Jan 22, 2022

विश्वव्यापी परात्मा यो नानारूपधरोsप्यज:


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥ श्री नृसिंहसरस्वत्यै नमः

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


दत्तात्रेयगुरु श्रीपादश्रीवल्लभ पुढे रुप श्री नृसिंहमुनि । तेचि श्रृंखला अवतरली रुपे अक्कलकोट स्वामी अर्थात अत्रि-अनसूया यांच्या पुत्ररूपांत अवतरित झालेले श्री दत्तात्रेय जगत्कल्याणासाठी पुन्हा श्रीपादश्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज ( अक्कलकोट ) म्हणून प्रकट झाले, अशी दत्तभक्तांची दृढ श्रद्धा आहे. पूर्वावतारांच्या चरित्रग्रंथांचे पठण, चिंतन केल्यानंतरच श्री स्वामींच्या लीलांचा खरा अर्थ उमगतो. भगवान दत्तात्रेयांच्या भक्तांची अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज एकच असल्याची दृढ श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हिंदू कालगणनेनुसार १३०० साली, (इ. स. १३७८) प्रकट झाले. आपले अवतारकार्य समाप्त झाल्यावर त्यांनी साधारण १३८० साली (इ. स. १४५९) श्री शैल्यगमन केले. श्री शैल्य पर्वताच्या रम्य परिसरांत, ते तीनशे वर्षे समाधी अवस्थेत होते. त्यानंतर, त्यांचे प्रथम प्रगटीकरण कर्दळीवनात झाले. पुढें, त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रीं भ्रमण केले तरी ' गाणगापूर आपले मुख्य स्थान आहे, यास्तव त्याचेच नजीक वास करून अवतारकार्य पूर्ण करावे.' याच संकल्पूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटी वास केला. श्री स्वामी समर्थ पूर्ण दत्तावतार होते, याची अनेक दत्तभक्तांना अनुभूती आली आहे.  
श्रीस्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना, त्यांची कीर्ती ऐकून एक युरोपियन वकिल त्यांच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी, त्या वकिलाचा एक पारशी मित्र अक्कलकोट येथे होता. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अक्कलकोट स्वामी महाराजांना विचारले, “ स्वामी, तुमचे मूळ स्थान कुठले आहे ? " त्यावर श्रीस्वामी महाराजांनी उत्तर दिले, “ सर्वप्रथम मी श्रीशैल पर्वतावरील कर्दळीवन येथे प्रगट झालो. या पृथ्वीतलावर तीर्थाटन करत करत कोलकता या शहरात गेलो. बंगालमध्ये भटकत असताना मला काली मातेचा आशीर्वाद मिळाला. त्यानंतर, गंगामातेच्या तीरावर भटकत मी हरिद्वार, केदारनाथ, गंगोत्री, बद्रीनाथ, अयोध्या, द्वारका अशा असंख्य पवित्र क्षेत्रांना भेट दिली. पुढें, मी गोदावरी नदीच्या काठी पोहोचलो. त्यानंतर मी हैदराबादला येथे आलो. तिथे काही काळ राहून मी मंगळवेढा येथे प्रयाण केले. मंगळवेढ्यास मी बरेच वर्षे वास्तव्य केले. मग पंढरपूर, बेगमपूर, व सोलापूर फिरून मोहोळ गावात पोहोचलो. काही दिवसांनी मी इथे या अक्कलकोट नगरीत आलो. तेव्हापासून माझे इथेच वास्तव्य आहे."
साधारण असाच प्रश्न पुणे येथील कर्वे नावाच्या एका भाविकाने विचारला असता, त्यावेळी अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थ उत्तरले, “ मी काश्यप गोत्री, यजुर्वेदी ब्राह्मण आहे. माझे नाव नरसिंहभान असून आमची रास मीन आहे. "
गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे प्रमुख स्थान आहे. एकदा गाणगापूरचा एक भक्त अक्कलकोटला आला असता, श्रीस्वामी समर्थांनी त्याला विचारले, “ तू कोणत्या देवाची आराधना करतोस? " त्यावर तो भक्त अतीव श्रद्धेने म्हणाला, “ माझे आराध्य दैवत श्री क्षेत्र गाणगापूरस्थित श्री नृसिंह सरस्वती आहेत. ” त्याचे ते उत्तर ऐकून श्रीस्वामी हसत म्हणाले, " माझेही नाव नरसिंहभान आहे, बरं का ?"
असेच एकदा श्री नरसिंह सरस्वतींच्या दीर्घकाळ वास्तव्याने पावन झालेले आणि दत्तसंप्रदायातील जागृत पुण्यक्षेत्र, श्रीनृसिंहवाडी येथील काही लोक श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला आले होते. तेव्हा, त्यांनी विचारले, “ स्वामी, तुम्ही कोण आहात ?" त्यावर स्वामींनी उत्तर दिले, “ मूळपुरुष, वटवृक्ष, दत्तनगर ! ” विशेष नवलाईची गोष्ट ही की स्वत: श्री नृसिंह सरस्वती यांनीच आपल्या या भक्तांना दृष्टांत देऊन अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाण्यास सांगितले होते. 
मुंबईत श्रीकृष्णबुवा ऊर्फ ठाकूरदासबुवा नावाचे एक दत्तोपासक होते. प्रारब्धयोगानें, त्यांना कुष्ठरोग झाला. अनेक वर्षे उपाय करूनही व्याधीस उतार पडला नाही. अखेर निराश होऊन यापुढें आपण काशीक्षेत्री वास करावा, असा त्यांनी निश्चय केला. तत्पूर्वी, आपल्या आराध्यदैवताचे, श्री दत्तपादुकांचे गाणगापूर येथे जाऊन अखेरचे दर्शन घ्यावें म्हणून ते श्री क्षेत्र गाणगापुरांस आले. श्री नरसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांवर अर्पण करण्यासाठी उत्तम कस्तुरी त्यांनी आपल्याबरोबर आणली होती. दर्शन घेऊन त्यांनी पादुकांचे यथासांग पूजनही केले. मात्र, त्यावेळीं बुवा कस्तुरी अर्पण करण्यास विसरले. त्याच रात्री त्यांना, " अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे, म्हणजे तू व्याधीमुक्त होशील " असा श्री दत्तप्रभूंचा स्वप्नदृष्टांत झाला. त्यानुसार, ते अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतलें. तत्क्षणीं, श्रीस्वामी महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, “ हमारी कस्तुरी अभी के अभी लाव !” अशारितीने, श्री स्वामी समर्थांनी अंत:साक्षित्वाची प्रचिती ठाकूरदासबुवास दिली.   
गोविंदराव टोळ नावाचे एक गृहस्थ पोटशूळाच्या व्याधीने अतिशय त्रस्त होते. त्यांचे वडील चिंतोपंत टोळ हे श्री स्वामी समर्थांचे भक्त होते. आपल्या पित्याच्या आग्रहास्तव ते अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आले खरें, मात्र गोविंदरावांची श्रीस्वामी समर्थांवर श्रद्धा नव्हती. त्यामुळे, स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गाणगापूरला जाण्याचे ठरविले होते. अनेक श्री समर्थभक्तांनी परोपरीने सांगूनही ते गाणगापूरला गेले. तेथे सुमारें अडीच वर्षे राहून त्यांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांची उपासना केली. अखेर, श्री दत्तप्रभूंचा दृष्टांत झाल्यावर ते अक्कलकोटला परतले आणि श्री स्वामी समर्थांची भक्तिभावाने सेवा करू लागले. पुढें, लवकरच त्यांची व्यथा दूर झाली. 
एकदा, गोविंदराव यांनी श्रीस्वामींना विचारले, “ भीमा-अमरजा संगमावरही आपले वास्तव्य असते का? " त्यावर प्रसन्नपणे स्मित करत श्रीस्वामी वदले, “ होय, मी त्याक्षेत्रीही आहे. ” त्यानंतर काही दिवसातच गोविंदरावांना शुभ स्वप्न पडले. त्यांना गाणगापूर येथील निर्गुण पादुकांच्या स्थानीं श्री स्वामी समर्थ दिव्यरुपांत विराजमान आहेत आणि त्यांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका धारण केल्या आहेत, असे दिसले.

दत्तभक्तहो, श्रीगुरुमहिमा काय पुससी । अंनतरुपें होतीं परियेसीं । विश्वव्यापक परमात्मा ॥ या वेदवचनाचीच ही प्रचिती नव्हें काय ?

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

No comments:

Post a Comment