॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्गुरुवे नमः ॥
॥ अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार पंचमोऽध्यायः ॥
ये श्राद्धा हीं विप्राघरीं । उत्तरदेशीं भिक्षा करी । श्राद्धापूर्वीं द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥ दत्त विप्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव । झाला श्रीपादराव । गृहभाव स्वीकारीना ॥२॥ विशेष विद्याभिज्ञ झाला । तात आरंभी विवाहाला । पुत्र म्हणे योगश्रीला । वरीं, अबला सर्व माता ॥३॥ निश्चय हा ते ऐकून । खिन्न होती त्यां दावून । त्रिमूर्तीरुप, आश्वासून । बंधू दोन पंग्वंध जे ॥४॥ करी प्रभू त्यांवरी डोळा । चालूं लागला पांगळा । पाहूं लागला आंधळा । अतर्क्य लीला श्रीपादाची ॥५॥ आशीर्वाद देई तयां । काशीपुरा जाऊनिया । बदर्याश्रम पाहुनियां । श्रीपाद ये गोकर्णासी ॥६॥ विमलाः कीर्तयो यस्य । श्रीदत्तात्रेय एव सः । कलौ श्रीपादरुपेण । जयति स्वेष्टकामधुक् ॥७॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे श्रीपादावतारकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥
पीठापूर येथे आपळराज नरसिंह राजशर्मा नामक आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण रहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमती महाराणी होते. ते दाम्पत्य मोठे सदाचरणी आणि भक्तिपरायण होते. त्यांना अनेक पुत्र झाले, पण दुर्दैवाने त्यापैकी केवळ दोनच पुत्र जगले. जे जगले, त्यातील एक जन्मांध तर दुसरा पांगळा होता. या दुःखाचा परिहार व्हावा, व आपल्याला एखादा ज्ञानी, सद्गुणी पुत्र व्हावा यासाठी ते पती-पत्नी ईश्वराची सश्रद्धेने उपासना करीत होते. एकदा महालय अमावास्येच्या दिनीं त्यांच्या घरीं पितृश्राद्ध होते. त्यावेळीं, श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले आणि त्यांनी ' भवति भिक्षां देहि ' अशी साद दिली. घरीं श्राद्धाला बोलाविलेले ब्राह्मण अद्यापि जेवायचे होते, तरीही माध्यान्हकाळी आलेल्या त्या अतिथीला सुमतीने श्राद्धान्नाची भिक्षा वाढली व भक्तिभावाने नमस्कार केला. तिचा अभ्यागत-सेवाभाव पाहून अवधूत प्रसन्न झाले. आपले त्रिमूर्तींचे गूढ रूप प्रगट करून तिला म्हणाले," माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥ अर्थात, " माते, तुझें काही मागणे असेल तर तू मला सांग. तुझ्या इष्ट कामना अवश्य पूर्ण होतील." तेव्हा, पुन्हा एकदा श्री दत्तप्रभूंना चरणवंदन करून सुमती म्हणाली, " प्रभू, तुम्ही मला आई म्हणून हाक मारली, हेच आपले वचन सिद्ध करा. मला तुमच्यासारखा विश्ववंद्य, तेजस्वी, आणि परमज्ञानी पुत्र व्हावा." तिची ही प्रार्थना ऐकून दत्त महाराजांनी स्मित केले आणि तथास्तु असा आशीर्वाद देत म्हणाले, " तुला एक तपस्वी, तुमच्या कुळाचा उद्धार करणारा पुत्र होईल. एक मात्र सदैव लक्षात ठेव - असावें तुम्हीं त्याचिया बोलीं, अर्थात तुम्ही तो जे काही सांगेल, त्याप्रमाणेच वागा." आणि प्रभू अंतर्धान पावले.
यथावकाश, श्री दत्तप्रभूंनी आपले वरदान सत्य केले. सुमतीला एके शुभदिनी ( भाद्रपद शुक्ल चतुर्थी ) पुत्र झाला, प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय आपळराज-सुमती यांच्या कुळात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपादांच्या बाललीलांनी त्यांचे माता-पिता सुखावले. श्रीपाद सात वर्षांचे झाल्यावर आपळराजाने त्यांचे यथाशास्त्र मौंजीबंधन केले. असामान्य, प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले श्रीपाद वेदपठण, तसेच मीमांसा, तर्क आदि शास्त्रांत लवकरच पारंगत झाले. पुढें, तें सोळा वर्षांचे झाल्यावर त्यांचे पिता, आपळराज श्रीपादांचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा, श्रीपाद म्हणाले, "तात, मी तापसी व ब्रह्मचारी आहे. योगश्री म्हणजेच वैराग्य हीच माझी पत्नी आहे. माझे नावच श्रीवल्लभ आहे. इतर सर्व स्त्रिया मला मातेसमान आहेत. मी आता तप करण्यासाठी उत्तर दिशेला जाणार आहे." श्रीपादांचा, आपल्या पुत्राचा हा निश्चय ऐकून आपळराज-सुमती दोघेही खिन्न झाले. पुत्रस्नेहाने ते व्याकुळ झाले. तत्क्षणीं, सुमतीला श्रीदत्तप्रभूंचे वचन आठवले. स्वतःला अति कष्टाने सावरत ती म्हणाली," पुत्रा, तू आमचा प्रतिपाळ करशील, अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवणार नाही." आणि आता पुत्रवियोग होणार या दुःखाने तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा, श्रीपादांनी आपल्या माता-पित्यास त्रिमूर्ती स्वरूपांत दर्शन दिले आणि आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतमय दृष्टीने पहिलें अन काय आश्चर्य ! पांगळा बंधू चालू लागला व आंधळ्या भावास दृष्टी प्राप्त झाली. श्रीपादांची लीला खरोखर अनाकलनीय होती. श्रीपादांनी आपल्या सहोदरांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना शुभाशीर्वाद दिला.
त्यानंतर, आपल्या माता-पित्याची अनुमती मागत ते म्हणाले, " माझी अवज्ञा न करता मला निरोप द्या." पुढें, श्रीपाद श्रीवल्लभ काशीक्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात जाऊन त्यांनी तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेतले. त्यानंतर आपले ज्ञानमार्गाचे अवतार कार्य करण्यासाठी ते तीर्थस्थानी भेट देऊ लागले. अनेक भक्तांना दीक्षा देत देत, ते गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रीं आले.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचे अवतार वर्णन करतांना श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात - दिगंत कीर्तिमान आणि शुद्ध सत्त्वमय श्री दत्तात्रेयच या कलीयुगात आपल्या भक्तांच्या इष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने प्रगटले आहेत.
संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धर्माची पुन्हा नीट घडी बसविण्यासाठी भगवंताचे अवतार होतात. दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवंत जेव्हा अवतरित होतात, त्या अवतारांत रजोगुणाचा अंश येतो. मात्र श्री दत्तप्रभूंच्या अवतारांचे वैशिष्ट्य असे की साधक, उपासक, योगीपुरुष, तसेच भक्त यांची साधनामार्गातील प्रगती करून देण्याचे कार्य दत्तावतारी अवधूत करतात. याचकरिता, श्री दत्तात्रेयांचे स्वरूप शुद्धात शुद्ध असे मानले जाते.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता.
॥ प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः ॥
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment