॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
हे जगा हितकारी । चुकवि चुकवि भ्रमफेरी । मृगजळ दाऊनि संसारी । मग तारी जीवाते ॥४१॥
या दिव्य गुरुस्तवन स्तोत्राचे माहात्म्य पुन्हा अधोरेखित करतांना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - हे स्तोत्र अतिशय कल्याणकारी असून जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातून सुटका होण्याचा हा सहजसोपा मार्ग आहे. भवभयभंजन अशा सद्गुरूंच्या कृपेने, योग्य साधना केली असता मोक्षप्राप्ती निश्चितच असते. मात्र तत्पूर्वी हा मायाध्यक्ष आपल्या भक्तांना या संसाररूपी मोहप्रवाहांत गुंतवितो. मायेच्या प्रभावाने अल्पसुखाने मोहित झालेला हा जीव या मिथ्या संसारालाच आपले सर्वस्व मानतो. लोकेषणा, वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा ईषणात्रयांच्या बंधनात पुरता अडकत जातो. ही माया म्हणजे खरें तर मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे काय तर जे जसे आहे ते तसे न दिसता काहीतरी वेगळे भासणे. त्याला तुम्ही दृग्भ्रम अर्थात दृष्टीचा खेळ अथवा भास म्हणू शकता. या मृगजळाचे ज्ञान झालें की तें पूर्णपणे मिथ्याच आहे, हे ध्यानांत येते. त्याच न्यायाने, सदगुरुंना पूर्णपणे शरण गेले की अमूर्त असणारे शुद्ध ईशचैतन्य हे तुझेंच मूळ स्वरूप आहे या सत्याची जाणीव होते. हे सर्वबंधमोक्षदायका, या मिथ्या संसारातील फोलपणा दाखवून तुम्हीच तर आमचा उद्गार करता.
ही आनंदनाथांची वाणी । जग तारक निशाणी । स्मरता झुलवी निरंजनी | योगी ध्यानी डुलविले ॥४२॥
हे गुरुस्तवन स्तोत्र हा भवसागर तरून जाण्याचे सुलभ साधन आहे आणि मुमुक्षु भक्तांना त्याची अवश्य अनुभूती येईल हे आनंदनाथ महाराजांचे वचन आहे. हे सर्वेश्वरा, तुझ्याच कृपेनें ईश्चराधिष्ठित असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन होऊन निर्विकार परमात्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. परिणामस्वरूप, भक्तांना सहजच निरंजन म्हणजेच निर्विकल्प, विमल दोषरहित अशी योगसमाधी अनुभवता येते आणि परमानंदाचा लाभ होतो.
ऐसा ऐकता गुरुस्तवन । जागे केले सच्चित गुरु कारण । केवळ तो हरि हर ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूर्ण । गुरुहृदय भुवन व्यापिले ॥४३॥
श्री दत्तप्रभूंना जगदगुरु मानण्यात येते. भक्तांनी केलेल्या अत्यल्प सेवेने ते संतुष्ट होतात. आपल्या प्रिय भक्ताने, शिष्योत्तमाने केलेले हे आपले स्तवन ऐकताच सद्गुरू प्रसन्न झाले. अत्यंत निर्मळ, शुद्ध आणि विमल असे हे मूळ परमतत्व भक्तांकरिता सगुण, साकार झाले. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रह्मा, विष्णु आणि महेश अशा तीन शक्तींचे समन्वित स्वरूप असणारे हे गुरुतत्त्व जागृत झाले. वागिंद्रियांनीं केलेल्या या स्तवनाने गुरुतत्त्वाची अनुभूती येऊ लागली आणि श्रीगुरुमूर्ती अंतःकरणात स्थिर झाली.
तेणे होवुनि स्मरती । स्वये प्रगटली स्फूर्ती । नाभी नाभी आवरती । अवतार स्थिती बोलतो ॥४४॥
गुरुतत्वाच्या कृपाप्रसादामुळे आनंदनाथ महाराज कृतार्थ झाले. सद्गुरूंशी अशी तादात्म्यता पावल्यावर, ईश्चराधिष्ठित असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन सहजच झाले. सद्गुरूंचे अभयवचन प्राप्त झाल्यामुळे आता कुठलीही भीती राहिली नाही. मन निर्भय, निःशंक झाले आणि अत्यंत उत्स्फूर्तपणें त्या परमात्म्याचे अवतार रहस्य वाणीतून शब्दरूपांत साकार होऊ लागले.
अयोनिसंभव अवतार । हिमालय उत्तरभागी निर्धार । होऊनी पूर्ण हंस दिगंबर । व्यापू चराचर निजलीले ॥४५॥
माधवशास्त्री रचित श्री स्वामी महाराज चरित्र हा संस्कृत श्लोकबद्ध ग्रंथ आहे. त्यांत स्वामी समर्थांचे स्वरूप वर्णन करतांना ते लिहितात - जन्मशून्यो दिव्यरुपो रविभा: सुरवंदित: । अर्थात श्री स्वामी महाराज जन्मशून्य आहेत. सूर्याप्रमाणे तेजस्वी असे त्यांचे रूप दिव्य असून सर्व देवांनादेखील ते वंदनीय आहेत. साक्षात परब्रह्माचा हा अवतार अयोनिसंभव आहे. श्री स्वामी महाराज यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे माता-पिता कोण ? यांविषयी खात्रीलायक माहिती मिळत नाही. मात्र काही अधिकारी भक्तांच्या मतांनुसार उत्तर हिंदुस्थानात हिमालय पर्वतराजींमधील एका अरण्यांत ते प्रथम प्रगट झाले. ' सर्व चराचरांत मीच ईश्वरीय चैतन्य रूपाने भरून आहे. ', या स्वानंदात सदैव निमग्न असलेला हा श्री दत्तप्रभूंचा पूर्णावतार दिगंबर होता. जणू दशदिशांना त्यांनी वस्त्र म्हणून धारण केले होते. संपूर्ण चराचर सृष्टीला, या ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले हे परमतत्त्व सकल जीवांच्या उद्धारासाठीच, त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविण्यासाठीच अवतरले होते. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थांना अशक्य ते काय असणार ? त्यांच्या लीला खरोखर अनंत, अनाकलनीय आणि अगाध आहेत. पण ते केवळ चमत्कार नव्हते, तर त्यांनी संसारी, मुमुक्षु जन, मूक प्राणी अशा सर्वच शरणागतांना भुक्ति-मुक्ती देऊन त्यांचे इहपर कल्याण केले.
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
क्रमश:
No comments:
Post a Comment