॐकारासी ॥४॥ ऐसा तू देवाधिदेव । हे विश्व तुझेचि लाघव । इच्छेचे वैभव । मूळब्रह्मी नटविले ॥५॥ ऐसा तू बा अपरंपारू । या अनंत ब्रह्माचा आधारू । चराचरीचा आकारू । पूर्णाधारू म्हणविले ॥६॥ ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती । तू जाणसि हे चित्ती । विश्वव्यापक म्हणवुनी ॥७॥ तरी देवा मतिदान () । देणे तुजचि कारण । जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ॥८॥ अहा जी निर्गुणा । विश्वव्यापक सगुणा । सत्य निराकार निरंजना । भक्तांकारणे प्रगटलासी ॥९॥ रूप पाहता मनोहर । मूर्ती केवळ दिगंबर । कोटी मदन तेज निर्धार । ज्याच्या स्वरूपी नटले ॥१०॥ कर्ण कुंडलाकृती । वदन पाहता सुहास्य मूर्ती । भ्रुकुटी पाहता मना वेधती । भक्त भाविकांचे ॥११॥ भोवयांचा आकारू । जेथे भुले धनुर्धरु । ऐसे रूप निर्धारु । नाही नाही जगत्रयी ॥१२॥ सरळ दंड जानु प्रमाण । आजानुबाहू कर जाण । जो भक्तां वरद पूर्ण । ज्याचे स्मरणे भवनाश ॥१३॥ ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्‌गुरु । मज दावुनि ब्रह्म चराचरू । बोलविला आधारू जगतासी ॥१४॥ ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी । वेद श्वान होऊनी । सदा द्वारी तिष्ठती ॥१५॥ तेथे मी लडिवाळ । खरे जाणिजे तुझे बाळ । म्हणवोनी पुरवी माझी आळ । माय कनवाळ () म्हणविसी ॥१६॥ मी अन्यायी नानापरी । कर्मे केली दुर्विचारी । ती क्षमा करोनि निर्धारी । मज तारी गुरुराया ॥१७॥ मनाचिया वारे । जे उठवि पापांचे फवारे । तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवि फेरे भवाचे ॥१८॥ कायिक वाचिक मानसिक । सर्व पापे झाली जी अनेक । ती क्षमा करुनी देख । मज तारी गुरुराया ॥१९॥ माता उदरी तुम्ही तारिले । ते विस्मरण जिवासी पडिले । हे क्षमा करोनि वहिले () । मज तारी गुरुराया ॥२०॥ पर उपकार विस्मरण । पापे केली अघटित कर्म । अहंभाव क्रोधा लागून । सदाचि गृही ठेवियले ॥२१॥ हे क्षमा करोनी दातारा । मज तारावे लेकरा । तुजविण आसरा । नाही नाही जगत्रयी ॥२२॥ मज न घडे नेम धर्म । न घडे उपासना कर्म । नाही अंतरी प्रेम । परी ब्रीदाकारण तारणे ॥२३॥ नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही । ऐसे देती ग्वाही । संत सज्जन पुराणे ॥२४॥ मागे बहुत तारिले । हे त्यांही अनुभविले । मज का अव्हेरिले । निष्ठुर केले मन किंनिमित्त ॥२५॥ तू विश्वाकारू विश्वाधारू । त्वांचि रचिले चराचरू । तूचि बीज आधारू । व्यापक निर्धारु जगत्रयी ॥२६॥ चार देहाच्या () सूक्ष्मी । तूचि झुलविशी निज लगामी । हे ठेऊनी कारणी । अहंभाव तोडावया ॥२७॥ जन्ममरणाच्या व्यापारी । जे भ्रमुनी पडले माया भरारी । ते सोडविशी जरी । निजनामे करुनिया ॥२८॥ ऐसा तू अनादि आधारू । तुज म्हणती वेदगुरु । परी हे व्यापुनी अंतरु । स्थिरचरी व्यापिले ॥२९॥ भावभक्ती चोखट () । करणे नेणे बिकट । नाम तुझे सुभट () । तोडी घाट भवाचा ॥३०॥ हे जाणुनी अंतरी । पिंड ब्रह्मांड शोधिले जरी । तरी सूक्ष्मीच्या आधारी । व्यापक निर्धारी तूचि एक ॥३१॥ म्हणोनि मौन्य गती । तुज निजानंदी स्तविती । जरी बोलविसी वाचाशक्ती । तरी हाती तुझ्या दयाळा ॥३२॥ म्हणोनि स्तवने स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती लागुनी । अवतार करणी () जाणोनिया ॥३३॥ अहंभाव तुटोनी गेला । प्रेमभाव प्रगटला । देव तेथेचि राहिला । अनुभव-शुद्धी खेळवी ॥३४॥ यज्ञ कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे स्तविता । हरिते व्यथा भवाची ॥३५॥ म्हणोनि सांगणे खूण । हा स्तव नित्य प्रेमे जाण । जो वाचील अनुप्रमाण । अकरा वेळा निर्धारे ॥३६॥ शुचिस्मित करूनि चित्ता । जो जपे प्रेमभरिता । पुरवी तयांच्या मनोरथा । सत्य सत्य त्रिवाचा ॥३७॥ हे लघु स्तव स्तवन । तारक जगाच्या कारण । भक्तिभावे पूर्ण । चुके चुके भव फेरा ॥३८॥ जो हा स्तव करील पठण । त्या घरी आनंद प्रकटेल जाण । देवोनी भक्ता वरदान । तारक त्रिभुवनी करील ॥३९॥ हा स्तव नित्य वाचा । भाव धरुनि जीवाचा । फेरा चुकवा चौऱ्यांशीचा । गर्भवास पुन्हा नाही ॥४०॥ हे जगा हितकारी । चुकवी चुकवी भ्रमफेरी । मृगजळ दाऊनि संसारी । मग तारी जीवाते ॥४१॥ ही आनंदनाथांची वाणी । जग तारक निशाणी । स्मरता झुलवी निरंजनी () योगी ध्यानी डुलविले ॥४२॥ ऐसे ऐकता गुरुस्तवन । जागे केले सच्चित () गुरु कारण । केवळ तो हरि हर ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूर्ण । गुरु हृदयभुवन व्यापिले ॥४३॥ तेणे होवुनि स्मरती । स्वये प्रगटली स्फूर्ती । नाभी नाभी आवरती । अवतार स्थिती बोलतो ॥४४॥ अयोनिसंभव अवतार । हिमालय उत्तरभागी निर्धार । होऊनी पूर्ण हंस दिगंबर । व्यापू चराचर निजलीले ॥४५॥ तेथून प्रगट भुवन । मग उद्धरु धरा जाण । धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे ॥४६॥ ऐशी ध्वनी निर्धार । गर्जला गुरु दिगंबर । सर्व देवी केला नमस्कार । आनंद थोर प्रगटला ॥४७॥ शालिवाहन शके तीनशे चाळीस । शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास । अवतार घेतला द्वितीयेस । वटछायेसी दिगंबरु ॥४८॥ तै धरा आनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार । सेवा करीन निर्धार । पादकिंकरी होऊनिया ॥४९॥ ऐसी गर्जना प्रकट । आनंद बोधवी हितार्थ । गुह्य हे निजबोधार्थ । न बोलावे दांभिका ॥५०॥

श्रीगुरुस्वामीसमर्थार्पणमस्तु
() मतिदान - सुबुद्धी () कनवाळ - कृपाशील, दयाळू
() वहिले - तात्काळ () चार देह - स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह
() चोखट - शुद्ध, उत्तम () सुभट - चांगले, पुण्यशील
() करणी - कृती () निरंजनी - शुद्ध निर्विकल्प समाधी
() सच्चित - शुद्ध अंतःकरण
सौजन्य : http://www.dattamaharaj.com/

                                                                                                                                                                 


अवश्य वाचावे असे काही -