Jun 30, 2020

श्री गजानन महाराज पासष्टी ( श्री वासुदेव महाराजविरचित )


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

हरी ॐ नमो ब्रह्मात्मेश गणेश । सर्व देव देवी चैतन्य चिद्विलास । नमो श्रीकृष्ण विठ्ठल ज्ञानेश ।वंदु तुकोबास संतमेळी ॥१॥ वंदु आत्मगणेश गुरू गजानना । वंदु पितामह ज्ञान भास्करांना । वंदु भक्त पुंडलिक बाबांना । चंद्रभागा मातेंना साष्टांगे ॥२॥

वंदु चैतन्य चिद् विलाशेष कृष्ण । पार्था गीते बोधोनी आत्मज्ञान । तेची विश्वात्मा पंढरी विठ्ठल होऊन । ज्ञानेश तुकाराम जाण तेचि झाले ॥३॥

तुकोबा सर्वेक्ये स्वराज्य भारुडोक्त । शौर्य परचक्री शिवराया रक्षित । वारी, ज्ञानेश मंदिर करीत ।धन्य राष्ट्रसंत जगद्गुरू ॥४॥

ते थळ गावी शारदा -भवानीराम पुत्र । साबळे पाटील गजानन होत । बैलाविण शेत नांगरीत । देती धन, पुत्र बालयोगी ॥५॥

ते आकोली पार्वती-कर्ताजी पुत्र । विश्वोद्धारी भास्कर संत । गुरु शिष्य ब्रह्मात्मा चैतन्यनाथ । आले समस्त जगदोद्धारा ॥६॥

माध्याह्नीच्या समयाला । आकोली गावापाशी आला । हा योगेश्वर साधु भला । श्री गजानन महाराज ॥७॥

आकोलीच्या रानात । सर्वे नंबर बावन्नात । एका शुष्क गर्दाळा प्रत । बनविली तुम्ही पुष्करीणी ॥८॥

श्री गजानन महाराजांनी । सजल केलेली विहीर या स्थानी । हा नामोल्लेख शासनाने । सर्व हक्क नोंदणी कोर्टी केला ॥९॥

शेगावाहुन जा आकोली जहागीर । पश्चिमेचा बघा बावन्न नंबर । श्री गजानन महाराजांनी सजल केलेली विहीर । वंदा साक्षात्कार नेत्री बघोनी ॥१०॥

चमत्कारे भास्कर शिष्य झाले । हे देवाचे देव खरे संत भले । तै पासुनी सर्वी श्रींना पुजिले । आकोलीचे झाले श्रीतीर्थ ॥११

काशीत मनकर्णा केली विष्णुंनी । भीष्मार्थ पार्थे बाणे गंगा निर्माणी । जैसी नामदेवार्थ विठठलांनी । मारवाडा भरोनि विहीर दिली ॥१२

जिजाबाई पायीचा कंटक काढून । भांडाऱ्या विठ्ठले विहीर भरून । तुकोबासवे केले भोजन । हा चिद् विलास पूर्ण गजाननांचा ॥१३

शरण आले पाटील भास्कर । ते पट्टशिष्य तुम्ही केले योगेश्वर । जिवंत केला भोजासा सोनार । तुकोबांनी पुत्र उठविला १४

ज्ञानेश जिवंत केले सच्चिदानंद । कृष्णे गोप वत्स केले जिवंत । कमाल खेळा मूल उडवित । मुक्ताईने प्रेते जिवंत केली १५

नागझरी गोमाजी बुवा भेटून । शेगावी आमले सप्ताही जेवून । बंकटलाला दामोदरा भेटून । पितांबरा आपण तुंबा दिला १६

ते नाल्या गंगोदके भरत । बंकटलाल घरी तुम्ही जेवित । तीर्थे जानराव बापू वाचत । शुध्द चिंचोणे देत जानकीरामा १७

चंदू मुकुंदाचे खाल्ले कानोले । शुध्द चित्ते मोह मोहळे वंदीले । लक्ष्मीनारायण खेताना भले । सप्त पुत्र दिले धनधान्य १८

भक्त हरी पाटलाचा । गर्व हरिला अंह कुस्तीचा । हातांनी पिळून रस ऊसांचा । पाजिला भक्तीचा सर्व मुलां १९

तेलंगी वेद शिकविले । गोविंदबुवांना हंसगीता ज्ञान दिले । खंडूजी पाटला कोर्टी यश आले । तुम्ही त्यांना दिले पुत्ररत्न ॥२०॥

गौरीशंकर बाबासवे जेवून । चित् शक्ती केली अर्पण । अमरावती खापर्डेनी पुजोन । आत्माराम सदना गेले तुम्ही ॥२१॥

पादुका दिल्या दत्तात्रय स्वामीस । शिष्यत्व दिले बाळाभाऊ प्रभुस । योगी केले रामचंद्र गुरवास । जयरामा दिले ज्ञान तुम्ही ॥२२॥

नलासम अग्नी प्रगटला । देवीदर्शन दिले झिंग्राजीला । द्वारकेश्वरी निर्मिले पाताळगंगेला । नरसिंह बुवाला काला दिला ॥२३॥

मनेंद्रिये गोविंदबुवा प्रत । तुफान घोडे केले शांत । सुखलाल मन द्वाड गाय बहुत । तुम्ही क्षणात गरीब केली ॥२४॥

कोंडोली धावा केला पितांबराने । शुष्क आम्रवृक्षा आली पाने । अंगी झाडे पडली वाऱ्याने । तुम्ही शांतपणे भास्करासह ॥२५॥

ज्ञानेश ध्वज अजानवृक्ष होत । भानुदास शुळी पाला फुटत । पडता याज्ञवल्क्य अक्षत । पाने फुटत जनक शयै ॥२६॥

योगाग्नी पेटता पलंग । परी भाजेना हो तुमचे अंग । ब्रह्मगिरी शरण येता मग । त्रितापांची आग विझविली ॥२७॥

सीता, मारुती, पांडव, प्रल्हाद । गाई गोपा वणव्या कृष्ण रक्षित । मांजरी पिले न जळत । महिमा अद्भूत समर्थांचा ॥२८॥

नारायण कोकाट्या वाचविले । डाॅ. कोल्हाटकर पुत्र सर्पी रक्षिले । डॉ. कवरासवे जेविले । क्षणात केले व्रणा बरे ॥२९॥

कवठ्याचे वारकऱ्या वाचविले । बापूजी काळ्या विठ्ठलरुप दाविले । मेल्या कुत्र्या जिवंत केले । शरण आले कर्मठ विप्र ॥३०॥

धृवासम गणू जवरी वाचले । पुंडलिक भोकरे प्लेगी रक्षिले । रामा हृदयी तुम्ही दाविले । वाचू लागले ज्ञानेश्वरी ॥३१॥

हस्तामलक गावोबावत । भोकरे ज्ञानेश्वरी वाचित । बायजाबाई गोपीकावत । निष्काम भक्त बनविल्या तुम्ही ॥३२॥

तुकाराम कर्ण छर्रा पडला । नारायण बुवा पुजारी केला । झामसिंह इस्टेट देता भला । मुंडगावी झाला महोत्सव ॥३३॥

अकोल्या राम मंदिर करवले । महताबशा महंत झाले । मशीदी कुरुमा तुम्ही केले । अस्पृश्य गाडी आले नवे मठी ॥३४॥

पाच सप्ताह मलकापूरी । तुम्ही काला केला विष्णूसाचे घरी । कंठी माळ , राम कृष्ण हरी । गाथा ज्ञानेश्वरी पंढरी वारी ॥३५॥

भव नर्मदे भक्ता रक्षिले । भवमुक्त गंगाभारती केले । पुंडलीक बुवा ब्रह्मज्ञ संत झाले । पुरी वाचविले पूर्णेच्या ॥३६॥

आकोट कुपी पर्जन्येश्वरी । गंगा गोदा तुमचे स्नान करी । ऋषिबुवा मीनानाथे द्वारकेश्वरी । सुनंदेतिरी काला केला ॥३७॥

जोग महाराज पंढरी भेटती । मारुती लक्ष्मणबुवा लीला बघती । वासुदेवानंद सरस्वती । स्वामी भेटो येती रंगनाथादी ॥३८॥

दास नवमी बालकृष्णासी । बाळापुरी भेटले समर्थ वेषी । कुत्रा डसला भास्कर बाबासी । दिवस चौऱ्यांशी वाचविले ॥३९॥

त्यांनी गुरू मंदिर पुर्ण करण्यार्थ । भक्ता घेवविली शपथ । देहु आळंदी पंढरी वारीतीर्थ । तुम्ही सोबत भास्करा नेले ॥४०॥

नाशिक ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर । या पुरुषोत्तम मासभर । करुनि निज चैत्री शेगावावर। रामजन्मा सत्वर तुम्ही आले ॥४१॥

चैत्र कृष्ण पंचमी सप्ताहार्थ । भक्तासह आले भास्कर नगरात । काला भोजने होता समस्त । भास्करा समाधिस्त बसविले ॥४२॥

शके अठराशे एकोणतीस । गुरुवार चैत्र कृष्ण पंचमीस । संजीवन समाधी भास्करास । गजानना खास तुम्ही दिली ॥४३॥

निवृत्ती ज्ञानेशासम गजानना । स्वतः समाधी देऊन भास्करांना । त्यांचे मंदिर करोनि तत्क्षणा । सप्ताही कावळ्यांना निवारीले ॥४४॥

चार पुण्यतिथी सप्ताह केले । आकोल्या टिळक सभाध्यक्ष झाले । भाकरी प्रसादे गीतारहस्य केले । गावोबासम भले टिळकांनी ॥४५॥

बहुदिन राहून बुटीघरी । दोन दिवस रघुजी राजमंदिरी । रामा रामटेकी भेटून सत्वरी । शेगाव नगरी तुम्ही आले ॥४६॥

पंढरी प्रार्थुनि विठ्ठलास । शेगावी ऋषी पंचमीस । गुरुवारी शके अठराशे बत्तीस । तुम्ही निजधामास ब्रह्मीलीन ॥४७॥

पार्थिव देह शेगावी ठेऊन । भास्कर मंदिरी राहिले आपण । सर्व तीर्थी भक्ता दिले दर्शन । धन्य गजानन सिद्ध योगी ॥४८॥

यतीरुपे जांजळा भेट मुंबईत । सुभेदारा साक्षात्कार होत । निमोणकरांचे लग्न लावित । रक्षित भक्ता गजानन ॥४९॥

शेगावी श्रीसंस्था कार्यार्थ । रावसाहेबा गोसावी रुपे आज्ञापित । त्यांचे स्त्री कन्ये रक्षित । झाले विश्वविख्यात श्रीमंदिरादी ॥५०॥

श्रींचे संस्थेचे विश्वस्त । पंढरी आळंदी श्रीमंदिरे बांधित । विद्यालयी अन्नदानादी देत । जनसेवा करीत तवकृपे ॥५१॥

शतचंडी यज्ञ पूर्ण केले । बंकटलाला पुत्रा वाचविले । जयपूर बाईचे भूत गेले ।रक्षिले नाईक नवर्‍या ॥५२॥

तुम्ही हकीम होऊन भले । वासुदेव बुवासी नेत्र दिधले । मातोश्री चंद्रभागे वैकुंठ दिले । पुरुषोत्तमा केले संस्थाध्यक्ष ॥५३॥

आणुनि गौरीशंकर दांडेकर । केला भास्कर मंदिर जीर्णोद्धार । शासने दिल्या जागेवर । अठ्ठावन आर मंदिरादी ॥५४॥

तुम्ही सर्वोच्च कोर्टी यश दिले । स्वाध्याय जपयज्ञादी प्रारंभिले । वेद शास्त्र पुराण सार ग्रंथ केले । विद्यापीठी दिधले विद्यादान ॥५५॥

शेगावावर रामजन्मा श्री गजानन पासष्टी पठण । जो करी त्या कधी होईना विघ्न । गणेशादी देव संत रक्षण । करतील आण विठ्ठलाची ॥५६॥

कोटी तीर्थे व्रत यज्ञादी घडती । श्रवणे कोटी कुळे उध्दरती । भूते, शनि, राहू, केतू न बाधती । विघ्ने, संकटे होती सर्व नष्ट ॥५७॥

जयंती थळ, आकोली जहागीरी । समाधी शेगाव भास्करनगरी । अखंड ज्ञानोबा तुकाराम गजरी । आळंदी पंढरी वारी घडो ॥५८॥

तुम्ही अच्युतात्मे निर्धारी । देव तुमचा आज्ञाधारी । तुम्ही म्हणाल त्याते उद्धरी । येरा न धरी हाती कल्पांती ॥५९॥

गजानना विश्वात्मा तुम्हीच सर्व । आमुचे मायबाप गुरुदेव । देऊनी आम्हा भक्ती प्रेमभाव । श्री सेवा सदैव करुनि घ्या हो ॥६०॥

आकोली जहागीरी तव मंदिरी । भास्कर नगरी भास्कर मंदिरी । शेगावी एकवीस पारायणे करी । त्या भेटेल स्वारी गजाननांची ॥६१॥

शके एकोणवीसशे अठरास । चैत्र कृष्ण पंचमीस । श्री भास्कर महाराज मंदिरास । श्रींनी पासष्टीस पूर्ण केले ॥६२॥

एका ज्ञानेश वरदोक्ती। पुढती पुढती । इया ग्रंथ पुण्य संपत्ती । सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होइजे ॥६३॥

नाम संकीर्तनं यस्य । सर्व पाप प्रणाशनम । प्रणामो दुःख शमनः । तं नमामि हरि परम ॥६४॥

स्वस्ति श्री गजानन पासष्टीते । श्री ज्ञानेश्वरदास विरचिते ।श्रवणे सौख्य मिळेल सर्वाते नमस्ते नमस्ते श्री गजानना ॥६५॥

॥ श्री गजानन महाराजार्पणमस्तु ॥


Jun 28, 2020

संक्षिप्त श्रीगुरुलीलामृत - अध्याय १




|| श्री गणेशाय नमः || श्री सरस्वत्यै नमः || श्रीमत्सद्गुरू दत्त दिगंबराय नमः || श्रीगुरूदेव दत्त स्वामी महाराजाय नमः ||

प्रारंभी श्री मंगलमूर्ती । ज्याचे योगे स्फूरे चैतन्य स्फुर्ती । ब्रह्मादिक देव असूर नर जया वंदिती । त्या नमियेले आदरे ।। १ ।। गजानन हेरंब लंबोदरा । विघ्नांतका सर्व विद्या सागरा । ग्रंथ सिद्धिसी नेऊनि दातारा । पूर्ण करा सविस्तर ।। २ ।। आता भगवती सरस्वती । अनादिविद्या चित्छक्ती । जियेचे योगे स्फूरे अंतःकरणवृत्ती । ते वंदिली प्रेमभावे ।। ३ ।। अक्षरस्वर्ण वीणा शोभत । करी पोथी वेदार्थ विहित । विरागे प्रबोध गायन करित । कल्याणार्थ जगताच्या ।। ४ ।। ॐ नमः श्रीसद्गुरूनाथा । श्रीगुरूदेवदत्त स्वामी समर्था । पूर्णब्रह्म केवल अनादि यथार्था । आपणचि एक अद्वितीय ।। ५ ।। खल दुष्टांचे निर्दलन । व्हावया साधूंचे परित्राण । धर्मसंस्थापनार्थ अवतीर्ण । होता युगायुगी जगदीशा ।। ६ ।। दुराचरण घोर कलियुगी । होऊ लागले जागोजागी । म्हणून श्रीपादवल्लभ रूप धरूनी जगी । सदाचारी जन लाविले ।। ७ ।। मागुती श्रीमन्नृसिंह सरस्वती । अवतरले नरवेषे यति । जनांसि लावूनि सद्धर्म निती । असंख्यात तारिले ।। ८ ।। या अवतार द्वयांचे चरित । प्रसिद्ध ' गुरूचरित्र ' ग्रंथात । सरस्वती - गंगाधरे इत्थंभूत । वर्णिले आहे सुरस ते ।। ९ ।। जगदोध्दारार्थ महीवरी संचार । करिती स्वच्छंदे गुरू नृसिंह यतीश्वर । हिमाचल जगन्नाथ हरिद्वार । अपार तिर्थे हिंडून ।। १० ।। तेचि परमात्मा नृसिंह सरस्वती । सोलापूरहूनि स्वच्छंदे पादगती । जगदुध्दारणार्थ अक्कलकोटाप्रति । तिष्ठले वर्षे एकवीस ।। ११ ।। पूर्वी अत्रिऋषिंनी उग्र तप । कुलाद्रि पर्वती स्त्रीसह अमूप । केले शतवर्ष सानुताप । पुत्र प्राप्त व्हावया ।। १२ ।। वाहे ' निर्विध्या ' नदी नामे । सुगंधिक स्तबक कुसूमे । तेथे वृक्षातळी बोधोपरमे । पत्नीसह ऋषि वसती ।। १३ ।। अत्रिऋषिंच्या सदनी । तेव्हा प्रवेशिले नारद मुनी । ऋषिने बसवूनी आसनी । केले पुजन देवर्षिंचे ।। १४ ।। अनसुया करी घेऊनी मुसल । कांडित होती तंदुल । तदा अत्रिऋषि मागती जल । तृषाकूल जाहले ।। १५ ।। पतिसेवा आज्ञा तत्पर । मुसल थांबवले वरचे वर अधर । सुगंध शुद्धोदक रूचिकर । दिधले सुपात्री आणूनी ।। १६ ।। जल प्राशुनी अत्रिमुनी शांतले । पाहूनी नारदास आश्चर्य वाटले । धन्य पतिव्रता - सामर्थ्य चांगले । ठेविले मुसल अधर हे ।। १७ ।। नारद मुनी विचारिती । आता करावी सुलभ युक्ति । लक्ष्मीस निवेदावी सतिख्याति । वैकुंठाप्रति जाऊनी ।। १८ ।। या त्रैलोक्यांत कोठे असती । आम्हांसम कोण स्त्रिया सुसती । नारदा हे यथा मति । विदित व्हावे आम्हाला ।। १९ ।। तो कलहप्रिय वदे तया । ब्रह्मांडामाजी एक अनसूया । महासाध्वी आदिमाया । सर्वेापमे विराजे ।। २० ।। तृषाक्रांत मुनी एकवेळ । म्हणती आणावे स्वच्छ जळ । सती कांडित होती तांदुळ । ठेविले अधर मुसळ ते ।। २१ ।। नारद म्हणे मी पाहिले प्रत्यक्ष । सत्य शपथ परमेश्वर साक्ष । पतिव्रता अनसूया दक्ष । साक्षात्कारी विशेष ।। २२ ।।नावासारखी करणी एक । ' अनसूया ' नाम सार्थक । बोले तैसे वर्ते सम्यक । असूयाविरहित सर्वदा ।। २३ ।। उमारमासावित्रीस । क्षोभविले लावूनी कलहास । नारद नाचे करी हास । सुस्वर सूरस गायने ।। २४ ।। नारद लावूनी गेले कळी । इकडे सक्रोधे तिघी तळमळी । खेदे गेल्या आपल्या स्थळी । परी काही सूचेना ।। २५ ।। कमलोद्भव कांतेसी म्हणे । तिळमात्र चिंता न करणे । ऐशा सती एक क्षणे । भस्म करीन पुष्कळ ।। २६ ।। वदे शंभूसी उमारमणी । न साहवे अनसूयेची करणी । काय भार मशक चिमणी । दग्ध करू क्षणात ।। २७ ।। मुख्य कलहाचे जनन । नारदाचे आगमन । अंतर्साक्षी जनार्दन । मधुसूदन समजले  ।। २८ ।। म्हणती ऐशा अनेक सती । निमिषांत धाडू यमलोकाप्रति । प्रिये असावी आनंदवृत्ती । चित्ती क्षोभ कशाला ।। २९ ।। ब्रह्मा विष्णू महेश्वर । एकत्र झाले तदनंतर । सती छळणाचा विचार । स्त्रीबुद्धीने मांडिले ।। ३० ।। ब्राह्मण रूपे त्रिवर्ग । भूमंडळी चालले भर्ग । स्त्रीबुद्धीने सती अपवर्ग । करू म्हणती क्षणार्धे ।। ३१ ।। अनसूया साध्वी प्रमुख । जाऊ न देती अतिथीस विन्मुख । करविती प्रेमे प्रसन्नमुख । यथोप्सित अर्पुनी ।। ३२ ।। ऐशा पुण्याश्रमी अतिथी त्रय । येऊनि वदती क्रोधमय । इच्छाभोजन क्षुधार्त प्रिय । द्यावे शिघ्र आम्हासी ।। ३३ ।। जरी तू साध्वी सत्य अससी । होऊनी विगत वसनेसी । वाढावे आम्हा भोजनासी । अनसुयेसी वदती ते ।। ३४ ।।ऐकूनि अतिथींची भाषणे । द्विजवरांसी साध्वी म्हणे । नग्न स्त्री पाहून होणे । काय लाभ तुम्हासी ।। ३५ ।। परकांतेचा समागम । मदांध जे विषयकाम । महारौरव नरकी आराम । पावती बंधन सकळ ते ।। ३६ ।। तुम्ही अतिथी अभ्यागत । भोजन समयी शुद्ध चित्त । असावे हे शास्त्रविहित । पहा निश्चित विचारे ।। ३७ ।। तुमचे भाषण सत्य सुरस । बोध शास्त्रार्थ नको आम्हास । वांच्छा मनी विगत - वास । वाढा म्हणती अतिथी ते ।। ३८ ।। नातरी घेऊन जाऊ सत्त्व । आम्हासी कळते धर्मतत्त्व । सतीस वाटले नवल कर्तृत्व । आले दैवत छळावया ।। ३९ ।। त्रिकालज्ञानी अत्रि-ऋषी । ब्रह्मविद्वर योगवशी । अंतरी देखिलें विधिहरिहरांसी । आलें छळणासी आश्रमीं ।। ४० ।। निजदैवत तीर्थ करून । अतिथींवरी केले सिंचन । तव ते तात्काळ बाले तीन । गोजिरवाणी जाहली ।। ४१ ।। विगत - वसन होऊनी सती । घेतली बालके अंकावरती । तो स्तनी दुग्धधारा सुटती । मग ते पाजिती लेकरा ।। ४२ ।। नेसुनी सतीने वस्त्र चांगले । ध्वजा तोरण उभारविले । गीत वाद्ये गर्जती भले । कोंदाटले नभ सुमूदे ।। ४३ ।। उभयतांसी परमानंद । दाटला प्रकटले करूणाकंद । ईश्वरे पूर्ण केला छंद । त्रयनंदन देऊनी ।। ४४ ।। पुढे काय नवल वर्तले । अकस्मात् नारद पातले । पाहूनि त्रैमुर्ती झाली बाले । देवर्षि हासले गदगद ।। ४५ ।। मग नारद गेले देवलोकी । सुरवर स्त्रियांसी एकाएकी । कोठे गेले विधि - हर - पिनाकी । म्हणती सांगा की माय हो ।। ४६ ।। सावित्री - उमा - रमा त्रिविध । नारदासी विनविती बहुविध । बहुत दिवस न पतीचा शोध । सांगा विदित असेल ते ।। ४७ ।। तुमचे पति अत्रि आश्रमात । बाल होऊनी लोळती पाळण्यात । नारदमुखे आश्चर्यवृत्त । श्रवणे झाल्या सक्रोध ।। ४८ ।। नारदे ऋषि आश्रम दाविला । तिघी म्हणती आत चला । जाऊनी पाहिले बालकांला । अंगी संचारला बहु क्रोध ।। ४९ ।। अनसुयेसी वदती तिघी जणी । शाबरी मंत्र निशीदिनी । बैसूनी जपतीस विजनी । इंद्रजालिके काय गे ।। ५० ।। बहुरूपी तुमचे पती । विदित असूनि क्षोभवृत्ती । जरी आहा मोठ्या सती । कळकळ तळमळ कशासी ।। ५१ ।। स्वपती नोळखिता तुम्ही । वृथा करिता तुम्ही आम्ही । जरी असाल साध्वी काही । न्यावे ओळखून पतींते ।। ५२ ।। निजपतीस ओळखित नसल्या । त्या म्हणाव्या पतिव्रता कसल्या । पतिधर्मी न गेल्या कसल्या । असल्या काय कामाच्या ।। ५३ ।। मग सावित्री लक्ष्मी उमा । त्यागुनी राग गर्व रिकामा । अज्ञाने नेणो आपला महिमा । म्हणती क्षमा करा हो ।। ५४ ।। पातिव्रताधर्म निपुण । अनसूया जगन्माता आपण । आलो अनन्य-एक शरण । द्यावे दान पतींचे ।। ५५ ।। अनसूया सती अलौकिक । दुग्ध परम पुरुषार्थदायक । आत्मतृप्त्यर्थ पिती सान बालक । अघटित कौतुक मायेचे ।। ५६ ।। हा पुत्रसोहळा पाहण्यासाठी । विमानांची झाली दाटी । अत्यादरें स्वर्णपुष्पवृष्टी । सुरवर करिती अखंड ।। ५७ ।।  मार्गशीर्ष शुक्लपक्षी । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्ही सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ।। ५८ ।। ब्रह्मावतार तो 'सोम' । रुद्रावतार 'दुर्वास' नाम । विष्णुस्वरूप 'दत्त' परम । सर्वांसी मान्य योगीश्वर ।। ५९ ।। अनसुया वदे हो सुरांगना । यथा पालिते त्रयनंदना । मी सासू तुम्ही सूना । सुखे नांदा श्वशुरगृही ।। ६० ।। देवस्त्रिया वारंवार नमिती । कृपा करून द्यावे दान पति । ऐकूनी सतीने तीर्थसिंचने मागुती । केले पुरूष पूर्ववत् ।। ६१ ।। हे पाहूनी सर्वांसी वाटले आश्चर्य । म्हणती धन्य धन्य सती ऋषिवर्य । नारद वदे साधले कार्य । अमरात्रय झाले एकत्र ।। ६२ ।। मग त्रैमुर्ती वदती नारदा । आमचे अभेदत्वे दैवी संपदा । विशुद्ध सत्त्वैक विलोकी सर्वदा । दत्त परमेश्वर स्वरूप ।। ६३ ।। तुझेनि मिषे जगतासी परम लाभ । योगी परम भास्कर स्वप्रभ । दत्तजयंती उत्साह समारंभ । करा आरंभ प्रतिवत्सरी ।। ६४ ।। इति संक्षिप्त श्रीगुरूलीलामृत । श्रुतिस्मृतिपुराणसंमत । ब्रह्मनिष्ठ वामन विरचित । प्रथमाध्याय सुरस हा ।। ६५।। 


।। श्रीगुरूदेव दत्त स्वामी समर्थ ।।


श्री गजानन महाराज (राजीमवाले) विरचित श्रीस्वामी समर्थ ध्यानाष्टक


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

भव्यमूर्ती कसा शोभे उंच धिप्पाड साजरा मोद होई जनांलागी मुखडा पाहता बरा ॥१ विशाल नेत्र कैसे ते कर्ण खांद्यास लागती गौरकांती जयाचे ते बाहू जानुस टेकती ॥२ लंबोदर पहा त्याचे गजास्या परी भासते वक्षस्थल तसे मोठे नास अव्यंग शोभते ॥३ रेशमासारखे ऐसे पाद ज्याचे अति मृदू ब्रह्मादि जाहले मुग्ध काय मी त्या मुखे वदू ॥४ एक रुद्राक्ष कंठी तो कौस्तुभापरी भासतो मोतियाच्या कुंडलाने कर्णही बहु शोभतो ॥५ तुलसीकाष्ठमाला ती वैजयंतीच दुसरी पहा ती योगीरायाची ज्ञानमुद्रा तशी बरी ॥६ कपाळी केशरी गंध कस्तुरीचा टिळा तसा कटी कौपिन लेवोनी स्वामिनाथ दिसे कसा ॥७ पूर्णावतार विष्णूचा बुद्धिग्रामासी पातला भक्त तारावया लागी यतीचा वेष घेतला ॥८ स्तोत्र हे स्वामीदासाचे नित्य कोणीही वाचील शीघ्र त्या स्वामीनाथाचा कृपावर्षाव होईल ॥९

इति श्री गजानन महाराज (राजीमवाले) विरचित श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ध्यानाष्टक

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु


Jun 22, 2020

परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी


|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||


परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींची पुण्यतिथी आषाढ शुक्ल प्रतिपदेला अनेक ठिकाणी साजरी केली जाते. या पावन भूमीवर जे प्रमुख संप्रदाय आहेत, त्यांत दत्त संप्रदायाचा निश्चितच समावेश होतो. ह्याच संप्रदायांत अनेक श्रेष्ठ विभूती होऊन गेल्या, ज्यांनी श्री दत्तगुरूंच्या भक्तीचा विस्तार केला. त्यामध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांचे नाव अग्रक्रमानें घेतले जाते.श्री स्वामी महाराजांचा जीवनकाल इ.स. १८५४ ते १९१४ असा होता. ह्या साठ वर्षांच्या आयुर्मर्यादेत त्यांनी आपल्या विशुद्ध उपासना, कुशाग्र बुद्धीमत्ता आणि सामान्य जनांचा उद्धार करण्याची तळमळ या साधनांद्वारे दत्तभक्तांना दत्तोपासनेचे एक विशाल भांडार उघडून दिले.
श्री स्वामी महाराजांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील माणगाव येथे श्रावण वद्य पंचमी शके १७७६ रोजी गणेश भट व रमाबाई ह्या सुशील दाम्पत्यापोटी झाला. स्वामींचे आजोबा हरिभट्ट टेंबे हे स्वत: उत्तम प्रकारे याज्ञीकी करीत असत. त्यांनी वासुदेवांना बालपणी संथा दिली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर संध्यावंदन, वेदाध्ययन व गुरुचरित्र अध्ययन असा स्वामींचा दिनक्रम सुरु झाला. वासुदेव शास्त्रींचा बायोबाईबरोबर विवाह झाल्यावर गृहस्थाश्रमाचें त्यांनी काटेकोर पालन केले. श्री नृसिंहवाडी येथील गोविंदस्वामी ह्या सत्पुरुषाने त्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे दत्तोपासना सुरु केल्यावर प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनी त्यांस मंत्रोपदेश दिला. त्यानंतर, स्वामी महाराजांनी माणगाव येथे दत्तमंदीर उभारले आणि दत्तभक्तीचा प्रसार करण्यास सुरुवात केली.
पुढे, तीर्थयात्रा करीत असतांना १८९१मध्ये त्यांच्या पत्नी कालवश झाल्यावर स्वामींनी संन्यास घेतला आणि अनेक तीर्थक्षेत्री यात्रा करण्यास सुरुवात केली. हे भ्रमण करीत असतांना त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेथील लोकांना मार्गदर्शन केले, दत्तकृपेनें अनेकांच्या अडचणींचे निवारण केले. अनेक चमत्कार, काही अपूर्व गोष्टी महाराजांच्या चरित्रात आढळून येतात. प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा आशीर्वाद लाभल्याने आपल्या या वाटचालीतच त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली.
टेंबे स्वामी नेहेमीच शास्त्रोक्त नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करीत असत. त्यांची दिनचर्या संन्यासधर्मास अनुकूल अशीच होती. स्वामी भल्या पहाटेच उठून प्रात:कर्मे उरकत असत. ते त्रिकाल स्नान करीत असत. दंडतर्पण व प्रणवजप झाल्यावर त्यांच्या संग्रही असलेल्या दत्तमूर्तीचे भस्म लावून पूजन करीत असत. ते स्वतः संन्यासी असल्यामुळे फुले, तुळशी आदी तोडू शकत नव्हते, पण कोणी भक्तांनी आणून दिल्यास ते पूजेत अर्पण करीत असत. त्यानंतर कोणी विद्यार्थी, साधक असल्यास त्यांना वेदाभ्यास वा त्यांचे शंकासमाधान करीत असत. माध्यान्हीं पुन्हा स्नानादी कर्मे झाल्यावर भिक्षा मागत असत. तीनच घरी भिक्षा घ्यायची, असा महाराजांचा नियम होता. सायंकाळी अनुष्ठान झाल्यावर ते पुराण प्रवचन करीत असत. ते इतरांकडून सेवा स्वीकारत नसत. स्वतःचे कपडेही स्वतःच धूत असत. भ्रमणही अनवाणीच करत असतं. चातुर्मासांत होणारा तीर्थक्षेत्रांतील मुक्काम वगळतां इत्तर वेळी कुठेही तीन दिवसांपेक्षा ते अधिक काळ वास्तव्य करीत नसत.
मनोनिग्रह, अनासक्ती आणि व्यासंग हे टेंबे स्वामींचे गुणविशेष विशेष लक्षणीय होते. ज्योतिष, योगशास्त्र, वेदाध्ययन,वैद्यकशास्त्र आदींवर त्यांचे प्रभुत्व होते आणि सर्वदा जनकल्याणासाठीच त्यांनी त्यांचा उपयोग केला. दत्तमाहात्म्य, दत्तपुराण, संस्कृत गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र असे अनेक मौलिक ग्रंथ स्वामींनी रचले. त्याशिवाय त्यांनी लिहिलेली अनेक स्तोत्रें, नित्योपासनेसाठी अनेक पदें आजही दत्तसंप्रदायांत महत्वाची साधने मानली जातात. दीक्षित स्वामी, रंगावधूत महाराज, गुळवणी महाराज, पूर्णानंद स्वामी असे अधिकारी संत श्री वासुदेवानंद महाराजांचे शिष्यगण आहेत. श्री स्वामी महाराजांनी समाधी घेतल्यावरही त्यांचे कार्य त्यांच्या शिष्यांनी पुढे चालू ठेवले. दत्तभक्तांवर स्वामींचे अपार ऋण आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा ॥ वासुदेवानंद सरस्वती सदगुरुनाथा कृपा करा ॥
- हीच परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणीं प्रार्थना !

. . श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची समग्र ग्रंथसंपदा श्री वासुदेव निवास ह्या वेबसाईट वर मोफत उपलब्ध आहे.


तसेच डॉ. वा. व्यं. देशमुख यांनी लिहिलेले . . सदगुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी यांचे चरित्रही - चरित्र चिंतन दत्तभक्तांस वाचता येईल.


Jun 21, 2020

आरती दत्तगुरूंची - श्री गुरु दत्तराज मूर्ती


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ.॥

ब्रह्मा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा

कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा

धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा

कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामधे आयुधे बहुत भरूनी ,

तेणे भक्तांचे क्लेश हरूनी, त्यासी करूनी नमन

अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती

ओवाळीतो प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती... ॥१॥

गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी

भीमा अमर संगमाची, भक्ती असे बहूत सुशिष्यांची

वाट दावूनीया योगाची, ठेव देत असे निज मुक्तीची

काशी क्षेत्री स्नान करितो, करविरी भिक्षेला जातो

माहुरी निद्रेला वरीतो, तरतरीत छाटी, झरझरित

नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती

ओवाळीतो प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती... ॥२॥

अवधुत स्वामी सुखानंदा, ओवाळीतो सौख्यकंदा

तारी हा दास हृदयकंदा, सोडवी विषय मोहछंदा

आलो शरण अत्रीनंदा, दावी सद्गुरु ब्रह्मानंदा

चुकवी चौऱ्यांशीचा फेरा, घालीती षडरिपू मज घेरा

गांजीती पुत्र पौत्र दारा, वदवी भजन मुखी, तव

पूजन करीत असे सुजन जयांचे बलवंतावरती 

ओवाळीतो प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती... ॥३॥



Jun 17, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक २१ ते ३० )




|| श्री गणेशाय नमः ||


दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू . जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


जयतु जयतु दत्तो देवसङ्घाभिपूज्यो

जयतु जयतु भद्रो भद्रदो भावुकेज्यः ।

जयतु जयतु नित्यो निर्मलज्ञानवेद्यो

जयतु जयतु सत्यः सत्यसंधोऽनवद्यः ॥२१॥

भावार्थ : सर्व देव-देवता गण ज्यांचे श्रद्धापूर्वक पूजन करतात, अशा दत्तात्रेयांचा विजय असो. जे अतिशय शुभ, कल्याणकारी आणि भाविकांचे उपास्य दैवत आहेत, अशा दत्तप्रभूंचा विजय असो. शाश्वत आणि विमल (अतिशय शुद्ध, पवित्र ) ज्ञान प्राप्त झाल्यावरच ज्यांच्या मूळ स्वरूपाचे आकलन होते, अशा दत्तमहाराजांचा विजय असो. सत्य हेच ज्यांचे स्वरूप आहे, जे सत्यवचनीं आहेत आणि जे उपाधीरहित आहेत, अशा श्री दत्तांचा विजय असो.


यद्यहं तव पुत्रः स्यां पिता माता त्वमेव मे ।

दयास्तन्यामृतेनाशु मातस्त्वमभिषिञ्च माम् ॥२२॥

भावार्थ : हे अत्रिसुता, पूर्वी केलेल्या कथनानुसार मी तर तुझा पुत्रच आहे. तेव्हा तूच माझा पिता आणि तूच माझी मातासुद्धा आहेस. हे माऊली, तू आपल्या दयारूपी दुधामृताने मला न्हाऊ घाल. (माझ्यावर दयेचा वर्षाव कर.)

Jun 12, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ११ ते २० )



|| श्री गणेशाय नमः ||


दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.


|| श्री गुरुदेव दत्त ||


सर्वमंगलसंयुक्त सर्वैश्वर्यसमन्वित ।

प्रसन्ने त्वयि सर्वेशे किं केषां दुर्लभं कुह ॥११॥

भावार्थ : ब्रह्माण्डातील सर्व मांगल्य, शुभ ज्यांच्या ठायीं एकवटले आहे, सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचे जे स्वामी आहेत असे या सर्व चराचराचे परमेश्वर दत्तमहाराज ज्याला प्रसन्न होतात, त्याला काहीही दुर्लभ कसे असेल बरें ? 


हार्दांधतिमिरं हन्तुं शुद्धज्ञानप्रकाशक ।

त्वदंघ्रिनखमाणिक्यद्युतिरेवालमीश नः ॥१२॥

भावार्थ : हे परमेश्वरा, तू अति विमल ज्ञानाचा प्रकाशक आहेस. आमच्या हृदयांतील अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी तुझ्या चरणांच्या नखरूपी माणिक रत्नाचे केवळ तेजच पुरेसे आहे. (हे प्रभो, आमचे मलिन चित्त शुद्ध करणे तुला सहज शक्य आहे.)  

Jun 11, 2020

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक १ ते १० )



ll श्री गणेशाय नमः ll ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


प्रत्यक्ष दत्तप्रभूंच्या आशिर्वादाने परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी त्यांच्या दिव्य आणि प्रभावशाली ग्रंथसंपदेची निर्मिती केली आहे. ह्या विविध ग्रंथांच्या उपासनेद्वारा भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक प्रश्नावलीदेखील तयार केली आहे. श्री टेंबे महाराज रचित ही प्रश्नावली श्रद्धाळूंना मार्गदर्शन करते, याचा अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे. या प्रश्नावलीत ज्या अठरा साधना सांगितल्या आहेत, त्यापैकी सहावी साधना पुढीलप्रमाणे आहे :

नंदना अनसूयेच्या स्मर चिंतार्त कां असा?।

प्राप्त आहे इष्ट वाची ‘श्रीदत्तभावसुधारसा’॥६॥

श्रीमहाराजांनी गरुडेश्वर येथील चातुर्मासांत लिहिलेले हे सिद्ध प्रासादिक स्तोत्र म्हणजे "श्री दत्तभावसुधारस स्तोत्र." ११० श्लोकांच्या या स्तोत्रांतील, ते ४४ श्लोकांमध्ये दत्तमहाराजांचे स्वरूप व गुणवर्णन केले असून आपला उद्धार करावा, अशी त्यांना प्रार्थनाही केली आहे. श्लोक ४५ ते ५२ यांत श्री दत्तमाहात्म्य आणि श्लोक ५३ ते १०४ यांमध्ये श्री गुरुचरित्र या दोन्ही प्रासादिक ग्रंथांतील कथा एकत्रित गुंफल्या आहेत. तर १०५ ते ११० श्लोकांमध्ये दत्तमहाराजांची दिनचर्या आणि त्यांच्या कृपाप्रसादाची प्रार्थना केली आहे. श्रीदत्तात्रेयांच्या भावभक्तीच्या अमृतरसाची वृष्टी करणारे हे स्तोत्र अतिशय अदभूत असून सत्वर इच्छित फळ देणारे महाप्रासादिक असे आहे. ह्या स्तोत्राचे नियमित पठण केल्यास ते श्रीगुरुचरित्र पारायणा इतकेच लाभदायक आहे. अतिशय रसाळ, सुलभ असे हे स्तोत्र संस्कृत भाषेंत असून ते श्रद्धापूर्वक समजून घेऊन वाचल्यास दत्तमहाराजांच्या कृपेची अनुभूती अवश्य येते. सर्व दत्तभक्त या दिव्यस्तोत्राने कृपांकित व्हावेत यासाठी या स्तोत्राचा भावार्थही दत्तकृपेनें आपण पाहू या.


ऋणनिर्देश : कै. ब्रह्मश्री पंडित आत्मारामशास्त्री जेरे आणि डॉ. वा. व्यं. देशमुख


दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू . जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||


दत्तात्रेयं परमसुखमयं वेदगेयं ह्यमेयं
योगिध्येयं हृतनिजभयं स्वीकृतानेककायम् ।

दुष्टागम्यं विततविजयं देवदैत्यर्षिवन्द्यं

वन्दे नित्यं विहितविनयं चाव्ययं भावगम्यम् ॥१॥

भावार्थ : अत्यंत सुखदायक, वेदांनीही गौरवलेले, सर्वव्यापी, योगींमुनींचे ध्येय असलेले, भक्तजनांचे भय नाश करणारे, अनेक रूप धारण करणारे, दुष्ट जनांना अगम्य असलेले, सर्वत्र ज्यांच्या विजयाचाच डंका वाजत आहे असे, देव-दैत्य आणि ऋषींनाही वंद्य असलेले, अत्यंत विनयशील, भक्तिभावाने प्राप्त होणारे, सर्व विद्या अवगत असलेले आणि अविनाशी असे जे दत्तात्रेय आहेत, त्यांना मी नित्य नमस्कार करतो.  


दत्तात्रेय नमोऽस्तु ते भगवते पापक्षयं कुर्वते

दारिद्र्यं हरते भयं शमयते कारुण्यमातन्वते ।

भक्तानुद्धरते शिवं च ददते सत्कीर्तिमातन्वते

भूतान्द्रावयते वरं प्रददते श्रेयः पते सद्गते ॥२॥

भावार्थ : पापांच्या राशींचा क्षय (नाश) करणाऱ्या, दारिद्र्य हरण करणाऱ्या, भयाचे शमन करणाऱ्या, कारुण्याची मूर्ती असणाऱ्या, भक्तांचा उद्धार करणाऱ्या, त्यांचे अभिष्ट आणि कल्याण करणाऱ्या, कीर्तीचा प्रसार करणाऱ्या, भूत-पिशाच्चादिकांना दूर पळविणाऱ्या, इष्ट वर देणाऱ्या, सर्व सिद्धी प्राप्त असणारे आणि सद्गती प्रदान करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना माझा भावपूर्ण नमस्कार असो. 

Jun 10, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ माला मंत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री  गुरुवे  नम: ॥ श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये ॥

ओम् नमो भगवते श्रीपादप्रभू दत्तात्रेयाय, सहस्त्रकोटी उदिततेजाय, अवधुताय, सुमतीनंदनाय, नरसिंहसुताय, मातृपितृ पुण्यप्रकटरुपाय, आनंदवर्धनाय, बापनाचार्यप्रियाय, ओम् गं गणेशस्वरूपाय, द्रां कालाग्नीशमन दत्तस्वरूपाय, हौ महादेव शिवाय, कालभैरवाय, श्रीं ह्रिं लक्ष्मी ऐश्वर्यसंपत्कराय, व्यंकटेशाय, क्षौं उग्रनृसिंह भक्तसंरक्षकाय, श्रीपादाय, साक्षात् गंधर्वपुरवासाय, नृसिंहसरस्वती दत्तात्रेयाय, प्रज्ञापुरवासाय, सर्वांतरयामी श्रीस्वामी समर्थ नृसिंहभान यतीश्वराय, गायत्री सावित्री चैतन्य मंत्रगर्भाय, आदित्याय, ओम् दत्त दत्त दत्त श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबराय, ऐं ह्रिं क्लिं महासरस्वती महालक्ष्मी महाकाली त्रयरूप अनघाशक्तीपिठाय, वासवीसहित सर्वशक्ती संपन्नाय, जीवशक्ती चैतन्यशक्ती प्रदायकाय, मम सर्व पापराशी ज्वालय ज्वालय, दुष्ट ग्रहान् निवारय निवारय, सर्व शत्रूं संहारय संहारय, मनोवांच्छित पुरय पुरय, मम सद्-बुद्धी प्रेरकाय, द्रां दत्तात्रेयाय, ओम क्लिं सर्वसुखप्रदाय, रक्ष रक्ष रक्षिताय श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर यतीराजाय नमो नमः

श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥