Jan 28, 2022

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार षष्ठोऽध्यायः

कथा असी परिसून । नामधारक करी प्रश्न । म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून । ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥ शैव धर्में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता । मृण्मयलिंग पूजितां । ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥ तो आश्‍चर्य मानून । म्हणे कैलास आणून । देतों, दे ही माती त्यजून । असें म्हणून चालिला ॥३॥ बळें मूळासह कैलासा । उचलितां हाले सहसा । भिऊनी गौरी वदे गिरिशा । प्रळय कसा हा वारीं ॥४॥ तैं कैलासा चेपी हर । खालीं रगडे निशाचर । मरणोन्मुख हो करीं स्तोत्र । तेणें हर प्रसन्न हो ॥५॥ त्वदन्य न मला त्राता । तूंचि माझा प्राणदाता । दयाळू तूं राखें आतां । असें म्हणतां सोडी शंभू ॥६॥ त्वां अनुमान न करितां । शिवा सोडविलें आतां । असें म्हणूनी तो गीता । गाता झाला सप्तस्वरें ॥७॥ गायी संम्यक्‌ रागरागिणी । निजशिर छेदुनि । त्याचा वीणा करुनी । काल साधुनि प्रेमानें ॥८॥ शिव तयाच्या गाण्यासी । भुलोनी ये तयापाशीं । आत्मलिंग देऊनि त्यासी । म्हणे होसि तूंचि शंभू ॥९॥ ये हाता अमरता । तीन वर्षें हें पूजितां । लंका कैलासचि ताता । होईल आतां निःसंशय ॥१०॥ अवनिवरी मध्यें जरी । ठेवितां न ये करीं । येणेंपरी नेई पुरीं । काय करिसी कैलासा ॥११॥ शिवा करुनी नमन । पुरा जाई रावण । त्वरें नारद जाऊन । करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥ अधर्मा त्या जाणून । इंद्र ब्रम्ह्या दे सांगून । तोही विष्णूसी कथून । ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥ त्या अनुचितकर्मे हर । पश्चात्तापें म्हणे विसर । पडला झाला पाव प्रहर । गेला क्रूर येथोनियां ॥१४॥ देव बंदींत पडले । विष्णू म्हणे तुज कळलें । तरी कां हें असें केलें । जड ठेलें पुढें मज ॥१५॥ जो आधी मारी जीव । तया केला चिरंजीव । वरदान सांगे शिव । म्हणे उपाय करीं तूं ॥१६॥ ऐसें निगुती ऐकून । नारदा दे पाठवून । विष्णू करावया विघ्न । धाडी विघ्नविनायकांते ॥१७॥ मुनी मनोवेगें तया । गांठुनी लोटी काळ वायां । धाडी संध्या करावया । गणराया तंव आला ॥१८॥ त्या मानुनी ब्रह्मचारी । तो न घेतां त्याचे करीं । रावण दे लिंग तरी । अवधारी म्हणे बटू ॥१९॥ स्वपोष्य मी अतिदीन । तीन वार बोलावीन । जड होतां खालीं ठेवीन । दोष ने मग मला ॥२०॥ स्वर्गलोकीं सुर पाहतां । बोलावी त्या अर्घ्य देतां । तीन वेळ तो न येतां । तो स्थापिता झाला लिंग ॥२१॥ त्यानें केलें तें स्थापन । रावणा न हाले म्हणून । महाबळी हो गोकर्ण । क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापनं नाम षष्ठोऽध्यायः ॥

सिद्धमुनींनी दत्तप्रभूंच्या प्रथम अवताराची अर्थात श्रीपादांची जन्मकथा नामधारकांस सांगितली. कथेच्या अखेरीस, जनकल्याणार्थ अनेक तीर्थक्षेत्रयात्रा करीत, तसेच अधिकारी शिष्यांना दीक्षा देत देत श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्रास आले हे ही सविस्तर सांगितले. हा कथाभाग ऐकून, नामधारकास उत्सुकता वाटली आणि त्याने सिद्धमुनींना प्रश्न विचारला," स्वामी, त्रिमूर्ती दत्तावतार अनेक तीर्थक्षेत्रीं गेले. मात्र, गोकर्ण क्षेत्राचे विशेष असे काय महात्म्य आहे ? इतर अनेक अतिपावन तीर्थे असतांना, तिथे न राहतां श्रीपाद गोकर्णक्षेत्रींच का आले ? हे मला सविस्तर सांगा." आपल्या शिष्याच्या या प्रश्नाने संतोष पावलेले सिद्धमुनी गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगू लागले. - गोकर्ण क्षेत्रीं प्रत्यक्ष श्रीशंकरांचे आत्मलिंग आहे आणि त्याची प्रतिष्ठापना गणपतीने केली आहे, त्यांमुळे त्रैमूर्तींचे निर्गुण स्वरूपांत तिथे वास्तव्य असते. या अतिपवित्र स्थानाच्या उत्पत्तीचे आख्यान असे की लंकाधिपती रावणाची माता कैकसी (श्री गुरुचरित्राध्यायात हिचा उल्लेख कैकया असा आला आहे.) ही परम शिवभक्त होती. नित्य शिवलिंग पूजनाचे तिचे व्रत होते, शिवार्चन होईपर्यंत ती अन्नग्रहण करीत नसे. एकदा, शिवलिंग न मिळाल्यामुळे तिने मृत्तिकेचे लिंग तयार केले आणि मोठ्या भक्तिभावाने ती त्याचे पूजन करू लागली. तेव्हा, दशमुख रावण आपल्या मातेच्या दर्शनासाठी तिथे आला होता. लंकेसारख्या अत्यंत समृद्ध राज्याचे आपण सार्वभौम अधिपति आहोत, आणि तरीही आपली आई एका मृण्मय शिवलिंगाचे पूजन करत आहे, हे पाहून रावणास विषाद वाटला. आपल्या वैभवाचा, पराक्रमाचा रावणाला अत्यंत गर्व होता. त्याने कैकसीला वंदन केले आणि म्हणाला, " माते, या शिवलिंगाच्या पूजनाने काय फलप्राप्ती होते ? " त्यावर, " मी कैलासपदाच्या प्राप्तीसाठी हे व्रत करत आहे." असे कैकसी उत्तरली. आपल्या मातेची ही काम्यव्रत उपासना ऐकून रावणाने अहंकारयुक्त स्वरांत प्रतिज्ञा केली, " एव्हढेच ना ! तू उगाच कष्ट का करतेस ? मी कैलासासह उमा-शंकर आपल्या लंकेत घेऊन येतो. यापुढे, तू या मृत्तिकालिंगाचे पूजन करू नकोस. " असे म्हणून तो क्रूर असुर त्वरेनें तेथून निघाला. मनोवेगाने तो थेट कैलास पर्वतापाशी आला आणि आपल्या वीस बाहूंचे बळ लावून, धवलगिरी कैलास क्रोधाने हलवू लागला. आपली दहा शिरें कैलासाला टेकून, त्याने तो पर्वत उचलला. तेव्हा, वैकुंठ, सप्तपाताळे, स्वर्गादि इतर लोक डळमळू लागले. सर्व शिवगण, सूर भयभीत झाले. जगन्माता गिरिजाही भयचकित होऊन श्री महादेवांकडे गेली आणि म्हणाली, " हे कैलासनाथा, इथे जणू काही प्रलयकालच आला आहे, असे भासत आहे. हे शूलपाणी, तुम्ही तत्काळ या अनर्थाचे निवारण करा. आमचे रक्षण करा." उमेची ही विनवणी ऐकून महादेवांनी आपल्या डाव्या हाताने कैलास पर्वताला दाब दिला. त्यामुळे रावणाची दहाही मस्तकें आणि वीस बाहू त्या महाकाय पर्वताखाली अडकले. अशा अतीव कष्टदायी स्थितीत अडकलेला, मरणोन्मुख रावण सदाशिवास पूर्णपणे शरण आला, आणि स्वतः रचलेले शिवस्तुतीपर स्तोत्र तो अत्यंत आर्ततेने गाऊ लागला. त्याने श्री शंकरांची, ' हे पिनाकपणे, मी तुला अनन्य शरण आलो आहे. तुझ्याशिवाय मला अन्य कोणीही त्राता नाही. सर्व जगताचे रक्षण करणाऱ्या श्री शंकरा, तूच माझे सर्वस्व आहेस. तुझ्या या भक्ताला मरण कसे येईल बरें ? हे दयाळा, या दीन शरणागतास अभय दे.' अशी प्रार्थना केली. भोळा चक्रवर्ती शम्भोमहादेव प्रसन्न झाला. त्याने डाव्या हाताचा दाब काढून टाकला आणि कैलासखाली अडकलेल्या रावणाची सुटका केली. आपण अक्षम्य अपराध केला असतांनादेखील कैलासपतीने आपल्याला जीवदान दिले, हे पाहून रावणाने शंकरांची अपार स्तुती केली. त्याने आपले एक मस्तक कापून त्याला आपल्या आतड्याचे तंतू जोडले. असे पूर्ण समर्पणभावाने तयार केलेले ते तंतुवाद्य तो वाजवू लागला आणि गण, रस आणि सप्तस्वरयुक्त असे गायन करू लागला. पार्वतीपती श्रीशंकराची भक्ती निर्वाणरुप कशी आहे, हे तो लंकानाथ छत्तीस राग-रागिण्यांमध्ये गाऊ लागला. त्याच्या भावभक्तीमुळे प्रसन्न झालेला शिव, पंचमुख-दशवदन या स्वरूपांत रावणासमोर प्रगट झाला आणि त्याने वर मागण्यास सांगितले. तेव्हा, शंकरास साष्टांग प्रणिपात करून रावण म्हणाला, " हे ईश्वरा, कैलासप्राप्तीसाठी तुझी नित्य पूजा करण्याचे माझ्या मातेचे व्रत आहे. त्यासाठी हा कैलास पर्वत मला लंकेस घेऊन जाता यावा." रावणाचे ते मागणे ऐकून चंद्रमौळी म्हणाला," भक्ता, माझ्या पूजनासाठी मी तुला माझे प्राणलिंग देतो. याची त्रिकाळ पूजा केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिव्य आत्मलिंगाची जर तू तीन वर्षे पूजा केलीस, तर तुला ईश्वरस्वरूप अर्थात माझे स्वरूप प्राप्त होईल. तुला अमरत्व येईल आणि निःशंकपणे लंकानगरीच कैलासासमान होईल. मात्र तुझ्या नगरीत पोहोचेपर्यंत हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. या आत्मलिंगाच्या पूजनाचे एव्हढे फळ मिळणार असेल तर आता हा कैलास नेण्याचे कष्ट का घेतोस ?" शिवाचे ते आत्मलिंग प्राप्त झाल्यामुळे रावण अत्यानंदित झाला, त्याने शंकरांस पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि तात्काळ, तो लंकानगरीकडे प्रयाण करता झाला. ही सर्व वार्ता देवर्षी नारदमुनींना कळली आणि जगत्कल्याणासाठी, अत्यंत त्वरेनें त्यांनी ती देवराज इंद्रास सांगितली. श्रीशंकरांच्या वरदानामुळे रावण अजरामर होऊ शकतो, लंकानगरीच कैलासासम होईल, हा अधर्म आहे, हे लक्षांत घेऊन इंद्राने हे वृत्त लगोलग ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णुंस कथन केले. मग, नारद, इंद्रादि सुरगणांसहित ब्रह्मदेव आणि विष्णू कैलास पर्वतावर आले. व्यथित झालेले नारायण शंकरास म्हणाले, " महादेवा, रावण हा एक क्रूर दैत्य आहे. सर्व देव-देवता त्याच्या बंदिवासात आहेत. आता जर तुमच्या आत्मलिंग पूजनाच्या फलस्वरूप तो ईश्वर झाला तर मी रामावतारात त्याचा वध कसा करू शकेन ? त्या दुष्ट दैत्याचे निर्दालन करण्याऐवजी तुम्ही त्याला चिरंजीव होण्याचे वरदान दिले. या सृष्टीची घडी आता बिघडून जाईल." तेव्हा शंकर म्हणाले, " त्याच्या भावभक्तीला मी भुललो आणि हे अनुचित कृत्य माझ्या हातून घडले. तो दैत्य प्रबळ आणि अमर झाला तर मोठाच अनर्थ होईल, याचा मला विसर पडला. तो क्रूर दैत्य जाऊन आता साधारण पाव प्रहर झाला असेल. अजूनही तो लंकेत पोहोचला नसेल. तेव्हा हे ऋषिकेशा, हे वरदान निष्फळ होईल, अशी काहीतरी तू उपाययोजना कर." हे शिववचन ऐकून, श्रीविष्णूंनी त्वरित नारदाला बोलावले आणि " देवर्षी, रावणास लंकेत पोहोचण्यास विलंब होईल, एव्हढे कार्य तुम्ही करा. मी माझ्या सुदर्शनचक्राने सूर्यास झाकतो, म्हणजे संध्याकाळ झाली आहे असे वाटेल. तुम्ही रावणास गाठून सायंसंध्या करण्यास सांगा." असे सांगितले. ते ऐकून नारद त्वरेने लंकाधीशाच्या शोधार्थ निघाले. त्यानंतर, श्रीविष्णूंनी विघ्न करण्यासाठी गणेश्वराला पाठवले. लगोलग, गौरीहरपुत्र बटूचा वेष घेऊन निघाला. इकडे, नारदमुनींनी रावणास गाठले आणि त्याला प्राप्त झालेल्या शिव आत्मलिंगाचे माहात्म्य सांगू लागले. तोवर श्रीहरीने सुदर्शन चक्र सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. रावणासही लवकरांत लवकर लंकेस पोहोचायचे होते, त्यामुळे त्यांनी नारदाची अनुज्ञा मागितली. तेव्हा, नारद म्हणाले, " आता सूर्यास्ताची वेळ झाली आहे. दशानना, तू तर वेदज्ञानी ब्राह्मण आहेस. तू सायंसंध्या करणार नाहीस का ? ब्राह्मणाने शक्यतो संध्येची वेळ चुकवू नये. मी तर माझे संध्यावंदन आणि नित्यकर्मे उरकून येतो." असा निरोप घेऊन देवर्षी स्नान-संध्येसाठी निघून गेले.
नारदमुनींचे बोलणे ऐकून रावणही आज आपला व्रतभंग होईल, म्हणून थोडा चिंतीत झाला. ' आपले नित्य त्रिकाळ संध्या करण्याचे व्रत आहे, आणि आता तर संध्येची वेळ झाली आहे. मात्र, शंकरांनी हे लिंग भूमीवर न ठेवण्याविषयी सांगितले आहे. आता काय करावें बरे ?' असा तो विचार करू लागला. तेव्हढ्यात बालबटूच्या वेषांतील श्रीगणेश त्याला दिसला. हा बालब्रह्मचारी आपला विश्वासघात करणार नाही, आपण हे शिवलिंग काही काळ त्याच्या हातात देऊन स्वस्थचित्तानें संध्या करावी, असे ठरवून रावणाने त्या बटुवेषधारी गणेशाला जवळ बोलावले आणि संध्यावंदन होईपर्यंत हे लिंग हातात धरण्यास सांगितले. त्यावर श्री गणेश म्हणाला, " मी वनवासी ब्रह्मचारी आहे. मी तर एक लहान बालक असून स्वतःचे पालन-पोषणही करण्यास असमर्थ आहे. हे दिव्य लिंग जड असेल, जर हे माझ्या हातातून खाली पडले तर ?" पण रावणाने त्याची अनेक प्रकारें समजूत घातली. तेव्हा, बालबटू गणपती निर्धारपूर्वक म्हणाला," हे लिंग जर जड झाले तर मी तुम्हांला तीन वेळा हाक मारीन. तरी तुम्ही आला नाही तर मग हे लिंग मी जमिनीवर ठेवीन आणि त्याचा मला दोष लागणार नाही." ते मान्य करून रावणाने ते प्राणलिंग बालगणेशाच्या हाती दिले आणि तो संध्या करण्यासाठी नदीतीरावर गेला. त्यावेळी, सर्व सुरवर विमानांत बसून ही गंमत मोठ्या कौतुकाने पाहत होते. इकडे रावण अर्घ्य देत होता, तोच श्रीगणेशाने त्याला आवाज दिला, " हे लिंग फार जड आहे, मी ते फार वेळ हातात धरू शकणार नाही. तू लवकर परत ये." न्यासपूर्वक अर्घ्य घेतांना रावणाने हातानेच खूण करून मी येतोच आहे, असे त्याला सांगितले. काही काळ वाट पाहून, त्या बटूने दोनदा रावणाला बोलावले आणि " हे आत्मलिंग अतिशय जड झाले असून, यापुढें एक क्षणही ते मी हातांत धरू शकत नाही." असे मोठ्या स्वरांत म्हणाला. त्यावेळीं रावण ध्यानस्थ होता, त्याने गणेशाला काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा, श्रीहरींचे स्मरण करून, समस्त देवादिकांच्या साक्षीने श्रीगणेशाने आपल्या हातातील स्वतःच्या पित्याचे ते दिव्य, आत्मलिंग भूमीवर ठेवले. सर्व सुरवरांनी हर्षोल्हासानें पुष्पवृष्टी केली. लवकरच, लंकेश्वर सांयसंध्या आटपून त्वरेनें तिथे आला. तेव्हा, त्याला महादेवाचे आत्मलिंग भूमीवर स्थित झालेले दिसले. संतप्त झालेल्या त्या महाबली रावणाने प्रचंड जोर लावून ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जमिनीत अढळपणे स्थिरावले होते. त्या प्रचंड बळानें त्या आत्मलिंगाला गायीच्या कानाचा आकार प्राप्त झाला, पण अथक प्रयत्न करूनसुद्धा ते शिवलिंग रावणाच्या हातात आले नाही. याच कारणांमुळे, ते शिवलिंग ' गोकर्ण महाबळेश्वर ' म्हणून प्रख्यात झाले. खिन्न, निराश झालेला रावण रिक्तहस्तेंच लंकेस परतला. या क्षेत्रीं महादेवाचा अक्षय्य वास असल्याने भूलोकीचे कैलास असा या तीर्थाचा महिमा आहे.
॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

No comments:

Post a Comment