Showing posts with label नवनाथ भक्तिसार आणि कथासार. Show all posts
Showing posts with label नवनाथ भक्तिसार आणि कथासार. Show all posts

Jan 12, 2023

श्री नवनाथ नित्यपाठ


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

विद्यानाथ श्रीगणेशातें । आद्यनाथ श्रीशंकराते । गुरू श्रीपाद श्री यतीते । वंदितो श्री रघुराजा ॥१॥ नमूं आतां नवनाथां । जन्म अयोनिज त्या होता । योगबल त्या दिले स्वतां । आद्यनाथे प्रत्यक्ष ॥२॥ नाथनावे नवारंभक । मच्छींद्र, गोरक्ष, गहिनी प्रमुख । जालंधर, कानिफ, रेवण देख । मीन, नाग, चर्पटी ॥३॥ नवनाथ यति यात्रिक । योग मार्ग प्रचारक । त्याग परहित मंत्रैक । गुरूभक्त ते निरंजन ॥४॥ चिखल गोळा मानवदेह । जाणीव चित्कलेसह । ज्ञान विज्ञान साधन व्यूह । देह धरितीं नवनाथ ॥५॥ नवनाथा नमस्कारूं । अवतार कार्य त्यांचे स्मरूं । योग पदही स्वीकरूं । मागू तया दिव्य सिद्धि ॥६॥ नाथ नारायण हे नऊ । अवतरती, बल त्यांते बहू । करिती दैवतेंहि जर्जरु । विश्वंभर त्या वश झाले ॥७॥ वायुदेवांसि आकर्षिले । भैरवाग्नीस वश केले । सूर्यतापन सहन झाले । साह्य करिती वेताळहि ॥८॥ श्रीशिव, श्रीराम, श्रीदत्त । आदेशा लक्ष देती गुप्त । प्रकट दर्शन सदा देत । जयनाथ गाऊं नऊं ॥९॥ त्याग आदेश ते देती । दीना अनाथां उपकारिती । धन धान्यादि संपदा किती । वितरती घरो घरीं ॥१०॥ वश यांतें सकल शक्ति । राजशक्ति, नि देवभक्ति । कामिनी, नि गुरुभक्ति । कालशक्ति हि वश यांसीं ॥११॥ आदिशक्ति श्री भवानी । ललिता, दुर्गा जी कुंडलिनी । योगिनी ती सद्य: प्रसादिनी । इच्छिलें तें देतसे ॥१२॥ जय जय श्री नवनाथ । बुद्धिचातुर्य, दे, साथ । मुखी नाम-जप सदा होत । प्रेमा हृदी भक्तांस्तव ॥१३॥ यवन हिंदूसी एकता । गिरि कुहरी वास करितां । अलख निरंजन बोध देतां । नाथ पंथा जय गाऊं ॥१४॥ कार्य केले सप्तशत । वर्षे, रक्षिले श्री, भक्त, । यज्ञ मार्गे, दाने देत । इंद्रराजहि दास केला ॥१५॥ धरूं ध्यानी नाथां सदा । स्तवूं त्यांसीच सर्वदा । याचूं एकचि संपदा । भार आपदा करां दूरी ॥१६॥ योग विद्या आम्हां द्यावो । कौशल्य कृति, हाती यावी । हीच सेवा अखंड व्हावी । सनाथ नारायणा ! करा आम्हां ॥१७॥ आदिनाथ श्री उमाकान्त । गुप्त राहती स्वर्ण-गिरींत । 'म्हातारदेव' प्रसिद्ध होत । नमन देवा ! उमाकान्ता ! ॥१८॥ गर्भगिरी जो गिरी सुवर्ण । कानीफ येथेंचि राही पूर्ण । मच्छींद्र-बायबा गौरवर्ण । मढीस्थानी दक्षिणेसी ॥१९॥ जालंदर जे जानपीर । वसले पूर्वेस या गिरीवर । समीप पाही नृसिंहपूर । गोरक्ष तेथें राहिले ॥२०॥ गर्भाद्रीवरीवाम तीर्थी । गोरक्षांची झाली वस्ती । नृसिंहपुर त्याची ख्याती । जाहली असे आजकी ॥२१॥ वडवानळीस नागनाथ । विटें गांवीं रेवणनाथ । शिष्य होय गहिनीनाथ । गैबी पीर, गोरक्षाचा ॥२२॥ मीन नाथ राही स्वर्गी । चर्पटीनाथ यात्रा मार्गी । चौरंगी - अडबंगी संगें दुर्गी । फिरती भर्तरी पाताळी ॥२३॥ आठवितां नवनाथा । भूतें, पिशाच्चें काय कथा । देवता, सिद्धि, येती हातां । जपें केवलें, भस्म मंत्रें ॥२४॥ स्मरणे यशे, धने, मान । भक्तांसि काही नसे वाण । इच्छिले पावती दीनजन । शरण नाथांसी येता क्षणी ॥२५॥

॥ ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ चैतन्य नवनाथाय नमः

॥ श्रीनवनाथांचा श्लोक ॥ ॥ गोरक्षजालंदरचर्पटाश्च अड्भंगकानीफमच्छिंद्राद्याः चौरंगिरेवाणकभर्त्रिसंज्ञा भूम्यां बभुवुर्नानाथसिद्धां ॥


॥ शुभं भवतु ॥

Apr 17, 2020

नवनाथ भक्तिसार आणि कथासार - अध्याय ४०



॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीमातापितृभ्यां नमः ॥ ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य जालंदरनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य अडबंगनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य चौरंगीनाथाय नमः ॥  ॐ चैतन्य रेवणनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य भर्तरीनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य गहिनीनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य नवनाथाय नमः ॥ जयजयाजी पंढरीनाथा ॥ पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो अनाथनाथा ॥ पुढें ग्रंथा बोलवीं ॥१॥ मागिलें अध्यायीं रसाळ वचन ॥ तुवां बोलविलें कृपेंकरुन ॥ स्वर्गी चरपटीनाथें जाऊन ॥ इंद्राचा गर्व हरिलासे ॥२॥ हरिहरांची जिंकूनि कोटी ॥ पुढे लोभाची भेटी ॥ गमनकळा नारदहोटीं ॥ प्राप्त झाली महाराजा ॥३॥उपरी मणिकर्णिकेचें करुनि स्नान ॥ पुढें पातले पाताळभुवन ॥ घेवूनि बळीचा गौरव मान ॥ वामनातें भेटला ॥४॥भोगावतीची करुनि आंघोळी ॥ पुनः पातला भूमंडळीं ॥ यावरी कथा पुढें कल्होळीं ॥ नवरसातें वाढी कां ॥५॥ असो आतां रमारमण ॥ ग्रंथाक्षरीं बैसला येवून ॥ तरी पुढें श्रोतीं सावधान ॥ कथारस घ्यावा कीं ॥६॥इंद्र चरपटीनें जिंकला ॥ वैभवें मशकतुल्य केला ॥ तरी तो विस्मयवान खोंचला ॥ खडतरपणीं हदयांत ॥७॥मग जो गुरु वाचस्पती ॥ परम ज्ञाता सर्वमूर्ती ॥ सहस्त्रनयन तयाप्रती ॥ घेवूनियां बैसलासे ॥८॥ देवमंडळांत सहस्त्रनयन ॥ घेवूनि बैसलासे कनकासन ॥ जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण ॥ अति तेजें मिरवला ॥९॥ऐशा रीती पाकशासन ॥ बैसला सेवूनि सभास्थान ॥ मग बृहस्पती विस्मयरत्न ॥ चरपटप्रताप सांगतसें ॥१०॥अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥ परी अर्कासमान थोर प्रताप ॥ हरिहरादि करुनि लोप ॥ स्थापूनि गेला आपुलेचि ॥११॥तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥ देवदानव झाले निर्बळ ॥ नाथपंथीं हें महाबळ ॥ आतळलें कैसें कळेना ॥१२॥तरी यातें करुनि उपाय ॥ साध्य करावी इतुकी ठेव ॥ या कर्मासी कोण लाघव ॥ स्वीकारावें महाराजा ॥१३॥कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥ दास्य करावें मनोधर्मे ॥ तोषवूनि सर्व कर्म ॥ महीवरी मिरवावें ॥१४॥असो यापरी यत्न करुन ॥ भेट घ्यावी त्या गंवसून ॥ परी ते जोगी तीव्रपणें ॥ वर्तताती सर्वदा ॥१५॥तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥ अर्थ वदावा तयासी निकट ॥ परी काय चाड आमुची अलोट ॥ कार्यार्थी भीड कोणती ॥१६॥तरी भिडेचें उपजेपण ॥ उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥ तयामागें रानोरान ॥ अपार मही हिंडावी ॥१७॥तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥ उदय पावेल कृपानव्हाळी ॥ अमरपुरीची देवमंडळी ॥ तेजोयुक्त होईल ॥१८॥ म्हणाल ऐसें कासयानें ॥ हा विपर्यास येईल घडोन ॥ तरी महीं होतो पुण्यपावन ॥ आसन माझें घेतसे ॥१९॥तरी मी येथें सावधान ॥ करुनि रक्षितों आपुलें आसन ॥ तस्मात् अमरावती सोडून ॥ जाणें नाहीं मजलागीं ॥२०॥ऐसें बोलतां अमरपती ॥ बोलता झाला वाचस्पती ॥ म्हणे महाराजा नाथाप्रती ॥ येथेंचि आणावे महायत्नें ॥२१॥तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥ यज्ञ करावा सोमभासा ॥ त्या निमित्तें नाथ राजसा ॥ घेवोनि यावें स्वर्गासी ॥२२॥ मग तो येथें आल्यापाठी ॥ दावूनि भक्तीची अपार कोटी ॥ मोह उपजवोनि नाथापोटीं ॥ कार्य साधूनि घेइजे ॥२३॥ऐसें बोलतां तपोद्विज ॥ परम तोषला अमरराज ॥ उपरी म्हणे महाराज ॥ कोणा पाठवूं पाचाराया ॥२४॥यावरी बोले कचतात ॥ हे महाराज अमरनाथ ॥ मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥ उपरिचर नामें मिरवतसे ॥२५॥उपरिचर जातां महीतळवटीं ॥ मच्छिंद्राची घेईल भेटी ॥ सांगूनि त्यातें कार्य शेवटीं ॥ मग मच्छिंद्र आम्हां बोधील ॥२६॥तरी त्यातें पाचारुन ॥ कार्ययज्ञाचा वदूनि काम ॥ विमानयानीं रुढ करुन ॥ पाठवावा महाराजा ॥२७॥यापरी मच्छिंद्रनाथ ॥ आला असतां अमरपुरींत ॥ गौरवोनि तुवां त्यातें ॥ तुष्टचित्तीं मिरवावा ॥२८॥तरी शक्ति तव सरितालोट ॥ मच्छिंद्र उदधिपोट ॥ संगमिता पात्र अलोट ॥ प्रेमतोय भरलें असे ॥२९॥तरी सुमुखाचें पडतां जळ ॥ कार्यशुक्तिकामुक्ताफळ ॥ तूतें ओपील तपोबळ ॥ नवनाथ आणोनियां ॥३०॥मग तो मुक्त अविंधविधी ॥ लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधीं ॥ मग तें रत्न कर्णविधीं ॥ स्वीकारी कां महाराजा ॥३१॥ ऐसे ऐकूनि गुरुवचन ॥ परम तोषला सहस्त्रनयन ॥ मग रथीं मातली पाठवोन ॥ उपरिचरा पाचारी ॥३२॥ उपरिचर येतां वदे त्यातें ॥ म्हणे महाराजा कामना मनांत ॥ उदेली करुं सोममखातें ॥ पूर्ण करीं आतां तूं ॥३३॥तरी विमानयानीं करोनि आरोहण ॥ जाऊनियां मच्छिंद्रनंदन ॥ उपरी त्यातें सवें घेऊन ॥ जावें नवनाथमेळीं ॥३४॥मग ते आर्या भावार्थित ॥ मेळवोनि आणी अमरपुरींत ॥ सोममखाचें सकळ कृत्य ॥ तया हस्तें संपादूं ॥३५॥अवश्य म्हणे वसुनाथ ॥ तत्काळ विमानयानीं बैसत ॥ बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ ॥ लक्षूनियां पातला ॥३६॥तों गोरक्ष धर्मनाथ ॥ चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ॥ बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ ॥ तीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे ॥३७॥ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें ॥ अवचटपणीं देखिला ताते ॥ मग उठोनि मौळी चरणातें ॥ समर्पीत महाराजा ॥३८॥मग नाथ वसु भेटून ॥ बैसला सकळांमध्यें वेष्टून ॥ म्लानवाणीं कार्यरत्न ॥ अमरांचें सांगतसे ॥३९॥ म्हणे महाराज हो शक्रापोटीं ॥ अर्थ उदेला मखकोटी ॥ तरी आपण नवही जेठी ॥ साह्य व्हावें कार्यार्था ॥४०॥बहुतांपरी करुनि भाषण ॥ सर्वांचे तुष्ट केलें मन ॥ उपरी मच्छिंद्रातें बोधून ॥ अवश्यपणीं वदविलें ॥४१॥मग जालंदर कानिफा चौरंगी ॥ मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी ॥ गोपीचंद रायादि अन्य जोगी ॥ आरुढ झाले विमानीं ॥४२॥गौडबंगाली हेलापट्टण ॥ प्रविष्ट झालें तैं विमान ॥ राव गोपीचंद मातेसी भेटून ॥ समागमें घेतली ॥४३॥उपरी विमानयानी होऊन ॥ पहाते झाले वडवालग्राम तेथून ॥ तेथें वटसिद्धनागनाथ पाहून ॥ आरुढ केला विमानीं ॥४४॥तेथूनि भर्तरीचें करुनि काम ॥ विमान चालविती इच्छिल्या व्योमें ॥ तों गौतमतीरीं नाथ उत्तम ॥ जती भर्तरी अवतरला असे ॥४५॥यापरी तीर्थ करितां महीपाठीं ॥ महासिद्ध जो नाथ चरपटी ॥ अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं ॥ सवें घेतला महाराजा ॥४६॥तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानें ॥ पहाते झाले विमानयानें ॥ तेथें रेवणसिद्ध बोधून ॥ आरुढ केला विमानीं ॥४७॥ असो नवनाथ परिवारासहित ॥ ते विमानयानीं झाले स्थित ॥ चौर्‍यायशीं सिद्धांसमवेत ॥ अमरपुरीं पातले ॥४८॥ विमान येतां ग्रामद्वारी ॥ सामोरा आला वृत्रारी ॥ परम गौरवोनि वागुत्तरीं ॥ चरणांवरी लोटला ॥४९॥सकळां करोनि नमनानमन ॥ नेत सदना सहस्त्रनयन ॥ आपुल्या आसनीं बैसवोन ॥ षोडशोपचारें पूजिले ॥५०॥नवनाथां पाहोनि सकळ अमर ॥ मनीं संतोषले अपार ॥ तेज पाहोनियां गंभीर ॥ उभे तेथें ठाकलें ॥५१॥मग हवनकृत्य मनकामना ॥ वदतां झाला सकळ जनां ॥ म्हणे महाराजा कवणे स्थाना ॥ सिद्ध अर्थ अर्थावा ॥५२॥मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणती सुरवरपाळा ऐक मात ॥ सिंहलद्वीपीं स्थान अदभुत ॥ यज्ञ तेथें करावा ॥५३॥अटव्य कानन आहे तुमचें ॥ शीतळ छायाभरित जळाचें ॥ तेथें न्यून साहित्याचें ॥ पडणार नाहीं कांहींच ॥५४॥ उपरिचर वसु गंधर्व घेऊन ॥ पाहत झालें अटव्यवन ॥ तेथें यज्ञसाहित्य आहुती करुन ॥ यज्ञ आरंभ मांडिला ॥५५॥दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन ॥ मंत्रप्रयोगीं बृहस्पती आपण ॥ यज्ञ आहुती नवही जण ॥ स्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती ॥५६॥परी किलोतळेचे सीमे आंत ॥ अटव्यवन होते अदभुत ॥ यज्ञ होतां मीननाथ ॥ मच्छिंद्रातें आठवला ॥५७॥मग पाचारोनि उपरिचर तात ॥ मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ ॥ सिंहलद्वीपीं मीननाथ ॥ कवण ग्रामीं ठेविला ॥५८॥येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत ॥ अटव्यवन हें विख्यात विराजित ॥ तरी कीलोतळेसहित मीननाथ ॥ पाचारितों आतांचि ॥५९॥मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन ॥ मीननाथासह कीलोतळारत्न ॥ पाचारुनि एक क्षण ॥ भेटी केली उभयतां ॥६०॥परम स्नेहानें क्षण एक कांहीं ॥ वाहवले मोहप्रवाही ॥ उपरी दारा सुत तया ठायीं ॥ मच्छिंद्रानें ठेविले ॥६१॥चौरंगी आणि अडबंगीनाथ ॥ मिरवीत बैसविले समुदायांत ॥ यज्ञआहुती तयांचे हस्तें ॥ स्वीकारीत महाराजा ॥६२॥दहा नाथ यज्ञआहुती ॥ प्रवाहीं चाले मच्छिंद्रजती ॥ पुत्रमोह धरुनि चित्तीं ॥ अभ्यासातें बैसविला ॥६३॥अभ्यास करितां मीननाथ ॥ वाचस्पती शक्रासी बोलत ॥ म्हणे महाराजा यज्ञार्थ ॥ तुम्ही बैसतां सरेना ॥६४॥तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु ॥ बैसवोनि पहावा अर्थ सुरसु ॥ ऐसे बोलतां प्राज्ञ विशेषु ॥ अमरपाळ समजला ॥६५॥मग हातींचें सोडूनि यज्ञकंकण ॥ वसुहाती केलें स्थापन ॥ मग न्यूनपणें बहुतां प्रार्थून ॥ निजदृष्टीं विलोकी ॥६६॥सर्व पदार्थ आणवोनि आपण ॥ अंगें झिजवी शचीरमण ॥ उदकपात्र सांगतां जाण ॥ सिद्ध होय पुढारी ॥६७॥खाद्य भोज्य षड्रस अन्न ॥ करें आणीतसे पात्रीं वाढून ॥ शेवटीं शिणले तयाचे चरण ॥ निजहस्तीं चुरीतसे ॥६८॥ऐसी सेवा करितां संपन्न ॥ तुष्ट होतसे जतीचे मन ॥ हदयीं भाविती यावरुन ॥ प्राणसांडी करावी ॥६९॥येरीकडे मीननाथ- ॥ -सुतासी विद्या अभ्यासीत ॥ तो समय जाणोनि सापेक्ष ॥ इंद्र मयूरवेषें नटलासे ॥७०॥निकटतरुशाखेवरती ॥ विद्या अभ्यासीत गुप्तपंथीं ॥ तों अकस्मात वातास्त्र जपती ॥ वाताकर्षण लाधलें ॥७१॥दैवें सर्व तपराहटी ॥ सकळ लाधली हातवटी ॥ उपरी वाताकर्षणविद्या पाठीं ॥ वातप्रेरक अस्त्र लाधलें ॥७२॥ऐसी विद्या होतां सघन ॥ परम हरुषला सहस्त्रनयन ॥ परी एक संवत्सर होतां यज्ञ ॥ अभ्यासीत तंववरी ॥७३॥असो हवनअर्पण आहुती ॥ मख पावूनि पूर्ण समाप्ती ॥ मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती ॥ अग्रपूजे बैसला ॥७४॥मग पूजा करोनि सांगोपांग ॥ उपरी त्रिदर्शनाथें पूजिलें अंग ॥ वस्त्रभूषणें चांग ॥ देऊनिया गौरविलें ॥७५॥सकळां बैसवोनि कनकासनीं ॥ उभा राहिला जोडीनि पाणी ॥ सर्वांसी वदे म्लानवदनीं ॥ नाथ वचन माझें परिसा ॥७६॥मातें घडला एक अन्याय ॥ परी आपण सहन करा समुदाय ॥ म्यां मयूरवेष धरुनि मायें ॥ अभ्यासिलें विद्येतें ॥७७॥मीनजतीचा प्रताप गहन ॥ मज सांपडलें विद्यारत्न ॥ तरी आपुला वर त्यातें देऊन ॥ सनाथपणीं मिरवावें ॥७८॥ऐसें बोलतां अमरनाथ ॥ सर्वासी समजलें तस्करीकृत्य ॥ मग ते कोपोनि परम चित्तांत ॥ शापवचन बोलताती ॥७१॥म्हणती इंद्रा तूं कृत्रिम ॥ आणिलें ठकवावया कारण ॥ तरी चोरुनि घेतलें विद्यारत्न ॥ निष्फळ होईल तुजलागीं ॥८०॥ऐसें बोलता सकळ जती ॥ मग उपरिचर वसु वाचस्पती ॥ गौरवोनि अपार युक्तीं ॥ तुष्ट केलें चित्तांत ॥८१॥ म्हणती महाराजा शापमोचन ॥ पुढें बोला कांहीं वचन ॥ मग ते बोलती तयाकारण ॥ तप आचरावें इंद्रानें ॥८२॥द्वादश वर्षे तप आचरितां ॥ विद्या फळेल तत्त्वतां ॥ परी नाथपंथी छळ न होतां ॥ पदरावरी पडेल ॥८३॥ऐसें बोलोनि सकळ जती ॥ विमानारुढ झाले समस्ती ॥ खाली उतरुनि महीवरती ॥ नाना तीर्थे भ्रमताती ॥८४॥ऐसें भ्रमण करितां जती ॥ तीर्थे झालीं अपरिमिती ॥ याउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजती ॥ पुसोनिया चालिला ॥८५॥ मग तें कीलोतळेचें नमन ॥ अवर्ण्य आहे अनुष्ठान ॥ नेत्रीं प्रेमबिंदु आणोन ॥ बोळविलें नाथासी ॥८६॥सवें घेऊनि मीननाथ ॥ विमानयानी झाले समस्त ॥ खालीं उतरुनि मृत्युमहींत ॥ नाना तीर्थे पाहिलीं ॥८७॥हेलापट्टणीं मैनावती ॥ पोहोंचवोनि तीर्थे हिंडती ॥ तेव्हां मीननाथें तीर्थक्षितीं ॥ सिद्ध तीन निर्मिले ॥८८॥तयांचें सांगितलें पूर्वी नाम ॥ आतां सांगावया नाहीं काम ॥ असो सिद्धकटकासह उत्तम ॥ तीर्थे करीत भ्रमताती ॥८९॥येरीकडे अमरनाथ ॥ लक्षूनियां सह्याद्रिपर्वत ॥ द्वादश वरुषें तप निश्चित ॥ तीव्रपणी आचरला ॥९०॥परी तें आचरितां तीव्रपणीं ॥ मंत्रप्रयोगें सोडी पाणी ॥ तेणें सरिता लोट लोटोनी ॥ भीमरथीतें भेटली ॥९१॥तें मणिकर्णिकेचे जीवन ॥ आणिलें होतें कमंडलू भरोन ॥ परी इंद्रहस्तीं प्रवाही होऊन ॥ इंद्रायणीं पडियेलें ॥९२॥ऐसें तप करोन ॥ स्वस्थानासी इंद्र जाऊन ॥ उपरी नवनाथ करितां तीर्थाटन ॥ बहुत दिवस लोटले ॥९३॥शके सत्राशें दहापर्यंत ॥ प्रकटरुपें मिरवले नाथ ॥ मग येऊनि आपुले स्थानांत ॥ गुप्तरुपें राहिले ॥९४॥मठींत राहिला कानिफाजती ॥ उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥ जानपीर जो जालंदर जती ॥ गर्भगिरीं नांदतसे ॥९५॥ त्याहूनि खालतां गैबीपीर ॥ तो गहनीनाथ परम सुंदर ॥ वडवाळग्रामीं समाधिपर ॥ नागनाथ असे कीं ॥९६॥विटग्रामीं मानवदेशांत ॥ तेथें राहिले रेवणनाथ ॥ चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥ गुप्त अद्यापि करिताती ॥९७॥भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥ मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥ गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥ दत्ताश्रमीं राहिला ॥९८॥गोपीचंद आणि धर्मनाथ ॥ ते स्वसामर्थ्येंं गेले वैकुंठांत ॥ विमान पाठवोनि मैनावतीतें ॥ घेऊनि विष्णु गेलासे ॥९९॥ पुढें चौर्‍यायशीं सिद्धांपासून ॥ नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्यानें ॥ येथूनि चरित्र झालें संपूर्ण ॥ सर्व नाथांचें महाराजा ॥१००॥तरी आतां सांगतों मुळापासून ॥ कथा वर्तली कवण ॥ प्रथमाध्यायीं गणपतिस्तवन ॥ सुंदरपणीं मिरवले ॥१॥उपरी सांगूनि रेतक्षिती ॥ आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती ॥ तो बद्रिकाश्रमाप्रती ॥ तपालागीं बैसला ॥२॥या प्रसंगाचें श्रवण पठण ॥ नित्य करितां भावेंकरुन ॥ तरी समंधबाधा घरांतून ॥ जाईल त्रासुनी  महाराजा ॥३॥द्वितीय अध्यायीं अत्रिनंदन ॥ विद्यार्णव केला अनुग्रह देऊन ॥ उपरी नागपत्रीं अश्वत्थी जाऊन ॥ सिद्धयर्थकळा साधिली ॥४॥तो अध्याय करितां नित्य पठण ॥ अपार धन लाभेल संसारी जाण ॥ विजयलक्ष्मी पाठीं बैसून ॥ करील हरण दरिद्र ॥५॥तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुती ॥ युद्धा प्रवर्तले श्वेतक्षितीं ॥ युद्ध करुनि उपरांतीं ॥ ऐक्यचित्त झालें असे ॥६॥याचें झालिया पठण ॥ शत्रु होतील क्षीण ॥ मुष्टिविद्यासाधन ॥ तया होत सर्वथा ॥७॥मुष्टिबाधा झाली असोन ॥ अपकार होईल तियेने ॥ मुर्तिमंत मारुती करोनि रक्षण ॥ राहे तया घरीं सर्वदा ॥८॥चतुर्थ अध्यायीं वदली कथा ॥ अष्टभैरव चामुंडा समस्ता ॥ रणीं जिंकूनि वसुसुता ॥ ज्वालामुखी भेटली ॥९॥तो अध्याय नित्य पठण करितां ॥ चुकेल कपटाची बंधनव्यथा ॥ शत्रु पराभवोनि सर्वथा ॥ निरंतर शांति मिरवेल ॥११०॥ पांचवे अध्यायींचे कथन ॥ भूतें घेतलीं प्रसन्न करुन ॥ अष्टपती जिंकून ॥ विजयी झाला मच्छिंद्र ॥११॥ती कथा नित्य करिता पठण ॥ भूतसंचार नोहे त्या घराकारण ॥ आले असतां जाती सोडोन ॥ परम त्रासेंकरोनियां ॥१२॥सहाव्या अध्यायांत ॥ शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ ॥ युद्ध करुनि प्रसन्नचित्त ॥ वश्य झालीं अस्त्रें ती ॥१३॥तो अध्याय नित्य करितां पठण ॥ शत्रूलागीं पडेल मोहन ॥ निष्कपट तो करुनि मन ॥ किंकर होईल द्वारींचा ॥१४॥ सातव्या अध्यायीं अपूर्व कथा ॥ जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता ॥ उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा ॥ इच्छेसमान झालीसे ॥१५॥ती कथा नित्य गातां ऐकतां ॥ लिप्त नोहे चौर्‍यायशींची व्यथा ॥ झाली असेल मिटेल सर्वथा ॥ चिंता व्यथा हरतील ॥१६॥जखीणभयापासुनी ॥ त्वरित मुक्त होईल जनीं ॥ एक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनी ॥ फलप्राप्ति घेइजे ॥१७॥आठवे  अध्यायीं सकळ कथन ॥ पाशुपतरायासी रामदर्शन ॥ रणीं मित्रराज जिंकोन ॥ केला प्रसन्न विद्येसीं ॥१८॥तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ आपुला सखा देशावरता ॥ तो गृहासी येऊन भेटेल तत्त्वतां ॥ चिंताव्यथा हरेल कीं ॥१९॥नववे अध्यायीं कथन ॥ गोरक्षाचा होऊनि जन्म ॥ उपरी सेवूनि बद्रिकाश्रम ॥ विद्यार्णव झालासें ॥१२०॥तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥ साधेल विद्या इच्छिल्या अर्था ॥ ब्रह्मज्ञान रसायन कविता ॥ चवदा विद्या करोनि राहे ॥२१॥दशम अध्यायीचें कथन ॥ स्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदन ॥ अंजनीसुतअर्थी पाठवोन ॥ अर्थ किलोतळेचे पुरविले ॥२२॥एकांतीं बैसूनि अनुष्ठान ॥ संजीवनी पाठ करी गौरनंदन ॥ गहिनीनाथाचा झाला जन्म ॥ कर्दमपुतळा करितां तो ॥२३॥तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रियांचे दोष जातील कपटपण ॥ मुलें वाचतील होतां जाण ॥ जगीं संतती मिरवेल ॥२४॥उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत ॥ उदय पावला जालिंदरनाथ ॥ तो एकादश अध्याय पठण करितां नित्य ॥ अग्निपीडा होईना ॥२५॥आणि जयाचे धवळारांत ॥ पूर्वीचा कांहीं दोष असत ॥ तो जाऊनि संपत्तिविशेषातें ॥ संततीसह भोगील कीं ॥२६॥ बाराव्यांत हें कथन ॥ जालिंदरें गुरु केला अत्रिनंदन ॥ उपरी कानिफाचा होऊनि जन्म ॥ विटंबिले देवांसी ॥२७॥ तो अध्याय करितां पठण ॥ क्षोभ न पावे कोणी देवता जाण ॥ क्षोभित असल्या होतील शमन ॥ सुख सर्व त्याचि देती ॥२८॥तेराव्या अध्यायांत ॥ मैनावतीतें प्रसन्न नाथ ॥ होऊनि केलें अचल सनाथ ॥ ब्रह्मरुपीं आगळी ॥२९॥तरी तो अध्याय करितां पठण ॥ स्त्रीहत्येचें दोष सघन ॥ त्यांचे होऊनि सकळ निरसन ॥ उद्धरील पूर्वजां ॥१३०॥चतुर्दश अध्यायीं कथन ॥ गर्तेत जालिंदर गोपीचंदानें ॥ स्त्रीबोलें घातले नेऊन ॥ गुप्त निशीमाझारी ॥३१॥ तो अध्याय पठण करितां ॥ असेल बंध कारागृहीं व्यथा ॥ तरी त्याची होईल मुक्तता ॥ निर्दोष जनीं वर्तेल ॥३२॥पंचदशांत सुढाळ कथन ॥ कानिफामारुतीचे युद्धकंदन ॥ उपरी स्त्रीराज्यांत जाऊन ॥ आतिथ्य पूर्ण भोगिलें ॥३३॥तो अध्याय गातां ऐकता नित्य ॥ घरचे दारचे कलह नित्यकृत्य ॥ शांति पावोनि सर्व सुखांत ॥ निर्भयपणें नांदेल ॥३४॥सोळावे अध्यायांत ॥ कानिफा भेटला गोपीचंदातें ॥ तरी तो अध्याय वाचितां नित्यानित्य ॥ दुःस्वप्नातें नाशील ॥३५॥ सप्तदश अध्यायीं कथन ॥ जालिंदर काढिला गर्तेतून ॥ उपरी नाथाची दीक्षा घेऊन ॥ गोपीचंदें अर्चिला ॥३६॥तोचि अध्याय पठण करितां ॥ योग साधेल आचरतां ॥ दुष्टबुद्धि जाईल सर्वथा ॥ सुपंथपंथा लागेल तो ॥३७॥अष्टादश अध्यायीं कथन ॥ बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन ॥ तपःपूर्ण भगिनी उठवोन ॥ तीव्रपणीं आचरला ॥३८॥तो अध्याय नित्य पठण करितां ॥ ब्रह्महत्या नासेल सर्वथा ॥ पूर्वज कुंभीपाकीं असतां ॥ सुटका होईल तयांची ॥३९॥ एकोणिसाव्यात गोरक्षाकारण ॥ भेटला मारुति श्रीरामप्रीतीने ॥ तरी तो अध्याय करितां पठण ॥ तया मोक्षार्थ साधेल कां ॥१४०॥ विसाव्यात अदभुत कथन ॥ श्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारण ॥ गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन ॥ स्नेहसंपन्न जाहला ॥४१॥ तो अध्याय पठण करितां गोड ॥ लागलें असेल अत्यंत वेड ॥ तरी ती चेष्टा जाऊनि धड ॥ होऊनि प्रपंच आचरेल ॥४२॥एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून ॥ मच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदनें ॥ नानापरी बोधूनि मन ॥ दुष्टकर्मातें निवटिलें ॥४३॥तो नित्य अध्याय पठण करितां ॥ नासेल बहुजन्माची गोहत्या ॥ निष्कलंक होऊनि चित्ता ॥ तपोलोकीं मिरवेल ॥४४॥बाविसाव्यांत सोरटीग्रामी ॥ गोरक्षें मीननाथा मारोनी ॥ पुन्हां उठविला मंत्रेंकरोनी ॥ मच्छिंद्रमोहेंकरुनियां ॥४५॥तरी तो अध्याय नित्य पठण करितां ॥ पुत्रांर्थिया पुत्र तत्त्वतां ॥ तो होईल विद्यावंत ॥ विद्वज्जना मान्य कीं ॥४६॥तेविसाव्यांत रसाळ कथन ॥ मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन ॥ सुवर्णविटेकरितां सुवर्ण ॥ गर्भगिरि केला असे ॥४७॥आणिक केला तेथें उत्सव ॥ तरी तो अध्याय पठण नित्य भावे ॥ करितां घरीं सुवर्ण नव ॥ अखंड राहे भरोनि ॥४८॥ चोविसाव्यांत भर्तरीनाथ ॥ जन्मोनि आला अवंतिकेंत ॥ तरी तो अध्याय पठण करितां नित्य ॥ बाळहत्या नासेल ॥४९॥बाळहत्या जन्मांतरी ॥ तेणें समस्त वांझ होती नारी ॥ तरी ते नासेल संसारीं ॥ सुखी होऊनि बाळ वांचे ॥१५०॥पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन ॥ रासभ झाला शापेंकरुन ॥ तरी तो अध्याय केलिया पठण ॥ शापवचन बाधेना ॥५१॥आणि मानवाविण दुसरा जन्म ॥ होणार नाही तयाकारण ॥ आरोग्य काया पतिव्रता कामिन ॥ पुत्र गुणी होईल ॥५२॥सव्विसावे अध्यायांत ॥ गणगंधर्व झाला विक्रमसुत ॥ आणि विक्रम भर्तरीसुत एकचित्त ॥ भेटी होऊनि राहिले ॥५३॥तो अध्याय करितां पठण ॥ गोत्रहत्या जाति नासून ॥ पोटीं पाठीं शत्रुसंतान ॥ न राहे होऊनियां ॥५४॥सत्ताविसाव्यांत अदभुत कथन ॥ राज्यपदी बैसला राव विक्रम ॥ भर्तरी पिंगलेचें होऊनि लग्न ॥ दत्तानुग्रह लाधला ॥५५॥तरी तो अध्याय करितां पठण ॥ पदच्युत पावेल पूर्वस्थान ॥ गेली वस्तु पुनः परतोन ॥ सांपडेल तयांची ॥५६॥अठ्ठाविसाव्या अध्यायांत ॥ पिंगलेकरितां स्मशानांत ॥ विरक्त होऊनि भर्तरीनाथ ॥ पूर्ण तप आचरला ॥५७॥तो अध्याय करितां श्रवण पठण ॥ त्या भाविकाचें होईल लग्न ॥ कांता लाभेल गुणवान ॥ सदा रत सेवेसी ॥५८॥एकुणतिसावे अध्यायींचे चरित्र ॥ भर्तरी होऊनि विरक्त पवित्र ॥ गोरक्षा सांगती अत्रिपुत्र ॥ गुरुनाथ पैं केला ॥५९॥तो अध्याय नित्य करितां पठण ॥ सुटेल क्षयरोगापासून ॥ आणि त्रितापांची वार्ता जाण ॥ कालत्रयीं घडेना ॥१६०॥ तिसाव्या अध्ययांत ॥ जन्मला चौरंगीनाथ ॥ परी तें चरित्र पठण करितां ॥ तस्करी दृष्टी बंधन होय ॥६१॥एकतिसाव्यांत चौरंगीनाथ ॥ तपा बैसला हिमालयांत ॥ तरी तो अध्याय पढतां ॥ कपटमंत्र न चालती ॥६२॥ बत्तिसाव्यांत सुगम कथन ॥ मच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोन ॥ द्वादश वर्षे राज्य करोन ॥ पुत्र दिधला रेवतीसी ॥६३॥त्या अध्यायाचें करितां पठण ॥ आयुष्य असतां देहाकारण ॥ गंडांतरें करुं येतील विघ्नें ॥ आपोआप टळतील कीं ॥६४॥ तेहतिसाव्यांत गौरनंदन ॥ वीरभद्राचा घेऊनि प्राण ॥ मच्छिंद्रशव स्वर्गाहून ॥ महीवरती उतरविलें ॥६५॥तरी ती कथा करितां पठण ॥ धनुर्वाताचें निरसे विघ्न ॥ झालेल्यातें होतां श्रवण ॥ पीडा हरेल तयाची ॥६६॥चौतिसाव्यांत रेवणजन्म ॥ होऊनि भेटला अत्रिनंदन ॥ सहज सिद्धिकळा दावून ॥ गेला असे महाराजा ॥६७॥तरी ती कथा करितां पठण ॥ जाणें कोणत्याही कार्याकारण ॥ तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन ॥ यश घेऊन येईल तो ॥६८॥पस्तिसाव्यांत पूर्ण कथन ॥ रेवण झाला विद्यावान ॥ दत्तकृपें स्वर्गी जाऊन ॥ बाळें आणिलीं विप्राचीं ॥६९॥तरी ती कथा करितां पठण ॥ महासिद्ध येईल उदराकारण ॥ बेचाळिसांचें करुनि उद्धारण ॥ गातील आख्यान लोक परी ॥१७०॥छत्तिसाव्यांत अपूर्व कथा ॥ जन्म झाला वटसिद्धनाथा ॥ आस्तिक ऋषि झाला ताता ॥ तयाचिये मातेसी ॥७१॥ती कथा करितां श्रवण पठण ॥ सर्पवृश्चिकदंश जयाकारण ॥ झालिया विषाचें उत्तीर्ण ॥ श्रवण केलिया अध्याय तो ॥७२॥सदतिसाव्या अध्यायांत ॥ नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत ॥ उपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथ ॥ जिंकियेले भिडोनी ॥७३॥ती कथा करितां श्रवण पठण ॥ सदना न लागे कुशीलपण ॥ लागल्या त्याचें होईल बंधन ॥ विद्यावंत होऊनियां ॥७४॥अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म ॥ होऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊन ॥ विद्येमाजी करुनि संपन्न ॥ तीर्थावळी धाडिला ॥७५॥तरी ती कथा सुरस ॥ श्रवण पठण होतां त्यास ॥ हिंवताप मधुरा नवज्वरास ॥ शांति होईल सर्वस्वीं ॥७६॥ एकूणचाळिसाव्यांत कथा ॥ चरपटीनें जिंकिलें अमरनाथा ॥ हरिहरादि देवां समस्तां ॥ स्वर्गी ख्याती लाविली ॥७७॥तरी तो अध्याय करितां पठण ॥ तो युद्धां जातां तपोधन ॥ शस्त्रबाण पावोन ॥ जय घेऊन येईल कीं ॥७८॥यावरी चाळिसाव्यांत कथन ॥ सर्व नाथांतें पाकशासन ॥ स्वर्गी नेऊनि करी हवन ॥ विद्यार्थिरुपें अर्थ पुरविला ॥७९॥तरी चाळिसावा नित्य पठण करितां ॥ लाभेल सर्व इच्छिल्या अर्था ॥ यश श्री ऐश्वर्य योग्यता ॥ पुत्रपौत्रीं नांदेल ॥१८०॥ एकुणचाळिसांचा फलार्थ ॥ तोचि प्राप्त तदर्थ ॥ कीं चाळिसावा एक परिस ॥ कीं कामधेनु कल्पतरु ॥८१॥गोरक्ष बोलतो वाचेकरुन ॥ त्यातें असत्य मानील जन ॥ जो निंदक यातें दावील निंदून ॥ तो अधिकारी विघ्नांचा ॥८२॥इहलोकीं परलोकीं ॥ राहणार नाहीं परम सुखी ॥ निर्वश पावोनि शेवटीं वंशीं ॥ पिचेल ग्रंथ निंदितां हा ॥८३॥अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार ॥ आहे गोरक्षाचा किमयागार ॥ परी पालटोनि भाषांतर ॥ महाराष्ट्र अक्षरीं रेखिला ॥८४॥म्हणोनि श्रोते हो भाविक जन ॥ सोडोनि द्या कीं निंदावचन ॥ विश्वासापर स्वार होऊन ॥ मोक्षमुक्काम करी कीं ॥८५॥तरी हा ग्रंथ संग्रह करुन ॥ चमत्कार पाहावा पठण करुन ॥ हे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण ॥ महासिद्धीचे असती कीं ॥८६॥हे चाळीस मंत्र परोपकारी ॥ आहेत दुःखाची करतील बोहरी ॥ तरी संग्रह करुनि उगलेचि घरी ॥ ठेवा विश्वास धरुनियां ॥८७॥ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र ॥ सुखकारक असती अति पवित्र ॥ दुःखदरिद्रहरण सर्वत्र ॥ गोरक्षकानें निर्मिलें ॥८८॥ पठण करितां षण्मासमिति ॥ जो अध्याय ज्या कार्याप्रति ॥ तें कार्य होईल निःसंशय चित्तीं ॥ पठण करुनि पहावें ॥८९॥याउपरी वाचितां न ये जरी ॥ तरी संग्रह करुनि ठेवावा घरीं ॥ नित्य वंदितां नमस्कारीं ॥ कार्य त्यांतचि घडेल ॥१९०॥एक कुसुम झोंकूनि वरती ॥ चला म्हणावें मम कार्याप्रति ॥ नवनाथ वंदूनि उक्ति ॥ नमस्कार करावा ॥९१॥ऐसा याचा आहे मार्ग ॥ करुनि पहावा चमत्कार चांग ॥ नवनाथ ओडवोनि अंग ॥ कार्य तुमचें करितील कीं ॥९२॥तरी असो विजय संपत्ती ॥ नांदो श्रोत्याच्या गृहाप्रति ॥ धुंडिसुत हेंचि प्रार्थी ॥ मालू नरहरी देवाते ॥९३॥शके सत्राशें एकेचाळीस ॥ प्रमाथीनाम ज्येष्ठ मास ॥ शुक्लपक्ष प्रतिपदेस ॥ ग्रंथ समाप्त जाहला ॥९४॥जरी ओंव्या सर्व नेमस्त ॥ सप्तसहस्त्र सहाशत ॥ उपरी ऐसे दैदीप्यवंत ॥ ओंव्या मंत्र असती ह्या ॥९५॥अध्याय वाचावया न बनेल ज्यासी ॥ तरी अध्यायांतील एक ओंवीसी ॥ पठण करुनि नाथनामासी ॥ कार्यकाज करावें ॥९६॥असो आतां बहु भाव ॥ श्रोते असोत चिरंजीव ॥ इहलोकीं परलोकीं ठेव ॥ आनंदाची होतसे ॥९७॥तरी समस्त नाथांतें धुंडीसुत ॥ मालू नरहरि हेंचि विनवीत ॥ कीं श्रोते असोत सुखरुपवंत ॥ सर्व अर्थी सर्वदा ॥९८॥स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ चत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ४० ॥ नवनाथभक्तिसार चत्वारिंशतितमोऽध्याय समाप्त ॥


॥ श्रीनवनाथांचा श्र्लोक ॥  


॥ गोरक्ष-जालंदर-चर्पटाश्च । अड्भंग-कानीफ-मच्छिंद्राद्याः । चौरंगी-रेवाणक-भर्तरिसंज्ञा । भूम्यां बभुवुर्नवनाथसिद्धा: ॥


************************************************************

कथासार : इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन,नाथांचा आशिर्वाद व समारोप


चरपटीनाथानें श्रीशिव, श्रीविष्णू आणि देवेंद्र यांच्यासह सर्व देवतांचा पराभव करून देवलोक हादरवून सोडला होता. या पराभवाचे शल्य देवेंद्रांस सलत होते. अत्यंत व्यथित होऊन तो बृहस्पतीस म्हणाला, " चरपटी नावाच्या एका तेजस्वी नाथपंथीय बालकाने हरी हर यांच्यासह देवलोकाची दुर्दशा करून महान पराक्रम केला आहे. नाथपंथीयांकडे वाताकर्षण विद्या असल्याने त्यांच्यापुढे देवदानव दुबळे ठरले आहेत. ती विद्या आपणांस प्राप्त होईल, यासाठी काहीतरी युक्ती सांगावी. नाहीं पेक्षा त्यांच्या घरीं जाऊन त्यांचें दास्यत्व स्वीकारुन त्यांस आनंदीत करावें." अशा भावार्थाचें इंद्राचें भाषण ऐकून बृहस्पतीनें सांगितलें कीं, नाथांस सन्मानपूर्वक येथें आणावें हें फार चांगलें ! सोमयाग यज्ञ करण्याच्या निमित्ताने नाथांस देवलोकांत घेऊन यावे. तें इथे आल्यानंतर तूं त्यांच्या सेवेंत तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरुप वागून त्यांस प्रसन्न करुन घेऊन, आपला स्वार्थ साधून घे, हाच एक सुलभ व साध्य मार्ग दिसतो.

ही बृहस्पतीची युक्ति इंद्रास मान्य झाली व त्यास आनंद झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावें हा विचार पडला. बृहस्पति म्हणाला, अष्टवसुपैकीं उपरिक्षवसु हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय, तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथें आला. होता तेव्हां त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे. तो नवनाथांस घेऊन येऊन तुझा हेतु सफल करील, हें ऐकून इंद्रानें उपरिक्षवसुस बोलावुन त्यास आपला हेतु सांगितला व विमान देऊन नाथांस आणावयास पाठविलें.

मग तो बदरिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपिचंद्र चालंदर अडबंगी आदि नाथमंडळीही तेथेंच होती. उपरिक्षवसु येतांच मच्छिंद्रनाथानें उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविलें. त्यानें सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करुन नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठीं फारच आग्रह केला व त्याजकडून येण्याचें कबूल करुन घेतलें. मग जालंदर , कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष , अंडबंगी, गोपीचंद्र आदिकरुन जोगी विमानांत बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदानें आपल्या आईस घेतलें. मग तेथून वडवाळ गांवीं जाऊन वटसिद्धनाथास बोध करुन बरोबर घेतलें. तसेंच गोमतीच्या तीरीं जाऊन भर्तृहरीस घेतलें. ताम्रपर्णीचें कांठीं जाऊन चरपटीनाथास घेतलें. पूणें प्रांतांत विटगांवाहून रेवणनाथास घेतलें. याप्रमाणें चौर्‍यांयशीं सिद्धासंह नवनाथ विमानांत बसुन सोमयागाकरितां अमरावतीस गेले.

त्यांचें विमान आलेलें पाहिल्याबरोबर, इंद्र नाथांस सामोरा गेला आणि नम्रपणानें बोलून त्यांच्या पायां पडला. मग त्यानें सर्वांस आदराने नेऊन आसनावर बसविलें व त्यांची षोडशोपचांरानीं पूजा केली. सर्व देव आनंदानें त्यांच्यापुढें उभे राहिलें. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतु इंद्रानें सर्वास सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हें कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पति यांनीं आपपसांत विचार करून सिंहलद्वीपामध्यें जें अटव्य अरण्य आहे, तेथें शीतल छाया असून, उदकाचा सुकाळ असल्यानें त्या स्थानीं  यज्ञाची तयारी केली. सर्वसंमतीने यज्ञास प्रारंभ करून स्वतः देवराज इंद्र व त्याची पत्नी शची यजमानपदी बसले. बृहस्पती मंत्रोच्चार करू लागले आणि नऊ नाथ 'स्वाहा' म्हणत समिधा आहुती टाकू लागले.

हें वन किलोतलेच्या सीमेंअंतर्गत होतें, तेंव्हा तेथें असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणुन मच्छिंद्रनाथानें उपरिक्षवसुस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितलें . त्याप्रामाणें किलोतलेसही मी येथें घेऊन येतो, असें सांगुन उपरिक्षवसु गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथानें त्यांना राहवुन घेतलें. मच्छिंद्रनाथानें मीननाथास विद्याभ्यास शिकविला. पुढें बृहस्पतीनें इंद्रास सांगितलें कीं, आपण यज्ञास न बसतां उपरिक्षवसुस बसवावें व तुम्ही इतरत्र लक्ष द्यावे. त्यांतील गर्भितार्थ लक्षात घेऊन इंद्रानें उपरिक्षवसुच्या हातांत यज्ञकंकण बांधिलें व आपण देखरेख ठेवूं लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता. त्यानें सेवा करण्यांत कसुर ठेवली नाहीं. ता वेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले.

मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत असतां, इंद्रानें मयुराच्या रूपानें गुप्तपणें झाडावर राहुन वाताकर्षणमंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होतांच इंद्रास परमसंतोष झाला. असा एक वर्ष यज्ञ चालला होता. तोंपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवीत होता. यज्ञ समाप्ती होतांच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला, मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्रानें दुसर्‍या नाथांची पूजा केली व वस्त्रेंभूषणें देऊन सर्वांचा सन्मान केला. सर्वांना सिंहासनावर बसवून इंद्र हात जोडून याचना करीत म्हणाला, माझ्याकडून एक अपराध घडला आहे, त्याबद्दल मला क्षमा करावी. मीननाथाचा विद्याभ्यास सुरु असतांना मी मोराच्या रूपात तिथे उपस्थित राहून कपटाने चोरून विद्या शिकली. तरी आपण मला क्षमा करून आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवावा आणि ती विद्या फलद्रूप करावी.

इंद्राचें हें चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागानें शाप दिला कीं तू कपटाने आम्हांस इथे आणून विद्या अवगत केली आहेस, पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरिक्षवसु व बृहस्पति मध्यस्थी करू लागले. त्यांनी अनेक प्रकारांनीं नाथांस विनवून संतुष्ट केलें. मग नाथ म्हणाले, इंद्रानें बारा वर्षे तप:श्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करूं नये, म्हणजे त्यास ती फलद्रुप होईल. असा उःशाप देऊन विमानारुढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले. त्यावेळीं मच्छिंद्रनाथानें किलोत्तमेचा निरोप घेतला आणि मीननाथासहि सोबत घेतलें. नंतर मैनावतीस हेळापट्टाणास पोंचविलें. मीननाथाचें तीन सिद्ध शिष्य झाले. त्यानंतर सर्व नाथ तीर्थयात्रा करीत भ्रमण करू लागले.

इकडें, इंद्रानें सह्याद्री पर्वतावर बारा वर्षें तप:श्चर्या केली. मंत्रप्रयोग म्हणत असतांना तो जें पाणी सोडी, त्या उदकाचा प्रवाह भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असें नाव पडलें . या प्रमाणें तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला.

नवनाथ अनेक दिवस तीर्थयात्रा करीत होते. शके सत्राशें दहापर्यंत ते प्रकटरूपानें फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्यें कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजुनें मच्छिंद्रनाथ, ज्याला मायबा असें म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरीवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ, त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ विटगांवीं राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरुपानें अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळीं राहिला. मीननाथानें स्वर्गास जाऊन वास केला. गिरनारपर्वतीं श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमांत गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. श्रीविष्णुनें विमान पाठवुन मैनावतीस वैकुंठास नेलें. अशा प्रकारें, चौर्‍यांयशीं सिद्धांपासून नाथपंथ उदयास आला.

या ग्रंथाचे आद्य ग्रंथकार श्री गोरक्षनाथांनी म्हणतात, " यांतील सर्व कथा अद्भुत आणि सत्य आहेत. जो कोणी या कथांस असत्य मानेल किंवा निंदा करेल, तो विघ्नसंतोषी इहपरलोकीं सुखी न राहतां त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकांत पडेल.म्हणून नाथभक्तांनी निंदा सोडून या ग्रंथावर श्रद्धा ठेवावी आणि नवनाथ कृपेचा चमत्कार अनुभवावा. फलश्रुतीमध्ये कथन केल्याप्रमाणे, मनोरथ पूर्तीसाठी तो तो अध्याय दररोज वाचनात ठेवावा. नवनाथांच्या कृपेनें सहा महिन्यांत निःसंशय मनोकामना पूर्ण होईल. यशप्राप्ती होईल. हा अत्यंत पवित्र ग्रंथ घरांत ठेवून दररोज केवळ एक फुल वाहून नवनाथांचे स्मरण करावे. नवनाथांची कृपा होऊन अवश्य कार्यसिद्धी होईल. अध्याय वाचण्यास जमला नाही तरी अध्यायातील एक ओवी वाचावी आणि नवनाथांचे स्मरण करावे.

श्री नवनाथांच्या चरित्राचे असे वर्णन करून मालुकवि म्हणतात, हा श्रीनवनाथभक्तिसार ग्रंथ शके सत्राशें एकेचाळीस, प्रमाथीनाम संवत्सरीं ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस पूर्ण झाला. तसेच श्रीदत्तात्रेयांस व नवनाथांना, 'श्रोत्यांस सुखरुप ठेवावें आणि त्यांचे मनोरथ परिपूर्ण व्हावें.' अशी प्रार्थना मालुकवि करतात.


Oct 16, 2019

नवनाथ भक्तिसार आणि कथासार - अध्याय १


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीपांडुरंगाय नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीमातापितृभ्यां नमः ॥ ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य जालंदरनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य अडबंगनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य चौरंगीनाथाय नमः  ॥  ॐ चैतन्य रेवणनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य भर्तरीनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य गहिनीनाथाय नमः  ॥ ॐ चैतन्य नवनाथाय नमः ॥ॐ नमो जी हेरंबमूर्ती ॥ वक्रतुंडा गणाधिपती ॥ विद्यार्णवा कळासंपत्ती ॥ भक्तसंकट वारीं गजानन ॥१॥ सदैव धवला श्वेतपद्मा ॥ विद्याभूषित कलासंपन्नधामा ॥ तुझ्या वंदितों पादपद्मा ॥ ग्रंथाक्षरां बोलवीं ॥२॥ तूं निश्वळ निरंजन निर्विकार ॥ परी भक्तरज्जुबंधनाधार ॥ प्रेमें संभवोनि मूर्ति साकार ॥ आम्हां दासां मिरविसी ॥३॥ तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा ॥ किंकिणीमंडिता ग्रंथादरा ॥ येऊनि स्वामी वदनसुंदरा ॥ मम रसनारस सेवीं कां ॥४॥ अगा अर्थ - लिंग - प्रकरण - ऱ्हस्व - ॥ दीर्घ शृंगार धारणा सुरस ॥ छंद ताल नवरसरस ॥ ग्रंथामाजी आदरीं कां ॥५॥ हे गणाधिपते गणराज ॥ मी अबुध वर्णना आहे सहज ॥ परी कृपा करोनि सकळां भोज ॥ विकळ आपदा हरी आतां ॥६॥ हे मोरेश्वरा गणाधिपति ॥ सर्वविषयाधीशमूर्ती ॥ मंगळारंभी मंगळाकृती ॥ आरंभीं स्तुती पार्थितो ॥७॥ तरी सरस्वती कळामांदुस ॥ सवे घेऊनि वहनहंस ॥ या संतांगणीं येऊनि सभेस ॥ विराजावें महाराजा ॥८॥ जी मंगलदायक वाग्भवानी ॥ चातुर्थसरिता ब्रह्मनंदिनी ॥ ती महाशक्ती हंसवाहिनी ॥ येऊनि घेई महाराजा ॥९॥ जीचेनि कृपें वांकुडें दृष्टी ॥ वाचस्पतीच्या मिरवती कोटी ॥ ती माय तूं सवें गोरटी ॥ घेऊनि येई महाराजा ॥१०॥ असो ऐसें पाचारणवचन ॥ ग्लानित भावना सम्यक् पाहून ॥ ग्रंथासनीं मूर्तिमंत येऊन ॥ वरालागीं ओपिजे ॥११॥ सकळसिद्धी पूर्णपणा ॥ पावोत ऐशा विनीतवचना ॥ वरद मौळी हस्तकंजना ॥ स्पर्शोनि ज्ञान मिरविलें ॥१२॥ म्हणे महाराजा कलोत्तमा ॥ सिद्धी पावेल काव्यमहिमा ॥ ऐसे बोलोनि सुशीलधामा ॥ रसने स्थापिली सरस्वती ॥१३॥ यापरी नमितों श्रीगुरुराज ॥ जो अज्ञानतमी सविता विराजे ॥ जो मोक्षपदातें वरवूनि काज ॥ साधकातें विराजवी ॥१४॥ तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी ॥ संजोगोनि बैसला मम पृष्ठीं ॥ लेखणी कवळोनि करसंपुटीं ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१५॥ वरदहस्तें स्पर्शोने मौळी ॥ फेडिली सकळ अज्ञानकाजळी ॥ यापरी तया बद्धांजुळी ॥ अनन्यभावें नमितों मी ॥१६॥जो नरहरिवंशीं विजयध्वज ॥ धुंडिराज नाम तयाचें साजे ॥ तोही पृष्ठीं बैसोनि सहज ॥ ग्रंथालागीं आदरीतसे ॥१७॥ आतां नभूं ज्ञानशक्ती ॥ जी सत्तामयी चिदभगवती ॥ अनन्यभावें चरणांवरती ॥ भाळ तिचिये अर्पोनियां ॥१८॥ यापरी नमितो श्रोते संत ॥ कीं तुमच्या गृहींचा मी अतीत ॥ तरी ग्रंथांतरीं सुरस नितांत ॥ प्रेमभरित दाटवा ॥१९॥ अहो प्राज्ञिक संत श्रोतीं ॥ प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती ॥ तुम्हां वर्णावया अबुध शक्ती ॥ मजमाजी केवीं मिरवेल ॥२०॥ परी धन्य तुम्ही भक्तिंवाडें ॥ स्वीकारितां बोल बोबडे ॥ जड बाळा उभवोनि कोडें ॥ जगामाजी मिरवितां ॥२१॥ कीं पहा जैसें कांचमण्यास ॥ सोमकांत नांव ठेविलें त्यास ॥ तेणोंचे शब्दें लाज सोमास ॥ वरवूनि बुंदां ढाळीतसे ॥२२॥ तेवीं तुमचा शरणागत ॥ नरहरि मालू धुंडीसुत ॥ तस्मात महंत श्रोते संत ॥ करा सरतें आपणांतरीं ॥२३॥ यापरी पूर्वी कथासारामृत ग्रंथ ॥ वदविला तुम्हीं श्रद्धायुक्त ॥ आतांही ओपूनि वरद हस्त ॥ भक्तिसार वदवा हा ॥२४॥ जे संत झाले जगद्विख्यात ॥ तयांचें माहात्म्य वदविलें समस्त ॥ परी सारसार कथा त्यात ॥ उरल्या असती महाराजा ॥२५॥ ज्या संतांच्या पायी रत ॥ गुरुमूर्ती प्रतापवंत ॥ कि ज्यांनी सांप्रदाय जगद्विख्यात ॥ जगामाजी स्थापिले ॥२६॥  तरी त्यांची सर्व कथा ग्रंथीं ॥ स्वीकारावया अवधान द्यावें श्रोतीं ॥ असो कलिप्रारंभीं रमापती ॥ नवनारायणां पाचारी ॥२७॥ उद्भवासी बैसवोनि सन्निध ॥ कनकासनीं यादववृंद ॥ तंव ते नवनारायण प्रसिद्ध ॥ प्रविष्ट झाले द्वारके ॥२८॥ कवि प्रथम हरि दुसरा ॥ अंतरिक्ष तृतीय होय चतुर ॥ महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर ॥ नारायण चतुर्थ तो ॥२९॥ पंचम महाराज पिप्पलायन ॥ सहावा आविर्होत्र नारायण ॥ सातवा द्रुमिल आठवा चमस जाण ॥ करभाजन नववा तो ॥३०॥ ऐसे नवनारायण महाराज ॥ द्वारकेंत पातले सहजासहज ॥ रमापतीचें पाचारणचोज ॥ दृश्य झाले धवळारी ॥३१॥ हरीनें पाहतांचि नारायण ॥ सोडिता जाहला सिंहासन ॥ परम गौरविले आलिंगून ॥ कनकासनीं बैसविले ॥३२॥ सकलवैभवभूषणाकार ॥ मेळवोनि सकळ अर्चासंभार ॥ सारिता झाला सपरिकर ॥ षोडशोपचारें पूजेसी ॥३३॥ हरिचा गौरव पाहोन ॥ बोलते झाले नारायण ॥ कवण अर्थी पाचारण ॥ आम्हांसी केलें श्रीरंगा ॥३४॥हरि म्हणे जो महाराजा ॥ कीं मनीं काम वेधला माझ्या ॥ कलींत अवतार घेणें ओजा ॥ तुम्हीं आम्हीं चलावें ॥३५॥ जैसे सम्रुच्चयें एकमेळीं ॥ राजहंस जाती उदधिजळी ॥ तेवीं तुम्हीं कृपाकल्लोळीं ॥ अवतारदीक्षा मिरवावी ॥३६॥ येरु म्हणती जनार्दना ॥ अवतार घ्यावा कवणे स्थाना ॥ कवण नामीं कवण लक्षणां ॥ जगामाजी मिरवावें ॥३७॥ यावरी बोले द्वारकाधीश ॥ कवि नारायण जो कां प्रत्यक्ष ॥ तेणें मच्छिंद्र होऊनि दक्ष ॥ जगामाजी मिरवावें ॥३८॥ यावरी हरी जो महादक्ष ॥ तो तंव शिष्य होऊनी प्रत्यक्ष ॥ महाराज नामें तो गोरक्ष ॥ जगामाजी मिरविजे ॥३९॥ यापरी अंतरिक्ष नारायण नाम ॥ तो जालिंदर मिरविजे प्रकाम ॥ तयाचा शिष्य भक्तिद्रुम ॥ प्रबुद्ध नामें कानिफा ॥४०॥ यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम ॥ मिरविजे जगीं चरपट नाम ॥ आविर्होंत्र जो योगद्रुम ॥ मिरविजे जगीं नामें नागेश ॥४१॥ यापरी द्रुमिल अतिसमर्थ ॥ जगीं मिरविजे भरतनाथ ॥ आणि चमस नारायण जगीं विख्यात ॥ रेवणनामें मिरविजे ॥४२॥ नववा जो करभाजन ॥ तो गहिनी ऐसें मिरविजे नाम ॥ ऐसे अवतार महीकारण ॥ दीक्षेप्रति मिरवावे ॥४३॥ म्हणाल एकटपणीं वास ॥ करणें सांगतां आह्मी कलीस ॥ तरी तुम्हांसवें अवतारास ॥ बहुत येतील महाराजा ॥४४॥ प्रत्यक्ष कवि वाल्मीक सुरस ॥ तो पुढें होईल तुलसीदास ॥ आणि शुक महाराज जो ब्रह्ममास ॥ कबीर भक्त होईल तो ॥४५॥ यापरी जो व्यास मुनी ॥ तो जयदेव होईल महाप्राज्ञी ॥ आणि उद्धव माझा प्राणाहुनी ॥ आवडता होईल नामा तो ॥४६॥ आणि भक्तिप्रौढी जांबुवंत ॥ तो नरहरि होईल नितांत ॥ प्रत्यक्ष जो बलराम भ्रात ॥ पुंडलीक होईल तो ॥४७॥ मीही प्रत्यक्ष जन्मोन ॥ ज्ञानदेव नामें मिरवीन ॥ आणि धवलारी जो पंचानन ॥ निवृत्तिनाथ होईल कीं ॥४८॥ आणि सत्यनाथ चतुरानन ॥ तो स्वनामीं मिरवील सोपान ॥ जी योगमाया मानसमोहन ॥ मुक्ताबाई विराजेल ॥४९॥ यापरी प्राज्ञक हनुमंत ॥ तो रामदास होईल महाभक्त ॥ आणि कुब्जा दासी मातें रमत ॥ जनी जनांत होईल कीं ॥५०॥ असो ऐसें समुच्चयेंकरोन ॥ कलींत वाढवावें भक्तिमाहात्म्य जाण ॥ मग अवश्य म्हणोनि नारायण ॥ पुढें बोलत प्रश्नातें ॥५१॥ म्हणती महाराजा सर्वज्ञमूर्ती ॥ आम्हां सांगतां जन्मस्थिती ॥ परी कवण स्थानीं केउते युक्तीं ॥ व्यक्त होणें तें सांगा ॥५२॥ यावरी बोले प्रत्यक्ष नारायण ॥ कीं दीक्षेचें भविष्यपुराण ॥ पूर्वीच कथिलें पराशरनंदनें ॥ महामुनि व्यास तो ॥५३॥ अगा पूर्वी अठ्ठ्यांयशीं सहस्त्र ऋषी ॥ निर्माण झाले विधिवीर्यासीं ॥ तें वीर्य चुकोनि ठायाठायासी ॥ अपाप कांहीं उरलें असे ॥५४॥ तें जीवदशेवांचोनि सत्य ॥ महाराजा न पावे उदय ॥ तरी ते ठायीं ठायीं केउतें वीर्य ॥ त्याचें ठाय ऐकावें ॥५५॥ उपरिचर वसु यानी असतां ॥ वीर्य गळलें उर्वशी पाहतां ॥ तें शरस्तंबीं दुरोनि द्रवतां ॥ आदळतां झालें त्रिभाग ॥५६॥ यमुनेंत वीर्यबिंदु द्रोणाकांठीं ॥ पडतांचि झाले विभाग शेवटीं ॥ दोन भाग द्रौणापोटीं ॥ एक जळीं पडियेला ॥५७॥ असो पर्णद्रोणांत जो भाग पडिला ॥ तो तत्काळ द्रोणकूपीं जन्मला ॥ परी जळांत जो भाग पडिला ॥ तो ग्रासिला मत्स्यानें ॥५८॥ तरी तें मत्स्युदरीं वीर्य ॥ नारायण प्रत्यक्ष आहे ॥ परी जीवदशेविण गर्भवंशोदय ॥ होत नाहीं महाराजा ॥५९॥ तरी प्राज्ञिक कवि नारायण ॥ तेणें मत्स्युदरी जन्म घेणें ॥ मच्छिंद्र ऐसें जगांत नामाने ॥ मिरवावें महाराजा ॥६०॥ यापरी शिव कामावरी कोपोन ॥ तृतीयनेत्रींचा काढोनि अग्न ॥ महास्मर केला भस्म तेणें ॥ ऐसें ग्रंथ बोलती ॥६१॥ परी तो काम द्विमूर्धनी ॥ बैसला आही वीर्य प्राशन करोनी ॥ तरी तयाचे जठरीं अंतरिक्ष जाऊनी ॥ जालिंदर नामें मिरवेल ॥६२॥ यापरी कुरुवंशीं जनमेजयें ॥ नागसत्री आवाहन केलें आहे ॥ तया वंशीं महान पाहें ॥ बृहद्रथ राणा मिरवेल ॥६३॥ तो महीलागीं करील हवन ॥ तेव्हां गर्भ सांडील द्विमूर्धन ॥ यज्ञकुंडीं देदीप्यमान ॥ जालिंदरें जन्मावें ॥६४॥ यापरी ब्रह्मवीर्य सहस्त्रेंशीं ॥ ऋषि निर्मिले सहस्त्र अठ्ठ्यायशीं ॥ तेव्हां वीर्य रेवातीरासी ॥ रेवेमाजी पडियेलें ॥६५॥ तें महीचे परम कुशीं ॥ वीर्य आहे रेवातीरासी ॥ तेथें व्यापोनि जीवदशेसी ॥ देहालागीं मिरवावें ॥६६॥ तो महाराजा चमस नारायण ॥ रेवणसिद्ध मिरविजे नामानें ॥ रेवारेवेंत झाला जन्म ॥ म्हणोनि नाम हें त्याचें ॥६७॥ तेचि वेळीं आणिक रेत ॥ सर्पिणीमौळीं अकस्मात ॥ पडतां प्राशिलें तिनें नेमस्त ॥ भक्ष्य म्हणोनि जाण पां ॥६८॥ ते जनमेजयाचे नागसत्रांत ॥ नाग आहुति विप्र देत ॥ तये वेळीं आस्तिकें निश्वित ॥ सर्पिणीतें लपविलें ॥६९॥ ब्रह्मवीर्य उदरांत ॥ अंडजाशुक्तिरत्नयुक्त ॥ पुढें होईल महानाथ ॥ भविष्य जाणोनि आच्छादी ॥७०॥ महातरुच्या पोखरी ॥ तक्षकात्मजा पद्मिनी नारी ॥ ठेवितां प्राज्ञिक ऋषीश्वरी ॥ नवमास लोटले ॥७१॥ असो त्या अंडजाशुक्तिकायुक्त ॥ जीवदशा सकळ होऊनि मुक्त ॥ तरी आविर्होंत्र नारायण तेथ ॥ संचरिजे महाराजा ॥७२॥वीर्य अंडजपात्र सांडोनी ॥ गेली आहे तक्षकनंदिनी  ॥ तो वडाच्या पोखरस्थानीं ॥ अद्यापि आहे महाराजा ॥७३॥ तरी तेथें आविर्होत्र ॥ प्रवेश करितां सत्पात्र ॥ वटसिद्धनाथ स्वतंत्र ॥ तया देहीं मिरवावे ॥७४॥ यापरी मित्ररेत मंत्रसंपत्तीं ॥ कृपें कुरवाळील मच्छिंद्रजती ॥ ती वरदहस्ताची उकरडा विभूती ॥ साचोकार मिरवेल ॥७५॥ तें मंत्रप्रतायें सूर्यवीर्य ॥ सविताराज सांडिता होय ॥ परी तें भविष्यकारणीं उकरडामय ॥ वरदभस्म मिरवेल ॥७६॥ तेथें हरी जो नारायण ॥ शीघ्र संचरोनि दीक्षाकारण ॥ गौरक्ष ऐसें प्रतिष्ठानामानें ॥ जगामाजी मिरवावें ॥७७॥ यापरी मृडानीकारणीं ॥ सुरवर आलिया दक्षसदनीं ॥ ते कमलोद्भव पाकशासनी ॥ समारंभें पातले ॥७८॥ परी दक्षात्मजेची रुपरहाटी ॥ नेत्रकटाक्ष पाहतां परमेष्ठी ॥ तेणें धडाडोनि कामपाठीं ॥ इंद्रियद्वारा द्रवला तो ॥७९॥परी तो चतुराननी ॥ बैसला होता समास्थानीं ॥ काम द्रवतां इंद्रियवदनीं ॥ परम चित्तीं लाजला तो ॥८०॥मग रगडोनि चरणटांचे ॥ छिन्नन्व केलें रेताचें ॥ तें एक आगळें साठ सहस्त्रांचें ॥ रेतभाग वहियेलें ॥८१॥ तें साठ सहस्त्र रेतप्रभाणासी ॥ जीवदशा अपत्य वालखिल्यऋषींसी ॥ झाले परी एक भागासी ॥ वीर्य आहे तैसेंच ॥८२॥ तें लज्जायुक्त होऊनी ॥ केरासह सांडिले भागीरथीजीवनीं ॥ तयांतूनि एक भाग जाऊनी ॥ कुशवंटीं ॥ स्थिरावला ॥८३॥ तरी ते कुशदरीचे निखळीं ॥ रेतभागाची आहे वेली ॥ ती पिप्पलायन माउली ॥ संचारावें तेणें तेथें ॥८४॥ टांचे चरपटलें आहे रेत ॥ म्हणोनि नाम चरपटनाथ ॥ जगांत मिरवोनि जगविख्यात ॥ दीक्षेलागी विराजावा ॥८५॥यापरी कुंभोदभवाचा उदय झाला ॥ तो मित्रकामशराचा लोट लोटला ॥ तो गगनपंथें विमुक्त झाला अतिबळें करोनियां ॥८६॥ एक भाग घटीं पडतां ॥ अगस्तिउदय झाला तत्त्वतां ॥ एक भाग महीवरता ॥ कैलिकसदनीं पातला ॥८७॥ तो महाराज कैलिकऋषी ॥ भिक्षाभरतरी ऊर्ध्वशी ॥ भरतरी म्हणती भिक्षापात्रासी ॥ आंगणीं तें ठेविलें ॥८८॥ तों मित्ररेत अकस्मात ॥ येऊनि पडिलें भरतरीआंत ॥ तें कौलिकें पाहोनि भविष्यातें ॥ भरतरीं तैसें रक्षितसे ॥८९॥ तरी ते भरतरीरेतसंगीं ॥ द्रुमिल नारायण प्रसंगीं ॥ संचारोनि रेत अंगीं ॥ भरतरी नामें मिरविजे ॥९०॥ यापरी हिमाद्रीच्या विपिनस्थानी ॥ दिग्गज ठेला महीते शयनीं ॥ तैं सरस्वतीचे उद्देशेंकरोनी ॥ विधि वीर्यासी ढांसळला ॥९१॥तें वीर्य गजकर्णात ॥ पडतांचि झाले बिंदयुक्त ॥तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त ॥ महीवरी पडीयेले ॥९२॥ तयावरोनी व्याघ्र चाली ॥ चालता भेदले पाउलीं ॥ तया पादसंधींत तनु ओतिली ॥ जीवदशा अत्रीची ॥९३॥  तैसा गजकर्णसूतिकारण ॥ प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न ॥ तया नामाभिधानी प्रयत्न ॥ कर्णकानिफा मिरविजे ॥९४॥ यापरी गोरक्षाची हतवटी ॥ पडतां वाळवंटाचे पोटीं ॥ कर्दमओपुतळा करितां जेठी ॥ अभिमंत्रोनि भविष्यांत्तर ॥९५॥ मंत्रशक्ती विष्णुवीर्य ॥ आव्हानिलिया पुतळामय ॥ तैं करभाजनें संचराया ॥ जीवदशा मिरवावी ॥९६॥ ऐसें सांगोनि रमारमणें ॥ संतुष्ट केले नवनारायण ॥ मग परस्परें नमनानमन ॥ करोनियां उठले ते ॥९७॥ असो भगवंतेंशीं नवनारायण ॥ पाहती मंदराचळमौळीस्थान ॥ श्रीशुकाचार्य समर्धपासीं जाऊन ॥ समाधीं वरियेलें ॥९८॥ नव समाधी मेरुपाठारीं ॥ दहावी समाधी शुकऋषीश्वरीं ॥ असो ते दाही स्थूळशरीरीं ॥ पुढें तेथोनियां निघाले ॥९९॥ यापरी शुकवीर्याचें कथन ॥ वद्रिकाश्रमीं सोमब्राह्मण ॥ रंभाउद्देशें झालें पतन ॥ कबीर तेथें जन्मला ॥१००॥ही कथा भक्तिकथामृतांत ॥ वदविली आहे जगन्नाथें ॥ आतां नवनारायण झालें व्यक्त ॥ त्यांची कथा ऐक वी ॥१॥ असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला ॥ एक मच्छीनें प्राशिला ॥ तंव कवि नारायण संचरोनि वहिला ॥ गर्भ लागला वाढीसी ॥२॥ दिवसानुदिवस नवमास ॥ मच्छीने लोटिले जलोदरास ॥ पुढें प्रसूत अंडज सुरस ॥ यमुनाजळीं व्हावें जों ॥३॥ तों तेथें एक कथा वर्तली ॥ श्रीकैलासीं अपर्णा माउली ॥ शिवासी म्हणे कृपासाउली ॥ अनुग्रह मज द्यावा जी ॥४॥ तुम्ही जपता जो मंत्र ॥ तो मज द्यावा जी पवित्र ॥ तेणेंकरोनि मी चिर ॥ सनाथपणें मिरवेन जी ॥५॥ शिव म्हणे उमे ऐक ॥ मी मंत्र उपदेशीन सकळिक ॥ परी एकांत ठाव अलोकिक ॥ ऐसा जाण पाहिजे गे ॥६॥ अपर्णा म्हणे एकांतस्थान ॥ तरी महीवरी शोधूं आपण ॥ ऐसें ऐकतां दयाघन ॥ अवश्य तीतें म्हणतसे ॥७॥ मग सिद्ध करोनि नंदिकेश्वर ॥ हिंडतां स्थाने महीवर ॥ श्रमोनि वर्ततां उमाईश्वर ॥ यमुनेतटीं येऊनि पोंचले ॥८॥ मग उतरोनि नंदिकेश्वरावरुनि तीं ॥ नंदी ठेवोनि तटावरती ॥ उभयतां उतरोनि यमुनेसरितीं ॥ जवळ कांठीं बैसलीं ॥९॥ तंव तो यमुनातटएकांत ॥ तेथें मनुष्यांची न मिळे जात ॥ ऐसें पाहोनि शुद्ध एकांत ॥ तें स्थान ईश्वरासी मानलें ॥११०॥ परी तो मच्छोदरांत ॥ कवि नारायण नेणोनि त्यांत ॥ पार्वतीतें उपदेशित ॥ मंत्रसंजीवनीसी नाथ ॥११॥ तीतें तो मंत्र उपदेशितां ॥ मच्छी तेथें होती सत्यता ॥ तो उपदेशशब्द गर्भी तत्त्वतां ॥ मच्छिंद्रानें ऐकला ॥१२॥ ऐकलेपरी ग्रहणचि झालें ॥ तेणेंकरुनि ज्ञान प्रगटलें ॥ मीतूंपण सर्व सरलें ॥ सर्वचि ब्रह्म सनातन ६ ॥१३॥ असो शिव पार्वतीतें पुसत ॥ कीं कैसें चोज उपदेशांत ॥ तूतें सांपडेल खूण ते मातें ॥ बोलानि दावीं अपर्णे तूं ॥१४॥ ऐसें शिव तीस पुसतां ॥ तों आधींच मच्छेंच्र झाला बोलता ॥ म्हणे महाराजा आदिनाथा ॥ ब्रह्मवोज मिरवेल ॥१५॥ आतां किंबहुना चराचरा ॥ असे स्वरुपीं वृत्ति साकार ॥ नग नोहे हेमचि सार ॥ आब्रह्मभुवनापासोनी ॥१६॥ ऐसें शिव ऐकतां वचना ॥ जळीं पाहे चाकाटोन ॥ तों मच्छोदरीं नारायण ॥ कवि महाराज समजला ॥१७॥ मग शंकर बोलते झाले त्यातें ॥ म्हणती महाराज तूं आहेस येथें ॥ तरी मम उपदेशाचा तूतें ॥ लाभ झाला कविराया ॥१८॥ परी हें फारचि झालें अपूर्व ॥ पुढें ऐक आनंदपर्व ॥ मंत्रउपदेशगौरव ॥ दत्तमुखीं करवीन मी ॥१९॥ तरी तुज जन्म झालियापाठीं ॥ बद्रिकाश्रमी यावें शेवटीं ॥ तेथें तूतें देईन भेटी ॥ सर्व सामग्री सचिन्ह ॥१२०॥ ऐसें बोलोनि आदिनाथ ॥ स्वस्थाना गेला अपर्णेसहित ॥ येरीकडे गर्भ मच्छोदरांत ॥ तोचि मंत्र घोकीतसे ॥२१॥ यापरी भरतां पूर्ण दिवस ॥ मच्छीनें प्रसूतकळा समयास ॥ अंड सांडोनि जळतटास ॥ मच्छी गेली जळोदरीं ॥२२॥ असो अंड सांडोनि तीरास ॥ मच्छी गेली जळोदरास ॥ त्यास कांहीं लोटल्या दिवस ॥ यमुनातीरी महाराजा ॥२३॥ तंव तेथे समयकाळी ॥ बकपक्ष्यांची उतरली मंडळी ॥ मीन वेचावया यमुनाजळी ॥ निजगणासहित संचरले ॥२४॥ तो अकस्मात मित्रात्मजातटी ॥ अंडजशुक्तिका पाहिली दृष्टीं ॥ मग सर्व मिळोनि चंचुपुटीं ॥ खाद्य म्हणोनि भेदिती ते ॥२५॥ चंचुपुटांचा भेदवज्र ॥ तेणें अंड झालें जर्जर ॥ द्विशकल होऊनि सत्वर ॥ महीवरे आदळले ॥२६॥ परी वरील शकल पडिलें महीं ॥ खालील शकलांत बाळ विदेही ॥ जैसा अर्क उदकप्रवाहीं ॥ एकाएकीं उतरला ॥२७॥ रुदनशब्द कडकडाट ॥ बाळतेजाचा बोभाट ॥ तें न्याहाळितां चकचकाट ॥ पाहोनियां पळाले ते ॥२८॥ असो सकळशुक्तिका रत्नाकर ॥ आंत मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र ॥ असतां तमारिकन्यातीर ॥ पावला धीवर त्या काळीं ॥२९॥ तो धीवर कामिकनाम सुभट ॥ पाहतां अंडजशुक्तिका प्रकट ॥ तों आंत रत्नतेज स्फुट ॥ बाळ रम्य देखिला ॥१३०॥ देखिला परी जो सविता ॥ मग चित्तीं द्रवली मोहममता ॥ म्हणे बाळ हें कोमळ तत्त्वतां ॥ यातें भक्षील कोणी सावज ॥३१॥ ऐसा उदय होतां चित्तीं ॥ देव शब्दकुसुमां सांडिती ॥ कीं हे महाराजा कामिकमूर्ती ॥ बाळ नेई वो सदनातें ॥३२॥ अरे हा कवी नारायण ॥ मच्छोदरी पावला जनन ॥ तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम ॥  जगामाजी मिरवी कि ॥३३॥ अरे हा दक्ष योगींद्रजेठी ॥ तारक नौका महीपाठीं ॥ तरी तूं संशय सोडोनि पोटीं ॥ सदना नेई महाराजा ॥३४॥ ऐसें देववागुत्तररत्न ॥ कर्णपुटिकं होतां भूषण ॥ मग तें दृढ करोनि जतन ॥ हदयसंपुटीं पाळीतसे ॥३५॥ महाविश्वासाचे पाठीं ॥ आधींच मोह नांदेल पोटीं ॥ आनंदाची अपार दाटी ॥ आनंदपात्रीं हेलावे ॥३६॥जैसें पयाचेनि पात्रीं ॥ घृतशर्करा होय मिश्रिती ॥ तो गोडपणाचा भाग अमृतीं ॥ वाढला कां जाईना ॥३७॥ कीं दरिद्राचे सुरवाडास ॥ मनीं पेटली राजहौस ॥ ते गजशुंडींची माळा ग्रीवेस ॥ सुख कां वाटलें जाईना ॥३८॥ कीं वंशवृद्धि ते शून्यमय ॥ चिंताकाळिमा निशा आहे ॥ तैसा सुतमित्राचा होतां उदय ॥ मग तेथ चिंता कासया ॥३९॥ कीं कवडीसाठीं वोंचितां प्राण ॥ ते मांदूसचि लाधली सुखधन ॥ कीं मृत्युभयातें असुख मानून ॥ चित्त जडे चिंतासाकडीं ॥१४०॥ तों पीयूषाची अनुकूलता ॥ गोडी सुखाचा उदय होतां ॥ मग चिंतानिशीचा आनंदसविता ॥ प्रभेलागीं हेलावे ॥४१॥ मग स्नेहकवचें करसंपुटीं ॥ तोयें न्हाणिला बाळजेठी ॥ हदयीं वाहूनि कामिक पोटीं ॥ सदनीं आणिले तयातें ॥४२॥ शारद्वता नामें सुंदरा नारी ॥ ओपिता झाला तिचे करीं ॥ म्हणे साजणी वंशाधारी ॥ सुत मिरवीं लोकांत ॥४३॥कीं पाहें पां पूर्ण भरंवसा ॥ कीं राधातनय कर्ण जैसा ॥ तरी तो पुढें राजमांदुसा ॥ जगामाजी आव्हानी ॥४४॥ तन्न्यायें भाग्योदयें ॥ सर्व सुखशयनीं पहुडावे ॥ अहाहा बाळ अवतार होय ॥ कवि नारायण मच्छेंद्र ॥४५॥ मग कामिकहाती सुढाळ सुता ॥ नवरत्नांच्या सम पाहतां ॥ परम आनंदली शारद्वता ॥ बाळ कवळिला स्नेहमेळीं ॥४६॥ स्नेहें धरितांचि पयोघरी ॥ पय दाटलें अतिपाझरीं ॥ जैसें सोमतेजकरी ॥ सोमकांत द्रवतसें ॥४७॥ असो कुशांचें मंडन ॥ स्नेहभावें होतां संगोपन ॥ मग बाळजठरापिंडींचा अग्न ॥ पय पाहोनि स्वीकारी ।४८॥ तैं स्नेहाचा ओघ बाणे ॥ बाळ अंगिकारोनि मार्जनें ॥ तप्तोदकीं घालोनि स्नानें ॥ पालखातें हालवितसे ॥४९॥ आधींच नामें शारद्वता ॥ त्यावरी अपत्यकामी कांता ॥ तेथें बाळमोहकाम द्रवतां ॥ कवण रीतीं वर्णावें ॥१५०॥आधींच असतां अमरवेलीं ॥ त्यावरी पजन्यर्वृष्टी झाली ॥ मग तो हेलावा लवलव पाउलीं ॥ कवणासी वर्णवे ॥५१॥ ऐसेपरी आनंदस्थितीं ॥ दिवस लोटले कांहींसे मिती ॥ पांच वरुषें वयावरुती ॥ मच्छिंद्रनाथ मिरवला ॥५२॥ तंव कोणे एके दिवसी ॥ सुदिनीं उदईक भूमीसी ॥ पिता म्हणे तमारिकन्येई ॥ चला जाऊं ये मच्छिंद्रा ॥५३॥ अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ ॥ कृतांतभगिनीतीरा येत ॥ मग जळोदरीं संचरोनि तात ॥ मच्छबाळां आव्हानीतसे ॥५४॥ तंव जाळ्यासवें मीनधाडी ॥ आंतुल्या ओढी करसंपुती ॥ बाहेर काढितां कामिक जेठी ॥ महीं मीनांतें सोडीतसे ॥५५॥ मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा ॥ वेंचोनि सांठवी या मीनां ॥ ऐसे वदोनि कामिक पुन्हां ॥ जळामाजी संचरे ॥५६॥ येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ मीन देखतां म्हणे हो तात ॥ अहा मातुळकुळा घात ॥ कामिका ताता मांडिला ॥५७॥ तरी आपण असतां ऐसी रहाटी ॥ बरवेपणें पाहतां दृष्टीं ॥ हें योग्य नव्हे कर्म पाठीं ॥ उपकारा मिरवावें ॥५८॥ पूर्वीं आस्तिकें मातुळकुळा रक्षिलें ॥ आपुले तपाचेनि बळें ॥ राव बोधोनि सत्रपाळ ॥ नागकुळा वाचविलें ॥५९॥ मग एक एक मत्स्य वेचोनी ॥ प्रवाहा मेळवी जीवनालागोनी ॥ तें कामिकतातें दृष्टीनें पाहोनी ॥ परम चित्तीं क्षोभला ॥१६०॥ जैसा परम सबळ ॥ पेटला मिरवी वडवानळ ॥ तेवीं कामिकक्रोधाग्नि प्रबळ ॥ हदयानाजी धडाडी ।६१॥कीं मेघमंडळाचे दाटीं ॥ चपळा पळती तेजावाटी ॥ तैसा धडाडोनि क्रोध पोटीं ॥ बाहेर आला तत्क्षणीं ॥६२॥ लक्षोनि मच्छिंद्राचें मुखमंडन ॥ स्वकरपुटी केले ताडन ॥ म्हणे जळोदरीचे काढितां मीन ॥ बहु श्रम जाणसी ॥६३॥ तरी पुन्हां जळोदरी ॥ मच्छ सोडितोसी कैसा भिकारी ॥ खासील काय उदरांतरीं ॥ भीक मागों जाशील ॥६४॥ ऐसे ऐकोनि कामिकवचन ॥ मनांत मच्छिंन्द्र करी बोलणें ॥ सर्वांत पवित्र भिक्षान्न ॥ दोष त्यासी कांहीं नसे ॥६५॥ तरी हाचि आतां उपदेश ॥ आरंभावे भिक्षान्नास ॥ येरीकडे जळोदरास ॥ कामिक तेव्हां संचरला ॥६६॥ येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ दृष्टी चुकवोनि गमन करीत ॥ भ्रमण करितां अद्वैतवनांत ॥ सुढाळ जागा दिसेना ॥६७॥ मग उत्तरदिशा बद्रिकाश्रम ॥ पाहतां झाला योगद्रुम ॥ तेथें द्वादश वर्षे उत्तमोत्तम ॥ गालागी आचरला ॥६८॥ तें तीव्र तप गा शुचिस्मंत ॥ मंत्रदृष्टी अद्वैतवनांत ॥ लोहकंटक पादांगुष्ठांत ॥ देऊनि तप करीतसे ॥६९॥ ऊर्ध्व वायूचे करुनि भक्षण ॥ दृष्टी अर्का देऊनि दान ॥ वाचा करोनि कृष्णार्पण ॥ हरीभजनीं मिरविल ॥१७०॥ शरीर क्लेशा देऊनि दान ॥ ईश्वरी वेध तनुमनप्रमाणें ॥ तेणें अस्थिपंजरावरोन ॥ त्वचा तितुकी मिरवीतसे ॥७१॥ तपें भक्षिलें सकळ मांस ॥ परी लाग न लागे अस्थित्वचेस ॥ मांस भक्षोनि सकळ भागास ॥ वृद्धिरस सकळ आटिलें ॥७२॥ नेत्र फिरोनि झाल्या वाती ॥ दिसों लागली कार्पासरीती ॥ सकळ तेजाची आटली ज्योति ॥ महाघोर तपानें ॥७३॥ अस्थि त्वचा व्यक्त होऊनी ॥ शिरा दिसती चांगुलपर्णी ॥ सर्व अंग गेले वाळोनि ॥ काष्ठापरी मिरवितसे ॥७४॥ ऐसे क्लेश असंभवित ॥ मच्छिंद्रअंगीं जाणवत ॥ तों तेथें अकस्मात ॥ अत्रिनंदन पातला ॥७५॥ संचरोनि देवालया ॥ स्तविता झाला उमाराया ॥ हे दक्षजामाता करुणालया ॥ दिगंबरा आदिपुरुषा ॥७६॥ कामांतका फणिवेष्टका ॥ रुंडभूषणा कैलासनायका ॥ अपर्णानिधाना कामांतका ॥ वृषभारोहणा महाराजा ॥७७॥ हे सकळ दानवांतका ॥ देवाधीशा उमाकांता ॥ प्रळयरुद्रा त्रिपुरांतका ॥ शूळपाणी महाराजा ॥७८॥ हे शंकरनामाभिधानी ॥ पंचवक्त्रा त्रिनयनी ॥ भस्मधारणा उमारमणी ॥ नरकपाळा विराजसी ॥७९॥ ऐसें स्तुतीचें वाग्रत्न ॥ दत्त अर्पितां माळा करोन ॥ तेणें तोपोनि कामदहन ॥ प्रत्यक्षपणे मिरवला ॥१८०॥प्रत्यक्ष होतां उमाकांत ॥ नयनीं यजिता झाला दत्त ॥ मग आलिंगोनि प्रेममरित ॥ निकट आपण बैसला ॥८१॥ योगक्षेमाची सकळ वार्ता ॥ शिव पुसतां झाला दत्ता ॥ तेणेंही सांगोनि क्षेमवार्ता ॥ शिवसुखा पुसिलें ॥८२॥ यापरी बोलता झाला दत्त ॥ कीं बद्रिकाश्रमीं कानन बहुत ॥ तरी महाराजा दृष्टी व्यक्त ॥ माजी करा कृपाळुवा ॥८३॥ मग अवश्य म्हणोनि उमारमण ॥ उभयतां पाहूं चालले कानन ॥ परी ही वासना दत्ताकारणें ॥ मच्छिंद्रदैवें उदभवली ॥८४॥ जैसा लाभ असतो पदरीं ॥ तो सहज वळूनि येत घरीं ॥ लघुशंके मूत्रधारीं ॥ मांदुसघट लागतसे ॥८५॥ कीं उष्णत्रासें मही चाली ॥ आतुडे कल्पतरुची साउली ॥ तेवीं दत्तवासना उदभवली ॥ मच्छिंद्रदैवप्रकरणीं ॥८६॥ कीं याजव्रता टाकिल्या बाहेरी ॥ हिरा ठेवोनि नेत गारी ॥ तेवीं दत्तात्रेयवासनालहरीं ॥ उदेली मच्छिंद्रदैवानें ॥८७॥ असो ऐशा लाभभावना ॥ उभयतां रमती बद्रिकाश्रमा ॥ नाना तरुप्लवंगमां ॥ अपार चिन्हें पाहती ॥८८॥सुरतरु पोफळी ॥ बकुळ चंपक कर्दळी ॥ गुलछबु गुलाब केळी ॥ नारळी सोनकेळी शोभल्या ॥८९॥ की सहज पाषाण ढाळितां महीसी ॥ दैवें आतुडे हस्तपादांसी ॥ तेवीं मच्छिंद्रदैवउद्देशी ॥ दत्तवासना उदभवली ॥१९०॥ ऐसे वर्णितां अपारतरु ॥ तरी बद्रिकेचा फार शेजारु ॥ कानना महा निकट मंदारु ॥ मंदराचळ शोभला ॥९१॥ तयावरोनि वर्षत तोयधर ॥ मणिकर्णिके अपार नीर ॥ ती भागीरथी उत्तमतीर ॥ निजदृष्टीनें पाहिली ॥९२॥ मग तेथ ओघ धरोन ॥ उभयतां करिते झाले गमन ॥ असो मच्छिंद्राकारणें ॥ निजदृष्टीं पाहातील ॥९३॥ तेथें जी जी होईल वार्ता ॥ श्रीगुरु ज्ञानंत होय सांगता ॥ निमित्तमात्र धुंडीसुता ॥ ग्रंथामाजी मिरविलें ॥९४॥ धुंडीसुत नरहरिवंशीं ॥ मालू वदे कवित्वासी ॥ निमित्तमात्र नरहरिकृपेसी ॥ तोचि बोलवी ज्ञानेश ॥९५॥ स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्यकिमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ प्रथमोऽध्याय गोड हा ॥१९६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ नवनाथभक्तिसार प्रथमोऽध्याय समाप्त ॥  


****************************************************************************

कथासार : नऊ नारायणांपैकी मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या 


ग्रंथारंभी मालुकवि म्हणतात- कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल, (ध्रुवमीन) आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले, असे नवनारायणांनी हरीस विचारिले. तेव्हा त्यांने त्यास सुचविले की, आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्युलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना ! आपण आम्हांस अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की, आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्युलोकी अवतार घेणार आहेत, प्रत्यक्ष कवि वाल्मीकि हा तुळसीदास होऊन येईल. शुकमुनि हा कबीर, व्यासमुनि तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेउन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मीसुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपति शंकर हा निवृत्ति होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजशी रममाण होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्तिमाहात्म्य वाढवू.

अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रितीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायाणांनी पुन्हा विनंति केली. तेव्हा हरीने त्यांस सांगितले की, पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनि त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून अठ्यांयशी हजार ऋषि निर्माण झाले. त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे; पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला. त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळिले तिच्या उदरात कवि नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे; यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रितीने की, कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील; तेव्हा द्विमूर्धन (अग्नि) गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. अठ्यायशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे, तेते चमसनारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाहि मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुति दिली; त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे, असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे, त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यात सूर्य आपले वीर्य सांडील, ते उकिरडामय असेल; त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नसमारंभसमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले; त्यासमयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले, त्यावेळी ते एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले, त्याचे साठ हजार वालखिल्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले; ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलीकऋषीने आंगणात ठेविले होते; त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले; ते त्याने (भर्तुहरि) तसेच जपून ठेविले आहे. त्यात धृवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले; त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला, त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने, कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे, ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले, तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधिस्त होऊन राहिले. पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले.

एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.

उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले.

मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.

मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला.

त्या माराच्या तिरिमिरीत मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन, भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरला हे पाहून त्याची दृष्टी चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला.

इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुति करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारही मिळाला. ते उभयतां बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.