॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
म्हणोनि सांगणे खूण । हा स्तव नित्य प्रेमे जाण । जो वाचील अनुप्रमाण । अकरा वेळा निर्धारे ॥३६॥ शुचिस्मित करूनि चित्ता । जो जपे प्रेमभरिता । पुरवि तयांच्या मनोरथा । सत्य सत्य त्रिवाचा ॥३७॥
गुरुस्तवनाच्या महतीचे वर्णन करतांना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - स्वामीभक्तांनो, श्री स्वामीकृपा प्राप्त होण्यासाठी मी तुम्हांस एक सहज सोपा उपासनामार्ग सांगतो. हे गुरुस्तवन स्तोत्र अत्यंत श्रद्धेनें आणि त्यांतील बोध, अर्थ जाणून घेऊन वाचावे. अनुप्रमाण म्हणजे एखाद्या गोष्टीचे यथार्थ ज्ञान होणे. अत्यंत नि:शंक मनाने, या स्तवनातील शब्द, वचनें यांचा यथायोग्य अर्थ जाणून घेऊन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थांवर दृढ श्रद्धा ठेवून या दिव्य स्तोत्राचे अकरा वेळा आवर्तन करावे. अंतःकरण पवित्र ठेवून जो या स्तवनाचे भक्तिभावाने पठण करेल, त्या भक्ताच्या सर्व इष्ट मनोकामना श्री समर्थांच्या कृपेने फलद्रुप होतील. हे त्रिवार सत्य आहे.
'त्रिवाचा' या शब्दाचा एक अर्थ असा आहे की तीन वेळा उच्चारलेले वचन, जे सत्यरूप असते. थोडा वेगळा आणि आध्यात्मिक अर्थ पाहू जाता, ‘ त्रिवाचा ’ हा शब्द वैखरी, मध्यमा आणि पश्यंती या तीन वाणींना दर्शवितो. आपल्या वाणीचं व्यक्त रूप अर्थात प्रत्यक्ष मुखातून प्रगटणारी शब्दरूप वाणी म्हणजे वैखरी आहे. तर मनातील विचार, मनातल्या मनात केलेले बोलणे असे मध्यमा हे वाणीचे अंतर्मनातलं रूप आहे, तर पश्यंती म्हणजे आपल्या विचारांचे सुप्त रूप अथवा स्फुरण होय. थोडक्यात, ईशस्तवन अथवा नामस्मरण जर मोठ्याने केले जे आपणही ऐकू शकतो आणि आजूबाजूचेही जन ऐकू शकतील तर ते वैखरी वाणीतील स्तवन होय. तेच मध्यम स्वरांत केलेले स्तवन जे आपण ऐकू शकतो मात्र बाजूला बसलेली व्यक्ती ऐकू शकत नाही, ते मध्यमा वाणीतील स्तवन होते. योगीपुरुष, उच्च कोटीचे साधक हे मात्र ईशस्तवन अथवा परमेश्वराच्या नामाचा जप करत नाहीत तर त्यातून नामजपाची धून ऐकतात. अर्थात नामाचा जप न होता ते त्यांच्या श्वासातच तद्रूप झालेले असते. असा जप त्या सिद्धपुरुषांच्या रोमारोमांत अविरत, अखंड सुरु असतो आणि हाच जप त्यांना परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करवून देतो. अर्थात श्री आनंदनाथ महाराजांसारखे सिद्ध योगी आणि श्री स्वामी समर्थांचे कृपांकित थोर शिष्य ज्यांनी त्या परमानंदाची अनुभूती वारंवार घेतली आहे, त्यांनी आपल्यासारख्या अतिसामान्य लोकांनाही श्री स्वामींच्या कृपेचा लाभ व्हावा यासाठी किती सहज-सुलभ तरीही अमौलिक असा हा श्रीगुरुस्तवनाचा ठेवा दिला आहे. श्री आनंदनाथ महाराजांचे स्मरण-वंदन करून आपणही श्री स्वामी समर्थांचे हे स्तवन नित्य पठणांत ठेवावे आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावरही राहो हीच प्रार्थना करू या !
हे लघु स्तव स्तवन । तारक जगाच्या कारण । भक्तिभावे पूर्ण । चुके चुके भव फेरा ॥३८॥ जो हा स्तव करील पठण । त्या घरी आनंद प्रकटेल जाण । देवोनि भक्ता वरदान । तारक त्रिभुवनी करील ॥३९॥ हा स्तव नित्य वाचा । भाव धरुनि जीवाचा । फेरा चुकवा चौऱ्यांशीचा । गर्भवास पुन्हा नाही ॥४०॥
श्री स्वामी समर्थांचे हे लघु स्तवन स्तोत्र अतिशय प्रभावी असून या भवसागरातून तरून जाण्याचा सुलभ मार्ग आहे. ईश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी केवळ त्याला अनन्यभावाने शरण जाणे आवश्यक आहे. अर्थात पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने जो हे स्तवन पठण करेल, तो या जन्म-मृत्यूच्या चक्रांतून सहजच मुक्त होईल. आपल्यासारखे सामान्य जन सहसा सकाम भक्ती करतात, म्हणजेच काही ठराविक इच्छापूर्ती, सांसारिक कामना आदि गोष्टींसाठी स्वामींची उपासना करतात. तर थोर तपस्वी, योगी-मुनी यांचे केवळ ' हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ' असेच मागणे असते. संकल्पसिद्धीदाते श्री समर्थ मात्र ह्या दोन्ही प्रकारच्या भक्तांवर नेहेमीच आपल्या कृपेचा वर्षाव करतात. हे पूर्णतः जाणणारे श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - नित्यनियमाने या स्तवनाचे पठण केले असता, श्री स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती अवश्य येईल. दत्तप्रभूंच्या वरदानाने भक्तांच्या सर्व शुभ मनोकामना पूर्ण होतील आणि हा संसार तरून जाण्यासाठी शक्तिसुद्धा प्राप्त होईल. जिथे या प्रासादिक स्तोत्राचे पठण होईल, तिथे प्रत्यक्ष श्री स्वामी महाराजांचा वास असेल अर्थातच तेथील वातावरण प्रसन्न, मंगलमय आणि पवित्र होईल. याचकरिता स्वामीभक्तहो, सूक्ष्म जीव ते मानव अशा चौऱ्यांशी लक्ष योनींच्या या संसृतिचक्रातून मुक्त होण्यासाठी त्या अवधूत दत्तात्रेयांचे हे स्तोत्र श्रद्धापूर्वक नित्य वाचा. योगीश्वर श्री स्वामी हे स्वतःच सत्य संकल्पाचे मूळ आहे. अशक्यप्राय आणि अतर्क्य गोष्टीसुद्धा स्वामी कृपेने सहज शक्य होतात. सर्व लौकिक आणि कर्मबंधने नष्ट करून मोक्ष प्रदान करणारे हे श्रीसद्गुरु आहेत. तेव्हा, शरणागतकवच असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पुन्हा गर्भवास भोगावा लागणार नाही, अशी ग्वाहीही श्री आनंदनाथ महाराज देतात.
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
क्रमश:
No comments:
Post a Comment