Jun 22, 2020

परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी


|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||


परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींची पुण्यतिथी आषाढ शुक्ल प्रतिपदेला अनेक ठिकाणी साजरी केली जाते. या पावन भूमीवर जे प्रमुख संप्रदाय आहेत, त्यांत दत्त संप्रदायाचा निश्चितच समावेश होतो. ह्याच संप्रदायांत अनेक श्रेष्ठ विभूती होऊन गेल्या, ज्यांनी श्री दत्तगुरूंच्या भक्तीचा विस्तार केला. त्यामध्ये श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांचे नाव अग्रक्रमानें घेतले जाते.श्री स्वामी महाराजांचा जीवनकाल इ.स. १८५४ ते १९१४ असा होता. ह्या साठ वर्षांच्या आयुर्मर्यादेत त्यांनी आपल्या विशुद्ध उपासना, कुशाग्र बुद्धीमत्ता आणि सामान्य जनांचा उद्धार करण्याची तळमळ या साधनांद्वारे दत्तभक्तांना दत्तोपासनेचे एक विशाल भांडार उघडून दिले.
श्री स्वामी महाराजांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील माणगाव येथे श्रावण वद्य पंचमी शके १७७६ रोजी गणेश भट व रमाबाई ह्या सुशील दाम्पत्यापोटी झाला. स्वामींचे आजोबा हरिभट्ट टेंबे हे स्वत: उत्तम प्रकारे याज्ञीकी करीत असत. त्यांनी वासुदेवांना बालपणी संथा दिली. आठव्या वर्षी मुंज झाल्यावर संध्यावंदन, वेदाध्ययन व गुरुचरित्र अध्ययन असा स्वामींचा दिनक्रम सुरु झाला. वासुदेव शास्त्रींचा बायोबाईबरोबर विवाह झाल्यावर गृहस्थाश्रमाचें त्यांनी काटेकोर पालन केले. श्री नृसिंहवाडी येथील गोविंदस्वामी ह्या सत्पुरुषाने त्यांना मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे दत्तोपासना सुरु केल्यावर प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनी त्यांस मंत्रोपदेश दिला. त्यानंतर, स्वामी महाराजांनी माणगाव येथे दत्तमंदीर उभारले आणि दत्तभक्तीचा प्रसार करण्यास सुरुवात केली.
पुढे, तीर्थयात्रा करीत असतांना १८९१मध्ये त्यांच्या पत्नी कालवश झाल्यावर स्वामींनी संन्यास घेतला आणि अनेक तीर्थक्षेत्री यात्रा करण्यास सुरुवात केली. हे भ्रमण करीत असतांना त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेथील लोकांना मार्गदर्शन केले, दत्तकृपेनें अनेकांच्या अडचणींचे निवारण केले. अनेक चमत्कार, काही अपूर्व गोष्टी महाराजांच्या चरित्रात आढळून येतात. प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा आशीर्वाद लाभल्याने आपल्या या वाटचालीतच त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली.
टेंबे स्वामी नेहेमीच शास्त्रोक्त नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करीत असत. त्यांची दिनचर्या संन्यासधर्मास अनुकूल अशीच होती. स्वामी भल्या पहाटेच उठून प्रात:कर्मे उरकत असत. ते त्रिकाल स्नान करीत असत. दंडतर्पण व प्रणवजप झाल्यावर त्यांच्या संग्रही असलेल्या दत्तमूर्तीचे भस्म लावून पूजन करीत असत. ते स्वतः संन्यासी असल्यामुळे फुले, तुळशी आदी तोडू शकत नव्हते, पण कोणी भक्तांनी आणून दिल्यास ते पूजेत अर्पण करीत असत. त्यानंतर कोणी विद्यार्थी, साधक असल्यास त्यांना वेदाभ्यास वा त्यांचे शंकासमाधान करीत असत. माध्यान्हीं पुन्हा स्नानादी कर्मे झाल्यावर भिक्षा मागत असत. तीनच घरी भिक्षा घ्यायची, असा महाराजांचा नियम होता. सायंकाळी अनुष्ठान झाल्यावर ते पुराण प्रवचन करीत असत. ते इतरांकडून सेवा स्वीकारत नसत. स्वतःचे कपडेही स्वतःच धूत असत. भ्रमणही अनवाणीच करत असतं. चातुर्मासांत होणारा तीर्थक्षेत्रांतील मुक्काम वगळतां इत्तर वेळी कुठेही तीन दिवसांपेक्षा ते अधिक काळ वास्तव्य करीत नसत.
मनोनिग्रह, अनासक्ती आणि व्यासंग हे टेंबे स्वामींचे गुणविशेष विशेष लक्षणीय होते. ज्योतिष, योगशास्त्र, वेदाध्ययन,वैद्यकशास्त्र आदींवर त्यांचे प्रभुत्व होते आणि सर्वदा जनकल्याणासाठीच त्यांनी त्यांचा उपयोग केला. दत्तमाहात्म्य, दत्तपुराण, संस्कृत गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र असे अनेक मौलिक ग्रंथ स्वामींनी रचले. त्याशिवाय त्यांनी लिहिलेली अनेक स्तोत्रें, नित्योपासनेसाठी अनेक पदें आजही दत्तसंप्रदायांत महत्वाची साधने मानली जातात. दीक्षित स्वामी, रंगावधूत महाराज, गुळवणी महाराज, पूर्णानंद स्वामी असे अधिकारी संत श्री वासुदेवानंद महाराजांचे शिष्यगण आहेत. श्री स्वामी महाराजांनी समाधी घेतल्यावरही त्यांचे कार्य त्यांच्या शिष्यांनी पुढे चालू ठेवले. दत्तभक्तांवर स्वामींचे अपार ऋण आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा ॥ वासुदेवानंद सरस्वती सदगुरुनाथा कृपा करा ॥
- हीच परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या चरणीं प्रार्थना !

. . श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची समग्र ग्रंथसंपदा श्री वासुदेव निवास ह्या वेबसाईट वर मोफत उपलब्ध आहे.


तसेच डॉ. वा. व्यं. देशमुख यांनी लिहिलेले . . सदगुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी यांचे चरित्रही - चरित्र चिंतन दत्तभक्तांस वाचता येईल.


No comments:

Post a Comment