Jan 14, 2022

श्री शंकर स्वामीरचित श्रीनृसिंहवाडीचा महिमा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री  गुरुवे  नम: ॥ श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये ॥


श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला । ऐकुनी घेई गुरूच्या मुला ॥ कृष्णावेणी, पंचगंगेच्या पुण्यसंगमावरी । सदा शोभे ही पावनपुरी ॥ दत्तराज-नरसिंहसरस्वती-त्रिमूर्ती-विधिहरी । विलासती येथें कृष्णातीरी ॥ कल्पवृक्ष औदुंबर प्रभुवरी शीतल छाया धरी । विराजती गुरूवर निजमंदिरी ॥ पदकमळें ज्यांची घनःश्यामसुंदर । निजपदस्वरूपी स्वयेंच ते गुरूवर ॥ सच्चिदानंदघन व्यापक सर्वेश्वर । या नृसिंहसरस्वती स्वामींचा आश्रय आहे हिला ॥

म्हणोनि महिमा जगीं जाहला श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला

दीनदयार्णव अंबामाधवनंदन श्रीगुरुयती । कल्पतरू कामधेनु शोभती ॥ भावभक्तिनें जे नर त्यांच्या पादुकांसि पूजिती । राहुनी तेथें उपासिती ॥ प्रदक्षिणा घालती, तयांचे चरित्रही वाचिती । नवविधा भजनें आराधिती ॥ कामना तयांच्या असतील, ज्या ज्या मनीं । त्या सकळ पुरविती, श्रीगुरु चिंतामणी ॥ प्रभुकृपें लाभती सुत वंध्येलागुनी श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला

दारिद्र्यासि धन, आरोग्य मिळे, रोग असे त्याजला । टळें अपमृत्युही तो या स्थळा ॥ कुष्ठी, अपस्मारी, अंध, बहिरे, हृदयशूळी, पांगळे । मंदमति, मूक होती चांगले ॥

धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चारी पुरुषार्थचि आगळे । या स्थळीं तेही लाभती सगळे ॥ श्रीगुरुपादुकार्चनी फळ, सौख्य-समृद्धी मिळे । दैन्य, अघ, तापत्रय मावळे ॥ ज्या ठायीं षड्गुणाधिपती श्रीवल्लभ । अघटित घटनापटू दत्तगुरु स्वयंप्रभ ॥ कवणास काय कधी तेथ असे दुर्लभ । दीनसहोदर भक्तवत्सल देव जगी गाजला ॥ तो जिथे शंकरासि लाधला श्रीनृसिंहवाडीचा महिमा आम्ही सांगतो तुला


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


No comments:

Post a Comment